मी लिहीलेले उखाणे- संग्रह

सिंधू वडाळकर's picture
सिंधू वडाळकर in जे न देखे रवी...
22 Aug 2010 - 11:19 am

माझे नांव- सिंधू वडाळकर.
राहाणार- मालेगांव
वय-६६
संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही.
आता मुलींची लग्ने झाली.
थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते... तेव्हा मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा.
जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच.
मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण.
१९७५ च्या आसपासचा काळ. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देता देता आमच्या काळचे उखाणे ही आठवतात.
***
(१) सुदाम्याचे पोहे केले कृष्णाने भक्षण...

--- राव म्हणतात, संकटकाळी मी करीन देशाचे रक्षण.

(२) रामनामाने समुद्रावर दगड तरंगले...

--- रावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले.

(३) प्रभू रामचंद्राला बोरे अर्पून, शबरीने जीवन केले कृतार्थ...

--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवनाला नाही उरत अर्थ"

(४) संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक...

--- रावांना आवडतात खुप मोदक

(५) निसर्ग्सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट...

--- रावांनी धरली परमार्थाची वाट.

(६) कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष...

--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवन रुक्ष"

(७) श्रावणात प्राजक्ताला येतो बहर...

--- राव म्हणतात, "महाराष्ट्रात पावसाने केला कहर"

(८) ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद...

--- रावांना आहे पुस्तके वाचनाचा छंद.

(९) महादेवाच्या गळ्यात नगाचा वेढा...

--- रावांना आवडतो केशरी पेढा.

(१०) वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी

--- रावांनी आणली आणली मला ५ तोळ्याची सरी

(११) जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष

--- रावांचे नाव घेते, आहे कुलदेवतेची साक्ष

(१२) खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे

--- रावांना आवडतात कांदे पोहे

(१३) अर्जुन व कृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी...

--- रावांना आहे परमार्थाची गोडी.

(१४) महाभारतात एकलव्याची आहे गाथा...

--- राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा.

(१५) कोल्हापूरची मिरची आहे झणझणीत...

--- रावांचा आवाज आहे खणखणीत

(१६) कमळाभोवती भ्रमराचे गुंजन...

--- राव करतात हरीचे भजन

(१७) आम्रतरूवर कोकिळेचे गुंजन...

--- राव करतात गणेशाचे पूजन.

(१८) राधा होती हरिभजनात तल्लीन...

--- राव म्हणतात आपण व्हावे ईश्वराशी लीन

(१९) कृष्णाने केले कालीयामर्दन...

--- राव धरतात रामाचे चरण

(२०) सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी आप्ल्या करतुत्वाचा उमटवलाय ठसा

--- राव म्हणतात अविरत प्रयत्न करण्याचा तू घे वसा
(२१) गणेशाला प्रिय दूर्वांची जूडी...

--- रावांना आहे परमार्थाची गोडी

(२२) संत जनाबाईने दळीता कांडीता विठ्ठलाल आळविले...

--- रावांच्या चरणी मी जीवनपुष्प वाहिले

(२३) श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य...

--- राव म्हणतात, प्रभू राम विश्वामित्राचे शिष्य.

(२४) हिरडा, आवळा, बेहेडा याची असते आयुर्वेदात भरती

--- रावांची राहूदे निरंतर किर्ती

शांतरसकलाउखाणे

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

22 Aug 2010 - 11:49 am | शिल्पा ब

छान...लग्नाळू मुलीनी वाचनखुण साठवून ठेवावी...आणि वाचनखुण उपलब्ध नसेल तर एक प्रिंट काढून ठेवावी...उपयोगी पडतात या गोष्टी..

चंद्राच्या रथाला चांदण्यांची जोडी
---- रावांचं नाव घेते लाडी गोडी..

कसंय हो आजी?

राजेश घासकडवी's picture

22 Aug 2010 - 12:15 pm | राजेश घासकडवी

एक गोष्ट आठवली. बालगंधर्वांना कोणीतरी म्हटलं, की स्टेजवर काम करणं ठीक आहे हो, पण तुम्ही स्त्रीवेशात हळदीकुंकवाला जाऊ शकणार नाही. त्यांनी ती पैज स्वीकारली. एका मोठ्या प्रतिष्ठित घरच्या हळदीकुंकवाला गेले. कोणीही हा पुरुष आहे असं ओळखलं नाही. वर त्यांनी उखाणाही घेतला,

राजहंस पक्ष, त्याला मोत्याचं भक्ष
नारायणरावांचं नाव घेते, इकडे द्या लक्ष

स्वतःचंच नाव व आडनाव घेऊन, लक्ष द्या म्हणूनही कोणाला शेवटपर्यंत कळलं नाही.

मिसळपाववर स्वागत.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Aug 2010 - 10:54 am | llपुण्याचे पेशवेll

बालगंधर्वांना काही स्त्रियांनी ओळखले होते असे म्हणतात. विड्याच्या पानाला चुना लावण्याच्या पद्धतीवरुन. तेव्हाच्या बायका चुना डब्यातून काढताना बोटाने काढत आणि पानाला लावत आणि पुरुष मंडळी नखाने काढत. :) त्यावरून ओळखले म्हणतात.

तिमा's picture

22 Aug 2010 - 1:22 pm | तिमा

सर्व उखाण्यांमधे --- रावांना देवपद दिल्यासारखे वाटते म्हणून उखाणे आवडत नाहीत. संसारामधे नवरा-बायकोला सारखेच महत्व आहे तर या नवरोबांची आरती का ओवाळायची ?

राजेश घासकडवी's picture

22 Aug 2010 - 1:30 pm | राजेश घासकडवी

लग्नात हुंडा म्हणून बापाने दिलीय मोटर
---रावांशिवाय माझं थोडंच अडलंय खेटर

कोणाला इतर काही इरसाल उखाणे सुचताहेत का?

कानडाऊ योगेशु's picture

23 Aug 2010 - 11:06 am | कानडाऊ योगेशु

हे घ्या रा.घासाहेब काहीच्या बाही उखाणे!

कबीराचे दोहे आणि कांदा पोहे वाला आवडला.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Aug 2010 - 5:06 pm | अविनाशकुलकर्णी

सर्व उखाण्यांमधे --- रावांना देवपद दिल्यासारखे वाटते म्हणून उखाणे आवडत नाहीत. संसारामधे नवरा-बायकोला सारखेच महत्व आहे तर या नवरोबांची आरती का ओवाळायची ?
-----------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक गोष्ट स्त्री पुरुष समानतेवर आणली तर संसाराची मजा फिकि होते.....एव्हढे असेल तर वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे रहावे समविचाराचा असेल तर पुढचे पाऊल टाकावे ..सरकारने व कायद्याने सोय केली आहे..

नावातकायआहे's picture

22 Aug 2010 - 7:38 pm | नावातकायआहे

>>सरकारने व कायद्याने सोय केली आहे..

वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे रहावे .सरकारने व कायद्याने सोय केली आहे......
ह्या विषयाव आधिक माहिति कुठ मिळल?

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Aug 2010 - 10:55 am | llपुण्याचे पेशवेll

वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे रहावे .सरकारने व कायद्याने सोय केली आहे......
ह्या विषयाव आधिक माहिति कुठ मिळल?

झकास.. म्हणजे सरकार हल्ली मित्रांसाठी मैत्रिणींची सोय पण करतं तर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2010 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर स्वागत आहे. उखाणे आवडले.

-दिलीप बिरुटे

अविनाशकुलकर्णी's picture

22 Aug 2010 - 9:30 pm | अविनाशकुलकर्णी

लिव्ह इन टाकुन गुगळा.....

पिवळा डांबिस's picture

23 Aug 2010 - 9:46 am | पिवळा डांबिस

मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण.
लेखक/लेखिका वयोवृद्ध असल्यास त्यांच्या लिखाणातल्या ऑब्वियस विसंगती दाखवू नयेत अशी आमच्या एका ताईने आम्हाला गळ घातल्यामुळे आमच्या "नो कॉमेंटस्!!":)
(काय करणार? ताई सलामत तो वयोवृद्ध पचास!!!)
:)

शिल्पा ब's picture

23 Aug 2010 - 10:03 am | शिल्पा ब

त्यांनी आधी तिकडे लेख टाकला असेल आणि मग तसाच इथे पेष्ट केला...असं मानून मी त्याकडे दुर्लक्ष करून उरलेला लेख वाचला जो कि छान आहे.

अर्धवट's picture

23 Aug 2010 - 10:13 am | अर्धवट

काकांचा इतरांना वयोवृद्ध संबोधुन, शिंग मोडुन वासरात सामिल होण्यचा निष्फळ प्रयत्न आवडला.. ;)

चतुरंग's picture

23 Aug 2010 - 7:37 pm | चतुरंग

हेच म्हणणार होतो! ;)

(तरणाबांड)चतुरंग

पिवळा डांबिस's picture

24 Aug 2010 - 12:37 am | पिवळा डांबिस

तुम्ही म्हणणारच!! :)

अशक्त's picture

23 Aug 2010 - 10:07 am | अशक्त

खोक्यात खोका टिव्ही चा खोका
खोक्यात खोका टिव्ही चा खोका
------------ माझी मांजर मी तिचा बोका

शिल्पा ब's picture

23 Aug 2010 - 10:12 am | शिल्पा ब

लै भारी...अशक्तराव, लै जाडजूड उखाणा लिवलायं..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Aug 2010 - 1:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे

राग मानू नका, पण हा उखाणा मला मित्राने १९९९ साली ऐकवला होता.

अशक्त's picture

23 Aug 2010 - 7:32 pm | अशक्त

अरे वा! तुमची स्मरणशक्ति चांगली आहे....( या वयात सुध्धा)

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Aug 2010 - 10:24 am | डॉ.प्रसाद दाढे

लग्नात नवर्‍या मुलालाही उखाणा घ्यावा लागतोच की..
मी माझ्या लग्नात घेतलेला हा उखाणा..

"अस्मानीच्या पर्‍या होत्या सुंदर आसपास
तरी मनाला आवडली एक मुलगी खास
साध्या सुंदर त्या मुलीचा आसमंती भास
अन *** ला भरवितो जिलबीचा घास!"

बाकी आचरट उखाण्यांचेही एक कलेक्शन नेटवर उपलब्ध आहे, फॉरवर्डेड मेल्समध्ये सापडेल

" संपात संप कामगारांचा संप
गणपतरावांच्या हातात ढेकणांचा पंप"

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
गणपतराव अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?

पिवळा डांबिस's picture

23 Aug 2010 - 10:28 am | पिवळा डांबिस

आमचा फेवरिट....

चहाचा कप, कपाखाली बशी....
*** माझी उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी!!!!!

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 12:07 pm | राजेश घासकडवी

कोल्ह्याला काकडी, सशाला गाजर
****च्या मी ताटाखालचं मांजर

आमोद शिंदे's picture

24 Aug 2010 - 1:23 am | आमोद शिंदे

संडासाच्या दारात देते लोटा ठेवुन
रायांना लागली जोरात मी घेते दाबुन

हा उखाणा अतिच इरसाल आहे असे वाटल्यास संपादक मंडळाने काढुन टाकावा.

जोडीत जोडी, लक्ष्मी-नारायणाची जोडी,
...राव ओढतात विडी, आणि मी लावते काडी,

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवतो/ते तूला, थोबाड कर इकडे...

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 1:29 am | मिसळभोक्ता

उखाणे आवडले.

तुमचे अनुभव नक्की येऊ द्यात इथे आता !

(ता. क. आपण कधी अमेरिकेला आल्याचे अनुभव लिहू नयेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मालेगावचे अनुभव खूप आवडतील.)