मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - प्रबोधनात्मक

ॐकार's picture
ॐकार in काथ्याकूट
20 Sep 2007 - 5:46 pm
गाभा: 

आवडणार्‍या लेखकांविषयी भरभरून लिहिले जात असताना आम्हाला आमचा प्रबोधनात्मक लेख लिहिणे अगत्याचे वाटत आहे. तसे पाहता गद्य हा आमचा प्रांत नोहे. परंतु गद्य , पद्य अथवा मद्य या विषयांमुळे ( श्लेष नाही!) बर्‍याच लोकांचा तोंडाचा आणि पोटाचा ( दोन्ही सुटलेले) प्रश्न सुटत असल्याचे पाहून आम्हाला आमच्या मुदपाकखान्यातले डबे-बाटल्या काढून रिकामे करण्याचा ( आणि मग बडवण्याचा) मोह आवरता येत नाही. छपाई केलेल्या पुस्तकांनंतर सुटलेल्या वाचनाचा नाद लावणार्‍या आतंरजालावर ठायी, ठायी सापडणार्‍या लेखांच्या पानांच्या भेंडोळ्या पुरवणार्‍या या नव्या दमाच्या लेखकांची कृतज्ञता विसरून कसे बरे चालेल? या मालिकेत उल्लेखाने मारून मारून मरकुंडीला आलेल्या लेखकांना मी अनुल्लेखाने मारण्याचा प्रमाद करतो आहे. सर्व जाणकार लोकांनी ( हे कुठे बरे सापडतात?) आमुचा प्रमाद पोटात घ्यावा. ( परत पोट!)

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, नाट्यछटा, समीक्षा, चर्चा , मुलाखत या-ना त्या प्रकारे रिकाम्या डोक्याला आणि परिणामी हातांना सतत खाद्य पुरवणार्‍या या लेखकांचे आणि त्यांचा साहित्याचे मोल अजून समाजाला कळलेले नाही. काळाच्या पुढे दोन (कधीकधी वेडीवाकडी) पावले चालणार्‍या या समस्त साहित्यिकांच्या साहित्याचे त्यामुळे अवमूल्यन होते आहे. हे साहित्य ५०-१०० लोकांनी वाचून जर आपापल्या घरी बौद्धिक घेण्यास सुरुवात केली तर समस्त मराठी बांधवांचा घरी प्रकाशकांची रीघ लागावी तो दिवस दूर नाही. परंतु आंतरजालावर वावरणार्‍या मराठी लोकांची अस्मिता लयास जात आहे ( अस्मिताचे सदस्य्त्व रद्द होत आहे असा अर्थ घेऊ नये) . त्यामुळे दिसामाजी काहितरी वाचावे , प्रसंगी अखंडित लिहित जावे ही अपप्रवृत्ती हल्ली बळावली आहे. सर्वच लेखक प्रबोधन करावयास लागले तर वाचणार कोण हा कळीचा प्रश्न अजून आपणांस उमगलेला नाही. तेव्हा या मालिकेत सापडणार्‍या लेखकांच्या साहित्याला ग्रथंनिर्मिती ( आणि परिणामी रोजगार निर्मिती) करता योग्य न्याय मिळावा याकरता मी खेडोपाडी राहणार्‍या ( यात यू. एस. , यू.के. ची सो कॉल्ड गावे आली) समस्त मराठी जनतेला आवाहन करतो आहे. (आव्हान लिहिणार होतो, पण कुणाच्या धोतराला असा हात घालणे बरे नव्हे).

एकूणच नवनव्या संकेतस्थळांमुळे मराठीभाषेला आलेली उर्जितावस्था पाहता ( काय म्हणालात? कसली अवस्था?) साहित्यक्षेत्रात आशेची पहाट झाली आहे. ( आठवा किंवा नका आठवू , रविकिरण मंडळ - पूर्वाश्रमीचे सन टी क्लब यांनी काव्यविश्वात पहाट आणली होती म्हणे) . इथे लिहू का तिथे लिहू, हे लिहू का ते लिहू, असं लिहू का तसं लिहू असे नानाविविध प्रश्न लेखकांना सतावत आहेत. परंतु हे सुलक्षणच म्हणायला हवे. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते उगाच नाही. ( शालेय जीवनात थोरामोठ्यांची वाक्ये निबंधात पेरली की जास्त गुण मिळतात असे आम्हांस शिकवले होते, त्याचा परिणाम) लेखकांचे वाढते अनुभव याचे द्योतक आहे. ( वय आणि अनुभवाबरोबर कधीकधी काही गोष्टींना वाढण्यास वाव मिळतो असे संशोधनात आढळले आहे - संदर्भ - पिंपळ आणि बांडगुळ, लेखक - अस्मादिक, किंमत - १२७ रू ५० पै फक्त. भारताबाहेर १२७ डॉ., घरपोच सेवा - त्याकरता अधिभार नाही. करमुक्त!, त्वरा करा!!!) अनुभवाबरोबरच येणारी वैचारिक प्रगल्भता ( अरे वा! किती दिवसांनी हा शब्द आम्हांस आठवला!), विचारस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ( कोण आहे रे तिकडे?) त्याचबरोबर धडाकेबाज लिखाण, उत्तम व्यवस्थापन , लेखकांची अत्याधुनिक लेखनशैली ( शैला मला माफ कर, मला माहित नाही मी काय लिहितो आहे!) या बहुगुणी आयामामुळे साहित्यक्षेत्रात यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल याबाबत मनात किंचितही किंतु बाळगू नये.

सारांश, समस्त गळेकाढू, गळेपडू, गळेकापू सदस्यांनी ( पूर्वी सदस्य हा शब्द लायब्ररीच्या संदर्भात येत असे, मग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरता , मग महाराष्ट्र मंडळांचा संदर्भात येऊ लागला. हल्ली संकेतस्थळांसंदर्भात येतो. पैसे देणार्‍या सदस्यास मंडळे वर्गणीदार असे म्हणतात हा औदार्याचा भाग निराळा.) ह्या लेखकांना प्रोत्साहनपर प्रतिसाद द्यावेत , तसेच त्यांचाबद्दल जगाच्या कानाकोपर्‍यात बातम्या द्याव्यात ( समाचार घ्यावा, चुकलो, द्यावेत) अशी आग्रहाची विनंती करतो. ह्या लेखाचा हेतु निव्वळ समाजप्रबोधन आहे. ह्या व्यासपीठामुळे प्रबोधनास वाव मिळावा याहून आमचे अहोभाग्य नाही असे आम्ही समजतो.

करील मनोरंजन ( नीट वाचा) जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी ( हे आडनाव ऐकल्यासारखे वाटत आहे)तयाचे!
( ओळखा पाहू कोणी म्हटले आहे? पहिल्या १० भाग्यवान विजेत्यांना महाराष्ट्र राज्य भव्य सोडतीची अडीच हजारांची तिकिटे [विभागून])

-मिलिंदसुत

प्रतिक्रिया

अप्पासाहेब's picture

20 Sep 2007 - 5:54 pm | अप्पासाहेब

सरळ , सादे , सोप्प लिवा की राव, अन त्ये आवडलेल्या लेखकंच्या नावाचे काय झाले वो?

लिखाळ's picture

20 Sep 2007 - 5:58 pm | लिखाळ

पहिल्या परिच्छेदातच आपण सर्व डबे रिकामे केल्याने आम्हांस खाण्यासारखे या लेखात काही उरले नाही. लेखाच्या शेवटी आधी मुलांशी खेळावे म्हणजे नाते जडेल प्रभुशी ही नवी शिकवण मिळाल्याने आम्हांस आनंद झाला. प्रबोधन मिळाले (की झाले? ते प्रबोधन काय असते? कोठल्या लाडवाचा प्रकार आहे का? बेसन आणि प्रबोधन यांत काही प्रास आहे म्हणून शंका आली). आता कृती करण्याइतका दम राहतो ते बघायचे :)
--(प्रबोधित) लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2007 - 6:09 pm | प्रकाश घाटपांडे

ओंकार स्वरुपा, गमभन हुरुपा , अ -लेखांच्या लेखा
तुज नमो
तुझे हे रुप आवडले. असेच आमचे प्रबोधन व्हावे.

प्रकाश घाटपांडे

सरपंच's picture

20 Sep 2007 - 6:13 pm | सरपंच

खुद्द 'गमभन'कारांनी येथे येऊन दोन सबुत लिवले हा आमी मिसळपावाचा सन्मान समजतो!

आपला,
सरपंच,
मिसळपाव ग्रामपंचायत.

रंजन's picture

20 Sep 2007 - 6:17 pm | रंजन

समस्त गळेकाढू, गळेपडू, गळेकापू सदस्यांनी ...
मस्त

चित्तरंजन भट's picture

20 Sep 2007 - 6:30 pm | चित्तरंजन भट

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, नाट्यछटा, समीक्षा, चर्चा , मुलाखत या-ना त्या प्रकारे रिकाम्या डोक्याला आणि परिणामी हातांना सतत खाद्य पुरवणार्‍या या लेखकांचे आणि त्यांचा साहित्याचे मोल अजून समाजाला कळलेले नाही.

आणि कधीच कळू नये अशी अनेक विघ्नसंतोषींची प्रामाणिक इच्छा आहे. मराठीला पुढचे जी.ए, मर्ढेकर इंटरनेटावरच मिळणार आहेत, हे कसे ह्या दळभद्र्यांना कळत नाही. जी. ए. जाऊ द्या बाबूराव अर्नाळकर मिळाले तरी खूप असे काही हलकट म्हणतात. असो, अशाने कसे होईल मराठी वाङ्मयाचे?

यूके, यूएसमधली खेडी.. हं. हं हं... नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. "जर्सीमध्ये हे मिळत नाही. हं... ती मजा नाही हं... गड्या ते दिवस राहिले नाही रे आणि मग हं.... ... ती मिसळ नाही .. हं.... हं ..हं... हं..... " (हेमामालिनीसारखे 'हं' म्हणायचे. 'नहीं' आठवा तिचा.) सुखवस्तू कण्हणे सगळीकडे ऐकू येते.

मध्ये मध्ये भारतात येणे होतेच. मग परतल्यावर 'हं...हं... हं...'ची आणखी एक सिरीज... "सवाईला गेलो होतो हं... चितळेच्या बाकरवड्या हं.... ह्याची मिसळ खाल्ली हं.... फ्ल्याट रिनोवेट केला हं..." असो. थांबतो. असो. (येताना टकिलेला सोबत आणायला विसरू नये. तिघांनी ह्या गहन प्रश्नावर आल्याबरोबर गंभीर चर्चा करायला हवी. )

प्रियाली's picture

20 Sep 2007 - 7:32 pm | प्रियाली

मिस केले (म्हणजे मिसला मिसेस केले माहित आहे..पण) हे मिस केलेच्या भुतावर "एनाराय" (ऐश्वर्याची बहिण) सर्वसमावेशक साहित्य निर्मिती दर दिवशी पाडत असतात.

त्यातून हे आयटीवाले भारतातून अमेरिका, अमेरिकेतून भारत, भारतातून युके, युकेतून जर्मनी, जर्मनीतून भारत अशा फेर्‍या मारत राहतात आणि

  • अमेरिकेत आल्यावर भारतात काय मिस केले?
  • भारतात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • इंग्लंडात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
  • अमेरिकेत आल्यावर इंग्लंडात काय मिस केले?
  • --- बाकीच्या जोड्या वाचकांनीच जुळवा!

यावर पानेच्या पाने कुरतडत असतात. दर सकाळी उठून हे मिस केले लेख वाचले नाही की काहीतरी जाम मिस होतं.

सर्किट's picture

21 Sep 2007 - 11:36 pm | सर्किट (not verified)

मध्यंतरी सकाळच्या पैलतीर सदरात "माझा अमेरिकेचा पहिला प्रवास" सारखे इतक्या रिटायर्ड स्त्रियांकडून लेखन झाले, की नवसह्याद्री भागात राहणार्‍या तमाम लोकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात यावा अशी मागणी करावीशी वाटली.

- सर्किट

लिखाळ's picture

20 Sep 2007 - 6:36 pm | लिखाळ

<< नॉन रेसिडेंट मराठी लोकांची नॉन रेसिडेंट सुखदुःखांची जाहिरातबाजी व्हावी म्हणून बहुतेक वेबसायटा स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटते. >>
आ?!! जोर्रात ठसका लागला आहे मला. नंतर प्रतिसाद लिहितो. (माझा मेडिकल इंश्युरन्स ..आ...इकडे साधी खडिसाखर नाही मिळत हो ! .....)
--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आजानुकर्ण's picture

20 Sep 2007 - 7:56 pm | आजानुकर्ण

ॐकार यांचे हे रुप पाहून चकित झालो. मिसळपावावर एकंदर उपहासपूर्वक लेखन करणार्‍यांचा जोरदार धिंगाणा आहे. लेख मस्त झाला आहे :) चालू द्या.

अवांतरः पण कुणाच्या धोतरात असा हात घालणे बरे नव्हे

टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे.

ॐकार's picture

20 Sep 2007 - 10:26 pm | ॐकार

टीपः धोतराला हात घालतात... धोतरात नव्हे.

या अक्षम्य गुन्ह्याबद्दल 'रावसाहेब' आम्हांस योग्य ती शिक्षा देतील.... :)

आजचा शोध -
काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय

सर्किट's picture

21 Sep 2007 - 11:38 pm | सर्किट (not verified)

ओंकारचे हे स्वरूप आम्हाला माहितीच नव्हते. लेख फक्कड झाला आहे !!

- सर्किट

सन्जोप राव's picture

21 Sep 2007 - 7:00 am | सन्जोप राव

धोतराला हात घालणे आणि धोतरात हात घालणे या सर्वस्वी विभिन्न हेतुजन्य कृती आहेत. याचे उद्देश, कृती आणि परिणाम वेगवेगळे आहेत. 'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा.
सन्जोप राव

कोलबेर's picture

21 Sep 2007 - 7:33 am | कोलबेर

धोतरात चे धोतराला केले हो :-)
- (मिसळपाव पंचायत सदस्य) कोलबेर

जगन्नाथ's picture

21 Sep 2007 - 7:36 am | जगन्नाथ

'मिसळपाव' चे संपादन शिथीलक्षम असले तरी इतकी क्रांतीची लाट इथेसुद्धा झेपणार नाही या भयाने तपशीलात जाता येत नाही. जिज्ञासूंनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा.

अाठवड्याभरात सर्व जिज्ञासूंचे अाड्रेस इथे प्रकाशित करावेत. धन्यवाद.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2007 - 10:23 am | प्रकाश घाटपांडे

प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले?

प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

21 Sep 2007 - 10:45 pm | सर्किट (not verified)

प्रकाशकाका, कोडी घालण्याची बीमारी तुम्हालाही जडली काय ? असो.
बाबूकाका खरे
काशीनाथ नाडकर्णी
(अनुक्रमे)

- सर्किट

जगन्नाथ's picture

21 Sep 2007 - 12:33 pm | जगन्नाथ

> प्रश्न- पु लं च्या ' भ्रमणमंडळा'त कुणाच्या धोतरात रस्सा सांडला होता? त्यावर ' हळूच चाटला बिटलात कि काय?' असे कोण म्हणाले?

काकाजी अाणि अाचार्य.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2007 - 2:55 pm | प्रकाश घाटपांडे

नाही, ती तुज आहे तुजपाशी मधील पात्रे आहेत
प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव's picture

21 Sep 2007 - 3:08 pm | प्रमोद देव

बटाट्याच्या चाळीतील पात्रं आहेत.

क्रेमर's picture

22 Jul 2010 - 8:39 pm | क्रेमर

ऐतिहासिक दस्तऐवज.

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

नावातकायआहे's picture

22 Jul 2010 - 10:27 pm | नावातकायआहे

प्र.का.टा.आ.