पट्टी सामोसा

चकली's picture
चकली in पाककृती
10 Mar 2008 - 10:33 pm

मला खूप आवडणारा पदार्थ : पट्टी सामोसा

साहित्य:

२ वाट्या मैदा
१ वाटी बेसन
मोहन घालायला ४ चमचे तेल
१ ते दिड वाटी मटार
२ बटाटे
३-४ मीरच्या
पाउण वाटी ओले खोबरे
फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लिंबू रस
मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:

१) सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ४-५ चमचे तेल कडकडीत गरम करावे आणि पिठाला मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पिठ घट्टसर मळावे व झाकून ठेवावे.
२) बटाटे सोलून त्याच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी त्यात मटार आणि बटाटे घालून परतावे. मध्यम आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे. बटाटे व मटार शिजले कि त्यात ओले खोबरे, गरम मसाला, मीठ, लिंबू रस घालून ढवळावे.
३) भिजवलेल्या पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पातळसर पोळ्या लाटाव्यात. प्रत्येक पोळी फक्त ४-४ सेकंद भाजावी. अशा प्रकारे पोळ्या भाजून घेतल्याने समोश्यावर फुगवटे कमी येतात.
४) १/२ वाटी कणिक किंवा मैदा घेउन त्याची घट्टसर पेस्ट बनवावी. भाजलेल्या प्रत्येक पोळीचे सुरीने दोन अर्धगोलाकार भाग करावेत. अर्धगोलाच्या दोन बाजू पेस्टने जोडून कोन बनावावा त्यात १-२ चमचे भाजी भरून आधी १ बाजू आत मुडपावी दुसर्या बाजूला पेस्ट लावून ती बाजू दुमडून चिकटवावी . त्रिकोणी समोसे मध्यम आचेवर तळून काढावे.
हे सामोसे चिंचगूळाच्या चटणीबरोबर छान लागतात.

टीप:

१) आवडीनुसार तिखटपणा कमीजास्त करावा.

फोटो

हे ठिकाण

प्रतिक्रिया

वरदा's picture

10 Mar 2008 - 10:55 pm | वरदा

लावण्याऐवजी त्या पुरीचा कोन करुन हातानेच बंद करते मी समोसे...बाकी क्रुती सेम्...मस्त गरम गरम खावेसे वाट्टायत...

चकली's picture

10 Mar 2008 - 10:56 pm | चकली

समोश्या विषयी माहीती इथे वाचायला मिळेल. समोसा/ सामोसा हा शब्द कसा आला असावा म्हणून गूगलींग केलं तेव्हा हे सापडले

दुवा

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

11 Mar 2008 - 12:12 am | प्राजु

मग याला पट्टीचे समोसे का म्हणतात? माझी समजूत होती की, पोळपाटावर मोठी पोळी लाटून त्याच्या पट्ट्या कापायच्या आणि सुरुवातीला भाजी भरून उरलेली पट्टी त्रिकोणी घडी घालत समोसे बनवायचे ... म्हणजे माझ्या या कल्पनेला सुरूंग लागला.. :)
बाकी इतर समोसे सुद्धा ती पोळी मधोमध कापूनच बनवत होते मी. पण पट्टीचे समोसे .. जरा अवघड वाटत होते.. आता नक्की करून बघेन.

कृती एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु

'पट्टीचे' असतात त्यामुळे ह्याला पट्टीचे सामोसे म्हणत असावेत!!:)

चतुरंग

प्राजु's picture

11 Mar 2008 - 12:28 am | प्राजु

करणारे माझ्यासारखे असतिल तर काय उपयोग.. मी नुसतेच पट्टीची खाणारी...
- (सर्वव्यापी)प्राजु

आवांतर : चतुरंग, विनोद आवडला.

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 1:22 am | स्वाती राजेश

भिजवलेल्या पीठाच्या पोळ्या करताना...

प्रथम एक पीठाची गोळी घेऊन त्याची छोटी पुरी लाटावी. त्या पुरीला तेल लावावे व त्यावर तांदळाची पीठी लावावी.
दुसरी गोळी घेऊन तेवढीच पुरी लाटून त्या पुरीवर ठेवावी. दोन्ही पुर्‍या एकत्रितपणे फुलक्या एवढ्या लाटाव्यात.

तव्यावर मंद भाजावी (चकलीने सांगितल्याप्रमाणे) डाग पडू देउ नयेत.
गरम असतानाच त्याचे सुरीने अर्धे २ भाग करावे. त्या भागाचे २-२ भाग करावेत कारण २ पुर्‍या तेलाने चिकटवल्यामूळे सहज वेगळे वेगळे भाग होतात. म्हणजे एकूण ४ अर्धे भाग होतात.

सारण भरेपर्यंत ओल्या फडक्याखाली ठेवाव्यात.पोळी न भाजलेल्या भागात सारण भरून तळतात.

हे सामोसे नेहमी सामोसे करतो त्यापेक्षा छोटे करतात त्यामुळे एका पोळीचे छोटे छोटे भाग पट्टीसारखे दिसतात म्हणून याला पट्टीचे सामोसे म्हणत असतील असा माझा अंदाज......

टीपः पट्ट्या अदल्यादिवशी करून फ्रिजमध्ये एअर टाईट डब्यात ठेवाव्या व दुसर्‍या दिवशी सारण भरून सामोसे करावेत.

चकली's picture

11 Mar 2008 - 9:28 pm | चकली

स्वाती,

उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ! यामुळे पट्टि सामोसा आणि साधा सामोसा यातला फरक समजला. पुढ्च्यावेळी तू सांगितलेस तसे करून बघेन!

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

11 Mar 2008 - 1:29 am | प्राजु

आत्ताच मी " हे नेहमिच्या समोस्यांप्रमाणेच करायचे " या निष्कर्षाला आले होते. त्यात आता ही वेगळीच कृती तू दिलीस. म्हणजे मला सांग, एका पोळीचे नक्की किती भाग होतात. चतकोर असे ४ का? आणि मग त्यात सारण भरायचे का? आणि त्या एकावर एक ठेवून का लाटायच्या? आणि कापताना दोन्ही एकत्रच कापायच्या का? आणि सारण भरताना डबल लेयर मध्ये भरायचे का? छे किती हे प्रश्न....
- (प्रचंड गोंधळेली)प्राजु

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 1:49 am | स्वाती राजेश

१.प्रथम २ छोटे पीठाचे गोळे घे.
२.पुरीएवढे दोन्ही लाट.
३.एकावर तेल लाव व तांदळाचे पीठ भुरभुरव.
४.दोन्ही पुर्‍या एकमेकांवर ठेऊन फुलक्याएवढ्या लाट.
५.मंद पांढर्‍या भाज.काळे डाग पडून देऊ नकोस.
६.प्रथम ती अर्धी कर म्हणजे भाकरी सारखे त्याचे पदर सुटलेले दिसतील.
७. ते पदर वेगळे वेगळे कर म्हणजे तुझ्याकडे अर्ध्या अर्ध्या ४ फुलक्या झाल्या.
८.त्या फुलक्या च्या आतील म्हणजे न भाजलेल्या भागात सारण घालून तळणे.

कळले नसेल तर आणखी डिटेल्स देऊ का?

प्राजु's picture

11 Mar 2008 - 2:00 am | प्राजु

हे अगदी नीट समजलं.. आत करेन्...फार डोकं खाल्लं का ग मी तुझं??
धन्यवाद.. :)स्वाती.

- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 2:08 am | स्वाती राजेश

मला आवडते...जर कुणी विचारले (कुकींग) तर कारण मी सुद्धा असेच कुणाचे तरी डोके खाल्ले असेन ना?:))))
त्याची ही फळे आहेत म्हणजे तू डोके खातेस ही फळे नव्हेत, मला चांगले पदार्थ येतात ही फळे.

प्राजु's picture

11 Mar 2008 - 2:11 am | प्राजु

धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु

आपला आभि's picture

11 Mar 2008 - 6:14 am | आपला आभि

बरेच काही काही वाचलं... पण एवढच कळल की पदार्थ खातानाच नव्हे तर पाककृती वाचताना सुद्धा जीभेला चव जाणवते..
कुठल्या हाटिलात मिळतात हो हे सामुसे .. जाउन खायला बरे.. आम्ही बनवायला जाव तर सामोस्याचा बटाटे वडा व्हायचा... हॅ हॅ हॅ...
मि पा भगिनी वर्ग येकदम 'form' मध्ये...

आपला खादाड आणि आळशी (by default)
आआआभि

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 4:24 pm | विसोबा खेचर

सामोश्यांची चर्चा छान सुरू आहे...:)

चकली, तुला धन्यवाद..

तात्या.

सोनम's picture

18 Jul 2009 - 8:07 pm | सोनम

पट्टीचे समोसे छान आहेत. करुन पाहिले पाहिजे. :) :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"