सोबत होती तुझी जेथवर
सोबत होती तुझी जेथवर
कधी एकटा ना पडलो
धुंद तुझ्या त्या सहवासातच
कसा होईना, पण घडलो
सकाळ तुझीया शिवाय माझी
होतच नव्हती सुरु तशी
दिवसभरातून तुझी भेट मग
घडतच होती माझ्याशी
तू नसल्यावर जीव व्हायचा
उगाच कासाविस माझा
परंतु तुझीया भेटी नंतर
स्वतःस समजे मी राजा
वैद्य भेट ती नित्य व्हायची
तुझीया संगे फिरल्याने
शुष्क खोकला आणिक थकवा
ऊर धुराने भरल्याने
परिवाराची मित्रांची मी
पथ्करली गे नाराजी
कारण तव दुर्गंध सोसण्या
होतच नव्हते ते राजी
अखेर सोडून दिधले तुजला
स्मरणही नाही होत तुझे
परतुनी येऊ नको मजकडे
हेच मागणे गे माझे
[वैधानिक इशारा - धुम्रपान आरोग्यास अपायकारक आहे ]
मिसळपाव