शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Jul 2010 - 7:27 am

प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला

प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला
किती वेचली फुले ओंजळ भरून
आताच का लागली पानगळ
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

हरदिनी तुझी वाट बघणे
वेळ लागतो म्हणूनी रूसणे
येतील का आठवणी कधी परतून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

मज आठवे ओंजळ फुलांची
घट्ट केलेल्या दोन करांची
तीच निष्प्राण फुले बघते आता वहीतून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

धुक्यात एकदा गेलो पहाटे
फिरावयास दोघे शालीत एकटे
हाती हात धरता उब मिळाली स्पर्शातून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

भारलेले क्षण आले मोहाचे
ताब्यात नव्हते ओझे मनाचे
सुख दिले घेतले डोळे मिटून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

शपथ घेतली दुर न जावू
तीच तोडली दुर तू जावून
वाट बघणे सोडले, जाते आता इथून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०

प्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

8 Jul 2010 - 8:30 am | निरन्जन वहालेकर

मज आठवे ओंजळ फुलांची
घट्ट केलेल्या दोन करांची
तीच निष्प्राण फुले बघते आता वहीतून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

छान कविता ! आवडली ! !