मराठी भाषेचे सौंदर्य आणि अचूक उपयोग

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in विशेष
28 Feb 2011 - 9:55 pm
मराठी दिन

जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध विषयावरील साहित्य इथे प्रकाशित करण्याचा मानस श्री.ध.मु. आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी व्यक्त केला आहे त्याला अनुलक्षून कोणत्या विषयावर लिहावे हा विचार डोक्यात असताना गेले तीन दिवस आकाशवाणीवरून शासनानेच राज्यातील शाळा-महाविद्यालयांना या निमित्ताने केलेले आवाहन ऐकण्यास मिळाले. शासनाने निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चर्चा, माहिती आदींचे आयोजन तर करावे अशा सूचना संस्थांना दिलेल्या आहेत. हे 'मराठी दिना' निमित्त होईलच. पण या संदर्भात मी काही भाषातज्ज्ञांनी दिलेली व्याख्याने ऐकली आहेत. त्या व्याख्यानामध्ये या ज्येष्ठांनी आग्रहाने आवाहन केले आहे की, 'स्वच्छ आणि व्याकरणदृष्ट्या अचूक' मराठी लिहिण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांनी मराठी महामंडळाचे लेखनविषयक नियमही सर्वांनी पाळावे. तसेच ते नियम वेळोवेळी केवळ विद्यार्थीच नव्हे तर कार्यालय आणि अन्यत्र ठिकाणी होत असलेल्या लिखाणातदेखील अंमलात येतील हे पाहावे. भाषेचे सौंदर्य (जे वाढत्या इंग्रजी मिश्रणाने भ्रष्ट होत चालले आहे) कसे खुलवावे हे सोदाहरण सांगून त्याद्वारे 'मराठी' चे मूळचेच देखणे रूप कसे कायम राहील यावर सातत्याने भर द्यावा.

(ठाणे येथील श्री.अरुण फडके "मराठी शुद्धलेखनाची कार्यशाळा" या मोहिमेंतर्गत हे कार्य फार प्रभावीपणे चालवितात हे इथे आवर्जून सांगणे आवश्यक आहे. त्यानी कोल्हापुरात आयोजित केलेल्या सत्राला मी हजर होतो)

'मराठी दिन' आनंदाने साजरा करीत असताना इथे साहित्य महामंडळाचे लेखनविषयक नियम सांगण्याचा माझा हेतू नाही (पण मि.पा. च्या संपादक मंडळाला त्याची आवश्यकता वाटत असेल तर पुढे कधीतरी ते नियम स्वतंत्र धाग्याच्या रूपाने इथे देता येतील) पण एक गंमत म्हणून मी वरील व्याख्यानातून नोंदविलेली काही उदाहरणे या लेखात देत आहे. ती आपल्या सदस्य वाचकांनी प्रथम वाचन म्हणून पाहावीत.....आणि ही सगळी वाक्ये 'भाषा मांडणीच्या दृष्टीने चुकीची वा अयोग्य असल्याने "योग्य" वाक्यरचना काय असू शकेल हे स्वतःही आणि घरातील सर्व लहानथोर यांच्यासमवेत चर्चा करून परत लिहावीत. इथे ती परत प्रतिसाद म्हणून देण्याची आवश्यकता नाही. मी स्वतःच सर्व वाक्ये दुरुस्त करून नंतर प्रकाशित करतो, म्हणजे त्यानुसार आपण 'भाषा किती अचूक लिहितो [की लिहित नाही] याचा लेखाजोखा सर्वासमवेत करता येईल.

अयोग्य वाक्यरचनेची काही उदाहरणे....

१. मालेगाव येथील पोलिस नियंत्रण कक्षाला पहिल्यांदा जातीय दंगल भडकल्याची माहिती मिळाली.
२. महाराष्ट्रानेही कांद्याचे वाढीव उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारे धोरण स्वीकारले आहे.
३. अखेरीस २० ऑगस्ट १८९५ रोजी तिरके बसणारे व धारदार सोंड असणारे तपकिरी डास न्याहाळताना त्यांच्या रक्तात रॉसला हिवतापाच्या जंतूशी साधर्म्य असणारे जंतू सापडले.
४. पृथ्वीचा भूभाग २/३ पाण्याने व्यापला असला तरी त्यापैकी जवळजवळ ९०% पाणी हे पिण्यायोग्य नाही.
५. गणपती विसर्जनासाठी वापरले जाणारे तलाव आणि जलाशयांवर पालिकेने विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे.
६. डेक्कन एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणी करताना चेकरने कमी दराचे तिकीट काढून प्रवास करणार्‍या प्रवाशाकडून दंडवसुली केली.
७. या पुलाची वाहनाचे वजन पेलण्याची क्षमता सुमारे १० वर्षापूर्वीच संपली असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले होते.
८. शतकभराहून अधिक इतिहास असलेल्या या संस्थेला सरकारने वांद्रे येथे दिलेल्या जागेवर बांधले जाणार असलेल्या नियोजित कलासंकुलाचा आराखडा गेली सुमारे १० वर्षे तयार आहे.
९. बा.सी.मर्ढेकर या वाङ्मयसेवकाचे उद्यापासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.
१०. गणेशोत्सवाने सामान्य माणसाचे मन आणि मत परिवर्तन करण्याचे यशस्वी कार्य केले.
११. राघोजींना डाव हुकला हे पाहून फार वाईट वाटले.
१२. गुपचूप ही कामगिरी उरकली पाहिजे असं मोरोपंतांनी ठरवलं.
१३. बहुतेक पंपचालक हे राजकारणी नेत्यांच्या नातेवाईकांचे आहेत.
१४. एवढे करूनही आत प्लास्टिकच्या वस्तू कोणी नेल्या तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे.
१५. कंपनीतील प्रत्येकाने कंपनी ज्या उत्पादनाची जाहिरात करीत असेल, तेच उत्पादन वापरायचे.
१६. एका कोपर्‍यात डझनभर चालताना वापरावयाच्या काठ्या होत्या.
१७. त्यानंतर घराच्या जमिनीवर, भिंतीवर आणि दरवाजांवरील माझ्या रेखाटनांचे प्रमाण वाढू लागले.
१८. यानंतर संतप्त सदस्यांनी सभापती मीराकुमार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांची भेट न घेताच निघून गेले.
१९. फेब्रुवारीत अवकाश भरारी मारणारी कल्पना चावला अचानक अंतर्धान पावली.
२०. शेवटच्या क्षणी तो दुखापतग्रस्त असल्याने त्याचे नाव संघातून वगळण्यात आले.

--oo0oo--

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

28 Feb 2011 - 10:05 pm | जयंत कुलकर्णी

हं.............
आपण लिहीले आहे ते दुर्दैवाने खरे आहे. बरेच लोक असेच लिहीतात. उदा. आपण जर इंग्लीश मधील जहिरातींचे मराठी रुपांतर बघितलेत तर संत ज्ञानेश्वर वरती परत समाधी घेतील, याची आम्हाला खात्री आहे.

इन्द्रा, लोकांच्या डोक्यांना चालना देणारा चांगला गृहपाठ दिला आहेस.

तू दिलेल्या उदाहरणांपैकी काही वाक्ये सरकारी मराठीची उदाहरणे आहेत, तर काही वाक्ये अभावितपणे, नकळत किंवा वृत्तपत्रीय भाषा चुकीच्या पद्धतीने वापरल्याने मांडणी चुकलेली अशी आहेत. चुकीची गोष्ट सातत्याने समोर येत राहिली की लोकांना हळूहळू त्याची सवय होते, आणि त्यात काही चुकलंय हेच मग बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही.

थोडा विचार केला तर बरोबर काय हे पटकन लक्षात येतं. निदान मी तरी माझ्या लिखाणातील प्रत्येक वाक्य वाचकाच्या नजरेने वाचून पहाते. वाचणार्‍याला त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळेल की नाही असा विचार केला, की वाक्यरचना बरोबर करता येते.

धनंजय's picture

28 Feb 2011 - 10:28 pm | धनंजय

योग्य आणि अयोग्य वाक्यरचनांची तुलना करण्याचे कुतूहल आहे.

चांगला चर्चाविषय.

पुष्करिणी's picture

1 Mar 2011 - 12:25 am | पुष्करिणी

योग्य आणि अयोग्य वाक्यरचनांची तुलना करण्याचे कुतूहल आहे.

+१.

मराठी आता जरी आपण देवनागरीत लिपीत लिहित असलो तरी त्यावर (पूर्वी) मोडी, नागरी लिपी वापरण्याचा प्रभाव असावा का? म्हणजे मोडी भाषेत एकच उकार आणि वेलांटी असतात, नागरीत अनुस्वार नसतो इत्यादी..

मराठीतल्या पंक्चुएशन ( मराठी शब्द? ) बद्दलही मला कुतूहल आहे..पंक्चुएशनही इंग्रजी भाषेची देणगी /प्रभाव आहे का ?

मेघवेडा's picture

1 Mar 2011 - 3:05 am | मेघवेडा

योग्य आणि अयोग्य वाक्यरचनांची तुलना करण्याचे कुतूहल आहे.

+ २.

.... लिपी वापरण्याचा प्रभाव असावा का?

लिपी महत्त्वाची आहेच. तीपेक्षाही भाषेची उत्क्रांती कशी होत गेली हे अधिक महत्त्वाचे असावे. म्हणजे आज आपण जी फोनवतो, टाईपतो अशी क्रियापदं गंमतीत वापरतो, कुणी सांगावं कालौघात ती प्रचलित क्रियापदंही होतील!?!

विरामचिन्हांविषयी सांगायचं तर संस्कृत-प्राकृतात स्वल्पविराम-पूर्णविराम नाहीत. (प्राकृतबद्दल खात्री नाही, पण संस्कृतात दंडाशिवाय इतर काही पाहिलेलं आठवत नाही.) तेव्हा ही विरामचिन्हं तशी अलिकडचीच असावीत असं मानायला हरकत नसावी.

बाकी वरील उदाहरणांत वाक्यातील शब्द अयोग्य क्रमाने मांडल्यामुळे चुकीची ठरत असलेली वाक्ये पाहून संस्कृतात शब्दांच्या क्रमालाही महत्त्व नाही हे आठवले.

उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः।
एषः आह्वयते कुक्कु: च वै तु हि च वै तु हि॥

:)

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 11:02 am | इन्द्र्राज पवार

पुष्करिणी....आणि....मेघवेडा.

दोघांनाही एकत्र प्रतिसाद देत आहे....

तसे पाहिले तर 'देवनागरी' हीच लिपी सर्वार्थाने वैज्ञानिक पद्धतीची मानली गेली आहे. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यानी तर 'देवनागरी' लिपी सर्व भारतीय भाषाकरीता व्यवहारात आणावी असे मत व्यक्त केले होते. गुरूवर्य टागोरांच्या "गीतांजली" ला नोबेल प्राईझ मिळाले, पण केव्हा? तर त्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर झाल्यावर. गांधीजी म्हणतात, "बंगाली लोकांशिवाय देशातील अन्य भाषिकांना 'गीतांजली' वाचायची झाल्यास ती प्रथम देवनागरीमध्ये देणे आवश्यक आहे...", म्हणजे वाचन ध्वनित झाले तर त्या अनुषंगाने अर्थही शोधता येईल. मुळात लिपीच माहीत नसेल तर साहित्यकृतीही कितीही नावाजलेली असली तर तिचा सर्वसामान्यांसाठी काही उपयोग नसतो.

देवनागरी ही पूर्णपणे स्वतंत्र (तसेच नागरी...) असल्याने तिच्यावर मोडीचा कुठलाही प्रभाव नाही. देवनागरीचे प्रकटन त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठीच केलेले आहे. इंग्रजी भाषेत खूप Twists आहेत....उदा. त्या भाषेत (आजही) ख, च, छ, ठ, घ, ढ, ष तसेच ळ हे 'थेट' उच्चार नाहीत. 'च' साठी 'Ch' आहे, पण येथेही गोंधळ असा आहे की, हे Ch केमिस्ट्रीसाठी आहे तसेच चार्मिंगसाठीही वापरले जाते. त्यामुळे आज या क्षणी इंग्लिश शिकणारा मुलगा 'के' आणि 'चा' साठी एकच स्पेलिंग कसे? असे म्हणू लागला तर त्याला शिक्षकाजवळ उत्तर नाही. मात्र देवनागरीमध्ये Phonological accuracy आहे. उदा. इथली एक मि.पा. सदस्य "अदिती"... तिचे हे नाम रोमन लिपीत Aditi असे लिहिले जाते. पण अमराठी व्यक्तीकडून त्याचा उच्चार 'आदिती/अडिती/अदिटी/आडायटी/अदिताय असा काहीच्याकाही होऊ शकतो, मग 'अदिती' ला तो उच्चार उच्चारून समोरच्या व्यक्तीला 'सुधारावे' लागेल. देवनागरी लिपीत ही अडचण नाही.

(हा विषय खूप मोठा आहे....फार सविस्तर लिहावे लागेल. पाहू या)

Punctuation ला मराठी शब्द = विरामचिन्हे
विरामचिन्हे प्रत्येक भाषेचे मूळचेच अंग असल्याने इंग्रजी भाषेची (च) ती देणगी आहे असे म्हणता येणार नाही. मात्र इंग्लिश साहित्याच्या प्रभावामुळे असेल कदाचित, भारतीय लिखाण परंपरेवर विरामचिन्हांचे महत्व ठसले गेले.

उदा. डोईवर जांभळे पागोटे खांद्यावर उपरणे पायात जोडा हातात छत्री खिशात केसरी अशा वेशात टिळक गायकवाड वाड्यात आले.

हे वाक्य मी श्रोत्यांसमोर भाषण म्हणून उच्चारले तर त्याना त्यात चूक किंवा खटकणे संभवत नाही, कारण श्रोतगण त्यावेळी 'ध्वनी' ऐकत असतो आणि त्यामुळे त्याला विरामचिन्हांचे महत्व जाणण्याची आवश्यकता नसते. पण तेच वाक्य मी लिहून तुमच्याकडे पाठविले तर तुम्हाला वाचता तर येईल, पण विरामचिन्हांच्या अभावी ते प्रभावहीन वाटेल.

इन्द्रा

पुष्करिणी's picture

2 Mar 2011 - 12:33 am | पुष्करिणी

देवनागरीवर मोडीचा प्रभाव नाही असं असलं तरी मराठी भाषा काही ठिकाणी जर १९५० च्या आसपास पर्यंत मोडीतून व्यक्त करत असतील तर त्या लिखाणाचा प्रभाव नाही का पडणार असं मला म्हणायचं होतं.

तू दिलेल्या उदाहरणात वाक्यरचना याप्रकारावर भर आहे. आता शुद्ध/ अशुध्द असं म्हणायच म्हणजे फक्त वाक्यरचनाच का? मग प्रस्थापित व्याकरणाच्या सर्व नियमांवर लक्ष ठेवावं लागेल, र्‍ह्स्व/दीर्घ्/संधी/समास्/काळ इ. इ.

'मराठी भाषेचे मूळ सौंदर्य टिकवणे' म्हणजे नक्की काय? इंग्रजीच्या प्रभावात जर विरामचिन्हांचा वापर येत असेल आणि त्याचं स्वागत असेल तर काय स्वीकारायच आणि काय नाकारायच हे ठरवण्याचे निकष कसे आणि कोण ठरवतं? अशा माझ्या ( बाळबोध ) शंका आहेत

अवलिया's picture

1 Mar 2011 - 8:38 am | अवलिया

अमुक एकच वाक्य योग्य आणि त्याव्यतिरिक्त दुसर्‍या पद्धतीने लिहिलेले/बोललेले वाक्य अयोग्य हा निर्णय घेण्याचा अधिकार कुणालाही का आणि कसा मिळतो हे जाणण्यास उत्सुक आहे.

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 11:29 am | इन्द्र्राज पवार

"...अमुक एकच वाक्य योग्य वा अयोग्य हा निर्णय घेण्याचा अधिकार कुणालाही का आणि कसा मिळतो."

~ हे ठरविण्यासाठी काही मापदंड असलेच तर ते व्याकरणाच्या अभ्यासात आहेत. भाषेचे दोन शिक्षक आपापल्या मगदुरीप्रमाणे असा अर्थाविष्कार करू शकतात, तरीही ते एका ठोस निर्णयाप्रत येतीलच याचीही शक्यता धूसर असते.

वरील २० उदाहरणातील एक "बहुतेक पंपचालक हे राजकारणी नेत्यांच्या नातेवाईकांचे आहेत..." हे वाक्य उच्चारले तर "पवारांनी दिलेल्या या वाक्याचा अर्थ आणि भाव मला समजला..." असे म्हणणार्‍या व्यक्तीला व्याकरण आणि रचनेचे महत्व दुय्यम वाटणार कारण त्या वाक्यातील 'रस' त्याने पुरेपूर घेतला आणि त्या वाक्यामुळे जे चित्र त्याच्या नजरेसमोर येणे आवश्यक आहे, ते सहजी आले. इथे तुम्ही म्हणता तसे वरील वाक्य योग्य ठरते. पण अधिकारवाणीने ते वाक्य अयोग्य रचनेचे असून योग्य वाक्य "बहुतेक पंपचालक हे राजकारणी नेत्यांचे नातेवाईक आहेत..." असे जर मी म्हटले तर ते योग्य की अयोग्य याची गरज अर्थ जाणून घेतलेल्या व्यक्तीस वाटण्याची शक्यता अजिबात नाही. कारण दोन्ही वाक्यातून त्याला हवा असलेला अर्थ त्याने जाणला आहेच.

व्याकरणदृष्ट्या मात्र वाक्यरचनेमागे काही हेतू असतो, विधान असते. पूर्ण आणि थेट अर्थ प्रकट करणार्‍या शब्दांची विशिष्ट क्रमाने योजना केली, तर सुस्पष्ट आणि सुंदर वाक्य तयार होते. म्हणूनच वाक्याची व्याख्या करताना स्थूलमानाने असे म्हटले आहे, "पूर्ण अर्थ प्रकट करणारे बोलणे किंवा लिहिणे म्हणजे वाक्य..." आणि तसले वाक्य विचार, अनुभव, चिंतन, व्यासंग, कल्पनाशक्ती, भावात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाक्यातून प्रकटणारी 'सौंदर्यदृष्टी' दर्शवित असेल तर वाचनाची सुंदर अनुभूती प्राप्त होते. या अनुषंगाने अमुक एक वाक्य योग्य की अयोग्य ठरविता येते....अगदी वैयक्तिक पातळीवर.

इन्द्रा

"...अमुक एकच वाक्य योग्य वा अयोग्य हा निर्णय घेण्याचा अधिकार कुणालाही का आणि कसा मिळतो."

हा असा संघर्षाचा मुद्दा नसावा. मला वाटते "वाक्य" ऐवजी "वाक्यरचना" असा शब्द वापरुन वरील प्रश्न पुन्हा उच्चारला तर ?

दाढी तात्विकदृष्ट्या धारदार चाकूने नुसते पाणी लावूनही करता येते.

नुसता स्नानाचा साबण हाताने गालाला लावून खरडण्याचा मार्ग आपण (मी तरी) कधीतरी अवलंबतोच आणि चालून जाईल इतपत दाढी होतेही.

पण तरीही बर्‍याचजणांना दाढीचा साबू, सुवासिक असला तर उत्तम, तो पसरण्यास ब्रश, फोम, कमी कापणारे रेझर, शक्यतो दुहेरी, तिहेरी ब्लेड, मागून आफ्टरशेव्ह असे आवडते आणि हे घटक आणि ही पद्धत नक्कीच जास्त हवासा वाटेल असा दाढीचा अनुभव देतात.

कोणी कशी दाढी करावी हे कोणी इतर कसे ठरवू शकते? हा मुद्दा हुकुमशाहीत, चळवळीत, संघर्षासाठी योग्य आहे.

पण नजाकत म्हणूनही काही गोष्ट असतेच की नाही? त्यासाठी तब्ब्येतीत आणि पद्धतशीर केल्याने मजा येतेच ना?

खरंय, किमान दाढी ही चाकूने होऊ शकते,

लेकिन सलामत अली और नजाकत अली में फर्क जानिये साहब..!!

~ हे ठरविण्यासाठी काही मापदंड असलेच तर ते व्याकरणाच्या अभ्यासात आहेत.

आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण. भाषा ही बदलत असते तद्वतच तिचे स्वरुप विशद करणारे व्याकरण सुद्धा कालानुरुप बदलत असते. १९ व्या शतकातील व्याकरणाची पुस्तके काढुन आजच्या भाषेला लावून पाहिली तर तिथे अनेक फरक आढळतील. व्याकरणाचा आधार घेत वाक्यांचा अर्थ लावणे हे अत्यंत कृत्रिम असुन त्यात भाषेच्या सौंदर्य वगैरेची अनुभुती येते असे म्हटले तर बोली भाषा, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य यांना अर्थ उरत नाही कारण ते व्याकरणाच्या नियमांना डावलूनच असतात. तरीही अनेकांना त्या साहित्या मधे सौंदर्य सापडते याचाच अर्थ ते व्याकरण बाजूला ठेवतात. मिपाच्या भाषेत फाट्यावर मारतात. नव्हे तसे मारावेच लागते.

म्हणूनच वाक्याची व्याख्या करताना स्थूलमानाने असे म्हटले आहे, "पूर्ण अर्थ प्रकट करणारे बोलणे किंवा लिहिणे म्हणजे वाक्य..." आणि तसले वाक्य विचार, अनुभव, चिंतन, व्यासंग, कल्पनाशक्ती, भावात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाक्यातून प्रकटणारी 'सौंदर्यदृष्टी' दर्शवित असेल तर वाचनाची सुंदर अनुभूती प्राप्त होते. या अनुषंगाने अमुक एक वाक्य योग्य की अयोग्य ठरविता येते....अगदी वैयक्तिक पातळीवर.

म्हणजेच "पूर्ण अर्थ प्रकट करणारे बोलणे किंवा लिहिणे म्हणजे वाक्य..." जरी व्याकरण दृष्ट्या अयोग्य असले तरी जर ते अर्थपुर्ण असेल तर ते ग्राह्य होते हे सिद्ध. आता अर्थपूर्ण कशाला म्हणावे याला वैयक्तिक संदर्भ येतच असतात. सबब व्याकरण इथेही अनावश्यक होते.

भाषेतल्या शब्दांवर कोणी शुद्ध अशुद्ध असा शिक्का मारणार असेल तर त्याची कीवच करावी. ते फार चूक आहे.

नियम फक्त ह्रस्व, दीर्घ, विरामचिन्हे, रचनेचा क्रम याबाबतीत असावेत.

उदा.

कुटं जाऊन र्‍हायलीस... ? --- शुद्ध वाक्य.

कुटं जाऊन र्‍हायलिस... ? ---अशुद्ध वाक्य.

म्या थितं ग्येलोच न्हवतो. त्योच आला सोताहून. -------शुद्ध वाक्य.

म्या थितं ग्येलोच न्हवतो त्योच आला सोताहून. -----अशुद्ध वाक्य - कारण पूर्णविराम, स्वल्पविराम नसल्याने वाक्य जंबल झाले

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 2:19 pm | इन्द्र्राज पवार

"....व्याकरणाचा आधार घेत वाक्यांचा अर्थ लावणे हे अत्यंत कृत्रिम असुन त्यात भाषेच्या सौंदर्य वगैरेची अनुभुती येते असे म्हटले तर बोली भाषा, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य यांना अर्थ उरत नाही कारण ते व्याकरणाच्या नियमांना डावलूनच असतात. ..."

~ हे मान्य, कारण ते वादातीत आहे. दलित आणि ग्रामीण साहित्याचा बाजच असा आहे की त्या मातीतील शब्द वा रचना नसेल तर लेखकाचा मूळ हेतूच हरवून बसेल. त्या संस्कृतीची अभिव्यक्ती व्याकरणाच्या पट्टया वा तत्सम मोजदंड लावून केले तर त्या कथानकाचा आत्मा सापडणारच नाही.....आणि समीक्षक तसे करीतही नाहीत हे आपण जाणतोच. आपला मुद्दा आहे तो व्यावहारिक बोली आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या लिखाणाचा पोत तपासण्यासंदर्भातील. ललित वाङ्मयातील स्वातंत्र्य इथे घेता येणार नाही.

'श्यामची आई' मध्ये आंघोळ घातल्यावर आईने आपले तळवेही पुसावे असा हट्ट लहानगा श्याम धरतो. आई आपल्या लुगड्याने त्याचे तळवे पुसून म्हणत, 'बाळ, पायाला घाण लागू नये म्हणून तू जसा जपतो, तसाच मनालाही घाण लागू नये म्हणून जप हो.' असे जे म्हणते ते भाषेच्या सौंदर्यालाही जसेच्यातसे लागू होते असे मी मानतो. भाषेचा इतिहास तपासताना त्यात ग्राम्य भाषेतील शिव्या आणि त्याबाबतची राळ जिभेवर येणारच, पण नंतर ती स्वच्छ करूनच आपण इतरांशी संभाषण चालू ठेवतो कारण त्या शिव्यांची छाया आपल्या मनावर पडू नये याची दक्षता आपण घेतलेली असते.

दया पवार, लक्ष्मण माने, प्र.न.सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड प्रभृतींनी जी भाषा मराठी साहित्यात आणली ती तशी आणली नसती तर त्यांच्या वेदनेची दाहकता जाणवलीच नसती हे जितके खरे, तितकेच हेही खरे की म्हणून त्याच भाषेत आपण व्यावहारिक पातळीवरील 'भाषेचे संस्कार स्वीकारावेत का?" या पठडीतील लेखकांनी व्याकरणाच्या नियमाला केराची टोपली दाखविली ती जाणीवपूर्वक नसून तो त्यांच्या राहणीचा अविभाज्य घटक प्रदर्शित करण्याचा एक अस्सल मार्ग म्हणून....आणि तीच त्या वाङ्मयाची मर्यादा मानली पाहिजे. नित्याचे व्यवहार करताना ही लेखकमंडळी व्याकरणशुद्धच मराठी लिहितील आणि आपल्या पाल्यांनादेखील भाषेचे योग्य संस्कार कसे मिळतील याकडे लक्ष देतील.

व्याकरणाला, तुम्ही म्हणता तसे 'मिपाच्या भाषेत फाट्यावर मारावे लागते" हे खरंय, पण ते 'काही वेळा' असे असावे. 'कायमच फाट्यावर मारावे...' अशीही टोकाची भूमिका घेतली तर सरतेशेवटी भाषेची लक्तरे काढणे हेच इथले व्यवच्छेदक लक्षण मानले जाईल.

इन्द्रा

तुमची आमची सहमती होणार नाही तेव्हा इथेच थांबलेले बरे.

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 7:27 pm | इन्द्र्राज पवार

"...थांबलेले बरे...."

~ तुमच्या मताचा आदर करतो, पण व्यक्तीशः मला आनंद झाला असता भाषेसंदर्भातील ही चर्चा अजून पुढे गेली असती तर. शेवटी ही कोणती अभिनव अशी चर्चा नसून भाषावृद्धीसंबंधात असल्याने तिच्यात निरोगी मते-मतातंरे अपेक्षित असतातच.

पण पाहु पुढेही, अन्य कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने. तुमच्या प्रतिसादांनी मलाही मेंदूवरील धूळ काहीशी झटकता आली हे इथे नमूद करणे आवश्यक आहे असे म्हणतो.

इन्द्रा

टारझन's picture

1 Mar 2011 - 2:53 pm | टारझन

अशीही टोकाची भूमिका घेतली तर सरतेशेवटी भाषेची लक्तरे काढणे हेच इथले व्यवच्छेदक लक्षण मानले जाईल.

येथे "मानल्या जाईल " असा सुद्ध बदल सुचवु इच्छितो . बाकी नाना आणि इंद्राशी सहमत. विकासची अभ्यासपुर्ण प्रतिक्रीया वाचायला आवडेल आणि क्लिंटण च्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत.

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 7:33 pm | इन्द्र्राज पवार

"...बाकी नाना आणि इंद्राशी सहमत....!"

~ हे आवडले....टारझनसारख्या इथल्या लखलखणार्‍या तार्‍याने माझ्या कुठल्यातरी मुद्द्याशी सहमत व्हावे यापरते दुसरे समाधान नाही. थॅन्क्स !

इन्द्रा

गवि's picture

1 Mar 2011 - 11:18 am | गवि

अगदी महत्वाच्या विषयाला हात घातलात. सुवासिक आंबेमोहोराच्या भातात घासाघासाला खडे यावेत तसे अशुद्ध लिखाण वाचताना वाटते.

अमुक एका गटाची भाषा ती शुद्ध आणि इतरेजनांची अशुद्ध असे मुळीच नाही. पण एक नियमितपणा असावा. पूर्वीचा नियमसंच केवळ बंडखोरी म्हणून मान्य करायचा नसेल तर नवीन नियम बनवावेत, म्हणजे रचना प्रत्येक वेळी वेगळी होऊन संभ्रम होऊ नये.

चिवट ला चीवट म्हणा हवे तर, त्याने भांडणे टळत असतील तर..पण मग यापुढे सगळेच चीवट म्हणू.. मेंदूला लवकरच सवय होईल..

फक्त ह्रस्वदीर्घासाठी एक काहीतरी साचा हवाच.

बाकी नवे शब्द बनवणे, बोलीभाषेतून उचलणे याला वाव ठेवला पाहिजे. तरीही शेवटी वाचणार्‍याला ती एक वाचनीय रचना वाटावी एवढी किमान अपेक्षा ठेवलीच पाहिजे.

बोलीभाषेचा विषय वेगळा. त्याला स्वतःचे संदर्भासहित व्याकरण असतेच आणि त्यामुळे तिथे पन, आनि, टकुर्‍यात असे शब्द कानाला खटकत नाहीत. ही अशुद्ध भाषा नव्हे. हा बोलीभाषेचा लहेजा आहे.

वाक्यरचनेतल्या डुलक्या मात्र तुमच्याकडे शिकवणी लावून दुरुस्त कराव्या अशी इच्छा होत आहे. :)

अखेरीस २० ऑगस्ट १८९५ रोजी तिरके बसणारे व धारदार सोंड असणारे तपकिरी डास न्याहाळताना त्यांच्या रक्तात रॉसला हिवतापाच्या जंतूशी साधर्म्य असणारे जंतू सापडले.

हे वाचून अक्षरशः पु.लं.चे खुर्च्या (भाड्याने आणलेल्या) हे न नाट्य (अतिभाषांतरित विडंबन) आठवले..

आणखी एक आठवलेलं वाक्य :

-बंदूक घेऊन पळणार्‍या सशाचा पाठलाग करताना तो ठेच लागून पडला.

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 3:23 pm | इन्द्र्राज पवार

...तरीही शेवटी वाचणार्‍याला ती एक वाचनीय रचना वाटावी एवढी किमान अपेक्षा ठेवलीच पाहिजे. ..."

~ थॅन्क्स ग.वि., नक्कीच, खुद्द भाषातज्ज्ञांनी याच नजरेतून भाषेच्या धाटणीकडे पाहिले आहे. "बहु भुकेला झालो | तुमच्या उष्ट्यांसाठी आलो |" असे दीनवाणे उदगार संत चोखोबांनी काढले. यातील वेदनेची तार तुम्हाआम्हाला भाजून टाकते, आणि जे दहा पानात लिहून साधणार नाही ते अशा अर्ध्यामुर्ध्या ओळीतील रचनेत मिळते. इथे वाचनाची 'अ‍ॅसिड टेस्ट' यशस्वी ठरते. मग ते सूत्रबद्ध आहे की नाही, त्यात व्याकरणाचे नियम पाळले गेले की नाही, कानामात्रार्‍हस्वदीर्घ जागच्याजागी आहेत की नाही, आदी घटक दुय्यम ठरतात.

पण अशी रचना सहजगत्या वा खोलवर दडलेल्या अन्यायाच्या भावनेने आली असेलच तर तिचे सौंदर्य खुलेल, अट्टाहासाने एखादे वाक्य लिहायचे आणि "वाचा लेको, आम्ही असेच लिहिणार..." हा दुराग्रह झाला. "अभिहस्तांकित कार्यात तथ्यसाहचार्य लोपले असल्याने ते कथीत असे अनुदिप्तिशील झाले आहे..." असली दुर्बोधता पांघरून एखादे वाक्य समोर आले तर त्यात कसली सौंदर्यस्थळे आपण शोधणार? ही रचना वाचता येईल पण ती वाचनीय आहे असे वाचक कदापिही म्हणू शकणार नाही. शेवटी लिखाणातील नेमके सौंदर्य कसे आणि कुठे शोधायचे यासाठी 'टाईम टेस्टेड सोल्युशन' नाही. हे नेमकेपण ज्याच्या त्याच्या मगदुरीचा भाग झाला.

"ब्रह्म कसे असते ?" असा प्रश्न आल्यानंतर एका साधूने जो प्रयोग केला तोच आपण करू शकतो. प्रश्नाला उत्तर देताना साधूने पृच्छ्काला एक खडीसाखरेचा खडा दिला आणि म्हटले, "टाक तोंडात." पृच्छकाने तसे केल्यावर साधून त्याला विचारले, "कसा लागतो?" "म्हणजे काय, खडीसाखरेसारखा. त्याचे वर्णन कसे करता येईल?" "मग ब्रह्म तसेच असते," साधू उत्तरला. भाषेतील सौंदर्याची कलात्मक प्रतीती ही अशीच असते. तिचे नेमके वर्णन करता येत नाही. वाचनावरच तिची साक्ष मनोमन पटत जाते. आपण ती तशी का वाटली वा वाटली नाही त्याची कारणमीमांसा करू शकतो. पण उद्या इथल्या एखाद्या सदस्याने म्हटले, 'मला भाषेच्या सौंदर्याशी काही देणेघेणे नाही...' तर त्याला उत्तर नाही. हे शास्त्रच अशा प्रकारचे आहे की भाषा लिहिणार्‍याने आणि वाचणार्‍याने आपल्या तार्किक बुद्धीचा वापर करून त्याचे ग्रहण करावे.

"औदुंबर" मध्ये विश्वाच्या सौंदर्याचे वर्णन शोधणार्‍याला "पिपांत मेले ओल्या उंदिर..." मध्ये तसली एकही ओळ सापडणार नसल्याने त्याने मर्ढेकरांना सौंदर्यशास्त्रच समजले नाही असा दावा केला तर तो खोडून काढण्याचा यत्नही करू नये, हेच खरे.

इन्द्रा

चिंतातुर जंतू's picture

1 Mar 2011 - 4:13 pm | चिंतातुर जंतू

"औदुंबर" मध्ये विश्वाच्या सौंदर्याचे वर्णन शोधणार्‍याला "पिपांत मेले ओल्या उंदिर..." मध्ये तसली एकही ओळ सापडणार नसल्याने त्याने मर्ढेकरांना सौंदर्यशास्त्रच समजले नाही असा दावा केला तर तो खोडून काढण्याचा यत्नही करू नये, हेच खरे.

हे जर मान्य केले तर मग हेही म्हणणे भाग पडते की ज्याला 'पिपांत मेले...' आवडते त्याने 'औदुंबर'ला नाके मुरडली तर तेही खोडून टाकण्याचा यत्न करू नये! पण मग या अशा एका शैलीलाच सुंदर मानणार्‍याने दुसर्‍या शैलीला निव्वळ नाके मुरडण्याच्या संस्कृतीने वाङ्मयाच्या आणि पर्यायाने भाषेच्या अवतीभवती हेकटपणा आणि अंतिमतः अज्ञानच वाढते का, हा प्रश्नदेखील विचारायला हवा.

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 11:53 pm | इन्द्र्राज पवार

"...ज्याला 'पिपांत मेले...' आवडते त्याने 'औदुंबर'ला नाके मुरडली तर तेही खोडून टाकण्याचा यत्न करू नये!..."
~ मी प्रतिसादात Vice-versa म्हणायला हवे होते. पण ठीक आहे, माझे मतही याबाबतीत तुमच्यापेक्षा वेगळे आहे असे नाही. फक्त तसे करण्यामागे निश्चित अशी एक भूमिका त्या विरोधकाकडे असणे नीतांत गरजेचे असत, अन्यथा चूष म्हणून विरोध करण्यात कसला आला आहे सौंदर्याविष्कार ? कलात्मक आस्वादाची शक्ती निसर्गाने प्रत्येकाला दिलेली असते हे खरे, पण प्रत्येकाने तिची मशागत केलेली असते, विकसन केलेले असते असे नाही. कलात्मक आस्वाद ही किती तरल आणि म्हणूनच किती कठीण गोष्ट आहे याचाच भाषाशास्त्राचा अभ्यास करणार्‍यालाच पत्ता नसतो. अत्र्यांनी संपादकीयातून मर्ढेकर आणि खानोलकरांना शिव्या घातल्या म्हणजे संपले....ते दोघे सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासातून नापास. याला कलेचा आस्वाद म्हणणे म्हणजे जोतिबाच्या जत्रेत हिंडलो पण तेथील अबीरबुक्का अंगावर घेतला नाही असेच म्हणावे लागेल.

दुसर्‍यांचा वा नावडत्या शैलीला नाके मुरडण्याच्या संस्कृतीने अंतीमतः वाङ्मयाचेच नुकसान होत असते हे विनातक्रार मान्य करायलाच हवे. "सात सक्कं..." नाही आवडू दे एखाद्याला...पण त्याने ती कादंबरी वाचून तो निर्णय घेतला पाहिजे. उगाच कुणीतरी 'अ' सांगतो त्याला 'ब' दुजोरा देतो, मग हा 'क' त्या कादंबरीला हातही न लावता त्या शैलीच्या चिंध्या करणार्‍या चर्चेत हिरीरीने भाग घेतो, यावेळी तो स्वतःलाच फसवत नसून पर्यायाने वाङ्मयीन कलाकृतीचा अपमानही करत असतो.

इन्द्रा

अवलिया's picture

2 Mar 2011 - 8:44 am | अवलिया

~ मी प्रतिसादात याचा व्यत्ययासही मान्य आहे असे म्हणायला हवे होते. पण ठीक आहे, माझे मतही याबाबतीत तुमच्यापेक्षा वेगळे आहे असे नाही. फक्त तसे करण्यामागे निश्चित अशी एक भूमिका त्या विरोधकाकडे असणे नितांत गरजेचे असत, अन्यथा चूष म्हणून विरोध करण्यात कसला आला आहे सौंदर्याविष्कार ? कलात्मक आस्वादाची शक्ती निसर्गाने प्रत्येकाला दिलेली असते हे खरे, पण प्रत्येकाने तिची मशागत केलेली असते, विकसन केलेले असते असे नाही. कलात्मक आस्वाद ही किती तरल आणि म्हणूनच किती कठीण गोष्ट आहे याचाच भाषाशास्त्राचा अभ्यास करणार्‍यालाच पत्ता नसतो. अत्र्यांनी संपादकीयातून मर्ढेकर आणि खानोलकरांना शिव्या घातल्या म्हणजे संपले....ते दोघे सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासातून नापास. याला कलेचा आस्वाद म्हणणे म्हणजे जोतिबाच्या जत्रेत हिंडलो पण तेथील अबीरबुक्का अंगावर घेतला नाही असेच म्हणावे लागेल.

दुसर्‍यांना वा नावडत्या शैलीला नाके मुरडण्याच्या संस्कृतीने अंतिमतः वाङ्मयाचेच नुकसान होत असते हे विनातक्रार मान्य करायलाच हवे. "सात सक्कं..." नाही आवडू दे एखाद्याला...पण त्याने ती कादंबरी वाचून तो निर्णय घेतला पाहिजे. उगाच कुणीतरी 'अ' सांगतो, त्याला 'ब' दुजोरा देतो, मग हा 'क' त्या कादंबरीला हातही न लावता त्या शैलीच्या चिंध्या करणार्‍या चर्चेत हिरीरीने भाग घेतो, यावेळी तो स्वतःलाच फसवत नसून पर्यायाने वाङ्मयीन कलाकृतीचा अपमानही करत असतो.

***

दोन चार ठिकाणीच सुधारणा सुचवल्या आहेत. त्या सुधारणा नसत्या तरी इंद्रा यांना काय म्हणायचे आहे हे मला तरी समजले होते. त्यांच्या त्या तथाकथित चुका त्यांच्या मनातील भाव माझ्यापर्यंत पोहोचण्यात कोणतीही आडकाठी आली नाही.

परंतु सौंदर्य वाढवण्यासाठी मराठीचा अचुक उपयोग केला जावा असे प्रतिपादन करणार्‍या इंद्रा यांच्याच प्रतिसादात त्यांनी केलेल्या चूका पाहून मजा वाटली आणि आमचाच सिद्धांत बळकट होत आहे हे पाहून समाधान वाटले ;)

इन्द्र्राज पवार's picture

2 Mar 2011 - 10:29 am | इन्द्र्राज पवार

"....मराठीचा अचुक उपयोग केला जावा ....

~ नितांत + अंतिमतः मान्य..... पण डालगे भरून गेलेल्या धान्यात असे एकदोन टोके सापडले म्हणून धान्याचा कस कमी झाला असे तरी मानू नका.

(माझी चूक काढताना तुम्हीही अचुक ही चूक केलीच ना? होते असे कधी कधी बेसावधपणे, पण त्यामुळे एखाद्याच्या सिद्धांताला त्यामुळे ढाळ लागते असेही नाही.)

इन्द्रा

माझी चूक काढताना तुम्हीही अचुक ही चूक केलीच ना? होते असे कधी कधी बेसावधपणे, पण त्यामुळे एखाद्याच्या सिद्धांताला त्यामुळे ढाळ लागते असेही नाही.)

हा हा !

आमच्या सिद्धांता नुसार अचुक आणि अचूक हे दोन्ही शब्द समान अर्थाचे आहेत.

कसे ते सांगतो

माझ्या काही मित्रांपैकी एक जण खुप भरभर बोलतो तो अ.चु.क. असे तिन्ही शब्द पटकन बोलतो त्याचे लेखी रुपांतर अचुक होते

एकजण हळू हळू बोलतो अ...चु....क... मधला वेळ लेखी दाखवता येत नाही म्हणून अचुक

एक जण चु लांबवतो... अ.. चुउ.. क त्याचे लेखी रुप अचूक

अजुन एक जण अ...चुऊऊ..क असे बोलतो त्याचे लेखी रुप अचूऽक असे होते

अशा प्रकारे अनेक प्रकारे अ चु क ह्या अक्षरांनी बनलेला शब्द उच्चारला जातो ते सर्व शब्द शुद्ध आणि योग्यच असतात

आता यातला लेखी अचूक हाच बरोबर बाकीचे चुक हे मराठी भाषेचा संदर्भ घेता लागूच पडत नाही कारण मराठी भाषा बोली भाषा आहे संस्कृतप्रमाणे (संस्करण करुन तयार केलेली) नाही. त्यामुळे संस्कृतप्रमाणे व्याकरण नियम मराठीला बसवणे अमान्य.

असो. पुन्हा एकदा तुमची आमची सहमती होणार नाही हे नक्की :)

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 5:02 pm | धमाल मुलगा

आधीच आमचा ह्या भानगडीतला व्यासंग दांडगा, आणि त्यात साद-प्रतिसादांतली मत-मतांतरे वाचून पार भिरभिरलो. :)

माझं वैयक्तिक मत असं आहे, की व्याकरणदृष्ट्या शुध्दतेचा आग्रह जरुर धरावा, पण त्याचा अट्टाहास नसावा. जिथे अर्थाचा अनर्थ होतो (मराठी दिन <=> मराठी दीन) तिथे जरूर पथ्यं पाळायला हवी, मात्र प्रत्येकच ठिकाणी अट्टाहास नसावा. अट्टाहासातून आक्रमकता आणि आक्रमकतेतून हल्ल्याची भावना वाढीस लागणे मला तरी अयोग्य वाटते. संस्थळांवर वावरताना असे लक्षात येते की काहीजण शुध्दलेखनाबद्दल अत्यंतिक आग्रही असतात. त्यातून कित्येक नवख्या लोकांना शुध्दलेखनावरुन टोमणे, डिवचणे,चिडवणे इत्यादी प्रकार घडताना दिसतात्/घडले आहेत. हे योग्य नाही.

मराठीच्या अचूक वापराबद्दल मात्र सहमत आहे. अगदी आम्ही गमतीनं सिगारेटीला म्हणतो तसं 'श्वेतधुम्रउत्सर्जनदंडिका' छाप जडबंबाळ संस्कृतप्रचुर शब्दच वापरले पाहिजे असं नव्हे, पण आजकाल अगदी वर्तमानपत्रांमध्ये येणार्‍या 'नवा आदेश जारी झाला' छाप शिर्षकांसारखंही नसावं.
म.टा.सारखं वर्तमानपत्र तर आधी हिंदीतून मजकूर तयार करुन मग त्याचं जमेल तितकं भाषांतर करुन छापतात की काय असा प्रश्न पडतो. गेल्या काही वर्षांपर्यंत दै. सकाळची प्रुफं धड तपासली जात होती असं आजकालच्या भाषेवरुन प्रकर्षानं जाणवतं. किंवा.....त्या काळपर्यंत मराठी कशी असते ह्याची माहिती असलेले लोक प्रुफं तपासत असावेत असं वाटतं.

जर, वर्तमानपत्रं, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक मिडिया ह्या सगळ्याच स्त्रोतांकडून दोषपुर्ण मराठीचा भडीमार होत असेल तर 'छापलंय ना, हेच योग्य असावं' अशी समजुत होत जाणं / सतत त्याच प्रकारचे शब्दप्रयोग वाचून / ऐकून आपसूक तसंच भाषेत मिसळलं जाणं हे अगदीच सहाजिक आहे.

मला कल्पना नाही, पण आजच्या घडीला वृत्तपत्रसंस्था, प्रकाशनसंस्था इत्यादींमध्ये 'प्रुफ रिडर'च्या नोकरीसाठी आलेल्यांच्या शुध्दलेखनाची कितपत चाचणी घेतली जाते?

शाळांमध्ये मराठी शिकवणार्‍या किती शिक्षकांना स्वतःला शुध्दलेखनाबद्दल पुरेपुर माहिती आहे?
किती शिक्षक शुध्दलेखनाची सवय आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बाणवतात?
(इथे मी किती मुलं मराठी शाळांत जातात हा कळीचा मुद्दा घेतलेलाच नाही. अमराठी शाळांत काहीही कारणास्तव मराठी विषय अभ्यासाला ठेवणे ही गरज असेल तर ती केवळ ' कसंबसं मराठी शिकवता येतं' ह्या जुजबी पात्रतेवरही शिक्षक नेमले जात असावेत असं एकुणच चित्र पाहून अंदाज बांधता येतो. त्यामुळे त्यांच्याकडून शुध्दलेखनावर भर देण्याची अपेक्षा करत नाही.)

'सरकारी मराठी' नावाची एक त्रयस्थ भाषा अस्तित्वात आहे. त्याबद्दल काही न बोललेलंच बरं.

अशा एकुण वातावरणाच्या प्रभावाखाली असलेल्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी कुठून शुध्दता शिकावी? ती प्रत्येकानं कशी बाणवावी?

११ कोटी+ इतकी मराठी भाषिक जनता आहे. प्रश्न चर्चेसाठी सोपा असला तरी अंमलबजावणी कशी करायची हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा असावा असं मला आपलं वाटतं.

स्पंदना's picture

2 Mar 2011 - 8:18 am | स्पंदना

इंन्द्रा च्या कोणत्याही लेखावर बाकिच्यांच्या प्रतिक्रिया आल्या शिवाय आपण काहीही बोलणे नाही असे मी ठरवुन टाकले आहे.

वरील साधक बाधक चर्चेने बरच काही समजल अन उमजल सुद्धा!
सार्‍या प्रतिसाद्कांचे अन लेखकाचे आभार!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2011 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील साधक बाधक चर्चेने बरच काही समजल अन उमजल सुद्धा!
सार्‍या प्रतिसाद्कांचे अन लेखकाचे आभार!

अ अ शी सहमत.....!

टारझन's picture

2 Mar 2011 - 11:46 am | टारझन

अ अ शी सहमत.....!

गेल्या शुक्रवार पासुन ह्या प्रतिक्रीयेतल्या "अ अ" चा विचार करत होतो .. पण आज अचानक स्वप्न पडलं आणि तो अ अ म्हणजे अपर्णा अक्षय आहेत त्याचा साक्षात्कार झाला .. :)

अवांतर : ह्या अ अ अजुन मराठी कशा नाही झाल्यात ?

आळश्यांचा राजा's picture

2 Mar 2011 - 9:44 pm | आळश्यांचा राजा

मराठीतले आपल्याला (म्हणजे मला) ट कळत नाही हे आज कळलं!

बाकी टारझण यांच्याशी सहमती व्यक्त केल्या जात आहे!