घन ओथंबून येती
घन ओथंबून येती
वनात राघू घिरघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतुन झडझडती
घन ओथंबुन झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती
घन ओथंबुन आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबेला
घन होऊन बिलगला
ना.धों महानोर
या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही .खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद,शेताचे सृजन ते ह्याचे सृजन!
कवी काव्य का लिहतो ? "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" हा एक निकष मानला तर समजणे थोडे सोपे जाईल. आपल्याला आलेला अनुभव हा व्यक्त करून रसिकासमोर मांडणे हे कवीला गरजेचे होते, नाही तर तो अस्वस्थ होतो. हा कवी खेडेगावात जन्मला,शेतकरी म्हणून वाढला.कविता लिहल्या, विधान परिषदेत गेला, तरी शेतकरीच राहिला.त्यामुळे सगळे अनुभव या गोष्टींशीच निगडीत. हा लळा इतका गाढ कीं कवी व निसर्ग एकरूपच होऊन गेले आहेत असे वाटावे. दोन उदा.बघून मग वरील कवितेकडे वळू.
(१)या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
(२) ज्वार उभार, गर्भार,
हिरव्या पदराला जर,
निर्या चाळताना वारा
घुसमटे अंगभर.
पहिल्यात मेघांनी भुईला दान दिले व पाणी कवीच्या डोळ्यात आले तर दुसर्यात ज्वार गर्भार! माणुस निसर्गात व निसर्ग मानवात एकरूप होऊनच कवितेत येतात. या वर जरा जास्त लिहावयाचे असल्याने येथे थांबू व कवितेकडे वळू.
घन ओथंबुन आल्यावर प्रथम कवी वनात बघतो, मग आजुबाजुला नदीनाल्यात व शेवटी शिवारात..एकदा कावळे, कबुतरे व पोपट कसे उडतात ते बघाच व मगच घिरघिरती’ याचा आनंद लुटा. तिघांचीही उडण्याची पद्धत निरनिराळी .पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात झ व ड याची पुनरुक्ती सुरेखच आहे पण फार महत्वाची नाही, जोरदार पावसात झाडाखाली भिजण्याकरिता उभे रहा व झडझडणारे पाणी उपभोगा.
आता हा पाऊस नदीत पडतो आहे.त्याने नदीला सागरभरती आणली, नदी ही सागरासारखी झाली आहे आणि लाटा डोंगरलाटा झाल्या आहेत. मला पहिल्यांदी ही अतिशयोक्ती वाटली पण या पावसाळ्यात नदीत बोट उलटी होऊन ३६ स्त्रीया बुडल्याचे वाचून या डोंगरलाटांची कल्पना आली. नदीवर पाणी भरावयाला जाण्याच्या वाटा आता वाटा रहिल्या नाहीत, ते ओसंडून वाहाणारे ओढे झाले आहेत. रोजची पायाखालची वाट पाण्याने वेढली , नाही, तिच्यांबरोबर हीही वेढली गेली आहे. निसर्गाबरोबरची समरुपता तिलाही संगतीने घेऊन जात आहे.
खरी बहार तिसर्या कडव्यात आली. शिवारातल्या फुलांतले केसरच ओले झाले असे नव्हे; ही भिजली व तिला आठवण कसली झाली ? साजणाची,छेलछबिल्या,साजणाची. जरा आडोशाला बिलगणार्या साजणाची. आणि इथे तर हा घनच साजण झाला आहे.खरा रसिक दिसतो नाही? (तेच पुरुष भाग्याचे!)
कवितेत निसर्ग व माणुस आपापल्या भुमिका कशा सहजतेने बदलतात पहा.लयही नैसर्गिक आहे. मिळाली तर ध्वनिमुद्रिका ऐका, नाही तर स्वत: गुणगुणा. मजा येते.
शरद
प्रतिक्रिया
हे घ्या , शरद दा. छान लिहिल
music @ dhingana.com" alt="" />
खरंय
सुरेख लिहिलय. आवडलं. अजूनही
ना.धो. महानोर एक जबर्दस्त
अप्रतिम रसग्रहण! महानोरांची
महानोर आणि पाऊस
सुरेख
विल्स नेव्ही कट शिगारेट.
धन्यवाद.
शिगारेटची लांबी
क्या बात है !!!
नेहमीप्रमाणे सुंदर विवेचन!!!!
सुरेख लेख. अडगळ यांचा
छान