"प्लिज मला सोडतोस का रे ऑफिसला" आशु एकदम घाईघाईत म्हणाली. ठीक आहे म्हणून निघालो आम्ही बाईकवर. वाटेत गप्पा मारताना सांगत होती "काल कॅश एक्सेस लागली, कुण्या एका वयस्कर व्यक्तीची पेन्शन मोजून घेण्यात चूक झाली असावी, आज गेल्या गेल्या कॅमेरा चेक करून आणि त्यांना फोन करून पैसे परत करते त्यांचे".
गाडी वाट काढत काढत कॅम्प पर्यंत आली तोच मागून एका रिक्षावाल्याने आवाज दिला, " ओ ताई तुमचा स्कार्फ पडलाय मागे तिकडे ". मी गाडी स्लो केली पण आशु म्हणाली प्लिज चल पुढे ... स्कार्फ मागे कुठे पडलाय काय माहिती ... वेळ जाईल अरे शोधण्यात". मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. मी थोडा कुत्सित हसलो आणि गाडी चालवत राहिलो ... ऑफिस पर्यंत गाडी आली, आशु म्हणाली " मला कसतरी वाटतंय रे, मी स्कार्फ टाकून दिला तसाच, मी फार उधळी आहे का रे , का बाबा म्हणतात तस मला काही किंमत नाहीये पैशाची ?" मी म्हणालो " अगं.. जाऊ दे ... असं काही नाहीये .. मनाला लावून घेऊ नकोस, ती तुझी तात्काळ प्रतिक्रिया होती .. इट्स ओके... जा ऑफिसमधे.. उशीर नको, बघू आपण"
मी परत घरी येताना त्याच रस्त्याने आलो, म्हंटल बघावं वाटेत कुठे स्कार्फ सापडला तर घेऊया. सॅलिसबरी पार्कच्या रस्त्यावर तशी गर्दी कमी होती, तोच रस्त्याच्या कडेला मला आशुचा स्कार्फ दिसला तो एका छोट्या मुलीच्या हातात. साधारण ४-५ वर्षाची असावी, तिच्या मागे तिची आई फुगे भरून काठीला अडकवत होती, २-३ वर्षाचं एक पोर तिच्या अवतीभवती घुटमळत होत. ती मुलगी स्कार्फ ची साडी करून नेसत होती आणि तिच्या आईला दाखवत होती. काहीतरी नवीन आणि छान गोष्ट आपल्याला मिळाली याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. का कोण जाणे, असं वाटलं नको मागायला तिला आपला स्कार्फ, कशाला तिच्या आनंदावर विरजण?
गाडीला किक बसली आणि मी निघालो पुढे ... येताना वाटेत मलाच वाटलं कि मीच तर उधळा झालो तर नाही ना. किशोरदा च एक गाणं गुणगुणत येत होतो, कात्रजला घरासमोरच्या दुकानात गेलो आणि तसाच एक स्कार्फ घेतला आणि घरी येऊन धुवायला टाकला.
रात्री जेवण करून गॅलरीत बसल्यावर आशुने परत स्कार्फ हरवल्याची रादर आपण टाकून दिल्याची खंत व्यक्त केली. दोरीवर वाळत टाकलेल्या त्या स्कार्फकडे बोट दाखवून मी म्हणालो " ते बघ, सापडला तुझा स्कार्फ, रस्त्यातच पडला होता म्हणून धुवायला टाकला".
आशूची कळी खुलली .. अगदी तशीच ... सकाळच्या त्या चिमुकली सारखी !!
प्रतिक्रिया
20 Oct 2016 - 10:31 am | amit१२३
आवडला लेख
20 Oct 2016 - 12:23 pm | टवाळ कार्टा
छान वाटले वाचून, वर ते ठेवा
20 Oct 2016 - 12:24 pm | टवाळ कार्टा
छान वाटले वाचून, ठेवा ते वर
20 Oct 2016 - 12:30 pm | शाम भागवत
आवडल
20 Oct 2016 - 12:46 pm | असंका
गमतीशीर आहे...!
पण कॅश दिली का ज्याची त्याला ते सांगितलंच नाहीत... ;)
21 Oct 2016 - 11:23 am | पाणक्या
दिली ना राव :)
20 Oct 2016 - 1:00 pm | एस
गुड गुड गुड!
20 Oct 2016 - 1:55 pm | शलभ
मस्त
20 Oct 2016 - 2:26 pm | प्रभास
छानच...
20 Oct 2016 - 3:15 pm | खेडूत
:)
मस्त!
20 Oct 2016 - 3:25 pm | तुषार काळभोर
छान
20 Oct 2016 - 3:42 pm | नि३सोलपुरकर
गुड गुड गुड!
छान वाटले वाचून, ठेवा ते वर.
20 Oct 2016 - 4:52 pm | संदीप डांगे
मस्त हं! आवडलं..
20 Oct 2016 - 6:45 pm | Rahul D
आवडले, पुलेशु
20 Oct 2016 - 6:58 pm | धर्मराजमुटके
छान कथा ! आवडली.
अवांतर खुसपट : आशुने गाडीवर बसेपर्यंत कथानायकाने अगदी सगळे निरिक्षण एका झटक्यात करुन घेतले. शिवाय परत येताना नायकाने लहान मुलीने घेतलेला स्कार्फ हा तोच स्कार्फ हे देखील ओळखले आणि दुकानात जाऊन तस्साच्या तस्साच स्कार्फ विकत घेतला म्हणजे नायकाचे रंगभान फारच उच्च दर्जाचे असणार यात शंकाच नाही.
नाहीतर आमच्यासारखे रंगाआंधळेच दुनियेत फार,
लाल, काळा, निळा हिरवा असले मुलभुत रंग सोडले तर वांगी, मोरपिसी, फिरता रंग, असे वेगवेगळे रंग आम्हाला कधी ओळखताच आले नाहित. किंबहुना आम्ही ज्याला लाल रंग म्हणतो तो लालच असेल त्याचीही शाश्वती नाही.
नायकाचे जीवन कोणत्याही मुलीशी लग्न केले की सुखी होणार हे निश्चित !!
21 Oct 2016 - 11:29 am | पाणक्या
हाहाहा... प्रतिक्रिया आवडली, मानो या ना मानो ... परवा सकाळी घडलेली हि आमची सत्यकथा ... पण मी "नायक" वगैरे अजिबात नाही वाटत ... बाकी रंगाचं ज्ञान म्हणाल तर "स्कार्फ धुतल्यावर रंग जरा फिक्का झाला असेल असे आमचे दुसऱ्या दिवशीचे स्पष्टीकरण :) :) हाय काय अन नाय काय
21 Oct 2016 - 1:58 pm | Ram ram
फारच देता बुवा तुम्ही