मिस्ड कनेक्शन्स

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 1:26 am

फ्रेंच कनेक्शन

तब्बल चार वर्षांनी आमचं भारतात जायचं ठरलं. मुलींच्या शाळा बुडू नयेत म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे जूनमध्ये जायचं असा प्लॅन करून फेब्रुवारीमधेच डील्स शोधायला सुरुवात केली. आम्ही चौघे आणि बरोबर एका मित्राची बायको आणि २ मुले असे एकूण ७ जणं जून मध्ये जाणार होतो. सुट्टी फार नसल्याने मी एका महिन्यात परत येणार व बाकी सगळे २ महिने म्हणजे ऑगस्ट पर्यंत राहणार होते. माझा मित्र जुलै मध्ये भारतात जाऊन या बाकी सगळ्यांबरोबर ऑगस्टमध्ये परत येणार होता.

बऱ्याच संशोधनाअंती Indianeagle.com (IE) नामक वेबसाईट वर एक चांगलं डील दिसलं. एअर फ्रांसची वॉशिंग्टन डी सी ते पॅरिस ते मुंबई आणि परत त्याच मार्गे फक्त $८०० मध्ये तिकिट्स मिळत होती. फक्त एकच कॅच होता. ऑगस्टमध्ये येणाऱ्यांच्या परतीच्या प्रवासात पॅरिसमध्ये २४ तासांचा स्टॉपओव्हर होता. त्या वेळेला आम्ही विचार केला की फ्रेंच टुरिस्ट व्हिसा काढून सगळे आयफेल टॉवर बघून येतील. मी IE च्या बुकिंग एजंटला कॉल केला आणि त्याच्याशी बोलून सगळ्यांची बुकिंग्स केली. मुली आनंदाने नाचायला लागल्या आणि तेव्हापासून दिवस मोजणे चालू झाले.

मधल्या काळात युरोपमधल्या बिघडलेल्या परिस्थितीची वर्णनं आम्ही वाचत होतो, त्यात मिपावर वाचलेले युरोपमधील चोऱ्यांचे वगैरे किस्से पण आठवले. मग एकूणच वाटायला लागलं की मी नसताना बायकोने मुलींना एअरपोर्टच्या बाहेर घेऊन जाऊ नये. जरी माझा मित्र बरोबर होता तरी त्याची पण २ मुलं बरोबर असणार त्यातला एक फक्त १.५ वर्षांचा. सर्व परिस्थितीचा विचार करता या सगळ्यांनी एअरपोर्टवरच थांबावे असं ठरलं. मी फ्रेंच एम्बसीकडे व्हिसासंबंधी नियमांची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की जर ते एअरपोर्टच्या बाहेर येणार नसतील तर फ्रेंच टुरिस्ट व्हिसाची गरज नाही. गुगलबाबा, Indian Eagle आणि अगदी फ्रेंच एम्बसीच्या वेबसाईट वर लिहिलं होतं की ज्या भारतीय नागरिकांकडे अमेरिकेचा व्हॅलिड व्हिसा असेल त्यांना फ्रेंच टुरिस्ट व्हिसाची गरज नाही. त्यामुळे आम्ही निर्धास्त झालो.

आमची प्रवासाला निघण्याची तारीख १२ जून होती परंतु साधारण ६ जूनला एअर फ्रांसच्या वेबसाइटवर एक मेसेज झळकत होता की कसल्या तरी मागणीसाठी १० जून ते १२ जून या काळात एअर फ्रान्सच्या पायलट्सचा संप आहे. तर या काळात प्रवास करू नका. मी एजन्टला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. तिने जातानाचे तिकीट बदलून द्यायची तयारी दाखवली. म्हणून आम्ही ९ जूनचं तिकीट घेतलं. पण परतीचं तिकीट बदलायला तिने नकार दिला, म्हणजे जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून सांगितलं.

अमेरिकेतून भारतात जाताना प्रवास चांगला झाला. महिनाभर भारतात कसा गेला तेच कळलं नाही आणि मी १२ जुलैला अमेरिकेत परत आलो. येताना पॅरिसला माझा स्टॉपओव्हर ५ तासांचाच होता. तेवढ्यात मी एअरपोर्टवर जास्त वेळ थांबण्यासाठी काय काय सोयी आहेत ते बघून ठेवलं. पॅरिसचा CDG एअरपोर्ट बराच मोठा आहे. प्रवाश्यांसाठी झोपायला सोफा वगैरे सोयी केल्या आहेत, मुलांसाठी गेमिंग झोन्स आहेत त्यामुळे २४ तास थांबणाऱ्या आमच्या मंडळींचा टाइम पास होऊन जाईल असं वाटलं. तसंही २ फॅमिलीज असल्याने गप्पा, खेळ आणि झोप आणि थोडा कंटाळा यात वेळ जातोच.

एकदाचा ११ ऑगस्ट म्हणजे या सगळ्यांचा परतीचा दिवस उजाडला. सकाळी ११ वाजता मुंबईहून विमान होतं त्यामुळे सगळे ७.३० लाच विमानतळावर हजर झाले. मी अमेरिकेतून फोनवर खबरबात घेत होतोच. आता एअरपोर्टमध्ये शिरतोय असं म्हणून बायकोने फोन ठेवला आणि १० मिनटात परत तिचा फोन, म्हणे बॅग्स चेक इन करून घेत नाहीयेत. म्हणलं तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट, अमेरिकन व्हिसा आणि तिकीट आहे मग काय प्रॉब्लेम आहे? तर तो बोर्डिंग एजन्ट फ्रेंच ट्रान्सीट व्हिसा किंवा शेंझेन व्हिसा मागतोय असं बायकोने सांगितलं. तेवढ्यात माझा मित्र पण विमानतळावर पोचला. त्याला पण तेच सांगितलं वर म्हणे आता तर बोर्डिंग पास पण देणार नाही.

मी भारतातील फ्रेंच एम्बसीला फोन केला व त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही विमानतळावरून बाहेर पडणार नसाल तर व्हिसा नाही लागणार. मी लगेच त्याला म्हणलं २ मिनटं थांब, मी तुला कॉन्फरंस करतो आणि त्या बोर्डिंग एजन्टला सांग. तो तयार झाला म्हणून लगेच कॉन्फरन्स केलं तर तो बोर्डिंग एजन्ट त्याला म्हणाला की CDG एअरपोर्टचा असा नियम आहे की प्रवासी ५ तासांच्यावर एअरपोर्टवर थांबू शकत नाही. हे ऐकून तो एम्बसीवाला म्हणाला तो तुमचा (एअरपोर्टचा) नियम आहे फ्रांस या देशाचा व्हिसा हवाच असा नियम नाही. परंतु जर एअरपोर्टच्या नियमामुळे तुम्हाला बाहेर यायला लागत असेल तर मात्र व्हिसा लागेल. मग काय, वाद घालण्यासारखं काही राहिलंच नाही. लगेच आमच्या सर्व मंडळींना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

मी त्या ट्रॅव्हल एजण्टला फोन केला. तिने सांगितलं की तिकीट डेल्टा एअर लाईन्सने दिलंय तर त्यांचं अमेरिकेतील ऑफिस उघडल्यावर आपण तिकीट बदलून घेऊ. ऑफिस उघडायला १० तास होते, मी म्हणलं की तोपर्यंत हे विमान निघून जाईल आणि नंतर त्यांनी नाही दिलं तर काय? त्यावर म्हणे आपण प्रयत्न करू. हे सर्व होईपर्यंत आमचे ठरलेले विमान निघायच्या तयारीला लागले. संताप, चीड, हतबलता आणि काय काय भावना दाटून आल्या. पण काही मार्ग सुचत नव्हता. भारतातली मंडळी उन्हामुळे आणि झालेल्या त्रासामुळे वैतागली होती. दुसरा पर्याय नसल्याने सर्व मंडळी आपापल्या घरी गेली आणि पुढे अजून ट्रॅव्हल एजन्टशी भांडत अजून काही मार्ग शोधत बसल्याने माझ्याकडे पहाटेचे ४ वाजत आले पण काही मार्ग सापडला नाही. त्यामुळे मला झोपण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

सकाळी जाग आल्यावर मी परत आमच्या ट्रॅव्हल एजन्टला भिडलो. पण काल जिच्याशी बोलत होतो तिची शिफ्ट संपली होती. त्यामुळे नवीन माणसाला परत सर्व सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. ते सर्व सांगितल्यावर तो म्हणाला मी डेल्टाला/ एअर फ्रांसला फोन लावून बोलतो. जवळपास ३-४ तास उलटले तरी मला परत काही त्यांचा फोन येईना. मी फोन केल्यावर सांगत होते की तो अजून एअर फ्रांसशी बोलतोय.

मला त्याचवेळेला शंका आली की हा आपल्याला टांग मारणार. दुसरीकडे मी पण नवीन तिकिट्स शोधायला लागलो. फक्त मुंबई ते वॉशिंग्टन डी सी एका दिशेचे तिकीट प्रतिमाणशी १००० डॉलर पासून पुढे दाखवत होते. शाळा सुरु होणार होत्या त्यामुळे या सर्वांना अमेरिकेत आणणे आवश्यक होते.

उपलब्ध मार्गांपैकी एक म्हणून मी एअर फ्रान्सला फोन केला. त्यांना परत सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्यांचं म्हणणं की मी एजन्टकडून तिकीट काढलंय त्यामुळे मी एजन्टकडे तिकीट बदलून मागितलं पाहिजे. एअर फ्रांस परस्पर तिकीट देईल पण मग ते पूर्ण किमतीचं असेल म्हणजे प्रतिमाणशी $१५०० अधिक $१०० तिकीट बदलायचे चार्जेस. एअर फ्रान्सचा माणूस मला सांगत होता की एजन्टला हीच तिकिटे सवलतीच्या दारात उपलब्ध असतात. मी एजन्टच्या मागे लागलो व बऱ्याच प्रयत्नांनी एजन्टने मला एअर फ्रांस बरोबर कॉन्फरन्स कॉल मध्ये घेतलं. परत सर्व परिस्थिती समजावून सांगण्याचा सोपस्कार पार पाडला. तर मला प्रतिमाणशी $१८०० किंमत सांगण्यात आली. कसं तर $१५०० तिकिटाचे आणि वर $३०० तिकीट बदलायचे चार्जेस. मी विचारलं की मगाशी तर मला $१०० तिकीट बदलायचे चार्जेस सांगितले मग आता का $३०० मागताय? तर म्हणे तिकीट कधी काढलंय त्यावर अवलंबून असतं. मी म्हणलं मला $९०० मध्ये तिकीट मिळतंय तर तुम्ही मला दुप्पट किंमत का सांगताय तर म्हणे आम्ही तुम्हाला सल्ला देतो की ते तिकीट घ्या. आता एजन्ट म्हणायला लागला की आम्ही तुम्हाला तिकीट बदलून द्यायला तयार होतो पण तुम्हीच ती ऑफर घेतली नाही. म्हणलं येड्या दुप्पट पैसे देऊन तिकीट कोणी घेईल का? बऱ्याच भांडणानंतर शेवटी विचार केला की यांच्याकडून काही होण्यासारखे नाही आपण आपलं तिकिट बघावं. उर्वरित भांडण ब्रेक नंतर करू.

अमेरिकन कनेक्शन

संशोधनांती मला प्रत्येकी $७७० ला तिकीट मिळाले. यावेळी मुंबई ते नूअर्क डायरेक्ट फ्लाईट घेतली व नूअर्क ते वॉशिंग्टन डी सी पुढची फ्लाईट होती. विचार केला कटकटच नको मध्ये कुठे दुसऱ्या देशात उतरायची. नशिबाने १५ ऑगस्टची तिकिटे मिळाली. एवढ्या लगेचची ७ तिकिटे मिळणे अवघड असल्याने माझे कुटुंब व माझा मित्र वेगवेगळे यायचे ठरले.

आमची मंडळी एकदाची युनायटेडच्या विमानात बसली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. पण त्रास एवढ्यातच संपणार नव्हता. मी साधारणतः ३०० मैलांवरून त्यांना घेण्यासाठी वॉशिंग्टन डी सी ला जाणार होतो. नूअर्क वरून वॉशिंग्टन डी सी ला ते १२ ला पोचणार होते म्हणून मी सकाळी ६ ला निघालो. सकाळी ८ ला मंडळी नूअर्कला उतरली व दुसऱ्या फ्लाईटसाठी बोर्डिंग पासवर लिहिलेल्या गेटवर जाऊन बसली. मी फोनवर अपडेट घेतच होतो, बायकोला म्हणलं आत्तापर्यंत फार गोंधळ झालाय तू कोणालातरी बोर्डिंग पास दाखवून विचार की ही फ्लाईट इथेच येणार आहे ना, त्याप्रमाणे तिने खात्री करून घेतली. पुढची फ्लाईट १०.३० ला होती. म्हणून आता बोर्डिंग चालू झाले असेल मी ९.४५ ला फोन केला तर म्हणे इथे लोक बसलेत पण बोर्डिंग डेस्कवर कोणीच दिसत नाहीये. माझ्या आग्रहावरून बायको परत एकदा विचारून आली तर बोर्डिंग चालू होईलच म्हणून सांगितलं. म्हणता म्हणता १०.१५ झाले तरी बोर्डिंगची चिन्हे दिसेनात, तेवढ्यात एक पायलट दिसला त्याला बायकोने विचारलं तर तो म्हणाला की गेट बदललंय. पण ना गेट बदलल्याची घोषणा झाली ना यांचे नाव पुकारले. धावतपळत बायको मुली नवीन गेटवर गेल्या तर त्यांना सांगितलं की आता विमान उडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही.

मी चेक केलं तर ते विमान १०.३० च्या ऐवजी १०.२५ लाच सुटलं. ते ऐकून माझी लहान मुलगी रडायलाच लागली. एकतर आधीच्या अडचणी, नंतर सलग १५ तासांचा प्रवास आणि आता हे विमान चुकलं. मी बायकोला म्हणलं भांड चांगलं त्यांच्याशी आणि लगेचचं विमान द्यायला सांग. तर त्यांनी २ तासांनंतरचं एक विमान होतं त्याचं तात्पुरतं तिकीट दिलं आणि सांगितलं की बोर्डिंगच्या वेळेला पास मिळेल. यावेळी वेळेवर बरोबर गेटवर गेले तर त्या विमानात फक्त २ सीट उपलब्ध होत्या. आम्ही म्हणलं की आमची छोटी मांडीवर बसून सुद्धा येईल तर त्याला ते तयार झाले नाहीत. अश्या तर्हेने हे पण विमान आमच्या मंडळींना न घेताच गेलं. इकडे मी डी सीच्या बाहेर ३० मैलावर गाडीत बसून होतो कारण शहरात जाऊन परत पार्किंगचा प्रॉब्लेम झाला असता. पण आता दुसरी पण फ्लाईट न मिळण्याने काय करावं ते कळेना.

पुढची फ्लाईट ५ तासांनंतर होती. पण त्यातही एक छोटाशी अडचण होती. ती फ्लाईट वॉशिंग्टन डी सी मधल्याच दुसऱ्या एअरपोर्टवर जाणार होती. मी म्हणलं ठीक आहे त्यात काय मी तिकडे येतो तुम्हाला घ्यायला. पण थोड्याच वेळात ट्यूब पेटली की त्यांचं सामान तर आधीच्या विमानाने पहिल्या एअरपोर्टवर गेलं असेल. मी युनायटेडच्या ग्राहकसेवेला फोन लावला व त्यांना आमची रामकहाणी सांगितली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बॅग आता “हरवले आणि सापडले” विभागात असतील. माझा विचार होता की माझ्याकडे वेळ आहे तर मी जाऊन बॅग्स घेऊन येतो. तर तसं नाही चालत कारण बॅग्स घेण्यासाठी प्रवाश्यांपैकी कोणीतरी लागतो. तो मला म्हणे की ते उतरले की की त्यांना त्या एअरपोर्टवरून या एअरपोर्टवर आणा आणि बॅग्स घ्या. संध्याकाळी ६ ला वॉशिंग्टन डी सी च्या ट्रॅफिकमधून ये जा करायचे म्हणजे एक दिव्यच आहे. मी त्याला म्हणलं की बाबारे जरा विचार कर ते १५ तास विमानप्रवास करून इथे आले तर ८ तास विमानतळावरच थांबून राहायला लागलं. त्यांना घरून निघून २५ तास झालेत आणि परत तू मला म्हणतो आहेस की त्यांना घेऊन फेऱ्या मारू? म्हणलं ते काही नाही बॅगा मला घरपोच द्या. ही मागणी त्याने मान्य केली व मला प्रक्रिया समजावून सांगितली. नंतर फोनवर बोलता बोलता बायको म्हणाली की ते आता वॉशिंग्टन डी सी पासून आमच्या घरी लगेच प्रवास करायच्या परिस्थितीत नाहीत, त्यामुळे मग वॉशिंग्टन डी सी मधेच हॉटेल बुक केलं. मध्ये वेळ असल्याने मी हॉटेलवर जाऊन बसलो. वेळेवर विमानतळावर जाऊन उभा राहिलो, अखेरीस मंडळी आली. एवढा शारीरिक व मानसिक त्रास आणि $२३०० चा भुर्दंड सोसून पोचले एकदाचे आणि आम्हाला हायसं वाटलं. पुढे ४ दिवसांनी माझा मित्र पण परत आला, त्याला जवळपास $२६०० खर्च आला.

फायनल कनेक्शन

मी मनोमन ठरवले होते की काही करून हा खर्च परत मिळवायचाच. म्हणून कुठे तक्रार करता येईल याचे संशोधन सुरु केले. तो एजन्ट तर अगदीच कुचकामी निघाला त्यामुळे आधी त्याच्याविरुद्ध तक्रार करायची होती. परंतु अशी कुठली सरकारी संस्था अथवा ट्रॅव्हल एजन्ट्सची एखादी शासकीय संस्था सापडत नव्हती. मग एअरलाईनची तक्रार करता येईल अशी कुठली सरकारी संस्था आहे का याचा शोध सुरु केला.

मला Federal Aviation Administration (https://www.faa.gov) कडे तक्रार दाखल करता येते असं कळलं. म्हणून मी एअर फ्रांसविरुद्ध तक्रार दाखल केली. दोन दिवसात मला FAA च्या एका कर्मचाऱ्यांची ई-मेल आली त्यात सांगितलं होतं की माझी तक्रार एअर फ्रांसकडे पाठवली आहे आणि पुढे काय अपेक्षित आहे याचं विवरण दिलं होतं. यथावकाश एअर फ्रांसकडून मला उत्तर आलं की जे झालं त्यात त्यांची काहीच चूक नाहीये त्यामुळे ते काही करू शकत नाहीत. मग परत मी ई-मेलवर थोडी भांडाभांडी केली. तर त्यावर मला एअर फ्रांसने सांगितलं की झालेल्या त्रासाबद्दल ते दिलगीर आहेत आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून $१५० चं एक ट्रॅव्हल व्हाउचर दिलं. माझं डोकंच सटकलं म्हणलं काय भीक देताय का? एवढं ८ लोकांचं वर्तुळाकार प्रवासाचं तिकीट काढलं आणि त्यात तुमच्या कुठल्यातरी विमानतळाच्या एका नियमामुळे मला (आणि माझ्या मित्राला मिळून) $६००० चा भुर्दंड पडला आणि तुम्ही $१५० चा ट्रॅव्हल व्हाउचर देताय? तर एअर फ्रांस म्हणे तुमचा आमचा तसा काही संबंध नाही. मी विचारलं म्हणजे काय, आमची विमानं एअर फ्रांसची होती आणि तुम्ही काय म्हणताय संबंध नाही? तर म्हणे एअर फ्रांस फक्त वाहक (कॅरिअर) आहे. आता हे फारच गोंधळात टाकणारं होतं. मी स्पष्टीकरण विचारल्यावर म्हणे आम्ही सगळे, म्हणजे डेल्टा, KLM, एअर फ्रांस, जेट एरवेज हे सगळे एका गटात आहोत, त्यामुळे यापैकी कोणाचेही विमान तुम्हाला असू शकते. परंतु तिकीट तर डेल्टा एअरलाईन्सने दिलंय तर तुम्ही त्यांच्याशी बोला.
परत माझ्या पोटात गोळा आला की आता अजून एका पार्टीला अथ पासून इतिपर्यंत सगळं समजावून सांगायचं. पण पर्याय नव्हता.

आता मोर्चा डेल्टाकडे वळवला. सगळी केस आणि डिटेल्स पाठवून दिले. थोड्या दिवसांनी डेल्टाकडून ई-मेल आली. प्रथम सगळं पाल्हाळ की तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि प्रवाश्यांची काळजी घेण्यासाठी डेल्टा कसे प्रयत्न करते वगैरे वगैरे. मनात म्हणलं मुद्द्याचं सांगा... तर पुढे लिहिलं होतं की सगळं झालेला गोंधळ व्हिसाशी संबंधित आहे त्यामुळे त्यात डेल्टा काहीच करू शकत नाही. वाचता वाचता माझी कानशिलं गरम होऊ लागली. राग, चीड, काही करू शकत नसल्याची भावना, एवढे पैसे उगाच खर्च करायला लागले याची टोचणी अश्या भावना उचंबळून आल्या. म्हणलं आपले पैसे अक्कलखाती जमा करायला लागणार बहुतेक. पण ई-मेल मध्ये अजून पण खाली काहीतरी लिहिलं होतं. आधी मला वाटलं की परत तेच पुराण असणार की आम्ही आमच्या ग्राहकांची किती काळजी घेतो वगैरे. पण वाचता वाचता लक्षात आलं की ते वेगळंच सांगत आहेत.

त्यात लिहिलं होतं की या परतीच्या प्रवासात जे झालं आणि जो खर्च झाला त्याला डेल्टा काहीच करू शकत नाही. परंतु जाताना जे आमचं विमान एअर फ्रान्सच्या वैमानिकांच्या संपामुळे बदलून घ्यायला लागलं होतं, त्यासंबंधी युरोपिअन युनिअनचा एक नियम आहे. त्या नियमाप्रमाणे आम्हाला प्रतिप्रवाशी ६०० युरो म्हणजेच $६७० मिळतील. मी ४ वेळा ते परत परत वाचलं, म्हणलं चला झालेल्या खर्चाचा थोडा भाग तरी वसूल होईल. थोडी आकडेमोड करता लक्षात आलं की जाताना तर आम्ही चौघे गेलो होतो म्हणजे जवळपास $२६०० मिळतील. मग त्या प्रतिनिधीला परत सगळी तिकिटं पाठवली आणि यथावकाश आमचे चेक्स आले.

अश्याप्रकारे आमच्या भारतवारी साठाउत्तरी संपूर्ण झाली.

प्रवासअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

एस's picture

28 Oct 2016 - 5:49 am | एस

हुश्श! ;-)

पिलीयन रायडर's picture

28 Oct 2016 - 10:13 am | पिलीयन रायडर

हेच्च वाटलं!!! म्हणलं जातात की काय २३००$ पाण्यात.. पण नाही, आपल्या ट्रेड मार्कना नेहमी मार्ग मिळतोच!

पण ही माहिती महत्वाची आहे. असे नियम ह्या धाग्यात एकत्र करता आले तर बरं पडेल.

ट्रेड मार्क's picture

28 Oct 2016 - 7:41 pm | ट्रेड मार्क

एका क्षणी मला पण वाटलं होतं की एवढे पैसे गेले... पण प्रयत्न सोडले नाहीत. विचार केला जास्तीत जास्त काय तर भांडायला लागेल. (मी सगळीकडे भांडत असलो तरी तसा मी भांडकुदळ नाही. :))

शोधलं की सापडतच.. त्यात मार्ग पण आलाच ;)

धाग्याचा मूळ उद्देश अश्या नियमांची माहिती मिळावी हाच आहे. मिपावर असे प्रवास करणारे बरेच आहेत. त्यामुळे प्रवास करायच्या आधी सर्व नियमांची माहिती घ्यावी. दुर्दैवाने हे व्हिसासंबंधी आणि सुरक्षेसंबंधी नियम वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे आपल्या प्रवासाच्या थोडे आधी परत एकदा चौकशी करणे महत्वाचे आहे.

यशोधरा's picture

28 Oct 2016 - 10:03 am | यशोधरा

बाप्रे! भलताच मनस्ताप.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Oct 2016 - 10:28 am | llपुण्याचे पेशवेll

अथक संग्रामाबद्दल अभिनंदन.

ट्रेड मार्क's picture

28 Oct 2016 - 8:00 pm | ट्रेड मार्क

न्याय मिळतो पण तो मिळवावा लागतो

सत्यवचन!!!

माझ्या मित्राने सोडून दिलं होतं म्हणजे फारसे प्रयत्न केले नाहीत. पण चांगली गोष्ट ही की माझ्याबरोबर त्याला पण पैसे मिळाले. म्हणजे मी तक्रार करतानाच आमच्या सगळ्यांची नावं आणि तिकिटं देऊन केली होती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2016 - 10:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

चिकाटीने आपली बाजू लावून धरल्याबद्दल अभिनंदन ! उपयुक्त माहितीचा लेख.

संदीप डांगे's picture

28 Oct 2016 - 10:18 pm | संदीप डांगे

+10000, भारीच!!!

नाखु's picture

1 Nov 2016 - 9:33 am | नाखु

जवळच्या लोकांच्या भीडेखातर्/टीकेखातर आपली न्याय्य आणि हक्काच्या पैशाची बाजू सोडू नये.

अभिनंदन आणि या अनुभवाने काहींना दिलासा/मार्गदर्शन होईल.

अमेरिकन त्रिशंकू's picture

29 Oct 2016 - 3:29 am | अमेरिकन त्रिशंकू

या प्रसंगात उपयोग झाला असता की नाही माहिती नाही पण तिकिट पूर्णपणे क्रेडिट कार्ड्वर चार्ज केले असेल तर (विशेषतः अमेरिकन एक्सप्रेस वर) तर क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्यावतीने एअरलाईनशी बोलून पैसे परत मिळवू शकते.

माझा वैयक्तिक अनुभव खूप चांगला आहे या बाबतीत.

विंजिनेर's picture

29 Oct 2016 - 6:10 am | विंजिनेर

अमेक्सच्या क्रेडिट कार्डावर प्रवास, भाड्याने घेणार असाल तर त्या गाडीचा ईंश्युरन्स इ. सुविधा "फुकट" (ऑप्ट-इन) उपलब्ध असतात.
शिवाय त्यांची ग्राहक सेवा उच्च दर्जाची आहे.

ट्रेड मार्क's picture

29 Oct 2016 - 7:25 pm | ट्रेड मार्क

हा पर्याय माझ्या लक्षात आला नव्हता. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

मी चेसच्या युनायटेड एक्सप्लोरर कार्डवरून घेतलं होतं. त्यांची अशी काही सुविधा आहे का बघायला पाहिजे. कोणाला माहिती/ अनुभव असल्यास कृपया माहिती द्या. सर्वांनाच उपयोगी पडेल.

अमेरिकन त्रिशंकू's picture

29 Oct 2016 - 11:01 pm | अमेरिकन त्रिशंकू

नवीन तिकिट पण त्याच क्रेडिट कार्ड्वर चार्ज केलं होतं का?
बहुतेक सर्व क्रेडिट कार्ड कंपन्या ही सुविधा पुरवतात. पण प्रत्येक क्रे.का. कं. चे नियम वेगळे असू शकतात.
तेव्हा क्रे.का.कं.ला फोन करून तुमची स्पेसिफिक माहिती पुरवून त्यांना विचारणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे.
युनायटेड एअरलाईन्सची फ्लाईट असती आणि ते तिकिट युनायटेड ब्रॅंडेड क्रे.का. वर विकत घेतलं असतं तर नक्की उपयोग झाला असता.

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2016 - 7:56 am | ट्रेड मार्क

दोन्ही तिकिटं युनायटेड एक्सप्लोरर कार्ड वर घेतली होती. पाहिलं डेल्टाने इश्यू केलं होतं आणि दुसरं युनायटेडने. काही करता येईल का?

पण युनायटेडच्या फ्लाईटला तो कनेक्टिंग फ्लाईट चुकल्यामुळे त्रास झाला त्याबद्दल विचारायला हरकत नाही.

अमेरिकन त्रिशंकू's picture

30 Oct 2016 - 7:43 pm | अमेरिकन त्रिशंकू

दोन्ही तिकिटं युनायटेड एक्सप्लोरर कार्ड वर घेतली होती. पाहिलं डेल्टाने इश्यू केलं होतं आणि दुसरं युनायटेडने. काही करता येईल का?

क्रे.का.कं आणि युनायटेड एअरलाईन्स दोघांना फोन करून बघा.
उपयोग होईलच असं नाही पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही.

विंजिनेर's picture

29 Oct 2016 - 6:23 am | विंजिनेर

भारतीय (वंशाच्या) लोकांना युरोप किंवा ब्रिटन मार्गे प्रवास करायचा असेल तर अमेरिकन पासपोर्ट/ग्रीन कार्ड विना प्रचंड डोकेदुखी असते - एकतर युनिअन प्रचंड ताकदवान असल्यामुळे पायलट/लगेज हँडलर्स्/इतर कुणी इ. कुठल्याही गटाचा कधीही संप होऊ शकतो - आणी मग गरीब बिचारे प्रवासी (गरीब बिचारे मुकी हाका... च्य चालीवर) भरडून निघतात.
दुसरे म्ह़णजे थंडीच्या दिवसात हिमवर्षावा मुळे हमखास रनवे बंद पडून संपूर्ण कोलाहल माजतो.
तिसरे म्हणजे लेखात म्हटल्यामुळे व्हिसाचे नियम अर्तक्य, जाचक आणि खर्चिक आहेत.

शिवाय, डेल/अमेरिकन/केएलम तश्याही ग्राहकसेवेबाबत स्वतःचा भिकारपणा दाखवण्यासाठी चढाओढच करत असतात म्हणा.

उत्तम+निर्धोक्+हमखास वेळेवर पोहोचण्याचा मार्ग म्हणजे (पश्चिम किनार्‍यांवरून) आशिया मार्गे (सिंगापूर्/कोरिया/जपान/बँकॉक्/हाँकाँग इ. मार्गे जावे किंवा मध्यपूर्वे मार्गे एमिरेट्स/इतिहाद मार्गे जावे.
असो.

रेवती's picture

30 Oct 2016 - 9:01 am | रेवती

बरीचशी सहमत.

श्रीरंग_जोशी's picture

29 Oct 2016 - 9:31 am | श्रीरंग_जोशी

एक अत्यंत त्रासदायक मोकळेपणाने मांडून आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करताना घ्यावयाची काळजी याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी केलेले हे लेखन खूप भावले. दोन्ही कुटूंबांना झालेला त्रास पाहून वाईट वाटले. तुम्ही प्रयत्न न सोडता चिकाटीने किल्ला लढवून आर्थिक नुकसान टाळले याबद्दल अभिनंदन.

गेल्या काही वर्षांत स्वतःच्या व इतरांच्या अनुभवांतून काही गोष्टी शिकलो की शक्यतोवर फ्लाइट बुकींग एअरलाइनच्या वेबसाइटवरूनच करावे. कधी कधी पूर्ण आयटिनररी त्या साइटवर उपलब्ध नसल्यास आघाडीच्या ट्रॅव्हल साइटवरून करावे जसे एक्सपिडिया, ऑरबिट्झ, ट्रॅव्हलोसिटी इत्यादी.

तसेच बुकींग करताना सीट नंबर, जेवणाचा प्रकार हे सेट केले असले तरीही प्रवासाच्या तीनचार दिवस अगोदर त्या त्या एअरलाइनच्या वेबसाइट वर पुन्हा एकदा तपासून घेणे (बरेचदा एकापेक्षा अधिक एअरलाइनचा प्रवास असतो).

सुदैवाने आजवर नकारात्मक म्हणावा असा अनुभव आलेला नाही. पण या बाबतीत दक्षता घेत राहणे कधीही उपयोगाचेच.

ट्रेड मार्क's picture

29 Oct 2016 - 7:44 pm | ट्रेड मार्क

विशेषतः खाण्याच्या बाबतीत आणि सीट्स तपासणे आवश्यक आहे. तसेच ज्येष्ठ व्यक्तींसाठी व्हील चेअर वगैरे घेतली असेल तर ते तर नक्कीच तपासावे. मी प्रवासाच्या आधी परत सगळं एकदा तपासतो, तसं या वेळेला पण तपासलं होतं. अगदी प्रवासाच्या दिवशी पण व्हिसाबद्दल तेच दाखवत होते. हा एअरपोर्टचा नियम बहुतेक कोणालाच माहित नव्हता आणि त्रास मात्र मला झाला. मी तर एअर फ्रांसच्या कस्टमर सर्व्हिसशी पण बोललो होतो की २४ तासांचा थांबा आहे तर एअरपोर्टवर थांबण्यासाठी काय पर्याय आहेत. कोणी एका शब्दाने काही बोललं नाही की एअरपोर्टवर ५ तासांच्या वर थांबता येणार नाही.

एअरलाइनच्या वेबसाइटवर तिकिटं जरा महाग पडतात म्हणून दुसरे पर्याय शोधले. चार जण जायचं म्हणलं की विचार करायला लागतो :)

पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, विश्वसनीय एजन्ट/ वेबसाईट वरून तिकीट घ्यावे.

सुधांशुनूलकर's picture

29 Oct 2016 - 9:36 am | सुधांशुनूलकर

हा अनुभव इथे मांडल्याबद्दल आभार. शांत डोक्याने विचार करून योग्य निर्णय घेत गेल्याबद्दल अभिनंदन.

खटपट्या's picture

29 Oct 2016 - 8:16 pm | खटपट्या

हा अनुभव आपण इथे मांडल्याबद्दल आभार. माझाही एअर फ्रान्सचा अनुभव अतिशय वाइट्ट आहे.

मी लॉस एंजेलेस ते मुंबई चे व्हाया पॅरीस तिकीट काढले. लॉस एंजेलेस वरुन व्यवस्थीत पॅरीसला पोहोचलो आणि पॅरीसला पोहोचल्यावर धक्काच बसला. कारण पॅरीस ते मुंबइ फ्लाइट चक्क कँसल केली होती. कारण विचारले तर म्हणे अपुरे प्रवासी आहेत म्हणून. मग आता या अपुर्‍या प्रवाशांनी जायचे कसे मुंबैला? भरपूर भांडाभांडी केल्यावर एमीरेट्सचे तीकीट माझ्या हातात कोंबण्यात आले. तेही पॅरीस ते दुबइ आणि दुबइ ते मुंबै असे होते.
तीथे ठाण्याचे एक आजी अजोबा होते. त्यांना काहीच कळत नव्हते काय करावे. त्यांनी भीतभीत मी मराठी आहे का विचारले. मी हो म्हणताच त्यांच्या चेहर्‍यावर त्यांचा मुलगाच भेटल्याचा आनंद झाला. मग त्या जोशी आजीआजोबांना घेउन मी दुबइ मार्गे मुंबै आणि मग ठाण्याला आलो.
त्यानंतर मी कानाला खडा लावला. कधीही एअर फ्रान्सने न जाण्याचा निर्णय घेतला.

माझी सर्व मिपाकरांना विनंती आहे की एअर फ्रान्स ने प्रवास टाळावा...

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2016 - 8:02 am | ट्रेड मार्क

एक तर बहुतेक युरोपिअन एअरलाईन्समध्ये दुजाभावाची (डिस्क्रिमिनेशन) वागणूक मिळते. एअर फ्रांस बरोबरच मला Lufthasa चा पण चांगला अनुभव नाहीये. त्यामुळे युरोपिअन एअरलाईन आणि युरोपमध्ये थांबा टाळणे हेच सर्वात उत्तम.

लुफ्तांसाचा अनुभव चांगला आला होता. डिस्क्रिमिनेट तर एयर इंडियानेही केले होते. ;) आपले लोकही वाईट वागतात. किती कचरा व पसारा घालून ठेवतात.

हा महत्वाचा लेख वाचायचा राहून गेला होता.
तुम्ही चिकाटीने बाजू लावून धरलीत म्हणून पैसे मिळाले.
असले नियम व टोलवाटोलवीबद्दल वाचूनच वैताग आला, तुम्हाला तर प्रत्यक्ष त्यातून जावे लागले.
अनुभवातून आता असे शिकायचे का, एयर फ्रान्सने जाण्याची वेळ आली तर ट्रांझीट व्हिसा करून घ्यायचा? एयर फ्रान्सवाले आधी तिकिटे स्वस्तात विकतात आणि नंतर असले नियम लावतात. माझा लेओव्हर टाईम जर तीन तासांचा असेल पण काही कारणाने फ्लाईट डिले होऊन तो सात आठ तासांचा झाला की काय करणार?
मी एकदा की दोनदा ए फ्रा ने गेलीये पण पहिल्यावेळी त्यांनी खाण्यापिण्याचे जाम हाल केल्यामुळे तसेही ते मनातून उतरले आहेत. त्यातून मी प्रवासी मौसम नसताना गेले होते. फ्लाईट रिकामी होतीच पण माझ्या टर्मिनलला मी व आणखी एक दोन माणसे सोडता दोनेक तास पहाटेच्यावेळी काळं कुत्रं फिरकलं नव्हतं. चांगलीच तंतरली होती.
एकूणच ती एयरलाईन आवडली नाहीये.

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2016 - 8:24 pm | ट्रेड मार्क

युरोपमधील कुठल्याही एअरपोर्ट थांबा असेल तर अतिरिक्त काळजी घ्या. जर का तुमचा कमी वेळाचा थांबा असेल पण त्यांच्याकडून उशीर झाला म्हणून लांबला तर ती विमानकंपनीची जबाबदारी असते. त्यामुळे त्या ठिकाणची व्हिसा वगैरेची सोय विमानकंपनीने करणे अपेक्षित आहे आणि बहुतांशी ते करतात. जर का तुमची आधीची फ्लाईट उशिरा आली आणि त्यामुळे तुमची पुढची फ्लाईट चुकली तरी पण तुमची पुढची सर्व सोय करण्याची जबाबदारी विमानकंपनीची असते. पण जर का तुमच्या चुकीने काही गडबड झाली तर मात्र ते कायमच हात वर करण्याच्या तयारीत असतात.

दुसरा एक महत्वाचा नियम मला समजला तो म्हणजे भारतातून निघून तुम्हाला अमेरिकेला येताना युरोपमध्ये हॉपिंग, म्हणजे भारत ते लंडन ते फ्रांस ते अमेरिका , असा प्रवास असेल तर ट्रान्सीट अथवा शेंझेन व्हिसा लागतोच. माझ्या ओळखीत एकाला त्याच्या युरोप मधल्या पहिल्या थांब्यावर अडवलं आणि त्याला तिथून स्वतःच्या खर्च करून दुसरं फ्लाईट बुक करून यायला लागलं. यात विमान कंपनी कुठलीच जबाबदारी घेत नाही.

तसेच फक्त व्हिसाचे नियम न बघता जर का ३-४ तासांपेक्षा तेथील थांबा जास्त असेल तर त्या विमानतळाचे नियम पण तपासणे गरजेचे आहे. मुख्य अडचण अशी आहे की हे नियम प्रत्येक विमानतळाचे वेगळे असू शकतात आणि वेळोवेळी बदलत असतात. मला तर आता असं वाटायला लागलाय की युरोपच काय दुसऱ्या कुठल्याही देशात थांबा असेल तर तिथले नियम बघणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत कधी काय नियम बनवतील आणि बदलतील काही सांगता येत नाही. त्यात आपल्या कातडीच्या आणि केसांच्या रंगामुळे आपण लगेच रडारवर येतो, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

रेवती's picture

31 Oct 2016 - 7:59 pm | रेवती

ओक्के.

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2016 - 10:45 am | श्रीरंग_जोशी

वर काही प्रतिसादांत डेल्टा - एअर फ्रान्स - केएलएम बाबत बरेच नकारात्मक अनुभव मांडले गेले आहेत अन काही सन्माननीय मिपाकरांनी या एअरलाइन्स टाळाव्या असेही सुचवले आहे. हे नि:संशय सरसकटीकरण वाटले.

२००९ सालापासून मी स्वत: व माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी (माझी बायको, आई-वडील, सासु-सासरे) यांनी अनेकदा या एअरलाइन्सद्वारे प्रवास केला आहे. आजवर लक्षात राहील असा एकही नकारात्मक अनुभव नाही. सर्वात मोठा फायदा असा की आम्हाला केवळ एक थांबा घेऊन सरासरी ९ तासांच्या दोन फ्लाइट्सद्वारे भारतात पोचता येते किंवा भारतातून पोचता येते.

इथल्या विमानतळावर (मिनियापोलिस - सेंट पॉल) डेल्टा एअरलाइन्सचा हब असल्याने अंदाजे दोन तृतीयांश किंवा अधिक फ्लाइट्स डेल्टाच्याच असतात. त्यामुळे स्थानिक वा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वाधिक पर्याय आम्हाला डेल्टाचेच असतात. आंतरराष्ट्रीय प्रवासात बुकींग करताना किंवा फ्लाइटच्या दोन दिवस अगोदरपर्यंत भारतीय शाकाहारी जेवणाचा पर्याय निवडून ठेवल्यास उत्तम चवीचे भारतीय जेवण इतर प्रवांशांपूर्वी आपल्याला आणून देण्यात येत (हे भारताकडे जाणार्‍या फ्लाइट्सबाबत). माझ्या बायकोला एअर फ्रान्सच्या फ्लाइटमध्ये मिळणारा मसाला चहा अतिशय प्रिय आहे.

डेल्टाचा फ्रिक्वेन्ट फ्लायर प्रोग्राम अंतरावर आधारित नसुन तिकिटाच्या किमतीवर असल्याने अधिक व्हॅल्यु फॉर मनी असा आहे. गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे डेल्टा अमेरिकेची आघाडीची एअरलाइन बनली आहे.

काही महिन्यांपूर्वी मी एका अनुभवी पायलटने लिहिलेले एक पुस्तक वाचले - Cockpit Confidential: Everything You Need to Know About Air Travel: Questions, Answers, and Reflections . त्यात या क्षेत्रातल्या आव्हानांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक वाचून एक बाब स्पष्टपणे जाणवते की आपल्याला प्रवासादरम्यान होणार्‍या प्रत्येक गैरसोयीसाठी ती एअरलाइन जबाबदार असेलच असे आवश्यक नाही. कितीतरी घटक त्या एअरलाइनच्या नियंत्रणात अजिबात नसतात.

दुर्दैवाने जालावर सकारात्मक अनुभव कुणी लिहित नाही अन नकारात्मक अनुभव आवर्जुन लिहिले जातात. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही परंतु एखादी एअरलाइन पूर्णपणे टाळावी ही सूचना संयुक्तिक नाही.

ट्रेड मार्क's picture

31 Oct 2016 - 7:26 pm | ट्रेड मार्क

१. जसा तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तसा रेवतीताईंनी, मी आणि इतरांनीही आपापले अनुभव सांगितले, जे चांगले वाईट दोन्ही असू शकतात. आता मला व्यक्तिशः एअर इंडियाचा आणि युनायटेडचा चांगला अनुभव आहे. तो मी एअर इंडिया कशी वाईट सेवा देते ते सांगणाऱ्या धाग्यावर जे काही मोजके सकारात्मक प्रतिसाद होते त्यात सांगितला. बादवे, मला आणि रेवतीताईंना पण एअर फ्रांसचा वाईट अनुभव आला, डेल्टाचा नव्हे.

२. इतरांवर सरसकटीकरणाचा आरोप करताना हे वाक्य "दुर्दैवाने जालावर सकारात्मक अनुभव कुणी लिहित नाही अन नकारात्मक अनुभव आवर्जुन लिहिले जातात." म्हणजे सरसकटीकरणच आहे ना?

३. "एखादी एअरलाइन पूर्णपणे टाळावी ही सूचना संयुक्तिक नाही" - एखादी एअरलाईन किंवा एखादा मार्ग किंवा एखादी सेवा/ वस्तू टाळावी यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? जर पर्याय उपलब्ध असेल तर विचार करावा हा अर्थ आहे, कोणावरही सक्ती नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही राहता तिथे जास्त उपलब्धता डेल्टाची आहे त्यामुळे ती एअरलाईन घेणे संयुक्तिक आहे.

४. धाग्याचा मुख्य उद्देश असे बारीक अक्षरातले, फारसे माहिती नसलेले नियम असतात आणि त्याचा तुम्हाला कसा त्रास होऊ शकतो हे सांगण्याचा आहे. तसेच एअरलाईनच्या चुकीमुळे अथवा त्यांच्याकडच्या कुठल्या प्रॉब्लेममुळे प्रवाश्याला त्रास झाला तर नुकसानभरपाई मिळू शकते हे सांगण्याचा आहे. बहुतांशी लोक कुठे भांडत बसायचं म्हणून सोडून देतात किंवा असं काही असतं याची माहितीच नसते किंवा चक्क लाजतात. तर मला आलेला अनुभव सांगून कोणाला काही फायदा झाला तर चांगलंच आहे. आता अनुभव सांगताना बरे वाईट दोन्ही सांगितले जाणार आणि ज्याने ते अनुभव दिले त्याचे नावही लिहिले जाणार.

मुख्य कार्यालय/ हबच्या ठिकाणी सेवा चांगलीच असते/ ठेवायला लागते. तसंही नथिंग इज पर्मनंट, त्यामुळे माझा आणि तुमचा विचार/ अनुभव केव्हाही बदलू शकतो.

उदय's picture

1 Nov 2016 - 2:37 am | उदय

त्यात लिहिलं होतं की या परतीच्या प्रवासात जे झालं आणि जो खर्च झाला त्याला डेल्टा काहीच करू शकत नाही. परंतु जाताना जे आमचं विमान एअर फ्रान्सच्या वैमानिकांच्या संपामुळे बदलून घ्यायला लागलं होतं, त्यासंबंधी युरोपिअन युनिअनचा एक नियम आहे. त्या नियमाप्रमाणे आम्हाला प्रतिप्रवाशी ६०० युरो म्हणजेच $६७० मिळतील.

तुम्हाला केवळ टेक्निकॅलिटीमुळे पैसे परत मिळाले आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण एजंटने तुम्हाला ऑलरेडी ९ जूनची तिकिटे बदलून दिली होती आणि तसं म्हटलं तर तुमची गैरसोय काही अंशी टाळली गेली होती. पण तरीही तुमची गैरसोय झाली असेल या अनुमानाने त्यांनी तुम्हाला पैसे परत दिले.

मुळात लहान मुले सोबत असताना मी २४ तास कुठल्याही एअरपोर्टवर थांबून घालवणार नाही विशेषतः बायकोबरोबर लहान मुली आहेत आणि मी पण सोबत नाही तेव्हा तर नक्कीच नाही. सध्या अतिरेक्यांच्या त्रासामुळे सगळीकडे कडक तपासणी होते हे तर जवळपास प्रत्येकाला माहीत असतेच. त्यामुळे कुणालाही ५ तासापेक्षा जास्त वेळ एअरपोर्टवर थांबू देत नाहीत याबद्दल आश्चर्य वाटायला नको. मान्य आहे की तुम्हाला हा नियम माहीत न्हवता किंवा कुणी सांगितला नाही, त्यामुळे खरेतर हे सगळे रामायण घडले. पण ही गोष्ट फ्रेंच एम्बसीला माहीत नसण्याची शक्यता ही तितकीच आहे. नशीब समजा की तुम्ही भारतातील फ्रेंच एम्बसीबरोबर किमान बोलू तरी शकलात. हेच जर कधी भारतीय एम्बसीबरोबर फोनवर बोलायची वेळ कधी आली, तर अजून चांगले पटेल. व्हिसावर भारतात गेलो होतो तेव्हा मला भारतातून ४ दिवसात सिंगापूरला जायचे होते, तर रिएंट्रीसाठी NOC लागेल का, हे मी भारतीय एम्बसीला विचारूनही त्यांनी चक्क खोटे सांगितले होते की काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मग मला एअरपोर्टवर लटकवले होते. सांगायचा मुद्दा काय की एम्बसीला इमिग्रेशनचे नियम माहीत असणे अपेक्षित आहे (तेपण धड सांगितले तर नशीब), एअरपोर्टचे जाण्या-येण्याचे नियम माहीत असणे अपेक्षित नाही. तुमच्या मूळ प्लॅनप्रमाणे २४ तास पॅरिसमध्ये थांबायचे तर व्हिसा काढायला हवा होता किंवा पैसे भरून विमानाची वेळ सोयीस्कर पडेल अशी घ्यायला हवी होती. मी एकदा प्रत्येकी $१५० भरून एअर फ्रान्सकडूनच वेळ बदलून घेतली आहे. (तुम्ही $७७०चे नवीन तिकीट काढण्यआधी हा पर्याय बघितला असेल हा अंदाज).

नूअर्कला विमान चुकले याला काही प्रमाणात तुमचे कुटुंबिय/तुम्ही जबाबदार आहात. विमानतळावर गेट बदलण्याचे प्रकार बर्‍याचदा होतात. त्यासाठी एअरपोर्टवर जे फलक लावलेले असतात तिथे करंट गेट क्रमांक कळतो, तुम्हाला गूगलवर नवा गेट क्रमांक कळतो, चेकईन काऊंटरवर विमानाचे ठिकाण/वेळ लिहिलेले असते. तुम्ही फोनवर अपडेट घेत होता, तर गेट बदलले आहे ते तुम्हाला कळले नाही आणि तुम्ही बायकोला सांगितले नाही ही कुणाची चूक?

मी बायकोला म्हणलं भांड चांगलं त्यांच्याशी आणि लगेचचं विमान द्यायला सांग.

एअरपोर्ट स्टाफशी भांडून काहीही फायदा होत नाही. झाले तर नुकसानच होते. सोबत लहान मुले आहेत हे सांगितले तर ते मदत करतात, असा अनुभव आहे. आम्हाला तर एकदा, सोबत मुले आहेत आणि दूरचा प्रवास करून आलात म्हणून टोरोंटोला आमच्या वेळेच्या आधीचे कनेक्टिंग विमान दिले होते.

(अर्थात अमेरिकन पासपोर्ट असल्याने फरक पडतो, हे देखील नमूद करतो). विमान म्हणजे फार अपेक्षा न ठेवता, एअरकंडिशन्ड एस.टी.मधून प्रवास करतोय इतपत अपेक्षा ठेवली की प्रवास सुखाचा होतो हे लक्षात ठेवा.

टेक्निकॅलिटीमुळे पैसे परत मिळाले हे बरोबर आहे. धाग्याचा उद्देश ते सांगण्याचा आहेच. एअरलाईन स्वतःहून पैसे देत नाही पण तुम्ही तक्रार केलीत अथवा नुसती विचारणा केलीत तर पैसे मिळू शकतात. बाकी नियमांप्रमाणे हे नियम सुद्धा आपल्याला माहिती नसतात, म्हणून ते सांगण्याचा छोटासा प्रयत्न.

बाकी तुम्ही म्हणताय ते सर्व घडून गेल्यावर मला पण सुचलं. माझी बायको आणि मुली यांच्याबरोबर माझा मित्र आणि त्याची फॅमिली पण होते. त्यामुळे ते अगदीच एकटे नव्हते. विमानतळांवरील कडक तपासणीबद्दल माहित आहेच आणि त्यासाठीची तयारी पण करतोच. पण हा विशिष्ठ नियम फ्रेंच व भारतीय कॉन्सुलेट याखेरीज, एजन्ट, एअरलाईन, विविध ट्रॅव्हल ब्लॉग्स व गूगल सर्च करून मिळेल तेवढे सर्व यापैकी कोणालाच माहित नव्हता. जर का नवीन नियम झाला असेल तर त्याची माहिती आधी प्रवाश्यांना द्यावी ही साधी अपेक्षा आहे.

बाकी मी वेळ बदलण्याविषयी विचारले होते. पण मला बरीच जास्त किंमत सांगितली. तुम्ही म्हणताय तसे काही $$ लावून बदलून देतात पण ते किती असावेत हे नक्की नाही असं दिसतंय. त्यावर ज्या दिवसाचं तिकीट तुम्ही काढलाय आणि ज्या दिवसाचं नवीन तिकीट काढताय त्या दोन्हीमधला फरक द्यायला लागतोच. एकूण ते बरंच महागात जातं.

बाकी नूअर्कला विमान चुकले यात आमची पण थोडी चोउक होती पण बरीचशी परिस्थिती पण पूरक नव्हती. मी लेखात सांगितल्याप्रमाणे प्रवास करत होतो, त्यात माझ्या प्रवासमार्गावर एक पट्टा असा आहे की जिथे डेटा कनेक्शनला प्रॉब्लेम असतो आणि नेमका यांच्या विमानाच्या बोर्डिंगच्या वेळेस मी त्या भागात होतो. बाकी बोर्डिंग चेक इन काउंटरवर त्यांनी लिहिलेलं बायकोला/ मुलीला दिसलं नाही आणि विमानतळावर तशी अनाऊन्समेन्ट झाली नाही. असो. गवि नेहमी म्हणतात तसं, अश्या नको असलेल्या घटना या बऱ्याच चुकांच्या साखळीमुळे घडतात. तसंच इथे झालं, आता त्यात सगळ्यांचाच थोड्याफार चुका असणार.

तेथे कडाकडा भांडायचं नसतं हे मलाही आणि माझ्या बायकोलाही कळतं हो. ही फक्त त्यावेळेला झालेली माझी सहज प्रतिक्रिया होती जी मी लिहिली. बायको काही काउंटरवर एकटीच गेली नव्हती, मुलीही सोबत होत्या. पण त्याने फारसा काही फरक पडला नाही. टोरोंटोच्या घटनेमुळे मात्र तुम्ही नशीबवान दिसताय.

विमान म्हणजे फार अपेक्षा न ठेवता, एअरकंडिशन्ड एस.टी.मधून प्रवास करतोय इतपत अपेक्षा ठेवली की प्रवास सुखाचा होतो हे लक्षात ठेवा.

बऱ्याच अंशी हे खरंय, फक्त तुम्ही बिझनेस/ फर्स्ट क्लासने जात नसाल तर. विमान प्रवासाबद्दल, म्हणजे उड्डाणादरम्यानच्या सेवेबद्दल, माझी कुठलीच तक्रार नव्हती. तर तक्रार फक्त व्हिसा आणि विमानतळाच्या आधी कोणालाही माहित नसलेल्या नियमांबद्दल आहे. बादवे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा पहिलाच प्रवास नाहीये. माझी बायको आणि मुली बरेचदा एकट्या पण आल्या गेल्या आहेत. तुमच्या सांगण्यावरून तुम्ही पण बरेचदा प्रवास केला आहे असा वाटतंय. पण तुम्ही/ मी किंवा अगदी दर महिन्याला प्रवास करणारा कोणीही त्याला एकूण एक नियम माहिती आहेत असा दावा करू शकत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

1 Nov 2016 - 6:27 am | श्रीरंग_जोशी

माझा हा प्रतिसाद मूळ धाग्यावर नसून चर्चेदरम्यान मांडल्या गेलेल्या मुद्द्यांवर होता. मूळ धाग्यावरचा प्रतिसाद अगोदरच दिलेला आहे.

वरचा प्रतिसाद थोडक्यात लिहिला. इतरही सकारात्मक अनुभव आहेतच. माझ्या सासुसासर्‍यांना दर वेळी भारतातून निघताना प्रति-माणशी दोन मोठ्या बॅगांखेरीज केबिन बॅग्जही चेक इन करू दिल्या जातात (बहुधा ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे). त्यामुळे ते अगोदरच औषधे व कागदपत्रे हॅण्ड बॅगेजमध्ये ठेवून विमानतळावर पोचतात.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा माझे आईवडील भारतातून येत होते तेव्हा पॅरिस विमानतळावर एअर फ्रान्सच्या काउंटरवर रांगेत उभे असताना त्यांची स्थानिक महिला अधिकारी प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकांजवळ स्वतःहून जाऊन हिंदीमध्ये संवाद साधत होती. माझ्या आईवडीलांना या गोष्टीचे खूपच समाधान वाटले.

बाकी डेल्टा - एअर फ्रान्स - केएलएम यांचा एकत्रित उल्लेख अशासाठी कारण तिकिट तिन्हीपैकी कुणाचेही असो त्यांचे कोलॅबरेशन असल्याने प्रत्यक्षात फ्लाईट यापैकी कुणाचीही असू शकते. तसेच गेल्या मार्च महिन्यापासून जेट एअरवेजने त्यांचे युरोपातले हब ब्रसेल्सहून अ‍ॅमस्टरडॅमला हलवल्याने भारतातून अमेरिकेतला प्रवास अ‍ॅमस्टरडॅममार्गे असल्यास निम्मा प्रवास (दोन्ही दिशांनी) जेट एअरवेजच्या विमानाने असण्याची शक्यता असते. जेट एअरवेजची खानपानसेवा खूपच चांगली आहे.

एखादी एअरलाईन टाळावी या सूचनेला असंयुक्तिक म्हंटले कारण बरेच भोळे लोक अशा गोष्टींच्या आधारे आपले निर्णय घेतात व अधिक सोयीचा पर्याय असूनही तो टाळतात. लगेच आठवलेले एक उदाहरण म्हणजे माझा एक भारतीय सहकारी तो अमेरिकेत नवा असताना त्याने कुणाचा तरी ऑनलाईन शॉपिंगचा नकारात्मक अनुभव ऐकला. त्याने अनेक वर्षे सगळी खरेदी दुकानात जाऊनच केली. मला जेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा मी त्याला अ‍ॅमेझॉनवरून मी नियमितपणे किती खरेदी ते दाखवले. केवळ एका गैरसमजामुळे त्याने अधिक महागडा व दर वेळी दुकानात जाण्याचा गैरसोयीचा पर्याय वर्षानुवर्षे वापरला होता.

तसेच सकारात्मक अनुभवांच्या तुलनेत नकारात्मक अनुभवांच्या ऑनलाईन नोंदी अधिक केल्या जातात व पसरतात हे त्या क्षेत्रात काम करणार्‍या अनुभवी व्यक्तीकडून एका सेमिनारमध्ये ऐकले आहे. तसेच माझेही निरीक्षण त्याच्याशी संलग्न असल्याने तसे इथे लिहिले.

ट्रेड मार्क's picture

1 Nov 2016 - 6:56 am | ट्रेड मार्क

कोणी कितीही काहीही सांगो प्रत्येकाचे आपापले अनुभव असतात. उद्या तुम्ही सांगताय म्हणून एखाद्याने एअर फ्रांसने जायचं ठरवलं तर त्याला वेगळा अनुभव येऊ शकतो एवढंच काय तुम्हाला पण पुढे कधीतरी वेगळा अनुभव येऊ शकतो. शेवटी प्रोबॅबिलिटी बघायची आणि पुढे आपलं नशीब. त्यामुळेच एअर इंडियाच्या धाग्यावर ९८% लोक एअर इंडिया टाळा म्हणून सांगत होते.

ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांच्याबरोबर लहान बाळ आहे त्यांना बहुतांशी चांगली वागणूक मिळते. बाकी पॅरिस एअरपोर्टवर हिंदी बोलणारी महिला अधिकारी भेटली हे मात्र खरंच आश्चर्य आहे. मला इंग्लिश बोलणारं कोणीतरी भेटायला पॅरिस विमानतळावर काम करणाऱ्या ५ लोकांना विचारायला लागलं. आधीचे चौघे "No English" म्हणून चक्क निघून गेले.

सौन्दर्य's picture

1 Nov 2016 - 8:10 am | सौन्दर्य

२००४ साली एअर फ्रांसने, मुंबईहून अमेरिकेला येताना, चार्ल्स द गॉल एअरपोर्टवर तेथील एकही अधिकारी किंवा इतर कर्मचारी इंग्रजीत उत्तर देत नव्हते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंग्रजीत बोलत नव्हते हे एक आश्चर्यच होते. नशीब पीए सिस्टीमवर तरी इंग्रजीत सुचना देत होते नाहीतर ..............

मराठमोळा's picture

1 Nov 2016 - 7:44 am | मराठमोळा

मागे कुणी ईन ट्रांझिट असा काहीसा लेख लिहिला होता तोही थरारक अनुभव होता.. विमान प्रवास, ट्रांझिट, विसा आणि वेळ या अत्यंत क्लिष्ट आणि तापदायक गोष्टी आहेत.. मी तर आता रिटर्न तिकीट काढायचं टाळतोच.. थोडेफार पैसे जास्त गेलेले चालतात पण तारीख आणि ईतर बदल मनस्ताप आणि खर्च वाढवून जातात. त्यापेक्षा हवं तेव्हा वन वे तिकीट काढावे आनि निश्चिंत रहावे.. बुकींग करताना मात्र, वेळ, डेस्टीनेशन आणि सर्व डील्स तपासून पहाव्यात. बरेच गमतीशीर अनुभव आहेत.. लिहिन कधीतरी.
हा दुवा काही टीप्स साठी.
जाता जाता डेल्टा एयरलाईन्स (किंवा एकंदरीत सर्व अमेरीकन एयर्लाईन्स) अतिशय भिकार आहे हे नमूद करतो.

पिलीयन रायडर's picture

28 Nov 2016 - 9:45 pm | पिलीयन रायडर

मी जानेवारी महिन्यात बहुदा वेस्ट कोस्टला जाण्याचे ठरवत आहे. त्यासाठी आत्ताच फ्लाईट बुकिंग करावे लागेल.

तर हे करताना
१. कोणत्या साईट्स वरुन बुकिंग करावे? स्वस्त तिकिट्स किंवा डिल्स कशा मिळवाव्यात?
२. कोणत्या एअरलाईन्सने जावे अथवा जाऊ नये?
३. इतर काही सुचना?

अंतर्गत प्रवासाला फारसा काही त्रास होणार नाही. फक्त आपल्या आणि पॅसिफिक टाइम झोन मध्ये ३ तासांचा फरक आहे हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे सुद्धा जेट लॅगचा थोडा का होईना त्रास होतोच. कारण एक तर जाताना किंवा येताना रेड आय फ्लाईट मिळते किंवा विचित्र वेळेला असते. अजून एक प्रकार म्हणजे फ्लाईट आधी भलत्याच दिशेला जाते म्हणजे NJ वरून मिशिगन आणि तिथून LA जाते. यात बाकी काही नाही पण वेळ जास्त लागतो. त्यामुळे त्याबाबतीत जरा काळजी घेणे चांगले.

थोडं संशोधन केलं तर चांगल्या डील्स मिळतील. शक्यतो expedia किंवा priceline पासून सुरुवात करा. साधारण किंमतीचा अंदाज येईल. माझं एक निरीक्षण आहे की तुम्ही सारखा सर्च करत राहिला तर थोड्या वेळाने तुम्हाला किमती जास्त दाखवतात. यासाठी मी सर्व सर्च एका लॅपटॉपवरून करतो ज्यात साधारणपणे कुठला मार्ग, कुठली विमान कंपनी, मधला थांबा किती हे सगळं ठरवून घेतो आणि मग दुसऱ्या लॅपटॉपवरून बुकिंग करतो. अजून एक निरीक्षण असं आहे की मध्यरात्रीनंतर किंवा अगदी पहाटे जरा कमी किंमतीत मिळतात.

अजून एक सूचना म्हणजे कॉम्बो डील्स बघायची. म्हणजे विमानाचं, हॉटेलचं आणि कारचं वेगवेगळं बुकिंग करण्याऐवजी तिन्ही एकत्र किंवा अजून वेगळी कॉम्बिनेशन्स (विमान + कार किंवा विमान + हॉटेल ईई) बघायची. जर वेगळं बुकिंग करायला लागलंच तर हॉटेल बुकिंगसाठी मला व्यक्तिशः hotwire आणि booking.कॉम चा चांगला अनुभव आहे. गाडीसाठी enterprise सगळ्यात ब्येस्ट आहे, म्हणजे चांगल्या गाड्या योग्य किमतीत मिळतात.

नगरीनिरंजन's picture

29 Nov 2016 - 3:22 am | नगरीनिरंजन

मुळात लहान मुलं बरोबर असूनही २४ तास स्टॉपओव्हर असलेली फ्लाईट निवडलीत ह्याचे आश्चर्य वाटते. त्यातही व्हिजा आणि हॉटेल बुकींग नाही. हे वाचलेले व परत मिळवलेले पैसे नक्की कधी आणि कशासाठी वापरण्याचा हेतू असतो आपला? कुटुंबाच्या आरामाबाबत व सुरक्षेबाबत तडजोड करु नये असे कळकळीने वाटते. शिवाय भारतीय माणसांना सगळीकडे चीप समजलं जातं ते मला अजिबात आवडत नाही.

ट्रेड मार्क's picture

29 Nov 2016 - 10:58 pm | ट्रेड मार्क

जेव्हा बुक केली तेव्हा आयफेल टॉवर बघायचा विचार होता. परंतु नंतर घटना अश्या घडत गेल्या की ते कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नको वाटले. व्हिसा लागणार नाही असं सगळे सांगत होते त्यामुळे काढला नाही. हॉटेल बुकिंग केले असते तर मग व्हिसा काढायलाच लागला असता. तसं पण विमानतळावर राहण्यासाठी छान सोय आहे. मस्त झोपता येतील असे स्लीपर सोफा ठेवले आहेत. तिथेच चार्जिंग पॉईंट्स आहेत, जवळ खाण्यापिण्याची स्टोअर्स आहेत, टॉयलेट्स अतिशय स्वच्छ आहेत, मुलांसाठी गेमिंग झोन्स आहेत. त्यामुळे त्यावेळेस असं वाटलं की बाहेर जाण्यापेक्षा विमानतळावर सुरक्षित आहे आणि वेळही जाण्याची साधने आहेत.

बाकी वाचवलेले पैसे कधी आणि कशासाठी खर्च करणार हा मुद्दा कळला नाही. खर्च कशाला करायचे? साठवता पण येतात ना?

शिवाय भारतीय माणसांना सगळीकडे चीप समजलं जातं ते मला अजिबात आवडत नाही. - हे मला पण आवडत नाही. पण भारतीयातलेच काही लोक्स चीप वागतात, त्यामुळे इतरांचा बहुदा तसा समज असावा.

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2017 - 8:33 pm | पिलीयन रायडर

जर्मनीहुन अमेरिकेत येण्यासाठी स्वस्त सुंदर टिकाऊ एयरलाईन कोणती? तसंच तिकिटं कुठुन बुक करावी ह्याविषयी काही टिप्स?

रुपी's picture

27 Apr 2017 - 3:11 am | रुपी

आधी Expedia, Orbitz, makemytrip इत्यादींवर दर इ. बघावेत. शॉर्टलिस्ट केलेल्या एअरलाइनच्या वेबसाइट वर जाऊन आणखी माहिती मिळेल. शक्यतो एअरलाइनला संपर्क करुन तिकीट बूक करावे. कधी कधी फोनवर आणि वेबसाइटवर सुद्धा वेगवेगळा दर सांगतात/दाखवतात. त्यामुळे फोनवर पेमेंट करण्याआधी वेबसाइट वर दर नक्की पाहावेत.
सुंदर टिकाऊ - लुफ्तान्सा असावी. कदाचित स्वस्तही असेल.

फारएन्ड's picture

27 Apr 2017 - 4:39 am | फारएन्ड

बहुधा बहुतांश पर्याय लुफ्तांन्सा व युनायटेड चे दिसतील. कदाचित एअर कॅनडा चे कॅनडा मधे हॉप असलेले. लुफ्तांसा चे मधे बरेच संप वगैरे सुरू होते त्यामुळे कदाचित डील्स चांगली मिळत. पण कुटुंबासहित जाणार असाल तर जरा माहिती काढून जा, उगाच संपामुळे अडकायला नको.

तसेच या दोन्ही एअरलाइन्स तिकीट त्यांचे असले तरी ऑपरेटर दुसराच असू शकतो (म्हणजे लुफ्तांसा च्या फ्लाइट ला युनायटेड, तर कधी उलटे). फ्लाइट युनायटेड ची असेल तर सीटबॅक टीव्ही अजूनही अनेक विमानांमधे नाही (लुफ्तांसाच्या आहे). फ्लाइट ऑपरेटर दुसरी असेल तर फ्लाइट नं ४ आकडी असतो असे सहसा पाहिले आहे.

तिकीट बुक करायला एक्स्पीडिया चांगली आहे. पण एअरलाइन च्या साइट वर तेव्हढेच प्राइस असेल तर तेथे बुक करणे चाम्गले, कारण अडचण आली तर एकाच एजन्सीशी बोलून काम होउ शकते.

फारएन्ड's picture

27 Apr 2017 - 4:32 am | फारएन्ड

जाम वैताग अनुभव दिसतोय. पण नंतर पाठपुरावा करून आर्थिक नुकसान निदान भरून निघाले हे वाचून चांगले वाटले.

आम्हाला एकदा लुफ्तांसा च्या फ्रँकफुर्ट स्टॉप बद्दल असाच प्रश्न पडला होता, तेव्हा एजंट, एअरलाइन व जर्मन एम्बसी तिघांनाही याबद्दल विचारले होते. तेव्हा एअरलाइन ने हे डीटेल दिले होते ते आठवते - काही तासांपेक्षा जास्त स्टे असेल तरच ट्रान्झिट व्हिसा लागेल असे. जर्मनीबद्दल आणखी एक इण्टरेस्टिंग नियम तेव्हा कळला होता - जर्मनीत जर दोन स्टॉप्स असतील (उदा: फ्रँकफुर्ट व म्युनिक) तर सुद्धा व्हिसा लागेल असे काहीतरी. ती मधली फ्लाइट डोमेस्टिक मधून जात असल्याने असेल कदाचित.

खरे म्हणजे ट्रॅव्हल एजंट लोकांना हे माहीत असते. तरीही शक्यतो या प्रवासाशी संबंधित सर्व कंपन्यांना/व्यक्तींना विचारून खात्री करणे हाच एक उपाय दिसत आहे. वरच्या माहितीवरून तर एअरपोर्टला ही विचारलेले चांगले, असे दिसते.

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2017 - 8:05 am | पिलीयन रायडर

टिप्ससाठी धन्यवाद! लुफ्थान्साचे त्यांच्या साईट वरुनच बूकिंग केले.