तिखट विषय, बोथट शब्द
मागे इथल्या पुस्तकांच्या जत्रेत नगरसेविका जॅकी स्मिथ यांचे नांव कवितावाचनाच्या फलकावर पाहिले, आणि कुतूहल वाटले. आमच्या या नगरसेविका गेल्याच वर्षी पुन्हा निवडून आल्या होत्या. वाटले, "वा! बाई कविता सुद्धा करतात तर." म्हणून नवकवींचे कवितावाचन ऐकायला तिथेच थांबलो.
नवकवींच्या कविता वाचण्यापेक्षा त्या ऐकाव्यात. कवीला गल्लीतल्या बारीकसारीक गोष्टींबद्दल वाटणारी खरीखुरी आपुलकी छापील पानावर क्षुल्लक वाटू शकते. पण कोरड्या शब्दांत नसतो तो गहिरा भाव आवेशातून जाणवू शकतो. अशाच एकदोन कवींनी कविता म्हटल्या, मला त्या खूप आवडल्या.
जॅकीबाईंची पाळी आली. सभेतली धिटाई, आत्मविश्वास हा राजकारणपटूच्या ठायी असतोच. तरतरीतपणे त्या लाऊडस्पीकरपाशी गेल्या. चिटणिसांनी त्यांची ओळख करून दिली.
मग बाईंनी पहिल्या कवितेचे प्रास्ताविक सांगितले - "आपल्या शहरातल्या स्थितीमुळे मला ही कविता स्फुरली -"
आपण आपल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये बघतो
सामान्य माणूस दारिद्र्यरेषेखाली राहातो
...
त्याची मुले मॅट्रिकपूर्वीच शाळा सोडतात
ड्रग्स विकून पोटासाठी पैसा जोडतात
...
वगैरे. बाई मोठ्या आवेशाने बोलत होत्या. पण मला असे सारखे वाटत होते, की हेच शब्द मी कित्येक पुढार्यांच्या तोंडून आधीही ऐकले आहेत. सुरुवातीला वाटले की "दारिद्र्यरेषा" वगैरे सरकारी शब्द मला खटकत असावेत. पण हे खरे नाही. अर्थ योग्य असेल तर चांगला कवी वाटेल तो शब्द चपखल बसवून देतो. दोष तो नसावा. मग असे वाटले, की कवितेत अहवालछाप कल्लोळ होता, पण अनुभवाची कळकळ नव्हती, हा दोष असावा. म्हणून पुढची "मुलीस उद्देशून" कविता नीट ऐकली :
...
मुली, मी तुझी मैत्रीण नाही, तर मी तुझी आई आहे
मला पोकळ बडबड नको, तुझा आदर मला हवा आहे
"हाय मम्मी" नको, निमूट "व्हय माय" मला हवे आहे
...
अधेड वय झाले की मुला-मुलीशी आईबापांने मैत्री करावी असे बालसंगोपनवाले म्हणतात. बाई त्यांना स्वानुभवातून सांगते आहे, शिस्त म्हणून काही हवी. इथे तर बाईंचा आपला अनुभव आहे, तरी कविता म्हणून का भावत नाही? बाईंच्या आवाजात जरब होती, पण आतडे तुटल्याचे स्वरात जाणवत नव्हते. बंडखोर मुलीबद्दल तणतण मला ऐकू आली, बंड जिव्हारी लागल्यामुळे कठोर झालेल्या आईचा कंप ऐकू आला नाही. हे मुलीला उपचारापुरते दिलेले उपदेशाचे डोस होते, आणि आदली कविता म्हणजे यमके जुळवलेले राजकिय भाषण होते.
काही म्हटले तरी जॅकीबाई म्हणजे साध्या नगरसेविका. राष्ट्रीय पातळीवरच्या पुढार्यांची भाषणे लिहिणारे खास लेखक असतात. तशी मदत जॅकीबाईंना कुठे मिळणार? ते सोडा - कवित्वाची हौस तर त्यांना आपणहून होती. शब्दांना काव्यात्म करण्याची जबाबदारी त्यांनी आपणहून स्वीकारली होती. म्हटले तर मला खटकलेल्यापैकी "दारिद्र्यरेषा" हा किती चित्रमय शब्द आहे - समाजाच्या ग्रुप पोर्ट्रेटवर खस्सकन आडवी रेघ ओढावी, आणि गरीब लोकांना खाली वेगळे करावे - किती नाट्य आहे. पण प्रत्यक्षात त्या शब्दातून एक रंगहीन आकडा पुसटसा दिसून लगेच गायब होतो. मुलीला दिलेल्या उपदेशात "खरा आदर" म्हणजे नेमके काय हरवले, काय हवे, ते ठसठसत नाही. साच्यातला कुठलातरी उपदेश शब्दाला शब्द जोडून सांगितल्यासारखे वाटते. शेवटी मला असे जाणवले, की कवितेतील प्रत्येक कडव्याला कंटाळवाणेपणाच्या किड्याने पोखरून पोकळ केले आहे.
खरे बघावे तर हे सगळे कंटाळा येण्यासारखे प्रश्न नव्हेत. "दरिद्री मुलांना ड्रग विकण्याचा मोह होतो. मुला-मुलींना वडील मंडळींचा प्रेमळ धाक हवा." पुन्हा-पुन्हा ऐकल्यामुळे हे मुद्दे टाकाऊ होणारे नव्हेत. तरीसुद्धा तेच ते शब्द ऐकून ऐकून त्यांच्याविषयी भाषा माझ्या हृदयाला भिडेनाशी झालेली आहे. पण समस्या तर अजून सुटलेल्या नाहीत. समस्येशी झटणारे असतात ते थोडेच, हे खरे आहे. पण लोकशाही देशांत बाकी सर्वांचे मतही लोकशिक्षणाने बदलणे आवश्यक असते. पण येथे तर मतपरिवर्तन होण्याआधीच, समाज बदलण्याआधीच कंटाळा येऊन विषय नकोसे होतात. विचारमंथन आणि मतपरिवर्तन व्हावे, पण चर्वितचर्वणामुळे दुर्लक्ष होऊ नये, असे आपल्याला हवे असते. आरोग्य, साथीचे रोग, समाजसुधारणा, या सर्व बाबतीत समस्या सुटायला दशके, शतके लागतात. पण खूप चर्चा झाल्यानंतरही महत्त्वाच्या विषयांबद्दल भाषेची धार दशका-शतकांपर्यंत कायम कशी ठेवावी? हे कोडे शेकडो लोकशाही देशांतल्या हजारो विचारवंतांना सुटलेले नाही. इतक्यांना जमले नाही, मग दोष जोराजोरात बोथट शब्द चालवणार्या एकट्या जॅकीबाईंना का द्या?
वाचने
4477
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
रोचक
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
स्वप्न साकार झाले!
छान
लेख आवडला.
कविता आणि कित्ता
हमे देखना है
In reply to हमे देखना है by सहज
सहमत
हाच तर कळीचा मुद्दा
छान लेख.
_____________________________
डॉमिनो
एकदम अंतर्मुख करणारा विषय आहे.