नसलेले गैरसमज कशाला निस्तरायचे? (लघुतम कथा)

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
2 Oct 2007 - 8:58 am

शुक्रवारी संध्याकाळी मेरीचा फोन आला. म्हणे "उद्याची काय गंमत आहे, माहितीए? ते चित्रकार विल्यम ब्राउन आहेत नं? ते आपला स्टूडियो आपल्या चाहत्यांसाठी उघडा ठेवणार आहेत. अरे आपल्याला थोडीच परवडताएत त्यांची चित्रं, पण कलाकारासमक्ष त्यांची कला अनुभवायची काय नामी संधी!" मी म्हटले, "वा, सुंदर!"
"पण तुझा मित्र राजेश, बथ्थडासारखा टेनिस खेळायला जातोय म्हणतो."
"बयो, राजेश आधी तुझा नवरा, मग माझा मित्र आहे. त्याच्या रुक्षपणाचा जाब मला नको विचारूस."
"ए राजेश! आयडिया!" मला फोनवर लोंबकाळत ठेवत ती ओरडली. "तू जा टेनिस खेळायला. मी जाईन स्टूडियोत तुझ्या या मित्राबरोबर. तास-दीड तासानंतर मग जाऊ तिघं डिनरला."
राजेशने तिथे संमती दिली असावी. इथे मीही कबूल झालो.

या राजेश-मेरींच्या लग्नाला एव्हाना झाली आहेत दोन वर्षे, पण जोडी बघितली की वाटते की ही कामदेवाची एकदम ताजी-ताजी शिकार आहे. दोघांचे स्वभाव म्हणजे इतके सुलट्याचे उलट आहेत, म्हणूनच की काय दोघे अगदी जिगसॉच्या कोड्यासारखे मस्त जुळतात. ही फटाक्याच्या लडीसारखी आनंदाने ताडताड उडत असते, आणि त्याचा हर्षोल्लासदेखील अनारासारखा धीरगंभीर असतो. दोघेजण आपले जिगरी दोस्त. तत्त्वज्ञान, राजकारण, या बाबतीत त्याला एकदाचे बोलके करून मग मी नुसते ऐकण्याचे काम करतो. मात्र, तिला गप्प करून स्वतः बोलू शकणारा माझ्यावेगळा या दुनियेत कोणी नाही असे आमचे मित्रलोक म्हणतात.

शनिवारी स्टूडियोत पोचताच मी आपली बडबड सुरू केली. "अग, या सुमाबरोबर नुसते पबमध्ये गप्पा मारायला जायचे म्हणजे सुद्धा मोठी नामुष्की आहे."
"सुमा म्हणजे तुझ्या ऑफिसातली ती मराठी मुलगी नं? सारखी तुझ्याशी 'दादा, दादा' करून बोलते ती?" इति मेरी.
"तीच ती." या सुमावर ऑफिसातले अर्धे तरूण जीव ओवाळून टाकतात. (हे तरूण मठ्ठ आहेत, आणि बाकीचे सगळे अरसिक आहेत लेकाचे.) पण तिला जी व्यक्ती हवीहवीशी आहे तिथे मात्र बिचारीचा "मयि सा विरक्ता" असलाच प्रकार चालू आहे. आता या मुलीमुलींच्या प्रणयाराधना करायच्या तर्‍हाच न्यार्‍या, मग ही सुमा आपल्या एकुलत्या एक मराठी दादाला भडाभडा सगळी मनाची चलबिचल सांगायला येते त्यात नवल ते काय?

"आता ऐकच तू, मेरी. काल तिला घेऊन पहिल्यांदाच माझ्या आवडीच्या पबमध्ये गेलो होतो. नेहमीचा बारटेंडर, स्कॉटी, पण आज त्याचे वागणे म्हणजे वेगळेच! कानापर्यंत मोठ्ठं स्मितहास्य काय, लवून सलामी काय. मी आपली नेहमीची डार्क बियर मागवली. सुमा मला म्हणे की तिच्यासाठी काहीतरी गोडमिट्ट मागव म्हणून. मला गोड कॉक्टेलमधलं कळतंय डोंबल. म्हटलं स्कॉटी, तुझी बेस्ट गोड कॉक्टेल आण बाईसाहेबांना. मग पाच मिनिटांनी स्कॉटीनं असलं जंगी सजावट केलेलं ड्रिंक ट्रेमधून आणलं, आणि म्हणे कसा - बाईसाहेब, हे साहेब अशाच हायक्लास ठिकाणी नेणार, बरं का. मग कुठे आम्हाला त्या सगळ्या भारुडाचा अर्थ लागला. आता या बुवाला काय सांगू की परक्या भाषेत आमच्या वटावटा टवाळक्या चालू आहेत, गुलूगुलू प्रेम नाही! पण खरं सांगू, म्हणच आहे नं तशी - आशुक-माषुक पे दुनिया फिदा. मुलामुलीची जोडी बघितली रे बघितली की लोकांना पाठीमागे लग्नाचे मंत्रबिंत्र म्हणणारा पाद्री-भटजी कोणीतरी उभा असल्याचा भास होतो. ते क्रौंचमिथुन सुद्धा नुसते मच्छिमारी करायला आले होते तिकडे, पण वाल्मिकी पडला कवी, काय म्हणते?"

हे कसले उपकथानकाचे विपरीत रामायण, म्हणून मेरीने भुवया वाकड्या केल्या.

"मग मीच ओढून-ताणून विषय लांबवला, आणि स्कॉटीने न विचारताच सांगून टाकलं, की ही माझी बहीण लागते म्हणून." मी गोष्ट संपवली.

"बहीण लागते म्हणून काहीच्या काही काय!" मेरी मला वेडावून म्हणाली. "तो स्कॉटी बिचारा सौजन्याने वागत होता. तुमचं काय नातं आहे, असं त्याच्या मनात त्याला काय वाटत होतं, ते तुला काय माहीत? उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?"

तोवर आम्ही एका सुंदर चित्रासमोर येऊन थांबलो. इतक्यात चित्रकारही तिथे फिरत फिरत आले. मेरी म्हणजे त्यांची मोठी रसिक चाहती. त्यांना म्हणाली, "तुमच्या सगळ्या चित्रांपैकी हे माझे सगळ्यात आवडते आहे." तर ते लगेच हसून म्हणाले, "तुमची निवड मोठी दर्दी बरं का - चित्राची आणि मित्राची!"

मेरी थोडीशी गोरीमोरी झाली. "या मित्राला निवडणारा तो माझा नवरा बरं का... येईलच तोही आता. मग बघू त्याला माझी चित्राची निवड आवडते का. हं." ब्राउनसाहेबांनी मंद हसत स्टूडियोची फेरी चालू ठेवली.

मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?"

तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो.

==================================

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2007 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : )

कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे )

आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !

सहज's picture

2 Oct 2007 - 9:39 am | सहज

नाईस लिटील कथा.

लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-)

The world is yet to grow up!

मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 10:21 am | विसोबा खेचर

वा धन्याशेठ!

मस्त लिहिलं आहेस...

'कामदेवाची ताजी शिकार' हे शब्द फार आवडले..:)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Oct 2007 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे

मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?"

तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो.

मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?"

तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो.
प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

2 Oct 2007 - 11:19 am | सर्किट (not verified)

गूढ विषय...
सहज सोपा अनुभव..
विचारात टाकणारा..
सुंदर कथा...
(जितकी लघु तितकी वाचनीय..)

- सर्किट

जुना अभिजित's picture

3 Oct 2007 - 2:20 pm | जुना अभिजित

जगजीतची एक गझल आठवली या विषयावरून..

बेसबब बात बढाने की जरूरत क्या थी
हम खफा कब थे मनाने की जरूरत क्या थी..

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

अनारा सारखा धीरगंभीर हर्षोल्लास -- हे आवडले. लेखही छान.

जुना अभिजित's picture

3 Oct 2007 - 3:39 pm | जुना अभिजित

अनारा म्हंजे?

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

धनंजय's picture

3 Oct 2007 - 4:56 pm | धनंजय

रोषणाईच्या दारूचा एक प्रकर आहे. हा 'अनार' जमिनीवर ठेवतात, तो पेटवला की झाडासारखी रोषणाई होते.

जुना अभिजित's picture

3 Oct 2007 - 5:20 pm | जुना अभिजित

समजला. आम्ही झाड म्हणायचो त्याला. शब्दयोजना अचूक आहे.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन's picture

3 Oct 2007 - 3:51 pm | नंदन

'लोकापवादो बलवान मतो मे' चे सौम्य रुप दाखवणारी, सहज लघुकथा आवडली.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय's picture

20 Oct 2007 - 1:18 am | धनंजय

रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले :

कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे
सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे
रामरंग सैयां सांवरे

अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?

देवदत्त's picture

20 Oct 2007 - 11:10 pm | देवदत्त

इथे नसलेला गैरसमज म्हणता येईल ..
तरीही प्रत्यक्षात भरपूर वेळा असेच होत असेल.