सुटका

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
22 Jun 2010 - 6:44 pm

"कुऽऽऽऽऽऽऽईऽऽऽऽऽ कुऽऽऽऽईऽऽऽऽऽ"

खाडकन जागा झालो. आधी समजेनाच काय आवाज येतोय. कसला आवाज येतोय. जरा समज आल्यावर समजलं. खिडकीत जावुन पाहिल तर समोर रस्त्यावर बसुन मान वर करुन यमन गाणारं कुत्र पाहुन डोकच सटकलं. मनात एक सणसणीत शिवी आली आणि तोंडातुन उच्चारुन त्याला हाकलुन लावावं असा विचार आला. पण तेवढ्यात लक्षात आलं. जमणार नाही असं बोलुन तो परत केकाटत बसला असता तर... पंचाईतच झाली असती. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. शेवटी शुक शुक करुन हाकलुन लावलं. हल्ली वाढलेल्या वयात शुकशुक करण्याचा फक्त कुत्रे मांजरी हाकलायलाच उपयोग होतो.

तांब्यातलं पाणी पिवुन तोंड ओलं केलं आणि परत लवंडलो. झोपेचं खोबरं झालं होतं. ते कुत्रं आता दुर गेलं होतं. इतका वेळ डोक्यात जाणारा आवाज बंद झाल्याने शांत शांत वाटत होतं. डोळे मिटायचा प्रयत्न केला तरी झोप आता पळुन गेली होती. घड्याळात पाहिले तर फक्त साडेतीन वाजले होते. उजाडायला खुपच वेळ बाकी होता. लवकर उठुन काय करायचे पण झोप तर लागली पाहिजे. हे असंच होतं हल्ली. पहाटे जाग येवुन जाते आणि सहा साडेसहाला परत झोप लागते. मग होते धावपळ, चिडचीड उशीर झाला म्हणुन. त्यामुळे आता काही झाले तरी झोपायचे नाही असा निश्चय करुन आढ्याकडे पहात पडुन राहिलो.

साडेचार वाजता मात्र संयम संपला. छ्या किती वेळ पडुन रहाणार असा विचार करुन सरळ फिरायला बाहेर पडलो. मस्त पहाटेची वेळ होती. पण नेहमी जाणवते तशी गार झुळुक नव्हती पण एकंदर खुपच ताजंतवानं वाटत होतं. मुख्य रस्त्यावर आलो. सगळीकडे शुकशुकाट होता. अजुन थोड्या वेळाने पेपरवाले, दुधवाले सुरु होतील. मग कामावर जाणारे लोक येतील. सगळा रस्ता गजबजुन जाईल. मी बघत बघत चाललो होतो. इतर वेळेला कधी असं निवांत फिरता येत नाही. रस्ता ओलांडता ओलांडता एखादी गाडी रेडा बनुन येईल की काय अशीच भिती वाटते. पण आज मात्र असली काही भिती वाटत नव्हती. बघता बघता चौकात आलो. दोन चार रिक्षावाले तिथे उभे होते. दिवसा पन्नास साठ जण उभे असतात तो कोपरा दिसतो कसा हे पाहुन किती दिवस झाले होते. आज पाहिला. लहानपणी मित्रांबरोबर तिथे बिनधास्त खेळायचो. आज चालणं मुश्किल झालं आहे.

विचार करता करता पुढे आलो. चक्क रिक्षावाल्यांनी आवाज दिला नाही हे पाहुन बरं वाटलं. नाहीतर कुठं जायचं विचारुन विचारुन पार भंडावुन सोडतात. पुढल्या रस्त्यावर बनत असलेल्या नव्या इमारतीच्या छपरावरुन शहर पहायचं अशी खुप दिवसांची इच्छा होती. हळुच इमारतीवर गेलो. झोपलेलं शहर मस्त दिसत होतं. सकाळची हवा किती छान असते. येवढी उंच इमारत एका दमात चढलो पण धाप लागली नाही. आता रोज सकाळी उठुन फिरायला जायचेच असं बजावत परत फिरस्तीला लागलो.

बराच वेळ फिरत होतो. विचाराच्या तंद्रित किती वाजले काय वाजले लक्षच नव्हतं. घड्याळाकडे नजर टाकायला हाताकडे पाहिले. तर घड्याळ विसरुन आलो होतो. घाई घाई. सूर्याकडे नजर टाकली तर बराच वर आला होता. आजुबाजुल पाहिले तर घरापासुन खुप लांब आलो होतो. सुटी होती म्हणुन उशीर झाला तरी बिघडले नाही. पटकन परत जायला निघालो. एवढ्या लांब आपण आलो तरी पाय दुखत नाही ही भावना खुप सुखावह होती. इतका वेळ झाला की पोटात कावळे कोकलतात. पण आज विचित्रच होतं. भुक लागल्यासारखे पण वाटत नव्हते. काय असेल ते असो पण आता घरी गेले पाहिजे असा विचार करत पटपट पाउले टाकत घराकडे निघालो.

घराच्या रस्त्याकडे वळालो तर थोडी गर्दी दिसली. ओळखीचे चेहरे वाटत होते. पण मला पाहुन काहीच ओळखीचं चिन्ह दाखवलं नाही म्हणुन मी दुर्लक्ष करुन घराकडे निघालो. दारासमोर आठ दहा जण आपसांत कुजबुजत होते. दोघं तर माझे जवळचे मित्र. काय झालं असावं असं म्हणुन मी त्यांच्याकडे निघालो. एकाच्या मागे उभा राहुन कानोसा घेत होतो. नक्की काय झालं आहे हे समजत नव्हतं आणि सगळे जण गंभीर चेहरा करुन होते. त्यामुळे एकदम "काय रे ? काय झालं?" असं कसं विचारायचं म्हणुन मी पण त्यांच्यासारखाच गंभीर चेहरा करुन उभा राहिलो. काही तरी कुजबुज चालु होती पण ऐकुच येत नव्हतं. आजकाल फार हळु आवाजात कुजबुज करायची फ्याशन आहे. समोरच्याला तरी कळतं की नाही समजत नाही. शेवटी एका मित्राच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला बोलणार तोच सगळे सावध होवुन उभे राहिले आणि दाराकडे पाहु लागले.

दारातुन तिघं चौंघं काहितरी उचलुन आणत होते. कुणीतरी माणुस असावा. माझ्या घरातुन कुणाला आणत आहेत असा विचार करुन मी डोकावुन पाहिले. खुपच ओळखीचा चेहरा होता. रोजच्या बघण्यातला असावा असं वाटत होतं. बाहेर आणलं. आणि घेवुन चालले. अरे कोण आहे तो ? माझं डोकंच चालेना. त्यांच्या मागे जावे की काय असा विचार करत होतो. तो कोण होता? घरात कशाला आला होता? काय करत होता? त्याला काय झालं? त्याला कुठे नेलं ? काहीच समजेना. मी त्यांच्या मागे जायचा विचार केला. आणि निघणार तोच आवाज आला.. "तुझं आता काय काम? तु माझ्याबरोबर चल."

खाडकन मागे वळुन पाहिलं.
तोच तो सकाळचा कुत्रा.
आजुबाजुला पाहिलं
दुसरं कुणीच नाही.
कुत्रा बोलला ?
मला विश्वास बसला नाही.
मी परत निघणार तोच परत "अरे सांगितले ना.. तुझे काही काम नाही. तुझे इथले काम संपले. सुटका झाली तुझी. आता चल मी नेईल तिकडे..." आणि त्याने तोंड वर करुन आवाज केला

"कुऽऽऽऽऽऽऽईऽऽऽऽऽ कुऽऽऽऽईऽऽऽऽऽ"

( बिकाला समर्पित )

कथा

प्रतिक्रिया

प्रभो's picture

22 Jun 2010 - 6:47 pm | प्रभो

=)) =)) =))

सुधर रे नान्या....

शुचि's picture

22 Jun 2010 - 6:51 pm | शुचि

आवरा!
पण आवडलं :)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2010 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे...!
अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

हे ललित लेखन आहे की कसे? नसेल तर पुरावा द्या. हे तुम्ही लिहिले की त्या कुत्र्याने? तुम्ही देहात होता की नाही? नसाल तर गर्दीत चालताना त्रास कसा झाला?

बिपिन कार्यकर्ते

शुचि's picture

22 Jun 2010 - 6:53 pm | शुचि

>> आजकाल फार हळु आवाजात कुजबुज करायची फ्याशन आहे. समोरच्याला तरी कळतं की नाही समजत नाही. >>

=)) =)) =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

22 Jun 2010 - 6:56 pm | सहज

आजकाल नाना व रामदास मस्त गंडवतात. पुन्हा छान वाचले.

:-)

विसोबा खेचर's picture

22 Jun 2010 - 6:57 pm | विसोबा खेचर

खाडकन जागा झालो. आधी समजेनाच काय आवाज येतोय. कसला आवाज येतोय. जरा समज आल्यावर समजलं. खिडकीत जावुन पाहिल तर समोर रस्त्यावर बसुन मान वर करुन यमन गाणारं कुत्र पाहुन डोकच सटकलं. मनात एक सणसणीत शिवी आली आणि तोंडातुन उच्चारुन त्याला हाकलुन लावावं असा विचार आला.

ज्या अर्थी डोकं सटकलं आणि मनात शिवी आली त्याअर्थी तो कुत्रा अन्य काही गात असावा.. कारण तो जर यमन गात असता तर आपल्यातली रसिकता निश्चितच जागी झाली असती अशी महती आहे यमनची..

असो..

प्रत्येकाची मतं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी! वाद नको..

चालू दे रे नाना! छान लेख.. :)

(यमनप्रेमी) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 7:02 pm | बिपिन कार्यकर्ते

कारण तो जर यमन गात असता तर आपल्यातली रसिकता निश्चितच जागी झाली असती अशी महती आहे यमनची..

१००% सहमत.

बिपिन कार्यकर्ते

शुचि's picture

22 Jun 2010 - 7:05 pm | शुचि

अवलिया , तो कुत्रा "रॉक्/पॉप/अ‍ॅसिड" गात असेल ;). ते भयानक असतं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

23 Jun 2010 - 5:09 am | शिल्पा ब

<<<तो कुत्रा "रॉक्/पॉप/अ‍ॅसिड" गात असेल

अ‍ॅसिड काय असत?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 7:10 pm | शानबा५१२

हल्ली वाढलेल्या वयात शुकशुक करण्याचा फक्त कुत्रे मांजरी हाकलायलाच उपयोग होतो.

:D :D

कल्पना भन्नाट होती........मी शेवटचा पॅरा दोनदा वाचला व तुमच्या एकुनच कथेच्या मांडणीचे मनातल्या मनात खुप कौतुक केले.

असे लेख वाचुन वाचुन मी पण लिहायला शिकणार्,मग बघतो कुठे पळतायत ते!!

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2010 - 7:20 pm | परिकथेतील राजकुमार

हा लेख लिहुन आपण स्वतःला धर्मराज युधिष्ठीर साबित करु इच्छीता काय ?

दुर्योधन
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

II विकास II's picture

22 Jun 2010 - 7:23 pm | II विकास II

खोडसाळपणा संपादित.

शुचि's picture

22 Jun 2010 - 7:26 pm | शुचि

खरय विकास लेख सुरेखच जमलाय. हा उडवला तर जळजळ होणारच.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मुक्तसुनीत's picture

22 Jun 2010 - 7:44 pm | मुक्तसुनीत

पंक्चरलेल्या रबरी रात्री
गुरगुरवावी रबरी कुत्री

रेवती's picture

22 Jun 2010 - 8:01 pm | रेवती

आजकाल फार हळु आवाजात कुजबुज करायची फ्याशन आहे.
सहमत. आजकाल मी आणि बरेच दिवस 'हाय!' 'हॅलो!' म्हणणारी एक महिला दोस्त बनू पाहतोय. तिची एक सवय आमच्या मैत्रीच्या आड येते. ती सवय म्हणजे, बोलताना स्पष्टपणे वाक्य सुरु करायचं आणि जसजसं वाक्य संपत येइल तसतसं ते कुजबुण्याकडे न्यायचं. शेवटी ती काय बोलते ते समजतच नाही. दर वाक्याला ती असच करते.
बाकि आपली ष्टोरी छान आहे. प्रियालीतैकडून शिकवणी घेताय कि काय असा प्रश्न मनात डोकावून गेला.
हल्ली वाढलेल्या वयात शुकशुक करण्याचा फक्त कुत्रे मांजरी हाकलायलाच उपयोग होतो.
खिखिखि!

रेवती

सन्जोपरावाच्या लेखाचा पहिला परिणाम नानांवर होईल असे स्वप्नात देखिल वाटले नव्हते.
संन्यास सोडुन एकदम वरच......... नानाची काळजी वाटते खुप आजकाल. :S

वेताळ

यमन नसून तो यम होता हे तुमच्या लक्षात आले कसे नाही, म्हणतो मी! ;)
तुम्ही पूर्वी शुकशुकाट कोणत्या कारणासाठी करायचात ते सूचक अर्थाने सांगणे हे तुमचे वय झाल्याचे लक्षण समजावे का? (किंवा का समजू नये?):?

(यवन)चतुरंग

Pain's picture

22 Jun 2010 - 10:09 pm | Pain

बळच आहे.

राजेश घासकडवी's picture

22 Jun 2010 - 10:13 pm | राजेश घासकडवी

वाचल्यासारखा वाटतोय...'जमणार नाही' सुद्धा ओळखीचं वाटतंय... नाना, काहीतरी नवीन लिहा की.

मिसळभोक्ता's picture

22 Jun 2010 - 10:26 pm | मिसळभोक्ता

भरभर वाचताना काहीतरी ओळखीचं वाटलं.

मग यमनाचा उल्लेख वाचला, आणि झाले मोकळे आकाश !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

केशवसुमार's picture

22 Jun 2010 - 10:30 pm | केशवसुमार

जाला वर णवीण साईट सुरु झाली की काय.. चला समस्त णतदृष्ट लोकस लगेच तिकडे चला.. चांगले चालय त्याची वाट णको लावायला?
(णतदृष्ट)केशवसुमार..

धनंजय's picture

23 Jun 2010 - 2:53 am | धनंजय

मस्त.
हल्ली "मृत्युदूतांची एक टोळी" अशी पात्रे असलेली दूरचित्रवाणी मालिका बघत आहे (डेड लाइक मी). तीसुद्धा गमतीदार आहे.

शिल्पा ब's picture

23 Jun 2010 - 5:08 am | शिल्पा ब

लेख आवडला.. :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अवलिया's picture

23 Jun 2010 - 6:50 pm | अवलिया

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासुन आभार. :)

--अवलिया

II विकास II's picture

23 Jun 2010 - 7:21 pm | II विकास II

>>सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासुन आभार. Smile

धन्यवाद