टाकून द्या ह्या वंगाळ सवयी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Apr 2010 - 10:07 pm

टाकून द्या ह्या वंगाळ सवयी

(सरकारी झैरातीत असल्या कविता असतात का?)

दारू पिवून शरीराचा नाश तुमी का करता मला समजत नाही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||धृ||

दारूमुळं सौंसाराची धुळधाण होई,
तिला सोडाया नका करू पण परंतू
उगा आजार लावून घ्याल,
सांगा माझं म्हनन खरं आहे का नाही?
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||१||

असलीच सवय हाये पान तंबाकूची,
अन त्ये खावून जागीच थुंकायची
दुसरं कायतरी काम करा,
उगा म्हनं तंबाकूबिगर येळ माजा जात नाही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||२||

पाहून राहिली मी तुमी खोकताय मघापासनं,
का सिग्रेटी पिता निसतं मग तुम्ही ओ पाव्हनं
काळजी वाटतीया म्हनून सांगतीया,
करू नका इस्पितळात जायची घाई
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||३||

{{ ह्ये आताच पहा मोबाईल वाजला तुमचा किती मोठ्यानं,
झोपलेली दचकून जागी व्हतील त्याच्या रिंगटोनीनं
रिंगटोन बदला नायतर आवाज शांत ठेवा
ऐकताय का माझं तुमी काही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी }} ||४||

कवन ऐकवीते रसिक जनांना करूनी वंदन,
तुम्हास सांगते द्या मज अनुमोदन,
जीवनमान सुधराया,
चांगल्या सवयी अंगी बाणवा बाई
टाकून द्या ह्या वंगाळ सवयी, लावून घेता कशापायी ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०४/२०१०

शांतरसकविताजीवनमान