मिस्ड कनेक्शन्स
फ्रेंच कनेक्शन
तब्बल चार वर्षांनी आमचं भारतात जायचं ठरलं. मुलींच्या शाळा बुडू नयेत म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे जूनमध्ये जायचं असा प्लॅन करून फेब्रुवारीमधेच डील्स शोधायला सुरुवात केली. आम्ही चौघे आणि बरोबर एका मित्राची बायको आणि २ मुले असे एकूण ७ जणं जून मध्ये जाणार होतो. सुट्टी फार नसल्याने मी एका महिन्यात परत येणार व बाकी सगळे २ महिने म्हणजे ऑगस्ट पर्यंत राहणार होते. माझा मित्र जुलै मध्ये भारतात जाऊन या बाकी सगळ्यांबरोबर ऑगस्टमध्ये परत येणार होता.
बऱ्याच संशोधनाअंती Indianeagle.com (IE) नामक वेबसाईट वर एक चांगलं डील दिसलं. एअर फ्रांसची वॉशिंग्टन डी सी ते पॅरिस ते मुंबई आणि परत त्याच मार्गे फक्त $८०० मध्ये तिकिट्स मिळत होती. फक्त एकच कॅच होता. ऑगस्टमध्ये येणाऱ्यांच्या परतीच्या प्रवासात पॅरिसमध्ये २४ तासांचा स्टॉपओव्हर होता. त्या वेळेला आम्ही विचार केला की फ्रेंच टुरिस्ट व्हिसा काढून सगळे आयफेल टॉवर बघून येतील. मी IE च्या बुकिंग एजंटला कॉल केला आणि त्याच्याशी बोलून सगळ्यांची बुकिंग्स केली. मुली आनंदाने नाचायला लागल्या आणि तेव्हापासून दिवस मोजणे चालू झाले.
मधल्या काळात युरोपमधल्या बिघडलेल्या परिस्थितीची वर्णनं आम्ही वाचत होतो, त्यात मिपावर वाचलेले युरोपमधील चोऱ्यांचे वगैरे किस्से पण आठवले. मग एकूणच वाटायला लागलं की मी नसताना बायकोने मुलींना एअरपोर्टच्या बाहेर घेऊन जाऊ नये. जरी माझा मित्र बरोबर होता तरी त्याची पण २ मुलं बरोबर असणार त्यातला एक फक्त १.५ वर्षांचा. सर्व परिस्थितीचा विचार करता या सगळ्यांनी एअरपोर्टवरच थांबावे असं ठरलं. मी फ्रेंच एम्बसीकडे व्हिसासंबंधी नियमांची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की जर ते एअरपोर्टच्या बाहेर येणार नसतील तर फ्रेंच टुरिस्ट व्हिसाची गरज नाही. गुगलबाबा, Indian Eagle आणि अगदी फ्रेंच एम्बसीच्या वेबसाईट वर लिहिलं होतं की ज्या भारतीय नागरिकांकडे अमेरिकेचा व्हॅलिड व्हिसा असेल त्यांना फ्रेंच टुरिस्ट व्हिसाची गरज नाही. त्यामुळे आम्ही निर्धास्त झालो.
आमची प्रवासाला निघण्याची तारीख १२ जून होती परंतु साधारण ६ जूनला एअर फ्रांसच्या वेबसाइटवर एक मेसेज झळकत होता की कसल्या तरी मागणीसाठी १० जून ते १२ जून या काळात एअर फ्रान्सच्या पायलट्सचा संप आहे. तर या काळात प्रवास करू नका. मी एजन्टला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. तिने जातानाचे तिकीट बदलून द्यायची तयारी दाखवली. म्हणून आम्ही ९ जूनचं तिकीट घेतलं. पण परतीचं तिकीट बदलायला तिने नकार दिला, म्हणजे जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून सांगितलं.
अमेरिकेतून भारतात जाताना प्रवास चांगला झाला. महिनाभर भारतात कसा गेला तेच कळलं नाही आणि मी १२ जुलैला अमेरिकेत परत आलो. येताना पॅरिसला माझा स्टॉपओव्हर ५ तासांचाच होता. तेवढ्यात मी एअरपोर्टवर जास्त वेळ थांबण्यासाठी काय काय सोयी आहेत ते बघून ठेवलं. पॅरिसचा CDG एअरपोर्ट बराच मोठा आहे. प्रवाश्यांसाठी झोपायला सोफा वगैरे सोयी केल्या आहेत, मुलांसाठी गेमिंग झोन्स आहेत त्यामुळे २४ तास थांबणाऱ्या आमच्या मंडळींचा टाइम पास होऊन जाईल असं वाटलं. तसंही २ फॅमिलीज असल्याने गप्पा, खेळ आणि झोप आणि थोडा कंटाळा यात वेळ जातोच.
एकदाचा ११ ऑगस्ट म्हणजे या सगळ्यांचा परतीचा दिवस उजाडला. सकाळी ११ वाजता मुंबईहून विमान होतं त्यामुळे सगळे ७.३० लाच विमानतळावर हजर झाले. मी अमेरिकेतून फोनवर खबरबात घेत होतोच. आता एअरपोर्टमध्ये शिरतोय असं म्हणून बायकोने फोन ठेवला आणि १० मिनटात परत तिचा फोन, म्हणे बॅग्स चेक इन करून घेत नाहीयेत. म्हणलं तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट, अमेरिकन व्हिसा आणि तिकीट आहे मग काय प्रॉब्लेम आहे? तर तो बोर्डिंग एजन्ट फ्रेंच ट्रान्सीट व्हिसा किंवा शेंझेन व्हिसा मागतोय असं बायकोने सांगितलं. तेवढ्यात माझा मित्र पण विमानतळावर पोचला. त्याला पण तेच सांगितलं वर म्हणे आता तर बोर्डिंग पास पण देणार नाही.
मी भारतातील फ्रेंच एम्बसीला फोन केला व त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही विमानतळावरून बाहेर पडणार नसाल तर व्हिसा नाही लागणार. मी लगेच त्याला म्हणलं २ मिनटं थांब, मी तुला कॉन्फरंस करतो आणि त्या बोर्डिंग एजन्टला सांग. तो तयार झाला म्हणून लगेच कॉन्फरन्स केलं तर तो बोर्डिंग एजन्ट त्याला म्हणाला की CDG एअरपोर्टचा असा नियम आहे की प्रवासी ५ तासांच्यावर एअरपोर्टवर थांबू शकत नाही. हे ऐकून तो एम्बसीवाला म्हणाला तो तुमचा (एअरपोर्टचा) नियम आहे फ्रांस या देशाचा व्हिसा हवाच असा नियम नाही. परंतु जर एअरपोर्टच्या नियमामुळे तुम्हाला बाहेर यायला लागत असेल तर मात्र व्हिसा लागेल. मग काय, वाद घालण्यासारखं काही राहिलंच नाही. लगेच आमच्या सर्व मंडळींना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.
मी त्या ट्रॅव्हल एजण्टला फोन केला. तिने सांगितलं की तिकीट डेल्टा एअर लाईन्सने दिलंय तर त्यांचं अमेरिकेतील ऑफिस उघडल्यावर आपण तिकीट बदलून घेऊ. ऑफिस उघडायला १० तास होते, मी म्हणलं की तोपर्यंत हे विमान निघून जाईल आणि नंतर त्यांनी नाही दिलं तर काय? त्यावर म्हणे आपण प्रयत्न करू. हे सर्व होईपर्यंत आमचे ठरलेले विमान निघायच्या तयारीला लागले. संताप, चीड, हतबलता आणि काय काय भावना दाटून आल्या. पण काही मार्ग सुचत नव्हता. भारतातली मंडळी उन्हामुळे आणि झालेल्या त्रासामुळे वैतागली होती. दुसरा पर्याय नसल्याने सर्व मंडळी आपापल्या घरी गेली आणि पुढे अजून ट्रॅव्हल एजन्टशी भांडत अजून काही मार्ग शोधत बसल्याने माझ्याकडे पहाटेचे ४ वाजत आले पण काही मार्ग सापडला नाही. त्यामुळे मला झोपण्याशिवाय काही पर्याय नव्हता.
सकाळी जाग आल्यावर मी परत आमच्या ट्रॅव्हल एजन्टला भिडलो. पण काल जिच्याशी बोलत होतो तिची शिफ्ट संपली होती. त्यामुळे नवीन माणसाला परत सर्व सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. ते सर्व सांगितल्यावर तो म्हणाला मी डेल्टाला/ एअर फ्रांसला फोन लावून बोलतो. जवळपास ३-४ तास उलटले तरी मला परत काही त्यांचा फोन येईना. मी फोन केल्यावर सांगत होते की तो अजून एअर फ्रांसशी बोलतोय.
मला त्याचवेळेला शंका आली की हा आपल्याला टांग मारणार. दुसरीकडे मी पण नवीन तिकिट्स शोधायला लागलो. फक्त मुंबई ते वॉशिंग्टन डी सी एका दिशेचे तिकीट प्रतिमाणशी १००० डॉलर पासून पुढे दाखवत होते. शाळा सुरु होणार होत्या त्यामुळे या सर्वांना अमेरिकेत आणणे आवश्यक होते.
उपलब्ध मार्गांपैकी एक म्हणून मी एअर फ्रान्सला फोन केला. त्यांना परत सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्यांचं म्हणणं की मी एजन्टकडून तिकीट काढलंय त्यामुळे मी एजन्टकडे तिकीट बदलून मागितलं पाहिजे. एअर फ्रांस परस्पर तिकीट देईल पण मग ते पूर्ण किमतीचं असेल म्हणजे प्रतिमाणशी $१५०० अधिक $१०० तिकीट बदलायचे चार्जेस. एअर फ्रान्सचा माणूस मला सांगत होता की एजन्टला हीच तिकिटे सवलतीच्या दारात उपलब्ध असतात. मी एजन्टच्या मागे लागलो व बऱ्याच प्रयत्नांनी एजन्टने मला एअर फ्रांस बरोबर कॉन्फरन्स कॉल मध्ये घेतलं. परत सर्व परिस्थिती समजावून सांगण्याचा सोपस्कार पार पाडला. तर मला प्रतिमाणशी $१८०० किंमत सांगण्यात आली. कसं तर $१५०० तिकिटाचे आणि वर $३०० तिकीट बदलायचे चार्जेस. मी विचारलं की मगाशी तर मला $१०० तिकीट बदलायचे चार्जेस सांगितले मग आता का $३०० मागताय? तर म्हणे तिकीट कधी काढलंय त्यावर अवलंबून असतं. मी म्हणलं मला $९०० मध्ये तिकीट मिळतंय तर तुम्ही मला दुप्पट किंमत का सांगताय तर म्हणे आम्ही तुम्हाला सल्ला देतो की ते तिकीट घ्या. आता एजन्ट म्हणायला लागला की आम्ही तुम्हाला तिकीट बदलून द्यायला तयार होतो पण तुम्हीच ती ऑफर घेतली नाही. म्हणलं येड्या दुप्पट पैसे देऊन तिकीट कोणी घेईल का? बऱ्याच भांडणानंतर शेवटी विचार केला की यांच्याकडून काही होण्यासारखे नाही आपण आपलं तिकिट बघावं. उर्वरित भांडण ब्रेक नंतर करू.
अमेरिकन कनेक्शन
संशोधनांती मला प्रत्येकी $७७० ला तिकीट मिळाले. यावेळी मुंबई ते नूअर्क डायरेक्ट फ्लाईट घेतली व नूअर्क ते वॉशिंग्टन डी सी पुढची फ्लाईट होती. विचार केला कटकटच नको मध्ये कुठे दुसऱ्या देशात उतरायची. नशिबाने १५ ऑगस्टची तिकिटे मिळाली. एवढ्या लगेचची ७ तिकिटे मिळणे अवघड असल्याने माझे कुटुंब व माझा मित्र वेगवेगळे यायचे ठरले.
आमची मंडळी एकदाची युनायटेडच्या विमानात बसली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. पण त्रास एवढ्यातच संपणार नव्हता. मी साधारणतः ३०० मैलांवरून त्यांना घेण्यासाठी वॉशिंग्टन डी सी ला जाणार होतो. नूअर्क वरून वॉशिंग्टन डी सी ला ते १२ ला पोचणार होते म्हणून मी सकाळी ६ ला निघालो. सकाळी ८ ला मंडळी नूअर्कला उतरली व दुसऱ्या फ्लाईटसाठी बोर्डिंग पासवर लिहिलेल्या गेटवर जाऊन बसली. मी फोनवर अपडेट घेतच होतो, बायकोला म्हणलं आत्तापर्यंत फार गोंधळ झालाय तू कोणालातरी बोर्डिंग पास दाखवून विचार की ही फ्लाईट इथेच येणार आहे ना, त्याप्रमाणे तिने खात्री करून घेतली. पुढची फ्लाईट १०.३० ला होती. म्हणून आता बोर्डिंग चालू झाले असेल मी ९.४५ ला फोन केला तर म्हणे इथे लोक बसलेत पण बोर्डिंग डेस्कवर कोणीच दिसत नाहीये. माझ्या आग्रहावरून बायको परत एकदा विचारून आली तर बोर्डिंग चालू होईलच म्हणून सांगितलं. म्हणता म्हणता १०.१५ झाले तरी बोर्डिंगची चिन्हे दिसेनात, तेवढ्यात एक पायलट दिसला त्याला बायकोने विचारलं तर तो म्हणाला की गेट बदललंय. पण ना गेट बदलल्याची घोषणा झाली ना यांचे नाव पुकारले. धावतपळत बायको मुली नवीन गेटवर गेल्या तर त्यांना सांगितलं की आता विमान उडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही.
मी चेक केलं तर ते विमान १०.३० च्या ऐवजी १०.२५ लाच सुटलं. ते ऐकून माझी लहान मुलगी रडायलाच लागली. एकतर आधीच्या अडचणी, नंतर सलग १५ तासांचा प्रवास आणि आता हे विमान चुकलं. मी बायकोला म्हणलं भांड चांगलं त्यांच्याशी आणि लगेचचं विमान द्यायला सांग. तर त्यांनी २ तासांनंतरचं एक विमान होतं त्याचं तात्पुरतं तिकीट दिलं आणि सांगितलं की बोर्डिंगच्या वेळेला पास मिळेल. यावेळी वेळेवर बरोबर गेटवर गेले तर त्या विमानात फक्त २ सीट उपलब्ध होत्या. आम्ही म्हणलं की आमची छोटी मांडीवर बसून सुद्धा येईल तर त्याला ते तयार झाले नाहीत. अश्या तर्हेने हे पण विमान आमच्या मंडळींना न घेताच गेलं. इकडे मी डी सीच्या बाहेर ३० मैलावर गाडीत बसून होतो कारण शहरात जाऊन परत पार्किंगचा प्रॉब्लेम झाला असता. पण आता दुसरी पण फ्लाईट न मिळण्याने काय करावं ते कळेना.
पुढची फ्लाईट ५ तासांनंतर होती. पण त्यातही एक छोटाशी अडचण होती. ती फ्लाईट वॉशिंग्टन डी सी मधल्याच दुसऱ्या एअरपोर्टवर जाणार होती. मी म्हणलं ठीक आहे त्यात काय मी तिकडे येतो तुम्हाला घ्यायला. पण थोड्याच वेळात ट्यूब पेटली की त्यांचं सामान तर आधीच्या विमानाने पहिल्या एअरपोर्टवर गेलं असेल. मी युनायटेडच्या ग्राहकसेवेला फोन लावला व त्यांना आमची रामकहाणी सांगितली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बॅग आता “हरवले आणि सापडले” विभागात असतील. माझा विचार होता की माझ्याकडे वेळ आहे तर मी जाऊन बॅग्स घेऊन येतो. तर तसं नाही चालत कारण बॅग्स घेण्यासाठी प्रवाश्यांपैकी कोणीतरी लागतो. तो मला म्हणे की ते उतरले की की त्यांना त्या एअरपोर्टवरून या एअरपोर्टवर आणा आणि बॅग्स घ्या. संध्याकाळी ६ ला वॉशिंग्टन डी सी च्या ट्रॅफिकमधून ये जा करायचे म्हणजे एक दिव्यच आहे. मी त्याला म्हणलं की बाबारे जरा विचार कर ते १५ तास विमानप्रवास करून इथे आले तर ८ तास विमानतळावरच थांबून राहायला लागलं. त्यांना घरून निघून २५ तास झालेत आणि परत तू मला म्हणतो आहेस की त्यांना घेऊन फेऱ्या मारू? म्हणलं ते काही नाही बॅगा मला घरपोच द्या. ही मागणी त्याने मान्य केली व मला प्रक्रिया समजावून सांगितली. नंतर फोनवर बोलता बोलता बायको म्हणाली की ते आता वॉशिंग्टन डी सी पासून आमच्या घरी लगेच प्रवास करायच्या परिस्थितीत नाहीत, त्यामुळे मग वॉशिंग्टन डी सी मधेच हॉटेल बुक केलं. मध्ये वेळ असल्याने मी हॉटेलवर जाऊन बसलो. वेळेवर विमानतळावर जाऊन उभा राहिलो, अखेरीस मंडळी आली. एवढा शारीरिक व मानसिक त्रास आणि $२३०० चा भुर्दंड सोसून पोचले एकदाचे आणि आम्हाला हायसं वाटलं. पुढे ४ दिवसांनी माझा मित्र पण परत आला, त्याला जवळपास $२६०० खर्च आला.
फायनल कनेक्शन
मी मनोमन ठरवले होते की काही करून हा खर्च परत मिळवायचाच. म्हणून कुठे तक्रार करता येईल याचे संशोधन सुरु केले. तो एजन्ट तर अगदीच कुचकामी निघाला त्यामुळे आधी त्याच्याविरुद्ध तक्रार करायची होती. परंतु अशी कुठली सरकारी संस्था अथवा ट्रॅव्हल एजन्ट्सची एखादी शासकीय संस्था सापडत नव्हती. मग एअरलाईनची तक्रार करता येईल अशी कुठली सरकारी संस्था आहे का याचा शोध सुरु केला.
मला Federal Aviation Administration (https://www.faa.gov) कडे तक्रार दाखल करता येते असं कळलं. म्हणून मी एअर फ्रांसविरुद्ध तक्रार दाखल केली. दोन दिवसात मला FAA च्या एका कर्मचाऱ्यांची ई-मेल आली त्यात सांगितलं होतं की माझी तक्रार एअर फ्रांसकडे पाठवली आहे आणि पुढे काय अपेक्षित आहे याचं विवरण दिलं होतं. यथावकाश एअर फ्रांसकडून मला उत्तर आलं की जे झालं त्यात त्यांची काहीच चूक नाहीये त्यामुळे ते काही करू शकत नाहीत. मग परत मी ई-मेलवर थोडी भांडाभांडी केली. तर त्यावर मला एअर फ्रांसने सांगितलं की झालेल्या त्रासाबद्दल ते दिलगीर आहेत आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून $१५० चं एक ट्रॅव्हल व्हाउचर दिलं. माझं डोकंच सटकलं म्हणलं काय भीक देताय का? एवढं ८ लोकांचं वर्तुळाकार प्रवासाचं तिकीट काढलं आणि त्यात तुमच्या कुठल्यातरी विमानतळाच्या एका नियमामुळे मला (आणि माझ्या मित्राला मिळून) $६००० चा भुर्दंड पडला आणि तुम्ही $१५० चा ट्रॅव्हल व्हाउचर देताय? तर एअर फ्रांस म्हणे तुमचा आमचा तसा काही संबंध नाही. मी विचारलं म्हणजे काय, आमची विमानं एअर फ्रांसची होती आणि तुम्ही काय म्हणताय संबंध नाही? तर म्हणे एअर फ्रांस फक्त वाहक (कॅरिअर) आहे. आता हे फारच गोंधळात टाकणारं होतं. मी स्पष्टीकरण विचारल्यावर म्हणे आम्ही सगळे, म्हणजे डेल्टा, KLM, एअर फ्रांस, जेट एरवेज हे सगळे एका गटात आहोत, त्यामुळे यापैकी कोणाचेही विमान तुम्हाला असू शकते. परंतु तिकीट तर डेल्टा एअरलाईन्सने दिलंय तर तुम्ही त्यांच्याशी बोला.
परत माझ्या पोटात गोळा आला की आता अजून एका पार्टीला अथ पासून इतिपर्यंत सगळं समजावून सांगायचं. पण पर्याय नव्हता.
आता मोर्चा डेल्टाकडे वळवला. सगळी केस आणि डिटेल्स पाठवून दिले. थोड्या दिवसांनी डेल्टाकडून ई-मेल आली. प्रथम सगळं पाल्हाळ की तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि प्रवाश्यांची काळजी घेण्यासाठी डेल्टा कसे प्रयत्न करते वगैरे वगैरे. मनात म्हणलं मुद्द्याचं सांगा... तर पुढे लिहिलं होतं की सगळं झालेला गोंधळ व्हिसाशी संबंधित आहे त्यामुळे त्यात डेल्टा काहीच करू शकत नाही. वाचता वाचता माझी कानशिलं गरम होऊ लागली. राग, चीड, काही करू शकत नसल्याची भावना, एवढे पैसे उगाच खर्च करायला लागले याची टोचणी अश्या भावना उचंबळून आल्या. म्हणलं आपले पैसे अक्कलखाती जमा करायला लागणार बहुतेक. पण ई-मेल मध्ये अजून पण खाली काहीतरी लिहिलं होतं. आधी मला वाटलं की परत तेच पुराण असणार की आम्ही आमच्या ग्राहकांची किती काळजी घेतो वगैरे. पण वाचता वाचता लक्षात आलं की ते वेगळंच सांगत आहेत.
त्यात लिहिलं होतं की या परतीच्या प्रवासात जे झालं आणि जो खर्च झाला त्याला डेल्टा काहीच करू शकत नाही. परंतु जाताना जे आमचं विमान एअर फ्रान्सच्या वैमानिकांच्या संपामुळे बदलून घ्यायला लागलं होतं, त्यासंबंधी युरोपिअन युनिअनचा एक नियम आहे. त्या नियमाप्रमाणे आम्हाला प्रतिप्रवाशी ६०० युरो म्हणजेच $६७० मिळतील. मी ४ वेळा ते परत परत वाचलं, म्हणलं चला झालेल्या खर्चाचा थोडा भाग तरी वसूल होईल. थोडी आकडेमोड करता लक्षात आलं की जाताना तर आम्ही चौघे गेलो होतो म्हणजे जवळपास $२६०० मिळतील. मग त्या प्रतिनिधीला परत सगळी तिकिटं पाठवली आणि यथावकाश आमचे चेक्स आले.
अश्याप्रकारे आमच्या भारतवारी साठाउत्तरी संपूर्ण झाली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हुश्श! ;-)
हेच्च वाटलं!!! म्हणलं जातात
खरंय.. एका क्षणी
बाप्रे! भलताच मनस्ताप.
सगळीकडे न्याय मिळतो पण तो मिळवावा लागतो
धन्यवाद
चिकाटीने आपली बाजू लावून
+10000, भारीच!!!
+११
या प्रसंगात उपयोग झाला असता
+१
चांगला पर्याय
नवीन तिकिट पण त्याच क्रेडिट
हो
दोन्ही तिकिटं युनायटेड
भारतीय (वंशाच्या) लोकांना
बरीचशी सहमत.
त्रासदायक अनुभव
सहमत
खूपच मनस्ताप देणारा अनुभव
हा अनुभव आपण इथे
सहमत
लुफ्तांसाचा अनुभव चांगला आला
हा महत्वाचा लेख वाचायचा राहून
युरोपमधील थांबा
ओक्के.
डेल्टा - एअर फ्रान्स - केएलएम
थोड्या दुरुस्त्या
गैरसोय
टेक्निकॅलिटीमुळे पैसे परत मिळाले हे बरोबर आहे
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
माझं मत
अगदी खर
मागे कुणी ईन ट्रांझिट असा
मी जानेवारी महिन्यात बहुदा
अंतर्गत प्रवासाला फारसा काही त्रास होणार नाही
मुळात लहान मुलं बरोबर असूनही
विचार बरोबर आहे
जर्मनीहुन अमेरिकेत येण्यासाठी
आधी Expedia, Orbitz,
जर्मनी-अमेरिका
जाम वैताग
टिप्ससाठी धन्यवाद!