अस्तित्वाचा पुरावा!

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
24 May 2010 - 3:07 pm

लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्‍यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही....
---------------------------------------

मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू. पण तिचं अकाऊंट महाराष्ट्रातल्या एका सहकारी बॅंकेत. इकडे इंदूरला ती बॅंक नाही. मग तिला सुचवलं, आपण एखाद्या राष्ट्रीयकृत बॅंकेत तुझं अकाऊंट उघडून टाकू. या निमित्ताने तरी हे काम होऊन जाईल. हाय काय नि नाय काय.

दुसर्‍या दिवशी कोपर्‍यावरच्या महाराष्ट्र बॅंकेत तिला सोडून आलो. संध्याकाळी परतलो तर बायकोचा चेहरा हिरमुसलेला. विचारणा केल्यावर कळलं, बाईसाहेबांकडे फोटो आयडेंटीटी म्हणून सरकारी नियमांत बसेल असे काहीही नाही. वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीयकृत बॅंकेत खातं असल्यास पासबुक, नोकरीत असल्यास तिथले ओळखपत्र. यापैकी तिच्याकडे खरोखरच काहीही नव्हतं. गेल्या वर्षीच आम्ही लग्नानंतर 'सहा वर्षांनी' का होईना विवाह नोंदणी करून घेतली होती, त्यावर दोघांचे फोटो आहेत. पण ते चालणार नाही, असं बॅंकेचा अधिकारी म्हणाल्याचं, सौभाग्यवतींनी सांगून टाकलं.

आता प्रश्नच उभा राहिला. फोटो आयडेंटीटी कार्ड आणायचं कुठून? कायम स्थलांतरामुळे दोघांची मतदार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झालेली. पण वोटर आयडी कार्ड काही मिळालेलं नव्हतं. किंवा स्वतःहूनही कधी त्यासाठी प्रयत्न केले नव्हते. बायको नोकरीही करत नाही. पॅन कार्ड काढण्याची वेळही कधी आलेली नाही. गाडी चालवता येत नाही, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. आता काय करायचं?

पॅन कार्ड यात सगळ्यात महत्त्वाचं. किमान हे असेल तरी बर्‍याच गोष्टी होऊन जातील. म्हणून मग आधी पॅन कार्ड काढायसाठी प्रयत्न करायचे ठरवले. पॅन कार्ड काढण्यासाठी चाचपणी करण्यासाठी गेलो.

जवळच पुण्याच्या एका बॅंकेची शाखा होती. तिथे विचारणा केली. पॅन कार्डच्या नियमावलीतही 'मॅरेज सर्टफिकिट'चा पुरावा म्हणून उल्लेख नाही, काऊंटरवरच्या बाईंनी माहिती दिली. मी हताश. नेटवर शोधाशोध केल्यानंतर त्यात पॅन कार्डसाठी ओळख पुरावा म्हणून 'शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून ते अगदी दहावी, बारावीचं मार्कशीटही चालणार असं लिहिलं होतं. मग त्याचा दाखला देत 'त्यात तरी फोटो कुठे असतो, हा प्रश्न विचारल्यानंतर त्या बाईकडे उत्तर नव्हतं. आमची चर्चा ऐकून बॅंकेचा अधिकारीही तिथे आलेला. बाकीची सगळी कागदपत्र बायकोकडे होतीच. शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावीचं मार्कशीट, रेशनकार्ड. पण यापैकी कशावरच फोटो नव्हता. त्यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पासपोर्ट यातले काही आहे काय विचारले? आमचा नन्नाचा पाढा होताच. अखेर त्यांना कसेबसे समजावून या सगळ्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी आणि मॅरेज सर्टफिकिट घ्या. त्या जोरावर ही माझी बायको आहे हे सिद्ध होईल, शिवाय तिच्या अस्तित्वाचा पुरावाही बाकीच्या कागदपत्रातून दिसेल, असं त्यांना पटवून सांगितलं.

पण तरीही कागदपत्रे परत आल्यास जबाबदारी तुमचीच असे सांगत त्यांनी ही कागदपत्रे स्वीकारायला अखेर तयारी दर्शवलीय.

हे एक काम उरकून महाराष्ट्र बॅंकेत आलो. तिथे खाते उघडायचे काम बाकीच होते. तिथल्या साहेबांना आम्हा दोघा नवरा-बायकोंचे फोटो असलेले मॅरेज सर्टफिकिट दाखवले, म्हटलं, अहो, माझ्यानंतर माझी सगळी मालमत्ता माझ्या बायकोच्या नावावर होण्यासाठी हे सर्टफिकिट तिला उपयोगी पडणार आहे, मग तिच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून हे ग्राह्य धरायला काय हरकत आहे. साहेबांना नियमांकडे बोट दाखवत 'नाही चालणार हो' असं म्हणत हतबलता दर्शवली. बायकोकडे बाकीची ढिगाने असलेली कागदपत्रेही कुचकामीच होती. कारण त्यावर तिचा फोटोच नव्हता. मग साहेबाने विचारलं तुमच्याकडे कॉलेजची काही कागदपत्रे आहेत काय ज्यावर तुमचा फोटो असेल? ......

....... आणि अशा तर्‍हेने ते सात वर्षे फायलीत बंद पडलेले बायकोचे डिएमएलटीचे सर्टफिकिट बाहेर पडले. सायबाला दाखवल्यानंतर त्याची कळी खुलली. 'हे चालेल', त्याने निकाल देऊन टाकला. मी आणि बायको एकमेकांकडे पहात गालातल्या गालात हसलो. सात वर्षे कुठल्याही कामास न आलेले कुठल्याशा नागालॅंड सरकारने मान्यता दिलेल्या आणि त्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमासाठी दिल्ली विद्यापीठाने दिलेले हे सर्टफिकिट अखेर सरकारी पातळीवर बायकोचे अस्तित्व सिद्ध करायसाठी धावून आले.

सरकारी कारभार म्हणतात तो हाच असावा. नाही काय?

समाजजीवनमानप्रकटनविचारमतअनुभव

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 3:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =))

सरकारी कारभाराचं आणखी एक उदाहरणः
माझा सगळाच सोयीचा कारभार असल्यामुळे मी लग्नानंतरही नाव बदललेलं नाही. सगळीकडे नाव लावताना स्वतःचं नाव आणि आडनाव एवढंच लावते. परवाच काही कामासाठी ऑफिसातून एक पत्र घ्यायचं होतं, त्यावर माझं नाव लिहीलेलं होतं:
सौ. संहिता मनोहर जोशी
बिनदिक्कत वडलांचं नाव आणि सौ. जोडून दिलं होतं! हसून हसून मी बेजार, समोरच्या माणसाचा 'आ' बंद करण्यासाठीही माझं हसू कमी होईना! शेवटी त्यांना घोळ सांगितला आणि मग नंतर उगाच "सिंगल बॅरल" माज दाखवला. माझं नाव नीट लिहा:
डॉ. संहिता जोशी.

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

24 May 2010 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार

काय तु नुसतीच डॉक्टर का प्रा. डॉ. ??

भोचकराव अनुभव भारीच बरका. सरकारी काम आणी..

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अन्या दातार's picture

25 May 2010 - 1:22 am | अन्या दातार

सरकारी काम आणी..
--> परिकथेत जाऊन थांब! ;)
:H :H :H

सहज's picture

24 May 2010 - 3:32 pm | सहज

मस्त!!

टारझन's picture

24 May 2010 - 10:20 pm | टारझन

लै भारी ! लै भारी !! लै भारी !!!

- भोसक

स्वाती२'s picture

24 May 2010 - 4:23 pm | स्वाती२

मजेशिर किस्सा!

jaypal's picture

24 May 2010 - 5:29 pm | jaypal

शेवटी "पुराव्या निशी शाबित केले हों". मस्त लेख.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

फटू's picture

24 May 2010 - 6:00 pm | फटू

सरकारी कागदपत्रे वेळच्या वेळी जमवायची ती या साठी !!!

- फटू

टुकुल's picture

24 May 2010 - 6:19 pm | टुकुल

हॅ हॅ हॅ.. मजेशीर अनुभव.

--टुकुल

धनंजय's picture

24 May 2010 - 6:20 pm | धनंजय

गमतीदार अनुभव. खुसखुशीत लिहिलेला आहे.

(घडत असताना गंमत कमी हालच वाटत असणार :-( )

बेसनलाडू's picture

25 May 2010 - 3:02 am | बेसनलाडू

(बिनसरकारी)बेसनलाडू

प्रभो's picture

24 May 2010 - 7:12 pm | प्रभो

जबरा अनुभव.

आळश्यांचा राजा's picture

24 May 2010 - 7:34 pm | आळश्यांचा राजा

अगदी हाच अनुभव (फक्त नावं आणि जागा बदलून) आम्हा नवरा-बायकोला आला होता. आश्चर्य वाटण्याइतका समान.

मजेशीर लिहिलाय!

आळश्यांचा राजा

डॉ.श्रीराम दिवटे's picture

24 May 2010 - 8:01 pm | डॉ.श्रीराम दिवटे

झक्कास!
आज हा लेख लिहितांना तुम्हांला किँवा आज आम्ही वाचतांना मौज वाटतेय खरी परंतु त्यावेळी तुम्हांला काय काय तणावांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पना करवत नाही.
असो. बऱ्‍याच दिवसांनी अभिनय कुलकर्णीँचे लिखाण वाचावयास मिळाले. मिपाच्या वाचकांतर्फे शुभेच्छा!

प्राजु's picture

24 May 2010 - 8:13 pm | प्राजु

मस्त लेख!!
म्हणतात ना..."सुंठ घासत खापरी येते कामी.. दुनियेत रिकामी वस्तू नाही."
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शिल्पा ब's picture

24 May 2010 - 10:20 pm | शिल्पा ब

अय्या!!!! तुला कशा इतक्या म्हणी माहिती गं ;;) ....बाकी भोचाकरावांचा अनुभव भारीच...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पिंगू's picture

24 May 2010 - 8:13 pm | पिंगू

सरकारी कागदपत्रे गोळा करताना काय धावाधाव होते ती ज्याने त्याने अनुभवाविच.. मला तरी आठवते की जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवतानाही असेच नाकी नउ आले होते आणि सरकारी नोकर म्हणजे बर्याचदा तरी आळसाचा कळस.

पासपॉर्ट काढतांना मला देखिल असाच अनुभव आला.....

सहकारी बॅंकेच्या पासबूकावर तर ते विश्वास ठेवेनात.

अन अचानक एम. एस .सी .आय. टी. च्या प्रमाणपत्राची मदत झाली......

__//\\__ सरकारी खात्त्याला साष्टांग दंडवत.....

मदनबाण's picture

24 May 2010 - 10:13 pm | मदनबाण

वेगळाच अनुभव !!! :)

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

मस्त कलंदर's picture

24 May 2010 - 10:51 pm | मस्त कलंदर

मस्त अनुभव घेतलात हो सर्कारी खात्याचा...
या बाबतीत मी थोडी लकी आहे... असली कागदपत्रे वाली कामे फटाफट होतात.. मुळात अशा ठिकाणी चेहर्‍यावर अंमळ जास्तच इनोसन्स :). (इतर वेळी उंची कमी असल्याचे वैषम्य यावेळी कुठल्याकुठे पळून जाते) नि सगळ्यांशी मराठीत व्यवहार इतके केले, की मुंबईत सगळं होतं..

(कसलीही चिरीमिरी न देता स्वत:च स्वतःची सगळी कागदपत्रे जमवलेली) मस्त कलंदर

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब's picture

24 May 2010 - 11:08 pm | शिल्पा ब

मला तर बाई असेच अनुभव जास्त...मराठीत बोला नाहीतर इंग्रजीत कोणीच लक्ष देत नाही... मुळात अशा ठिकाणी चेहर्‍यावर अंमळ जास्तच इनोसन्स ठेवताच येत नाही :-( (इतर वेळी उंची जास्त असल्याचा आनंद यावेळी कुठल्याकुठे पळून जातो), नि सगळ्यांशी मराठीत व्यवहार केले, की मुंबईत कामच नाही होत..

( चिरीमिरी देऊन कागदपत्र न जमवता आल्याने लिंबू मिरची बांधून फिरत असलेली ) भिस्त जालिंदर
विस्कटलेल घर हि संगणक चालू असल्याची खुण आहे !!!!

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मस्त कलंदर's picture

24 May 2010 - 11:53 pm | मस्त कलंदर

प्रतिसाद संपादित.
वैयक्तिक चर्चा खरडवहीतून करावी.
धन्यवाद.

मराठमोळा's picture

25 May 2010 - 1:27 am | मराठमोळा

छान अनुभव कथन, शैलीही चांगली. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अनिवासि's picture

25 May 2010 - 4:47 am | अनिवासि

मिपावर माझी पहिली प्रतिक्रिया.
५२ सालची गोश्त. interला S.P. त होतो. काहि कारणाने कालेज सोडावे लगले आणि म्हणुन I.D. card मीळाले नव्ह्ते. तेथल्या post office मध्ये थोडे पैसे होते ते परत मिळवण्यासाठि गेलो. collegeच्या I.D. शिवाय पैसे नाहित.- इति वदन्ति बालिका.
परदेशात जाणार होतो म्हणुन passport काडला होता तो दाखवला. उपयोग नाहि. i.d. कार्ड आणा अथवा ओळ खिचे कोणितरि आणा - इति बालिका!
समोरच त्यावेळी एक वाचनालय - विवेक वाचनालय होते. तेथे बसणारा मुलगा- मामा घोले माझा मित्र आणि बालिकेने त्याला अनेक वेळा पाहिलेले असणार म्हणुन त्याला बोलविले - मी ह्याना ओळ खत नाहि- पैसे मिळ्णार नाहित. फक्त १०/१५ रुपयेच होते - नाद सोडून दिला.
थोड्क्यात असा आडमुठेपणा नवीन नाहि.
१५-२० वर्स्।नि भारतात आलो असताना पोस्टातिल एक मोठे अधिकारी भेटले त्याना हा किस्सा सान्गितला. एक महिन्यनि त्यानि तपास करुन पैसे आणुन दिले
पहिलि प्रतिक्रिया आणि टन्कलेखनाचा पहिला प्रयोग- चुक्भुल देणेघेणे.

गोगोल's picture

25 May 2010 - 9:18 am | गोगोल

५२ सालचे पर्देशातले अनुभव वाचायला आवड्तील.
असो...मिपाच्या परीवार्रातर्फे शुभेच्छा!

भडकमकर मास्तर's picture

25 May 2010 - 9:58 am | भडकमकर मास्तर

हेच म्हण्तो... ५२ सालचे परदेशातले अनुभव लिहाच

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 9:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंटरेस्टींग. तुमचे अनुभव जरूर लिहा. टंकलेखन सवयीने व्यवस्थित जमेल.

अदिती

Nile's picture

25 May 2010 - 5:22 am | Nile

चार माहित असलेल्या नियमात बसत नाही की जमणार नाही म्हणण्याचा नेहमीचा अनुभव! आम्ही पासपोर्ट कसा मिळवला हे सांगत नाही, परत घेतील ते सांगितलं तर. ;)

-Nile

अरुण मनोहर's picture

25 May 2010 - 12:52 pm | अरुण मनोहर

पोस्टात पेन्शन घेण्यासाठी "जिवंत असल्याचा दाखला" आणायला सांगतात, त्याची मजा वाटत आलेली आहे. जरी स्वतः अगदी फोटो आय डी घेऊन गेले, तरी डॉक्टर ने कागदावर लिहून दिलेले असले पाहीजे, की ही व्यक्ती जिवंत आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बँकेतपण हेच प्रकार! मी पॅन कार्ड, पासपोर्ट इ.इ. फोटो-आयडी दाखवले, उत्तर एकच "चालत नाही"; पण एक फॉर्म भरून दिला आणि आपण जिवंत आहोत याची जबाबदारी आपण घेतली की पेन्शन मिळतं.

अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2010 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारी कारभार कसे असतात त्याबद्दलचा स्सही अनुभव...!

-दिलीप बिरुटे

आनंद घारे's picture

25 May 2010 - 7:46 pm | आनंद घारे

अनेक लोक बँकेत खोटे अकाउंट उघडून लांड्या लबाड्या करू लागले, खोट्या नावाने प्रवास करू लागले, खोट्या नावावर मोबाइल फोन घेऊन त्याचा उपयोग दहशतवादी कृत्यांसाठी करू लागले वगैरे कारणांमुळे फोटो आयडीची मागणी करायला सुरुवात झाली. सरकारी तसेच खाजगी आस्थापनांनासुध्दा त्याची अंमलबजावणी करावी लागतेच. ईतिकीट असेल तर भारतातील तसेच अमेरिकेतील खाजगी विमान कंपनीसुद्धा फोटो आयडीशिवाय विमानात प्रवेश करू देत नाही याचा अनुभाव मी घेतलेला आहे. यामुळे कांही लोकांना सुरुवातीला त्रास होणारच, पण सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की नियम बनवण्याचे अधिकार मर्यादित लोकांनाच असतात, इतरांनी ते पाळायचे असतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

भोचक's picture

26 May 2010 - 10:59 am | भोचक

घारे साहेब माझा सरकारवर अजिबात राग नाही. फक्त फोटो आयडेंटीटी पुरावा म्हणून काय ग्राह्य धरावे यासंदर्भात सरकारी बिनडोकपणाचा राग आहे. माझ्याकडे विवाह नोंदणी सर्टफिकिट आहे, ज्यावर आम्हा दोघांचे फोटो आहेत. शिवाय आमचे अस्तित्व सिद्ध करणारे पुरावे देऊन सरकारनेच ते आम्हाला त्यांच्या निमशासकीय संस्थेकडून (महापालिका) दिलेले आहे. असे असताना तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही आणि कुठल्याशा शिक्षण संस्थेचे (जिला बाजारात फारशी किंमत नाही.) सर्टफिकिट केवळ त्यावर फोटो आहे, म्हणून ओळखपत्र म्हणून ग्राह्य कसे काय धरता येऊ शकते? उद्या खोट्यानाट्या शिक्षण संस्थेच्या नावावर कोणीही फोटो आयडेंटीटी प्रूफ तयार करू शकतो. विवाह नोंदणीनंतर माझी मालमत्ता बायकोच्या नावावर होण्याच मार्ग बर्‍यापैकी मोकळा होतो. तो इतका महत्त्वाचा पुरावा असेल तर बॅंक अकाऊंट, पॅन कार्ड याला तो का चालत नाही? हा माझा सवाल आहे. विशेष म्हणजे पॅन कार्डसाठी शाळेचा दाखला, दहावी, बारावीचं मार्कशीटही चालतं. पण त्याच्यावर फोटो नसतो. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर सरकारी यंत्रणेकडे उत्तर नाही. काही वर्षांपू्र्वीपर्यंत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसायचे. आता आहेत, तर त्याचा उपयोग फोटो आयडेंटीटी प्रूफ म्हणून करायला काय हरकत आहे?

बाकी सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.

@ अनिवासीः तुमचे पन्नास-साठीच्या दशकातले परदेशातले अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. नक्कीच आवडतील.

(भोचक)
जाणे अज मी अजर

आनंद घारे's picture

26 May 2010 - 5:58 pm | आनंद घारे

काही वर्षांपू्र्वीपर्यंत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसायचे. आता आहेत, तर त्याचा उपयोग फोटो आयडेंटीटी प्रूफ म्हणून करायला काय हरकत आहे?
हरकत नाही, पण? हे ठरवण्याचे अधिकार लहान कर्मचार्‍यांना देता येत नाहीत. अलीकडे असे छायाचित्र असते ( सर्व राज्यांमध्ये असते का?) ही गोष्ट ज्या वेळी नियम करणार्यांच्या ध्यानात येईल, तेंव्हा ते याचा समावेश करतील. अशा प्रकारचे नियम रोज बदलले जात नाहीत.
शाळा, कॉलेज, ऑफीस वगैरेंच्या दाखल्यावर फोटो असतील किंवा नसतीलही. असले तरी मुख्याध्यापक, प्रिन्सिपाल किंवा मॅनेजर त्या माणसाचा चेहरा पाहूनव्ह त्यावर सही करत असेल असे वाटत नाही. पण फोटो आयडी मिळण्यासाठी काही तरी सोय असावी म्हणून अशी प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जातात. अशिक्षित आणि नोकरी न करणार्‍या लोकांची खरोखरच खूप पंचाईत होते यात शंका नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

अरुंधती's picture

25 May 2010 - 9:03 pm | अरुंधती

धमाल अनुभव! सरकारी यंत्रणा, कारभार अनेकदा किचकट, रेंगाळणारा आणि कागदी घोडे नाचवणारा होतो तो असा.... पण हेच कोणी ''थोरा-मोठ्या'' घरचे सुपुत्र-सुपुत्री असतील तर....???? तर चित्र वेगळे असते भाऊ! मग घरपोच सर्व्हिस! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अनिवासि's picture

27 May 2010 - 12:52 am | अनिवासि

सर्वाच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
अनुभव खुपच आहेत. काहि लिहुनहि तयार आहेत. फक्त टन्कलेखनाचि सवय होउ दे मग लिहितो. ह्या दोन वाक्याला १० मीनिटे लागली आणि अजुन अनुस्वार सापडत नाहि!
पण हे सन्केतस्थळ सापडले ह्याचा आनन्द झाला. एका दिवाळी अन्कात श्री . अभ्यन्कराच्य लेखाच्या शेवटि माहिती होती.
मरांठी अजुन बरे आहे पण शुध्हलेखनाच्या नावाने बोम्ब!