येई येई गा मुकुंदा | जगज्जीवन परमानंदा |
आम्ही तुझ्या नामछंदा | वेडावलो ||
तुझिया मायेपासून राही | जगी ऐसे काही नाही |
भक्त तुझा सावध पाही | माया मोहा ||
भवसागरी अफाट जळ | काम लोभाचे नित्य खेळ |
तरण्या यातून द्यावे बळ | आम्हा लागी ||
हवेपणाची हाव तोडी | नकोपणाही तैसा सांडी |
नाम किर्तना करुनी होडी | तरावया ||
नाम तुझे जपे मुख | सदा होय जिव्हे सुख |
डोळीयाना होय दुःख | अपार की ||
जिव्हे तुजला मिळतो हरी | नामजपे या संगत करी |
वंचित आहो आम्ही परी | दर्शनासी ||
घेत नाम देव राया | धरुनी संता तरेन माया |
परि या नेत्रा सुखी कराया | दर्शन देई ||
- सागर लहरी २५.१२.२००९