रक्षण

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
24 Nov 2010 - 10:12 am

डोळे मिटून मी आत डोकावतो
तेव्हा मला एक वाघुळ दिसतं.
तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये
ते गरागरा फिरत असतं.
बाहेरच्या प्रकाशाला अंधार
नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं,
गोंगाट असल्यावर काही नाही
पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं....
सकाळी जेव्हा मी उठतो
मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं,
बाहेर सृष्टी सजत असते
शब्दरहित पण नवनव्या ढंगानं.
गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात
आणि मूकपणे कळ्या उमलतात.
तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो,
गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो....
बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात
मला एक मांजर दिसतं.
कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून
स्वतःचंच पोट चाटत असतं.
बस यायच्या थोडंसं आधी,
का कोण जाणे पण ते वळतं,
टाटा केल्या सारखा पंजा हवेत ठेवून
बिलोरी डोळ्यांनी माझ्यात खोलवर पाहातं.
मी नजर टाळून मोबाईल काढतो,
उगाच चाळा म्हणून वेळ पाहतो,
कोणी मेल टाकलंय का पाहतो,
फेसबुकवर कोणी आहे का पाहतो.
तेवढ्यात मग घरघरत बस येते,
सगळी माणसांची टरफलं पोटात घेते......
ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून
मी त्याचीच नक्कल करत असतो.
बंद काचेबाहेर तेव्हाही
गुलमोहराचा उत्सव चालूच असतो.
मी तिकडे बघतही नाही,
यंत्रांमध्येच रमतो,
यंत्रंही मला आता जिवंत वाटतात,
कारण माझा जिवंतपणाही तसाच असतो.....
संध्याकाळी झाडं पानं मिटून घेतात
आणि पक्षी घरट्यात जाऊन निजतात
तेव्हा मी टीव्ही पाहत बसतो.
ग्रीन कार पासून ग्रीन कारखान्यांपर्यंत
आणि ग्रीन सिमेंट पासून ग्रीन टॉयलेट पेपरपर्यंत
सगळ्या जाहिराती पाहत असतो.
वाघांना कसं वाचवताहेत त्याची डॉक्युमेंटरी,
शार्क्सना कसं वाचवताहेत त्यावर कॉमेंटरी,
समुद्रातली कासवं वाचवणार,
बर्फातली अस्वलं वाचवणार,
सुंदरबनातले वाघ वाचवणार,
आफ्रिकेतले सिह वाचवणार,
झाडं वाचवणार जंगल वाचवणार,
नद्या वाचवणार डोंगर वाचवणार,
कोणालाही सोडणार नाही ,
सगळी पृथ्वीच वाचवणार
असा छानपैकी गोंगाट होतो,
आणि मेंदू रिकामा होऊन जातो.
मनही अगदी बधीर होऊन जातं,
आतलं वाघुळ थकून जातं....
मग मी झोपायला जातो.
जडावलेल्या डोळ्यांनी विचार करतो.
त्या दवबिंदूंना, त्या कळ्यांना
त्या मांजराला, त्या झाडांना
एवढंच एक साकडं घालतो,
"माझ्यासाठी एवढं करणार ना?
सगळं संपण्याआधी तुम्ही मला वाचवणार ना?"

करुणकवितामुक्तक

प्रतिक्रिया

माणसाचे मन आणि त्याचे जीवन मिस करीत असलेले लाईफ मस्त मांडले आहे ..

आवडली कविता आणि त्यातील भाव

अवलिया's picture

24 Nov 2010 - 5:07 pm | अवलिया

कविता आवडली!

स्पंदना's picture

25 Nov 2010 - 12:20 pm | स्पंदना

__/\__