***** कल्याणम्

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
20 Oct 2010 - 5:00 pm

अलीकडे मी टेलीव्हिजनवर एक मराठी मालिका पहात होतो. चाकोरीबाहेरच्या आणि काहीशा अवास्तव अशा तिच्या कथाभागात दैवी चमत्कार, भुताटकी, करणी, चेटूक, कुंडली, भविष्यवाणी, अंतर्ज्ञान असले अतार्किक प्रकार नव्हते, अवास्तव वाटणा-या व्यक्तीरेखासुध्दा सपाट किंवा उथळ वाटत नव्हत्या. कमी अधिक प्रमाणात त्यांच्या अंगात असलेले निरनिराळे गुणदोष एकमेकांशी सुसंगत वाटायचे. कथानकात रोज येणारी वळणे आणि त्यातून मिळणारे धक्के सुसह्य असायचे. घरातले चित्रण दाखवणारे सेट्स उघडउघडपणे कृत्रिम वाटत नव्हते. अशा कारणांमुळे ही मालिका एका बाजूने कुठे तरी वास्तवाला धरून चालली आहे असे वाटत होते. शिवाय तिच्या प्रसारणाची वेळ माझ्यासाठी सोयिस्कर असल्यामुळे मी ती नेहमी पाहू शकत होतो. दोन तीन आठवड्यांपूर्वी तिची कथा एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन उत्कंठेच्या शिगेला (क्लायमॅक्सला) पोचली होती. लवकरच त्या मालिकेच्याच वेळी दाखवल्या जाणार असलेल्या दुस-या मालिकेची घोषणा झाली होती. त्यामुळे आता ती मालिका संपणार असे मला वाटायला लागले होते. नेमक्या अशा वेळी आजारपणामुळे आठवडाभर मी टीव्ही पाहू शकलो नाही. हॉस्पिटलमधल्या अंथरुणावर पडल्या पडल्या त्या मालिकेत आता पुढे काय होईल याचा विचार करता करता माझ्यापुरती मीच त्या मालिकेची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या कल्पनेनुसार तिचा शेवट करून टाकला.

प्रत्यक्षात ही मालिका एक वेगळे वळण घेऊन पुढे चाललेली आहे. ती आता वास्तवापासून जरा जास्तच दूर जात आहे आणि तिची बदललेली वेळ मला सोयिस्कर नाही. यामुळे मी ती मालिका आता फारशी पहात नाही. मनातल्या मनात या मालिकेचा माझ्यासाठी मी कसा शेवट केला होता ते दाखवण्याचा हा एक प्रयत्न .......
जे वाचक ही मालिका पहात नाहीत त्यांना एक स्वतंत्र गोष्ट म्हणून याची कथा समजेल अशी आशा आहे.

---------------------------------------------------------------------------------------
भाग १

स्थळः सुभेदारांचा पुरातन वाडा - सुभेदार कुटुंबाचे प्रमुख अप्पासाहेब बाहेरगावी गेले आहेत. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. मोठा मुलगा वरुण, त्याच्या पत्नी मनूताई, मुलगा राकेश, सून स्वाती आणि मुलगी प्रेमा, लहान मुलगा किशोर, त्याची पत्नी विशाखा, मुले प्रशांत आणि रोहित आणि आईवडिलांना वंचित झालेली नात चिन्मयी इतके लोक या घरात रहात असतात. अप्पासाहेबांची मुलगी उल्का हिचे संपतरावांशी आणि किशोरची मोठी मुलगी श्रध्दा हिचे पुनीतशी लग्न झाले आहे. या दोघी आपापल्या सासरी असतात.
वेळः सकाळची

प्रेमा आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसली आहे. मनूकाकू चहाचे दोन कप घेऊन येतात. प्रेमाला सांगतात, "हा घे बाई चहा. आणि ही चिन्नी उठली नाही का अजून?"
"तिला रिकामटेकडीला काय उद्योग आहे? लोळत पडली असेल!" प्रेमा
"जरा तिला बघतीस का? तिच्यासाठी पण चहा आणला आहे मी, आता मला हे जिने चढणं उतरणं जमत नाही गं. लगेच गुढगे ठणके मारायला लागतात. जरा बघ ना!"
"आई तू पण ना! बघू, माझा चहा पिऊन झाला की मी बघते महाराणी काय करताहेत ते!"
आपला चहा पिऊन झाल्यावर दुसरा चहाचा कप हातात घेऊन प्रेमा माडीवरील गॅलरीत जाते. चिन्मयी गादीवर अस्ताव्यस्त पडलेली असते. तिला गदागदा हलवत प्रेमा म्हणते, "उठा उठा चिन्नूताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही, अजूनही।।"
प्रेमा बोटाने चिन्मयीचा एक डोळा उघडायचा प्रयत्न करते. पण चिन्मयी त्यालाही प्रतिसाद देत नाही. घाबरलेली प्रेमा खाली येऊन स्वातीकडे जाते, "अगं, ही चिन्नी बघ कसं तरी करते आहे. खरं तर ती कसली हालचालच करत नाहीये!"
"असं का? अगं, आता एक नवीन नाटक सुरू केलं असेल तिनं! आपण तिच्याकडे लक्ष दिलं तर ती लगेच डोक्यावर चढून बसेल. तू लक्षच देऊ नकोस, तीच कंटाळेल, कंटाळेल आणि मुकाटपणे उठेल बघ थोड्या वेळानं."
"पण मग मी आईला काय सांगू?"
"म्हणावं, तिनं प्यायला चहा आणि तू लाग आपल्या कामाला."
----------------------------------

सर्वांसाठी ब्रेकफास्ट तयार करून ठेवल्यावर मनूताई त्याच्यासाठी जेवणाचे डबे भरायच्या तयारीला लागलेल्या असतात. घरातले एक एक जण येऊन कांदेपोहे खाऊन पुढच्या कामाला लागत असतात. मनूताई प्रेमाला विचारतात, "चिन्नी खाऊन गेली का गं?"
"नाही अजून. मी बघते हं."
या वेळी प्रेमा आपण होऊन माडीवर जायला निघते, तेंव्हा स्वाती तिला अडवते, "अगं कशाला उगीच चढ उतर करतेय्स? ती केंव्हाच तिच्या त्या कोमू की ढोमू तिच्या कडे गेलीय्."
"काही खाल्यापिल्ल्याशिवाय?"
"कुठल्यातरी हॉटेलात जायचं त्यांचं ठरलं असेल आधीपासून. ती कुठे आपल्याला सांगते?"
"असेल बाई, तिचा काही नेम सांगता येत नाही. महा नाटकी, ढोंगी आणि पक्की आतल्या गाठीची!"
----------------------------------------------

प्रशांत टेबलावर नाश्ता करत बसलेला असतो.
कौमुदी अतीशय घाईत धावत पळत आत येतांनाच ओरडून विचारते. "चिन्ने, चिन्ने, काय करते आहेस?"
प्रेमा, "अगं, ती तर तुझ्याचकडे गेली आहे."
"नाही "
"मग त्या ऋषीकडे गेली असेल." पुढे येत स्वाती म्हणते.
"ते शक्य नाही."
स्वातीला बाजूला सारून कौमुदी धडाधडा जिना चढून वर जाते. तिला पाहून प्रशांत उठतो आणि तिच्या मागे जातो.
"प्रशांतदादा!!! लवकर ये!!!" कौमुदी किंचाळते. दोघे मिळून चिन्मयीला उचलून खाली आणतात. काय झाले आहे ते पहायला दोन्ही काका काकू वगैरे सगळे बाहेर येतात.
"आपल्याला एक सेकंदसुध्दा वाया घालवता येणार नाही. चल..." कौमुदी धापा टाकतच बोलते. वरुणकाकांना हातानेच बाजूला करत चिन्मयीला घेऊन दोघेही बाहेर जातात. दारात रिक्शा उभीच असते. तिच्यात बसून वेगाने चालले जातात.
"हे काय चाललंय?" वरुण ओरडतात
"एक नवीन नाटक सुरू झालेलं दिसतंय्." स्वाती सांगते, "अहो पाहिलंत ना, ही कौमुदी बाहेर रिक्शा थांबवून आत आली होती आणि प्रशांतसुध्दा तयार बसला होता. तीघांनी मिळून सगळं ठरवून केलं असणार.
"अगं, मघाशी तू तर म्हणालीस चिन्नी कोमूकडे गेली आहे." मनूकाकू विचारतात
"बहुधा तिनं नुसतं तसं दाखवलं असेल आणि हळूच पुन्हा वर जाऊन बसली असेल." स्वाती
"महा नाटकी आणि ढोंगी कुठली!" प्रेमा
पण हे पहात असतांना किशोर अस्वस्थ झाले आहेत. म्हणाले, "नाही दादा, मला तसं नाही वाटत. मी नीट चौकशी करून येतो."
"हो भावजी, मलासुध्दा चिन्नी ठीक वाटली नाही. मी येते तुमच्याबरोबर" मनूकाकू.
"कुठे निघालात तुम्ही आणि तिला कुठे शोधणार आहात?" वरुण
"सध्या तरी आपल्याला सुभाषकडेच जावे लागेल. त्यालाच कदाचित माहीत असेल." किशोर
"त्याचं नाव सुध्दा नको काढूस माझ्यापुढे. मला तर त्याचं तोंड बघायची इच्छा नाही." वरुण
"अहो ते डॉक्टरकाकाही त्यांच्याच नाटकात भागीदार आहेत ना? सगळे मिळून कुठेतरी खिदळत बसले असतील आणि आपल्याला हसत असतील." स्वाती
"ठीक आहे. मग आपण त्यांना लगेच रेड हँडेड पकडू आणि त्यांचे दात पाडून त्यांच्या घशात घालू. चल मी येतो तुझ्याबरोबर." वरुण
"अहो बाबा, तुम्ही आताच नाही म्हणाला होतात ना?" स्वातीच्या वाराचा उलट परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे ती वैतागली आहे. पण आता उपयोग नाही. दोघे भाऊ बाहेर चालले जातात.

----------------------------

वरुण आणि किशोर सुभेदार हे दोघे भाऊ डॉक्टर सुभाष यांच्या दवाखान्यापर्यंत पोचले आहेत. दाराशीच कम्पौंडर गाडगीळ गोंधळलेल्या मुद्रेने उभे आहेत. या दोघांना पाहून म्हणतात, "अहो, डॉक्टरसाहेबांना एक फोन आला होता. त्यांनी नुसता रिसीव्हर कानाला लावला आणि तो खाली आपटून ते उठले, गाडी स्टार्ट केली आणि तुफान स्पीडने चालले गेले. मी आणि इथले पेशंट्स नुसते पहात राहिलो."
"कुठे गेले असतील? आणि कशाला?" किशोर
"माहीत नाही. पण बहुधा तुमच्या चिन्मयीसाठीच .."
"कुठल्या हॉटेलात?" वरुण
"अहो हॉटेल काय म्हणताहात् ? हॉस्पितळात .. ते नेहमी त्या आयुष नर्सिंग होममध्ये ते जातात"
"ते आणिक कुठे आहे?" किशोर
"तुम्हाला माहीत नाही? आता कमाल झाली. गॅलॅक्सी मॉलला वळसा घालून उजवीकडे वळलात की थोड्या अंतरावर डावीकडे एक रस्ता जातो. तिथं आहे ते."
"चला, आता तिथे जाऊन गाठूया त्यांना." वरुण
----------------------------------------

आयुष हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथल्या रिसेप्शनिस्टला किशोर विचारतो, "चिन्मयी सुभेदार .. "
"आत आहेत"
"ती कशी आहे?" किशोर
"तिला कसली धाड भरली आहे? ती आत म्हणजे कुठे आहे? तिची ती मैत्रीण, भाऊ आणि तो डॉक्टरडा?" वरुण ओरडतो
"सगळे आहेत, पण तुम्ही कोण?"
"तिचे काका, हे चौघे कुठे बसले आहेत?" वरुण अधिक जोरात ओरडतो
"हे पहा, हे हॉस्पिटल आहे. इथे दंगा करायचा नाही. सिक्यूरिटी ... यांना इथून आधी बाहेर घेऊन जा."
"अहो पण, माझं ऐका .." किशोर तिला शांत करायचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करत रिसेप्शनिस्ट म्हणते
"सिक्यूरिटी, इन्स्प्क्टर शिंत्र्यांना सांगा की सुभेदार बंधू आले आहेत. त्यांना काय विचारायचं आहे ते यांना विचारून घ्या म्हणावं."
--------------------------------------------

प्रचंड घाईघाईत असलेले डॉक्टर सुभाष तेवढ्यात आतून बाहेर येतात. किशोर त्यांना हाका मारतो, पण त्या न ऐकता ते गाडीत बसून चालले जातात.
"काय माजलाय् बघ हा!" वरुण
"आपण त्याला धक्के मारून घराबाहेर ढकलून दिल्यानंतर तो तरी कशाला आपल्याकडे येईल?"
थोड्या वेळाने पोलिस इन्स्पेक्टर शिंत्रे बाहेर येतात. हातातल्या कॅमे-यामधून तिथल्या सगळ्या हालचाली टिपून घेत असलेला एक वार्ताहर त्यांच्यासोबत येत आहे.
शिंत्रे, "बोला काका, चिन्मयीला काय केलंत?"
"आम्ही कुठं काय केलं? तिचीच नाटकं चालली आहेत." वरुण
"असं होय्? म्हणून तिची ही कंडीशन झालीय्?
"अहो ती कशी आहे?" काकुळतीला आलेला किशोर
"तशी जीवंत आहे, पण तिचं काही खरं नाही."
"म्हणजे?"
"तुम्हाला खरंच काही माहीत नाही की तुम्ही नाटक चालवलंय्? तुम्हाला हे महागात पडणार आहे हां. सांगून ठेवतो."
"खरंच आम्हीही गोंधळात पडलो आहोत हो." किशोर
"असंच दिसतंय्, चला देशमाने, आपण घटनास्थळावर जाऊ. तिकडे लगेच पोचायला पाहिजे." शिंत्रे
"म्हणजे?" वरुण
"तुमचा सुभेदार वाडा, येताय्?"
---------------------------------------------------------------------

सुभेदारवाड्याला पोचण्याच्या थोडे अंतर आधीच इन्पे.शिंत्रे दोघा भावांना जीपमधून खाली उतरवतात आणि सांगतात, "आम्ही पुढे जाऊन चौकशीची थोडीशी सुरुवात करतो. तुम्हाला यायला पाच मिनिटं लागतील, तोंवर आम्हाला तुमच्या घरच्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत."
दोन कॉन्स्टेबल आणि वार्ताहराला घेऊन वाड्यात आल्याआल्या इन्स्पेक्टर शिंत्रे सांगतात, "एक महत्वाची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत."
"कसली? काय झालं?" स्वाती
"ते आम्ही विचारणार आणि तुम्ही सांगायचंय्."
"आत्ता घरात कोणी पुरुष माणूस नाही. तुम्ही नंतर या हं."
"तुम्ही चांगल्या शिकल्यासवरल्या दिसता, नोकरी वगैरे करता ना? आम्हाला थोडी माहिती द्यायला तुम्हाला काय हरकत आहे?"
"कसली?"
"हेच. आज सकाळपासून घरात काय काय झालं?"
"काय व्हायचंय्? रोजच्यासारखं नेहमीचंच चाललंय्?"
"काहीसुध्दा वेगळं नाही?"
"काही नाही. सगळेजण उठलो, चहा प्यालो, आंघोळी केल्या वगैरे वगैरे.."
"तुमची पुरुष माणसं कुठं आहेत?"
"ती गेली कामावर"
"एक कॉलेजमधला पोरगा आहे ना, तो कुठं आहे?"
"बाहेर गेलाय्. त्यानं काही केलं की काय?"
"आणि ती छोकरी, चिन्मयी की कोण? ती कुठे आहे?"
"तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे."
"आज सकाळी तिनं काही वेगळं केलं का?"
"काही नाही. सकाळी उठली, तोंड धुतलंन्, चहा प्याली, हो ना गं प्रेमा?"
"बरं, तिला भेटायला इथे कोणी आलं होतं का?"
"नाही."
"अगं, असं काय करते आहेस स्वाती? ती कौमुदी नव्हती का आली?" मनूकाकू उद्गारल्या.
"हां, पण ती बहुतेक दरवाजातच चिन्मयीला भेटली असेल, म्हणून नाही सांगितलं." स्वाती
तोपर्यंत वरुण आणि किशोर वाड्यावर येऊन पोचतात. त्यांना आत येतांना पहात शिंत्रे उद्गारतात, "काय मजा आहे पहा. या घरातली माणसं वेगवेगळ्या दिशांना बाहेर जातात आणि नेमकी एकाच ठिकाणी जाऊन पोचतात."
"म्हणजे?" वरुण
"अहो या स्वातीताईंनी सांगितलं की तुम्ही रोजच्यासारखे आपापल्या कामाच्या ठिकाणांवर गेला होतात. मग ते सोडून तुम्ही दोघं त्या आयुष क्लिनिकपाशी काय करत होतात? आणि तुमची पोरंसुध्दा नेमकी तिथेच कशी गेली होती? सांगा."
"धडधडीत खोटं बोलतीय् हो ती. काय गं स्वाती? यांना असं का सांगितलंस?" वैतागाने वरुण विचारतात
"आता तुम्ही कुठं गेला होतात ते मला काय माहीत? तरी मी यांना सांगत होते की पुरुष माणसं घरात नाहीय्त. ते ऐकायला तयार नव्हते म्हणून मला जसं वाटलं तसं मी सांगितलं." स्वाती
"बरं, तुमची चिन्मयी तरी तिच्या मैत्रिणीबरोबर नेहमीसारखी हंसतखिदळत बाहेर पडली होती ना?" शिंत्रे
"नाही हो, कौमूदी आणि प्रशांत दोघे मिळून तिला उचलून बाहेर घेऊन गेले होते. म्हणून तर तिला शोधत आम्ही तिथं आलो होतो." किशोर
"हे असलं सगळं रोज तुमच्या घरात घडतं कां हो? यांना त्यात काही वेगळं वाटलंसुध्दा नाही, म्हणून म्हणतो." शिंत्रे
"अगदी असंच नसेल, पण आमची चिन्मयी काही काही वेळा नाटकं करत असते, आपली गंमत म्हणून. ते सगळं तुम्हाला कुठं सांगायचं!" स्वाती
"तिचा काही नेम सांगता येत नाही. महा ढोंगी, नाटकी आणि पक्की आतल्या गाठीची आहे ती!" प्रेमा
"प्रेमाताई तुम्ही बोललात ते बरं झालं. आता तुम्हाला एक दोन प्रश्न विचारायचेय्त. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आता या वेळी जर तुम्ही खरं खरं सांगितलं नाहीत तर तुम्ही एकट्या फासावर लटकणार आहात."
"काय?"
"हेच. आत्ता जर तुम्ही लपवाछपवी केलीत तर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते." करड्या आवाजात शिंत्रे बोलतात.
प्रेमा हादरते. रडायला लागते. आईच्या कुशीत शिरते. मनूकाकू म्हणतात, "असं काय घाबरवताहात हो माझ्या पोरीला? किती लहान आहे ती?"
"अहो, तिनं असं काय केलंय?" वरुण
"चिन्मयीच्या खुनाचा प्रयत्न!" इन्स्पेक्टर शिंत्रे
-------------------------------------------------------------------------------------

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

घारेकाका बरेच दिवसांनी कळफळकावरची धुळ झटकलीत.
सध्या भुताखेतांवर चेटुक जादुटोण्यांवर पी हेच*डी करतोय ;)
त्यात एकडे परदेशात कुठले आलेत मराठी वाहिन्या.
विषय पाहाता धाग्याचा काश्मिर होऊ शकतो. पण तुम्ही आपला उपक्रम चालु ठेवावा.
पुढील भागाची वाट पहातोय :)

* आले लगेच * पाहुन. ते आमाला काय विचारते कुण्या मद्राश्याला नात तर तंबीला विचारे ने *

मिसळपाव's picture

20 Oct 2010 - 10:29 pm | मिसळपाव

हॉस्पिटलमधे होता म्हणालात वरती. या असल्या मालिका पाहूनच तब्येत बिघडली का काय? ह.घ्या. Hope आता बरे आहात.

आनंद घारे's picture

21 Oct 2010 - 4:01 pm | आनंद घारे

मालिका पाहून अंगात भिनलेले लिखाणातून वाहून गेल्यामुळे मला आराम पडला आहे. आता वाचकांचे काय होणार?