मागे इथल्या पुस्तकांच्या जत्रेत नगरसेविका जॅकी स्मिथ यांचे नांव कवितावाचनाच्या फलकावर पाहिले, आणि कुतूहल वाटले. आमच्या या नगरसेविका गेल्याच वर्षी पुन्हा निवडून आल्या होत्या. वाटले, "वा! बाई कविता सुद्धा करतात तर." म्हणून नवकवींचे कवितावाचन ऐकायला तिथेच थांबलो.
नवकवींच्या कविता वाचण्यापेक्षा त्या ऐकाव्यात. कवीला गल्लीतल्या बारीकसारीक गोष्टींबद्दल वाटणारी खरीखुरी आपुलकी छापील पानावर क्षुल्लक वाटू शकते. पण कोरड्या शब्दांत नसतो तो गहिरा भाव आवेशातून जाणवू शकतो. अशाच एकदोन कवींनी कविता म्हटल्या, मला त्या खूप आवडल्या.
जॅकीबाईंची पाळी आली. सभेतली धिटाई, आत्मविश्वास हा राजकारणपटूच्या ठायी असतोच.