चारशे रुपायांची खुर्ची!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
20 Mar 2008 - 2:02 am

राम राम मंडळी,

आज सहजच पुण्याला अण्णांची ख्यालीखुशाली विचारणारा फोन केला आणि अण्णांची तब्येत ठीक नसल्याचं कळलं. बेचैन होऊन स्वत:च्याच विचारात गढलो असताना अचानक एक जुना प्रसंग डोळ्यासमोर आला आणि मी एकदम १५-२० वर्ष मागे गेलो. अण्णांची एक लहानशीच परंतु छानशी आठवण मनात ताजी झाली!

अभिजात संगीताची जिथे गंगा वहाते ते ठिकाण म्हणजे पुण्यात दरवर्षी साजरा होणारा सवाईगंधर्व संगीत महोत्सव. आमच्या अण्णांनी (स्वरभास्कर पं भीमसेन जोशी) हे रोपटे १९५२ साली लावले आणि आज तयाचा वेलू अक्षरश: गगनावेरी गेला आहे, हे वेगळे सांगायला नको. आजही अनेक लहानमोठ्या कलाकारांची एकदा तरी सवाईगंधर्व महोत्सवात आपली कला सादर करावी अशी आवर्जून इच्छा असते.

मंडळी, सवाईगंधर्व महोत्सवाचं आणि माझं फार जुनं नातं आहे. संगीताची श्रवणभक्ती करणार्‍या माझ्यासारख्या अनेकांकरता त्या सवाईच्या तीन रात्री म्हणजे अक्षरश: पर्वणीच! त्यातशिवाय माझ्या मानसगुरू अण्णांनी हा महोत्सव सुरू केला असल्यामुळे मला त्याबद्दल विशेष प्रेम.

अहो नांवं तरी कुणाकुणाची घेऊ? आजपर्यंत अनेकांचं उत्तम गायन आणि वादन अगदी मनसोक्तपणे सवाईत ऐकायला मिळालं हे माझं भाग्य! प्रत्येक वेळेस एका स्वर्गीय तृप्तीचा अनुभव घेऊन, तीन रात्री ऐकलेलं गाणंवाजवणं कानात साठवूनच पुण्याहून परतलो! आणि दरवर्षी तिसर्‍या दिवशी सर्वात शेवटी साक्षात अण्णांनी आपल्या गुरुजींकरता बांधलेली ती स्वरांची पूजा! अण्णांचं ते प्रसादरुपी गाणं ऐकून दरवर्षी हरिद्वारच्या गंगेत स्नान केल्याचं पुण्य गेली अनेक वर्ष लाभलं या परिस दुसरं भाग्य ते काय?

अत्यंत सुरेल झंकारणारे ते चार तानपुरे आणि त्या मधोमध शंकराचार्यांनी प्रसाद म्हणून दिलेली शाल मांडीवर घेऊन नादब्रह्माच्या पुजेस बसलेला तो स्वरभास्कर जेव्हा चार तंबोर्‍यांच्या गुंजारवाशी तंतोतंत मिळताजुळता असा दमदार, कसदार षड्ज लावतो तेव्हा ती हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या दुनियेतली ती एक अलैकिक घटना असते. आकाशी उगवलेला तो भास्करदेखील क्षणभर पृथ्वीवरील आपल्या बंधुराजाचं ते स्वर्गीय गाणं ऐकण्याकरता थांबतो!!

असो!

सवाईत ऐकलेल्या काही मैफली, आठवणी इतक्या सुरेख आहेत की त्याबद्दल एक लेखमालाच लिहावी लागेल. लिहीन सवडीने केव्हातरी.. त्यातलीच एक गंमतीशीर आठवण आज इथे सांगणार आहे...

नक्की वर्ष आठवत नाही, परंतु १९८८-८९ चा सुमार असावा. काही कामानिमित्त पुण्याला गेलो असताना येता येता आठच दिवसांवर येऊन ठेपलेल्या सवाईगंधर्व महोत्सवाचं तिकिट घेऊनच ठाण्याला परतलो होतो. सवाईत तेव्हा तीन दिवसाच्या खुर्चीचा सिजन तिकिटचा दर असे ४०० रुपये आणि भारतीय बैठकीचा दर असे ८० रुपये. मी मस्तपैकी चारशे रुपये देऊन बेहेरे आंबेवाल्याकडून जरा बर्‍यापैकी पुढे जागा असलेल्या खुर्चीचं तिकिट पदरात पाडून घेतलं होतं! (खुर्ची क्रमांक २५, माझ्या आजही लक्षात आहे!)

सवाईगंधर्व महोत्सवाचा दिवस उजाडला. सकाळी ठाण्याहून निघालो, दुपारी पुण्यात पोहोचलो. संध्याकाळी मस्तपैकी जेवून, पान चघळत चघळत कार्यक्रमाकरता निघालो! आता तीन दिवस अगदी भरपूर गाणं ऐकायला मिळणार म्हणून आमची स्वारी एकदम खुशीत होती! रमणबागेच्या मैदानात सवाईचा मंडप उभारला होता. मुख्य प्रवेश दारापाशी पोहोचलो.

"तिकिट?" द्वारपालाने सवाल केला.

मी हसत हसत खिशात हात घातला. बघतो तर तिकिट नाही! सगळे खिसे पुन्हा एकदा तपासले! तिकिटाचा पत्ता नाही! बहुतेक पुण्यात ज्या घरी उतरलो होतो तिथेच विसरलो असेन म्हणून पुन्हा रिक्षा पकडून घर गाठलं. तिथेही सगळी शोधाशोध केली! कुठेही तिकिटाचा पत्ता नाही!

'च्यायला! आता करायचं काय?' या विचारात घरी ठाण्याला आमच्या मातोश्रींना फोन लावला!

"अरे असा कसा रे वेंधळा तू? तिकिट तर इथे ठाण्यालाच विसरला आहेस!" फोनवर मातोश्री वदल्या!

"बरं, बघतो मी काय करायचं ते!" असं म्हणून फोन ठेवला आणि पुन्हा रिक्षा करून मंडप गाठला. तो मगासचाच द्वारपाल मिशीला पीळ भरत तिथे उभा होता.

"नमस्कार साहेब! मी या कार्यक्रमाकरता खास ठाण्याहून आलोय!" मी.

"बरं मग? त्यात काय विशेष? अहो इथे तर परदेशातूनही लोक येतात. हॅ हॅ हॅ हॅ!" असे दात विचकत द्वारपालाने मला पुन्हा उडवून लावला!

"हो, तेही बरोबरच आहे म्हणा. पण साहेब, माझा एक प्रॉब्लेम झालाय. मी खुर्चीचं तिकिट काढलं होतं आणि ते नेमकं मी ठाण्यालाच विसरलोय!"

"बरं मग?"

"नाही, म्हणजे आता कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झाली आहे. आणि आता ठाण्याला जाऊन तिकिट घेऊन येणं काही शक्य नाही. बरं, खुर्च्यांची सगळी तिकिटंही आता संपली आहेत आणि भारतीय बैठकीचं तिकिट काढायचं म्हणजे, ती पाहा किती लंबच लांब रांग आहे! आणि अहो एवढं करून एकदम मागची कुठली तरी जागा मिळणार!"

मी माझा सगळा त्रागा त्याला एकदम बोलून दाखवला!

"हे पाहा, मला दुसरंतिसरं काही सांगू नका. तिकिट दाखवा आणि आत जा पाहू कसे! अशी तिकिटं हरवल्याच्या/विसरल्याच्या थापा अनेक जण मारतात!" एव्हाना त्या द्वारपालातला पुणेकर जागा झाला होता!

"म्हणजे? मी थापा मारतोय असं तुम्हाला म्हणायचंय की काय?!" मी जोरात ओरडलोच त्याच्या अंगावर. साला आता आपली पण सटकली होती!

"थापा मारताय की नाही, ते मला काय माहीत? नसाल सुद्धा मारत! तिकिट दाखवा, तरच तुम्हाला आत सोडतो. नाहीतर तो तिथे बंदोबस्ताचा पोलिस उभा आहे. 'हा माणूस इथे दंगा आणि गुंडगिरी करतोय' असं सांगून सरळ मी तुम्हाला त्याच्या ताब्यात देईन!"

पुणेकर द्वारपालाने आता कायद्याची भाषा सुरू केली! :)

"हे बघा साहेब, माझा आसन क्रमांक २५ आहे. आता थोड्याच वेळात सगळ्या खुर्च्यांवर ती ती माणसं येऊन बसतील. फक्त २५ क्रमांकाची खुर्ची तेवढी रिकामी राहील, कारण ती माझी आहे! माझ्याशिवाय त्या खुर्चीवर दुसरं कुणीच बसायला येणार नाही. तेव्हा प्लीज मला आत सोडा की साहेब! वाटल्यास आपण जरा वेळ वाट पाहू आणि मग मी त्या २५ क्रमांकाच्या रिकाम्या खुर्चीत जाऊन बसेन! मग तर झालं?"

"हे पहा, मला असल्या ५६ सबबी सांगू नका. मला तुमचं काही एक ऐकायचं नाही!"

छ्या! हा द्वारपाल काही केल्या ऐकायलाच तयार नव्हता. वर पुन्हा मला पोलिसच्या ताब्यात द्यायला तयार होता. त्याचं एकच म्हणणं होतं, 'तिकिट दाखवा आणि आत जा'! मला त्याही परिस्थितीत त्याचं कौतुक वाटलं! तो बापडा आपलं काम अगदी चोखपणे बजावत होता!

"अरे पण माझं काय? मी काय आता तीन दिवस पुण्यात नुसताच बोंबलत बसू की काय?"

आता माझीही विचारचक्र सुरू झाली होती!

तरीही मला काय करावं ते कळेना. तसे सुदैवाने माझ्या ओळखीचे काही गायक-वादक कलाकार होते. त्यापैकी एखाद्याचं शेपूट धरून मी आतही घुसू शकत होतो. पण बसणार कुठे? आणि का म्हणून? बरं आज एक वेळ सोय होईल परंतु उद्या आणि परवा पुन्हा हाच प्रकार करायला लागणार होता! तीन दिवसांच्या सिजन तिकिटाकरता चांगले ४०० रुपये खर्च केले असताना मी असं आतमध्ये मंडपात कुणाच्या तरी ओळखीने, चोरट्यासारखं इथे तिथे का बसावं?

रात्रीचे ९ वाजत आलेले होते आणि कार्यक्रम सुरू होणार होता.

शेवटी मी एक अखेरचा आणि जालिम उपाय करायचं ठरवलं! सगळे उपाय थकले तरी माझ्या भात्यात एक ब्रह्मास्त्र होतं! मी तेच वापरायचं ठरवलं!

"रिक्षा...!" मी हाक मारली.

मी पुन्हा एकदा रिक्षात बसलो. "अरे बाबा, नव्या पेठेत जायचंय. कॉलनी नर्सिंग होमच्या जवळ. कलाश्री बंगला!!"

पाच दहा मिनिटातच आमची रिक्षा कलाश्री बंगल्यापाशी पोहोचली!

"अण्णा आहेत का? जरा भेटायचं होतं, थोडं काम होतं!" पुन्हा एकदा बंगल्याबाहेरच्या द्वारपालाशी गाठ! परंतु इथे तिकिट नसल्यामुळे त्याने मला आत सोडलं!

मी दबक्या पायाने बंगल्याच्या आतील प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचलो! समोरच माझं दैवत, स्वरभास्कर बसले होते. निवांतपणे पान जमवणं चाललं होतं. तेही कार्यक्रमाला निघायच्याच तयारीत होते!

"या! काय म्हणता मुंबईकर? सवाईकरता आलात वाटतं!" अण्णांनी प्रसन्न मुद्रेने सवाल केला.

मी आता दिवाणखान्यात शिरलो, नेहमीप्रमाणे अण्णांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला!

"अण्णा, आपल्याकडे जरा एक काम होतं! थोडीशी जरा पंचाईतच झाली आहे!"

मी तिकिट विसरण्याचा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि त्यामुळे द्वारपाल मंडपात सोडत नाही, असं त्यांना सांगितलं!

"अरेच्या! एवढंच ना? तुम्ही व्हा पुढे आणि मंडपाच्या दुसर्‍या दाराशी थांबा. मीही आता तिकडेच निघालो आहे! नाहीतर श्रीकांत देशपांडेंना (सवाईगंधर्वांचे नातू!) भेटा आणि मी पाठवलंय म्हणून सांगा. ते तुमची व्यवस्था करतील!"

चला काम झालं. आपण एकदम खुश! मंडळी, सवाईगंधर्व संगीत महोत्सव म्हणजे आमची पंढरीची वारी! परंतु त्या वर्षी वारीच्या सुरवातीलाच विठोबाचं दर्शन होण्याचा योग होता!

अण्णांचा निरोप घेऊन मी तिथून पुन्हा मंडपापाशी आलो. दुसर्‍या दरवाज्यापाशी गेलो. इकडेतिकडे पाहिलं परंतु त्या गर्दीत श्रीकांत देशपांडे कुठेच दिसेनात!

मी पुन्हा आपला पावसात भिजलेल्या, बावरलेल्या कुत्र्याच्या पिलासारखा तिथेच जरा वेळ उभा राहिलो. कार्यक्रम तर सुरू झाला होता. अगदी दयनीय, रडवेली अवस्था झाली होती माझी! :)

परंतु मला फार वेळ वाट पाहावी लागली नाही! थोड्याच वेळात तिथे अण्णांची गाडी आली. तितून अण्णा, वत्सलावहिनी उतरल्या. "अण्णा आले, अण्णा आले!" असं म्हणून त्यांच्या गाडीभोवती चाहत्यांची, कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. अण्णा लोकांचे नमस्कार-चमत्कार स्विकारत त्या गर्दीतून वाट काढत मंडपात जाऊ लागले!

'पण माझं काय??'

मी पुन्हा आपला लोचटासारखा त्यांना सामोरा गेलो!

"अरेच्च्या! तुम्ही अजून बाहेरच? चला माझ्यासोबत आत!"

अण्णांचे एवढे शब्द कानी पडले आणि आपली कॉलर एकदम कडक झाली! आता मला कुठलाच द्वारपाल अडवणार नव्हता!कारण आता मी हिंदुस्थानी संगीताच्या बादशहासोबत होतो! :)

सर्वात पुढे असलेल्या कोचावर अण्णा आणि वत्सलाताई विराजमान झाले!

"आणा पाहून बोलावून त्या द्वारपालाला! मी सांगतो त्याला!"

साला, आपली कॉलर पुन्हा एकदा टाईट! मी आता पुन्हा मंडपाच्या आतल्या बाजूने पहिल्या प्रवेशद्वारापाशी गेलो आणि माझी व त्या द्वारपालाची नजरभेट झाली, गाठ पडली!

"ऑ?? तुम्ही आत कसे काय? चला बाहेर व्हा पाहू!" तो मोठ्ठ्याने खेकसलाच माझ्या अंगावर!

"मी बाहेर होतो, परंतु त्या आधी तुम्हाला जरा अण्णांनी आत बोलावलंय. अण्णा आत बसले आहेत. आत्ताच आले आहेत!" मी.

??

आता तो द्वारपाल चकित होऊन माझ्याकडे पाहू लागला आणि चुपचाप माझ्या मागनं आत येऊ लागला! :)

दोन मिनिटातच पुन्हा आम्ही अण्णांपाशी पोहोचलो!

"काय देशमूख कसं काय?" अण्णांनी आता त्याची चौकशी केली.

"मी ठीक आहे अण्णा. आत्ताच आलात वाटतं!" असं म्हणून त्याने हसून अभिवादम केलं.

"हे पाहा, हे आमचे मुंबईचे पाहुणे आहेत. त्यांचं तिकिट ते घरी विसरले आहेत. त्यांना जरा चांगल्या जागी बसवा!"

स्वरभास्करांचं फर्मान निघालं!

"हो अण्णा, मी बघतो यांची व्यवस्था!" असं म्हणून तो माझ्याकडे वळला. "चला साहेब!"

"बोला कुठे बसताय? अहो आधी नाही का सांगायचं! आता काय तिकिट आणायला मुंबईला थोडंच जाता येणार आहे?!!"

देशमूख द्वारपाल चक्क आता मला समजून घेऊ लागला! :)

"किती नंबरची खुर्ची म्हणालात तुमची?" देशमूख द्वारपालाने अगदी अदबशीरपणे विचारले! आम्ही आता गर्देतून वाट काढत जाऊ लागलो.

"ती पाहा माझी खूर्ची. २१ ते ३० क्रमांच्या लाईनमध्ये डावीकडून पाचवी खूर्ची, जी अजूनही रिकामी दिसत्ये ना? तीच माझी खुर्ची!

"अरे वा वा! छान छान! बसून घ्या, बसून घ्या! आणि उद्या परवा मीच इथे असेन. तेव्हा काळजी करू नका, मी तुम्हाला डायरेक्ट आत सोडेन!" असं म्हणून द्वारपालसाहेब तिथनं निघून गेले!

मंडळी, तो दिवस आणि त्या पुढचे दोन दिवस मी त्या २५ क्रमांकाच्या खुर्चीत बसून अगदी यथास्थित गाणं एन्जॉय केलं. ती खुर्ची मला अण्णांनी दिली होती!

माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....!

--तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

20 Mar 2008 - 2:34 am | चतुरंग

अहो आजकालच्या सत्तेच्या खुर्च्या पटकावण्याच्या संगीतखुर्चीच्या जमान्यात, सवाईगंधर्व महोत्सवातली खरीखुरी संगीतमय खुर्ची तुम्हाला साक्षात स्वरभास्करांकडून मिळाल्यानंतर तुम्हाला सिंहासनावर बसल्यासारखं वाटलं असेल तर नवल नाही!

चतुरंग

व्यंकट's picture

20 Mar 2008 - 5:49 am | व्यंकट

भाग्यवंत आहात.

व्यंकट

धनंजय's picture

20 Mar 2008 - 7:18 am | धनंजय

भाग्यवंत आहात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2008 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाग्यवंत आहात.

प्राजु's picture

27 Mar 2008 - 8:25 am | प्राजु

भाग्यवंतच आहात.. शंकाच नाही..

- (सर्वव्यापी)प्राजु

केशवसुमार's picture

20 Mar 2008 - 9:31 am | केशवसुमार

हा किस्सा तू मागे सांगितला होतास त्या पेक्षा लेखात मस्त रंगवला आहेस..
बाकी चतुरंगशेठशी सहमत..
केशवसुमार

चित्तरंजन भट's picture

20 Mar 2008 - 3:27 pm | चित्तरंजन भट

हा किस्सा तू मागे सांगितला होतास त्या पेक्षा लेखात मस्त रंगवला आहेस..
केशवाशी सहमत आहे !

स्वाती दिनेश's picture

21 Mar 2008 - 1:13 pm | स्वाती दिनेश

चित्त आणि केसु ह्यांच्यासारखेच म्हणते.
स्वाती

प्रमोद देव's picture

20 Mar 2008 - 9:40 am | प्रमोद देव

मी पुन्हा आपला पावसात भिजलेल्या, बावरलेल्या कुत्र्याच्या पिलासारखा तिथेच जरा वेळ उभा राहिलो. कार्यक्रम तर सुरू झाला होता. अगदी दयनीय, रडवेली अवस्था झाली होती माझी! :)

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.छान आठवण आहे.

मनस्वी's picture

20 Mar 2008 - 9:55 am | मनस्वी

ती खुर्ची मला अण्णांनी दिली होती!

माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....!

मस्तच!

भाग्यवंत आहात.

+१

सर्वसाक्षी's picture

20 Mar 2008 - 3:06 pm | सर्वसाक्षी

भाग्यवान आहेस!

धम्मकलाडू's picture

20 Mar 2008 - 3:24 pm | धम्मकलाडू

संपूर्ण प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहिला....उत्तम लेखन..हे सांगायला नकोच.. सर्वसाक्षी म्हणतो तसा खूपच भाग्यवान आहेस, तात्या....

धम्मकलाडू

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Mar 2008 - 4:36 pm | डॉ.प्रसाद दाढे

तात्या तुम्ही खर॑च खूप भाग्यवान आहात, हेवा वाटतो

अमिगो's picture

20 Mar 2008 - 5:14 pm | अमिगो

तुम्ही खर॑च भाग्यवान आहात!

देवदत्त's picture

20 Mar 2008 - 11:06 pm | देवदत्त

खरोखर तात्या, भाग्यवान आहात :)

माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....!
छान एकदम..

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 6:18 am | सुधीर कांदळकर

घ्यावे लागतात महाराज, असे भाग्य लाभायला.

अभिनंदन, धन्यवाद.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 6:12 pm | विसोबा खेचर

संजीव साहेबांच्या विनंतीनुसार त्यांचा इथला प्रतिसाद काढून टाकला आहे, सबब त्याना दिलेले माझे उत्तरही आपोआपच उडाले आहे...

तात्या.

अविनाश ओगले's picture

21 Mar 2008 - 8:29 pm | अविनाश ओगले

लेखन आवडले... खूपच छान.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2008 - 8:37 pm | प्रकाश घाटपांडे

द्वारपाल व तात्या दोघही धन्य पावले.
प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर's picture

26 Mar 2008 - 8:21 pm | प्रभाकर पेठकर

मला तात्यांचा जितका हेवा वाटतो त्याहून अधिक त्या द्वारपालाचे कौतुक वाटते.'खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविनं राई राई एवढ्या' ची आठवण जागृत झाली.

एव्हाना त्या द्वारपालातला पुणेकर जागा झाला होता!

हा हिणकस शेरा अनाठायी वाटतो.

वरदा's picture

26 Mar 2008 - 8:58 pm | वरदा

माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....!

असणारच्....कीती सुंदर लिहिलयत्...

स्वाती महेश's picture

27 Mar 2008 - 7:21 am | स्वाती महेश

अनुभव कथन थोडं पाल्हाळीक असलं तरी चांगल रंगवले आहे. पण तुमची पंडीतजींची ओळख असल्याने तुम्ही त्यांच्या वशील्यावर आत घुसु शकलात त्यात आपले काम चोख बजावणार्‍या त्या द्वारपालाला का बोल देता? ह्या संपुर्ण अनुभवात मला सगळ्यात जास्त हा द्वारपालच भावला. आजकालच्या जगात सगळे वशिले लावुन काम करत असताना कोण आपली जवाबदारी इतकी चोख पार पाडतं? तिकिट घरी विसरलात ही तुमची चुक ना? पंडीतजींनी देखिल तुम्हाला थोडे खडसावयला हवे होते.

विसोबा खेचर's picture

27 Mar 2008 - 7:34 am | विसोबा खेचर

स्वातीजी,

त्यात आपले काम चोख बजावणार्‍या त्या द्वारपालाला का बोल देता?

आपण माझ्या लेखातलं खालील वाक्य पाहावं!

मला त्याही परिस्थितीत त्याचं कौतुक वाटलं! तो बापडा आपलं काम अगदी चोखपणे बजावत होता!

मलादेखील त्या देशमूख द्वारपालाचे कौतुक वाटले असेच मीही लिहिले आहे!

ह्या संपुर्ण अनुभवात मला सगळ्यात जास्त हा द्वारपालच भावला.

का बरं? तो द्वारपाल जर एवढा चोख होता, कुणाचीही भीडभाड बाळगणारा नव्हता, तर त्याने पंडितजींपुढे तरी शेपूट का घातलंन/घालावंन हे सांगा पाहू! का नाही त्याने पंडितजींना तेवढ्याच तेखात चोख उत्तर दिलंन?? सांगा पाहू! :)

तिकिट घरी विसरलात ही तुमची चुक ना?

मान्य! मी ती कुठेही नाकारलेली नाही..

पंडीतजींनी देखिल तुम्हाला थोडे खडसावयला हवे होते.

मला जे करायचं होतं ते मी केलं, द्वारपालाला जे करायचं होतं ते त्याने केलंन, आणि पंडितजींना जे करायचं होतं ते पंडितजींनी केलं! :)

असो.. अभिप्रायाबद्दल धन्यवाद...

आपला,
(पंडितजींचा भक्त!) तात्या.

प्रशांतकवळे's picture

27 Mar 2008 - 10:45 am | प्रशांतकवळे

तात्या, गेल्या जन्मी काय पुण्य केलंत हो, अहो ज्यांचे नुसते नाव घेतल्याने मन भरून येतं, तुम्ही अशा महामानवांच्या सानिध्यात असता.

वाह!

प्रशांत

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 1:40 am | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापसून आभार..

ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार.. :)

तात्या.