सिनेमावाला विज्या

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
"विज्या, आज कॉप्या पुरवता नाही येत आपल्याले" मी धावतच सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या विज्याच्या गँगला सांगितले.
"कोण अडवते बे आमाले?” पोरे माझ्यावरच ओरडली.
"थांबा बे पोट्टेहो." विज्याच्या एका आवाजात पोरे चूप. त्याने त्याच्या बच्चन कट केसातून हात फिरविला, डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, विडीचा धूर सोडला आणि मला विचारले,
"पण काहून बे बारक्या?"
"मास्तर सांगत होता, आज इन्सपेक्टर येनार हाय."
"पोलीस" विज्या हलकेच हसला. "डॉन का इंतजार तो बारा मुलखोकी...."
"तो इन्सपेक्टर नाही, शाळंतला इन्सपेक्टर."
"हा कोण रायते? अंदर मेरा जिगरी यार पेपर दे रहा है, मालूम? तो पास नाही झाला, तर भाऊ का म्हणन?"

दर वर्षी याचा कोण मित्र पेपर देतो आणि तो मित्र पास झाला काय आन नाही काय, याने भाऊला - म्हणजे साक्षात अमिताभ बच्चनला काय फरक पडतो, हे एक को़डेच होते. तेव्हा मात्र असे विचार येत नव्हते. विज्या सांगेल तीच पूर्व दिशा हेच डोक्यात ठेवून आम्ही त्याच्या मागे फिरत होतो. विज्यासुद्धा आपण गावाचा हिरो आहे हे सिद्ध करण्यासाठी विविध धंदे करीत होता. विज्या, विजय देवरावजी चव्हाण, देवरावजींचा आशेचा कंदील, पण हा कंदील सिनेमाच्या अंधारातच जास्त रमत होता. या विज्याने आपल्या बापाचे बारसे करून टाकले होते. तो लोकांना आपली ओळख 'पूरा नाम विजय दीनानाथ चव्हाण, बापका नाम दीनानाथ चव्हाण' अशी करून देत होता. बाकीच्यांचे नशीब बलवत्तर, नाहीतर अग्निपथच्या नादात कुणाकुणाचे बारसे झाले असते. सिनेमा विज्याच्या अंगाअंगात मुरला होता, त्याच्या श्वासाश्वासात सिनेमा होता, त्याच्या वाक्यावाक्यात सिनेमा होता. विज्याचे विश्व सिनेमापासून सुरू होऊन सिनेमापाशी संपत होते. त्याच्या विश्वातले त्याचे दैवत होते अमिताभ बच्चन. कुलीच्या वेळेला अमिताभला अपघात झाला, तेव्हा विज्याने सोळा शनिवार निरंकार उपास केला होता म्हणतात. अमिताभच्या सिनेमातली अमिताभगिरीच तो आचरणात आणीत होता. अमिताभगिरीच्या नावाखाली गावातल्या पोरांना पास करण्यासाठी कॉप्या पुरविणे, शाळेत मास्तर सांगतील त्याच्या विरुद्ध जाणे, कालच भेटलेल्या मित्राच्या प्रेमासाठी दुसऱ्या गावात जाऊन मारका करून येणे असे धंदे विज्या नेहमीच करीत होता. उद्देश होता गावातला अमिताभ विज्याच आहे अशी प्रतिमा उभी करणे.
"तूले का भेटते बे असे लफडे करून?" असे त्याला विचारले तर तो उत्तर द्यायचा.
"काही गोष्टी फायदा आन नुसकानीच्यावर रायते बारक्या. मेरी पिक्चरका हिरो मै हूं. हिरो हाय तर लफडा होनार, कारण लफडा असन तरच हिरो रायते. लफडा नसन तर साली जिंदगी म्हणजे शो संपलेल्या पिक्चरच्या टिकिटावाणी हाय. तेचा का उपेग?"

तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या मुलाला त्या वेळी त्याचे हे तत्त्वज्ञान भयंकर आवडायचे. हाच आपला अमिताभ आहे अशी मनातल्या मनात खातरी व्हायची. विज्या तसा माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा होता. मी लहान असल्यापासून मला विज्या आणि त्याच्या गँगचे प्रचंड आकर्षण होते. हिवाळ्यात गावी गेलो की तिथे दोनच विषय असायचे - सिनेमा आणि विज्या. मुले विज्याचे किस्से सांगायचे. विज्याने कसा टॉकिजमध्ये धिंगाणा घातला, गाण्याच्या वेळेला शिट्ट्या वाजवून सारी टॉकीज डोक्यावर घेतली.... हे असे किस्से ऐकले की मलाही विज्याच्या गँगसोबत फिरावे असे वाटायचे. आजी आधी मला या मुलांबरोबर जाऊ देत नव्हती. सहावी झाल्यानंतरच्या उन्हाळ्यात प्रथमच हिम्मत करून मी विज्याच्या गँगबरोबर शेठजीच्या वाडीतले आंबे तोडायला गेलो होतो. ते चोरून आणलेले आंबे मोठ्या मजेत मी खात होतो
"काय बारक्या, मजा आली का नाही आज?"

मी मान डोलावली आणि त्या दिवसापासून मी विज्याच्या गँगचा बारक्या झालो. सातवीतला शहरी बारीक पोरगा म्हणून विज्याने माझे नाव बारक्या ठेवले होते. मी आधी आजीला न सांगता जात होतो. मग तिला कळले तरीही जात होतो. तशीही मुले उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीतच गावी येतात म्हणून तीही दुर्लक्ष करीत होती. मी जसा विज्याच्या गँगमध्ये रुळत गेलो, तशी माझी आणि विज्याची मैत्री वाढत गेली. आम्ही अमिताभच्या चित्रपटावर चर्चा करायचो. अग्निपथ यायच्याआधी विज्याचा आवडता अमिताभपट होता मुकद्दर का सिकंदर. नावाच्या साधर्म्यामुळे असेल, अग्निपथ आल्यानंतर मात्र तोच चित्रपट विज्याचा आवडता झाला. अग्निपथनंतर तो तसाच आवाज बदलून बोलत होता, सारखा 'पूरा नाम' असेच करीत होता. मला टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा बघायला परवानगी नव्हती, म्हणून मग मी टीव्हीवर सिनेमा बघायचो. विज्याने सांगितलेला सिनेमा टीव्हीवर कधी येईल, याची वाट बघायचो. विज्याला मात्र टीव्ही हे काय प्रकरण आहे याची अजिबात कल्पना नव्हती. मी विज्याला टीव्ही बघण्यासाठी वर्ध्याला ये म्हणून सांगितले. दर वर्षी गावावरून धान्य वर्ध्याला यायचे, त्या वर्षी विज्या आमच्या बंडीसोबत धान्य घेऊन वर्ध्याला आला. टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुरू होती. टीव्हीवरची मॅच बघून तो भलताच खूश झाला.
"बारक्या, लय खासच चीज हाय यार तुया टीव्ही. हे बंदं खरं रायते का आपल्या पिक्चरवाणी?"
टीव्हीतली मॅच जरी खरी असली, तरी सिनेमात जे दाखवितात ते वास्तव नसते, त्याचा वास्तवाशी दूरान्वयानेही संबंध नसतो हे विज्याला कोण सांगणार? कुणी चुकूनही असा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचे वास्तव तिथेच संपण्याची शक्यता होती. एक माणूस मात्र रोज विज्याला या वास्तवाची जाणीव करून देत होता, रोज ओऱडून विज्याला सांगत होता सिनेमा काही खरे नाही, सिनेमा म्हणजे आयुष्य नाही. ती व्यक्ती म्हणजे विज्याचा बाप, देवरावजी चव्हाण.

"सिनेमे पाहूनच पोट भरनार हाय का तुया लेकराचं?" विज्या झोपला असला, तरीही त्याला ऐकू जाईल अशा आवाजात ओरडल्याशिवाय विज्याच्या बापाचा दिवस उजाडत नव्हता. सिनेमा, अमिताभ हे शब्द जरी जरी कोणी विज्याच्या बापासमोर उच्चारले, तरी तो विंचू चावल्यासारखा चवताळून उठायचा. अमिताभ आणि विज्या दोघांनांही तोंडात येईल त्या शिव्या द्यायचा. अमिताभनेच आपल्या पोराच्या आयुष्याचे वाटोळे केले आहे, अशी त्याची ठाम समजूत होती. झिजून फाटलेल्या चपला त्याने कडूलिंबाच्या फांदीला अडकवून ठेवल्या होत्या.
"येकदिस नाही त्या अमिताभची या खेटरानं पूजा केली, तर माय नाव देवराव नाही." अशा शिव्या देत विज्याचा बाप विडी ओढत खोडावर बसायचा.
मी गावात गेलो की विचारायचो. "काकाजी, इज्या कोठ गेला जी?"
या प्रश्नावर काकाजीचे एकच उत्तर ठरलेले होते. "गेला मसनात." बरोबर बाबा असतील, तर मग देवरावजी आपले दुःख बाबांना सांगत.
"का सांगू बापू तुम्हाले, फुकट हादडाची सवय लागली या पोट्ट्याले. खायले कार आन भुइले भार. येका कामाचं नाही जी हे पोट्टं. मांग याले बैलं चाराले ने म्हटलं, तर यानं हरभऱ्यात बैलं घातले जी. अर्धा हरभरा बैलानं खाल्ला. तुम्ही याले वर्धेले घेउन जा आन द्या चिकटवून कुण्या टाकीजमंधी. गेट किपर म्हणून राहीन सिनेमे पाहत दिवसभर."

बापाच्या अशा बोलण्याचा विज्यावर कधीच काही परिणाम झाला नाही. बापाने कितीही बडबड केली, तर विज्या तेच करायचा जे त्याला करायचे असायचे. दर शुक्रवारी काहीतरी निमित्त काढून सिनेमा बघायला हिंगणघाटला जाणे, रात्रीचा शो बघून उशिरा घऱी येणे, सकाळी उशिरा उठणे, आरामात आंघोळ करणे, अर्धा तास भांग पाडणे. शाळा-कॉलेज ह्या गोष्टी कधी विज्याच्या पचनी पडल्या नाहीत. विज्या दहावी पास झाला होता हे ऐकून होतो. पुढे त्याने शिक्षण का सोडले, म्हणून एकदा त्याला विचारले तर त्याने उत्तर दिले.
"याराना, दोस्ती, दुसरं का? आपला दोस्त येका पोरीच्या प्रेमात पडला. लय रडत व्हता. म्या इचार केला, भाऊ का म्हणन. गेलो, त्या पोरीले उचलून आणाले. पण साला पत्ता उलटा पडला. तिच्या भावान पायलं, मारका झाला, पोलीस केस झाली, येका रात्रीची जेल झाली. आता जेलात गेलेल्या माणसाच कॉलेज कायच रायते बे?"
"जेलगिल म्हणजे जास्तच झालं."
"जास्त कायच बे, भाऊ तर किती वेळा जेलमंधी जाते. आपण येक डाव गेलो तर का बिघडलं?" विज्याला अजिबात पश्चात्ताप नव्हता, उलट झाले त्याचा अभिमान होता. मीही मोठा होत होतो, तेव्हा विज्याच्या अशा वागण्याची मला आता भीती वाटत होती. त्याने अमिताभगिरी कमी करावी, असे मला मनोमन वाटत होते. मी समजावून बघत होतो.
"तू इकडं हे असे धंदे करत रायतो आन तिकडं काकाजी बोंबलत रायते न लेका."
"मी माया बुढ्याचं कायले लोड घ्याले जातो बे? बापाचा जन्मच पोट्ट्यायले तरास द्याले झाला रायते. त्याचं कामच ते हाय, पोट्ट्यायले तरास देनं. शराबी नाही पायला, त्याचा बाप कसा तरास देत होता आपल्या पोराले. म्या तुले सांगतो बारक्या, त्या त्रिशूलमंधी बी संजीवकुमारले मालूम रायते हा आपला पोरगा हाय." आपण नकारार्थी मान हलविली, तरी आमचा सलीम जावेद काही ऐकायचा नाही. "त्याले बराबर मालूम रायते. बापाची जात, ते पोट्ट्यायले तरास दिल्याबिगर जमतच नाही त्याले. म्या म्हणतो, आपला पोरगा नाही झाला गुंडा, झाला इन्सपेक्टर, तर का बिघडलं होतं? पण नाही, तो बाप तरीबी पोराले तरास देते. तुले सांगतो बारक्या, भाऊले जेवढा तरास गुंड्यान दिला नसंन, तेवढा तरास बापानं दिला हाय. जिथ भाऊच बापाच्या तकलीपीतून सुटला नाही, तर म्या कसा सुटीन बे?"
विज्याचे हे उत्तर याआधीसु्द्धा बऱ्याचदा ऐकले होते. विज्याच्या अशा बोलण्यामुळे माझ्या मनात विज्या म्हणजे शराबीमधला अमिताभ आणि देवराव काकाजी म्हणजे प्राण अशीच प्रतिमा तयार झाली होती. फरक एकच होता - प्राणकडे मोठा बिझनेस होता, तर काकाजीकडे फक्त वीस एकर शेती होती. आपला बाप हेच आपल्या दारू प्यायचे कारण आहे हे विज्या नेहमी सांगायचा.

"आज ये शराब मुझे लेबल की तरह चिपकी है ना, तो उसकी वजह मेरा बाप है बारक्या. ज्या दिवशी माया बाप सकाळी उठून बकबक करनं सोडून देइल नाम त्या दिवशी म्या बी दारू सोडून देइन. गॉडप्रॉमिस." विज्याच्या मागे फिरणाऱ्या आमच्यासारख्यांना हे सारे खरे वाटत होते. त्या वयात माझे असे मत झाले होते की केवळ बडबड करणाऱ्या बापामुळेच मुले दारू प्यायला लागतात. कुणीही दारू पिऊन लोळलेला दिसला की त्याचा सकाळी उठून बडबड करणारा बाप माझ्या डोळ्यासमोर यायचा.

विज्याच्या बापाने बडबड कमी नाही केली, पण एक दिवस विज्यालाच घरातून हाकलून लावले. गावातल्या पोरांना पास करायचे समाजकार्य विज्याच्या अंगलट आले. गणिताच्या पेपरला कॉपी पुरवता आली नाही, तेव्हा आता गावातला पोरगा दहावीला नापास होणार, म्हणून विज्याने बोर्डात ओळख काढून पेपर कुणाकडे तपासायला गेले याचा पत्ता काढला. विज्या आणि मी त्या पोराला घेऊन सरळ त्या मास्तरच्या घरी वायगावला पोहोचलो.
"चावी इकडे आहे मास्तर" विज्याने दरवाजा बंद करीत डायलॉग फेकला. मास्तर वायगावात खोली करून एकटाच राहत होता.
"चावी नाही, मी पेन शोधतोय.” असे म्हणत मास्तरने वर बघितले. पायात कथ्थ्या रंगाची पँट, अंगात रंगीत बनियान, त्यावर बटन न लावलेले जॅकेट, गळ्यात मफलर, बच्चन कट अशा अवतारात एक हात कंबरेवर ठेवून आपला कोण विद्यार्थी भेटायला आला, हेच मास्तरला समजत नव्हते. मास्तरने आजूबाजूला बघितले, आणखी दोन पोरे दिसली.
"कोण तुम्ही? काय पाहिजे?”
"तू मुझे वहा ढूंढ रहा है मास्तर और मै तेरा यहा इंतजार कर रहा हूं" विज्याने विनाकारण डायलॉग फेकला. डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, तोंडातल्या विडीचा धूर सोडला. मास्तर काही बोलणार, तेवढ्यात विज्याने हातातला चाकू बटन दाबून उघडला. चाकूचे धारदार पाते मास्तराच्या खोलीतल्या दिव्याच्या मंद प्रकाशातसुद्धा चमकत होते. चाकू बघताच मास्तर घाबरला. विज्या हळूहळू चालत मास्तरच्या जवळ गेला. त्याने तो चाकू मास्तरच्या मानेवर धरला. मास्तरला घाम फुटला, त्याचे हातपाय लटलट कापायला लागले. मास्तरने विचारले.
"काय पाहिजे?”
"पेपर"
"आलमारीत” मास्तरने घाबरतच उत्तर दिले.
"तुझा पेपर काढ बे.” आम्ही पेपरावरची अक्षरे ओळखून त्या पोराचा पेपर त्या गठ्ठ्यातून शोधून काढला.
"मास्तर, हा पेपर आणि हा पोरगा. पास झाला पाहिजे.”

पोरगा पास झाला, पण विज्या नापास झाला. सहा महिन्यांनी विज्याच्या बहिणीची सोयरीक जुळली. त्याच्या दुर्दैवाने ती जुळली ती नेमकी त्या मास्तरशीच. बोलणी झाली आणि साखरपुड्याला मुलाकडची मंडळी गावात आली. मी त्या वेळेला गावातच होतो. मी मास्तरला ओळखले तसे विज्याला गाठले. त्याला सारी माहिती दिली. लग्न होईपर्यंत विज्याने मास्तरला तोंड दाखवायचे नाही असे ठरले. आता बाहेर कुठे पडला तर कुणाला तरी दिसेल, म्हणून विज्या कुटाराच्या रिकाम्या ढोलीत जाऊन लपला. कार्यक्रमाची जबाबदारी आम्ही उचलली. विज्याच्या बापाला विज्याची कमी भासू द्यायची नाही हाच उद्देश होता. बहिणीचा पानसुपारीचा कार्यक्रम आणि तिचा भाऊ घरात नाही, म्हणून विज्याचा बाप त्याच्या आईजवळ कुरकुर करीत होता. विज्या दिसला का? म्हणून आम्हाला विचारत होता आणि आम्ही सारे एकच उत्तर देत होतो, "येथंच तर व्हता जी काकाजी." सारे ठरल्याप्रमाणे सुरू होते. पण विज्या लघ्वीला गेला आणि घोटाळा झाला. नेमके त्याच वेळेला विज्याच्या बापालासुद्धा लघ्वी लागली. विज्या न्हाणीघरातून बाहेर पडत असताना त्याने विज्याला पाहिले. त्याचा हात धरून त्याची आपल्या होणाऱ्या जावयाशी ओळख करून दिली. मास्तरने विज्याला ओळखले, पण तो काही बोलला नाही. विज्याला वाटले, मास्तर चेहरा विसरला. आपण उगाचच घाबरत होतो. तीन दिवसांनी सोयरीक मोडली म्हणून निरोप आला. विज्याच्या बापाने चौकशी केली, तेव्हा खरे काय ते समजले. विज्याच्या बापाने त्याला बदडून काढले आणि घरातून हाकलून लावले. तेव्हापासून विज्या गावातल्या देवळात राहायला लागला.

पेपर प्रकरणात मी होतो ही गोष्ट आमच्या घरी समजली आणि अपेक्षेप्रमाणे माझे गाव बंद झाले. शिक्षण पूर्ण होईपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही अशी मला सक्त ताकीद मिळाली. माझे बारावी झाले आणि मी इंजीनियरिंगसाठी अमरावतीला गेलो, त्यामुळे विज्याशी भेट बंदच झाली. सिनेमा बघताना टॉकीजमधे शिट्ट्या ऐकल्या की विज्या आठवायचा. मित्रांसोबत अमिताभच्या सिनेमावर चर्चा करताना विज्याच्या तोंडून ऐकलेले अमिताभचे संवाद आठवायचे. मुकद्दर का सिकंदरमधील अमिताभचे मेमसाहबविषयीचे संवाद बोलताना विज्याचा आवाज कापरा व्हायचा. कुणीतरी मेमसाहब विज्याला आतल्या आत खात असावी, असे आता वाटते; पण तेव्हा हे सार कळावे असे वय नव्हते. विज्याची गोष्ट सांगायची पद्धत आठवायची - 'भाऊनं हवेत उडून येकच फाइट मारली तर च्याभन चार पोट्टे येका झटक्यात खल्लास.' विज्या सिनेमा बघत नव्हता, तर तो सिनेमा जगत होता.

कॉलेज संपल्यानंतर मी गावी गेलो होतो. विज्या अजूनही देवळातच राहत होता, रोजंदारीचे काम करून पोट भरीत होता. त्याच्या तिन्ही बहिणींची लग्ने झाली होती. बापलेकात अजूनही विस्तव जात नव्हता, त्यामुळे विज्याचे लग्न मात्र राहिले होते.
"का इज्या, कंचा पिक्चर पायला येवढ्यात?”
"कोठ बे, पिक्चरगिक्चर बंद. तुले सांगतो बारक्या, आता खिशात पैसे रायते, पण पिक्चर पाहाच मन नाही होत.”
"काहून?”
"भाऊचे पिक्चर येनं बंद झालं यार आता.”
"भाऊचे नाही, तर शाहरुखचे पाहाचे.”
"ह्येट, नाव नको काढू. मांग नथ्था मले तो डर पाहाले घेउन गेलता. तो का साला पिक्चर हाय? मले सांग, भाऊले मेमसाब आवडे का नाही? जवा भाऊले समजते हे आपल्या दोस्ताची लवर हाय, तवा भाऊ त्यायच्या मंधी आला का? भाऊनं मरतवरी आपल्या दोस्ताले समजू देलं नाही का हेच पोरगी भाऊची मेमसाब हाय ते. याले म्हणते लव आन याले म्हणते दोस्ती. नाहीतर तो शारुक आपल्या दोस्ताच्याच पाठीमंधी खंजर खुपसाले जाते बे. हे असं रायते का कधी?”

नोकरीच्या निमित्ताने मी मुंबईला आलो आणि माझा गावाशी संपर्क तुटला. आजीच्या तोंडून गावात काय चाललेय याची माहिती मिळत होती. 'रिश्तेमे हम तो तुम्हारे बाप लगते है' अस म्हणणारा विज्या आता खरेच बाप झाला होता. त्याचा बाप त्याला घरी घेऊन गेला होता. विज्या आता घरची शेती सांभाळत होता. दोन वर्षांपूर्वी गावाला गेलो होतो. अठरा वर्षांनंतर मी गावात पाऊल टाकीत होतो. आजीसुद्धा गावात राहत नसल्याने आमचे गावातले घर आता बंद होते. गावात घरोघरी मोटारसायकली आणि डिश दिसत होती. विज्याच्या घरातूनही टीव्हीचा आवाज येता होता. देवराव काकाजी त्याच खोडावर बसले होते. म्हातारा पूर्ण खचला होता. एका डोळ्यात मोतीबिंदू झाला होता, हातात काठी आली होती.
"कोण बापू व्हय का जी, कोठ चालले?”
"जाउन येतो वावरात, याला वावर दाखवून आणतो.”
"हा मोठा व्हय ना तुमचा?”
"हो.” बाबांनी सांगितले.
मला राहवले नाही आणि मी नेहमी विचारायचो तो प्रश्न विचारला.
"काकाजी, इज्या कोठ गेला जी?”
"इज्या असन वावरात.” 'मसनात'चे आता 'वावरात' झाले होते. सुखद बदल असला, तरी कानाला सवय नसल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. मी लगेच वावराच्या दिशेने निघालो. विज्याच्या वावराजवळ मला एक मोटरसायकल उभी दिसली. त्याच्या नंबर प्लेटवर अमिताभचा फोटो होता. माझी खातरी झाली, विज्या जवळपासच असला पाहिजे. तो लगेच दिसला. सोयाबीनची मशीन लावली होती. गळ्याभोवती मफलर गुंडाळून विज्या कामावर नजर ठेवून होता. खाली एक साधी फुलपँट आणि वर पांढऱ्या रंगाचा शर्ट होता. आता पूर्वीचा बच्चन कट राहिला नव्हता आणि जे केस होते, त्यातले अर्धे पांढरे झाले होते. बोटात विडी मात्र होती. विज्याने मला ओळखले.
"वर्धेवरुन येउन रायला का?”
"हो, आताच आलो.”
"तू मुंबईलेच हाय ना आता ?”
"हो."
"का म्हणते तुयी मुंबई?”
"मायी कायची बे, तू येन कधी मुंबईत?”
"म्या का करु तेथ येउन?”
"पिक्चर पाहू, भाऊचा बंगला पाहू.”
विज्या फक्त हसला. अमिताभचे नाव काढल्यानंतर त्याच्या डोळ्यात दिसणारी चमक आता दिसत नव्हती. अमिताभगिरी तर कधीच संपली होती, पण आता आत दडलेला अमिताभसु्द्धा हरवला होता. तो सिनेमावाला विज्या संपला होता. वास्तवात जगणारा विज्या हे चित्र सुखावह होते, बुद्धीला आनंद देणारे होते, तरीही माझे मन मात्र त्या सिनेमावाल्या विज्याला शोधत होते.
तेवढ्यात विज्या बोलला, "याले घेउन जा."
मी मागे वळून पाहिले. एक दहा वर्षाचा पोरगा छाती नसली तरीही छाती काढून चालत येत होता. मनगटात मनगटाच्या आकारापेक्षा मोठी चेन होती. मुलाने डावा अंगठा नाकाजवळ नेला, दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि म्हणाला.
"बाबा, आई तुम्हाले जेवाले बलावून रायली.”

मी मनातल्या मनात हसलो. 'सिनेमावाला विज्या' अजूनही संपला नव्हता तर ......

(काल्पनिक)
Footer

कथा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

19 Oct 2017 - 12:56 am | लालगरूड

खूप छान

संग्राम's picture

19 Oct 2017 - 2:13 am | संग्राम

मस्त

सुखीमाणूस's picture

19 Oct 2017 - 8:09 am | सुखीमाणूस

मजा आली वाचताना

गुल्लू दादा's picture

19 Oct 2017 - 8:53 am | गुल्लू दादा

खूप सुंदर रंगवलाय विज्या. मज्जा आली वाचून.

चौकटराजा's picture

19 Oct 2017 - 9:31 am | चौकटराजा

आज प्यी येल असते तर त्यानी शाबासकी दिली असती. नागपूरी बोलीचा सुंदर वापर, मधे काही काळ गेलेला दाखवणे, बारक्या व विजा यांच्या आयुष्यातील घडामोडी, विजाचा बाप हे बाजूकडील आणखी एक व्यक्तीमत्व यानी हे सारं सजून आलं आहे. त्यात नाट्यमय शेवट हा खास घटक ही यात वापरलाय ! वाह वा !

मित्रहो's picture

19 Oct 2017 - 1:52 pm | मित्रहो

अशीच शाबासकीची थाप नवीन काही लिहायला स्फूर्ती देते. अशीच माया असू द्या म्हणजे मग आम्ही सुचेल तसे लिहीत राहू.

मस्त लिहिलंय..तुम्ही म्हणताय काल्पनिक पण एकदम खरंखुरं वाटतयं

पगला गजोधर's picture

19 Oct 2017 - 3:07 pm | पगला गजोधर

छान

1++

अनामिक's picture

19 Oct 2017 - 4:57 pm | अनामिक

मस्तंच! छान जमलंय लेखन.

निशाचर's picture

19 Oct 2017 - 8:55 pm | निशाचर

आवडलं!

जब्बरदस्त लिहिलंय.
अप्रतिम

जयंत कुलकर्णी's picture

19 Oct 2017 - 9:45 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच !

पैलवान's picture

19 Oct 2017 - 9:51 pm | पैलवान

एक म्हणजे सकारात्मक बदल दाखवला ते मनापासून आवडलं.
आणि दुसरं म्हणजे अभ्या..चा मिथुन आठवला.

दोन्हींना +१.

छान लिहिलं आहे.

कविता१९७८'s picture

20 Oct 2017 - 7:18 am | कविता१९७८

छान व्यक्तिचित्रण

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 11:48 am | पद्मावति

मस्तं, मस्तं!

जव्हेरगंज's picture

20 Oct 2017 - 12:25 pm | जव्हेरगंज

जबरी!

नाखु's picture

20 Oct 2017 - 12:47 pm | नाखु

वाटलं नाही

शालेय जीवनात बच्चन पेट असलेला नाखु शिनेमावाला

प्रास's picture

20 Oct 2017 - 5:03 pm | प्रास

काल्पनिक न वाटणारा कल्पनाविलास...!

मस्तं लिखाण!

सिरुसेरि's picture

20 Oct 2017 - 7:29 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . सिनेमावाला विज्या आयुष्यात सेट झाला हे पाहुन बरे वाटले . आता सिनेमावाला विज्या ची इनिंग संपुन छोटे भाईजान येउन राहिले .

ताकदीनं रंगवलंय व्यक्तिचित्र. अंतूशेठच्या स्टाईलनं सांगायचं तर लेखणीत मज्जा आहे तुमच्या.

स्नेहांकिता's picture

21 Oct 2017 - 12:26 pm | स्नेहांकिता

खरंच काल्पनिक असेल तर सर्व बारकाव्यांसाठी शाब्बास !!

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2017 - 4:13 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! अत्यंत प्रभावी शब्दचित्र आहे. कथानकाने मनाची पकड घ्यायला किंचित वेळ लावला पण मध्यापासून शेवटापर्यंत शब्दशब्द मनावर परीणाम करीत गेला आणि शेवट अनपेक्षित आणि मनाला चटका लावणारा वाटला.
प्रतिभावंत आहात.

नूतन सावंत's picture

22 Oct 2017 - 5:21 pm | नूतन सावंत

खुप आवडलं विज्याचं पात्र,काल्पनिक वाटलं नाही.

इरसाल कार्टं's picture

22 Oct 2017 - 7:23 pm | इरसाल कार्टं

मीही असे अनेक 'विज्या' पाहिले शाळेत असताना. आम्ही कायम 'बारक्या'च्या भूमिकेत राहिलो.

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:45 pm | पैसा

जबरदस्त!

mayu4u's picture

23 Oct 2017 - 2:44 pm | mayu4u

आवडलं!

वाह, मस्त लिहिलंय..आवडेश!

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 4:02 pm | विनिता००२

सुरेख
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.

अत्रन्गि पाउस's picture

23 Oct 2017 - 4:27 pm | अत्रन्गि पाउस

फक्कड जमलाय

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 6:47 pm | मित्रहो

धन्यवाद मंडळी. सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणाऱ्यांचे मनःपूर्व आभार. मिपावर दिवाळी अंकाच्या निमित्ताने पंचपक्वानांचे ताट वाढून ठेवले असताना तुम्ही हे व्यक्तीचित्र वाचले आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या त्याबद्ल आभार. लालगरुड आणि संग्राम यांनी लेख प्रकाशित होताच दोन तासातच प्रतिक्रिया दिल्या. धन्यवाद लालगरुड, संग्राम. चौकटराजा काका आणि पेठकर काका मनापासून धन्यवाद. तुमच्यासारख्यां मंडळींकडून मिळनारी शाबासकीची थाप आम्हाला लिहिते करते. धन्यवाद सुखीमाणूस, गुल्लुदादा, शलभ, पगला गजोधर, निशाचर, अनामिक, जयंत कुलकर्णी, अभ्या, पैलवान, कविता१९७८, पद्द्मावती, जव्हेरगंज, नाखु, प्रास, सिरुसेरी, एसभाऊ, स्नेहांकिता, सुरंगी ताई, पैसाताई, इरसाल कार्ट, may4u, केडी, विनिता००२, अत्रन्गि पाउस.
खरच या प्रतिक्रिया बऱेच काही सांगून जातात. मी सलग चौथांदा मिपाच्या दिवाळी अंकासाठी लिहितोय. पहिल्या वर्षी जो लेख लिहिला होता त्यावर एसभाउंची एक प्रतिक्रिया होती लेख सुंदर आहे पण काय आहे यापेक्षा काय नाही हे जास्ती आले. आता फक्त लिहतानाच नव्हे तर इतरत्र सुद्धा काय आहे याकडे मी जास्त बघतो. पैलवाण यांंनी म्हटल्याप्रमाणे ती सकारत्मकता कदाचित त्यातून आली असावी. हो पात्र काल्पनिकच आहे पण वर इरसाल कार्ट यांनी म्हटल्याप्रमाणे असे विज्या बरेच भेटतात त्याच्यांसोबत फिरनारे बारक्यांची तर काही कमी नसते. अशा भेटलेल्या विज्यांना एकत्र बांधून हे सिनेमावाला विज्या व्यकिचित्र लिहिले. तुमचे असेच प्रेम असू द्या.
व्यक्तीचित्रे असा सुंदर विषय दिल्याबद्दल मिपाच्या संपादक आणि साहीत्य संपादक मंडळींचे आभार

जुइ's picture

24 Oct 2017 - 12:14 am | जुइ

झकासं जमले आहे व्यक्तिचित्रण. आवडले!

आनंदयात्री's picture

24 Oct 2017 - 12:45 am | आनंदयात्री

एक नंबर. सुखद शेवट केल्याने व्यक्तिचित्र जास्त भावले.

अभिजीत अवलिया's picture

25 Oct 2017 - 6:58 pm | अभिजीत अवलिया

मस्त लिहिलंय .

स्वाती दिनेश's picture

27 Oct 2017 - 11:51 am | स्वाती दिनेश

विज्या आवडला, छान लिहिलंय..
स्वाती

मित्रहो's picture

27 Oct 2017 - 12:36 pm | मित्रहो

धन्यवाद अॅमी, जुइ, आनंदयात्री, अभिजीत अवलिया, आणि स्वाती. प्रतिक्रेियेबद्दल धन्यवाद.

कपिलमुनी's picture

27 Oct 2017 - 2:50 pm | कपिलमुनी

व्यक्तीचित्र खूप आवडले !
अजून लेखांची अपेक्षा आहे

संजय पाटिल's picture

27 Oct 2017 - 4:00 pm | संजय पाटिल

व्वा! काय जबरदस्त लिहीलय...
लिहीत रहा..

सविता००१'s picture

28 Oct 2017 - 5:09 pm | सविता००१

सुरेख लेखन.

स्वराजित's picture

1 Nov 2017 - 4:13 pm | स्वराजित

खुप छान लेख . शेवट आवडला.

जबरदस्त लिहिलंय! अप्रतिम जमलंय व्यक्तिचित्र.