श्रीगणेश लेखमाला ९ : माझी चित्तरकथा

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
26 Sep 2015 - 12:03 am

..........................
वर्दळीच्या नव्या पेठेतली सकाळी ७.००ची वेळ. इंच इंच लढवणार्‍या दुकानदारांची स्टँडीज, मॅनिक्वीन बाहेर ठेवण्याची घाई. पाच मजली भव्य शोरूम. २० बाय ५ चा ग्लोसाईन. वजन अंदाजे ३५० किलो. त्यात ट्यूबलाईट्स. लहान जिन्यावरून तो नेता येत नाही, म्हणून बाहेरून चढवतोय. वरून सोडलेले दोर. पाळणा बांधून त्यावर उभे राहून ड्रिल करणारे कामगार. त्यांच्या कमरेला दोर बांधून धरलेला मी. दोर थोडा हलला की धस्स होतंय. बोर्ड हळूहळू जागेवर बसताना निम्म्याच्या वर मी कठड्यावरून बाहेर आहे.
..........................
पाच लाख पॅम्पलेट्सची ऑर्डर. एकाच वेळी सोलापूर अन कोल्हापुरात पेपरमध्ये पडले पाहिजेत. वेळ २ दिवस फक्त. प्रिंटिंग व्हायलाच २ दिवस जातात. सोलापुरात पडतील हो, कोल्हापूरचे कसे काय? रात्री १२ला पेपर विक्रेत्याला गाठून त्याचे गठ्ठे पॉईंटवर पोहोचवा. लगेच गाडी कोल्हापूरच्या दिशेने. बरोबर ५ वाजता कोल्हापूरचे पेपरवाले पॅम्पलेट्स टाकतात.
..........................
इलेक्शनचे काम. पैसे घ्यायला उमेदवाराने फार्म हाऊसवर बोलावलेले. गावाबाहेर ३० कि.मी.वर सुनसान एरियात. १०-१२ गनमन. तेवढीच दांडगी कुत्री. एखाद्याला टपकवून पुरला तरी खबर कळणार नाही. रोखीत पैसे घेऊन परत येईपर्यंत जिवाची शाश्वती नाही.
..........................
असलो तर राजा असतो. नसले तर चहा प्यायलाही पैसे नसतात..
..........................
काय गरज आहे असले धंदे करायची? ११ ते ५ जॉब नाही मिळणार मला? महिन्याचा पगार काय नको वाटतो? रात्रंदिवस फोन वाजत असतो. एकदा घरातून बाहेर पडलो की यायची वेळ कधीच फिक्स नाही. का करतो मग मी हे सगळं?
उत्तर एकच..
छंद.
व्यवसायाचा छंद. छंदाचा व्यवसाय.
..........................
मध्यमवर्गीयच मी. अगदी टिपिकल. वडील बँकेत, आई शाळेत. झालो असतो ना डॉक्टर इंजीनिअर, गेलाबाजार बँकेत तरी. पण नाही. नडली माझी चित्रकला. पूर्ण खानदानात चित्रकला मलाच कशी येते.... माहीत नाही. यात काही करीअर आहे... माहीत नव्हते.....
बारावीपर्यंत रितीरिवाजाप्रमाणे शिक्षण झाले. रितीरिवाज म्हणजेच गणिताशी दुश्मनी करून अन इतिहासाची पुस्तके चितारून. नाही म्हणायला प्रत्येक चित्रकला स्पर्धेत शाळेचे नाव गाजण्याएवढी कला माझ्या अंगात होती. दै. सकाळची स्पर्धा असो की कामगार कल्याण केंद्राची. मी राज्यस्तरीय पहिला नंबर कधी सोडला नाही. एवढ्या एका गोष्टीसाठी मला अभ्यासातून सूट मिळायची.
घरात कौतुक फक्त वडिलांना. चौथीत असताना मी आर्टिस्ट क्वालिटीचे पोस्टर कलर अन वॉटरप्रुफ इंक वापरलीय. आईच्या दृष्टीने माझा ऊपयोग फक्त दिवाळीत तुळशी वृंदावन रंगवायला किंवा रथसप्तमीला रथ काढून द्यायला. वडिलांच्या ओळखीच्या एकाने सांगितले की कमर्शिअल आर्ट कर. काय असते ते पण माहीत नव्हते. नेहमीच्या कॉलेजपेक्षा वेगळे कॉलेज असते अन तेथे फक्त चित्रेच काढायची असतात हा ईंटरेस्टिंग पार्ट होता. त्यावेळी दहावीनंतर फाऊंडेशनला अ‍ॅडमिशन मिळत असे.
मग काय...दहावीनंतर मी लगेच चित्रकला महाविद्यालयासाठी बाहेर जाण्याचे ठरवले. घरच्यांनी ते मात्र ऐकले नाही. "आधी बारावी कर. तब्येत चांगली कर अन मगच जा" असा सल्ला मिळाला. बारावी नापास झाला तरी चालेल, अशीही सूट मिळाली. मग काय, बास्केटबॉल अन टेक्निकल एवढेच दोन वर्षे केले. घरातील आर्थिक स्थिती चढउताराची व्हायला अन मला फाऊंडेशनच्या कोर्ससाठी बाहेर पडायला गाठ पडली. फाऊंडेशन एक वर्षाचे. अगदी ओढगस्तीत पार पडले. सुरुवातीला भीती वाटायची. च्यायला सगळीच आर्टिस्ट पोरं. आपला कुठे निभाव लागावा. एकेकाचे कलर सेट अन ब्रशेस पाहून छाती दडपायची. पण टिकलो. टिच्चून काम केले. मराठवाड्यात पहिला आलो. मग म्हटले, आपले कोल्हापूर गाठावे. उपयोजित कलेची पदविका (पदवी अन पदविका कालावधी सेमच - ४ वर्षे फाऊंडेशननंतर आहे. दोन्हीला जीडी आर्टस म्हणत.)
..........................
फाऊंडेशनचा स्वतंत्र कोर्स एक वर्षाचा असे. असाईनमेंटसही भर्पूर असत. ह्या मार्कावरच पुढची दिशा ठरे. सगळ्या शाळांतली चित्रकला चांगली असणारीच मुले वर्गात असल्याने कॉम्पीटिशन टफ वाटायची. ही भीती अगदी कमर्शिअल आर्टच्या प्रथम वर्षात कायम होती. कारण कोल्हापूरचा कलाप्रांतातला दबदबा. तिथला सगळ्या चित्रकला महाविद्यालयापेक्षा वेगळा अनुभव. पण सरावलो थोड्या दिवसात. वाटले होते त्यापेक्षा भरपूर विषय होते. अ‍ॅनॉटॉमी तर अगदी डॉक्टरांना शिकवत नसतील एवढी घटवून घेतली जाई. टायपोग्राफी, फॉन्टस अन स्केचेसच्या कागदांनी बॅगा भरायच्या. अ‍ॅडव्हर्टायझिंग आर्ट एन आयडीयाला ओएनएम चा ऑग्लिव्ही पुस्तकातून पिडायचा. जगातली सगळी गाजलेली न फसलेली कॅम्पेन्स, पिअर्स साबणाच्या गेल्या शतकातल्या अ‍ॅडपासून आजपर्यंतचा प्रवास एकताना भान हरपायचे. एकेक शब्दांचा काळजीपूर्वक केलेला उपयोग अन अभ्यास पाहून वाचनाची गोडी लागली. एखाद्या प्रॉडक्टचा यूएसपी (युनिक सेलींग पॉइन्ट) हेच सर्वस्व झाले. जगातील उत्तमोत्तम मॅगझीन्स, व्हिडिओज अन फोटोग्राफ यातून जाहिरातक्षेत्र म्हणजे ६५ वी कला का म्हणतात याचे भान आले. सेकंड इयरला असाईनमेंट्स शोकेसमध्ये लागू लागल्या. इतर मुलांकडून अन शिक्षकांकडून कौतुक चालू झाले. सेकंड इयरला परीक्षेला ऑप्शनल विषय निवडायचा असे. अ‍ॅडव्हरटाईझिंग, पब्लिक वेल्फेअर अन पब्लिकेशन. ऐन वेळी मी कुणी न निवडणारा पब्लिकेशन निवडला. टिच्चून काम केले. त्या वेळी डेडलाईन सांभाळून काम करायच्या माझ्या मर्यादांची मलाच जाणीव झाली. पहिल्यांदाच स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास जाणवायला लागला.
इतरांना वाटायचे - ५ वर्षे काय शिकवतात चित्रे काढायला? पण खरे सांगतो, ती ५ वर्षे पुरेशी वाटायची नाहीत. कॅलिग्राफी, टायपोग्राफी, अ‍ॅनॉटॉमी हे करत तीन वर्षे पार पडली. खर्च अगदी मेडिकल-इंजीनिअरिंगवाल्यांप्रमाणे नसायचा, पण तोसुद्धा जड व्हायचा. शिक्षण शुल्क तर अगदी नाममात्र म्हटल्याप्रमाणे. मिरजला मावशीकडे राहून रोज रेल्वेने कोल्हापूरचा जाण्या-येण्याचा पास काढून कॉलेज पूर्ण केले. शेवटच्या वर्षाची परीक्षा मुंबईला जे.जे.मध्ये. तिथे रहेजा, सोफिया अन अमरावतीची मुले परीक्षेला यायची. बांद्र्याच्या कलानगर जे.जे. हॉस्टेलमध्ये राहून एकदाची परीक्षा पार पडली. लगेच नोकरी मिळवायला इतर सहाध्यायींची धडपड सुरू झाली. आपापले पोर्टफोलिओ घेऊन अ‍ॅड एजन्स्यांची अन अ‍ॅनिमेशन हाउसेसची दारे ठोठावू लागली. काय जाणे, पण मला त्यात इंटरेस्ट वाटेना. सरळ गावी निघून आलो.
..........................
गावी एक आठवडा तेवढा पिक्चर बघण्यात अन फिरण्यात घालवला. कॉलेजात असताना बाईक वगैरे वापरलेली, पण घरी बाईक देईनात. त्या काळात मला बाईक रेसिंगचा नाद लागलेला. गाड्या थोड्याशा मॉडीफाय करून द्यायची कामे करायचो. पैशाची गरज भासू लागली. शिकत असताना थोडी प्रिंटिंगची कामे केली होती, त्या अनुभवावर एक दिवस बाबांना म्हणालो, "मला ५० हजार हवेत."
"कशाला?"
"पीसी अन स्कॅनर, प्रिंटर घ्यायचाय. प्रिंटिंगची कामे चालू करतो."
"त्याशिवाय होणारच नाहीत का? सध्या तर मी देऊ शकत नाही."
"नाही होणार."
"मग एक काम देतो तुला, सध्या बाहेरून करून घे. जमेल का?"
एका बँकेच्या लोगोचे अन स्टेशनरीचे काम होते. काम भरपूर होते. बरीचशी आर्टवर्क हाताने केली. डीटीपीवाल्याकडे बसून उरलेली केली. जवळपास ३ महिने काम चालले. सगळे फिरणे बस आणि रिक्षाने, दरम्यान माझा जो होईल तो खर्च वडील देत. तीन महिन्यांनी बँकेचे बिल मिळाले. ७८ हजाराचे होते, डीटीपीवाल्याचे पैसे तेव्हाच दिले. उरलेली रक्कम देताना वडिलांनी तोपर्यंत मला खर्चाला जेवढे पैसे दिले, त्याचे व्हाऊचर बनवून ठेवले होते. ते वजा करून उरलेले १४ हजार माझ्या हातात आले.
"आता मला सांग, १४ हजार कमवायला काय करावे लागते? किती वेळ लागतो?"
उत्तर मला माहीत झाले होते.
"मग तुला एकरकमी ५० हजार कसे द्यायचे?"
आता तेही मला नको होते. वडिलांनी दिलेल्या धड्यापेक्षा मौल्यवान गोष्ट मला कळली होती.
मला स्वतःला पैसे कमवता येतात. निदान एका पद्धतीने तरी.
..........................
अचानक मला एका अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन हाऊसची स्वप्नवत पगाराची ऑफर आली. इंटरव्ह्यू पार पाडून जॉइन झालो. घरच्यांना अगदी हायसे वाटले. पण माझे मन नोकरीत लागेना. प्रिंट मीडियाचे आकर्षण गप्प बसू देईना. एक दिवस नोकरी सोडून पुन्हा घरी आलो.
परत माझी प्रिंटिंगची कामे सुरू झाली. मित्रपरिवार होताच. लहानसहान कामे करत दिवस सरू लागले. तेव्हा पहिली सेकंडहँड बाईक घेतली. ग्राफिक्सच्या नॉलेजसाठी मल्टीमिडीयाचा डिप्लोमा केला, लागणार्‍या सॉफ्टवेअरचे सर्टिफिकेट कोर्स केले. या सार्‍यांना लागणारा पैसा म्हणजे सोबत कामे चालू असतच.
..........................
अचानक एका मित्राने म्हटले, ऑफिस टाकू या. माझ्याकडे जास्त भांडवल नव्हते. घरून मागायची सोय नव्हती. ही संधी भारी वाटली. लहान स्वरूपात ऑफिस सुरू झाले. जसजशी कामे येऊ लागली, तसे मला कळू लागले - धंदा एवढा सोपा नाही. लहान कोटेशन्सही चुकू लागली. थोड्याशा गफलतीमुळे पूर्ण असाईनमेंट रिजेक्ट व्हायचे प्रमाण वाढू लागले. रिकव्हरीचा प्रश्न होताच. मला एकट्याने ही कामे झेपेनात. पार्टनर वेगळ्या फील्डमधला. त्याला माझे प्रोब्लेम कळेनात. शेवटी ६ महिन्यात ऑफिसचा कारभार आटोपला. आटोपला असे वाटले, पण ओळखीच्या काही स्क्रीन प्रिंटर्सनी मला परत मदतीचा हात देऊ केला. त्यांना डिझाईनसाठी माझी गरज होती. त्यांनी ऑफिससाठी लागणारे पैसे दिले. परत जुनी कथा रिवाईंड. मला मॅनेजमेंट जमेना. प्रिंटिंगसाठी लागणारे पेपर, बाईंडिंग, प्लेटा याच्या हिशोबात वारंवार चुकू लागलो. डिझाईन्स सुंदर असायची, पण प्रिंटिंगला वाट लागायची. काय करावे समजेना. त्यात बँकांचा व्यवहार, चेक्स इ. गोष्टींचे गांभीर्य नव्हते. एका बँकेने सीसी दिली, पण तो पैसा कसा खर्चायचा याचे ताळतंत्र राहिले नाही. भरीस भर म्हणून स्क्रीन प्रिंटर्सनी गैरफायदा घ्यायला सुरुवात झाली. शेवटी डोक्यावर मोठ्ठा कर्जाचा भार घेऊन, मी मालक नसलेल्या या धंद्याचा अंत झाला. सुरुवातीला घरी काही बोललेलो नव्हतो. मध्यंतरात त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. शेवटी असा अपेक्षाभंग करून बसलो. कर्जाचा भार पूर्ण उचलायचे ठरवले. वडिलांनी मुदत मिळवून दिली. नेमके त्याच वेळी एका प्रॉडक्शन युनिटचे मालक मला नोकरीसाठी हुडकत आले. सर्व मानापमान बाजूला ठेवून नोकरी चालू केली. रोज ४-४ तास ओव्हरटाइम करून, बाहेरची कामे घेऊन अन चक्क एक वेळा जेवून कर्जाचा भार उतरला. याच काळात धंद्यातल्या सार्‍या खाचाखोचा खर्‍या अर्थाने कळू लागल्या. हे आधीच केले असते तर बरे, असे वाटायचे. प्रिंटिंगमधल्या लहानसहान गोष्टी आत्मसात झाल्या. फील्डमधल्या लोकांच्या ओळखी झाल्या. डिझाईनर म्हणून लोक मला ओळखू लागले. धंद्याची इच्छा मात्र अजून जिवंत होती. मात्र आयटीमधला पैसा खुणावू लागला. एक दिवस नोकरी सुटली अन सरळ एका कंपनीत व्हिज्युअलाईझर म्हणून जॉइन झालो. तिथे टीममध्ये अ‍ॅक्चुअल कामाचा अनुभव असणारा मी एकटाच होतो. गावातील पगारापेक्षा तिप्पट पगारात बरे चालले होते. वीकेंडला गावी आलो असता दोघातिघांनी पार्टनरशिपसाठी ऑफर दिली होती. ९ महिन्यात आयटीला रामराम ठोकला. घरच्यांच्या विरोधाला जुमानून एकट्याने फ्रीलान्स कामे सुरू केली.
..........................
अशातच एका अपघाताला तोंड द्यावे लागले. पुण्याहून येताना ट्रॅव्हल्सची वोल्व्हो सरळ पुलात कोसळली. मला बराच मार लागला. चेहरा पूर्ण फाटला, खालचा जबडा डिस्प्लेस झाला. डोक्यावर अन पाठीवर जखमा झाल्या. माझ्या शेजारचा जागीच मृत झाला. केवळ खेळाचे शरीर होते म्हणून लवकर रिकव्हर झालो. तरी या अपघाताने व्यवसायातून ६ महिन्यांसाठी बाहेर फेकला गेलो. हातातल्या मोठ्या असाईनमेंट्स गेल्या. हे प्रिंटिंगचे फील्ड धार्जिणे नाही, असे घरच्यांचे बोलणे रोज ऐकू लागलो. एक दिवस ठरवले. सरळ उठून नात्यातल्या एकाचा बार रेस्टॉरंट सांभाळायच्या कामाला मदत करायला सुरुवात केली.
प्रिंटिगची कामे ज्या तन्मयतेने करायचो, त्याच पद्धतीने हॉटेलमध्ये काम केले. स्टॉक, गोडाऊन, किचन, टेबल अन काऊंटर अशा सगळ्या ड्युट्या केल्या. रोज रात्री झोपायला ३ वाजायचे. मनुष्यस्वभावाचे हरेक नमुने तिथे पाहायला मिळाले. लवकरच एका नवीन बारची पार्टनरशिप अन चालवायसाठी ऑफर आली. जवळपास हे डिल फिक्स होतच होते. पण.....
नवीन हॉटेलचे बोर्ड अर्थातच मी डिझाईन अन प्रिंट केलेले होते. ते पाहून तिथेही माझ्या लाडक्या प्रिंटिंगने पाठ सोडली नाही. कस्टमर तिथे येत अन मी कामे करून देई. हळूहळू प्रिंटिंगच्या कामाचीच व्याप्ती वाढू लागली. एका जिवलगाने सल्ला दिला - "ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर." नुसता सल्ला देऊन न थांबता या जिवलगाने नवीन ऑफिसच्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केले. प्रसंगी तासनतास वाद घातला, पण अभ्याचे स्वतःचे ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात येईपर्यंत सर्व प्रकारची मदत केली.
पैसा, भावनिक पाठबळ, तांत्रिक मदत अगदी जे जे लागेल ते ते पुरवले. त्यावेळी ह्या जिवलगाची मदत नसती तर कदाचित मी एखाद्या बारच्या काऊंटरवर दिसलो असतो.
..........................
आता माझ्या या ऑफिसात सर्व प्रकारच्या अ‍ॅडव्हर्टाईझिंगची कामे केली जातात. मोठी कॅम्पेन्स अगदी प्रोफेशनली कम्प्लीट होतात. रेडिओसारख्या माध्यमाच्या अ‍ॅडस सदैव चालू असतात. त्यांचे स्क्रिप्ट्स अन क्रियेटिव्हज यामध्ये माझी मोनोपली तयार झाली आहे. न्यूजपेपर अ‍ॅडसाठी सर्व मोठ्या पेपर्सची एजन्सी आहे. सोशल मीडिया मार्केटिंग अन एसईओमध्ये बरीचशी कामे चालू असतात. फ्लेक्स अन प्रिंट हा तर माझा जुना व्यवसाय. ती कामे अगदी प्रॉपरली पूर्ण होतात.
आज जुन्या चुकांची शक्यतो पुनरावृत्ती टाळली जाते. हिशोबातला पै न पै टिपला जातो. आरोग्याकडे तर अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही. कस्टमर्सच्या कंपनीचे मोटो अन टॅगलाईन्स तयार करता करता स्वतः मात्र केवळ पुस्तकी वाक्ये न अवतरित करता काम करत राहिलो. मला जमतेय अन लोक देतायत तोपर्यंत कामे मिळत राहणारच. कामे होत राहतील, पण जोडलेली माणसे अन कमावलेला लौकिक हेच अ‍ॅसेट्स मानून सध्यातरी वाटचाल चालूय. लोक म्हणतात, बिझनेसमन म्हणजे फक्त पैसा पैसा अन पैसा करणारी जात. कमर्शिअल आर्ट म्हणजे तर शुद्ध उपयोजित कला. आर्ट फॉर पीपल. आमची प्रत्येक कलाकृती लोकांचा विचार करून साकारलेली असते. मिळणार्‍या पैशाला बांधील असते.
पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची....
त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही.
..........................

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

Rahul D's picture

2 May 2017 - 12:40 am | Rahul D

तू खूप नशिबवान आहेस..