आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात बर्याच महत्वाच्या गोष्टी आपल्या नजरेतुन निसटतात, तसेच काही उत्कृष्ट चित्रपटसुद्धा पहायचे राहुन जातात, किंबहुना ते कधी आले कधी गेले हे सुद्धा माहित नसतं आपल्याला. कमी भांडवलाचे, छोटे कलाकार असलेले आणी मार्केटींग न करु शकलेले हे चित्रपट असेच कुठेतरी हरवुन जातात. गेल्या वीकांतला एका मित्राने आग्रह केला म्हणुन पाहिलेला, मन हेलावुन टाकणारा, डोळ्यात पाणी आणणारा आणी खोल विचार करायला लावणारा हा एक चित्रपट - "थँक्स मा". विषय आणी त्याची मांडणी उत्तम कलेचा एक नमुना आहे.
म्युनिसिपालीटी नावाचे एक १२-१३ वर्षाच्या मुलाचे पात्र एका लहान कलाकाराने फारच छान अभिनयातुन साकारलेले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर वाढलेला, आई वडील कोण माहीत नसलेला असा हा म्युनिसिपालीटी. त्याच्या बरोबर घरातुन पळुन आलेली किंवा त्याच्यासारखेच ३-४ अनाथ मुले. रेलवे स्टेशनवर लोकांचे लक्ष दुसरीकडे गुंतवुन पाकीटमार करणे, लहानसहान चोर्या करणे आणी पैसे वाटुन घेणे हे त्यांचे रोजचे काम. त्यात पोलिस म्युनिसिपालीटीला पकडतात आणी बालसुधार केंद्रात पाठवतात. तिथल्या अधिकार्याची वासनिक नजर याला समजते आणी हा तिथुन पळ काढतो. पळताना तो एका स्त्रीला नवजात अर्भकाला गेटवर ठेवताना पाहतो. ती स्त्री निघुन गेल्यावर एक कुत्रा त्या बाळाजवळ जातो, पण काही व्हायच्या आत म्युनिसिपालीटी कुत्र्याला हाकलुन बाळाला उचलतो. आईवडील नसलेल्या म्युनिसिपालीटीला बाळची दया येते आणी तो त्या बाळाच्या आईला शोधण्याचा निर्णय घेतो. एका बाळ हरवलेल्या कुटुंबाकडे त्या बाळाला घेउन जातो, पण ते त्यांचं बाळ नाही हे कळताच बाळाला घेउन म्युनिसिपालीटी पुन्हा परत येतो. तो आणी त्याचे मित्र त्या बाळाची चांगली काळजी घेतात.
बरच फिरुन टॅक्सी, बाळाला सोडणरी वेश्या, ते बाळ तिला विकणारा वॉर्डबॉय, हॉस्पिटल असा शोध घेतल्यावर शेवटी त्या बाळाच्या आईचा पत्ता म्युनिसिपालीटी ला मिळतो. त्या बाळाच्या आईच्या हातात ते बाळ दिल्यावर त्याला खुप आनंद होणार असतो. त्या बाळाची त्याच्यासारखी अवस्था होणार नाही असा विचार करुन तो सुखावुन जातो.
२५-३० वयाची एक स्त्री त्याच्यासमोर येते, म्युनिसिपालीटी खुप आनंदाने ते बाळ पुढे करतो पण ती स्त्री त्याला पैसे देऊ करते आणी बाळ घेण्यास नकार देते.
म्युनिसिपालीटी तिच्यावर चिडतो, ती पळत पळत खाली येते आणी एका कार मधे बसते. तिला खुप रडु येत असतं, तिच्या बाजुला ड्रायवर सीटवर बसलेली व्यक्ती तिला समजावता समजावता तिचा उपभोग घ्यायला सुरुवात करतो, तो दुसरा तिसरा कुणी नसुन त्या मुलीचा राक्षसी बाप असतो.
दुरुन हे सर्व पाहुन म्युनिसिपालीटी उदास मनाने बाळाला घेऊन परत जातो आणी बाळाला एका ओळखीच्या चर्चच्या ऑर्फनेज मधे देतो.
चित्रपटाच्या शेवटी एक नोट आहे: " तुम्ही हा सिनेमा बघत होतात त्या वेळात भारतभरात १५-२० लहान बाळांना अनाथ म्हणुन सोडण्यात आले असेल."
रोज अनैतिक संबंधातुन जन्माला आलेली २५०-२७० नवजात अर्भके रस्त्यांवर्/अनाथ आश्रमासमोर सोडली जातात किंवा मारुन टाकली जातात.
चित्रपट संपल्यावर माझी विचार करण्याची शक्ती हरविली होती आणी डोकं सुन्न झालं होतं. बास पुढे काही लिहायची ईच्छा होत नाहीये.
का आणी किती ही विकृती समाजात. कदाचित विकृती आपण म्हणतो, त्यांच्यासाठी हा रोजचाच खेळ असावा.
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
4 Jul 2010 - 11:45 pm | टारझन
मराठमोळ्या ... साला शेवटच्या दोन परिच्छेदांमधे मी देखील सुन्न झालो यार @@
हे असले पिक्चर पहावत नाही आपल्याला ... तु छाण लिहीलंयंस एकदम !!
पण मग हे "थ्यांक्स मा " हे चित्रपटाचं नाव देण्याचं काय कारण ? पोर्याला अनाथ सोडुन दिल्याबद्दल पोर्या मा ला थ्यँक्स म्हनतोय का ?
(आईबाप नं१ लाभलेला) टारझन
5 Jul 2010 - 10:45 am | मराठमोळा
>>पोर्याला अनाथ सोडुन दिल्याबद्दल पोर्या मा ला थ्यँक्स म्हनतोय का ?
नाही. कुणीही जेव्हा लहान असतो तेव्हा त्याची आईच त्याची पुर्ण काळजी घेते, वाढवते, जपते तेव्हा कळत न कळत प्रत्येक जण थॅंक्स मा असंच म्हणत असतो, पण ज्यांना असं रस्त्यावर टाकुन दिले जाते त्यांना ना आई मिळते ना प्रेम. चित्रपटाची ही थीम आहे की अशा या मुलांना रस्त्यावर न टाकता त्यांनाही थँक्स मा म्हणता येईल असा एक समाज निर्माण करुया.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
5 Jul 2010 - 12:05 am | रामदास
असेच म्हणतो आणि डोळे पुसत पुसत बघतो.
5 Jul 2010 - 12:11 am | राजेश घासकडवी
असं काही पाहिलं की मन सुन्न होतं... कुठे तरी आपल्याला माहीत असत की असले प्रकार घडतात. पण तिथे डोळेझाक करणं आणि आपल्या मध्यम वर्गीय संस्कृतीत रमून जाणं एवढंच आपण करतो.
उत्तम सिनेमाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
5 Jul 2010 - 12:11 am | बिपिन कार्यकर्ते
नकोसं.... तरी चित्रपट बघेन म्हणातोय.
बिपिन कार्यकर्ते
5 Jul 2010 - 1:44 am | गणपा
:(
काय बोलावं?
नुसता विचार करुनच सुन्न व्हायला होत.
5 Jul 2010 - 1:47 am | पुष्करिणी
एकदम सुन्न !
पुष्करिणी
5 Jul 2010 - 4:26 am | रेवती
असे चित्रपट बघून वाईट वाटतं हे खरं पण आपण फक्त वाईट वाटून विषय सोडून देतो. आजही मुलगा होइपर्यंत चार चार मुली होउ देणारे आणि त्यांची पुरेशी काळजी न घेणारे आईवडील आहेतच. एक मुल आपल्याला झालं तर दुसरं मुल हवं असताना दत्तक घेणारे किती असतात? नुसतं वाईट वाटण्याला कितीसा अर्थ राहिला? आठ दहा वर्षापूर्वी हैद्राबादला स्कूटरवरून तीन मुली, एक छोटा मुलगा व त्यांचे आईवडील जाताना पाहिले. परिस्थिती अत्यंत बेताची असावी असा अवतार होता. या मुलांचे शिक्षण, पोषक आहार, संस्कार यांची काळजी कितपत घेतली जाणार असे मनात आले.
मराठमोळेसाहेब आपण चांगल्या चित्रपटाबद्दल माहिती दिलीत.
रेवती
5 Jul 2010 - 5:00 am | सहज
ममो, मला हा सिनेमा बघवणार नाही. क्षमस्व!
5 Jul 2010 - 6:09 am | स्पंदना
वाचुनच सुन्न व्हायला झाल.
स्वतःचच पोर पण हरवलेल्या त्या माते बद्दल वाचुन खरच मन हेलावल.
5 Jul 2010 - 11:34 am | शानबा५१२
मला 'त्या' बाळप्रमाणेच कींवा त्यापेक्षा जास्त वाईट 'त्या' आईसाठी वाटल.कारण बाळ जे चाललय त्याच्याशी अजाण होत्,पण त्या आईला पुर्ण जाणीव होती परीस्थीतीची.
वेश्यागमन्,कॉण्डम व तस्मम प्रकार असताना ह्यांना वासना शमवण्यासाठी हे असे प्रकार का करावे लागतात???(म्हणजे जे 'ह्या' थराला पडु शकतात त्यांनी 'हे' केलेले बरे!)
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
5 Jul 2010 - 11:40 am | श्रावण मोडक
चित्रपट? वास्तवाची एक मीती आहे ही इतकेच.
अलीकडचाच एक अनुभव सांगतो - माझ्या एका स्नेह्यांनी अपत्य होऊ न देता एका अनाथाश्रमातून अपत्य दत्तक घेतले. चौदा वर्षं झाली या घटनेला. हे मूल मोठं झालं. वयाच्या सहाव्या वर्षानंतर हळुवारपणे या मुलाला दत्तक वगैरे सांगितलं गेलं. काही काळानं हे मूलही त्याच अनाथाश्रमात आठवड्यातील सुटीच्या दिवशी तिथल्या मुलांसमवेत खेळण्यासाठी जाऊ लागलं - एक सामाजिक योगदान म्हणून. आपलीच आवड म्हणून. त्या दांपत्याचाही त्या संस्थेशी तसा संबंध होताच. गेल्या सहा-आठ महिन्यात (आता हे मूल १४ वर्षांच्या वयात आहे हे ध्यानी घ्या) या मुलाच्या वर्तनात थोडा फरक पडत गेला. "माझी मूळ आई कोण, मला तिला जाब विचारायचा आहे," असा धोशा लावला गेला. अर्थात, त्याचं उत्तर देणं शक्य नव्हतं. एक दिवस असा आला की, त्या संस्थेत संध्याकाळी आपल्या नेहमीच्या तिथल्या मुलांसमवेत खेळण्याच्या कामासाठी हे मूल गेलं होतं; ते परतलंच नाही. पुढचे तीन दिवस त्या दांपत्याचे काय हाल झाले ते मी पाहिले. मुलाचा दोष नाही. दांपत्याचाही नाही. संस्थेचाही नाही. या परिस्थितीवर कोणाचेच नियंत्रण नसते. आठवड्याने मूल परतलं. त्याची त्याच्या या दत्तक आई-वडिलांविषयी काहीही तक्रार नाही. आठवड्यात नेमकं काय घडलं वगैरे गोष्टी तपशिलाच्या. त्या मुलानं एक प्रश्न कायमचा निर्माण केला हे वास्तव.
आपल्या (जैविक) आईला जाब विचारावंसं त्याला आता चौदा वर्षांनी वाटण्याजोगं काय घडलं असावं? कुठून त्याच्यात ही भावना निर्माण झाली असावी? समाज (यात सारं काही आलं) याला जबाबदार असेल तर मात्र या चित्रपटातील थँक्स मां असं म्हणण्याजोगी भावना निर्माण करण्याच्या उद्देशाचं आव्हान खरंच आव्हान आहे.
चित्रपटामागील या हेतूचं कौतूक. पण भाबडेपणा न ठेवता इतकंच सांगतो की, ही एकच मीती यात येते आहे. हा प्रश्न हाताळताना नैतीक-अनैतीकतेचे मुद्दे असतात तसे न-नैतीक मुद्देही असतात. वर रेवती यांनी तीन मुली आणि एक मुलगा असा एक प्रसंग लिहिलाय. त्या मुलांच्या जोपासनेविषयीचा प्रश्न गंभीर आहे. पण त्या परिस्थितीमागील कारणमीमांसा अत्यंत जटील आहे. केवळ जोपासनेचा मुद्दा ही अशा परिस्थितीतील प्रेरणा असत नाही. मुलगाच हवा इथंपासून या कारणमीमांसेची सुरवात होते. पुढे असंख्य पैलू, अनेक मीती.
गंमतीचा भाग - मीही एक मुलगा, माझ्या तीन बहिणी. इथं बिलकुल वैयक्तिक काहीही (घेतलेलंही) नाही. त्यामुळं तशी शंकाही मनात आणू नका. आपल्यातच असं एक उदाहरण आहे, हे सांगायचं आहे. कारण गेल्या चाळीसपैकी, जाण येऊ लागलेल्या पंचवीस वर्षांतील अनेक प्रसंगात मीही अनेकदा हा प्रश्न माझ्याच संदर्भात स्वतःलाच विचारला आहे. का आपल्या आई-बाबांनी चार मुलं होऊ दिली असावीत? हा प्रश्न थेट त्यांना विचारण्याची हिंमत याआधी झालेली नाही. आता मला तो प्रश्न त्यांना विचारावासा वाटत नाही. प्रश्न मी विचारत नाही; पण कारणमीमांसा तशीच राहते. ती मला ठाऊक नाही. हे ठीक आणि उत्तम की, जगताना आम्ही बरेच 'गावची गल्ली', 'रस्ता' ते 'जिल्हा मार्ग' (स्केल उदाहरणासाठीच, काही जण म्हणतील आम्ही राज्यमार्गावर आहोत; काही म्हणतील, नाही अजून तालुक्यात आहोत) असे आलो. हे भौतीक अर्थाने. वैयक्तिक मी भौतीकतेच्या पलीकडे बऱ्याच अंशी महामार्गाच्या दिशेनं जाऊ शकलो. यात त्या आई-बापाचाही वाटा आहे. त्यामुळे आता हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. पण हा प्रश्न डोक्यात येऊन जाण्याजोगी स्थिती आलीच नाही असे थोडेच म्हणता येईल.
(वैयक्तिक काहीही नाही, हे एव्हाना ध्यानी आलेलं असावं ही आशाच. कारण माझ्या लिखाणात अनेक प्रिझम्प्शन्स असतातच.)
समाज हे अशाच घटकांचं, प्रक्रियांचं मिश्रण असतं. तिथं ही व्यामिश्रता भेदण्याचे या चित्रपटातील उद्देशासारखे प्रयत्न होत रहावेत. ते इकडून ढुशा देतील. तिकडूनही ढुशा मिळत राहतील. या घुसळणीतून थोडं लोणी निश्चित हाती पडेल. :)
6 Jul 2010 - 11:59 am | मराठमोळा
धन्यवाद श्रामो,
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर काय बोलावं हेच सुचत नव्हत. ह्या विषयावर प्रतिसाद द्यायला कुणाचेही हात धजावणार नाहीत असे वाटत होते.
तुमच्या अनुभवाप्रमाणे मुले दत्तक घेणे सुद्धा सोपे नाही. आपण आपलाच विचार करुयात, कितीजण अशी मुले दत्तक घ्यायला तयार होतील. आणी तुम्ही सांगता तसा प्रकार झाला किंवा त्या मुलाचे आईबाप सापडले तर काय प्रसंग उभा राहील? रेवती ताईंच्या म्हणण्याप्रमाणे मध्यमवर्गाने मुले दत्तक घेणे फारच अवघड, कारण एकच समाजाचे/नातेवाईकांचा दबाव.
मुले सोडुन देणे हा प्रकार फक्त भारतातच आहे असे नाही. जगभर हा प्रकार पाहिला जातो, अशी ही मुले मोठी झाल्यावर फ्रस्टेशनमधे वाममार्गाला लागणार नाहीत तर काय होणार?
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 Jul 2010 - 6:21 pm | रेवती
धन्यवाद श्रामो!
काहिही वैयक्तीक न घेतल्याबद्दल!:)
पुढचे तीन दिवस त्या दांपत्याचे काय हाल झाले ते मी पाहिले. मुलाचा दोष नाही. दांपत्याचाही नाही. संस्थेचाही नाही.
वयात येणार्या मुलांचे प्रश्न कमी का असतात? सगळ्या बाबतीत 'का?' हा प्रश्न असतोच, त्यावर त्यांच्या दृष्टीने उत्तरेही तयार असतात. 'आपण जे समजतो तेच खरे' असेही डोक्यात असू शकते. मग त्या 'का?' चे उत्तर शोधायला वाट्टेल तो मार्ग चोखाळायला कमी करत नाहीत. अनेकदा हे मार्ग चुकीचे असू शकतात. यासाठी मूल दत्तकच असायला हवे असे नाही. दहावीच्या परिक्षेत नापास झाल्यावर आत्महत्या करणारी (वाइट मार्ग निवडणारी) मुले सगळी काही दत्तक नसतात. त्याचबरोबर वाईट संगतीत असण्यामुळे काहीजण भरकटतात. सगळेजण पुढे 'वाया' जात नाहीत. आईवडील काही न काही मार्ग शोधून आपल्या लेकरांना मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करतात. ते पालकांचे हाल नसतात का? मग फक्त दत्तक मुलांनी पौगंडावस्थेत केलेल्या चुकांना "बघा, ही मुले कोणते प्रसंग आणतात आईबापावर!" असे म्हटले जाते. या सगळ्यात मी स्वत:ला समाजामधली एक समजते. आमच्या ओळखीच्या मराठी कुटुंबातील वडील माणूस हा अनेक वर्षांपूर्वी दत्तक घेतलेला आहे, त्याला स्वत:ची (बायोलॉजिकल) दोन आपत्येही आहेत. मला आधी वाटायचे कि याने दुसरे मूल दत्तक का नाही घेतले? आता या व्यक्तीने जर विचार केला १) कि मला जसे वाढवून मोठे केले तसे मीही एका जिवासाठी करीन तर ते ठिक आहे आणि सगळ्यांना एकदम मान्य ही असेल. पण, २) इतरांना अशी हवी आहेत तेवढी (म्हणजे २) मुले जन्माला घालायची मुभा आहे तशी मला नाही का? कि मी दत्तक असल्याने समाजासाठी झटण्यासाठीचा एक उमेदवार अशीच ओळख जन्माबरोबर आलिये?
अगदी गरीब तर नको असलेली मुले वार्यावर सोडून देतात. तर आपण म्हणतो," नको रे बाबा असले झेंगट!" आता कसली आलिये समाजसुधारणा?
रेवती
6 Jul 2010 - 1:45 pm | स्मिता चावरे
आपला लेख , रेवती ताई आणि मोडक यांचे प्रतिसाद वाचून एका भीषण वास्तवाची जाणीव झाली.
अवांतरः ह्या चित्रपटाविषयी अधिक माहिती द्याल का? दिग्दर्शक /कलाकार कोण आहेत? ह्या चित्रपटाची व्हीसीडी उपलब्ध आहे का?
6 Jul 2010 - 2:03 pm | मराठमोळा
ही घ्या माहिती. गुगलवर सुद्धा उपलब्ध आहे.
Thanks Ma Hindi Movie 2010
Drama Movie
Cast And Crew
Cast: Alok Nath ,Raghuveer Yadav,Barry John ,Ranvir Shorey,Sanjay Mishra,Mukta Barve,Jalees Sherwani
Director: Irfan Kamal
Music Director: Sajid Ali, Wajid Ali
Producer Aziz Makani
Sound Manas Chaudhary
Cinematography Ajay Vincent
Release Date: 19 Feb 2010
Genre: Drama
Language: Hindi
आलोक नाथ, रणवीर शौरी यांचा फारच छोटा रोल आहे सिनेमात.
ऑनलाईन डाउनलोड करु शकता.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 Jul 2010 - 3:49 pm | स्मिता चावरे
तत्परतेने माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
6 Jul 2010 - 3:49 pm | स्मिता चावरे
तत्परतेने माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
6 Jul 2010 - 6:37 pm | रेवती
मराठमोळा साहेब,
मला जे म्हणायचं आहे ते मी नीट सांगू शकलेले नाही असे वाटते.
मला अगदी उलट म्हणायचे आहे. नातेवाईकांचा दबाव वगैरे जाउदे!
अगदी निर्भीडपणे बाळ दत्तक घ्यायला काय हरकत आहे? असे म्हणायचे होते. दत्तक मुलेच असे प्रसंग उभे करतात असे नाही तर बायोलॉजिकल मुलेही अनेक वाईट प्रसंग आईवडीलांवर आणत असतात असे म्हणायचे आहे. माझा त्यावर लिहिलेला मोठा प्रतिसाद मी प्रकाशित करू शकत नाहीये. कारणही कळत नाहिये.
आजकाल अनेक मुले आणि मुली आईवडीलांना पसंत नसलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करायला धजावतात तेंव्हा ते कोणत्या नातेवाईकांना घाबरत असतात? कोणत्या समाजाचा आणि त्यांनी बरे वाईट म्हणण्याचा विचार करत असतात? असाच विचार मूल दत्तक घेताना होत नाही. असे माझे म्हणणे आहे.
रेवती
6 Jul 2010 - 7:02 pm | श्रावण मोडक
हा प्रतिसाद वर माझ्या प्रतिसादावर दिलेल्या प्रतिसादावरचाही आहे.
बहुदा
>>मला जे म्हणायचं आहे ते मी नीट सांगू शकलेले नाही असे वाटते.
असंच घडलं असावं. मला तुमचा आधीचा प्रतिसाद अनावश्यक जनरलायझेशन करणारा वाटला. आत्ता माझ्या प्रतिसादावर दिलेल्या प्रतिसादाचा सूर मला एकदम वेगळा, आधीच्या उलटा आणि या प्रश्नाची अधिक व्यापक जाण दाखवणारा दिसतोय. (स्वगत: अर्थात, तोही तितकासा स्पष्ट व्यक्त होणारा नाहीये.) तुम्ही, मी आणि ममोही एकाच स्तरावर आहोत. एकाच दिशेने विचार चालले आहेत आपले. :)
6 Jul 2010 - 11:29 pm | मराठमोळा
>>आजकाल अनेक मुले आणि मुली आईवडीलांना पसंत नसलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करायला धजावतात तेंव्हा ते कोणत्या नातेवाईकांना घाबरत असतात? कोणत्या समाजाचा आणि त्यांनी बरे वाईट म्हणण्याचा विचार करत असतात? असाच विचार मूल दत्तक घेताना होत नाही. असे माझे म्हणणे आहे.
तुमचे म्हणणे पटते आहे रेवती ताई, पण लग्न करणं आणी मुल दत्तक घेणं यात बराच फरक आहे. आजकाल समाज लव मॅरेज ला काही प्रमाणात स्वीकारु लागला आहे. पण मुल दत्तक घेणे हे मुळात पती पत्नी दोघांना मान्य असायला हवे ना. दोघांना काही प्रॉब्लेम नसताना मुल दत्तक घेऊ, अशी संकल्पना तर रुजली पाहीजे. कदाचित ती वेळ येईपर्यंत लग्न न झालेली स्त्री मुलांना समाजमान्य जन्म देऊ शकेल इतपत समाज बदललेला असेल आणी मुले रस्त्यावर सोडण्याचे प्रमाणही बर्याच अंशी घटलेले असेल.
आज समाजात अशीसुद्धा उदाहरणे आहेत की मुल होत नाही तरी दत्तक घेण्याची हिंम्मत जोडप्यांनी दाखवलेली नाही. मुल झालेल्यांच तर सोडुनच देऊ.
श्रामो म्हणतात त्याप्रमाणे या चित्रपटासारखे प्रयत्न आव्हान असले तरी होत रहावेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरच कदचित लोणी हाती पडेल.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
7 Jul 2010 - 1:38 am | शिल्पा ब
सोडून दिलेली मुले - एक भीषण वास्तव आहे...
मुलगा हवा म्हणून परिस्थिती असो नसो वाटेल तेव्हढी प्रजा वाढवतात लोक...
दत्तक घेणे सोपे नाही...इथे एका जोडप्याला मुल होत नाही म्हणून त्यांनी काही महिन्यापूर्वी एक बाळ दत्तक घेतले...त्याआधी बराच अभ्यास केला...कधीकधी बाळाची आई ड्रग घेणारी असते, तर कधी रोगट तर कधी काय...त्यांनी कोरियन बाळ दत्तक घेतले...
दत्तक घेतलेल्या बाळाला आपल्या बाळासारखे प्रेम करता येणे सोपे नाही....खूप प्रयत्न करूनही मुलंच होत नसेल तर दत्तक घेण्याचा जरूर विचार करावा...पण त्याचबरोबर त्याला मनानेसुद्धा आपले मानावे...किमान तसा प्रयत्न करावा...वरील काही प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे स्वतःचे मुलसुद्धा वाममार्गाला लागू शकते तेव्हा जर कुठे काही चूक झालीच तर दत्तक बाळाच्या मागे उभे राहावे....
सख्खे आई बाप सुद्धा स्वार्थी नसतात असे काही नाही...स्वतःच्या मुलीवर अतिप्रसंग करणारे बाप आणि आयासुद्धा काही कमी नाहीत ...प्रकरणे उजेडात येत नाही एवढेच....
शेवटी समाज तरी कुठे कुठे पुरा पडणार? असे होऊ नये याची काळजी घेणे हा उपाय आहे....जर असे काही झालेच तर त्यात बाळाची काय चूक...त्याची काळजी घ्यावी...इथे अमेरिकेत अनैतिक संबंधाने मुले झाली तरी लोक ती वाढवतात, पौगंडावस्थेतील आई बाप तर नेहमीचेच....आपल्याकडे हे शक्य नाही...किंवा खूपच अवघड आहे म्हणू...म्हणून संबंध ठेवताना शक्यतो काळजी घ्यावी...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
7 Jul 2010 - 10:08 am | मराठमोळा
हे आर्टीकल वाचा.
टाईम्सचं जुनं पण छान आर्टीकल आहे पण शेवटच्या परिच्छेद फार महत्वाचा आहे.
त्यात त्यांनी म्हंटल आहे की मुलांना रस्त्यावर मरायला सोडण्यापेक्षा कायदेशीर रित्या त्या मुलाला women and child welfare department कडे सोपवु शकतात. मुलाच्या आईचे नाव सुद्धा गोपनीय ठेवले जाते.
ही माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे लोक मुलांना रस्त्याव्र सोडुन देतात.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!