सेहवागचं काय करायच?

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जनातलं, मनातलं
5 Dec 2009 - 4:58 am

आज सका़ळी मॉर्गनचा हा लेख वाचून आठवलं की आपण मागे एकदा सेहवागबद्दल एक लेख लिहिला होता पण तो मिपावर दिलाच नाहीये !

मी लिहिलेला लेख जुना आहे आणि तपशील त्यावेळच्या सामन्याबद्दल आहेत पण सेहवागचं 'तोडणं' हे स्थळ/काळाच्या पल्याड पोचलंय :)

कालच क्रिकइन्फोवरही सेहवागबद्दल एक छान लेख वाचला. त्यातली खूप आवडलेली दोन वाक्यं इथे देतो आणि मग त्यानंतर माझा लेख.

-- Part of Sehwag would have felt for Sri Lanka (he says he feels sorry for the bowlers when he bats this well)

-- to acknowledge Vijay, who at some other time would have been the story of the day. But when Sehwag bats like he did, you feel sorry for the bowlers, put the other batsmen in the footnote, and move on.

-------------------------------------------------------------------------------------
कसोटी क्रिकेटमधे ३०० धावा .. त्याही फक्त २७८ चेंडूत ! शिवाय एकदा ३०० केल्या आहेतच !

द. आफ्रिकेचे खेळाडू एकच प्रश्न स्वत:ला विचारत असतील – “त्या सेहवागचं काय करायचं?”

सेहवागने मला खोटं ठरवलं आणि मला मनापासून आनंद झालाय !! चमकलात? सोप्पंय हो .. सेहवाग जेव्हा नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला होता तेव्हा मला वाटायचं की ह्याचं तंत्र के. श्रीकांतपेक्षा बरं आहे बस्स ! बेभरवशेपणात मात्र एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं ! दोन त्रिशतकं आणि कसोटी क्रिकेटमधे, वन डे क्रिकेटपेक्षा, जास्त सरासरी राखून Sehwag proved me wrong !

त्याच्या खेळातल्या बेभरवशेपणाचं तर असं आहे की तो त्याच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे ! कुठल्याही परिस्थितीत जर चेंडू फटका मारण्यायोग्य वाटला तर तो फटकावणारच ! बरं, जाफर किंवा द्रविडला जो चेंडू ‘well left’ सदरात जावा असं वाटेल त्यावर सेहवागला ‘sixer’ दिसू शकतेच ! त्याला इलाज नाही ! जो माणूस ३०० धावांच्या जवळ पोचल्यावरही सिक्सर मारण्यासाठी पुढे यायला कचरत नाही त्याला कोण आणि कसं अडवणार ? कसोटीत ३०० धावा करणारा तो एकमेव भारतीय आहे तरीही तीनशे दिसायला लागल्या म्हणून तो मंदावला नाही ! उलट त्याचा प्रयत्न असा दिसतो की शतक, द्विशतक, त्रिशतक हे टप्पे शक्यतो चौकार – षटकार असे रूबाबात पार करायचे ! त्याला ‘नजफगढचा नवाब’ म्हणतात ते का उगाच?

तो खेळताना आपण उत्सुक अधीरतेने सामना पहायचा ! बाकी कुणी काही करू शकत नाही – अगदी नॉन स्ट्राइकर एंडचा खेळाडूही ! षटकार बसला तर आपली प्रार्थना फळाला आली म्हणायचं पण आऊट झाला तर नाही रूसायचं !

मर्चंट, गावसकर आणि तेंडुलकर निर्विवादपणे महान खेळाडू आहेत पण त्यांनीही जो पराक्रम केला नाही तो सेहवागने करून दाखवलाय ! एकदा नाही तर दोनदा !! ‘तेंडल्या’ अजून क्रिकेट खेळतोय .. त्यामुळे आशेला वाव आहे !!!

सेहवागचा खेळ त्याच्या सळसळत्या रक्ताचा आरसा असावा ! नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मायकेल क्लार्क सचिनला म्हणाला होता की आता म्हातारा झालास, तुला तर नीट पळताही येत नाही वगैरे ! (सचिन international cricket खेळायला लागला तेव्हा मायकेल क्लार्क ८-९ वर्षांचा असेल! )त्यावर non striker सेहवागने ताडकन मायकेल क्लार्कला सुनावलं होतं की तुला माहितीये ना तू कोणाशी बोलतोयस? अरे, तो ‘सचिन तेंडुलकर’ आहे !!

सेहवागचा एक अनोखा विक्रम म्हणजे त्याने गेल्या दहा शतकांपैकी प्रत्येक खेळीत किमान दीडशे धावा ठोकल्यात. टेस्ट क्रिकेटमधे हे करणारा तो एकमेव खेळाडू आहे. लक्षात घ्या, इथे एकमेव खेळाडू म्हटलंय; एकमेव भारतीय खेळाडू नाही ! त्याची धावांची भूक अशीच वाढत राहो !!!

अशा खेळी झाल्या की जाणवतं टेस्ट क्रिकेटला इतकं महत्व का आहे ते ! हा खेळ मानसिक आणि शारीरिक कणखरपणा पाहणारा आहे. त्यासमोर T20 म्हणजे अगदीच लुटुपुटीचं क्रिकेट वाटतं ! काल ३०० धावांच्या जवळ पोचल्यावरही सेहवाग एकेरी – दुहेरी धावा घ्यायला उत्सुक होता !

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने योग्य वेळी दाखवलेला संयम ! डावखुरा फिरकी गोलंदाज पॉल हॅरिस सातत्याने लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत होता. अशा नकारात्मक गोलंदाजीचा उद्देश हाच असतो की बॉल्स नुसते वाया जातात, विकेट मिळत नाही पण बॅट्समन फटकेही मारू शकत नाही ! सेहवागसारखे फटकेबाज तर लवकर फ़्रस्ट्रेट होऊन चूक करण्याची शक्यता निर्माण होते. काल वीरू त्याला पुरून उरला. शांत डोक्याने चेंडू सोडून द्यायचा पण योग्य संधी मिळवून चेंडू भिरकवायचा ! अगदी ठरवून मारल्यासारखे रिव्हर्स स्वीपही बिनधास्त मारत होता !

कुठलाही खेळ, मग अगदी पत्ते असोत की कुस्ती, युक्तीने खेळायचा असतो. ‘चक दे इंडिया’ आठवा ! जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या अक्कलहुशारीवर कुरघोडी करावी लागते ! द.अफ्रिकेचे खेळाडू म्हणजे पक्के व्यावसायिक पण काल वीरूने ‘चक दे..’तला धडा जणू तोंडपाठ म्हणून दाखवला !!!
-------------------------------------------------------------

क्रीडालेख

प्रतिक्रिया

मानस's picture

5 Dec 2009 - 10:44 am | मानस

सेहवागचा खेळ हा सचिन तेंडुलकर नामक इसमाने पॉलिश केलाय .. हे तो स्वतःच म्हणतो. ...

पण सध्याच्या त्याच्या फॉर्मला सलाम ...

अभिनंदन

मदनबाण's picture

5 Dec 2009 - 11:10 am | मदनबाण

छान लेख...
त्याची धावांची भूक अशीच वाढत राहो !!!
असेच म्हणतो. :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

टारझन's picture

5 Dec 2009 - 12:28 pm | टारझन

धन्यवाद चित्रे सर .. सेहवाग आपला लै लै आवडता खेळाडू आहे.
त्याची बॅटिंग पहाणे थ्रीलींग असतं ! द्रविड "लक्षुमन" हे खेळाडू तांत्रिक मांत्रिक खेळाडू दिवसभर आटवतात हे खरं असलं तरी जरा दोन तासांनी पुन्हा येऊन बसलं की ह्यांच्या बॅटिंगमधे काही मिस् केलं असं वाटत नाही :)

लाराचं ४०० धावांचं रेकॉर्ड तोडणारा सेहवाग हा एकमेव खेळाडू मला वाटतो :) तशी अपेक्षा अजित आगरकर कडून पण होती .. पण तो आता इंटरनॅशनल खेळत नाहीये =))

- टारेंद्र सहावाघ

श्रावण मोडक's picture

5 Dec 2009 - 12:41 pm | श्रावण मोडक

तशी अपेक्षा अजित आगरकर कडून पण होती .. पण तो आता इंटरनॅशनल खेळत नाहीये
=)) =)) =)) =)) =)) =))
टाऱ्या सुधर की लेका.

संदीप चित्रे's picture

5 Dec 2009 - 10:35 pm | संदीप चित्रे

ह्या जोडगोळीला सलामीला येऊन दिवसभर बॅटिंग(!) करताना पाहिले आहेस का टार्‍या? नसेल तर जरूर पहा ;)
द्रविड आणि लक्ष्मण म्हणजे 'रन मशीन्स' वाटायला लागतील :)
----------
>> लाराचं ४०० धावांचं रेकॉर्ड तोडणारा सेहवाग हा एकमेव खेळाडू मला वाटतो
एग्जॅक्टली :)

टारझन's picture

5 Dec 2009 - 11:18 pm | टारझन

द्रविड आणि लक्ष्मण म्हणजे 'रन मशीन्स' वाटायला लागतील

ही गोष्ट मी नाकारत नाहीच्चे !! हे दोन्ही खेळाडू महान आहेत. वाष्ष्ट्रेलियाच्या नाकात काड्या घालून इरिटेट करतात त्यांना :)
मी फक्त इतकंच म्हणालो की २ तास जर बाहेर जाऊन आलो आणि ह्यांनी जर भरपुर रन्स काढल्या तरी फार मिस् केल्यासारखं वाटत नाही, जे सेहवाग च्या बाबतीत वाटतं :)

- लक्षुमन

संदीप चित्रे's picture

6 Dec 2009 - 12:25 am | संदीप चित्रे

>> २ तास जर बाहेर जाऊन आलो आणि ह्यांनी जर भरपुर रन्स काढल्या तरी फार मिस् केल्यासारखं वाटत नाही, जे सेहवाग च्या बाबतीत वाटतं

२ तासात तर सेहवाग पूर्ण सामना संपवू शकतो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2009 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेगवाग काय भरोशाचा फलंदाज नाही. आडमफट्टा खेळणारा वाटतो. :)
अर्थात खेळतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असते. यात शंकाच नाही.
'चली तो चांद तक' असे ते प्रकरण आहे.:)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

6 Dec 2009 - 9:03 pm | टारझन

'चली तो चांद तक' असे ते प्रकरण आहे

ओक्के :)

टार्‍या.

मनिष's picture

5 Dec 2009 - 2:16 pm | मनिष

कुठलाही खेळ, मग अगदी पत्ते असोत की कुस्ती, युक्तीने खेळायचा असतो. ‘चक दे इंडिया’ आठवा ! जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या अक्कलहुशारीवर कुरघोडी करावी लागते ! द.अफ्रिकेचे खेळाडू म्हणजे पक्के व्यावसायिक पण काल वीरूने ‘चक दे..’तला धडा जणू तोंडपाठ म्हणून दाखवला !!!

मला आपले उगाचच श्रीलंकेशी मॅच चालू आहे असे वाटत होते! ;)

संदीप चित्रे's picture

5 Dec 2009 - 10:25 pm | संदीप चित्रे

माझ्या लेखाआधीची प्रस्तावना वाचलेली दिसत नाहीये तुम्ही ;)

मनिष's picture

6 Dec 2009 - 4:37 pm | मनिष

तुम्हीही उत्खननवादी झालात तर! :)

चतुरंग's picture

5 Dec 2009 - 10:54 pm | चतुरंग

एकेका खेळाडूचा नैसर्गिक बाज असतो त्यात तो खेळला तरच खेळल्यासारखा वाटतो. विवियन रीचर्डसला उगीच चेंडू तटवून खेळताना पाहिलं तर कसं मिळमिळीत वाटेल ना? त्यानं म्हणजे च्युईंगम चावत, बेफिकीरपणे लेगला दृष्टी टाकत, बॉलरकडे "हं टाक रे काय टाकायचंय ते!" असं तुच्छ नजरेनं म्हणून चेंडूला फोडून काढणं हेच योग्य दिसतं!
सेहवागची कालची ट्रिपल हुकली त्याचं मला वाईट वाटलं पण त्यापेक्षा त्याची ती इनिंगच अजिबात बघायला मिळाली नाही ह्याचं जास्त वाईट वाटलं! कसोटी क्रिकेट हे निर्विवाद महत्त्वाचे आहेच. खरा अभिनय जसा रंगभूमीवरुन येतो असं म्हणतात तसं खरं क्रिकेट हे कसोटीतूनच निर्माण होतं बाकी सारे सोप ऑपेरा! ;)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

6 Dec 2009 - 12:29 am | संदीप चित्रे

>> सेहवागची कालची ट्रिपल हुकली त्याचं मला वाईट वाटलं पण त्यापेक्षा त्याची ती इनिंगच अजिबात बघायला मिळाली नाही ह्याचं जास्त वाईट वाटलं!

मी तर आपली दृष्ट लागायला नको म्हणून इंटरनेटवर लाईव्ह कव्हरेजची लिंक मिळाली असूनही दुसर्‍या दिवशी बराच वेळ स्कोअर बघणंही टाळलं पण तरीही ट्रिपल हुकलीच :(

सेहवाग म्हणालाय की पुन्हा संधी येईल की ... त्यात काय !
लढ बाप्पू !

भडकमकर मास्तर's picture

6 Dec 2009 - 1:54 am | भडकमकर मास्तर

पुन्हा संधी येईल की ... त्यात काय !

अगदी खरंय...
१९५ वर मेल्बर्नमध्ये लाँगऑन डी प मिडविकेट पट्ट्यात कॅचऔट झाल्यावरही तो असंच बोलला होता. १९५ वर पुन्हा असा बॉल मिळाला तर नक्की मारीन...

दमनक's picture

6 Dec 2009 - 11:25 am | दमनक

वाघाची एक काउंटी क्रिकेटची आठवण वॉर्नने सांगितली आहे. वाघ फलंदाजी करतोय. कोणीतरी पाकिस्तानी रिव्हर्स स्विंगरच्या हातात चेंडू आहे. वाघ त्याच्या साथीदाराला सांगतो, अरे माझ्याकडे या रिव्हर्स स्विंगरला तोंड देण्याचा एक प्लॅन आहे. बरे बुवा. पुढचाच चेंडू स्टेडिअममध्ये ठोकला जातो. साहजिकच नवीन चेंडू आणावा लागतो. रिव्हर्स स्विंगरचा प्रश्न सुटला :)

संताजी धनाजी's picture

7 Dec 2009 - 11:37 am | संताजी धनाजी

हे हे
- संताजी धनाजी

जे.पी.मॉर्गन's picture

7 Dec 2009 - 12:50 pm | जे.पी.मॉर्गन

लई भारी लेख भौ ! बीरूभाय आपल्याल्या आवडतो तो त्याच्या अ‍ॅटिट्यूडसाठीच ! अन माणसाचं टेंपरामेंटही भारी आहे. तो असा आहे म्हणूनच तो आहे !!!

पण एक लक्षात आलं का? तेव्हा ऑल हॅरिसला तो शांतपणे खेळला. पण आत्ताच्या कसोटीत त्याचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की त्यानी हेराथ न साक्षात मुरलीला निगेटिव्ह लाईनवर सेटल होऊच दिलं नाही. इनसाईड आऊट शॉट्स असा खेळलाय की ज्याचं नाव ते ! ! ! रिव्हर्स तर लाजवाबच !

तेव्हा तयार रहा.... अजून एक ३०० येऊ घातली आहे ! :)

बाकी लेख झकासच !