शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल.
पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती.