देव जरी मज...

अमित करकरे's picture
अमित करकरे in जनातलं, मनातलं
3 Feb 2011 - 7:06 am

'देवबाप्पा खूप पॉवरफुल व ग्रेट आहे. त्याला सर्व जगाची काळजी असते. देवबाप्पाला शांत मुले व मोठ्यांचे ऎकणारी मुलेच आवडतात. तो आपले सारे हट्ट पुरे करतो. आजी म्हणते की आपण त्याचे ऎकले नाही की त्याचा कोप होतो, तो चिडतो व आपल्याला शाप देतो. तो खुश असेल तर आपण मागू ते मिळतं… मी कधीच देवबाप्पाला भेटलेलो नाही पण तो जसा वागतो अगदी तसेच माझे बाबा सुध्दा वागतात, मग माझे बाबाच देव आहेत का?’ – इयत्ता तिसरीमधील एका मुलाने विचारलेला एक प्रश्न.

काय उत्तर देणार?

तुम्ही देव माना अथवा मानू नका, पण प्रत्येकाचे देवाबद्दल काही ना काहीतरी मत हे असतेच, मग ते अगदी देवाला कधी रिटायर करायचे, याबद्दल का असेना. देव ही एक संकल्पनाच आहे, पण काहींच्या मते तो अनुभवही आहे. काहींच्या जीवनात असे प्रसंग घडले आहेत की त्यांना चमत्कारच म्हणता येईल. पण या लेखामागे माझा देवाच्या या कामांचा विचार नाही. माझ्या मनातील प्रश्न याहूनही मूलभूत आहेत.

एक तर त्या तिसरीतल्या मुलाप्रमाणेच मलाही हा प्रश्न पडतो की जर त्याच्या मनासारखे केले नाही तर देव चिडणार असेल, जर त्याला अमुक पदार्थ – तमुक फुल किंवा अमकाच रंग आवडणार असेल, तर त्याच्यात अन माझ्यात काय फरक? त्यानेच निर्माण केलेल्या भावना व वासनांवर त्याचाच कंट्रोल असायला हवा की नको?

मला असे शिकवले गेले की देव सर्वशक्तिमान आहे व त्यानेच या सर्व जगताची, त्यातील निसर्गाची, प्राणीमात्रांची [त्यात आपणही आलो] व संपूर्ण ग्रहमालेची निर्मिती केली आहे. तो अनादि, अनंत, अजिंक्य, अवध्य, अमर, अजेय,… इत्यादी अनेक विशेषगुणांनी युक्त आहे. जर हे सगळे मान्य केले, तर फक्त मानव जमातीलाच त्याची ओळख का? आजवर आपल्यापैकी कुणालाही, एखादा प्राणी अथवा पक्षी कोणत्याही देवाची उपासना [सगुण/निर्गुण] करताना दिसलाय? नक्कीच नाही! अन्‌ मग, देवाबद्दल इतकी अनास्था (?) दाखवूनही पशु-पक्षांचे काही बिघडले आहे असेही वाटत नाही. मग नक्की गोची कशात आहे? गोची आहे ती देव या संकल्पनेतच. कारण संकल्पना म्हणली की त्यात व्यक्तिसापेक्षताही आली अन त्यातूनच आला जन्माला “ज्याचा त्याचा देव”. मला वाटते, आपल्या लहानपणी ऎकलेला, पूर्वापार चालत आलेला, देवाच्या लोकसंख्येचा आकडा [तेहेतीस कोटी] कदाचीत त्याकाळची जगाची लोकसंख्या दर्शवीत असेल, अन त्यातून आपल्या ज्ञानी पूर्वजांना असेच सुचवायचे असेल की देव हा बाहेर कुठेही नसून तुमच्यातच आहे. त्याची आराधना करा.

निसर्गाशी एकरुप होऊन जगणारे प्राणी फक्त शरीरधर्माचे पालन करतात. मनुष्य त्यांच्यापेक्षा निश्चितच पुढारलेला आहे. त्याने त्या शरीरधर्माला नीतीमत्तेची व समाजकारणाची जोड दिली, पण यातूनच जन्माला आले देव नावाचे एक मृगजळ. निसर्ग नावाच्या सर्वशक्तिमान व सर्वसमावेशक घटकाचे एक भोंगळ रुप. ’देवाला रिटायर करा’ या विधानाला कडकडून विरोध करण्यापेक्षा, त्यामागचा विचार जाणून घेणे गरजेचे आहे. या विधानाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की आपला देवावरचा अंधविश्वास काढून त्याजागी स्वत:वरचा, इतरांवरचा विश्वास वाढीस लावण्याची गरज आहे. माझ्यामते, असे केल्याने जगात घडणार्‍या तथाकथित दैवी चमत्कारांमधे वाढ होईल व हेही कळेल की या सर्वाचा कर्ता करविता बाकी कोणी नसून, आपल्यातलाच देव आहे.

असे असले तरी ’देव’ या संकल्पनेचे फायदेही बरेच आहेत. त्यातूनच जन्मास आलेल्या स्वर्ग-नरक या उप-संकल्पनेच्या आकर्षणापोटी अथवा भीतीपायी समाजातील नीतीमत्तेची पातळी टिकून राहते. देवाला नवस बोलल्यावर, त्याची मनोभावे प्रार्थना केल्यावर मिळणार्‍या आत्मिक बळामधे अनेक संकटांना तोंड देण्याची शक्ती असते. अन्‌ त्याहुनहि महत्वाचे, म्हणजे या संकटातून पार झाल्यानंतर किंवा एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य केल्यानंतर त्याचे श्रेय देवाला दिल्यामुळे आपल्या डोक्यात अहंतेची हवा कमी भरते. आपण सोडुन इतर अनेक घटकांचा आपल्या यशात वाटा आहे, हा विचारच आपल्याला जमिनीवर ठेवण्यात मदत करतो. संकटाच्या काळी हमखास जाणवणार्‍या एकाकीपणावर “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..” हे एक चांगले मलम आहे.

“ॐ पूर्णमिदं। पूर्णात्‌ पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।”

( ओम! हे पूर्ण आहे. पूर्णातूनच पूर्ण जन्माला येते. पूर्णातून पूर्ण बाहेर आल्यावरहि पूर्णच शिल्लक राहते. )

आपल्या उपनिषदांमधे उधृत केलेल्या या सर्वव्यापी शक्तिच्या संज्ञेशी पूर्णपणे साधर्म्य साधणारी गोष्ट म्हणजे निसर्ग. नैसर्गिक तत्वांतूनच या जगताची निर्मिती झाली, यापुढेही निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट निसर्गातील तत्वांमधूनच निर्माण होणार आहे, यातील कोणत्याही किंवा सगळ्या गोष्टींचा विनाश पावला तरी जे शिल्लक राहील त्यालाही निसर्गच म्हणले जाईल [केवळ त्याचे रुप वेगळे असेल]. थोडक्यात, आपल्या आजुबाजुला जे जे काही आपल्याला दिसते ते, व त्याहीपेक्षा खुप काही, जे आपल्या दृष्टीपलिकडचे आहे, सर्व निसर्गाचीच रुपं आहेत. जसे फुल, पाने, डोंगर, माती, वारा, सुगंध; तसेच कॅरीबॅग, गर्द, ए-के ४७ व प्रदुषण. निसर्गाच्या एका रुपाने [मानव] स्वत:च्या शक्तिबद्दल असलेल्या अघोरी व भ्रामक कल्पनांना बळी जाऊन, निसर्गाच्या इतर काही रुपांपासून निर्माण केलेली ही काही कु-रुपे. आज सर्वत्र असा ओरडा होत आहे की ही कुरुपे निसर्गाला हानिकारक आहेत, पण खरं तर फार काळ निसर्गाचे काहीच बिघडणार नाहीये. निसर्गाच्या अस्तित्वाला तर यातून काहिच धोका नाही, असेल तो आहे फक्त आपल्याला. यातून जर काही नष्ट होणार असेल तर ती आहे मानवजात, निसर्ग नव्हे. आपल्या आजच्या प्रचलित कल्पनेप्रमाणे एका प्रचंड उल्कापातानंतर पृथ्वीवरील महाकाय सजीव [डायनासोर] नष्ट झाले, पण तरिही काही [कोटी] वर्षात निसर्गाने काश्मिर, स्विट्झर्लंड, वर्षावने, एव्हरेस्ट, वाळवंटे, इतकेच काय पण वर्षाला प्रत्येकी एक याप्रमाणे मिस-युनिवर्स व मिस-वर्ल्ड यांची निर्मिती केलीच की! सजीवसृष्टीचा विनाश करणार्‍या त्या उल्का-संकटाने निसर्गाचे काहीच बिघडले नाही कारण तो उल्कापातही निसर्गाचाच एक भाग होता हो!! सांगायचा मुद्दा असा की वरीलपैकी प्लॅस्टीक, प्रदूषण व सध्याचे ग्लोबल वॉर्मींग यांचा धोका फक्त सजीवांना आहे, निसर्गाला नाही, कारण पृथ्वी, त्याभोवतालचा ओझोनचे कवच, त्याला सध्या आपण पाडत असलेले भोक व त्यापलिकडचा सूर्य व त्याची अतीनील किरणे… हे सगळं सगळं निसर्गचाच एक भाग आहे. नष्ट होणार आहे तो निसर्गाचा एक घटक, निसर्ग नक्कीच नव्हे.

त्यामुळे उपासना करायची असेल तर निसर्गाची करुया. तीही निसर्गाच्याच पध्दतीने, कारण खरा देव आहे निसर्ग. तुम्ही त्याच्या नियमांचे पालन केलेत तर त्याच्या सारखा दाता नाही. तुम्ही पालन केले नाहीत तरी तो पुरेशी पूर्वकल्पना देऊन आपला हिसका [?] दाखवतो. या जगतातील सर्व सजीव व निर्जिवही त्याच्याच नियमांचे पालन करतात, व त्याच्याच इशार्‍यांवर अवलंबून असतात. कळत नकळत सर्व चराचर सृष्टी निसर्ग नामक शक्तीला मनापासुन मानते. पण हे सगळे, सगळ्यांत सर्वात हुषार असलेल्या माणसांनाच हे कधी पटणार, “देव जाणे!!”

धर्मप्रकटनविचार

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 10:38 am | नरेशकुमार

'निसर्ग' या एका शब्दातच सगळे समावलेले आहे.
अतिशय सुरेख लिखान.

त्यामुळे उपासना करायची असेल तर निसर्गाची करुया. तीही निसर्गाच्याच पध्दतीने, कारण खरा देव आहे निसर्ग.

निसर्गापुढे नतमस्तक.

निसर्गाला जात नाही, धर्म नाही, वय नाही. किती छान.

अमोल केळकर's picture

4 Feb 2011 - 12:40 pm | अमोल केळकर

चांगले विचार व्यक्त केले आहेत

अमोल

संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या प्रत्येक अभंगातून मनुष्याला निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास सांगितले आहे.
निसर्ग, म्हणजे प्रकृती, म्हणजेच ईश्वर!! म्हणजेच विश्वात्मक देव..!

लेखन आवडले.. अगदि मनापासून लिहिलेले आहे.

क्रान्ति's picture

4 Feb 2011 - 8:47 pm | क्रान्ति

....मला वाटते, आपल्या लहानपणी ऎकलेला, पूर्वापार चालत आलेला, देवाच्या लोकसंख्येचा आकडा [तेहेतीस कोटी] कदाचीत त्याकाळची जगाची लोकसंख्या दर्शवीत असेल, अन त्यातून आपल्या ज्ञानी पूर्वजांना असेच सुचवायचे असेल की देव हा बाहेर कुठेही नसून तुमच्यातच आहे. त्याची आराधना करा.

नक्कीच असू शकतं असं.

.....संकटाच्या काळी हमखास जाणवणार्‍या एकाकीपणावर “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..” हे एक चांगले मलम आहे.

खरंच चांगले विचार मांडले आहेत.