दहशत
======================================
मुंबईत राहणाऱ्या.. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाजवळ अशा प्रकारचे भरपूर अनुभव असतील.. मी लिहिलेल्या प्रसंगांपेक्षा जास्त मजेशीर.. खिळवून ठेवणारे.. विचार करायला लावणारे.. हेलावून सोडणारे.. किंवा सुन्न करून टाकणाऱ्या या अशाच अनुभवांनी मुंबईकरांना, एका सूत्रात गुंफले आहे. लोकल प्रवास मुंबई करांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. आणि तितकाच जिव्हाळ्याचाही.
मुंबईतली गर्दी, धावपळ, गतिमानता.. लोकल्सच्या वेळा, ऑफिस, घर ऑफिसातल कामकाज.. त्यातूनच शोधून उपभोगलेले.. धरून ठेवलेले उत्सवी क्षण या सगळ्याची नशा मुंबईकरांच्या नसानसांतून वाहताना दिसते. मुंबईकरांना उत्साह, प्रेरणा, जीवन शक्ती देत राहते. आणि मग हीच नशा चारपाच दिवस हवा बदलासाठी गेलेल्या मुंबईकराला, पाहुण्याघरी राहणाऱ्याला गेलेल्याला जशी घराची ओढ लागावी त्या प्रमाणे मुंबईची ओढ लावते.
म्हणूनच मुंबईतली लोकल ही फक्त वाहन नाहीये.. तर ती मुंबईची, मुंबईकरांची जीवन वाहिनीच आहे. एक दिवस जरी लोकल बंद पडली तरी निम्म्याहून अधिक मुंबई ठप्प होऊन जाते. रक्त वाहिनीत अडथळा आल्यावर एखादी व्यक्ती अस्वस्थ होऊन जावी तशीच लोकलच्या मार्गात अडथळा आल्यावर मुंबई अस्वस्थ होऊन जाते. इतकी सुविधा इतका सुरळितपणा लोकलने मुंबईला बहाल केला आहे.
मुंबईत येणारे लोक.. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची धुरा वाहता वाहता लोकलवरचा ताण दिवसेनदिवस वाढतच जातोय.. तरी ती शक्य तितक्या प्रवाशांना आपल्या अंगाखांद्यांवर घेऊन अव्याहत चालतेच आहे.. अवाढव्य वाढल्या गोकुळाला अपुरी पडती आहे. प्रसंगी तिच्या अधुरेपणावर, संपत चाललेल्या क्षमतेवर टीका, विनोदही केले जातात. तरी ती आहे म्हणूनच मुंबई "मुंबई" आहे याची जाणीव सच्च्या मुंबईकरांना आहेच. तिच्याबद्दल कौतुक, अभिमान आणि आपलेपणाही आहे.
अशा या लोकलवर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते तेव्हा ती अख्ख्या मुंबईची, कुठून कुठून चरितार्थासाठी येऊन राहिलेल्या मुंबईतल्या प्रत्येक रहीवाश्याची, पर्यायाने अख्ख्या भारताची असते. ११ जुलै २००६ रोजी भारताच्या हृदयास (मुंबईस)रोहिणीत शिरलेल्या.. काही विघातक घटकांमुळे जोरदार झटक्यांना सामोरे जावे लागले.. आणि मुंबईसकट अख्खा भारत कळवळून गेला.
संध्याकाळच्या भर गर्दीच्या वेळेला ६ ६: ३० च्या दरम्यान माटूंगा स्टेशनवर पहिला बॉंबं स्फोट झाला.. त्या पाठोपाठ माहीम, बांद्रा-खार, सांताक्रुझ-पार्ला या स्टेशनांच्या मध्ये जोगेश्वरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल.. अशा एकूण सात ठिकाणी लोकल मध्ये स्फोट होत गेले.. लोकलचे डबे.. डब्यांमधली माणसं.. स्टेशनं.. अस्ताव्यस्त विखुरली गेली.. पत्रे.. हातपाय.. मनं.. साऱ्यांच्या चिंधड्या-चिंधड्या उडल्या.. रक्ताचे अश्रूंचे पाट वाहिले.. तो प्रसंग कोणा एकावर ओढवला नव्हता. बॉंब असलेल्या डब्यातून प्रवास करणारे.. स्फोटात जीव गमावणारे.. जखमी झालेले.. स्फोट, चिंधड्या, पाट, जखमा बघणारे.. मदत कार्य करणारे.. स्फोटात जीव गमावलेल्यांचे आप्त, स्नेही.. टीव्ही सेटच्या समोर बसून ती विदारक दृश्यं बघून हादरलेले.. मुंबईकर.. भारतवासी.. साऱ्यांचा थरकाप उडवणारा असाच तो प्रसंग. कित्येकांच्या मनावर खोल ओरखडे सोडून गेला.
वृत्तपत्रे लाल-काळ्या रंगात माखत राहिली.. दोनशेच्या आसपास मृत हजाराच्यावर जखमी.. स्फोट बघताना मेल्याहून मेलेल्यांसारख्या झालेल्यांची तर मोजदात.. थोडक्यात बचावलेल्या, मृत्यूचे निकट दर्शन घडल्याने विखुरल्या भावभावनांची तर गणतीच नाही.
माझ्या सुदैवाने मी तो आतंक बघणाऱ्यांत, किंवा छिन्नविच्छिन्न झालेल्या देह मनांच्या अवशेषांमध्ये नव्हते. आज नव्हते.. पण उद्या..? असेनही असा विचार स्फोट, स्फोटानंतरची चलचित्र, वृत्तपत्रांतील छायाचित्र बघणाऱ्या प्रत्येक मुंबईकराच्या मनात एकदातरी नक्कीच आला असेल.
रोज उशीरांपर्यंत ऑफिसात राहावे लागण्याचा शाप त्या दिवशी वरदान ठरला होता. मोबाईल फोन, इंटरनेट, वगैरे मुळे ऑफिसमध्ये असलो तरी बाहेरच्या जगाशी आपण.. आणि आपल्याशी ऑफिसबाहेरच जग संपर्कात असतच. पहिला स्फोट झाल्या नंतर लगेचच ऑफिसमधील एकाच्या वडिलांचा फोन आला.. त्यानंतर सरांच्या घरून.. मग माझ्या बहिणीचा नाशिकवरून.. आणि एकाला नागपुरवरून.. असे अवघ्या काही मिनिटांत फोन येत गेले बातमीची खात्री करून घेण्यासाठी ताबडतोब काही जणांनी नेटवर धाव घेतली.. ऑफिसच्या जवळच विजयसेलच मोठ शोरूम आहे.. आम्ही काहीजण तिकडे पळालो.. लहान मोठ्या आकाराच्या पंचवीस तिस टीव्हीमध्ये अस्ताव्यस्त जीवन चारीबाजूनी रक्तओकत होत. ती अफवा नव्हती. त्या नंतर बातम्यांमधला हाहाकार वाढतच गेला.. काही वेळापूर्वी एकासुरात वाजणारे फोन गलितगात्र होऊन गेले.. बाहेरच्या जगाशी.. बाहेरच्या जगातल्या आपल्यांशी संपर्क साधता येईना.
'विराज' नेमका त्या दिवशी स्टॉक एकश्चेंजला होता. तो साधारण याच वेळेला घरी यायला निघतो. एकदा फोन लागला आणि बंद झाला.. सगळ्यांनीच फोनवर उड्याघेतल्या मुळे नेटवर्क बिझी झालं.. तेवढ्यात पुण्याहून बाबांचा परत एकदा फोन आला.. ते विराजशीही बोलले होते.. नंतर काहीवेळ एसएमएस करता येत होते. त्या तेवढ्या वेळात मी कमीत कमी सात आठ वेळा एसएमएस करून त्याला घरी न येता जवळ पास कोणी ओळखीचं असेल तिकडे जा म्हणून सांगत राहिले.. (माझे एक काका चर्नी रोडला राहतात तो तिथेही जाऊ शकला असता पण त्याला घरीच यायचे होते. ) त्याच्या कडून काहीच उत्तर येत नव्हते. मग काही वेळाने एसएमएसही करता येईना. माझ्या वडिलांना मात्र आम्हा दोघांच्या संपर्कात राहता येत होतं. त्यामुळे चर्चगेट टू परेल व्हाया पुणे असा आमचा संवाद चालू होता.. चर्चगेट स्थानकावर ( सगळ्याच स्थानकांवर ) हल्लकल्लोळ माजला होता.. स्टेशनमध्ये पाय ठेवण्या इतकीही जागा उरली नव्हती. बस स्टॉप गर्दीने फुलून गेले होते.. प्रत्येकाला कधी एकदा घरी पोहचतो असे झाले होते.. बस, टॅक्सी, टेंपो, गाड्या.. जे मिळेल त्या वाहनात लोक घुसत होते. काही जणांनी चालण्याचा पर्याय निवडला.. कोणाला वाहन मिळतच नसल्याने तो पर्याय अनुसरावा लागला.. तब्बल तास दिडतासांनंतर चालत थांबत.. विराजला एका बस मध्ये चढायला मिळालं. त्या नंतर अफवा पसरू नयेत म्हणून फोनचं नेटवर्क बंदच करण्यात आले. ड्रायव्हर शेजारच्या दांडीवर टेकून सहा साडेसहा तासांनंतर रात्री बारा साडेबाराच्या सुमारास तो घरी पोहचला. ( नशिब या वेळी ते निदान बेस्टच्या वाटेला गेले नाहीत. नाहीतर काय झालं असतं याची कल्प्नाच करवत नाही.)
मी ऑफिसमध्ये.. राजस घरी आजी-आजोबांच्या सोबत सुखरूप होता. धावत पळत घरी गेलंच पाहिजे असं काही नव्हतं. तसंही मी लागलीच घरी निघून काय होणार होतं.. गर्दीत आणखीन वाढ. स्वतःचे स्वतः करून घेतलेले हाल. पुढे स्फोटांची संख्या वाढत वाढत सात वर पोहोचली.. लोकलची सगळी गर्दी रस्त्यांवर आली.. मी दहा वाजेपर्यंत ऑफिस मध्येच थांबले होते.. ज्यांना जवळपास कुठे जाणं शक्य होतं ते निघून गेले.. मला जवळात जवळ म्हणजे माटुंग्याला जावं लागलं असतं. तेही अशा वेळी लांबच तेव्हा जरूर तर ऑफिसातच राहण्याच्या तयारीने मी थांबले होते. दहाच्यापुढे सेंट्रललाईन सुरू झाली.. तरी ट्रेनने जाण्याची हिम्मत होईना.. ट्रेनने जाण्यापेक्षा चिंचपोकळीच्या सुनसान स्टेशन वरून एकटीनं जाण जास्त नकोसं वाटत होतं. पण तशी वेळ आली नाही. माझे बॉसही सांताक्रुझला राहणारे असल्यामुळे मी साधारण अकरा-साडे अकराला कारने घरी पोहचले.
विराज अजूनही यायचा होता.. टिव्हीवर बातम्या सुरू होत्या, आजी पुरत्या घाबरलेल्या.. अधून मधून रडत होत्या..काहीसा घाबरलेला तीन वर्षांचा राजस चुपचाप बसला होता.. त्याला नक्की काय झाल आहे काही कळत नव्हतं. तरी रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं होतंय एवढं समजल्याने तो खूपच शहाण्यासारखा वागत होता. विराज कधी पोहोचेल काहीच कळू शकत नव्हतं. त्यामुळे त्याची वाट न बघता राजसला झोपायला लावलं. ( हे त्या दिवसातलं सगळ्यात अवघड काम ) तसा तो बाबाशिवाय जेवला हे ही खूप होतं. विराज आल्यानंतरचा तास दिड-तास विराजकडून आखो देखा हाल ऐकण्यात गेला.. जाणीवा काही वेळापुरत्या तीक्ष्ण झाल्या. झोप नव्हतीच. तरी उद्या उभं राहण्यासाठी आजच्या थकव्याची पाठ टेकवणं भाग होतं. रात्र सरली दिवसवर आला.. त्याला ना कशाचं सुख-दुःख होतं ना कसली उसंत. तरी अख्खा दिवस किरणांमध्ये आदल्या रक्तरंजित दिवसाची सावली साकळली होतीच.
११ ची रात्र सरली तशीच बाराचीही संपली.. तेरा तारखेच्या सुर्यानं आपल्यासोबत बऱ्याच जणांना कामाला लावलं.कार्यरत राहणं हे तर जिवंत असण्याच वैशिष्ट्य आहे ना..? "थांबला तो संपला" असं आपण म्हणतो ते बहूतेक अशा प्रसंगांमध्ये बळ एकवण्यासाठीच..! आणि मुंबईकरांचा तर हा जीवन मंत्रच आहे. याच मंत्राने मुंबईकरांना.. मुंबईला पुन्हा उभं केलं.. चालायला लावलं.. धावायला भाग पाडलं..!
माणसाला विस्मृतीच वरदान लाभलंय म्हणूनच तो अशा अघटितांनंतर खचून न जाता पुन्हा उभा राहू शकतो.. उमेद बाणवतो.. सरणाऱ्या दिवसांसोबत टेलिव्हिजन वरच्या "न्यूज".. "वर्तमानपत्रातल्या" बातम्या.. आणि स्फोटांचे संदर्भ मागे पडत गेले. तरी घटिताचे परिणाम जागोजागी आपल्या खुणा ठेवून जातात.
१३ तारखेचा लोकल प्रवास हा असाच त्या घटनेच्या भीषणतेचा प्रत्यय देणारा होता.. रेल्वे स्थानकाचे उडालेले पत्रे, अव्याहत मदत
कार्य केल्या नंतरही घातपाताची कहाणी कथन करणारे अवशेष.. लोकलमधलं सुतकी वातावरणं.. विमनस्क चेहरे.. धास्तावल्या आवाजातल्या कानावर पडणाऱ्या चर्चा.. जीवनाच्या अशाश्वततेचा दाखला देणारे हृदयविदारक अनुभव.. कधी पुसले जातील..?
माझ्या सकाळच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या खेळकर ग्रुपमधल्या बहुतेक सगळ्याजणी याच सुमारास परत जायच्या.. त्यातली एक त्या वेळेला लोकलमध्ये होती. तिनं हे सगळं घडताना प्रत्यक्ष पाहिलं. आतंकाचं विदारक दृश्य बघून ती तिथून घरी निघून जाऊ शकली नाही. पूर्णं रात्र ती तिच्यापरीने मदत कार्याला हातभार लावत राहिली. तिच्याकडे सांगण्यासारखं खूप काही होतं.. पण नेमकं अशावेळी काही बोलावंसं वाटत नाही.. आणि विचारणारे काहीबाही विचारत राहतात. तिच्या मैत्रिणीही असच काय काय सांगत विचारत होत्या.. ती आपली जेवढ्यास तेवढंच बोलत होती.. आणि त्याच वेळेला बाजूला चौथ्या सिटवर कशीबशी टेकलेली एक बाई क्षणा-क्षणाला आणखीन-आणखीन अस्वस्थ होत होती. तिच्या चेहऱ्यावरची वेदना, डोळ्यातलं दुःख.. न बोलता खूप काही सांगत होतं. तिच्या चेहऱ्यावरची वेदना, डोळ्यातलं दुःख.. न बोलता खूप काही सांगत होतं. त्या बिचारीला स्फोटावर चाललेली चर्चा सहन होत नव्हती. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटांच्या झळांमध्ये तिचा शेजार होरपळून गेला होता.. दोन लहानगी कच्ची-बच्ची म्हातारे सासू-सासरे आणि नवरा घर एवढंच ठाऊक असलेली बायको.. या सगळ्यांच्या विश्वाच्या, विश्वासाच्या घरच्या कर्त्या पुरुषासोबत चिंधड्या-चिंधड्या झाल्या होत्या. तो आघात.. तो आक्रोश.. तिच्या मनातून जाता-जात नव्हता. जाणारा जातो त्या नंतरच मरण उरलेल्यांच. आणि या अशा विषयावर कोणी गप्पा कशा मारू शकतं..? दुःख.. वेदना.. असहायता.. राग..! भीती..? अशा कितीतरी भावनांचा कल्लोळ तिच्या डोळ्यात उसळला होता. आतंकाची भेसूरता मी जवळून पाहिली ती तिच्या डोळ्यात.. तिच्या गदगदल्या शब्दात.. हुंदक्यात. आणि मग त्यानंतर ती अशीच कुठे कुठे दिसत राहिली.
"मुंबई" कधीच थांबत नाही..! खरं तर कोणीच थांबून राहू शकंत नाही. मग ते एखादं लहान शहर असो की अगदी दूर दूरच दुर्गम गाव असो.. जिवंत असलेल्यांना जगणं चुकत नाही. मुंबईत ते जरा जास्त लवकर घडतं इतकंच.. आणि मग दुसऱ्याच क्षणी मुंबईने वेग घेतलेला दिसून येतो.
स्फोटात छिन्न-विच्छिन्नं झालेली लोकल.. रक्त-मास, मृत्यूच थैमान, जीवनाची अनिश्चितता.. अनुभवलेली माणसं पुन्हा धावू लागली.. रोजच्या रोज धावणारे लोकलचे डबे जसे खडखडतात तशा कुणा-कुणाच्या व्यथा-वेदना अधे-मध्ये खडखडत राहिल्या.
कधी मधी उठणाऱ्या अफवा.. मध्येच थांबवून तपासासाठी रिकामी केली जाणारी लोकल.. मिलेट्रीतले शस्त्र सैनिक तैनात असलेले डबे.. श्वान पथकं.. तर एखादीच्या अंगावर दिसणाऱ्या भाजल्याच्या कापल्याच्या खुणा.. अजूनही त्या दिवसाबद्दल कुजबुजतं राहतात.
त्या दिवशी रात्रीचे ८: ३०.. ९: ०० वाजून गेले होते. डब्यात पुरेशी गर्दी होती. जर्मन बांधणीच्या नव्या हवेशीर लोकलच्या स्टिल रॉडमधून अगदी सेकंड क्लासचा डबाही पूर्णं दिसत होता.. मध्येच माझ्या सारख्या चार-पाच जणी उगाचच उभ्या होत्या. ट्रेननं माटूंगा स्टेशन सोडलं आणि दुसऱ्याच क्षणी सेकंड क्लासच्या डब्यातल्या पलीकडच्या दाराजवळ प्रचंड आरडा-ओरडा सुरू झाला.. कोणी एक माणूस डब्याच्या या दारातून चढून त्या दाराने उडी मारून जाताना दिसला. आणि मग एक किंकाळी. जवळपासचे डबे चिरत गेली. पुढे जोर-जोरात आरडा ओरडा, रडारडी नेमकं काय घडलंय कळायला मार्ग नव्हता.. गोंधळातून कोणाचा गळा कापला गेला.. वगैरे ऐकू येत होतं.. (ती किंकाळी..? ) तिकडे तो आरडा-ओरडा चालू होता आणि इथे माझ्या समोरच उभ्या असलेल्या एका नेपाळी मुलीनं मोठ्यांदा रडायला सुरूवात केली.
एक डबा सोडून पलीकडे चाललेले दुःखद चित्कार ऐकून ती पुरती गारठली होती. कदाचित तिच्या कुठल्याशा भयप्रद आठवणींना धक्का लागला असावा.. तसे तर आम्ही सगळेच गोंधळलो होतो.. काहीतरी घडलंय एवढं माहीत होतं. पण काय..? आणि कसं..? काहीच कळतं नव्हतं ( का..? चा विचार मनात आणायला जणू बंदी होती. ) कधीही काहीही घडू शकतं.. हे मनावर पुन्हा पुन्हा ठसलं जात होतं. ( बहुतेक तिच्या मनात हेच जरा जास्तच खोलवर उसळलं असावं. ) परिणाम भीती.. वेदना.. शोक. जवळ उभ्या असलेल्या आम्ही तिघी-चौघींनी तिला सावरायचा खूप प्रयत्न केला.. तरी ती शांत होऊ शकली नाही. तिच्यासाठी आम्ही सगळेच तिऱ्हाईत होतो. तिने फोन वर फोन लावण्यास सुरुवात केली.. त्याच ट्रेनने प्रवास करणाऱ्या ओळखीच्या मुलांना बोलावून ती ट्रेन सोडून निघून गेली.
तिकडच्या डब्यात घुसलेल्या त्या माणसानं एका बाईचं मंगळसूत्र कापून नेलं होतं. आणि आकस्मितपणे झालेल्या या हल्यानं.. लुटीनं शॉक बसलेली बाई जोरात किंचाळली.. भीतीमुळे नुकसानीमुळे काही न सुचून रडायला ओरडायला लागली... तिच्या किंचाळण्या, रडण्या.. ओरडण्यानं त्या नेपाळी मुलीचं अवसान गळलं. सुदैवानं आधी वाटलं तसं त्या बाईंना काही झालं नव्हतं. गळ्यातल्यावरचा घाला गळ्यावर येता येता वाचलेल्या बाईंचा आक्रोश नंतर काही वेळांनी कमी झाला. चालत्या ट्रेन मधून चोरी करून पळालेल्या चोराची कंम्लेंट करण्यापलीकडे काही करणं कोणालाच शक्य नव्हतं.
या प्रकारातून पुन्हा एकदा प्रखरपणे जाणवली ती मना मनातली दहशत. दहशदवाद त्याच काम करून गेला होता. अखंड, अविरत शिस्तीत धावणारी मुंबई.. अधून-मधून सैरभैर होताना दिसू लागली.. मग ती अशी लहान-सहान घटना असो.. की पावसाची झड.. जीव खाऊन काम एके काम करणारा मुंबईकरही काही वेळा जीवावर आल्यासारखा अगतिक होताना दिसू लागतो. पण ते तेवढंच वेळ.
मग जीवन त्याला परत जगायला लावतं. चालायला, धावायला, भाग पाडतं. हिंमत जोडून, जिद्दीनं दहशतीचा सामना करायला लावतं. हे असं जोपर्यंत होत राहील.. तेव्हा तेव्हा जीवनापुढे दहशत, दहशतवाद असाच हरेल. हरतच राहील. .
======================================
स्वाती फडणीस ................... १९-०८-२००९
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 4:03 pm | मी ऋचा
वाचता वाचता डोळे भरुन आले.....सुरेख चित्रण!!!!
27 Jul 2010 - 4:46 pm | गणपा
स्वातीताई तुमची लेखणी खुप प्रभावी आहे.
वाचत वाचता समोरचा पडदा धुसर झाला.
मिडिया मारे कितीही कौतुक करो की मुंबईकर ग्रेट आहेत. दहशतवादाला भिक न घालता दुसर्या दिवशी मुंबई धावु लागली. सत्य हेच आहे की हातावर पोट असणारा मुंबईकर हा लाचार आहे. त्याच्या कडे स्वतःचा जीव धोक्यात घालण्या वाचुन पर्याय नाही.
-(या बाँबस्फोटांची झळ बसलेला)गणा
27 Jul 2010 - 5:59 pm | रेवती
फार्फार सहमत रे गणपा!
खरं तर जगात सगळीकडेच कमीअधिक फरकाने अशी परिस्थिती पाहता येते.
कुठे स्फोटानंतर तर कुठे रोगराईनंतर आणि कुठे निसर्गाच्या कोपानंतर......
मागे राहिलेल्या माणसाला उभे रहावेच लागते.
जुन्या हिंदी चित्रपटात मुंबई कितीतरी शांत दिसते. लोकसंख्याही कमी होती त्यावेळी!
हा स्फोट झाला त्याआधी आठ दिवसच माझ्या वहिनीने नोकरी सोडली होती.
माझा भाउ व वहिनी त्याच ट्रेनने येत व स्टेशनला भेटत. त्या दिवशी भाऊ हापिसातून उशिरा निघाला.
नशिब आमच्यावर मेहेरबानच म्हणायला हवं. वहिनीतर नंतर त्या आठवणीनं थरथर कापायची.
त्यानंतर मुंबई काही त्यांना मानवली नाही. दुसरीकडे जावं लागलं. मुंबईतल्या पूरपरिस्थितीतही माझे दोन्ही भाऊ अडकले होते. ते आठवले कि अंगावर शहारा येतो. मुंबईकरांना इलाज नाही .......रोज सकाळी धावावेच लागते.
तुमच्या लेखनातून सगळे प्रसंग समोर उभे राहतात.
27 Jul 2010 - 6:21 pm | प्रसन्न केसकर
दहशतवादाचा उद्देशच लोकांमधे दहशत पसरवणे हा असतो. त्याला एकच प्रभावी उत्तर असतं ते म्हणजे विचलित न होता आपलं काम सुरु ठेवणं. आपल्या दहशतवादी कृत्यांमुळे लोकांमधे दहशत पसरत नाही हे लक्षात येण्यानेच दहशतवादाचे कंबरडे मोडते. मुंबईकर नेहमीच अश्या जिद्दीने दहशतवादाचा सामना करत आलेले आहेत.
27 Jul 2010 - 9:31 pm | आवशीचो घोव्
मुंबईकर नेहमीच अश्या जिद्दीने दहशतवादाचा सामना करत आलेले आहेत.
पोटाची खळगी भरावीच लागते राव! जिद्द बिद्द काही नाही.
27 Jul 2010 - 10:22 pm | स्वाती फडणीस
आभार..!
28 Jul 2010 - 4:56 am | शिल्पा ब
मी असे बरेच प्रसंग पहिले आहेत...काहीही झालं तरी लगेच मुंबई उठून कामाला लागते...त्याशिवाय गत्यंतर नाही...मुंबईकर केवळ सहन करतात म्हणून सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते असं मला वाटतं...इथे तर देशाच्या दृष्टीने महत्वाची अशी अनेक ठिकाणे आहेत तरी हि हलगर्जी ? आता काही बोलण्यासारख पण उरलं नाही...किती वेळा तेच ते सांगणार ? ज्यांनी ऐकायचं ते मात्र शहामृगासारख डोक खुपसून बसणार... :-(
शेवटी ज्याचं जळत त्यालाच कळतं म्हणतात ते काही उगाच नाही.