बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
30 Oct 2017 - 7:40 pm

आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच इण्टरेस्ट ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा 'रेल फॅन च्या नजरेतून' नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.

काही वेळा खूप तपशीलात न शिरता सीन असतो. फक्त एका रॅण्ड्म गाडीच्या टपावरून. तेथे काही गोची असण्याची शक्यता कमी असते. काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत. ते डबे समोरासमोर सीट्स असलेले असावेत त्या काळी. त्या गाण्यांतही खूप डीटेल्स मुळात नसतात. शोले मधला सीन व इतरही अनेक चित्रपटातील सीन्स आहेत ज्यात सहजपणे काही गोची दिसत नाही. शोले मधे त्या मालगाडीच्या ट्रेलर मधे सीन ओपन होतो. तेव्हा ती गाडी पुढे चाललेली असते. मग हल्ला झाल्यावर थांबते व डाकू उलटी न्यायला लावतात. नंतर धर्मेन्द्र इंजिनात गेल्यावर पुन्हा मूळ दिशेला नेउ लागतो. मधे हे सगळे ट्रेलर मधून बाहेर पडून डाकूंशी लढतात. गाडीला वेगवेगळ्या प्रकारच्या वॅगन्स आहेत. पण कोण नक्की कसा कोठे जातो याच्या विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही, कारण सीन अत्यंत वेगवान आणि थरारक आहे. यातील चुका काढायच्या झाल्या तर सीन सेकंदासेकंदाला पॉज करून बाजूला गाडीचे चित्र काढून त्यावर ते प्लॉट करावे लागेल.

सुदैवाने इतर दिग्दर्शक इतका त्रास करून घेत नाहीत :)

प्राचीन काळापासून आपल्या पब्लिकला काही सीन्स चा अर्थ माहीत असतो. पडद्यावर दोन फुले आपटली की काय झाले हे उघड असते. तसेच एखाद्या खेड्यापाड्यात सुरूवात झाल्यावर १५-२० मिनीटांनी एक रॅण्डम आगगाडी फुल पडद्यावर दाखवली म्हणजे नायक मुंबईला गेला हे ही पब्लिक ला कळते. मग त्या आगगाडीचा सीन प्रत्यक्ष बंगाल मधला का असेना.

कधी कधी एरव्ही चांगल्या सीन मधे रेल्वे तपशीलांकडे दुर्लक्ष केल्याने गोची जाणवते. उदा: 'आप की कसम' मधले 'जिंदगी के सफर मे' हे अतिशय सुंदर गाणे. या गाण्याचे चित्रीकरण खरे तर खूप सुरेख आहे. अतिशय उदास खिन्न वातावरण आणि किशोर चा जबरी आवाज. एका कडव्यात त्याला मुमताज आठवते तेव्हा तिच्या बाजूला एकदम फुललेली फुले आणि हिरवेगार सीन्स तर याच्या बाजूला एकदम पतझड वाले सीन्स सगळे मस्त जमले आहे.

पण हा त्या गाडीत येउन बसतो आणि ती गाडी निघते. तेथे दिसणारा फाटा बहुधा कल्याणजवळचा आहे जेथे एक मार्ग कर्जत कडे आणि दुसरा कसार्‍याकडे जातो. पुढे बोगदेही दिसतात. पण ते इग्नोर केले तरी क्लिअरली दिसते की तो इलेक्ट्रिफाइड ट्रॅक आहे. मात्र इतर सीन्स मधे कोळश्याच्या इंजिनात ते कोळसे घालतात ते सीन्स आहेत. तसेच गाडी निघते तेव्हा टीपिकल स्टीम इंजिन सुरू होताना चाकाजवळ येणारी वाफ, सहसा फक्त स्टीम इंजिनांच्या चाकांना असणारे ते कनेक्टिंग रॉड्स वगैरे दिसतात. त्या इंजिनाच्या आगीतून त्यांना काही "डायरेक्शन" दाखवायचे होते का माहीत नाही पण बाकी सुंदर चित्रीकरण, आवाज, संगीत सगळेच जमून आलेल्या या गाण्यात हे विसंगत वाटते.

तरीही ठीक आहे. ट्रॅक इलेक्ट्रिफाइड असला तरी ७० च्या दशकात स्टीम इंजिने अनेक ठिकाणी वापरात होती (नंतरही होती). मध्य रेल्वेने खूप लौकर बदलली. विशेषतः मुंबईजवळ प्रवासी गाड्यांना इलेक्ट्रिकच बहुतांश वापरत. पण इथे इंजिन दाखवलेलेच नाही. त्यामुळे शक्ती सामंता ला बेनेफिट ऑफ डाउट :)

अशा गोच्या तुम्हाला अनेक ठिकाणी जरा खोलात गेलात तर सापडतीलः
- रा.वन मधला लोकलचा सीन. धमाल आहे. पण ती गाडी बांद्रा स्टेशनवर आहे - असे आवर्जून स्क्रीनवर येते. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर. प्रत्यक्षात गाडी पाहिलीत तर मध्य रेल्वेची आहे. एक दोन सीन्स मधे तर फेक लोकल आहे. कशावर तरी लोकलच्या इंजिनाचे डेकोरेशन आहे. आता मध्य रेल्वेबद्दल मुंबईकर म्हणतील ती हार्बर लाइन ची असेल बान्द्र्याला असेल तर. होल्ड युअर ऑब्जेक्शन :) जरा थांबा. पुढे ती गाडी मस्तपैकी भायखळा स्टेशनातून जाते. हे हार्बर लाइन वर येतच नाही, कारण ती लाइन सॅण्डहर्स्ट रोडवरून च वरती उचलली आहे. लेको तुम्ही जर मध्य रेल्वेची लोकल वापरली आहे, तो ट्रॅक वापरला आहे तर स्टेशनची नावे वेस्टर्न ची कशाला?
- रजनीच्या पिक्चर मधे लॉजिक शोधायचा प्रयत्नच मुळात विनोदी आहे. पण तरी हा एक सीन बघा, 'शिवाजी- द बॉस'. इथे नीट पाहिलेत तर त्याचा पाय तेथे अडकायची शक्यता दिसत नाही. कारण ट्रॅक स्विच तेथे गॅप सोडेल. का ते पुढच्या काही सीन्स मधे जे लिहीले आहे त्यावरून बघा
- आमिर च्या गुलाम मधल्या त्या १०:१० की दौड सीन मधे हे गृहीत धरलेले आहे की त्या येणार्‍या लोकल्स चा वेग रोज सेम असतो. अगदी रात्रीची वेळ धरली तरी हे खरे नाही हे लोकल्स ने प्रवास करणार्‍यांना पटेल. लोकलचा वेग कमीजास्त असू शकतो असे धरले तर त्या सीन मधल्या कौशल्याला काही अर्थ नाही.

असे फुटकळ बरेच आहेत. पण काही यापेक्षा मोठे ब्लूपर्स असलेले सीन्सः

जब वी मेट
हा ही एक सुंदर चित्रपट. गाणी एकदम मस्त. पण सुरूवातीला असलेल्या ट्रेन चेस मधे इतका गोंधळ घातला आहे! त्यात काही गोष्टी आवर्जून चुकीच्या दाखवायचे कारणही कळत नाही. पहिले म्हणजे ट्रेनचे जे लाँग शॉट्स आहेत त्यात ती चक्क मॉडेल ट्रेन वाटते. इथे दुसराही एक ब्लूपर आहे. ज्या टॅक्सी मधे ते बसतात, त्यात बसतानाच्या सीन मधे पुढे फ्लॅप आहे. मग वरतून घेतलेल्या अँगल्स मधून जे सीन्स आहेत त्यात ती फ्लॅप नाही. मग रतलाम ला पोहोचतात तेव्हा ती फ्लॅप परत आलेली आहे :)

आता रतलाम. हे पश्चिम रेल्वेवरचे मोठे जंक्शन आहे. राजधानी एक्सप्रेस चे जे फक्त ३-४ स्टॉप्स आहेत त्यात हे आहे. या पिक्चर मधे ते अगदीच लहान गावचे स्टेशन वाटते. मग तेथे गाडी येते. इथे आणखी विनोद आहे. ती गाडी म्हणे - "पंजाब मेल". तीही मुंबई हून दिल्लीला चाललेली. इथे दोन गोच्या आहेत. एक म्हणजे "मुंबई" असे ढोबळ सहसा म्हणत नाहीत. मुंबई व दिल्लीचे चे कोणते टर्मिनस ते सांगतात. तरी ठीक आहे सांगितले असेल. पण दुसरे म्हणजे ही ट्रेन मुंबई-फिरोजपुर अशी जाते. फार जुनी आणि फेमस गाडी आहे. पहिल्यांदा त्याच्याही पुढे जायची पेशावरपर्यंत. मग फाळणीनंतर फिरोजपूर पर्यंत केली. करीनाला दिल्लीला जायचे आहे म्हणून मधल्या स्टेशन वर फक्त दिल्लीपर्यंतची अनाउन्समेण्ट करणार नाहीत :)

पण खरा विनोद आणखी बेसिक आहे. पंजाब मेल ही मध्य रेल्वेची गाडी आहे. मुंबईहून दिल्लीला दोन वेगळे मार्ग आहेत. एक मध्य रेल्वेचा - जो कसारा, इगतपुरी, भुसावळ, भोपाळ वगैरेहून जातो. दुसरा पश्चिम रेल्वेचा - जो बडोदा, रतलाम वगैरे वरून जातो. पंजाब मेल यातील पहिल्या रूट ने जाते. म्हणजे ती रतलाम वरून मुळातच जात नाही!

वास्तविक त्या चेस सीन मधे तसे काही अतर्क्य नाही. मग रेल्वेच्या डीटेल्स च्या बाबतीत इतक्या ढोबळ चुका का आहेत कल्पना नाही. पंजाब मेल च्या जागी राजधानी एक्सप्रेस म्हणून काम झाले असते - जी मुळात दिल्लीपर्यंतच जाते आणि रतलामला थांबते ही!

यादों की बारात
सलीम जावेद च्या स्क्रिप्ट मधे असा फ्लॉ फार क्वचित सापडेल. या पिक्चरच्या शेवटी अजितच्या मागे धरम लागतो. तो व इम्तियाज धावताना रेल्वे रूळांवरून धावतात व मधे सिग्नल पडतो, रूळ सरकतात व अजितचा पाय त्यात अडकतो असा तो सीन आहे. यात सर्वात ढोबळ दिसणारी गोची म्हणजे नंतर येणारी जी गाडी आहे तिला जे इंजिन आहे ते शंटिंग करता वापरले जाणारे आहे - म्हणजे तुम्हाल स्टेशन मधे कधी थोडे डबे इकडून तिकडे नेणे वगैरे करताना तसे इंजिन अजूनही दिसेल. कधी यार्ड मधली गाडी प्लॅटफॉर्म वर लावताना वापरतात. हे इंजिन फार वेगात जात नाही. यात दाखवलेले अंतर आहे तेवढ्या दुरून माणसे दिसली तर ते आणखी हळू करून सहसा थांबवतील.

पण मोठी गोची पुढे आहे. अजित जसा उभा आहे त्या संदर्भाने पाहिले तर त्याच्या समोरून येणारा तो ट्रॅक आहे तो तसाच सरळ अजितच्या मागे जातो व समोरूनच त्याच्या डाव्या बाजूने एक साइड लाइन येउन मिळते - तेथे प्लॅटफॉर्म आहे. आता अजितचा पाय अडकला कारण तो रूळ सरकला आणी मेन लाइन ला चिकटला. हे केव्हा करतील? जर बाजूच्या साइड लाइन वरून गाडी येणार असेल तर तिला मेन लाइन वर घ्यायला. पण इथे गाडी येते ती तर थेट समोरून येते. म्हणजे तिला लाइन क्लिअर द्यायला तो रूळ तसा चिकटणारच नाही! तेथे गॅपच हवी. किंबहुना स्विच पोझिशन तशी असेल तर ती यात दाखवलेली गाडी तेथे अडकेल किंवा घसरेल.

बाकी ते स्टेशन वगैरे दिसते त्यावरून हा स्विच कोठूनतरी रिमोटली न होता स्टेशनजवळून कोणीतरी मॅन्युअलीच केलेला असण्याची शक्यता जास्त होती. इतक्या लोकांत कोणीच तेथे धावत जाउन का ती गाडी थांबवू शकत नाहीत माहीत नाही :)

तूफान
अमिताभच्या "तूफान" मधे असाच गोंधळ आहे. केतन देसाई यांनी मनमोहन देसाई लॉजिक वापरायचा प्रयत्न केला पण तो आधीचा स्पार्क यात नव्हता. यातील क्लायमॅक्स मधे कमल कपूर चा पाय अमिताभ मुद्दाम अडकवतो. इथे सीन यादों की बारात सारखाच आहे. पण प्रत्यक्षात गाडी त्याच्या जवळ येताच अमिताभ पुन्हा त्याला मोकळा करतो व तो उडी मारतो. आता रूळ तेथे न चिकटल्याने गाडी तेथून सरळ पुढे जायला हवी. पण पुढच्याच सीन मधे ती वळून गेलेली दिसते - जी तो रूळ चिकटला असता तेथे, तरच गेली असती :)

बाकी यात त्या कमल कपूर ला ती गाडी त्याच ट्रॅक वरून जाणार आहे हे माहीत असते, अमिताभला ती सगळी स्विच सिस्टीम माहीत असते, तो तो स्विच हलवेपर्यंत या रूट वरून एक रॅण्डम गाडी चाललेली आहे हे रेल्वेवाल्यांच्या लक्षात येत नाही वगैरे अचाट लॉजिक सोडून देऊ. हा शैतान सिंग म्हणे बिकानेर वरून उधमपूर हवाईअड्ड्याकडे निघालेला असतो - बिकानेर जवळच कोठेतरी कोकण असावे. कारण तेथे नागोठण्याजवळ असलेले "भिसे टनेल" सुद्धा स्पष्ट दिसते :)

पूर्वी पेण, रोहा वगैरे भागात रेल्वे ट्रॅफिक नसल्याने तेथील ट्रॅक्स शूटिंग करता वापरत. तेच इथे वापरलेले दिसतात.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई
इथे अजय देवगणचा तो सीन आहे ज्यात एक ट्रक इकडून तिकडे नेण्याकरता तो आख्खा ट्रॅकच उपसून काढतो. यात उल्हासनगर स्टेशन दाखवले आहे. तेथे एक डिझेल इंजिन वाली गाडी उभी आहे. तेथून सिंगल ट्रॅक जाताना दिसतो. आता उल्हासनगर म्हणजे कल्याणजवळ. ते गेली अनेक दशके इलेक्ट्रिफाइड ट्रॅक वर आहे. त्यामुळे यातली कथा ६० च्या दशकातील असली तरी चुकीचा आहे तो सीन. तसेच तेथील ट्रॅक्स सुद्धा किमान दुहेरी आहेत अनेक वर्षे. आणि पूर्वी सहसा पॅसेंजर गाड्यांना तेथे डिझेल इंजिने लावत नसत, गेल्या काही वर्षांत लावू लागले. आणि माझ्या आठवणीत उल्हासनगर ला थांबणारी थ्रू ट्रेन पाहिली नाही. कारण कल्याण जवळच आहे.

दुसरे म्हणजे आख्खे रूळ काढण्यापेक्षा तेथे ८-१० पोती माती टाकून किंवा काही लाकडी फळ्या लावून जरा लेव्हल तयार करून ट्रक का नेत नाहीत कल्पना नाही. तसेही तेथे रस्ता ऑलरेडी होता असे त्या शॉट मधे दिसते. कदाचित रीटेक्स मुळे तयार झाला असावा :)

द बर्निंग ट्रेन
यात तर ब्लूपर्स ची रेलचेल आहे. फार पूर्वी या पिक्चर वर लिहीलेले आहे इथे. मला सर्वात गंमत वाटली तो भाग म्हणजे या गाडीतून रीतसर उतरणार्‍यांपेक्षा दारातून थेट वरती टपावर जाणारे, खिडक्यांच्या गजाला धरून इकडे तिकडे जाणारे आणि वेळोवेळी खाली फेकले गेलेले असेच जास्त असतील :) धर्मेन्द्र प्लॅटफॉर्मवरून बाइकवरून येउन गाडी पकडतो गार्डाच्या डब्याचे दार धरून तेव्हा तो गाडीच्या उजव्या बाजूने पकडतो. मात्र मग अचानक डाव्या बाजूने गार्डाचे दार ठोठावतो. तेथे धावत्या गाडीच्या दारात बाहेर उभ्या असलेल्या त्याला तो गार्ड आत न घेता "अरे जाओ यहाँसे" ही म्हणतो. तेथे पुढच्या लंब्याचौड्या संवादांआधी धरम ने "कोठे?" असे विचारावे असे मला वाटले होते :)

या गाडीचे सर्व डबे आतून जोडलेले असूनही कोठेही जायचे म्हंटले की हे हीरो लोक असतील तेथून थेट टपावर जाउनच पुढे जातात. मधे एकदा तर एक 'Not to be loose shunted' लिहीलेली वॅगन सुद्ध दिसते. असा ज्वालाग्राही पदार्थ असलेली वॅगन नव्या सुपर एक्स्प्रेस च्या पहिल्या ट्रिपलाच ट्रेनच्या डब्यांमधे लावून टाकणे हे सेफ्टी प्रोटोकॉल प्रमाणेच असावे :) मात्र ती वॅगन एरव्ही दिसत नाही.

इंजिन मधला बॉम्ब फुटतो त्यानंतर एक दोन स्टेशन्स मधून ती गाडी जाताना तेथील सिग्नलमन ला गाडी फार जोरात जात आहे, ड्रायव्हर ने सिग्नल दिला नाही वगैरे तपशील दिसतात. पण इंजिनातून धूर येत होता हे दिसत नाही. तो धूर पुढच्या स्टेशन - रतलाम- पर्यंत गायब होतो. बहुधा दिवाळीचा बॉम्ब असावा.

बाकी गमती त्या लेखात मिळतील

ही मधेच वॅगन लावायची पद्धत गाडीत हीरो लोक असले की वापरत असावेत. कारण मोहब्बतें मधेही उदय चोप्राच्या एण्ट्रीला एक ओपन वॅगन होती पॅसेंजर गाडीच्या मधेच.

कभी हाँ कभी ना
हे सर्वात धमालः
शाहरूख आणि दीपक तिजोरी गाणे गात गात गोव्याच्या वास्को स्टेशन वर येत आहेत. तिकडे एकदम घरी येताना उत्सुक वगैरे दिसणारी सुचित्रा कृष्णमुर्ती गाडीत आहे, अगदी पाच मिनीटात उतरणार अशा थाटात. म्हणजे गाडी हे गाणे संपता संपता वास्को ला पोहोचणार असावी.

एकच प्रॉब्लेम आहे. सुचित्रा कृष्णमुर्ती ज्या गाडीत आहे ती गाडी गाणे चालू असताना कसारा घाटात आहे. तेथेही ती गाडी किमान तीनदा इंजिनांचे मॉडेल बदलते - कारण वरकरणी सारखी दिसली, तरी ही तीन वेगवेगळी इंजिने आहेत. हे WCM-5 , हे बहुधा WCM-1, आणि हे WCM-2 :) त्यातही इंजिने फक्त मुंबई-पुणे व मुंबई-इगतपुरी या मर्यादित रूटपर्यंतच वापरली जाणारी डीसी ट्रॅक्शन वाली इंजिने आहेत. त्यामुळे ही गाडी गोव्याच्या आसपाससुद्धा असू शकत नाही. मधे एकदा आपल्याला कसारा घाटातील १२४ किमीचा मार्करही दिसतो. गाडी नक्की कोठे चालली आहे माहीत नाही पण कोणत्याही दिशेला असली तरी तेथून त्या काळात वास्को ला जायला १२-१४ तास लागतील. अजून एक छोटासा प्रॉब्लेम. ही ब्रॉडगेज गाडी अशीच्या अशी वास्कोला जाउ शकत नाही. मधे मिरज किंवा कोठेतरी या सर्व लोकांना मीटर गेजच्या गाडीत बसावे लागणार आहे (सर्व मार्ग ब्रॉडगेज होणे हे बरेच नंतर झाले). मग ती पुढे जाईल. तोपर्यंत हे दोघे गाणे गात बसणार असे दिसते. नाहीतर इतका वेळ स्टेशन वर येउन बसणार. पण काहीतरी चमत्कार असावा. कारण गाणे संपता संपता तिची गाडी आपोआप वास्को जवळ येते. आता ती गाडी छानपैकी मीटर गेज झालेली आहे तसे इंजिन बदलून . शाहरूख त्या गाडीच्या शेजारच्या रोडवरून उरलेले कडवे म्हणत चालला आहे. आणि लगेच रिपीट चमत्कार! गाडी त्यानंतर दोन मिनीटांत वास्को स्टेशनात शिरताना पुन्हा तेवढ्यात एक नवीनच इलेक्ट्रिक इंजिन लावून पुन्हा ब्रॉडगेज झालेली आहे!

गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे बदलतात वगैरे आपण पाहिले आहे. इथे गाडी इंजिनेच नव्हे तर गेजही बदलते! :)

बाकी असंख्य असतील. सापडले की लिहीन. तुम्हीपण लिहा.

ज्यांना माहीत नाही त्यांना शीर्षकाचा संदर्भः बीबीसीआय आणि जीआयपी या पूर्वीच्या खाजगी रेल्वे कंपन्या. आता पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे साधारण तेच भाग कव्हर करतात. आणि तो याचा डबा तिकडे जोडण्याचा संदर्भ :)

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

लेखन आवडले पण तुमचा अभ्यास जोरदार आहे मानायला हवे. जब वी मेटमध्ये एकदा खर्‍या ट्रेनऐवजी मॉडेल आहे सहज समजले ते सोडता मला कधी शंका आली नाही.

खास फारएन्ड स्टाईल लेख.

सप्तरंगी's picture

30 Oct 2017 - 8:06 pm | सप्तरंगी

केवढा अभ्यास आहे तुमचा, पण हे कळायला या movies पाहायला लागणार..

नितिन थत्ते's picture

30 Oct 2017 - 8:24 pm | नितिन थत्ते

तुम्ही पुरुष आहात असे समजून सांगतो......

अशा चुका बायकोबरोबर पिक्चर पाहताना काढू नका !!!

दिल तो पागल है या सिनेमात पौर्णिमेला येणारा व्हॅलेंटाइन डे असा खास प्रसंग आहे. त्यात रात्री बारा वाजतात तेव्हा माधुरी दीक्षित आपल्या खिडकीतून क्षितिजापासून १५-२० अंश वर आलेला पूर्णचंद्र बघते. पौर्णिमेला येणाऱ्या व्हॅलेंटाइन डे ला १२ वाजता असा चंद्र पाहणे हा काहीतरी स्पेशल रोमॅण्टिक वगैरे इव्हेण्ट म्हणून सिनेमात दाखवला आहे. त्यावेळी "पौर्णिमेला १२ वाजता चंद्र डोक्यावर असायला हवा; खिडकीतून कसा दिसेल?" असं मी म्हटल्यावर, "पुन्हा पिक्चरला तुझ्याबरोबर येणार नाही" अशी आकाशवाणी झाली होती.
========================
>>इथे अजय देवगणचा तो सीन आहे ज्यात एक ट्रक इकडून तिकडे नेण्याकरता तो आख्खा ट्रॅकच उपसून काढतो.

अजय देवगणची सुपरमॅन ताकद दाखवणे हा उद्देश असतो.
========================
>>काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत. ते डबे समोरासमोर सीट्स असलेले असावेत त्या काळी.

हे कळलं नाही. अजूनही तसेच असतात डबे; वातानुकूलित कुर्सीयान सोडून. साधे डबे असोत की शयनयान.

बाकी रुळांचे टर्न आउट वगैरेच्या चुका काढणे हे कै च्या कै आहे.

सुबोध खरे's picture

30 Oct 2017 - 8:29 pm | सुबोध खरे

तुम्ही पण IRFCA चे सदस्य आहेत काय?
मी पण एक असा रेल्वे चा फॅन आहे. सुदैवाने लष्करात असल्याने सरकारी खर्चाने सरकारी वेळात मी रेल्वेचा भरपूर प्रवास केला आहे. यात बऱ्याच वेळेस रेल्वचा इंजिनात बसून प्रवास करण्याचे भाग्य हि लाभले आहे. ज्यात yp ( कोळशाचे मीटर गेज चे इंजिन) वेरावळ ते गीर.
WCM -५ चे लोकमान्य इंजिन इगतपुरी ते कसारा,
YDM ४ - ब्रिगांझा घाट (कॅसल रॉक ते कुळे) आणि राणकपूर एक्स्प्रेस अबू रॉड ते महेसाणा.
WDP -४ कोयना एक्स्प्रेस कल्याण ते कर्जत.
WCG -२ सह्याद्री एक्स्प्रेस पुणे ते लोणावळा,
WDM -२ आणि WDM ३ A यात तर अनेक वेळेस.
WAM -४ कोणार्क एक्स्प्रेस (राजमंद्री ते सामलकोट)
WCAM -३ इंद्रायणी एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण
WCAM -२ कल्याण ते कर्जत डेक्कन एक्स्प्रेस.
आजही माझ्या दवाखान्याच्या समोरुन जाणारी गाडी पाहून कोणती गाडी आहे आणि तिला कोणते इंजिन लावले आहे हे पाहण्यासाठी मी पुढे होतो त्यावरून बायको थट्टा करते.
हिंदी सिनेमात रेल्वेचा असा "खून" केलेला पाहवत नाही.
त्यातून हिंदी सिनेमात सगळे लष्करी अधिकारी कायमच गणवेशात असतात आणि मधुचंद्राची रात्र संपायच्या आत "ड्युटी"वर रुजू व्हायची "ऑर्डर" असते. आणि सगळेच्या सगळे सैनिक फक्त सीमेवरच तैनात असतात.
वैद्यकीय क्षेत्रात हि केवळ नाडी पाहून "मुबारक हो" किंवा आपको दवा कि नहीं, दुवा कि जरुरत है, आय ऍम सॉरी, इस का अर्जन्ट ऑपरेशन बहुत जरुरी है असले डायलॉग पाहून डोकं उठतं. अमर अकबर अँथोनी मध्ये तर तिघांचे रक्त तीन नळ्यात गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वर चढून एका नळी त येतं आणि मग ते त्यांच्या आईच्या नसेत जातं. हा सीन पाहून न्यूटनचा आत्मा थडगं सोडून पळाला असेल
डोके बाजूला ठेवूनच हिंदी सिनेमा पाहावा लागतो.

यशोधरा's picture

30 Oct 2017 - 8:41 pm | यशोधरा

खास "फारएन्ड" वाला लेख!

मारवा's picture

30 Oct 2017 - 9:29 pm | मारवा

एकदम जबरी लेख आहे.
आवडला
फार फार आवडला फारएन्ड भौ !

गामा पैलवान's picture

30 Oct 2017 - 10:47 pm | गामा पैलवान

फारएण्ड,

शारूक्खानचा सीन मस्तंय. मुंबईच्या लोकलगाडीतला पहिला डबा जो बायकांचा असतो तो विलग होऊन पुढे जातो हे फारंच विनोदी वाटलं. मोटर तर दुसऱ्या डब्याला असते ना?

आ.न.,
-गा.पै.

वेल्लाभट's picture

30 Oct 2017 - 11:24 pm | वेल्लाभट

कहर ! जबरदस्त

निरीक्षणाची कमाल आहे ! अफलातून.

तो संदर्भ वाला शेवटचा व्हिडियो मात्र अणवेळेबळ आहे.

तुम्हाला सेन्सॉर बोर्डावर घेतला पाहिजे. मज्जा येणार आहे. असा व्यासंग हवा.

वीणा३'s picture

31 Oct 2017 - 1:44 am | वीणा३

इथल्या लोकांचा एकेका विषयावरचा अभ्यास बघितला कि खरंच थक्क व्हायला होता. मस्त लेख, (खरंतर मस्त अभ्यास + निरीक्षण )

डाम्बिस बोका's picture

31 Oct 2017 - 8:48 am | डाम्बिस बोका

तुमची निरीक्षण शक्ती अचाट आहे.

लोनली प्लॅनेट's picture

31 Oct 2017 - 10:51 am | लोनली प्लॅनेट

मस्त माहिती मी सुद्धा रेल्वे चा फॅन आह

जॉनी गद्दार सिनेमात ती बंगलोर एक्सप्रेस मुंबई हुन रात्री 9:30 वाजता सुटून सकाळी 7 वाजता बंगलोर ला पोहचणार असते म्हणजे ती मोदींची बुलेट ट्रेन च असली पाहिजे

मस्त लेख आहे... आता बायकोचे डोके खातो... धन्यवाद

पद्मावति's picture

31 Oct 2017 - 4:26 pm | पद्मावति

तसेच एखाद्या खेड्यापाड्यात सुरूवात झाल्यावर १५-२० मिनीटांनी एक रॅण्डम आगगाडी फुल पडद्यावर दाखवली म्हणजे नायक मुंबईला गेला हे ही पब्लिक ला कळते. मग त्या आगगाडीचा सीन प्रत्यक्ष बंगाल मधला का असेना. :) खास फारएन्ड टच!
मस्तं. तुमची निरिक्षणशक्ती अफाट आहे.

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2017 - 7:06 pm | टवाळ कार्टा

कहर लेख आहे =))

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Oct 2017 - 8:38 pm | माम्लेदारचा पन्खा

स्वतः रेल्वेवाले सुद्धा इतका अभ्यास करत नाहीत ! सिनेमात सगळं Larger than life असतं मग हा अपवाद कसा असेल ??

मज्जा आली लेख वाचून .......एक नंबर !!

हुप्प्या's picture

31 Oct 2017 - 10:54 pm | हुप्प्या

मागे एक लेख वाचला होता ज्यात ज्युली (१९७५) आणि विधाता ह्या सिनेमातील रेल्वेशी संबंधित काही चुका दाखवल्या होत्या त्या आता आठवत नाहीत. बहुधा इंजिन चुकीचे होते किंवा कोळशाच्या इंजिनचे ड्रायवर असताना डिझेलचे इंजिन दाखवणे असे घोटाळे झाले आहेत.

पूर्वी अनेक वर्षे कुठले स्टेशन दाखवायचे असले की पनवेल स्टेशनवर भिस्त असे कारण ते रिकामे असायचे (फार जुनी गोष्ट!). दिवा पनवेल ही दिवसातून एक किंवा दोन वेळा जाणारी गाडी सोडल्यास बाकी सामसूम असे. त्यामुळे मला वाटते शोले, परिचय ह्या सिनेमात ह्याच स्टेशनवर चित्रीकरण झालेले आहे.

दिलवाले दुल्हनिया ह्या सिनेमात आपटा हे स्टेशन (कोकणातले) पंजाबातील म्हणून दाखवले आहे.

गुलामी ह्या सिनेमात इंग्रजांच्या सत्तेचा काळ दाखवला आहे. वातावरण, लोकांच्या वेषभूषा सगळ्या जुन्या काळातल्या पण ट्रेनचे डबे WR वगैरे नव्या पद्धतीची विभागांची नावे असणारे दाखवले आहेत.

शोलेमधील मालगाडीवरील दरोडेखोरीचा प्रसंग खूपच चांगला आहे पण एकंदरीत गाडीवर लादलेली मालमत्ता पाहून नक्की काय गोष्टी चोरण्याकरता ती मालगाडी थांबवण्याचा उपद्वव्याप ते डाकू करतात ते कळत नाही. कारण बहुतेक डब्यात लाकडे, क्रूड ऑईल, कोळसे असले सामान असते. घोड्यावर स्वार डाकूंना हे सगळे बोजड सामान हलवणे कसे शक्य होते? आणि असले सामान विकणे सोपे आहे का?

babu b's picture

15 Nov 2017 - 12:11 am | babu b

शोलेचे चित्रीकरण बेलापूर भागात झाले आहे

पर्णिका's picture

1 Nov 2017 - 1:07 am | पर्णिका

लेख मस्तच, फारएन्ड ! मजा आ गया... :)

लाल गेंडा's picture

1 Nov 2017 - 9:34 am | लाल गेंडा

तुमच्या लेखाच्या शीर्षकावरून मला एकदम पु ल देशपांडे यांनी लिहिलेले पेस्तनकाका आठवले.
त्यांनी हा संदर्भ आंतरजातीय विवाहाला दिला होता.
पण झकास.

लै सूक्ष्म आणि एक्सपर्ट निरीक्षणं.

पण एक जाणवलं.. फारेंड पेटंट "इनोसंट भोळा खोचकपणा" न जाणवता सरळसोट फॅक्टस सांगण्याची शैली वाटली.

लोनली प्लॅनेट's picture

1 Nov 2017 - 11:02 am | लोनली प्लॅनेट

वरील प्रतिक्रियेत शोले बद्दल वाचून फार हसू आले
बजरंगी भाईजान मध्ये पाकिस्तान मधील रेल्वे सुद्धा निळ्याच रंगाची दाखवली आहे आता तिथे जाऊन शूटिंग करणे शक्य नसले तरी CGI वापरून ति रेल्वे हिरवी दाखवणे शक्य होते पण आपले निर्माते इतकी attention to detail दाखवत नाहीत . े

चित्रपट : टॅक्सी नो. ९२११
नाना पाटेकर जॉन abraham ला सांगतो कि माझी बायको बांद्रा स्टेशन वरून नाशिक गाडी पकडून माहेरी गेली. खरे तर बंद्र्याहून कुठलीही गाडी नाशिकला जात नाही. कारण बांद्रा पश्चिम रेल्वे वर आहे आणि नाशिक मध्य रेल्वे वर, ते सुद्धा कल्याण हून दोन फाटे फुटतात त्यातले नॉर्थ म्हणजे कसारा मार्गे नाशिकला जाता येते.
चित्रपट : मुंबई पुणे मुंबई
जोश्या मुक्त बर्वेला सोडायला पुणे स्टेशन वर येतो, तेव्हा ते एकमेकांना बये करतात , पण नंतर काही अंतरावर जाऊन पुन्हा स्लोव motion मध्ये मागे चालत येतात, यात मुक्ताला दाखवतात त्या शॉट मधील रेल्वेच्या घड्याळ्याची वेळ आणि जोश्याला दाखवतात त्या शॉट मधील रेल्वेच्या घड्याळ्याची वेळ यात १०-१५ मिनिटांचा फरक आहे. कारण सोप्पं आहे दोघांचे शॉट थांबून अथवा रिटेक घेऊन करण्यात आले आहेत.

रेल्वेच्या दुनियेबद्दल खुप माहिती मिळाली . "बीबीसीआय ला जीआयपीचा डबा " सांगणारा अंतु बर्वा शेठ यांचा मित्र आठवला .

रेल्वेप्रमाणेच आणखी काही बाबतीत पेटंट ब्लूपर्स असतात.
१. पर्वतरांगा.. हिमालय (बर्फाच्छादित ऑर अदारवाईजही), सह्याद्रि, नीलगिरी, आल्प्स वगैरे पर्वतांचे खडक आणि एकूण रचना खूप वेगवेगळी आहे. तरीही या जागांची हिल स्टेशन्स सर्रास एकमेकांच्या नावे खपवली जातात. जो जीता वोही सिकंदर या नितांतसुन्दर सिनेमात पहिला शब्दच "देहरादून" असा आहे. नंतर सायकल रेसमधे पायकारा रोड म्हणजे दक्षिण भारत.. मग मधेच बारामुल्ला घाटी.. म्हणजे हिमालय.. आणि त्यानंतर शेवटच्या रेसमधे "कोडाईकनाल"की सबसे ऊँची चोटी पर वगैरे..

२. गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर्स (नेमप्लेट्स) या नेहमी
MH04, MH 01 वगैरे मराठी मातीतल्या. मग कथानक अगदी राजस्थान किंवा एमपी यूपीतलं असलं तरी.

आगाऊ म्हादया......'s picture

2 Nov 2017 - 7:16 am | आगाऊ म्हादया......

केवढा अभ्यास आहे तुमचा. बापरे. साला आमच्यासारखे लोक आहेत म्हणून ह्या विनोदी दिग्दर्शकाचं फावतंय.

जेम्स वांड's picture

2 Nov 2017 - 8:07 am | जेम्स वांड

तुम्ही एक्स्ट्रीम रेल फॅन दिसता आहात बुआ, फारच मस्त लेख, इतकं लिहायला रेल्वेची तपशीलवार माहिती असणे गरजेचे असते खरे.

एक आठवलेला ब्लूपर म्हणजे सचिन खेडेकर असलेल्या 'बोस द फोर्गोटन हिरो' सिनेमातील, सुभाष बाबू, महंमद झियाउद्दीनच्या वेषात जेव्हा बिहार (आजचा झारखंड) मधील आडवळणाच्या गोमोह स्टेशन वरून 'फ्रांटीयर मेल' पकडतात तेव्हा दाखवलेलं स्टेशन खास ब्रिटिश टच मध्ये आहे, पण तीच फ्रांटीयर मेल जेव्हा पेशावरला थांबते तेव्हा बाबूजी चक्क निळ्या डब्यातून उतरतात, श्याम बेनेगल सारख्या दिग्दर्शकाला जर हे चुकले तर आजच्या केजो फेजो कडून काय अपेक्षा ठेवावी........

नितिन थत्ते's picture

2 Nov 2017 - 8:29 pm | नितिन थत्ते

गोमोह स्टेशन आडवळणाचे नाही हो मोठे जंक्शन आहे.

हर्मायनी's picture

2 Nov 2017 - 2:55 pm | हर्मायनी

अभ्यास फारच दांडगा आहे तुमचा.
अजून ऍड करायचा म्हणजे चेन्नई एक्सप्रेस सिनेमामध्ये चेन्नई एक्सप्रेस चक्क दूधसागरच्या इथून जाताना दाखवली आहे. :D

मनिमौ's picture

3 Nov 2017 - 10:16 am | मनिमौ

तुमची निरीक्षण शक्ती थक्क करणारी आहे

असंका's picture

4 Nov 2017 - 10:23 am | असंका

धुम 2 मध्ये ह्रतिक रोशन रेल्वे ट्रॅक शेजारुन डेझर्ट सर्फिंग करताना वाळूवर आधीच्या शॉटमध्ये झालेल्या खुणा सहज दिसतात....

असंका's picture

4 Nov 2017 - 10:59 am | असंका

धुम 2 मध्ये ह्रतिक रोशन रेल्वे ट्रॅक शेजारुन डेझर्ट सर्फिंग करताना वाळूवर आधीच्या शॉटमध्ये झालेल्या खुणा सहज दिसतात....

गामा पैलवान's picture

5 Nov 2017 - 12:11 am | गामा पैलवान

दाबंग सिनेमात रेल्वे स्टेशनातली मारामारी चौक स्थानकात चित्रित केली आहे. पुलावरून घेतलेल्या चित्रणात तीनही रूळ मोकळे दिसतात. पण लगेच मधल्या रुळावरून मालगाडी पुढे जातांना दिसते. नंतर दोनच मिनिटांत उलट दिशेने दुसरी गाडी येतांना दिसते. प्रत्यक्षात चौक स्थानक कर्जत पनवेल मार्गावर असून तो एकेरी मार्ग आहे.

चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=9C5X0ftyxj0

-गा.पै.

गामा पैलवान's picture

5 Nov 2017 - 12:11 am | गामा पैलवान

दबंग सिनेमात रेल्वे स्टेशनातली मारामारी चौक स्थानकात चित्रित केली आहे. पुलावरून घेतलेल्या चित्रणात तीनही रूळ मोकळे दिसतात. पण लगेच मधल्या रुळावरून मालगाडी पुढे जातांना दिसते. नंतर दोनच मिनिटांत उलट दिशेने दुसरी गाडी येतांना दिसते. प्रत्यक्षात चौक स्थानक कर्जत पनवेल मार्गावर असून तो एकेरी मार्ग आहे.

चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=9C5X0ftyxj0

-गा.पै.

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2017 - 7:05 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला. खास फार एंड स्टाइल डिसेक्शन !
स्वाती

फारएन्ड's picture

6 Nov 2017 - 6:47 am | फारएन्ड

सर्वांचे आभार!

नितिन थत्ते - नोटेड :)
सुबोध खरे - मी सदस्य नाही पण त्या साइट वर अनेकदा जातो. तुमचा इंजिनांचा अनुभव जबरी असेल. लिहा कधी जमले तर. आवडेल वाचायला. मी सुद्धा कधीही गाडी दिसली की ती नीट निरखून बघतोच - इंजिन कोणते आहे वगैरे. पूर्वी मी व माझे काही मित्र याबद्दल सतत एकमेकांना माहिती द्यायचो - इंजिनांचे प्रकार, ते डब्यांवर असलेले कोड्स, ट्रॅक्स च्या बाजूला असलेले विविध सिग्नल्स व साइनबोर्ड्स, त्यांचे अर्थ ई. मजा यायची.

गापै - तो लोकलचा वेगळा झालेला डबा पाहून मलाही आश्चर्य वाटले होते. तो इंजिन वालाही वाटत नाही.
हुप्प्या - शोले बद्दलचा प्रश्न आता तुम्ही विचारल्यावर मलाही पडला आहे :). डांबराची पिंपे ई दिसली. अजून काय माल असतो कोणास ठाउक :)
गवि - हो विनोदी लिहायचा असे डोक्यात नव्हते. लिहीता लिहीता जे सुचले तितकेच लिहीले. पंचेस वगैरे टाकायचा प्रयत्न केलेला नाही.

प्रतिक्रियांमधे लिहीलेले सीन्सही पाहतो आता. मला माहीत नव्हते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

मित्रहो's picture

6 Nov 2017 - 10:27 am | मित्रहो

मस्त लेख आहे. तुमची निरीक्षण शक्ती अफाट आहे. द बर्निंग ट्रेन हा रोहीत शेट्टीच्या पिक्चरसारखा आहे. त्यात कधीही काहीही होउ शकते. फक्त रोहीत शेट्टी असता तर साऱ्यांनी स्कॉर्पियोमधून उड्या घेतल्या असत्या. हवेत स्कॉर्पियो उडाली असती आणि मग त्यातून ट्रेनच्या टपावर उडी घेतली असती.

सौन्दर्य's picture

15 Nov 2017 - 1:22 am | सौन्दर्य

तुमची निरीक्षण शक्ती जबरा आहे. हिंदी सिनेमे बघताना असेही डोके बाजूला काढून ठेवायचे असते त्यामुळे इतक्या बारकाईने तुम्ही दाखवून दिलेल्या चुका कधी लक्षातच आल्या नाही. गम्मत म्हणजे तुमचा लेख वाचून झाल्यावर 'त्या चुका' पाहण्यासाठी का होईना डोके ताळ्यावर ठेऊन ते सिनेमे बघावेसे वाटू लागले आहे. लेख मस्तच.

पु ल देशपांडे यांची आठवण झाली

अंतूशेटच्या मुलाचा ..... बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे ... इ. इ.

असो ...

निरीक्षण शक्ती ला सलाम