उपमा

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 4:09 pm

उपमा
शाळेत सर्वात प्रथम शिकवला जाणारा अर्थालंकार म्हणजे उपमा. कळावयाला व ओळखावयाला, उपयोगात आणावयाला सोपा.वाघासारखा शूर सैनिक. वाघ शूर.. माहित आहे; सैनिक वाघासारखा आहे .. सांगितले, सैनिक शूर आहे कळले; एकदम सोपे ! उदाहरण द्या. लांडग्यासारखे क्रूर मास्त.... चुकलो, चुकलो... गायीसम गरीब आई ! लक्षात ठेवावयाचे चार घटक :
[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सैनिक / आई.
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात.... येथे वाघ/ गाय.
[३] दोहोत जो सारखेपणा आहे त्यास साधर्म्य, सादृश्य किंवा साधारण धर्म म्हणतात, येथे येथे शूरपणा / गरीबपणा.
[४] प्रस्तुत व अप्रस्तुत यात सारखेपणा दाखवणारे जे शब्द, येथे सारखा/ सम, त्याना सादृश्यवाचक किंवा उपमाप्रतिपादक म्हणतात.
उपमेचे कार्य
१. नवीन गोष्ट समजावून घेताना जुन्या माहीत असलेल्या गोष्टी़शी संबंधीत साम्य/विरोध माहीत करून घेणे उपयोगी पडते. उदा. तुम्ही हत्ती पाहीला नाही; परंतु मी जर सांगितले की त्याचे कान सूपासारखे; त्याचे पाय खांबासारखे, तर तुम्हाला हत्तीचे कान/पाय यांची कल्पना येऊ शकेल.
२. यथार्थ ज्ञान देणे हा एक भाग झाला. कविमनातल्या भावना उत्कटपणे वाचकाच्या मनात निर्माण करणे हेही महत्वाचे काम उपमा करते.
कन्या सासुयासी जाये मागे परतोनी पाहे !
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा !!
चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी तैसा तुका तळमळी !!
येथे तुकारामांच्या आर्ततेची कल्पना उपमांमुळेच वाचकाच्या मनात जागृक होते.
३. तिसरे कार्य म्हणजे चमत्कृतीमुळे आनंद देणे.मृगनयना, चंद्रमुखी या खरोखरी आल्हाददायक उपमा आहेत. पण अनेक वेळच्या उपयोगामुळे त्यांतील चमत्कृतीचा आनंद मिळणे अवघड झाले आहे. " तुझे चांदण्याचे हात " ही नवीन कल्पना जास्त आल्हादकारक आहे. सुवर्णसंधी, रामबाण औषध, असे प्रयोग रुळून गेल्यामुळे अलंकार राहिलेच नाहीत. माधव जुलियनांची नवीन कल्पना बघा
लावण्ययुक्त, पिस्त्यापरि लाडिक मुख तिचे जरा उघडे
सुचवी भाव जणूं कीं, " गंमत नामी तुम्हास सांगु गडे "
४. सौंदर्यदर्शन हे उपमेचे चौथे कार्य. चमत्कृतीपूर्ण यथार्थ दर्शन पुरेसे नाही. ते सुंदरही पाहिजे. उपमा किळसवाणी असेल तर आनंद कोठून व मग अलंकार तरी का म्हणावयाचे ?
अर्थात जुन्या कल्पनांना जवळ करूनच हे विधान स्विकारावे. नवकवी मुखाला खारा पिस्ता म्हणतील, पावडरचा जाडा थर दाखवावयाला ! असो.
उपमेचे तीन प्रकार
[१] पूर्णोपमा
उपमेतील चारही मुख्य घटक, प्रस्तुत, अप्रस्तुत, सादृश आणि उपमाप्रतिपादक यांचा स्पष्टपणे उल्लेख झालेला असतो त्या उपमेला पूर्णोपमा म्हणतात.
चाफ़्यापरी गोरेपण पिवळं,
काकडीपरी अंग कोवळं,
मैद्यापरी लुसलुशीत सगळं,
दृष्ट पडून करपली ! पडे कुणा पाप्याची सावली!
तांबे.
यातील पहिल्या ओळीत प्रस्तुत ... गोरेपण, अप्रस्तुत ... चाफ़ा, सादृश्य ... पिवळा रंग, उपमाप्रतिपादक .. परी हे चारही घटक स्पष्टपणे सांगितले आहेत.
[२] लुप्तोपमा
चार घटकांपैकी एक किंवा दोन स्पष्टपणे सांगितले नसतील तर लुप्तोपमा होते.
राया डोळ्यामंदी तुझ्या मोतियाचे पाणी,
राया तुझा रंग जवसाच्या फ़ुलावाणी.
तुझ्या डोईवर अक्षी पागुट कुसुंबी,
तुझा वठ बाई जशी फ़ुलली डाळिंबी.
राया तुझ दात जसं धुतल तांदुळ,
तुझ्यासाठीं मला जनूं भरलंया खूळ.
जात्यावरलं गाण
काय सुरेख ग्रामीण उपमा. लुप्त घटक शोधा, पण आस्वाद पहिल्यांदी घ्या.
[३] मालोपमा
एकाच उपमेयास अनेक उपमाने दिलेली असतात तेव्हा मालोपमा होते.
जो सर्व भूतांच्या ठाईं द्वेषातें नॆणे काहि
आप परू नाहि चैतन्या जैसा !
उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे
हे कहि चि नेणिजे वसुधा जेंवि !
रायाचे देह चालूं रंकाते परौते गालूं
हे नेणेचि कृपालू प्राणु पै गा !
गाइची तृषा हरूं व्याघ्रा विष होऊनि मारूं
हे नेणेचि करूं तोय जैसे !
घरिचिया उजियेड करावा पारखेया आंधारु होआवा
हे न म्हणे पांडवा दीपु जैसा !
ऐसी सर्व भूतमात्रिं येकपणाची मैत्री
कृपेची धात्री आपण जो !
अध्याय १२.
चैतन्य, वसुधा, प्राण, तोय, दीप ही उपमाने भक्त या उपमेयाला दिली आहेत.
एक नम्र विनवणी. रसिक वाचकांनी या उपक्रमात भाग घेऊन स्वताला आवडलेली रचना प्रतिसाद म्हणून अवष्य द्यावी. शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

21 Dec 2010 - 4:36 pm | मेघवेडा

अतिशय सुरेख लेख! उपमेचे एवढे प्रकार माहिती नव्हते. लुप्तोपमेचं उदाहरण भारीच! माझ्यामते त्यात सादृश व उपमाप्रतिपादक लुप्त आहेत.

>> नवकवी मुखाला खारा पिस्ता म्हणतील, पावडरचा जाडा थर दाखवावयाला !

हा हा हा.. हे भारीच!

गणेशा's picture

21 Dec 2010 - 5:14 pm | गणेशा

अतिषय सुंदर लिहिले आहे . आवडले ..

आपण लिहिल्यावर मी वाचलेल्या कविता अश्या उपमांच्या प्रकारात बसतात हे कळाले ..
(अवांतर : माझ्या लक्षात माझ्याच कविता नाहि राहत त्यामुळे रिप्लाय म्हनुन उदा. जास्त देता येत नाहियेत ही खंत)

तरीही आपणच लिहिलेल्या ह्या शब्दांमुळे (" तुझे चांदण्याचे हात ") माझी आवडती कविता आठवली .. त्यातील हे कडवे :

काढ सखे गळ्यातील
तुझे चांदण्यांचे हात
क्षितिजापल्याड उभे
दिवसाचे दूत

- कुसुमाग्रज ( विशाखा)

बाकी कोठ्ल्या उपमा उपमेय वैगेरे गोश्टी शिकाय्च्या फंदात पडलो नाही, डाय्रेक्ट वापरायला लागलो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Dec 2010 - 8:47 pm | निनाद मुक्काम प...

मला पण
काजू चालतील .
लेख चांगला झालाय

यशोधरा's picture

21 Dec 2010 - 4:56 pm | यशोधरा

मस्त लेख :)
बोरकरांच्या कवितांमधून उपमांचे खूप सुरेख दर्शन होते.

मेघवेडा's picture

21 Dec 2010 - 5:07 pm | मेघवेडा

>> बोरकरांच्या कवितांमधून उपमांचे खूप सुरेख दर्शन होते.

+१. येस्स. मला चटकन आठवलेले उदाहरण : जीवन त्यांना कळले हो!

मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो
जळापरि मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो

इ. इ.

नितांतसुंदर!

यशोधरा's picture

21 Dec 2010 - 5:58 pm | यशोधरा

मस्त रे मेव्या. बालकवींची श्रावणमासी कविता, बहिणाबाईंची मन वढाय वढाय ही अजून काही उदाहरणे.
बोरकरांची विचित्रवीणा, त्यांनी केलेले गोव्याचे वर्णन.
अजून आठवेल तसे लिहूयात का?

मेघवेडा's picture

21 Dec 2010 - 6:06 pm | मेघवेडा

हो नक्की लिहूया की. शरद सुद्धा असेच म्हणत आहेत. :)

गणेशा's picture

21 Dec 2010 - 7:29 pm | गणेशा

तुम्ही लिहा लवकर सगळे .. वाट पाहत आहे.

बोरकर मी वाचलेच नाहियेत अजुन त्यामुळे उत्सुक आहे वाचायला ..

योगी९००'s picture

21 Dec 2010 - 6:16 pm | योगी९००

लेख खरोखर सुंदर आणि वाचनीय आहे. (काहीतरी उपमा द्यायला बघत होतो पण आयत्यावेळी लेखाला द्यायला उपमा सुचत नाही आहे. तो पर्यंत सुंदर आणि वाचनीय ही विशेषणे चालवून घ्या).

प्रेमाला उपमा नाही असे का म्हणतात बरे? प्रेम करावे तर राधेसारखे किंवा मिराबाईसारखे..किंवा लैला-मजनू सारखे...या उपमाच झाल्या ना? (मराठी व्याकरण माझे जरा कच्चेच आहे..शाळेत लक्ष सारखे इंग्रजी किंवा संस्र्कुत व्याकरण याचकडे असायचे ..)

स्वाती२'s picture

21 Dec 2010 - 6:26 pm | स्वाती२

सुरेख लेख!

अविनाशकुलकर्णी's picture

21 Dec 2010 - 6:51 pm | अविनाशकुलकर्णी

माहितित भर पडली..सुंदर लेख

शुचि's picture

21 Dec 2010 - 7:06 pm | शुचि

कालच मला एक ब्लॉग सापडला ज्यात "रावणाचे कौतुक करणारे" पुढील वाक्य सापडले -

रावण से रक्षा हेतु राम को अमोघआदित्य स्तोत्र का मंत्र देने वाले ऋषि अगस्त्य का यह कथन हमारे नेत्र खोल देने वाला होगा- 'हे राम! मैं अपनी संपूर्ण तपस्या की साक्षी देकर कहता हूँ कि जैसे कोई पुत्र अपनी बूढ़ी माता की देख-रेख करता है वैसे ही रावण ने सीता का पालन किया है।' (अध्यात्म- रामायण)

मला वाटतं ह्याची गणना उपमा अलंकारात होऊ शकते. शरद साहेब यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.

गणेशा's picture

21 Dec 2010 - 9:15 pm | गणेशा

वरच्या उपमांच्या प्रकारात आपले वरील "जैसे कोई पुत्र अपनी बूढ़ी माता की देख-रेख करता है वैसे ही रावण ने सीता का पालन किया है।' हे बसवायचा प्रयत्न केला .. जमले नाही ..
खुप वेळ विचार केला कदाचीत कमी पडलो असेन ..

मी प्रयत्न करताना खालील पद्धतीने विचार केला ,
---
>> कन्या सासुयासी जाये मागे परतोनी पाहे !
>> तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा !!

येथे जसे केशवाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या युवतीच्या (गोपिका/मिराबाई) मनाची तुलना कन्या माहेरुन सासरी जाताना ज्या ओढीने .. ज्या व्याकुळतेने मागे पाहते त्या सम केली आहे .. म्हणजे युवतीची आणि सासरी जातानाची मुलगी याण्ची तुलना त्यांच्या व्याकुळता या साधर्म्याने दाखवली आहे

>> जीवनावेगळी मासोळी तैसा तुका तळमळी !!
पाण्याविना मासोळीचा जीव जसा कासाविस होतो त्याप्रमाणे संत तुकाराम यांची तळमळ आहे ..
म्हणजे मासोळी आणि तुकोबा यांचे त्यांचे जे जीवन आहे ( पाणी आणि विठठल भक्ती) , ते नसतानाची तळमळ ह्या उपमेने तुलना केली आहे

>> गाईसम गरीब आई

येथे आई ही गाई जशी गरीब आहे तशी गरीब प्रेमळ असते हे उपमेतुन दाखवले आहे

-------वरील वाक्याचे "जैसे कोई पुत्र अपनी बूढ़ी माता की देख-रेख करता है वैसे ही रावण ने सीता का पालन किया है।' जर वरील प्रमाणे घटकात रुपांतर केले तर

[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे पालन
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात....येथे देख-रेख
[३] दोहोत जो सारखेपणा आहे त्यास साधर्म्य, सादृश्य किंवा साधारण धर्म म्हणतात, येथे - बूढी माता.

असे होते .. त्यामुळे हे बळेच केलेले उपमाचे घटकीकरण वाटत आहे असे वाटते .. येथे लिहिताना लेखकाला फक्त क्रियेबद्दल माहिती द्यावयाची आहे असे वाटते, ...

वरील वाक्य जर अगस्त्य अशे म्हणाले असते की ( मी मराठीत लिहितो हिंदी कच्चे आहे )

हे रामा ! ... मातेसम वंदिले रावणाने सितेस असे असते तर

[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सिता
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात....येथे माता
[३] दोहोत जो सारखेपणा आहे त्यास साधर्म्य, सादृश्य किंवा साधारण धर्म म्हणतात, येथे - वंदने
(वंदिले ऐवजी पालन करणे हे वरती मुळ वाक्यात आहे तसा अर्थ घ्तला तरी चालेल)
असे होते .. आणि हे योग्य वाक्य वाटते ...
---------
उपमा ह्यालाच कविता लिहिताना मी विशेषन म्हणतो ..
समजा मी खालील ओळ लिहिली
की
" काळी कोवळी रात्र ओली "
तर हे कदाचीत 'मालोपमा' होयील असे वाटते ..

काळी, कोवळी, ओली हे रात्रीला दिलेली उपमा (विशेषन) वाटतात .. (शरद राव येथे समजुन सांगा चुकल्यास)

जर कुठल्या क्रियेबद्दल विशेषन वापरले की ते क्रियाविशेषन होते ..
येथे क्रिया अश्या आहेत की - पालन करणे .. देखरेख करणे
आणि क्रियेचीच उपमा क्रियेशी थोडी अवघड वाटते ..

म्हणजे
पाउस जसा बरसतो तसेच माझे मन बरसते
असे असेल तेंव्हा बरसने ही क्रिया पाउस आणि मन या दोहोत जो सारखेपणा आहे तो दाखवतो

याउलट

मेघ जसा पाउस बरसवतो तसाच तो माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर आणतो ..

हे वाक्य लिहिले की
बरसणे आणि पाणी बाहेर आणने ह्याची तुलना होते .. ना की मेघ / मन/ डोळे यांची तुलना होते ..
तसेच तुम्ही दिलेल्या पहिल्या वाक्याचे होते आहे

हुश्श .. काय काय लिहिले पटकन येव्हडे ..थांबतो ..

फक्त धन्यवाद शरदरावांना त्यांच्यामुळे वेगळा विचार केला मी आज वाक्य लिहिताना/ विचार करताना..
--
नोट : वरील गोष्टी कोणालाही आवडल्या नसल्यास सोडुन देणे .. मी हे लिहिताना , मला हे रुल्स , घटकीकरण कळाले आहे का की काही परिश्रम अजुन करावे लागतील हे माझेच मी तपासुन पाहत होतो .. याचा मला नक्कीच फायदा होयील म्हनुन हे घटकीकरण क्रियेशी आणि नामाशी करुन पाहत होतो .. त्यामुळे काही वेगळे वाटल्यास शमस्व , शुची ताईंच्या वाक्यामुळे फक्त हे लिहायला दिशा मिळाली म्हनुन त्यांचे ही आभार

- गणेशा

धन्यवाद गणेशा!
आपले विवेचन वाचून मलाही वाटू लागलं आहे की वरील उदाहरण "रूपक" असावं. उपमा नव्हे.
____
आपण लेखाचे मर्म जाणता असं माझं नीरीक्षण आहे. फाफटपसार्‍यापासून दूर असता. प्लीज कीप इट अप.

धनंजय's picture

21 Dec 2010 - 10:51 pm | धनंजय

तुमचा आदला विचारच ठीक होता. उपमाच आहे.

गणेशा यांचे विवेचन समजले नाही.

त्यांनी सुचवलेल्या "मातेसम" आणि तुम्ही वाचलेल्या "जैसे...माँ" मध्ये काय फरक आहे, तो मला कळलेला नाही.

मला दिसते ते विश्लेषण असे आहे :
[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे रावणाचा सीतेशी व्यवहार
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात....येथे पुत्राचा मातेशी व्यवहार
[३] दोहोत जो सारखेपणा आहे त्यास साधर्म्य, सादृश्य किंवा साधारण धर्म म्हणतात, येथे देखरेख

मनिम्याऊ's picture

21 Dec 2010 - 7:21 pm | मनिम्याऊ

प्रस्तुत कवितेतील प्रत्येक कडव्याच्या दुस~या ओळीत उपमालंकार सापडतो..

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाऊ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाऊ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाऊ त्यांना आरती

देह जावो, देह राहो; नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाऊ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाऊ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती."

- यशवंत