कोणता मानू मी विठठल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
9 Aug 2010 - 7:33 pm

महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची 'पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाच्या भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली, 30072010490माढा येथील विठोबाचे मंदिरपौंडरीकक्षेत्रे, पंडरीपूर, पांडुरंगपूर अशा नावाने ओळखल्या जात होते. विठोबाची मूर्ती पंढरपूरात केव्हापासून आहे हे नेमके सांगता येणार नाही.

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।

अशा लोकभावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही. संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्त्व वाढले. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा डळमळीत होते. असो, या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले. पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा ? चर्चेवरुन 30072010079माढ्याचा विठ्ठल मूळ विठ्ठलाची मूर्ती कोणती त्याबद्दल मला ओढ होती. म्हणून मी पंढरपूरला न जाता थेट माढ्याला पोहचलो. मूळ मूर्तीची गोष्ट सांगण्यापूर्वी इतिहासातील मूर्तीसंबंधातील काही संदर्भांची तोंडओळख करुन देतो.

विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा 30072010494माढ्याचा विठ्ठल...ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठलमुर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मुर्ती विहिरीत लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती हलविल्या गेली आहे. '' एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती.'' सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना मुर्ती दिसली नाही त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आनण्याची विनवणी केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती परत आणली. पुढे ''अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल असलेल्या 'माढा' या गावी [जि.सोलापूर] येथे नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ? पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२] महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.

श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे आणि ते मला पटणारे आहे. त्या विषयी इथे अधिक काही टंकत नाही. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे. 30072010496पायातले तोडेतर मूर्ती विठ्ठमूर्ती माढ्याला हलविली गेली. त्या विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मी माढ्याला पोहचलो. सावता माळ्याच्या अप्रकाशित अभंगातील दाखला त्या मूर्तीबाबत दिल्या जातो. तो अभंग असा-

विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥

सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व 30072010495मंत्राक्षरवर्णनापेक्षा दिगंबरत्व ह्या मुद्याकडे श्री. रा.चि. ढेरे आपले लक्ष वेधतात. मस्तकावर गवळी टोपी. दोन्ही कानात शंखाकार कुंडले. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला. मनगटावर कडे. आणि विठ्ठलाच्या वक्ष:स्थळावर मंत्राक्षर आपल्याला दिसतात.
'' श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा: || श्री
वत्स'' [पृ.क्र. १२९]

प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढे येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ''पांडुरंगमाहात्म्य'' चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी

''१) मूर्तीच्या -हदयावर देवाचा नाममंत्र कूटश्लोकात कोरलेला आहे.
२) मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि-
३) मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे'' [पृ.क्र.१३९]

ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. या सर्व लक्षणावरुन मलाही ती मूर्तीच मूळ वाट्ली. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी क्षणाक्षणाला असंख्य अद्बुत चमत्कार घडणा-या या सृष्टीत एखादी शक्ती कार्यरत असावी यावर विश्वास आहे. असो, तो विषय वेगळा. श्री.रा.चि.ढेरे म्हणतात ''मूर्तीद्रव्य हे भंगुर आणि जंगम असल्यामुळे त्याच्या बदलामुळे देवत्वाची आणि देवत्त्वाशी संबंध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्त्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नाही ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच. असो, पुढे चंद्रभागेला नमस्कार करुन पंढरपूर येथील प्रचलित पांडुरंगाचेही दर्शन घेतले. पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.

अधिक संदर्भासाठी जिज्ञासूंनी ''श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक. लेखक. श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. श्री विद्या प्रकाशन, 250 शनिवार पेठ, पुणे ४११०३०” हे वाचावे. त्यातील ''आद्य मूर्तीचा शोध'' हे प्रकरण वरील विषयावर आहे.

संस्कृतीकलाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विकास's picture

9 Aug 2010 - 7:47 pm | विकास

लेख आवडला. बरीच नवीन माहीती त्या निमित्ताने कळली.

गणपा's picture

9 Aug 2010 - 7:53 pm | गणपा

असेच म्हणतो.

प्रभो's picture

9 Aug 2010 - 11:00 pm | प्रभो

असेच म्हणतो.

माढ्याला माझ्या आत्याची कुलदेवता/ तसेच पुर्वी मावशी राहत असल्याने बर्‍याचदा जाणे झाले, पण विठोबाला जायचा चान्स नाही आला.. पण घरात बघितलेल्या जुन्या फोटोंवरून आठवतंय की माझ्या आईची मंगळागौर झाली होती माढ्यात आणी सगळ्यांचे विठ्ठलाच्या गाभार्‍यात फोटो आहेत ते.... :)

बेसनलाडू's picture

10 Aug 2010 - 1:45 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

धनंजय's picture

9 Aug 2010 - 7:54 pm | धनंजय

खूप माहितीपूर्ण. लेख आवडला.

छोटा डॉन's picture

9 Aug 2010 - 7:56 pm | छोटा डॉन

ह्यावर सविस्तर नंतर जराश्या सवडीने खरडतो.
ही केवळ पोच समजावी ...

स्वाती२'s picture

9 Aug 2010 - 8:10 pm | स्वाती२

लेख आवडला. रा. चिं. ढेर्‍यांचे पुस्तक तर आवर्जून वाचावे असे.

प्रियाली's picture

9 Aug 2010 - 8:23 pm | प्रियाली

नवीन माहिती कळली. लेख आवडला.

इंटरनेटस्नेही's picture

9 Aug 2010 - 9:41 pm | इंटरनेटस्नेही

अत्यंत माहितीपुर्ण लेख! आवडला हेवेसांनल.

सुनील's picture

9 Aug 2010 - 10:06 pm | सुनील

लेख आवडला. बरीच नवी माहिती मिळाली. औरंगजेबाच्या तावडीत मूर्ती सापडण्यापूर्वी ती हलवली गेली हे ठीकच. पण तसे अफझलखान येण्यापूर्वी तुळजापूरची मूर्ती का हलवली गेली नसावी? की तो येणार, मूर्ती फोडणार हे अनपेक्षित होते?

मूर्तींची अशी हलवाहलव गोव्यातदेखिल झालेली आहे. आज फोंडा परिसरात दिसणारी सगळी देवळे ही गोव्याच्या अन्य भागांतून स्थलांतर करून आणलेली आहेत. फोंडा भाग तसा डोंगराळ तेव्हा देवळे तिथे सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा असावी.

धनंजय's picture

9 Aug 2010 - 10:54 pm | धनंजय

फोंडा गावात पोर्तुगिजांनी सौंद्याच्या राजाला शरण दिली होती, आणि तिथे हिंदू धर्मस्थळांना (सौंदेकरांशी तह करून) अभय दिले होते.
म्हणून फोंड्याला ही देवळे आली.
फोंड्याला टेकड्या-दर्‍या आहेत खर्‍या, पण तशा केपें, सांगे वगैरे ठिकाणी सुद्धा आहेत. शिवाय फोंड्याजवळची देवळे दुर्गम नसून सहज पोचण्यासारखी आहेत.

ही माहिती आमच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात होती, आणि अन्यत्रही वाचलेली आहे.

सौंदेकरांचे अखेरचे वंशज अगदी हल्लीहल्लीच वारले (गेल्या काही दशकांत).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2010 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>अफझलखान येण्यापूर्वी तुळजापूरची मूर्ती का हलवली गेली नसावी? की तो येणार, मूर्ती फोडणार हे अनपेक्षित होते?

अफजलखानाने शिवाजी महाराजांना 'जिवंत कैद करुन घेऊन येतो' अशी प्रतिज्ञा केली आणि तो जेव्हा निघाला तो थेट तुळजापूरास मुक्कामास पोहचला. हे अनपेक्षितच घडले असे वाटत नाही. . पण महाराजांच्या कुलदेवतेवर हल्ला करायचे हे अफजलखानाने निश्चित केले असावे असे त्याच्या कृतीवरुन वाटते. [पाहा: सभासदाची बखर]-
'' श्रीभवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून, जातियांत घालून, भरडून पीठ केले. [ इथे आकाशवाणी झाली की आजपासून एकविसाव्या दिवशी तुझें शीर कापल्या जाईल...]पुढे लष्कर कूच करुन श्रीपंढरीस आले. भीमातीरीं उतरले. देवास उपद्रव देऊन वांईस आलें.''

दुसरा उल्लेख मल्हारराव चिटणीसाच्या बखरीतला पाहा-

'' एकंदर तीस हजार जमावानिशी अफजलखान मोठे अहंकारे करुन, निघोन दरमजल येतां तुळजापुरी श्रीदेवीस उपद्रव केला. परंतु देव बडवे यांणी लपवून ठेविला'' यावरुन लक्षात येते की, मूर्तीस उपद्रव झाला किंवा मूर्तीस लपवून ठेवल्या गेले होते. असेही म्हटल्या जाते की, अफजलखान मुर्तीची नासधुस करेल म्हणून भोप्यांनी मूळ मूर्ती लपवून ठेवून तिथे दुसरी मूर्ती ठेवली आणि त्या मूर्तीची तोडफोड अफजलखानाने केली. तो गेल्यानंतर पुन्हा मूळ मूर्तीची स्थापना केली गेली. अर्थात या गोष्टीला माझ्याकडे अनुक्रमे आता फारसे संदर्भ नाही. पण वरील संदर्भ बोलके आहे. [अर्थात बखरीतले वास्तव किती हाही शंकेचा विषय आहेच]

-दिलीप बिरुटे

तुळजापूरची श्रींची मूर्ती चल आहे. (हलवता येते)
आणि माढ्याप्रमाणेच तुळजापुरातील मूर्तीसंदर्भात सुध्दा आख्यायिका आहेत. जवळच्या तीर्थ नामक गावात तशीच मूर्ती आहे आणि ती अस्सल आहे असे समजले जाते. तेथील गावकरी सुध्दा तसेच सांगतात की अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी तुळजापुरातील मूर्ती येथे आणली गेली.
बाकी माढ्याच्या मंदिरात कैकदा गेलो आहे. तिथे देवी रुक्मिणीची सुध्दा मूर्ती आहे. ही कहाणी माहीत आहे.

धन्यवाद डॉक्टरसाहेब..

माढ्याच्या विठ्ठलाबद्दल ही नवीनच माहिती कळली. एकदा जाऊन आले पाहिजे. रा. चिं. ढेर्‍यांचे पुस्तकही वाचले पाहिजे.

>> पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते.
मी लहानपणी पंढरपूरला राहात होतो तेव्हाही मला पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या शिळेत बराच फरक वाटत असे. अजिबात गर्दी नसण्याच्या त्या काळात पांडुरंगाची महापूजा बर्‍याच वेळा अनुभवली आहे. पांडुरंगाची शिळा (तुलनेने) खडबडीत आहे. दर्शनामुळे किंवा नारळ ठेवल्यामुळे पाय खडबडीत होतील, पण संपूर्ण अंग का खडबडीत असेल का हा प्रश्नच आहे खरा..

आमची अर्थात पांडुरंगावर भक्ती! मग पाषाणमूर्ती पंढरपूरला असो नाहीतर माढ्याला नाहीतर अजून कुठे. हृदयस्थ विठोबा सगळ्यात खरा!!

अवांतरः माढ्याला एकटाच विठोबा आहे का? का तिथे रुक्मिणीची वेगळीच मूर्ती आहे?

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 10:56 pm | राजेश घासकडवी

छान माहिती.

ही मूर्ती हलवण्याच्या प्रकारावरून एक गमतीदार वचन आठवलं.

'विलियम शेक्सपिअरची नाटकं त्याने लिहिली नाहीच मुळी. ती त्याच नावाच्या दुसऱ्याच एकाने लिहिली.'

खरा शेक्सपिअर कुठचा तर तो नाटकं लिहिणारा, तसंच खरी विठ्ठलाची मूर्ती कुठची तर पंढरपूरच्या मंदिराच्या गाभ्यात असलेली. त्या स्थळाला भक्तांच्या श्रद्धेमुळे महात्म्य आहे. एरवी 'खरा विठ्ठल' हा खऱ्या भक्ताच्या हृदयातच असतो. अमुक मूर्तीत, किंवा माठात जर त्याचा आत्मा ठेवता आला असता तर आणखीन काय हवं होतं?

चित्रा's picture

9 Aug 2010 - 10:39 pm | चित्रा

माहितीपूर्ण लेख. फोटो दिल्यामुळे खूपच बहार आली.

विठ्ठलाच्या चेहर्‍याचा फोटो मोठा लावता येईल का? हा चेहरा जरा जास्त निमुळता आहे का? आपल्याकडे दिसणार्‍या बर्‍याचशा मूर्तींमध्ये चेहरे गोलसर असतात असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2010 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

30072010498

चेहरा गोल नाही. निमुळता आहे.

-दिलीप बिरुटे

अनिरुद्ध प's picture

22 Jul 2013 - 4:51 pm | अनिरुद्ध प

श्री विट्ठलाच्या मस्तकावरिल शिवलिन्गाचे छायाचित्र सुद्धा डकवायला हवे होते.

क्रेमर's picture

9 Aug 2010 - 10:42 pm | क्रेमर

चांगली माहिती.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2010 - 10:48 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम माहिती...

राजेशचा प्रतिसाद पण आवडला.

ऋषिकेश's picture

9 Aug 2010 - 11:05 pm | ऋषिकेश

प्रा डॉ, एकदम भारी लेख!! बरीच नवी माहिती मिळाली

पुष्करिणी's picture

10 Aug 2010 - 1:58 am | पुष्करिणी

छान माहितीपूर्ण लेख, बरीच नविन माहिती कळाली

खालिद's picture

10 Aug 2010 - 5:36 am | खालिद

खूप माहितीदायक लेख.

सवडीने लेख आणि संदर्भ वाचावे लागतील.

सहज's picture

10 Aug 2010 - 6:42 am | सहज

विठ्ठलमूर्ती खरी कोणती हे मी पहिल्यांदाच ऐकले. त्यावर काही शास्त्रीय संशोधन, पुरावे सरकारने काही चौकशी काम केले आहे का?

माहीतीपूर्ण लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2010 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>त्यावर काही शास्त्रीय संशोधन, पुरावे सरकारने काही चौकशी काम केले आहे का?
श्री. रा.चि.ढेर्‍यांनीच त्यावर काम केले आहे असे वाटते. संशोधनातील निष्कर्षे काही अंतिम असत नाही. त्यामुळे अजूनही संशोधनाला वाव आहेच. श्री रा.चि.ढेर्‍यांच्या या संशोधनावर 'सवंग लेखन' म्हणूनही खूप टीका झाली होती. सरकार असे काही काम करेल असे वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

पारुबाई's picture

10 Aug 2010 - 7:24 am | पारुबाई

अभ्यासपूर्ण लेख.

पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने ...................या वाक्याचा अर्थ सान्गाल का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2010 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने ...................या वाक्याचा अर्थ सान्गाल का ?

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सानेगुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. मंदिर प्रवेशामुळे मोठा गदारोळ माजला होता. पुजार्‍यांनी दलितांना प्रवेश देऊ नये म्हणून प्रकरण न्यायालयात नेले. तिथे त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. शासकीय आदेशानुसार विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले. पण कट्टर पुजार्‍यांना ती गोष्ट काही मान्य झाली नाही. मंदिरात दलितांनी प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीची महापूजा करुन मूर्तीतील देवत्त्व काढून एका घागरीत ठेवले. पुढे ती घागर एका वाड्यात ठेवण्यात आली. एकादशीला कर्मठ लोक त्या माठाची पूजा करत असायचे. अर्थात दर्शनार्थी प्रचलित मूर्तीचीच पूजा करीत होते. पुढे कर्मठ लोकांना पश्चाताप झाला ती गोष्ट वेगळी. असो, असा आहे त्या वाक्याचा अर्थ. आणि ही गोष्ट फक्त त्रेसष्ठ वर्षापूर्वीची आहे. :)

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

11 May 2012 - 1:49 pm | बॅटमॅन

ही गोष्ट बहुतेक यशवंत पाठकांच्या आत्मचरित्रात्मक अथवा दुसर्‍या कुठल्यातरी पुस्तकात वाचली होती.

नीलकांत's picture

10 Aug 2010 - 8:59 am | नीलकांत

सर, खूप माहितीपुर्ण लेख आहे. या विषयावर अधीक वाचायला हवे.

- नीलकांत

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Aug 2010 - 9:52 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी आत्मा माठात वगैरे काढता येण्याइतका काही पांडुरंग काही छोटा वाटत नाही.
रा चिं ढेरे यांचे लेखन विद्वत्तापूर्ण असते.
या पांडुरंगाबद्द्ल वाचलेले आहे. त्यावेळेला बराच मोठा वादंग यावरून झाला होता हे ही ऐकले आहे.
पांडुरंगाची मूर्ती शाळिग्रामाची असूदे नाहीतर POPची त्यामुळे माझी श्रद्धा कमी होईलसे वाटत नाही.
सरांनीही चांगला लेख लिहीला आहे.

भारतीय's picture

10 Aug 2010 - 11:50 am | भारतीय

<><पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.
विठ्ठल आचरणात येऊ द्या.. पंढरपूर काय किंवा माढ्याचा काय.. विठ्ठल तो विठ्ठलच! आचरणात येईल तो खरा!
बाकी माहीती आवडली..

लिखाळ's picture

10 Aug 2010 - 12:06 pm | लिखाळ

वा ! छान पाहितीपूर्ण लेख.
फोटो उत्तम- चित्रा यांच्या नीरिक्षणाशी सहमत.

(ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे वेगळे आहेत अशी एक चर्चा उपक्रम किंवा मिपावर पूर्वी वाचली होती, तीची आठवण झाली. )

अवलिया's picture

10 Aug 2010 - 12:19 pm | अवलिया

>>> पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ?

शांतपणे डोळे मिटुन "स्वतःला" पहा. तोच खरा विठ्ठल !

बाकी केवळ रुपाचे डोलारे.. असले काय नसले काय !!

अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान, कळो आले

तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव
फिटला संदेह अन्य तत्वी

मुरडुनिया मन उपजलासी चित्ते
कोठे तुज रिते न दिसे रया

दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या

वृत्तीची निवृत्ती आपणां सकट
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज

निवृत्ती परम अनुभव नेमा
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो

विठ्ठल विठ्ठल .. जय हरी विठ्ठल !!

भाऊ पाटील's picture

10 Aug 2010 - 1:05 pm | भाऊ पाटील

प्रा डॉ- सुंदर आणि माहीतीपूर्ण लेख.

अवलिया--शांतपणे डोळे मिटुन "स्वतःला" पहा. तोच खरा विठ्ठल !

वा वा!

विठ्ठल विठ्ठल .. जय हरी विठ्ठल !!

दत्ता काळे's picture

10 Aug 2010 - 12:57 pm | दत्ता काळे

लेख फार आवडला. बरीचशी माहीती मला नविनच होती.

सहज's picture

10 Aug 2010 - 1:00 pm | सहज

.

स्वाती दिनेश's picture

10 Aug 2010 - 2:28 pm | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण लेख आवडला, बरीच नवीन माहिती समजली.
धन्यवाद,
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2010 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवर्जून प्रतिसाद लिहिणा-या मित्रमंडळींचे आणि वाचकांचेही मन:पूर्वक आभार.........!

-दिलीप बिरुटे

इतक्या सुंदर माहितीपर धाग्यात उगाचच कोणीतरी पिंक टाकल्यासारखा गरज नसतानाही बादरायण धुणी धुण्याचा अवांतर पिंक प्रतिसाद टाकला आहे.
तसा प्रतिसाद अवलिया अथवा इतर कोणी टाकला असता तर तात्काळ संपादीत झाला असता.
असो.
जॉर्ज ऑरवेल म्हणतो तेच खरे. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.

सुंदर लेख आणि अनमोल माहिती... :)

प्रचेतस's picture

19 Jul 2013 - 7:53 pm | प्रचेतस

अरे वा. उत्तम माहिती.

हा लेख नजरेतून कसा काय सुटला होता कुणास ठाऊक.

यशोधरा's picture

20 Jul 2013 - 3:10 pm | यशोधरा

हेच म्ह्णते.

रुमानी's picture

20 Jul 2013 - 11:57 am | रुमानी

धन्यवाद वल्ली.. :)
महीती व फोटो दोन्हि आवडले. पाडुरंगाचि मुर्ती मात्र मनास अतिशय भावली...

खूप माहितीपूर्ण. लेख आवडला.
जवाहरलाल

ब़जरबट्टू's picture

20 Jul 2013 - 1:09 pm | ब़जरबट्टू

छान माहिती दिलीये.. ले़ख आवडला !!

पैसा's picture

20 Jul 2013 - 3:20 pm | पैसा

रा. चिं. ढेरेंचा मूळ लेख वाचला होता. त्या मूर्तीचे फोटो पाहून बरे वाटले.

सुधीर's picture

20 Jul 2013 - 4:31 pm | सुधीर

लेख आणि मूर्तीचे फोटो आवडले.

नविन माहितीपूर्ण लेख!

राही's picture

20 Jul 2013 - 5:55 pm | राही

श्री विट्ठल एक महासमन्वय हे ढेरे यांचे पुस्तक अत्यंत वाचनीय आहेच पण त्यांची बाकीची सर्वच पुस्तके इतिहासाच्या आणि नाथ ,दत्त आणि शाक्त संप्रदायांच्या अभ्यासकांनी जरूर वाचावींत अशी आहेत. त्यांचे लिखाण, सहज सोपे, प्रासादिक आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करणारे असते. समर्पक शब्दांचा वापर हे आणखी एक वैशिष्ट्य. ते कुठल्याही रूढी/कल्पनांचे दैवीकरण अथवा उदो उदो करीत नाहीत तर उलट दैवतांच्या मूळ मानवी स्वरूपाचा वेध घेतात. कुणाच्याही भावना न दुखवता अलगद श्रद्धां-परंपरांच्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनव आहे. हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यात वावरते आहे हे आपल्या पिढीचे अहोभाग्य आहे.

drsunilahirrao's picture

22 Jul 2013 - 12:41 pm | drsunilahirrao

सुंदर लेख !

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2013 - 2:00 pm | गंगाधर मुटे

मी पंढरपूरला ३०-३५ वेळा गेलो आहे. पण माढा याबद्दल काहीच माहिती नव्हती.
आता पुढल्या खेपेस पहिले माढा दर्शन.

सुरेख लेख. :)

त्रिवेणी's picture

22 Jul 2013 - 2:22 pm | त्रिवेणी

आजच वाचले.
माझ्यासाठी ही सगळीच माहिती नवीन आहे. धन्यवाद.
अवांतर- सर तुमच्या पिएचडीचा विषय कोणता होता.

अनिरुद्ध प's picture

22 Jul 2013 - 4:58 pm | अनिरुद्ध प

श्री विट्ठलाच्या मस्तकावरिल शिवलिन्गाचे छायाचित्र सुद्धा डकवायला हवे होते.

मालोजीराव's picture

22 Jul 2013 - 5:51 pm | मालोजीराव

कपाळावरील गोल गंध पाहून पांडुरंग म्हणजे तत्कालीन शैव-वैष्णव (आडवे आणि उभे गंध) यांना एकत्र आणणारा दुवा वाटतो…

मालोजीराव's picture

22 Jul 2013 - 5:52 pm | मालोजीराव

vitthal

अनिरुद्ध प's picture

22 Jul 2013 - 7:25 pm | अनिरुद्ध प

मालोजी राव ते शिव विश्णुचे एकत्रित रुप्च आहे म्हणुन त्याचे नाव पान्डुरन्ग आहे,तसेच त्याच्या मस्तकावर त्यान्नी शिवलिन्ग सुद्धा धारण केले आहे म्हणुनच तो पान्डुरन्ग आहे.

प्रचेतस's picture

22 Jul 2013 - 7:30 pm | प्रचेतस

ते शिवलिंग नसून दक्षिणी पद्धतीचा मुकूट आहे.

अनिरुद्ध प's picture

22 Jul 2013 - 7:42 pm | अनिरुद्ध प

आपला ईतिहासा बद्दलचा अभ्यास निसन्शय माझ्यापेक्षा अधीक आहे पण आपल्या द़क्षिणी पद्धतिच्या मुकुटावर शिव्लिन्ग असुन त्याचे छायाचित्र देण्याचा प्रयत्न करिन्,आणि ते छायाचित्र माढा येथिल मुर्तिचे आहे,तसेच सध्या पन्ढरपुर येथिल मुर्तिवर्सुद्धा असेच शिवलिन्ग आहे असे वाटते.

माढा येथील मूर्तीचे छायाचित्र वर एका प्रतिसादात बिरुटे सरांनी दिलेलेच आहे.

काही दक्षिणी पद्धतीचे मुकूट येथे पहा. अर्थात हे मात्र सालंकृत आहेत.

a a a

मालोजीराव's picture

24 Jul 2013 - 12:00 pm | मालोजीराव

मूर्ती प्रत्यक्षात पहिली नाही (मुकुट नसताना) परंतु भक्त आणि वारकरी विठ्ठलाने डोक्यावर शिवलिंग धारण केले आहे असे मानतात. विठ्ठल जर शैव-वैष्णव समन्वयाचे प्रतिक असेल तर डोक्यावर शिवलिंग असावे.१७ व्या शतकात चंद्रभागेमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळाली होती त्यातील विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग स्पष्ट कोरले होते.त्या मुर्तीही पंढरपुरात आहेत असे ऐकून आहे.

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 12:37 pm | अनिरुद्ध प

मालोजीराव्,आमचे वार्करि मित्र अजुन वारिहुन परत आले नस्ल्याने प्रस्तुत शिव्लिन्गाचे छायाचित्र देण्यास विलम्ब होत आहे म्हणुन क्षमस्व्,जसे मिळेल तसे लवकरात लवकर,देण्याचा प्रयत्न करिन.

नविन व उत्तम माहिती. धन्यवाद!!

विटेकर's picture

24 Jul 2013 - 5:14 pm | विटेकर

हे माढा नेमके आहे कोठे ? कोणत्या दिशेला? माढा नावाचे दोन गावे आहेत का?

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 5:35 pm | अनिरुद्ध प

हे पन्ढरपुर जवळ्च सुमारे २० मैलावर आहे,आप्ले केन्द्रिय क्रुशिमन्त्री ईथुनच लोकसभेवर निवडुन गेले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2013 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

madha

-दिलीप बिरुटे

छान माहिती आणि फोटो. प्रतिसाद देखील तितकेच माहितीपूर्ण. ढेरे सरांचे पुस्तक न कळल्यामुळे बाजूला ठेवले होते. आता पुन्हा वाचायला घेईन.

लेख नजरेतून निसटला होता. फार छान लिहिले आहे.

गावडेसरांशी सहमत.
लेख आवडला.

शि बि आय's picture

18 Jul 2016 - 11:40 pm | शि बि आय

खूप छान लेख.. बर्याच नवीन गोष्ट समजल्या.

स्कंद पुराण आणि पदमपुराणाशिवाय विष्णुपुराणांतर्गत तिसरे माहात्म्य डॉ ढेरे याना उपलब्ध झाले होते पण त्यात गूढ मंत्राचा श्लोक आहे कि नाही याबाबत ते खुलासा करत नाहीत. या माहात्म्याबद्दल संशय वाटण्याचे कारण म्हणजे ही माहात्म्ये लोकजीवनात मूर्ती प्रसिद्ध पावल्यानंतर लिहिली गेली असल्याचा संभव असून त्यांना प्राचीनत्व प्राप्त होण्यासाठी पुराणांचा साज चढविला गेला आहे. सत्यनारयणा पोथोला जसे ' स्कंदपुराणे रेवाखंडे' या शादप्रयोगाने प्राचीनत्व देण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या माहात्म्यांची विश्वसनीयता व प्राचीनता कितपत मानायची याचा संशोधकांनी विचार केला पाहिजे. शिवाय पुराणांच्या प्रतीमध्ये एकवाक्यता
नाही. वेळोवेळी त्यात भर घालण्यात आलेली दिसते. त्यामुळं मूळ थी कोणती व त्य।त कसेकसे बदल होत गेले याचे संशोधनझाल्याशिवाय माहात्म्ये संशोधनाचे साधन होऊ शकणार नाहीत.

डॉ. ढेरे यांच्या मते आद्य विठ्ठलमूर्ती चे अनन्य साधारण वैशिष्ठ्य म्हणजे त्यावर कोरलेला नाममंत्र कूटलोक होय परंतू आपण हे पाहिले आहे को, ही दोनही माहात्म्ये ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय वाटत माहीत. त्यापेक्षाही अधिक विश्वसनीय मूर्तीचे लक्षण. म्हणजे संतानी वर्णंत केलेले विठ्ठलमूतिचे स्वरूप हे होय. विठलाच्या मूर्तीवर जर मंत्राक्षरमाला असती तर संतानी त्याचा उल्ळेख केला असता. विठ्ठलाचे नित्य दर्शन घणारे, पंढरपूरात स्थायिक असणारे, व मूर्तीचे संपूर्ण दर्शन होण्याची सहजशक्यता असलेल्या, संताच्या वर्णनात मंत्राक्षरमालेचा लवमात्र उल्लेख नाही. यांने स्पष्टीकरण करण्याचे उत्तरदायित्व डॉ. ढेरे यांना मुळीच टाळता येणार नाही. भक्‍त- सम्राट नामदेव महाराज, संत जनाबाई, शिवकल्याण यासारच्या पंढरपुरवासीय व नित्य दक्षंन घेणार्‍या संतांच्या वर्णनात मंत्राक्षर मालेचा उल्लेख नसणे हे आश्चर्य कारक वाटते. त्यामुळ अश्या तर्‍हेची मंत्राक्षरमाला या प्राचीन मूर्तीवर नसावी असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आद्यमूर्तीच्या वर्णनात संतांचे शब्द
विश्‍वसनीय का? ज्यांच्या विश्‍वसनीयतेबद्दल शंका आहे अशा माहात्म्याची वणंने प्रमाण मानावयाची याच्याबद्दल फारसा संदेह बाळगण्याचे कारण नाही. संतांची वर्णने अधिकृत समजावयास कोणतीच हरकत वाटत नाही. अर्थात ज्यांना प्राचीन मूर्तीच्या अनन्य साधारण वेशिष्ठ्याचा डोलारा उभा करावयाचा आहे
त्यांना मात्र ही वर्णने नि:संशय अडचणीत टाकणारी आहेत.

आपल्या सिद्धांताला अन्य रचनांची पृष्टी म्हणन जी इतर साधने 'विठ्ठलसहस्रनाम स्तोत्र' ' विठठल अष्टोत्तर शतनाम स्तोत्र' डॉ. ढेरे घेतात त्या साधनांच्या प्राचीनतेबद्दल ते स्वतः साशंक आहेत आणि त्यांचे कारणही ते मान्य करतात. अशा कृतींचा “ रचना हेतूच मळी पावित्र्य व प्राचीनता वाढवून सांगण्याचा असतो आणि त्यासाठी त्यांचा कर्ता आपले नांव पुसून टाकोत असतो.” डॉ. ढेरे यांचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे

शा वि कु's picture

19 Sep 2020 - 2:21 pm | शा वि कु

सुंदर लेख. अगदी नवीन माहिती मिळाली.

कंजूस's picture

29 Oct 2020 - 7:54 pm | कंजूस

गोरोबा कुंभाराचा काळ,( त्याने पांडुरंगाला विटेवर वेटिंग ठेवले. खूप वेळ. कंटाळून पांडुरंगाने हात कटीवर ठेवले. "अरे लवकर बाहेर ये, रुक्मिणी वाट पाहातेय.") अल्लदीन खिलजी वारंगळपर्यंत ( आन्ध्रा) देवळे फोडत गेला तो काळ, त्या भीतीने महाराष्ट्रात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागात मूर्ती हलवण्याची क्लपना आली असावी. गुराख्यांचा कापडी टोपी घातलेला देव होता.