उपमा
शाळेत सर्वात प्रथम शिकवला जाणारा अर्थालंकार म्हणजे उपमा. कळावयाला व ओळखावयाला, उपयोगात आणावयाला सोपा.वाघासारखा शूर सैनिक. वाघ शूर.. माहित आहे; सैनिक वाघासारखा आहे .. सांगितले, सैनिक शूर आहे कळले; एकदम सोपे ! उदाहरण द्या. लांडग्यासारखे क्रूर मास्त.... चुकलो, चुकलो... गायीसम गरीब आई ! लक्षात ठेवावयाचे चार घटक :
[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सैनिक / आई.
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात.... येथे वाघ/ गाय.
[३] दोहोत जो सारखेपणा आहे त्यास साधर्म्य, सादृश्य किंवा साधारण धर्म म्हणतात, येथे येथे शूरपणा / गरीबपणा.
[४] प्रस्तुत व अप्रस्तुत यात सारखेपणा दाखवणारे जे शब्द, येथे सारखा/ सम, त्याना सादृश्यवाचक किंवा उपमाप्रतिपादक म्हणतात.
उपमेचे कार्य
१. नवीन गोष्ट समजावून घेताना जुन्या माहीत असलेल्या गोष्टी़शी संबंधीत साम्य/विरोध माहीत करून घेणे उपयोगी पडते. उदा. तुम्ही हत्ती पाहीला नाही; परंतु मी जर सांगितले की त्याचे कान सूपासारखे; त्याचे पाय खांबासारखे, तर तुम्हाला हत्तीचे कान/पाय यांची कल्पना येऊ शकेल.
२. यथार्थ ज्ञान देणे हा एक भाग झाला. कविमनातल्या भावना उत्कटपणे वाचकाच्या मनात निर्माण करणे हेही महत्वाचे काम उपमा करते.
कन्या सासुयासी जाये मागे परतोनी पाहे !
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा !!
चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी तैसा तुका तळमळी !!
येथे तुकारामांच्या आर्ततेची कल्पना उपमांमुळेच वाचकाच्या मनात जागृक होते.
३. तिसरे कार्य म्हणजे चमत्कृतीमुळे आनंद देणे.मृगनयना, चंद्रमुखी या खरोखरी आल्हाददायक उपमा आहेत. पण अनेक वेळच्या उपयोगामुळे त्यांतील चमत्कृतीचा आनंद मिळणे अवघड झाले आहे. " तुझे चांदण्याचे हात " ही नवीन कल्पना जास्त आल्हादकारक आहे. सुवर्णसंधी, रामबाण औषध, असे प्रयोग रुळून गेल्यामुळे अलंकार राहिलेच नाहीत. माधव जुलियनांची नवीन कल्पना बघा
लावण्ययुक्त, पिस्त्यापरि लाडिक मुख तिचे जरा उघडे
सुचवी भाव जणूं कीं, " गंमत नामी तुम्हास सांगु गडे "
४. सौंदर्यदर्शन हे उपमेचे चौथे कार्य. चमत्कृतीपूर्ण यथार्थ दर्शन पुरेसे नाही. ते सुंदरही पाहिजे. उपमा किळसवाणी असेल तर आनंद कोठून व मग अलंकार तरी का म्हणावयाचे ?
अर्थात जुन्या कल्पनांना जवळ करूनच हे विधान स्विकारावे. नवकवी मुखाला खारा पिस्ता म्हणतील, पावडरचा जाडा थर दाखवावयाला ! असो.
उपमेचे तीन प्रकार
[१] पूर्णोपमा
उपमेतील चारही मुख्य घटक, प्रस्तुत, अप्रस्तुत, सादृश आणि उपमाप्रतिपादक यांचा स्पष्टपणे उल्लेख झालेला असतो त्या उपमेला पूर्णोपमा म्हणतात.
चाफ़्यापरी गोरेपण पिवळं,
काकडीपरी अंग कोवळं,
मैद्यापरी लुसलुशीत सगळं,
दृष्ट पडून करपली ! पडे कुणा पाप्याची सावली!
तांबे.
यातील पहिल्या ओळीत प्रस्तुत ... गोरेपण, अप्रस्तुत ... चाफ़ा, सादृश्य ... पिवळा रंग, उपमाप्रतिपादक .. परी हे चारही घटक स्पष्टपणे सांगितले आहेत.
[२] लुप्तोपमा
चार घटकांपैकी एक किंवा दोन स्पष्टपणे सांगितले नसतील तर लुप्तोपमा होते.
राया डोळ्यामंदी तुझ्या मोतियाचे पाणी,
राया तुझा रंग जवसाच्या फ़ुलावाणी.
तुझ्या डोईवर अक्षी पागुट कुसुंबी,
तुझा वठ बाई जशी फ़ुलली डाळिंबी.
राया तुझ दात जसं धुतल तांदुळ,
तुझ्यासाठीं मला जनूं भरलंया खूळ.
जात्यावरलं गाण
काय सुरेख ग्रामीण उपमा. लुप्त घटक शोधा, पण आस्वाद पहिल्यांदी घ्या.
[३] मालोपमा
एकाच उपमेयास अनेक उपमाने दिलेली असतात तेव्हा मालोपमा होते.
जो सर्व भूतांच्या ठाईं द्वेषातें नॆणे काहि
आप परू नाहि चैतन्या जैसा !
उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे
हे कहि चि नेणिजे वसुधा जेंवि !
रायाचे देह चालूं रंकाते परौते गालूं
हे नेणेचि कृपालू प्राणु पै गा !
गाइची तृषा हरूं व्याघ्रा विष होऊनि मारूं
हे नेणेचि करूं तोय जैसे !
घरिचिया उजियेड करावा पारखेया आंधारु होआवा
हे न म्हणे पांडवा दीपु जैसा !
ऐसी सर्व भूतमात्रिं येकपणाची मैत्री
कृपेची धात्री आपण जो !
अध्याय १२.
चैतन्य, वसुधा, प्राण, तोय, दीप ही उपमाने भक्त या उपमेयाला दिली आहेत.
एक नम्र विनवणी. रसिक वाचकांनी या उपक्रमात भाग घेऊन स्वताला आवडलेली रचना प्रतिसाद म्हणून अवष्य द्यावी. शरद
वाचने
4892
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच!
अतिषय सुंदर लिहिले आहे .
आपल्याला तो वरून खोब्र घातलेला उपमाच आवड्तो
मला पण काजू चालतील . लेख
In reply to आपल्याला तो वरून खोब्र घातलेला उपमाच आवड्तो by आत्मशून्य
मस्त लेख बोरकरांच्या
+ १
In reply to मस्त लेख बोरकरांच्या by यशोधरा
मस्त रे मेव्या. बालकवींची
हो नक्की लिहूया की. शरद
In reply to मस्त रे मेव्या. बालकवींची by यशोधरा
.
In reply to हो नक्की लिहूया की. शरद by मेघवेडा
सुंदर लेख..
सुरेख लेख!
माहितित भर पडली..सुंदर लेख
लेख आवडला
.
In reply to लेख आवडला by शुचि
धन्यवाद गणेशा! आपले विवेचन
In reply to . by गणेशा
उपमाच आहे, असे मला वाटते
In reply to धन्यवाद गणेशा! आपले विवेचन by शुचि
गाऊ त्यांना आरती