एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे. आपले नित्यनेमाचे उद्योगधंदे आटोपुन तो नगरीचा फेरफटका करत असे. नगरीत अनेकांशी गप्पा मारत असतांना तो आपल्या वैयक्तिक आयुष्याला विसरत असे. नगरीत अनेक विद्वज्जन, मान्यवर भल्या भल्या विषयांवर चर्चा, वाद करत असत. पण हा त्यापासुन बरेचदा दुर रहात असे. लोकांशी बोलावं, विनोद करावा, टवाळी करावी असाच याचा खाक्या असे. वैयक्तिक आयुष्यात ज्यांना विचार करायचा नसतो ते चव्हाट्यावर येवुन विचार केल्याचे नाटक करतात असा त्याचा सरळ सरळ विचार होता.
नगरातील नगरपालाने काही काळ बदली नगरपाल नेमल्यानंतर ब्राह्मणाची साडेसाती सुरु झाली. नव्या नगरपालाने नेमलेल्या काही रक्षकांनी आकस बुद्धिने ब्राह्मणाच्या नगरातील फेरफटका तसेच वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र बसुन गप्पा मारण्यावर बंदी आणली. अशा प्रकारे ब्राह्मणाची कोंडी करुन त्याला नगरात वावरणे मुश्किल केले. ब्राह्मण उदास होवुन नगराशेजारच्या तळ्याकाठी जावुन बसला असतांना आकाशातुन शंकर पार्वती फेरफटका मारायला निघाले होते त्यांनी त्याला पाहिले.
ब्राह्मणाकडे पाहुन पार्वतीने कळवळुन शंकराला याच्या दुःखाचे कारण विचारले आणि ते दुःख कमी कसे होईल हे विचारले. त्याला उत्तर देतांना शंकराने पुरातन कालातील एक कथा सांगितली.
फार पुर्वी अवंती नगरीत राजा विक्रमादित्य राज्य करत होता. काही वैयक्तिक अडचणींमुळे त्याने आपला राज्यकारभार काही दिवस अमात्य आणि मंत्र्यांच्या ताब्यात देवुन तो राज्याबाहेर निघुन गेला. कधी मधी राज्यात येत असे पण राज्यकारभार मंत्र्यांच्या ताब्यात होता. एवढ्या मोठ्या राज्याची व्यवस्था अष्टप्रधानांकडुन होणार नाही, हे जाणुन अमात्यांनी काही पुर्वीच्या मंत्र्यांना पाचारण केले तसेच काही नवे मंत्री नेमले. राज्यकारभारात सुधारणा आणण्यासाठी नवीन राजवाडा बांधला जाईल असे नागरीकांना सांगितले. नवा कारभार पारदर्शी आणि सर्वांच्या हिताचा असेल असे सांगण्यात आले. जनतेमधे नव्या राजवटीविषयी उत्सुकता होती.
कुणालाही काहीही समस्या असेल तर मंत्रीगण स्वतः जातीने ती समस्या सोडवेल असे अमात्यांकडुन आश्वासन मिळाल्यामुळे काहीही अडचण आली की जनता मंत्रीगणांच्या घराचे दरवाजे ठोठावु लागली. सुरवातीला मंत्र्यांकडुन जनतेचे गा-हाणे नीट ऐकुन सोडवण्याच्या पद्धतीमुळे जनतेला त्यांच्याबद्दल आपुलकी तसेच विश्वास वाटु लागला. मात्र हळु हळू मंत्र्यांमधले काही जनतेच्या अडचणींकडे कानाडोळा करु लागले. आपल्या पदाचा दुरुपयोग करु लागले. जनतेच्या अडीअडचणी सोडवणे दुरच उलट मंत्र्यांविरुद्ध जनता आरडाओरडा करु लागली.
कधीही दार ठोठवा आम्ही तुमचे गा-हाणे ऐकुन अडचणी सोडवु असे आश्वासन देणा-या अमात्यांकडे मंत्र्यांची बैठक जमली. अनेक मंत्र्यांनी जनता रात्री बेरात्री एकांती आम्हाला त्रास देते, कधीही दार वाजवले जाते, आम्हाला उत्तर देणे भाग पडते असा सुर लावला. यावर खुप चर्चा झाली आणि नगरात न्यायाचा पुतळा बसवायचे ठरले. मध्यभागी चौकात एक मोठा चेहरा असलेला पुतळा बसवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुक काढुन त्याचे गुणगान करुन लोकांना सांगण्यात आले.
न्यायाचा पुतळा ही एक अनोखी कारागिरी होती. ज्यांना आता काही तक्रार करायची असेल त्यांनी कुणाही मंत्र्याच्या घरी जाण्याची गरज नव्हती. त्यांनी फक्त न्यायाच्या पुतळ्याच्या कानात आपली तक्रार सांगायची होती. न्यायाचा पुतळा तक्रार ऐकुन घेवुन त्यावर यथायोग्य निर्णय देणार होता. सर्व जनता या नव्या पद्धतीवर खुश झाली होती. कारण आपल्याला आता न्याय मिळेल ही त्यांना खात्री होती. यानंतर कुणीही मंत्र्याकडे तक्रार घेवुन आला तर त्याला न्यायाच्या पुतळ्याबद्दल सांगायचे किंवा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असे मंत्रीपरिषदेने ठरवले होते. मंत्र्यांना आता कोणताही त्रास होत नव्हता.
आता नगरीत न्यायाचे, धर्माचे राज्य आहे, कुणीही पिडित नाही असा डांगोरा पिटला गेला. त्याला सर्व मंत्र्यांनी माना डोलावुन होकार भरला. मंत्री हो म्हणाले म्हणुन जनतेनेही हो म्हटले. पण हळु हळू नागरिकांच्या लक्षात येवु लागले. पुतळा म्हणजे देखावा होता. कुणीही पुतळ्याकडे तक्रार केली पुतळा हाच योग्य निर्णय आहे असे मोघम उत्तर देवुन गप्प बसायचा. पुतळ्याकडे केलेल्या विचारणांचे, प्रश्नांचे उत्तर मिळत नसे. मंत्र्यांकडे विचारणा करण्याची सोय नव्हती कारण ते दार उघडतच नसत. अमात्य आपल्या सदनात विश्राम करत असत. विक्रमादित्य कधी येत असे जात असे त्याला काहीच फरक पडत नव्हता. नागरिक तोंड दाबुन बुक्कयांचा मार सहन करत असत.
एवढे बोलुन शंकर पार्वतीला म्हणाला, न्यायाच्या पुतळ्याबद्दल रस्त्यावर येवुन चर्चा करणे म्हणजे राजद्रोह समजला गेला. ज्यांनी अशी चर्चा केली त्यांना नगर सोडुन जाण्याचा सल्ला मिळाला. काही जण नगर सोडुन गेले, काही जण घरात बसुन हे दिवस जातील अशा आशेने वास्तव्य करुन राहिले. एवढे झाल्यावर शंकर पार्वती पुढे निघुन गेले.
ही कथा ऐकुन ब्राह्मणाला आपण काय करावे याचा उमज पडला आणि तो तळ्याच्या काठावरुन उठुन चालु लागला.
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 11:24 am | सागर
नाना ...मस्तच ...
अगदी आटपाट नगरातली कथा ऐकतोय असे वाटले
तिसरा पर्याय ब्राह्मणाला सुचु नये काय? ;)
अवांतर : शेवटी कहाणी साठा उत्तरी ... संपूर्ण .... असे टाकले असते तर अजून मस्त झाली असती
8 Jul 2010 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार
हेच हेच विचारणार होतो.
ह्या ब्राम्हणाविषयी माया आहेच आणि थोडाफार (पुर्ण न्हवे ;) ) अन्यायही त्याच्यावर झाला हे मान्य आहे. पण नगरीत ब्राम्हणाशीवाय अजुनही अनेक लोक असणारच त्यांना देखील कधी कधी त्रास सहन करावा लागला असेलच की ? तसेही बर्याचदा ओल्या बरोबर सुके जळतेच. त्यामुळे ब्राम्हणाने निराश न होता आहे त्या परिस्थीतीशी जुळवुन घ्यावे आणि लवकरच परिस्थीती सुधारेल अशी खात्री बाळगावी असे वाटते.
बाकी आम्ही ऐकलेल्या ह्याच कथेत हा ब्राम्हण एकदा आपले घरदार विकुन, सगळी ओळख पुसून नगरी सोडुन गेल्याचा देखील उल्लेख आहे. पुन्हा त्याने असा काही उपदव्याप करु नये अशी शंकर-पार्वतीकडे प्रार्थना.
मांजरीची नखे लागतात म्हणुन तक्रार करणारे पिल्लु आम्हीतरी आजवर पाहिले नाही ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
8 Jul 2010 - 11:28 am | सहज
गोष्टीतले मंत्रीगण काय गाणे म्हणतात माहीती आहे का नाना?
अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही!
हा हा हा नाना लै भारी कथा.
8 Jul 2010 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी "दिल अभी परा नही" वाचलं! ;-)
अदिती
8 Jul 2010 - 11:58 am | II विकास II
>>त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे.
असल्या गोष्टीतील ब्राम्हण नेहमीच गरीब असतो. ;)
>>ही कथा ऐकुन ब्राह्मणाला आपण काय करावे याचा उमज पडला आणि तो तळ्याच्या काठावरुन उठुन चालु लागला.
असेच काही चालु पडलेले ब्राम्हण नंतर मंत्री होतात.
ब्राम्हणाला आताच शुभेच्छा.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
8 Jul 2010 - 12:05 pm | समंजस
छान! मस्त कथा! एकदम चांदोबा वाचण्याच्या वयात जाउन आलो :)
या कथेचं तात्पर्य असं दिसून येतं की, काळ कुठलाही असो, राज्य कुठलंही असो समस्या त्याच असतात. पण निराकरण सुद्धा तेच असतं का :?
8 Jul 2010 - 12:13 pm | नितिन थत्ते
काही सदस्यांनी संपादकांसारख्या फॉण्टमध्ये प्रतिसाद देण्याचा सपाटा लावल्याचा परिणाम असेल का?
नितिन थत्ते
8 Jul 2010 - 12:19 pm | सहज
त्या साध्या राज्यात कुठले फाँट कुठले मुद्रीत शोधन कार्य?
माझ्या मते उठसुठ पाध्ये पाध्ये हाका मारल्याने वैतागुन पाध्ये व उपाध्ये यांनी पुतळा बसवला!
:-)
8 Jul 2010 - 12:36 pm | अरुण मनोहर
>>>न्यायाच्या पुतळ्याबद्दल रस्त्यावर येवुन चर्चा करणे म्हणजे राजद्रोह समजला गेला. ज्यांनी अशी चर्चा केली त्यांना नगर सोडुन जाण्याचा सल्ला मिळाला<<<
१) नगर सोडून जाण्यासाठी विनामुल्य पादत्राणे दिली होती किंवा नव्हती,
२) दिली असल्यास ती पादत्राणे सगुण होती की निर्गुण (आभासी)?
ह्यावर प्रकाश टाकल्यास ह्या कथेचा काल निच्छीत करण्यास मदत होईल.
8 Jul 2010 - 2:49 pm | टारझन
शब्द संपले :)
8 Jul 2010 - 3:03 pm | संकेत
ब्राह्मण चपलांसकट चालू पडला की चपलांशिवाय?
8 Jul 2010 - 3:22 pm | मितभाषी
काही जण घरात बसुन हे दिवस जातील अशा आशेने वास्तव्य करुन राहिले.
हेही दिवस निघुन जातील असे म्हणुन आनंदाने मार्गक्रमण करावे. सदा आनंदी, प्रसन्न असावे. मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण॥
आपलेच दुख कुरवाळीत बसल्याने त्याची तिव्रता अजुन वाढते असे म्हणतात.
.
.
.
..
बाबा भावशानंद.
8 Jul 2010 - 3:55 pm | छोटा डॉन
>>एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे.
गरिब ब्राम्हण ?
अंमळ गल्लत होते आहे का ?
पहिल्याच ओळीत कथेने 'सत्यकथनाशी फारकत' घेतल्याने पुढील लेख वाचवला नाही.
कथेचा मुळ पायाच चुकीच्या समजुतीवर बेतलेला असल्याने असे विस्कळीत कथासार कितपत पटेल ही शंका आल्याने पुढील कथा न वाचण्याचा निर्णय घेतला.
बाकी लेखकाचे अनुभवविश्व आणि कथा रचण्यातली हातोटी ह्या बाबी पाहता त्यांच्याकडुन अधिक उत्तम कथांची किंवा सहित्याची अपेक्षा ठेवण्याला हरकत नसावी. :)
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 4:21 pm | प्रकाश घाटपांडे
अरे तसे नव्हे! गरीब म्हणजे स्वभावाने गरीब! आटपाट नगरात श्रीमंत ब्राह्मण कथेत कधी येतच नाहीत. किंवा असेही असेल की वादविवादात उत्तेजन मिळण्यासाठी आवश्यक असलेले उत्तेजक द्रव्य पिणे किंवा पाजणे त्याला बिचार्याला परवडत नसेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Jul 2010 - 5:06 pm | छोटा डॉन
>>गरीब म्हणजे स्वभावाने गरीब!
तेच हो, आम्ही स्वभावानेच गरिब म्हणत आहोत.
इथे वरच्या कथेत जो ब्राम्हण स्वतःला 'गरिब' संबोधुन जे असत्य सांगत आहे त्यामुळे कथेचा पायाच ठिसूळ झाला आहे.
>>आटपाट नगरात श्रीमंत ब्राह्मण कथेत कधी येतच नाहीत.
आता ही श्रीमंती पैशाची का ?
बाकी ही श्रीमंती जर स्वभावाची किंवा समजुतदारपणाची असेल तर असा ब्राम्हण अशा 'वादविवादापासुन' दुरु राहुन प्रामाणिकपणाने एखादा आश्रम वगैरे स्थापुन 'विद्यादाना'चे काम करत राहिल ह्याबद्दल आमच्या मनात अजिबात किंतु नाही.
पण असे श्रीमंत ब्राम्हण फारच कमी आहेत हेच दु:ख.
जो तो आपल्या ज्या काही असेल त्या भल्याबुर्या गरिबीचे भांडवल करायला पाहतो हे पाहुन वाईट वाटते.
>>असेही असेल की वादविवादात उत्तेजन मिळण्यासाठी आवश्यक असलेले उत्तेजक द्रव्य पिणे किंवा पाजणे त्याला बिचार्याला परवडत नसेल.
होय, हे असु शकते.
मात्र आमचा ह्या बाबतीत जास्त अभ्यास नाही. ;)
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 5:10 pm | II विकास II
>>जो तो आपल्या ज्या काही असेल त्या भल्याबुर्या गरिबीचे भांडवल करायला पाहतो हे पाहुन वाईट वाटते.
मनोहर जोशी आणि पापड कथा आठवली.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
8 Jul 2010 - 9:18 pm | विसोबा खेचर
छान रे नान्या.. :)
8 Jul 2010 - 9:27 pm | Nile
नंतर आपल्या पारावर जाउन, 'कुठे गेले ते विद्वज्जन' असे विचारणारा तो बामण हाच काय?
बाकी जुन्या नगरपालाने जाहिर दिलेले शालजोडी अन नारळ बामण विसरला काय? अरे 'ये पब्लिक है सब जानती है'.
-Nile
10 Jul 2010 - 12:29 pm | sneharani
मस्त लिहलय.