पुणे ते लेह (भाग ११ लेह - खारदूंग ला - हुंडर)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
15 Mar 2018 - 11:20 am

०४ सप्टेंबर
######################################################################################
'मन चिंती ते वैरी ना चिंती'.
काल रात्री परत एकदा फोर्ड कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यांनी आश्वस्त केले होते की 'क्लच प्लेट्स खराब झालेल्या नसणार.' पण तरीही आपण उंचावर गेलो आणि काही झाले तर? शंका हजार.
सकाळी ५ च्या आधीच उठलो. 'आपण भाड्याची गाडी घेऊन 'खारदूंग ला' ला जाणार आहोत'. मी निर्णय जाहीर केला. ५:१५ ला टॅक्सी स्टॅन्ड गाठले. तिथे त्सरींग नावाचे एक टॅक्सिचालक भेटले. त्यांची गाडी ठरवली. इथे self driven भाड्याची गाडी मिळत नाही. जेमतेम ४-५ महिने असणारा धंदा, सातत्याने प्रचंड खराब रस्त्यांमधून गाडी चालविल्याने होणारे गाड्यांचे नुकसान, मेन्टेनन्सचा जास्त खर्च अशा अनेक गोष्टींमुळे इथे टॅक्सी खूप महाग आहे. टॅक्सी ठरवून ६:१५ पर्यंत होमस्टे वर यायला सांगितले. त्यांना थोडे ऍडव्हान्स पैसे द्यावेत म्हणून पाकीट शोधायला गेलो आणि आपण ते गडबडीत बरोबर आणलेच नसल्याचे लक्षात आले.

'ऍडव्हान्स क्यूँ चाहिये? आपने हां बोल दिया, मैने हां बोल दिया. हो गया.' - त्सरींग ह्यांचे तत्व भारी होते.

ठरल्याप्रमाणे सव्वा सहाला लेह मधून निघालो. आजचा रूट होता लेह - साऊथ पुल्लू - नॉर्थ पुल्लू - खालसर - डिस्कीट - हुंडर आणि शक्य झाल्यास पुढे भारत पाक वास्तविक नियंत्रण रेखेवरचे ('एलओसी'वरचे) तुर्तुक. (हा पूर्ण रस्ता श्योक नदीच्या कडेने जातो)

खालसर मधून एक रस्ता सुमूर - तिरीचा - पनामिक मार्गे सियाचीन ग्लेशिअर कडे जातो. (हा पूर्ण रस्ता नुब्रा नदीच्या कडेने जातो). पण बहुतेक इकडे जाऊ देत नाहीत. फार फार तर पनामिक पर्यंत जाऊ देतात. ह्या दोन्ही नद्यांच्या प्रदेशाला नुब्रा खोरे म्हटले जाते. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने खारदूंग ला अतिशय महत्वाचा आहे.

खारदूंग ला

काल रात्री बर्फवृष्टीने वरच्या भागात हाहाकार माजवला होता असे साऊथ पुल्लूच्या चेकपोस्टवर समजले. वर वर जात असताना बर्फाची जाड चादर सगळीकडे पसरलेली दिसतच होती. इथे गाडी (विशेषतः अवजड वाहने) चालवतानाची एक मुख्य समस्या म्हणजे ऑक्सिजन कमी असल्यामुळे गाडीला पिकअप न मिळणे.

आमच्या पुढे असलेल्या ह्या पेट्रोल/डिझेलच्या टँकरला काही कारणास्तव एका ठिकाणी थांबावे लागले आणि नंतर जवळपास ५ मिनिटे कुथून कुथून देखील एक इंच सुद्धा पुढे जाता येईना. शेवटी टँकर थोडा मागे सपाट रस्त्यापर्यंत आणून मग वर चढवावा लागला. एका पर्यटकांच्या ग्रुपच्या i20 ने तर दमच तोडला होता. गाडीतल्या पर्यटकांवर इतक्या प्रतिकूल हवामानात ती गाडी ढकलायची वेळ आली होती.

'किस रूट से आये आप लोग'? - त्सरींगनी विचारले

'श्रीनगर.......श्रीनगर में तो लोग पूरा पाकिस्तान का सपोर्ट करते है शायद. दिवारों पर पाकिस्तान के सपोर्ट में लिखा हुआ दिखा श्रीनगर में'

'वैसे ही है वो लोग. इधर सिर्फ इंडिया को मानते है. पाकिस्तान चायना कुछ नहीं .'

काल आमच्यावर काय प्रसंग गुजरला होता ते त्सरींगना सांगितले.

'इधर होता है ऐसा गाडी को. लेकिन जा सकते थे आप लोग.'

शेवटी एकदाचा खारदूंग ला टॉप आला. समुद्र सपाटीपासून १८३८० फूट उंची असलेला खारदूंग ला जगातील सगळ्यात उंचीवरचा मोटोरेबल रोड मानला जातो. पण हे खरे नाही. खारदूंग ला ची ऊंची मोजण्यात चूक झाली होती. ह्याची खरी ऊंची १७५८२ फूट आहे आणि ह्याचा नंबर ११ वा आहे. आपल्या उत्तरांचल राज्यात असणारा भारत तिबेट सीमेवरचा १८१९२ फूट उंचीचा मना पास, भारताच्या काराकोरम पर्वतराजीत असलेला १८३१४ फूट उंचीचा मारिस्मिक ला, पॅंगॉन्ग तलावाकडे जाताना लागणारा १७५८६ फूट उंचीचा चांग ला, २०१७ साली BRO ने लडाखच्या डेमचोक आणि चिसुमले ह्या गावांना जोडणारा बांधलेला १९३०० फूट उंचीचा उमलिंग ला, काकासान्ग ला असे बरेच पास खारदूंग ला पेक्षा उंचीवर आहेत. आणि ते योग्य गाडी घेऊन पार करता देखील येतात.

खारदूंग ला टॉपला पोचेपर्यंत बायकोला विरळ हवेचा त्रास फार मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. अस्वस्थ वाटून डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी आली. १७५८२ फूट ही काही कमी उंची नाही. खारदूंग ला टॉपवर लष्कराचे छोटेखानी वैद्यकीय केंद्र आहे. तिथे गेलो. तिथे असलेल्या सैनिकाने तिला हाताला धरूनच आत नेऊन बसवले. तपासून लगेच ऑक्सिजन लावला. त्यांच्यासाठी ही नेहमीची बाब असावी. जवळपास १५ मिनिटे ऑक्सिजन दिल्यावर तिला हुशारी आली. उगाच का प्राणवायू म्हटलेय याला?
'जल्दीसे नीचे की तरफ जाईये. यहा ऊंचाई पर ज्यादा समय मत गुजारीये' - सैनिकाने सूचना केली.
पण जलद खाली जाणे शक्य न्हवते. कारण गाड्या बर्फावरून घसरत होत्या. थोड्याच अंतरावर एक बस बर्फात अडकली होती. बस वाल्याने खूप प्रयत्न केला आणि अखेरीस चाकाला लोखंडी साखळ्या लावून कशीबशी गाडी मार्गस्थ केली.(बर्फावरून गाडी घसरू नये म्हणून इथले चालक चाकांना लोखंडी साखळ्या लावतात). आमची गाडी पण तीन चारदा घसरून दरीच्या दिशेने गेली.

बर्फाच्छादित दरी

अशा दरीत पडलो तर काही शिल्लक राहील का आपले?

'हम लोग उतर जाये क्या गाडी से'?

'नहीं नहीं. कोई जरुरत नहीं. हो जायेगा.' - त्सरींग

साऊथ पुल्लू पासून जवळपास ३० किमीवर असलेले नॉर्थ पुल्लू गाठायला २ तास सहज लागले असतील. ह्यातील जवळपास २५ किमी भागात रस्ता अस्तित्वात न्हवता आणि कधीच नसतो. जवळपास वर्षभर होणारी बर्फवृष्टी, सतत कोसळणाऱ्या दरडी ह्यामुळे हा पॅच नेहमी खराब स्थितीतच असतो. अक्षरश: अंग तुंबलून निघाले.
नॉर्थ पुल्लू ला देखील लष्कराचा चेक पोस्ट आहे. तिथे देखील ILP ची एक प्रत द्यावी लागते. नॉर्थ पुल्लू ओलांडताच एके ठिकाणी शेकडो याक दिसले. प्रचंड मोठा असणारा हा प्राणी प्रत्यक्षात खूपच भित्रा आहे.

याक

आणि हा मिलिटरी कॉन्व्हॉय

नुब्रा खोरे

.

नॉर्थ पुल्लू पासून पुढे एका ठिकाणी जेवण केले. धाब्याच्या मालकाने राजमा भात, दही आणि भाजी अगदी आग्रह करून करून खायला घातले. शेवटी एकदाचे १२:३० ला हुंडर मध्ये पोचलो. हुंडर मध्ये छोटेसे वाळवंट आहे. आणि इथे डबल हॅम्प बॅक्टरीयन ऊंट दिसतात. ऊंटाची ही अतिशय दुर्मिळ जात असून अतिशय ऊंचीवरच्या वाळवंटी प्रदेशात आढळते. जुन्या काळी हिमालय भागात एक सिल्क रूट अस्तित्वात होता. काबुल पासून तिबेट पर्यंतचा व्यापार ह्या सिल्क रूट ने चालत असे आणि माल वाहण्यासाठी कामी येत डबल हॅम्प बॅक्टरीयन ऊंट. पण १९५० नंतर हा सिल्क रूट बंद झाला आणि ह्या उंटांचे व्यापारी महत्व संपले. एका अंदाजानुसार भारताचा विचार करता संपूर्ण नुब्रा खोऱ्यात केवळ २११ डबल हॅम्प बॅक्टरीयन ऊंट शिल्लक आहेत.

हुंडरचे वाळवंट

डबल हॅम्प बॅक्टरीयन ऊंट

इथे बाजूनेच एक नदी देखील वाहते. एकंदरीत हा भाग व्यवस्थित सुशोभित केला आहे.

इथे थोडा वेळ थांबून परतीच्या प्रवासाला निघालो. मला वैक्तिकरित्या तुर्तुकला जायचे होते. हे भारताच्या ताब्यातील हद्दीतील शेवटचे गाव असून अगोदर वास्तविक नियंत्रण रेखेपलिकडे ('एलओसी'च्या पलिकडे) होते. (इथून पाकिस्तानव्याप्त काश्मीरची हद्द चालत बहुतेक फक्त अडीच किमीवर आहे.) १९७१ साली युद्धात भारताने हे गाव जिंकले आणि पाकिस्तानला नंतर परत दिले नाही. ह्या गावावर भारताने कब्जा करण्यापूर्वी जे लोक कामानिमित्त वगैरे पाकिस्तानच्या अन्य भागात गेले होते ते कधीच इकडे परत येऊ शकले नाहीत. त्यांची त्यांच्या नातेवाईकांशी ताटातूट झाली ती कायमचीच. जमीन/संपत्ती वगैरे गमावणे एकवेळ ठीक आहे. पण ह्या युद्धाने ह्या गावातील नागरिकांचे नागरिकत्वचं बदलले.

हुंडर पासून तुर्तुक जवळपास ८५ किमी दूर होते. इथले रस्ते आणि त्यांचा दर्जा लक्षात घेता अजून ३ तास तुर्तुकला पोचायलाच लागले असते आणि परतीच्या प्रवासात खारदूंग ला ला पोचेपर्यंतच मध्यरात्र झाली असती. त्यामुळे आम्ही कदाचित प्रचंड बर्फवृष्टीत फसलो असतो जे फार धोकादायक ठरले असते. त्यामुळे पुन्हा या भागात येईनच तेव्हा जाऊ असा विचार करून तुर्तुकवर फुली मारुन परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात डिस्कीट मोनेस्टरीला गेलो.

डिस्कीट मोनेस्टरी मधील बुद्ध मूर्ती

डिस्कीट मोनेस्टरी

प्रतिबिंब (परतीच्या प्रवासात टिपलेले एक छायाचित्र)

रात्री ८ च्या दरम्याने लेह मध्ये परत आलो. एकंदरीत आजचा प्रवास खूप उत्तम झाला. भाड्याची गाडी असून देखील आम्ही सांगू त्या प्रत्येक ठिकाणी अजिबात कटकट न करता त्सरींगनी गाडी थांबवली. आता उद्या लेह ला गुडबाय करून पॅंगॉन्ग ला जायला आम्ही तयार होतो.

प्रतिक्रिया

सालदार's picture

15 Mar 2018 - 12:41 pm | सालदार

मस्त!

पाहात राहावं असं आहे सगळं. उत्कंठावर्धक आणि रोचक. पुभाप्र.

अनिंद्य's picture

15 Mar 2018 - 1:35 pm | अनिंद्य

एकदम थ्रिलिंग !
फोटोत निसर्ग सुंदर टिपला आहे.
या मालिकेच्या भागांची वाट पाहतो नेहमी.
पु भा प्र

शलभ's picture

15 Mar 2018 - 4:16 pm | शलभ

मस्तच.

या मालिकेच्या भागांची वाट पाहतो नेहमी.

+१

यशोधरा's picture

18 Mar 2018 - 3:49 pm | यशोधरा

महान!

कपिलमुनी's picture

15 Mar 2018 - 4:49 pm | कपिलमुनी

सहकुटुंब असताना गाडि घेउन न जाण्याचा निर्णय अतिशय योग्य !!

डॉ श्रीहास's picture

16 Mar 2018 - 12:51 am | डॉ श्रीहास

हेच म्हणतो...

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2018 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सहल. पुढचा भाग लवकर टाकावा.

१७५८२ फूट ही काही कमी उंची नाही.

हे वाचून क्षणभर डोकं गरगरलं :) तुम्ही गमतीत लिहिलं असावं.

लेह साधारण साडेतीन हजार मीटर उंचीवर, आणखी अठराशे मीटर उंचावर खारदुंगलाचा माथा असेल. Altitude sickness मुळे अगदी अडिच हजार मीटर उंचीवरही त्रास होऊ शकतो. लेहच्या हवेला शरीर सरावलं तरी आणखी उंचावर आणि प्रवासाने दमलेलं असताना त्रास होणं माझ्या मते स्वाभाविक आहे. तुम्ही लगेच खाली उतरायला सुरूवात केलीत, ते बरंच झालं. पर्यटकांनी Altitude sickness ला कमी लेखू नये किंवा पर्यटकांमुळे लष्कराने केलेल्या सोयींवर ताण पडू नये, असं वाटतं.

गाडीच्या Malfunction इंडिकेटरविषयी आज एक माहिती मिळाली की (युरोपात तरी) चारचाकी साधारणतः तीन हजार मीटर उंचीपर्यंत चालवली जाईल असं गृहित धरून इंजिनचं कॅलिब्रेशन करतात. कॅलिब्रेशनसाठी धरलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर Malfunction इंडिकेटरचा पिवळा दिवा लागतो. ही एक शक्यता असू शकेल.

लेख नेहमीप्रमाणेच छान आहे. हुंडरचं वाळवंट आणि मोनॅस्टरीचं स्थान विशेष आवडलं.

प्रचेतस's picture

16 Mar 2018 - 8:49 am | प्रचेतस

अतीव सुंदर.
एकंदरीत वर झालेली बर्फवृष्टी, बंद पडत असलेल्या, घसरत असलेल्या गाड्या, चाकांना साखळी लावून गाड्या उतरवणे इत्यादी वाचून तुम्ही तुमची गाडी खारदुंग ला येथे नेली नाही हे उत्तमच केले.

बादवे, तुर्तुक गाव हे पाकिस्तानात होते असे म्हणण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग. तिथून K2 या भारताच्या (सध्या पा. व्या. का. मध्ये असलेल्या) सर्वोच्च शिखराचे दर्शन घडू शकते.

अभिजीत अवलिया's picture

17 Mar 2018 - 4:15 pm | अभिजीत अवलिया

तुर्तुक गाव हे पाकिस्तानात होते असे म्हणण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

दुरुस्ती करून घेतो.

अन्य सर्व वाचकांचे देखील आभार.

किल्लेदार's picture

22 Mar 2018 - 12:45 am | किल्लेदार

मस्त.. स्वतःची गाडी नेली नाहीत हे मात्र बरे केलेत. एवढ्या भयंकर निसरड्या रस्त्यावर स्वतः ड्रायविंग करताना आजूबाजूचा निसर्ग म्हणावा तसा एन्जॉय करता येत नाही.

सप्टेंबर मध्ये तुमचे तुर्तुक चुकले हे ऐकून खरंच हळहळ वाटली. सप्टेंबर महिन्यात तुर्तुक मध्ये ऍप्रिकॉट, स्थानिक भाज्या आणि बकव्हीट पासून बनवलेले पदार्थ चाखता येऊ शकले असते. मी जून मध्ये गेल्यामुळे मी त्याला मुकलो. त्यात माझ्या रॉलीला पेट्रोल न मिळाल्यामुळे तुर्तुकहून पुढे बॉर्डरपर्यंत जाण्याची रिस्कही घेता आली नाही. तुर्तुक हा बाल्टिस्तानमधला भाग. हा प्रदेशच काय तर तिथले लोक, संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी आणि बरंच काही लडाखमधल्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे.

पुढल्यावेळी जाल ..(म्हणजे जाच ! ) तेव्हा मात्र हे चुकवू नका आणि एक-दोन दिवस हाताशी ठेऊन जा.

K२ तर दिसले नाही पण पाकव्याप्त बाल्टिस्तानातली शिखरं मात्र दिसली.

t-2-2

अभिजीत अवलिया's picture

22 Mar 2018 - 1:42 pm | अभिजीत अवलिया

नक्कीच. पुढच्या एक दोन वर्षात झंस्कार व्हॅली अनुभवण्याचा विचार आहे. त्यावेळी तुर्तुकला पण जाईन.

@निशाचर,
तुम्ही सांगितलेले इंजीन कॅलिब्रेशनचे मला माहीत नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2018 - 1:47 pm | मराठी कथालेखक

बर्फावरून गाडी घसरू नये म्हणून इथले चालक चाकांना लोखंडी साखळ्या लावतात

हे नेमकं कसं करतात ? साखळ्या कुठे नी कशा लावतात त्याने गाडी घसरण्यास अटकाव कसा होतो हे नाही कळाले. फोटो असतील तर कृपया टाका.

अभिजीत अवलिया's picture

23 Mar 2018 - 10:36 pm | अभिजीत अवलिया

खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे.
(फोटो जालावरून साभार)

मी पाहिलेल्या सगळ्या केस मध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट जवळच्या आणि ड्रायव्हरच्या मागच्या अशा दोन चाकांना अशा साखळ्या लावल्या होत्या.
माझ्या अंदाजाप्रमाणे साखळी मुळे गाडी स्किड होणार नाही. टायरला बर्फात ग्रीप चांगली मिळते.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2018 - 5:52 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2018 - 5:53 pm | मराठी कथालेखक

परतीच्या प्रवासाबद्दल पण लिहिणार आहात का ?

अभिजीत अवलिया's picture

5 Apr 2018 - 9:22 pm | अभिजीत अवलिया

परतीच्या मनाली पर्यंतच्या प्रवासाचे लिहीणार आहे.

सस्नेह's picture

6 Apr 2018 - 5:04 pm | सस्नेह

अप्रतिम निसर्गचित्रे !

श्रीधर's picture

9 Apr 2018 - 3:05 pm | श्रीधर

+1