आपल्या संस्कृतीने आणि संस्कारांनी लहानपणापासूनच बचतीचे महत्व आपल्या मनावर बिंबवले आहे. विविध सणांच्या निमित्ताने आपण जनावरांची, यंत्रसामुग्रीची, हिशेबाच्या वह्यांची पूजा करत असतो. खरी पूजा म्हणजे केवळ पोकळ विधी नव्हेत. एखाद्या रिक्षावाल्याने नुसता रिक्षाला हार घालणे पुरेसे नाही. त्या आपल्या उपजीविकेच्या साधनाचे महत्व समजून घेऊन त्याने आपल्या रिक्षाची नीट निगा राखायला हवी. सणवार एकवेळ सोडून देऊ, पण आपले संस्कारही हेच सांगतात. लहानपणी ताटात अन्न शिल्लक ठेवले म्हणून अनेकांनी मार खाल्ला असेल.