घन ओथंबून येती

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
15 Oct 2010 - 6:37 am

घन ओथंबून येती
वनात राघू घिरघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतुन झडझडती
घन ओथंबुन झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती
घन ओथंबुन आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबेला
घन होऊन बिलगला
ना.धों महानोर
या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही .खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद,शेताचे सृजन ते ह्याचे सृजन!
कवी काव्य का लिहतो ? "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" हा एक निकष मानला तर समजणे थोडे सोपे जाईल. आपल्याला आलेला अनुभव हा व्यक्त करून रसिकासमोर मांडणे हे कवीला गरजेचे होते, नाही तर तो अस्वस्थ होतो. हा कवी खेडेगावात जन्मला,शेतकरी म्हणून वाढला.कविता लिहल्या, विधान परिषदेत गेला, तरी शेतकरीच राहिला.त्यामुळे सगळे अनुभव या गोष्टींशीच निगडीत. हा लळा इतका गाढ कीं कवी व निसर्ग एकरूपच होऊन गेले आहेत असे वाटावे. दोन उदा.बघून मग वरील कवितेकडे वळू.
(१)या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
(२) ज्वार उभार, गर्भार,
हिरव्या पदराला जर,
निर्‍या चाळताना वारा
घुसमटे अंगभर.
पहिल्यात मेघांनी भुईला दान दिले व पाणी कवीच्या डोळ्यात आले तर दुसर्‍यात ज्वार गर्भार! माणुस निसर्गात व निसर्ग मानवात एकरूप होऊनच कवितेत येतात. या वर जरा जास्त लिहावयाचे असल्याने येथे थांबू व कवितेकडे वळू.
घन ओथंबुन आल्यावर प्रथम कवी वनात बघतो, मग आजुबाजुला नदीनाल्यात व शेवटी शिवारात..एकदा कावळे, कबुतरे व पोपट कसे उडतात ते बघाच व मगच घिरघिरती’ याचा आनंद लुटा. तिघांचीही उडण्याची पद्धत निरनिराळी .पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात झ व ड याची पुनरुक्ती सुरेखच आहे पण फार महत्वाची नाही, जोरदार पावसात झाडाखाली भिजण्याकरिता उभे रहा व झडझडणारे पाणी उपभोगा.
आता हा पाऊस नदीत पडतो आहे.त्याने नदीला सागरभरती आणली, नदी ही सागरासारखी झाली आहे आणि लाटा डोंगरलाटा झाल्या आहेत. मला पहिल्यांदी ही अतिशयोक्ती वाटली पण या पावसाळ्यात नदीत बोट उलटी होऊन ३६ स्त्रीया बुडल्याचे वाचून या डोंगरलाटांची कल्पना आली. नदीवर पाणी भरावयाला जाण्याच्या वाटा आता वाटा रहिल्या नाहीत, ते ओसंडून वाहाणारे ओढे झाले आहेत. रोजची पायाखालची वाट पाण्याने वेढली , नाही, तिच्यांबरोबर हीही वेढली गेली आहे. निसर्गाबरोबरची समरुपता तिलाही संगतीने घेऊन जात आहे.
खरी बहार तिसर्‍या कडव्यात आली. शिवारातल्या फुलांतले केसरच ओले झाले असे नव्हे; ही भिजली व तिला आठवण कसली झाली ? साजणाची,छेलछबिल्या,साजणाची. जरा आडोशाला बिलगणार्‍या साजणाची. आणि इथे तर हा घनच साजण झाला आहे.खरा रसिक दिसतो नाही? (तेच पुरुष भाग्याचे!)
कवितेत निसर्ग व माणुस आपापल्या भुमिका कशा सहजतेने बदलतात पहा.लयही नैसर्गिक आहे. मिळाली तर ध्वनिमुद्रिका ऐका, नाही तर स्वत: गुणगुणा. मजा येते.
शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

15 Oct 2010 - 7:26 am | स्पंदना

हे घ्या , शरद दा. छान लिहिल आहे, अस काही वाचायला मिळणे हे आमच भाग्य.

music @ dhingana.com" alt="" />

मेघवेडा's picture

15 Oct 2010 - 2:02 pm | मेघवेडा

खरंय. शेवटच्या वाक्याशी प्रचंड सहमत. फारच सुंदर आहे गाणं!

सुरेख लिहिलय. आवडलं. अजूनही लिहा.

ना.धो. महानोर

एक जबर्दस्त कवी आहेत ..
त्यांची प्रत्येक कविता मनात घर करते ..

धन्यवाद

अप्रतिम रसग्रहण!
महानोरांची शैली खूप आवडते मला..

गडद जांभळं.. भरलं आभाळ..
मृगातल्या सावल्याना बिलोरी भोवळ..
खोल वरी चिंब बाई.. मातीला दरवळ..

सुरेख कल्पना..!

अडगळ's picture

15 Oct 2010 - 7:46 pm | अडगळ

महानोर आणि पाऊस म्हणजे चहा आणि नेव्ही कट ची जोडी आहे. एक आला की दुसरा आठवतोच.
हे अजून एक पावसाचं रूप महानोर मांडतात.
येणार्‍या जीवाचे डोहाळे पोरीला लागावेत , तसे पावसाचे डोहाळे आषाढाला लागलेत. पाणकळा.आणि इकडं शब्दांना सॄजनकळा. पावसाचं हे भवतालातलं नवनिर्माण आणि कवीचं शब्दांचं माहेरपण साजरं करणं.
मेघुटांची पालखी तर खासंच. कॅमेरा अलगद रानावरून आभाळावर.

आषाढाला पाणकळा,
सृष्टी लावण्याचा मळा,
दु:ख भिरकावून आले,
शब्द माहेरपणाला,
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला,
मेघुटांच्या पालखीने,
डोळे गेले आभाळाला.

जाईजुईचा गंध मातीला ....

(अति)अवांतर : दरवेळी ही कविता ऐकताना-वाचताना , आषाढ , सावळं आभाळ , पालखी आणी आषाढाची वारी , सावळा विठोबा, पालखीतनं(पुष्पकविमान वगैरे पेक्षा पालखी भारी) आभाळापार जाणारा तुकाराम असं सगळं एकत्र जाणवतं.

मुक्तसुनीत's picture

15 Oct 2010 - 7:51 pm | मुक्तसुनीत

हा लेख (नेहमीप्रमाणे ) आवडलाच. पण ही प्रतिक्रिया फारच सुरेख.

अवांतर : नेव्ही कट म्हणजे काय ?

जुनं प्रेम.

मुक्तसुनीत's picture

15 Oct 2010 - 7:57 pm | मुक्तसुनीत

महानोरांचे सहा शब्दही कधीकधी पुरेसे होतात. उदाहरण :

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे.

पहिल्यांदा या सहा ओळी वाचल्या तेव्हाचा थरार विसरता येत नाही.

रामदास's picture

15 Oct 2010 - 7:56 pm | रामदास

जशी फोर स्क्वेर लांब पण मिळते तशीच छोटीपण मिळते. अडगळ यांनी लिहीलेली नेव्ही कट म्हणजे डब्लु.डी.आणि एच.ओ. विल्स यांची शिगारेट असावी.

मिसळभोक्ता's picture

15 Oct 2010 - 10:48 pm | मिसळभोक्ता

महानोर आमचे आवडते कवी !

मस्त कलंदर's picture

15 Oct 2010 - 11:08 pm | मस्त कलंदर

नेहमीप्रमाणे सुंदर विवेचन!!!! परवाच हा चित्रपट झी टॉकीजवर पाहिला आणि हे गाणे लागल्यावर अंमळ चढ्या आवाजातच गाणे ऐकले!!!!
बाकी, महानोरांबद्दल काय बोलावे? त्यांच्या कवितांचे आणि पाऊस-निसर्गाचे नाते एकदम अतूट. पण हे जर्रा मोठे झाल्यावर कळले. लहान असताना भावाच्या डोळ्याच्या पापण्या ताणून ताणून "डोळ्यांच्या सांदी" तली "सावल्यांची राणी" शोधताना लै मार पडला होता!!!! :(

स्वाती२'s picture

16 Oct 2010 - 1:28 am | स्वाती२

सुरेख लेख. अडगळ यांचा प्रतिसाद ही आवडला.

सन्जोप राव's picture

16 Oct 2010 - 6:20 am | सन्जोप राव

छान उपक्रम. सुमारसद्दीत उठून दिसणारा. महानोर विशेष आवडते नसले तरी रसग्रहण आवडले. निसर्गकविता हा कविता आताशा बहुदा कालबाह्यच झाला आहे, असे वाटते. अजून येऊ द्या.