न्यायाचा पुतळा
एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे. आपले नित्यनेमाचे उद्योगधंदे आटोपुन तो नगरीचा फेरफटका करत असे. नगरीत अनेकांशी गप्पा मारत असतांना तो आपल्या वैयक्तिक आयुष्याला विसरत असे. नगरीत अनेक विद्वज्जन, मान्यवर भल्या भल्या विषयांवर चर्चा, वाद करत असत. पण हा त्यापासुन बरेचदा दुर रहात असे. लोकांशी बोलावं, विनोद करावा, टवाळी करावी असाच याचा खाक्या असे. वैयक्तिक आयुष्यात ज्यांना विचार करायचा नसतो ते चव्हाट्यावर येवुन विचार केल्याचे नाटक करतात असा त्याचा सरळ सरळ विचार होता.
नगरातील नगरपालाने काही काळ बदली नगरपाल नेमल्यानंतर ब्राह्मणाची साडेसाती सुरु झाली. नव्या नगरपालाने नेमलेल्या काही रक्षकांनी आकस बुद्धिने ब्राह्मणाच्या नगरातील फेरफटका तसेच वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र बसुन गप्पा मारण्यावर बंदी आणली. अशा प्रकारे ब्राह्मणाची कोंडी करुन त्याला नगरात वावरणे मुश्किल केले. ब्राह्मण उदास होवुन नगराशेजारच्या तळ्याकाठी जावुन बसला असतांना आकाशातुन शंकर पार्वती फेरफटका मारायला निघाले होते त्यांनी त्याला पाहिले.
ब्राह्मणाकडे पाहुन पार्वतीने कळवळुन शंकराला याच्या दुःखाचे कारण विचारले आणि ते दुःख कमी कसे होईल हे विचारले. त्याला उत्तर देतांना शंकराने पुरातन कालातील एक कथा सांगितली.
फार पुर्वी अवंती नगरीत राजा विक्रमादित्य राज्य करत होता. काही वैयक्तिक अडचणींमुळे त्याने आपला राज्यकारभार काही दिवस अमात्य आणि मंत्र्यांच्या ताब्यात देवुन तो राज्याबाहेर निघुन गेला. कधी मधी राज्यात येत असे पण राज्यकारभार मंत्र्यांच्या ताब्यात होता. एवढ्या मोठ्या राज्याची व्यवस्था अष्टप्रधानांकडुन होणार नाही, हे जाणुन अमात्यांनी काही पुर्वीच्या मंत्र्यांना पाचारण केले तसेच काही नवे मंत्री नेमले. राज्यकारभारात सुधारणा आणण्यासाठी नवीन राजवाडा बांधला जाईल असे नागरीकांना सांगितले. नवा कारभार पारदर्शी आणि सर्वांच्या हिताचा असेल असे सांगण्यात आले. जनतेमधे नव्या राजवटीविषयी उत्सुकता होती.
कुणालाही काहीही समस्या असेल तर मंत्रीगण स्वतः जातीने ती समस्या सोडवेल असे अमात्यांकडुन आश्वासन मिळाल्यामुळे काहीही अडचण आली की जनता मंत्रीगणांच्या घराचे दरवाजे ठोठावु लागली. सुरवातीला मंत्र्यांकडुन जनतेचे गा-हाणे नीट ऐकुन सोडवण्याच्या पद्धतीमुळे जनतेला त्यांच्याबद्दल आपुलकी तसेच विश्वास वाटु लागला. मात्र हळु हळू मंत्र्यांमधले काही जनतेच्या अडचणींकडे कानाडोळा करु लागले. आपल्या पदाचा दुरुपयोग करु लागले. जनतेच्या अडीअडचणी सोडवणे दुरच उलट मंत्र्यांविरुद्ध जनता आरडाओरडा करु लागली.
कधीही दार ठोठवा आम्ही तुमचे गा-हाणे ऐकुन अडचणी सोडवु असे आश्वासन देणा-या अमात्यांकडे मंत्र्यांची बैठक जमली. अनेक मंत्र्यांनी जनता रात्री बेरात्री एकांती आम्हाला त्रास देते, कधीही दार वाजवले जाते, आम्हाला उत्तर देणे भाग पडते असा सुर लावला. यावर खुप चर्चा झाली आणि नगरात न्यायाचा पुतळा बसवायचे ठरले. मध्यभागी चौकात एक मोठा चेहरा असलेला पुतळा बसवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुक काढुन त्याचे गुणगान करुन लोकांना सांगण्यात आले.
न्यायाचा पुतळा ही एक अनोखी कारागिरी होती. ज्यांना आता काही तक्रार करायची असेल त्यांनी कुणाही मंत्र्याच्या घरी जाण्याची गरज नव्हती. त्यांनी फक्त न्यायाच्या पुतळ्याच्या कानात आपली तक्रार सांगायची होती. न्यायाचा पुतळा तक्रार ऐकुन घेवुन त्यावर यथायोग्य निर्णय देणार होता. सर्व जनता या नव्या पद्धतीवर खुश झाली होती. कारण आपल्याला आता न्याय मिळेल ही त्यांना खात्री होती. यानंतर कुणीही मंत्र्याकडे तक्रार घेवुन आला तर त्याला न्यायाच्या पुतळ्याबद्दल सांगायचे किंवा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे असे मंत्रीपरिषदेने ठरवले होते. मंत्र्यांना आता कोणताही त्रास होत नव्हता.
आता नगरीत न्यायाचे, धर्माचे राज्य आहे, कुणीही पिडित नाही असा डांगोरा पिटला गेला. त्याला सर्व मंत्र्यांनी माना डोलावुन होकार भरला. मंत्री हो म्हणाले म्हणुन जनतेनेही हो म्हटले. पण हळु हळू नागरिकांच्या लक्षात येवु लागले. पुतळा म्हणजे देखावा होता. कुणीही पुतळ्याकडे तक्रार केली पुतळा हाच योग्य निर्णय आहे असे मोघम उत्तर देवुन गप्प बसायचा. पुतळ्याकडे केलेल्या विचारणांचे, प्रश्नांचे उत्तर मिळत नसे. मंत्र्यांकडे विचारणा करण्याची सोय नव्हती कारण ते दार उघडतच नसत. अमात्य आपल्या सदनात विश्राम करत असत. विक्रमादित्य कधी येत असे जात असे त्याला काहीच फरक पडत नव्हता. नागरिक तोंड दाबुन बुक्कयांचा मार सहन करत असत.
एवढे बोलुन शंकर पार्वतीला म्हणाला, न्यायाच्या पुतळ्याबद्दल रस्त्यावर येवुन चर्चा करणे म्हणजे राजद्रोह समजला गेला. ज्यांनी अशी चर्चा केली त्यांना नगर सोडुन जाण्याचा सल्ला मिळाला. काही जण नगर सोडुन गेले, काही जण घरात बसुन हे दिवस जातील अशा आशेने वास्तव्य करुन राहिले. एवढे झाल्यावर शंकर पार्वती पुढे निघुन गेले.
ही कथा ऐकुन ब्राह्मणाला आपण काय करावे याचा उमज पडला आणि तो तळ्याच्या काठावरुन उठुन चालु लागला.
प्रतिक्रिया
तिसरा पर्याय... :)
तिसरा
:-)
चुकून
>>त्या
वा!
काही
छे हो
शंका
शब्द संपले
चपलांसकट
काही जण
गरिब ???
अन्वयार्थ
तेच हो ...
>>जो तो
छान रे
नगरीत अनेक
....