घरगुती विजपुरवठा, वापर आणि उपकरणे

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
24 Sep 2016 - 10:43 am

*** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** ***

घरगुती विजपुरवठा वापर आणि उपकरणे

विषय सूची
सुरुवात

१) सामान्य प्रश्न

२) स्विचेस

३) प्लग आणि सॅाकेट्स

४) तपासणीसाठी उपयुक्त वस्तू
५ ) मेन केबल ते घराचे वायरिंग

दुरुस्ती विभाग

स्विच दुरुस्ती

सॅाकेट दुरुस्ती

ट्युब लाइट दुरुस्ती

सिलींग फॅन

इस्त्री दुरुस्ती

सुरुवात

घरातल्या विद्युत रचनेची,उपकरणांची दुरुस्तीची माहिती पुस्तकांत, इतर ठिकाणी मिळाली तरी कोणी स्वत: करायला जात नाही कारण शॅाक लागायची भिती असते .परंतू बाहेरचे इलेक्ट्रीशनस उगाचच वायरिंग बदलायला सांगतात. "पाचसात वर्षे झाली ना? करा बदली. वीज बिल जास्ती येतंय? करा बदली. बटणस बरोबर नाही लागत? करा बोर्ड बदली. दहाबारा हजारला फोडणी.
पण तसं नसतं. कित्येकदा कॅान्टॅक्टस जुने होतात. सामान्य लोक ते करू शकत नाहीत आणि वायरमन लोकांना जुनी कामं करायची नसतात. नवीन कामात पैसे लगेच मिळतात. थोडीफार माहिती घेतल्यास फायदा होतो. केवळ पंचवीस वर्षे झाली म्हणून कॅापर वायर काढून अॅल्युमिनिअम वायरिंग गळ्यात मारतात. ते टाळता येते. कमीतकमी उपकरणे आणि त्यांची माहिती असायला काहीच हरकत नाही.
इथेच आपण प्रश्न विचारू आणि माहितीची देवाणघेवाण करूया.
विषय सूचीकडे परत जा

सिलींग फॅन

सामान्य प्रश्न - १
विजेचे बटण / बोर्डावरचा पंखा ,ट्युबलाइट इत्यादीसाठीचा असणारा ऑनऑफ स्विच गरम होतो.अथवा ऑन केल्यावर लागत नाही .
-
वर दिसणाय्रा प्लास्टिकच्या बटणाखाली आतमध्ये मेन सप्लाइ ( फेज म्हणतात) आणि दिवा/पंखा इकडे जाणाय्रा वायरची टोके स्क्रू वापरून बाजुबाजुला आणलेली असतात. बटण दाबल्यावर त्या दोन टोकांत संपर्क केला जातो आणि सप्लाइचा विद्युत प्रवाह दिव्याच्या वायरीला जोडला जातो ,दिवा लागतो. मग आपल्याला वरून शॅाक का लागत नाही? तर त्या प्लास्टिकमधून वीज वाहात नाही म्हणून. घराच्या वायरिंगमधले स्विचेस हे कच्चे दुवे आहेत कारण इथे यांत्रिक हालचाल होते व सतत चालूबंद करण्यामुळे तांब्याचे कॅान्टॅक्टसवर काळा थर चढतो. त्यातून प्रवाह वाहू शकत नाही. स्विच गरम होऊ लागतो. चालूबंद करताना बटणामागे ठिंणग्या दिसतात. शिवाय दाबून धरणारी स्प्रिंग गंजून तुटते,सैल होते. अशावेळी तो स्विच बदलणे हा उपाय आहे. फक्त स्क्रू पिळून, कॅान्टॅक्टस साफ करूनही जागच्याजागी दुरुस्ती होऊ शकते. वायरिंग बदलण्याची गरज नाही. परंतू हे काम सर्वांनाच जमण्यासारखे नाही.

सामान्य प्रश्न - २
बाजारात पंख्याच्या रेग्युलेटरचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत उदा १ ते ४ गती पर्याय असलेला, १ ते ६ व त्यापूढे गती पर्याय असलेला. तरी यातील चांगला कोणता? सध्या घरी रोमाचा १ते४ चा रेग्युलेटर आहे पण १ व २ वर हवा अगदी नगण्य असते,३ वर थोडीशी वाढते पण ४ वर अगदी नकोशी होइल इतकी हवा येते तरी हे रेग्युलेटर बदलण्याचा विचार आहे.-
?? फॅनचे रेग्युलेटर साधे वापरावे का इलेक्ट्रॅानिक( सॅालिड स्टेट) वापरावे.??

== आता जुन्या पद्धतीचे ( रिझिस्टन्स/कॅाइल टाइप) मोठा बॅाक्सवाले रेगुलेटर बनवणे जवळपास बंदच झाले आहे. जो मिळेल तो घ्यावा लागतो. सॅालिड स्टेटचे मिळतात ते लावायचे झाल्यास सॅाकेट बसेल एवढा भाग बोर्डाचा कापावा लागतो. ते नवीन प्लास्टिक बोर्ड असेल तर सोपे असते कारण सुरी गरम करून कापता येते.

?? रेग्युलेटरचे वायरिंग कसे असते??

= बोर्डावरची एक फेज वायर -पंख्याचा स्विच-स्विचमधली दुसरी वायर-रेग्युलेटर-रेग्युलेटरमधली दुसरी वायर ही फेजच असते -पंख्याकडे-पंख्याची दुसरी वायर-बोर्डाच्या न्युट्रलला जोडलेली असते.
------------------------------------------
सामान्य प्रश्न - ३
आपण कोणतेही टु पिनची वायर कधी सुलटी कधी उलटी लावतो. लावतो. सध्या शक्यतो सर्व थ्री पिनचेच सॅाकेट वायरला असतात ते नेहमी बरोबर लावतो. टु पिनचे उदा. मोबाईल चार्जर चे वायर उलटे सुलटे लावले जाते त्याने काय फरक पडतो.?

= काही फरक पडत नाही. फक्त एवढेच की घरामध्ये ठरावीक चांगल्या सॅाकेटचा वापर करतो त्यात प्लग घट्ट बसतो. दुसरीकडे/रेल्वेत हे टुपिनवाले प्लग सैल बसतात/पडतात/ वायर लहान पडते हा त्रास असतो. त्यासाठी एखादा थ्रीपिन प्लगवाला चार्जर वापरा अथवा ओरिज्नल चार्जरच वापरायचा असल्यास एक थ्रीपिन-टुपिन अडॅप्टर जवळ बाळगावा.
---------------------------------------------------------
सामान्य प्रश्न - ४
कॅार्परेशनच्या नळाला पाणी आल्यावर मोटरने पाणी वरच्या टाकीत चढवल्यावर वीज जास्त लागते का टाकीत भरलेले पाणी वरच्या टाकीत भरल्यावर वीज जास्त/ कमी लागते.?

= तत्वत: कॅार्परेशनच्या नळाला थेट पंप लावणे कायद्याने बंदी आहे. ( असे सर्वच करतात आमच्याकडे वगैरे काथ्याकूट टाळून )- एक चौकोनी प्लास्टिक टब अडीच फुट बाइ दीड बाइ एक फुट उंच घेऊन त्याच्या एका बाजूस तळापासून एकदीड इंच उंचीवर १२ mm अडॅप्टर लावून त्यास तीन फुट लांब पंपाचा सक्शन पाइप जोडावा. जोड पक्के असावेत, त्यांतून हवा खचली जाऊ ये. टबात नळाचे पाणी एका बाजूला अडॅप्टरपासून दूर पडेल असे ठेवा. नळाच्या पाण्यातून हवा येते ती पंपात खेचली जाता कामा नये कारण प्राइमिंग जाते आणि पंप वेगाने पाणी फेकत नाही. वीज जास्ती वापरली जाण्याचे हे एक मोठे कारण आहे. पंपाच्या आत हवा जायला नको. टब पाण्याने पूर्ण भरला की पंप चालू करावा आणि पाणी खाली जात अडॅप्टरपरच्या थोडे वरच बंद करावा. काम झाल्यावर टब उलटा रिकामा करून पंप त्यातच ठेवता येतो तसे ड्रममध्ये करणे अवघड जाते. पंपाची वायर प्लग भिजता /ओला ठेवू नये आणि शक्यतो थ्रीपिन प्लग खय्रा अर्थिंगसह वापरावी म्हणजे शॅाक बसत नाही. ओल्या हाताने स्विच बंद करू नये.

पंप वीज जास्ती खाण्याची काही हैड्रॅालिक्स कारणेही विचारत घ्यावी लागतात.पंपाला जोडलेले पाइपही प्रवाहाला विरोध करतात आणि वीज जास्ती खाते. टब वापरून पंपाची सक्शन उंची कमी केलीच आहे. दुसय्रा तिसय्रा मजल्यावरून येणाय्रा पाइपमध्ये वेटोळे असले की त्यात हवा अडकते ती अडथळा करते.तो सरळ खाली आला तर हवा अडकत नाही. पंपाच्या प्रेशरसाइडला एक प्लास्टिक अडॅप्टर तीन फुटांवर ठेवा. पंप स्टार्ट केल्यावर त्यातून जोरदार पाणी येताना दिसले की वरचा पाइप जोडावा. प्राइमिंग नीट होत नसल्यास पंपाचा आवाज एकसारखा सतत उँउँउँउँउँ असा न येता कमीजास्त होत राहातो.
---------------------------------------------------------
सामान्य प्रश्न - ५
हल्ली बरेचसे थ्री पिन प्लगचे सॅाकेट्स येतात त्यातून आत एक पातळ प्लॅस्टिक पडदा असतो.कधीकधी त्यातून आपले उपकरण वापरून प्लग काढला की ते असे काही बंद होते की काही धारदार वस्तू वापरून तो पडदा बाजूला करुन प्लग बसवावा लागतो. हे काम डेंजरस आहे.अजून कोणाला होतो का हा त्रास?काय करावं?
तसेच घराच्या बाहेरच्या बाजूला एक प्लग सॅाकेट आहे तिच्यावरचे कव्हर पडून गेल्या गेल्या आत पांढरे कोणत्याशा कीटकाने घर केले आहे.ते साफ करुन वापरावे की नाही?

= हे असले पडदेवाले सॅाकेट अशासाठी असतात की तुमचा सॅाकेट खाली दोनतीन फुटांवर (परदेशांत असतात तसे )असेलतर तीनचार वर्षांच्या अजाण मुलांनी त्यात काही वस्तू घालून शॅाक लागू नये. इथे नियमाप्रमाणे सॅाकेट्स पाच फुटांवर असतात आणि तो धोका नसतो. जेव्हा प्लग सॅाकेटात खोचला जातो तेव्हा प्लगवरची मोठी लांब अर्थिंगची पिन आत घुसते आणि तिथल्या पडद्यावर दाब पडला की खालच्या लाइव दोन्ही पिनांवरचा पडदा दूर होतो. प्लग काढल्यावर पडदा परत बंद होतो. सुरक्षिततेसाठी योजना असली तरी टु- पिनवाले चार्जर वापरताना अर्थिंगची पिनच नसल्याने या सॅाकेटातला लाइव पिनांवरचा पडदा बाजूला सरकत नाही. त्यामुळे काही नोकियासारख्या कंपन्या एक खोटी प्लास्टिक ची अर्थिंग पिन असलेले परंतू खरेतर टुपिनच असलेले चार्जर देऊ लागले आहेत.
सोपे उपाय- *एकतर असले सॅाकेट्स बसवूच नका, *असे अगोदरच असतील आणि बिघडलले असतील तर बदला. काढलेल्या सॅाकेट्समधला पडदा काढून टाकून परत वापरता येईल. * बाल्कनी/व्हरांड्यातल्या सॅाकेट्सच्या भोकांत एक माशी माती/पाने भरून घर करते. असे घर दिसले की तो सॅाकेट काढून नवीन साधा सॅाकेट लावायचा. त्यात एक रिकामा अनब्रेकबल स्वस्तातला थ्रीपिन प्लग लावून ठेवायचा म्हणजे माशी घर करत नाही. काढलेल्या सॅाकेटात किडा असतो तो उडून जाइपर्यंत ते सॅाकेट थोडे दिवस एका दोरीने तिथेच बाजूला बांधून ठेवा. एक दोन महिन्यांनी तो सॅाकेट स्वच्छ करून, पडदा काढून टाकून परत वापरता येईल.

---------------------------------------------------------

विषय सूचीकडे परत जा

२) स्विचेस किती प्रकारचे असतात?
२-क)मेन स्विच
सर्वात पहिला स्विच ( यास मेन स्विच म्हणतात) हा घरातल्या मुख्य दरवाजापाशी घरात असतो. इथे मेन वीज सप्लाइ घरच्या सर्व वायरिंगशी जोडलेला असतो. यामध्ये डबल स्विच म्हणजे सप्लाइच्या दोन तारा अ) फेज आणि ब) न्युट्रल दोन्हींशी संपर्क तोडता येतो. आणखी एक उघडी तांब्याची तार ( वरती प्लास्टिक आवरण नसलेली ही अर्थिंगची म्हणजे सुरक्षिततेची असते. ती थेटच जोडलेली असते घरातल्या अर्थिंगशी. साधारणपणे पंधरा अँपिअरच्या तारा इथे असतात तिथून मुख्य विजेच्या बोर्डाला आणि प्रत्येक खोलीत आणि बाथरूममध्ये पंधरा अँपिअरच्या तारा पोहोचवलेल्या असतात. ( वायरिंगच्या रेटिंगची माहिती नंतर घेऊ.) जर का एसी युनिट लावायचे असेल तर इमारतीच्या मुख्य विद्युत पुरवठा करणाय्रा वीज मंडळाच्या केबलमधून आणखी एक दोन तारांचा सप्लाइ घ्यावा लागतो आणि त्या तारा जाडजुड असून पंचवीस अँपिअर प्रवाह वाहू शकणाय्रा असतात. त्यासाठी आणखी एक 'मेन स्विच ' असतो.
२-ख)
या दोन्ही मेनस्विचची जागा दरवाजापाशीच जमिनीपासून पाच साडेपाच फुटांवर असणे नियम होता. का तर समजा आग लागली घरात,अथवा भुकंप झाल्यास पटकन बाहेर पळताना, हाताने स्विच बंद करता आला पाहिजे. आजकाल फ्लॅट सिस्टिममध्ये हे स्विच वर उंचावर लावतात -मुख्य भिंतीची शोभा जाऊ नये म्हणून. हे चुकीचं आहे. भारतात स्विच बोर्ड नेहमी पाच फुटांवर असतो तर परदेशात दोन फुटांवर दिसतो याचे कारण असं आहे की इथला विद्युत पुरवठा २३० व्होल्टसचा असतो ,आठ दहा वर्षांच्या थोड्या जाणत्या मुलांचाच हात पाच फुटांवर पोहोचतो. २३० व्होल्टसच्या धक्क्याने माणूस मरू शकतो. परदेशातला पुरवठा ११० व्होल्टसचा असतो त्याने धक्का बसलातरी मृत्यु येण्याची शक्यता कमी असते.

२-ग) स्विच चालू बंद( ऑनऑफ) स्थिती.

आपली नेहमीची दिव्या पंख्याची स्विच/बटणे आपण खाली करतो तेव्हा चालू करतो ,बटण वरती म्हणजे बंद. परंतू आताची नवीन स्विचेस उलट असतात. खाली ( डाउन down) म्हणजे बंद हे लक्षात ठेवावे लागते. गिजरवगैरेलाही असला स्विच असेल तर फार घोळ होऊन धोका उत्पन्न होतो.

२-घ) मेन स्विच खराब होणे-
याही स्विचमध्ये चालूबंद होण्याच्यामुळे नव्हे तर सतत वीज वाहाण्यामुळे ,पाऊस ,दमट हवा यामुळे कॅान्टॅक्टसवर कार्बनचा काळा थर जमतो. प्रवाह अधूनमधून खंडित होतो॥ ट्युबलाइटस उगाचच बंदचालू होतात यावरून ओळखावे. स्विच साफ करून/बदलून घ्यावा.
विषय सूचीकडे परत जा

३ ) प्लग आणि सॅाकेट्स
इलेक्ट्रिक बोर्डावर वेगवेगळ्या साइजचे सॅाकेट्स का असतात आणि टिव्ही,फ्रिज, माइक्रोवेव अवन इत्यादींसाठी वेगवेगळ्या साइजेसचे प्लग्ज का असतात?
इलेक्ट्रिकच्रा प्रत्येक वापरायच्या वस्तुचे रेटिंग वेगळे असते. रेटिंग म्हणजे ते उपकरण किती वीजप्रवाह घेईल हे वॅाटिज ( W, watts ) याने दाखवलेले असते. दुसरा एक आकडा व्होल्ट्सचा (V ,Volts) असतो. भारतातले ,भारतात वापरण्यासाठीचे प्रत्येक उपकरण २३० व्होल्ट्सचेच असते. परदेशातून आणलेले ११० व्होल्टसचे असू शकते. ते उपकरण इथे चालणार नाही.मोडेल. आपला हेअर ड्राइअर असेल तर त्याला जोडलेल्या छोट्या वायरला एक छोटा 'टु पिन प्लग' असतो बहुतेक. माइक्रोवेव अवनच्या वायरला बहुधा मोठा जाडजुड 'थ्री पिन प्लग' असतो. इस्त्रिच्या वायरला छोटा थ्री पिन प्लग असतो. असं का?
- वर सांगितल्याप्रमाणे उपकरणाचे रेटिंग ६५० वॅाट्स ( watts) अधिक असेल तर ते उपकरण पंधरा अँपिअरच्या वायरलाच जोडले जावे हा उद्देश असतो.त्यामुळे त्याचा प्लग मोठा असतो आणि तो त्याच्यासाठीच्याच सॅाकेटमध्ये जाऊ शकतो. इस्त्रीचे वाटेज ६५० असते त्याला छोटा थ्री पिन प्लग चालतो आणि पाच अँपिअरच्या वायरला जोडला तरी चालतो. इस्त्रिच्या आतल्या वायरिंगमध्ये बिघाड झाला तर वापरणाय्रा व्यक्तिला शॅाक लागू नये म्हणून तिसरी पिन अर्थिंगच्या वायरला जोडलेली असते. हेअर ड्राइअर प्लास्टिकचा असतो त्यामुळे वायरिंग खराब झाले तरी शॅाक लागत नाही आणि अर्थिंगची पिन नसलेला टु पिन प्लग चालतो. पण आता नवीन नियमाप्रमाणे सर्वच उपकरणांस थ्री पिन प्लग लावण्याची शिफारस केली आहे.
विषय सूचीकडे परत जा

तपासणीसाठी उपयुक्त वस्तू

या वस्तू कशा वापरायच्या हे अनुभवी मनुष्याच्या मार्गदर्शनातूनच शिका.
तपासणीसाठी उपयुक्त वस्तू - १
टेस्ट लँप
फोटो (१)

यामध्ये दोन जाड्या वायर्स एका बल्ब होल्डरला जोडलेल्या आहेत. वायरच्या टोकाकडचा अर्धा इंचाचा तुकडा प्लास्टिक /पिविसी कवर शिलून तांब्याच्या तारेची टोके उघड केली आहेत. होल्डरमध्ये ६० वॅाट्स अथवा १०० वॅाट्स बल्ब लावला की टेस्ट लँप तयार झाला.
वापर-निरीक्षण -अनुमान:-
हा टेस्ट लँप घरातील २३० व्होल्ट्स वायरिंगवर वापरता येतो. ( सोसायटीच्या पंपरुममध्ये वापरू नका कारण तिथे ४४०व्होल्ट्स दाब असतो शिवाय तसले काही काम फक्त अधिकृत वायरमननेच करणे अपेक्षित आहे)

अ) टोकांपासून चारपाच इंच दूरवरती वायर हातात धरून सॅाकेटचे बटण चालू ठेवून सॅाकेटच्या एका भोकात तारेचे एक टोक टाकायचे, तारेचे दुसरे टोक दुसय्रा कोणत्याही भोकात थोडेसेच टच करून पाहिले तर दिवा लागला तर त्या दोन्हींपैकी एका तारेत वीज आहे हे सामान्य अनुमान निघते. मग कोणत्या तारेत नक्की वीज आहे?
ब) सॅाकेटच्या ३ अथवा ५ भोकांपैकी सर्वात वरचे भोक जरासे मोठे असते आणि हे अर्थिंगला जोडलेले असते. टेस्ट लँपची एक वायर या भोकात प्रथम धरा आणि दुसय्रा वायरचे टोक बटण चालू करून उजवीकडच्या भोकात किंचित स्पर्श केल्यावर दिवा पेटला तर याठिकाणी प्रवाह /फेज /चालू वायर आहे. आता वरची वायर तशीच धरून सर्व भोकात स्पर्श करून पाहा.जिथेजिथे दिवा लागेल तिथे फेज आहे. शिवाय बोर्डावरची अर्थिंगही चांगली आहे हे अनुमान निघते.
क) कधीकधी दिवा पेटत नसेल तर -- तुमचा दिवाच जळला असेल/ अर्थिंग बरोबर नसेल /सॅाकेटच्या आतल्या वायरी सुटलेल्या असतील अशी बरीच कारणे असू शकतात.
ड) दिवा पेटल्यावर जसे खात्रीने सांगता येते की प्रवाह चालू आहे तसे न पेटल्यावर खात्रीने सांगता येत नाही.
अनुभवाने मार्गदर्शनाखालीच वापर करावा.
___________________________________________

तपासणीसाठी उपयुक्त वस्तू - २
टेस्टर
दुकानात हा विकत मिळतो. थोडाफार स्क्रुड्राइवरसारखा असतो आणि छोटे स्क्रू पिळताही येतात. यावर 500 volts लिहिलेले असते तरी तो फक्त घरातल्या २३० volts वरच वापरतात.
फोटो (२) टेस्टर

(व्होल्टेज इंडिकेटर) टेस्टर
वापर-निरीक्षण -अनुमान:-
मागच्या प्लास्टिक /पिव्हीसी असलेली मुठीवर एका हाताच्या बोटांनी धरून एक बोट मागच्याच कडीवर टेकवायचे.पुढच्या लोखंडी सळीवर बोट जाता कामा नये. पायामध्ये बुट/चपला घातलेल्या असल्यास दुसरा हात भिंतीवर ठेवायचा. पुढचे लोखंडी टोक उघड्या विजेच्या तारेवर टेकवायचे/घासायचे आणि लगेच सोडायचे असते.
प्लास्टिक मुठीच्या आतला दिवा पेटलेला दिसल्यास त्या तारेत वीज वाहती आहे हे नक्की. दिवा न पेटल्यास तारेमध्ये वीज नाही असे खात्रीशिर सांगता येत नाही. पुन्हा पुन्हा पाहून खात्री करावी लागतो. योग्य पद्धतीने वापर केल्यास टेस्टर फार उपयुक्त वस्तू/हत्त्यार आहे.
___________________________________________

तपासणीसाठी उपयुक्त वस्तू - ३
continuity test lamp कंटिन्युअटी टेस्टर/ लँप
फोटो (३)

फोटोत दाखवल्याप्रमाणे वायर्स जोडून हा टेस्टर तयार होतो दोन वेगळ्या रंगाच्या वायर्स जोडा.इथे एक निळी आणि एक पिवळी वापरली आहे. ६०/१०० वॅटसचा दिवा असतो.
वापर-निरीक्षण -अनुमान:-
क्रमांक चार मधला अडॅप्टर आणि क्रमांक १ मधला साधा टेस्टर बरोबर हा "कंटिन्युअटी टेस्टर/ लँप" वापरतात. वापरण्यासाठी अनुभव आवश्यक आहे.
___________________________________________

तपासणीसाठी उपयुक्त वस्तू - ४
थ्रीपिन अडॅप्टर-बल्ब होल्डर
फोटो (४)

हा एक साधाच अडॅप्टर आहे पण फार उपयु्त आहे. क्रमांक ३ बरोबर वापरतात.

क्रमांक २,३ आणि ४ एकत्र फोटो
फोटो (५)

विषय सूचीकडे परत जा

मेन केबल ते घराचे वायरिंग

तुमचे घर एखाद्या हौसिंग सोसायटीत एखादा ब्लॅाक असेल तर तुमच्या ब्लॅाकपर्यंत विजपुरवठा कसा होतो ते पाहूया.
इलेक्ट्रिसिटी सप्लाइ कंपनीची एक मोठी केबल सोसायटीत बरेच विंग्ज आणि जिने/प्रवेश असतील तर प्रत्येक जिन्याजवळ/ प्रवेशापाशी आणलेली असते. त्या केबलमध्ये खरंतर चार वायर्स असतात. प्रत्येक वायर वेगवेगळी इन्सुलेट केलेली असते आणि चारही मिळून आणखी एक वर इन्सुलेशन असतेच शिवाय त्याखाली लोखंडी तारेची जाळी असते त्यामुळे केबल सहजासहजी तुटत नाही. फेजच्या तीन लाइव वायर्स आणि एक कॅामन न्युट्रल असते. तुमच्या मजल्यावर बारा ब्लॅाक्स असतील तर प्रत्येक फेजमधून चार चार ब्लॅाक्सना पुरवठा होतो. न्यूट्रल सर्वांनाच दिलेली असते. प्रत्येक फेजमधून प्रथम एका मेन कटाउट-फ्युजला प्रवाह जातो.( त्याला आपण आता PH1, PH2,PH3 म्हणू तात्पुरते ) तुमच्या इमारतीचा सर्वांचा विजपुरवठा तोडायचा निर्णय विज कंपनीने घेतल्यास विज कंपनीचा मनुष्य येऊन हे कटाउट्स काढून नेतो. म्हणजे इमारतीचा सप्लाइ तोडला असे म्हणतात. शिवाय रस्त्यावरच्या ज्या मेन केबलमधून ही केबल आलेली असते तिथूनही तोडतात.

फेजच्या मेन कटाउट-फ्युज ( हा एक पोर्सलेनचा डब्यासारखा भाग असतो त्याचा खालचा भाग बोर्डावर बसवलेला असतो. वरच्या झाकणासारख्या भागात पितळी कॅान्टॅक्ट्स असतात त्यात योग्य अशी फ्युज वायर टाकलेली असते. खालच्या भागातल्या दोन क्लिपांत मेनकडून येणारी आणि तुमच्या ब्लॅाकच्या मिटरला जाणारी फेजसाठीची वायर असते. झाकण जोरात आत दाबले की त्यांचा संपर्क फ्युज तारेमधून होतो. समजा मेन कटाउट-फ्युजपैकी ( PH1, PH2,PH3 पैकी कोणताही एक फ्युज गेल्यास त्याला जोडलेले चार ब्लॅाक आणि पाण्याचा पंप यांपैकी कोणत्यातरी एका वायरिंगने जास्ती करंट घेतला आहे/शॅार्ट झाले आहे.
आता तुमच्या मिटरला एक फेज मिळाली आणि एक न्यूट्रल दिलेली असते. यापुढे एक छोटा फ्युज कटाउट असतो.( याला आपण BL1 म्हणू ) रचना मोठ्या कटाउटप्रमाणेच फक्त १५/२५ अँपिअरचा फ्युज असतो. तर असे १२ ब्लॅा्क्सचे बारा BL1,BL2,BL3.....BL12 असतील ) या कटाउट नंतर एक साधा मेन स्विच असतो तो आपल्या घरातल्या स्विचसारखाच असतो.

// मेन केबल - मेन फेज कटाउट - ब्लॅाकचा मिटर - ब्लॅाकचा कटाउट BL1 - मेन स्विच.//

हे वायरिंग विज कंपनीकडून करून दिले जाते. यावर त्यांचा अधिकार असतो. या बोर्डालाच मिटर बोर्डही म्हणतात. कटाउटमधला फ्युज उडल्यास आपण स्वत: अथवा वायरमनकडून दुरुस्ती करण्याचा अधिकार नसतो. तुम्हाला विज पुरवठा कंपनीस अर्ज देऊन ते काम करवून घ्यावे लागेल. मिटरच्या तक्रारीही तेच पाहतात. ब्लॅाकचा फ्युज उडल्यास तुम्ही आणि मेन फेज PH1,2,3 उडल्यास सोसायटीने अर्ज करून काम करवून घ्यायचे असते. सर्व मेन स्विचेसपासून प्रत्येकाच्या ब्लॅाकपर्यंत आणि आतले वायरिंग इमारत बांधणारा बिल्डर करून देतो. शिवाय जी अर्थिंगची तार लागते तीही तोच टाकतो. बांधकाम / फाउंडेशन करतानाच एक तांब्याची प्लेट पाचसहा मिटरस खोल पुरून त्याभोवती मीठ,कोळसा भरतात. प्लेटला जोडलेली तांब्याची तार एका लोखंडी पाइपातून वरच्या बोर्डापर्यंत आणतात. या तारेला जोडूनच सर्वांना अर्थिंग दिलेली असते.

काही कारणाने ,आग वगैरे लागल्यास मेन स्विच बंद करून धोका टाळता येतो. आपल्या घरातही एक मेन स्विच आणि फ्युज असतोच. तो स्थानिक वायरमन दुरुस्त करू शकतो. फ्युज गेल्यास वायरमनकडूनच काम करवून घ्यावे कारण तो फ्युज उडण्याचे कारणही शोधतो व घरातले वायरिंग/ कोणते उपकरण त्याला कारण आहे हेसुद्धा पाहतो. शिवाय त्यानिमित्ताने थोडे शिकायला मिळेल.

विषय सूचीकडे परत जा

स्विच दुरुस्ती

स्विच दुरुस्त करणे. सामान्य प्रश्न (१)मध्ये असलेली परिस्थिती आल्यास स्विच दुरुस्त करावा लागतो. यात दोन प्रकारे करता येतो. अ)जागच्या जागी बोर्डावरच करणे, ब)जुना काढून पुर्ण नवाच स्विच लावणे.
अ) जागच्या जागी बोर्डावरच स्विच दुरुस्त करणे करणे.
हे काम थोडेसे झटपट होते आणि बय्राचदा यशस्वी होते. बटण दाबावे लागते अथवा गरम होते अशी तक्रार असेल तर हे करावे. मुख्य म्हणजे इतर स्विचेसच्या रांगेत हा स्विच असतो आणि एकसारखाच राहतो फक्त आतली बाजू स्वच्छ केली जाते. बोर्डाच्या आतली एकच वायर हलवावी लागते त्यामुळे वायर्सचा गोंधळ होत नाही.
अ१) बोर्ड उघडावा आणि कोणता स्विच ते पाहावे. सर्व स्विचेसमधून एकच कॅामन लाइव वायर फिरवलेली असते त्यावर कुठेही छोटा टेस्टर टेकवल्यास टेस्टरातला दिवा पेटलेला दिसेल. आता घरातला मेन स्विच बंद करावा आणि पुन्हा टेस्टरने तपासावे.दिवा पेटणार नाही. असे एकदोनवेळा मेनस्विच ओनओफ करून टेस्टर बरोबर दाखवतोय आणि बोर्डाच्या आतली पावर बंद होते याची खात्री करावी.
विशेष सुचना (मेन स्विच बद चालू करण्याअगोदर घरातले टिव्ही/फ्रिज/कंमप्युटर/मोबाइल फोन चार्जिंग हे सर्व बंद ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा ते विनाकारण बंद- चालू होत राहतील.)
अ २) स्विचच्या मागे दोन स्क्रू दिसतात त्याच्या एका टोकाच्याकडच्या स्क्रूखाली लाइव वायर असते आणि मध्यावरच्या स्क्रूखाली दिवा/पंख्याच्या रेग्युलेटरकडे / अथवा सॅाकेटला जोडलेली वायर असते. त्याचा स्क्रू पूर्ण काढावा.वायर बाजूला केल्यावर आतला आणखी एक बारीक स्क्रू काढला की बाहेरचा बटणाचा भाग निघून येईल. हा स्क्रू काढण्यासाठी एक बारीक स्क्रूड्राइवर वापरावा लागेल.
अ ३) आतमध्ये खालच्या भागात आणि बटणाच्या वरच्या भागाखाली एकेक तांब्याची गुट्टी दिसेल ती काळी झालेली असते त्यामुळे एकमेकाला टेकल्यावरही प्रवाह वाहताना अडथळा येतो,स्विच गरम होतो. या गुट्ट्या चाकुच्या टोकाने साफ कराव्या. पुन्हा बटणाचा वरचा भाग आहे तसा जोडावा. हे करण्यासाठी थोडे कसब लागतो ते एका नव्या स्विचवर आत्मसात करावे म्हणजे बोर्डावर पटकन करता येईल. दोनचारदा बटण दाबून घट्ट बसल्याची खात्री करावी. वायर आहे तिथे जोडावी आणि स्क्रूखाली वायरीचे टोक घट्ट बसले आहे हे आढून पहावे. लगे हाथ इतरही सर्वच स्क्रू घट्ट आहेत का पाहावे.

ब ) जुना काढून पुर्ण नवाच स्विच लावणे.
हे काम थोडे किचकट आहे शिवाय प्रथमच करणाय्रास जोखमीचे/घोटाळ्याचे वाटेल कारण दोनचार वायर्स काढाव्या लागतात.
ब १) प्रथम अ१ मध्ये सांगितल्याप्रमाणे काळजी घेऊन बोर्डावरची पावर बंद झाल्याची खात्री करून घ्यावी.
ब २) बिघडलेला स्विच काढण्या अगोदर त्याच्या वायर्स सोडवाव्या लागतात. इतर सर्वच स्विचेसमधून जोडणारी एक कॅामन लाइव वायर काढण्यासाठी इतरही स्विचेसचे स्क्रू सैल करून त्या वायरमधून आपला स्विच मोकळा करावा. दुसरी वायरही काढा.
ब ३) आता स्विच वायर्समधून मोकळा झालाय पण बोर्डावरून काढण्यासाठी दोन बोल्ट्स काढा. नवीन स्विच तिथे बोर्डावर धरल्यावर बोल्ट्सची भोके समोरासमोर आली पाहिजेत. (नाही आल्यास दुसरा स्विच आणावा लागेल. )बोल्ट्स लावून स्विच बसवा. कॅामन लाइव वायर आहे तशी लावून दिव्याकडे जाणारी वायरही जोडा.
ब ४) मेन स्विच चालू करून सर्वच स्विचेस बरोबर चालतात का हे पाहावे लागेल कारण कॅामन वायर हलवली होती ती नीट लागली आहे का खात्री होईल.
या कामात आपण फक्त लाइव वायर्सचनाच हात लावला होता . न्यूट्रल काढली नव्हती त्यामुळे परत चुकीचं जोडतानाचा धोका नव्हता.

विषय सूचीकडे परत जा

सॅाकेट दुरुस्ती

कधीकधी असं होतं की बोर्डवरचे सॅाकेट थ्रीपिनचे असते आणि त्यात टुपिन प्लग नीट बसत नाही. मग पाच पिनांचे सॅाकेट लावावे असं वाटतं तर कधी असलेल्या सॅाकेटमध्ये प्लग लावला तरी सप्लाई मिळत नाही, भोकांत एका माशीने माती भरून ठेवलेली असते अशावेळी सॅाकेट बदलायची गरज पडते. सॅाकेटला जोडलेला स्विचही खराब झाला असेल तर तेही काम करून टाकता येते.

सुचना :१) आपण आता ५ अँपिअरचे सॅाकेट बदलताना त्या जागी ५ अँपिअरचेच लावणार आहोत. तिथे १५ अँपिअरचे मोठे लावायचे नाही. २ ) या कामात लाइव,न्यूट्रल आणि अर्थिंग(ग्राउंड) या तिन्ही वायर्स हलवणार आहोत तेव्हा विशेष ज्ञान आवश्यक आहे. ३) कोणत्याही पुस्तकात अथवा ऐकीव माहितीच्या आधारावर वायर्सच्या रंगांवर विश्वास ठेवू नका. बय्राचदा एकाच रंगाची वायर वापरलेली असू शकते. काही तारा म्हणजे सर्व स्विचेसना जोडणारी लाइव तार उघडी असते. त्यावरचे प्लास्टिक / पिविसी इन्सुलेशन काढलेले असते , आणि अर्थिंगची तांब्याची तारही उघडीच असते. या तारांबद्दल गैरसमज असता कामा नये. ४ ) बोर्डावर समोरून सॅाकेटकडे बघितल्यास उजवीकडे L लाइव आणि डावीकडे N न्यूट्रल असते म्हणजे आतमधून उलट दिसेल तरीही असेच असेल अशी समजूत करून चालू नये. प्रत्यक्ष टेस्टर,टेस्ट लँप वापरून नक्की करायचे असते.
कृती-
१ ) सॅाकेटची सर्वात वरची पिन ही अर्थिंगला जोडलेली असते. स्विच मधून सॅाकेटला जाणारी तार लाइव असते. पाच पिनांचे सॅाकेट असेल तर ती लाइव तार आणखी एका वरच्या पिनेस जोडलेली असते. बोर्ड उघडून टेस्ट लँप वापरून त्याचे एक टोक अर्थिंगला टेकवा दुसरे टोक स्विचमधल्या लाइव तारेस स्पर्श केल्यावर दिवा पेटेल. ते टोक स्विचमधल्या दुसय्रा टोकाला स्पर्श केल्यास आणि स्विच ऑन असेल तर दिवा पेटला पाहिजे. स्विच ऑफ केल्यावर पेटणार नाही. दोन तीनदा केल्यावर लाइव वायर कोणती ,अर्थिंग कोणती याची खात्री होईल. अर्थिंगला टेस्ट लँपचे एक टोक धरून सॅाकेटच्या उरलेल्या तिसय्रा तारेवर दिवा पेटल्यास काम सुरू करू नका धोका आहे. तुमच्या इमारतीच्या वायरिंगमध्येच गडबड झालेली आहे हे नक्की.
थोडक्यात अर्थिंग आणि लाइवमध्ये दिवा पेटला पाहिजे पण अर्थिंग आणि न्यूट्रलमध्ये नाही. ही खात्री झाल्यावरच मेन स्विच ऑफ करून कामाला सुरुवात करा.
२) स्विचकडून येणारी लाइव वायर वेगळी करून त्यावर टॅग लावा. न्युट्रलही वेगळी करून टॅग लावा. कधीकधी इथे दोनचार वायर्स एकत्र पिळून स्क्रूखाली असतात त्या तशाच पिळलेल्या ठेवून वेगळे करा. वरची मोठी पिन अर्थिंगची त्यातलीही तार वेगळी करा.
३) आता सॅाकेट वायर्समधून सोडवला आहे तो बोर्डावरच्या बोल्ट्सने पक्का केलेला असतो तेही काढल्यावर सॅाकेट निघेल.
४) नवीन सॅाकेट बसवून बोल्ट्स पक्के करा. बोल्ट्सचे नट्स विशेष घट्ट असणे आवश्यक आहे कारण प्लग बाहेर खेचताना हेसुद्धा खेचले जाऊन सुटतात. वायर्स जोडा योग्य ठिकाणी. साध्या थ्रीपिनला बदलून फाइवपिन लावला असेल तर लाइव आणि न्यूट्रल वरच्या आणखी एकेका पिनेत जावी लागते. यासाठी दुसय्रा एखाद्या सॅाकेटचे निरीक्षण उपयोगी पडेल.
५) ही कामे करताना बय्राचदा वायर कमी पडते अथवा जुनी तुटते. ती बदलावी लागेल. अॅल्युमिनियम वायर फार लगेच तुटतात.
६) सर्व वायर्स ओढून पाहा आणि सर्वच स्क्रू घट्ट करा.
७) बोर्ड बंद करून मेन स्विच चालू करा.

विषय सूचीकडे परत जा

ट्युब लाइट दुरुस्ती

ट्युब लाइट हे एक प्रकाश देणारे साधे सोपे स्वस्त साधन आहे. यामध्ये उत्पन्न होणारे दोष आणि ते कसे शोधायचे ते पाहू. ट्युब पेटत नाही हा सामान्य दोष आहे. जुन्या फिटींगमध्ये इतक्या कटकटी असतात की सुरुवातीचे सोपे उपाय करून काम नाही झाले तर सरळ ती संपूर्ण पट्टीच काढून नवीन टाकून काम चालू करणे सोपे पडते. काढलेली फिटींग नंतर सावकाश टेबलवर घेऊन दोष शोधत बसावे.
सुरुवातीचे सोपे उपाय
१) स्टार्टर, एक बल्ब आणि एक नवीन ट्युब हाताशी ठेवूनच उंचावरच्या ट्युबलाइटवर हात पोहोचेल असे स्टुलावर चढावे.
*प्रथम ट्युबचा इलेक्ट्रिक सप्लाई ज्या बाजूच्या बल्ब होल्डरमधून घेतला आहे तिथे एक ४०/६० वॅाट्सचा बल्ब लागतो का पाहावे. तो पेटतो तर सप्लाइ ओके आहे.
*स्टार्टर काढून आपल्याकडचा नवीन बसवावा आणि पाहावे ट्युब पेटते का. नसेल तर ट्युब थोडी फिरवून पाहावी लागते. ट्युब फिरवताना काचेच्या नळीला धरू नये तर टोकाला जी अॅल्युमिनियम टोपणं असतात ती हातानी घट्ट धरून फिरवावीत कारण टोपणं नळीतून हलतात आणि एखादी चांगली ट्युब वाया जाऊ शकते.
*नळी फिरवूनही पेटली नाही तर ती काढा. नवी ट्युब बसवून पाहा.
*तरीही ट्युब पेटली नाही तर ते जुने फिटिंगच काढून तिथे एक नवे कोरे ट्युबपट्टी -फिटिंगच बसवून काम चालू होते आणि काढलेले खराब फिटिंग खाली टेबलावर घेऊन सावकाश दुरुस्ती करत बसता येईल.
थोडक्यात एखाद्या घरात/जागेत बय्राच ट्युबज असतील तर एक चालू ट्युबपट्टीफिटिंग हाताशी ठेवणे सोयीचं पडतं.
दुरुस्ती - ट्युबलाइट पट्टीचं वायरिंग लक्षात घेणं जरुरीचं आहे.ते फोटो /वायरिंग नकाशा यात जालावर/पुस्तकांत सापडेलच पण ते शब्दांत सांगायचं तर असं आहे-
मेन सप्लाइची एक वायर बल्ब होल्डरमधून पट्टीकडे - चोकचे एकटोक-चोक-दुसरे टोकातून-ट्युबलाइटला जे दोन्ही टोकाकडे ट्युब पकडणारे होल्डर असतात त्यातील एकाला-तिथून बाहेर पडणारी वायर-स्टार्टरच्या होल्डरला-स्टार्टरच्या दुसय्रा टोकातून बाहेर-दुसय्रा टोकाच्या ट्युब होल्डरला जाऊन बाहेर-बल्ब होल्डरमधल्या दुसय्रा टोकातून मेन्सकडे परत.
*ट्युबच्या दोन्ही टोकांस जी अॅल्युमिनियमची टोपणे असतात तिथे दोनदोन पिना असतात. त्यातून आतल्या कॅाइलला प्रवाह मिळतो. काढलेली ट्युब दुसय्रा चांगल्या पट्टीत लावून पेटली तर ती ठीक आहे अथवा फेकावी.
*पट्टीतला महाग आणि महत्त्वाचा भाग चोक असतो. यात एक मोठी कॅाइल एका डब्यात बसवलेली असते. कॅाइलचे काम व्होल्टेजला जाऊ देणे पण प्रवाह /करंटला अडथळा करणे हे आहे. चोक तपासण्यासाठी "कंटिन्युअटी टेस्ट लँप "१०० वॅाटचा दिवा लावून वापरावा लागतो. चोकच्या दोन वायरींपैकी एक बाजूला करावी. टेस्टरच्या तारा जोडल्यावर दिवा पूर्ण लख्ख पेटतो का हे पाहावे. नंतर चोकच्या दोन कनेक्शनला टेकवून पाहावे तो आता मंद पेटला तर चोक चांगला आहे. अजिबात पेटला नाही अथवा अगोदरसारखाच लख्ख पेटला तर चोक गेलेला आहे. चोक गेल्यास पट्टी फेकून देऊन नवे पूर्ण सेट घेणेच स्वस्त पडते.
*सुचना* हा कंटिन्युअटी टेस्ट लँप कसा वापरायचा ते मार्गदर्शनाखाली शिकावे. आजुबाजूस लहान मुले असतील तर टेस्टिंग काम करू नये. मुलांना कुठेही पटकन हात लावून हे काय आहे विचारायची सवय असते. आपल्या हातात उघड्या चालू तारा असतात.

* चोक चांगला निघाल्यास काढलेली तार पुन्हा आहे तिथे स्क्रूने घट्ट करावी. ट्युबलाइट धरून ठेवणाय्रा साइड होल्डरकडे लक्ष द्यावे. याच्या आत दोनदोन पत्र्याच्या लोखंडी टेन्शन पट्ट्या असतात त्या बय्राचदा गंजतात आणि ट्युबच्या पिनांना चांगला कॅान्टॅक्ट करत नाहीत. तर असे असल्यास ते साइड होल्डर नवे टाकावे. काम किचकट असते कारण वायरी जेमतेम ढकललेल्या असतात. स्क्रूने शेडे घट्ट धरले आहेत का हे वायर ओढून खात्री करावी. बय्राचदा स्क्रूने वायरीतील तार न पकडता वरचे प्लास्टिक दाबलेले असते. अशावेळी तार धरली आहे याची खात्री करावी.
* आता स्टार्टर होल्डरकडे लक्ष द्यावे त्यातल्या पट्ट्या पितळी असल्या तर चाकूने साफ कराव्यात. पत्र्याच्या लोखंडी गंजलेल्या असल्यास तो होल्डर काढून नवीन बसवावा. स्टार्टर लावावा.
* आता होल्डरात ट्युब बसवावी आणि शेवटची महत्त्वाची टेस्ट करावी-- मुख्य दोन तारांपैकी एकावर कंटिन्युअटी टेस्ट लँपची एक तार टेकवावी आणि दुसरी ट्युबपट्टीच्या लोखंडी कडांवर (रंग नसेल तिथे) घासावी. ठिकठिकाणी घासून दिवा पेटतो का पाहावे. दिवा पेटल्यास आपले रिपेरिंग करताना कुठेतरी लाइव वायर पट्टीला टेकलेली आहे. ते शोधून काढा. दोन्ही शेडे तपासा. शॅाक न लागण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. हे झाल्यावर ट्युब लागते का पाहावे. नक्की पेटेल. आता ही दुरुस्त झालेली ट्युबपट्टी दुसरीकडे वापरता येईल.

// कंटिन्युअटी टेस्ट लँप कसा वापरावा?//

याच्या बल्ब होल्डरात ६०/१०० वॅाट्सचा दिवा बसवा. तारांची टोकेचारपाच इंच दूर इन्सुलेशनवर एका हातात क्रॅास घट्ट धरा. अडॅप्टरला जोडून स्विच
ऑन करून दुसय्रा हातातल्या साध्या टेस्टरने दिव्याकडून येणाय्रा वायरला ( इथे फोटोतली पिवळी)स्पर्श करा. छोट्या हातातल्या टेस्टरातला दिवा पेटला पाहिजे. न पेटल्यास स्विच ऑफ करून होल्डरातला अडॅप्टर फिरवून बसवा. आता लाइव वायर बल्बमधून येते असं दिसेल. आता टेस्टर बाजूला ठेवून दोन हातात दोन वायर धरा. टोकं टेकवल्यावर दिवा लख्ख पेटेल. आता ही दोन टोके जर का स्टार्टरच्या दोन टर्मिनलना लावली तर दिवा जलद चालूबंद होताना दिसेल. म्हणजे स्टार्टर चांगला आहे. काम झाल्यावर लगेच स्विच बंद करून कंटिन्युअटी टेस्ट लँप काढून ठेवा. अतिशय उपयुक्त वस्तू परंतू मार्गदर्शन घेऊनच वापरावी.

विषय सूचीकडे परत जा

सिलींग फॅन

सिलींग फॅन
सिलींग फॅनमधला दोष म्हणजे तो अजिबात फिरत नाही अथवा हळूहळू फिरतो. याचे कारण फॅनचा स्विच / फॅनचा रेग्युलेटर / फॅनमधला कन्डेन्सर / फॅनमधल्या इलक्ट्रिक मोटरचे वाइंडिंग यांपैकी एक अथवा मिळून असून शकते. याशिवाय फॅनमधून आवज येणे हा दोष फॅनची बेअरिंग खराब झाल्याचा परिणाम असतो तो आपण घेणार नाही. इलेक्ट्रिकल दोष पाहू.
फॅनचे वायरिंग- विजेच्या बोर्डावर फॅनचा चालूबंद करण्याचा स्विच असतो त्यातून मिळणारा विजप्रवाह ( फक्त लाइव वायर ) प्रथम बोर्डावरच्याच रेग्युलेटरला जातो.तिथून तो फॅन जिथे बसवला आहे तिथे हुकच्या बाजूला असलेल्या एका कनेक्टरपर्यंत नेलेला असतो. फॅनमधून येणारी न्यूट्रल वायर कनेक्टरमधून बोर्डापर्यंत येऊन आतल्या न्यूट्रलला जोडलेली असते.

रेग्युलेटरमध्ये दिलेले बटण फिरवले की आतल्या रिझिस्टन्समुळे/इतर रचनेमुळे व्होल्टेज कमी जास्त करून फॅनकडे पाठवले जाते व फॅनची गती कमी जास्त करता येते. ते एका डाइअलवर आकड्यांनी दर्शवलेले दिसते. रेग्युलेटरमध्ये बिघाड झाल्यास फॅन काही गतींवर न फिरणे अथवा अजिबात न फिरणे हे होऊ शकते. तुमचा जुना रेग्युलेटर बोर्डावरच एका मोठ्या बॅाक्समध्ये लावलेला असेल व तो फॅन लावला की गरम होतो असा असेल तर जुना रिझिस्टन्स /कॅाइल रेग्युलेटर आहे. तो आता मिळत नाही. नवीन सॅालिड स्टेट टाइप मिळतात ते लहान असतात व सॅाकेट बसवतात त्या छोट्या चौकोनातच बसतात. यामध्ये दुरुस्ती अशी काही नसते फक्त बदलणे हाच उपाय असतो.
मेन स्विच बंद करून फॅनचा जो स्विच आहे त्यातून रेग्युलेटरला जाणारी वायर दूर करा. फॅनकडे जाणारी लाइव वायर रेग्युलेटरला जोडलेली असती तीही काढा. आता रेग्यालेटरला लावलेले नटबोल्ट्स काढून तो बोर्डावरून काढून घ्या. अगोदरचाही छोटा सॅालिड स्टेट टाइप असेल तर तो दुकानात दाखवून दुसरा घेऊन या. तो लावून स्विच आणि फॅनकडे जाणारी वायर जोडली की काम झाले. जुन्या टाइपचा काढून नवा टाइप लावण्यासाठी बोर्डावर एक चौकोन कापायचे काम वाढेल. रेग्युलेटरला असलेल्या दोन वायर्स या लाइव ( फेज) वायर्सच असतात - एक स्विचकडे जाते व दुसरी पंख्याकडे.
*पंखा ज्या स्टिलच्या दांड्याने छताच्या हुकला टांगलेला असतो त्या दांड्यावर खालच्या पंख्याच्या बाजूस एक प्लास्टिकची टोपी असते त्याचा स्क्रू सैल करून वर केल्यावर एक गोल कंडेन्सर रबर पॅकिंगमध्ये ठेवलेला दिसेल. पंखा हळहळू फिरण्याचे कारण बय्राचदा हा कंडेन्सर काम करत नसतो.
* कंडेन्सर जिथे ज्या वायर्सना जोडला आहे त्यावरची इन्सुलेशन टेप काढा.वायर सोडवा.टॅग लावा. दुसरी वायरही सोडवून टॅग लावा.कंडेन्सरच्या दोन्ही तारा एकमेकास किंचित स्पर्श करा. एखादा 'चिक्' असा आवाज येईल. कंडेन्सरमध्ये काही विजभार असेल तो निघून जाईल ( discharge ). नंतरच काढा.
पंख्याच्या आतल्या मोटरकडून आलेल्या वायर्सचीटोके जशी जोडलेली असतील तशीच ठेवा. शिवाय त्या वायर्स तुटणार नाहीत हे बघा कारण फारच छोटे तुकडे असतात. कधीकधी तीन स्क्रूवाला कनेक्टर ठेवलेला असतो त्याने काम सोपे होते. कोणत्या दोन खाचात कनेक्ट केला आहे हे नोंद करूनच काढा. टोके एकमेकास जोडून डिसचार्ज करायला विसरू नये.
* या काढलेल्या कंडेन्सरची तपासणी अशी करा:-
कंटिन्युअटी टेस्ट लँप चालू करून त्याची टोके कंडेन्सरच्या दोन वायर्सना टेकवली की दिवा पेटेल. टेस्ट लँप बंद करा. आता कंडेन्सरची वायरची टोके थोडे दूर धरून एकमेकास टेकवली की एक ठिणगी पडेल आणि सेफ होईल.त्यातली साठलेली वीज निघून जाईल. कंडेन्सरच्या बाहेरच्या भागास हात लावण्यात काहीच धोका नसतो. फक्त शेडे एकदा स्पर्श करावेत. कंडेन्सरची भार धरण्याची क्षमता capacityकमी झाल्याने फॅन हळू फिरतो. तरी थोडी क्षमता असतेच म्हणून डिसचार्ज करावाच.
हा कंडेन्सर दुकानात दाखवून नवीन ( बहुतेक २५० माइक्रो फॅरडे रेटिंग असते )आणि. नवीन कंडेन्सरही टेस्ट करून डिसचार्ज करून योग्य ठिकाणी पुर्वीसारखा कनेक्ट करा. वायर्स पिळून जोडल्यास त्यावर इन्सुलेशन टेप घट्ट गुंडाळा.
हे सर्व काम पंखा हुकमधून खाली न उतरवता वरच्यावर करता आल्यास बरेच काम वाचते.
फॅनची वायर बोर्डात स्विचला पुन्हा जोडून चालू करून पाहा. बहुतेक दुरस्त झालेला असेल. तरीही हळू फिरला/अथवा फिरला नाही तर मोटरचे वाइंडिंग खराब झाले असेल. ते काम आपण करू शकत नाही. बेअरिंगचे कामही अवघड असते. ते करू नये.

विषय सूचीकडे परत जा

इस्त्री दुरुस्ती
इस्त दुरुस्ती

इस्त्री ही एक उपयुक्त इलेक्ट्रिक उपकरण आहे. दोन प्रकारच्या इस्त्र्या असतात.एक हलकी एक सवा किलो वजनाची ऑटमॅटिक आणि दुसरी सवातीन किलोची (साडेसहा पौंडाची ). यामध्येही घरगुती आणि टेलर मॅाडेल असे दोन प्रकार असतात.या वजनदार इस्त्र्या ऑटमॅटिक नसतात. टेलर मॅाडेलचा आकार पंचकोनी असून पुढे टोक असते, चपट्या असतात. घरगुती लंबगोल आणि उंच असतात.
छोटी ऑटमॅटिक इस्त्री तापत नाही ही तक्रार असली तर त्याच कंपनीकडे दुरुस्तीला पाठवणे उचित कारण त्यात जो टेम्परेचर कन्ट्रोलचा ( थर्मोस्टॅट ) भाग असतो तो बाजारात दुसरा सुटा खात्रीलायक मिळण्याची शक्यता कमी असते. यामध्ये वायर ही आतूनच जोडलेली असते,वेगळी काढता येणारी नसते. सतत वापर होत असेल तर वायरीची पुढील टोके आतमध्ये तुटतात. उघडल्यावर ते प्रथम पाहावे आणि तीनचार इंचाचा भाग कापून पुन्हा कनेक्शन द्यावे. कंटिन्युअटी टेस्ट लँप वापरून आतल्या हिटर कॅाइलमधून प्रवाह वाहतो का ते पाहावे. कमीतकमी दोष कुठे आहे ते कळून तात्पुरते काम करता येईल पण ही इस्त्री एकदा बिघडू लागली की वारंवार त्रास होऊ शकतो.
घरगुती /टेलर मॅाडेल बरीच वर्षे टिकते. यामध्ये
थर्मोस्टॅट नसतो व हातानेच फार तापली की स्विच ऑफ ,गार होऊ लागली की ऑन करावा लागतो. आतमध्ये तापणारी कॅाइल असते तिचे वॅाटिज ६५० असते व तीन अँपिअर प्रवाह घेते. पाच अँपिअरच्या सॅाकेटमधून प्लग लावून वापरता येते. याची वायर सिटी असून एका टोकास थ्रीपिन प्लग आणि दुसय्रा टोकास एक अडॅप्टर असतो तो इस्त्रीच्या मागच्या प्लगवर घट्ट बसतो.
या इस्त्रितील बिघाड -बरेचसे बिघाड वायरीतच होतात कारण तीन अँपिअरचा प्रवाह यातून जातो आणि फ्लेक्सबल -लवचिक हलणारी केबल (इस्त्रीची वायर ) वापरली जाते. तशीच जोडलेली ठेवून कपड्यांवर फिरवताना वायरीला पीळ पडून आतल्या तारा एकेक तुटत जातात. कमी झाल्या की तापतात. कधी वायर पेटतेही. बोर्डावरच्या अथवा इस्त्रीच्या टोकाकडचे प्लग ,अडॅप्टर तिथल्या पिनांत सैल बसले तर तापतात. खालच्या अडॅप्टरच्या बाजूस एक पितळी टेन्शनपट्टी असते ती इस्त्रीच्या केसिंगला स्पर्श करत नाही कारण पत्रा गंजलेला असतो. मग शॅाक लागण्याचा धोका वाढतो. हे सर्व दोष वापर केल्याने वाढत जातात. अधूनमधून इकडे लक्ष देऊन प्लग,अडॅप्टर,वायर बदलावी. इस्त्री प्रथम पाचेक मिनिटे तापवून घ्यावी व स्विच बंद करून फिरवावी. फिरवताना एका दिशेने नेऊन परत उलट तोंड करून आणू नये.तसे केल्याने वायरला पीळ पडतो. उलट मागेमागे आणावी आणि उभी ठेवावी. इस्त्री पाडू नये. आतली कॅाइल लवकर खराब होते. ही कॅाइल पाचसहा वर्षं अथवा अधिक सहज टिकते आणि त्याची किंमतही कमी- पंधरावीस रुपये असते. कॅाईल जळली की तसा वासही येतो आणि तापायची बंद होते.
ती कॅाइल ( element ) कशी बदलायची ते पाहू-
*वायर काढून इस्त्रीच्या मुठीच्या खाली दोन गोल नट दिसतील ते काढावेत. इथेच एका पट्टीवर २३० व्होल्ट्स, ६५० वॅाट, ३/३.२ किलोग्राम लिहिलेलं दिसेल. आता वरचे गोल झाकण एकदम ओढू नका. पुढच्या टोकाकडचा भाग तीनचार इंच उचला. मागच्या बाजूस न उचलता आतल्या बाजूस पाहिल्यावर प्लग पिनांखाली एकेका पितळी नट्ने खालच्या कॅाइलची पितळी पट्टी जोडलेली दिसेल. ते नट्स एक लांब नाकाच्या पकडीने हळूहळू सैल करा. गेलेल्या कॅाइलला काढण्यासाठी एवढी काळजी नसून दुसरी नवीन कॅाइल बसवल्यावर असेच उलट करायची सवय होईल. नट्स निघाले की झाकण निघेल.
* खाली एक जाड/जड लोखंडी तुकडा ( ballast -वजन वाढवतो आणि उष्णता धरून ठेवतो.) डबलनट्स वापरून याच बोल्ट्सवर लावलेला दिसेल तो काढायचा आहे. नाकावर रुमाल बांधून घेतल्यावर हा काढा कारण कॅाइलच्या वर खाली अॅस्बेसटॅास आणि माइका ( अभ्रक , हे काचेसारखे पारदर्शक पण कुरकुरीत असते )वापरलेले असते त्याचे कण उडतात.
* कॅाइल काढताना निरीक्षण करा - मागच्या पितळी पट्ट्या आणि कॅाइलचा इस्त्रीच्या लोखंडाशी संपर्क होऊ नये म्हणून अभ्रकाचे,अॅस्बेसटॅासचे तुकडे कसे बसवले आहेत.
*खालची कॅाइल जिथे जळली असेल तिथे अभ्रकही जळून भोक पडलेले दिसेल. कॅाइल काढून घ्या आणि पॅकिंगचे चांगले अभ्रक बाजूला ठेवा.
*ही कॅाइल दुकानात दाखवून नवीन कॅाइल आणा. आजकाल हे सामान विकणारी दुकाने कमी झाली आहेत आणि दुसय्रा रिपेरिंगच्या दुकानात कुठे मिळते ते सांगायची टाळाटाळ करतात हा अनुभव आहे.
* इस्त्रीचा तळाचा भाग ज्यावर कॅाइल ठेवतो तो आणि वरच्या लोखंडाचा खालचा टेकणारा भाग अगदी सपाट आणि उंचवटे असलेला /गंजलेला असता कामा नये.
* आणलेली कॅाईल चालू आहे का हे कंटिन्युअटी टेस्ट लँप वापरून बघा अथवा फिटिंग केल्यावर संशय नको. दुकानात टेस्ट करून देत नसतील अगोदरच तर आता टेस्टींग केलेली परत घेतील का हे विचारून ठेवणे . आहे तशीच परत दिली तर बदलून देतील. पंधरावीस रुपयांचा प्रश्न नसून आपली फिटिंगची खटपट वाया जायला नको हा हेतू.
*कॅाइलच्या दोन्ही बाजूंस अभ्रक असते यातून पारदर्शक असल्याने उष्णता जाते पण करंट जात नाही. ती ठेवून कुठे गरज पडेल तिथे अभ्रकाचा तुकडा ठेवा. मागच्या कनेक्टर पट्ट्या वाकवून त्यांची भोके वरच्या झाकणातल्या पिनांच्या खाली आलेल्या बोल्टमध्ये बसवून नट्स लावा. झाकण एका हाताने धरावे लागेल, दुसय्रा हाताने लोखंडी ballast हलकेच ठेवा. पाडू नये अथवा ठेवल्यावर घासू नये/सरकवू नये. खालचे अभ्रक घसटू नये.
* झाकण टेकवण्या अगोदर पट्ट्यांच्या मागे अभ्रक/अॅसबेस्टसचा एक तुकडा असा सरकवा की पट्ट्या मागच्या पत्र्याला टेकणार नाहीत. आता वरचे मुठ/हँडल नट्स लावून घट्ट करा.

*//*आता महत्त्वाचा भाग म्हणजे केलेले काम चोख झाले का पाहाणे.--
* कंटिन्युअटी टेस्ट लँप चालू करून प्रथम इस्त्रीच्या दोन पिनांना टेकवल्यास दिवा पेटला पाहिजे. = कॅान्टॅक्टस बरोबर झाले आहेत.
**एका पिनेस आणि बाहेरच्या कोणत्याही भागास टेकवल्यास दिवा पेटता कामा नये. दुसय्रा पिनेसही पाहा. न पेटण्याची कसोटी तितकीशी पक्की नसते त्यामुळे दोनचारवेळा करा. = वायर आतमध्ये इस्त्रीला स्पर्श करत नाही.
** आता वायरचा अडॅप्टर इस्त्रीला जोडून प्लग बाजूला ठेवा. प्लगमधली एक पिन आणि इस्त्रीचा बाहेरचा भाग यात दिवा पेटायला नको. =बय्राचदा एखादी तार, तुकडा मागच्या केसिंगमध्ये पडलेला असेल तर संपर्क तयार होतो. केसिंगच्या आतमध्ये स्वच्छ करा.
** प्लगची अर्थिंगची मोठी पिन आणि इस्त्रीचे लोखंडी तळ,हँडल वगैरेत दिवा पेटला पाहिजे. = इस्त्री चांगली बरोबर अर्थिंगला जोडली गेली आहे. दिवा लागत नसेल तर अडॅप्टरच्या बाहेर काढलेली अर्थिंगची टेन्शन पट्टी आतल्या केसिंगला स्पर्श करत नसेल ती वाकवून पुन्हा पाहा.*//*

आता जिथे इस्त्रीचा प्लग लावणार त्या सॅाकेटातली अर्थिंग खरोखर चांगली आहे का हे पाहण्यासाठी साधा टेस्ट लँप वापरा.-
सॅाकेटचा स्विच चालू करून टेस्ट लँपचे एक टोक अर्थिंगच्या भोकामध्ये ठेवून ( वरचे मोठे ) दुसय्रा टोकाने उजवीकडच्या लाइव वायरसाठीच्या भोकात किंचित् टेकवल्यावर दिवा पेटला पाहिजे. तिथे न पेटता डावीकडच्या न्यूट्रलच्या भोकात पेटल्यास आतल्या बाजूस वायर्स उलट लावलेल्या आहेत त्या फिरवा.*//*

आता इस्त्री तापवून पाहण्यासाठी तयार झाली. प्रथम दोनचारमिनिटे,पाच मिनिटे तापवा. कधीकधी रेझिन जळल्याचा वास येतो तो नंतर जातो. दोनचारवेळा तापवून थंड केल्यावर प्रत्यक्ष तळालाच हाताच्या बोटांनी स्पर्श करून शॅाक लागत नाही याची खात्री केली की काम पूर्ण झाले.

विषय सूचीकडे परत जा

___________________________________________

//सुरुवात म्हणून हे थोडेसे लिखाण केले आहे. फोटो देईनच. थोडीफार समज वाढावी ही इच्छा ठेवली आहे.
सुचनांचं स्वागत

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

28 Sep 2016 - 10:41 am | नितिन थत्ते

उत्तम...

>>वीज वाचविण्यासाठी काय उपाय करावेत

मुळात वीज वापरून* उष्णता निर्माण करणे टाळावे. परंतु इस्त्री, ओव्हन हे सोयीच्या दृष्टीने फार उत्तम असतात त्यामुळे ते टाळण्यासारखे नसतात.
आंघोळीचे पाणी गॅस गीझरने तापवावे.
इलेक्ट्रिक हॉट प्लेट वापरण्याऐवजी इंडक्शन कुकटॉप वापरावे. हॉटप्लेटमध्ये आधी हॉटप्लेट गरम होते, मग पातेले आणि मग आतला पदार्थ. इंडक्शन कुकटॉपमध्ये पदार्थ तापतो.
तसेच मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये होते. याउलट कन्व्हेक्शन ओव्हनमध्ये आख्खा ओव्हन तापतो मग आतले पदार्थ. (परंतु केक ब्रेड बनवायला कन्व्हेक्टिव्ह ओव्हनच वापरावा लागतो.

बाकी फिलॅमेंट बल्ब ऐवजी ट्रूबलाइट किंवा एलईडी बल्ब वापरावे. नको असलेले दिवे पंखे बंद करावे वगैरे नेहमीचे यशस्वी उपाय आहेतच.

पंखे ब्रँडेड वापरावे. बर्‍याच स्वस्त सीलिंग पंख्यांची ब्लेडस पातळ पत्र्याची बनवलेली असतात. त्यांना स्ट्रेंग्थ यावी म्हणून त्यावर रिब मारलेल्या असतात. त्या रिब मुळे एरोडायनॅमिक्सची ***** एक झालेली असते.

एसी २७ डिग्रीवरच चालवावा. २०-२२ डिग्रीवर चालवून ब्लँकेट/रजई घेऊन झोपण्यासारखा मूर्खपणा दुसरा नाही.

नितिन थत्ते's picture

28 Sep 2016 - 10:44 am | नितिन थत्ते

वरच्या प्रतिसादात "मुळात वीज वापरून* उष्णता निर्माण करणे टाळावे." ता वाक्याविषयी.

भारतात बहुतांश वीज औष्मिक वीज केंद्रात बनते. म्हणून जी वीज उष्णतेपासून निर्माण केली ती वापरून पुन्हा उष्णता निर्माण करू नये.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2016 - 6:43 pm | मार्मिक गोडसे

म्हणून जी वीज उष्णतेपासून निर्माण केली ती वापरून पुन्हा उष्णता निर्माण करू नये.

विजेवर चालणारी सगळीच उपकरणे थोडीफार का होईना उष्णता निर्माण करतातच.

अनुप ढेरे's picture

28 Sep 2016 - 12:00 pm | अनुप ढेरे

आंघोळीचे पाणी गॅस गीझरने तापवावे.

सरकारी सिलिंडर गॅस गिझरसाठी वापरायला बंदी आहे ना? यासाठी म तो कमर्शिअलवाला सिलिंडर घ्यावा लागेल.

संजय पाटिल's picture

28 Sep 2016 - 12:16 pm | संजय पाटिल

सरकारी सिलिंडर गॅस गिझरसाठी वापरायला बंदी आहे ना?>>>
नाहि. फक्त हॉटेल, लॉजेस या ठिकाणी वापरू शकत नाहि.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2016 - 6:37 pm | मार्मिक गोडसे

नाही, उलट सरकारी गॅसवितरकाकडून गॅसगिझर घेतल्यास फिटिंगही करून देतात.

तेजस आठवले's picture

29 Sep 2016 - 4:19 pm | तेजस आठवले

चांगला विषय. काही झाले कि इलेक्ट्रिशियनला बोलावणे आणि सांगेल तेवढे पैसे देणे हेच आम्ही करतो.:(
ह्या लेखाद्वारे माहिती मिळेल. धन्यवाद. ते फिशटॅन्क आणि टीव्ही केबिनेट चे काय कळले नाही.

गॅस सिलिंडरल-गिजरमध्ये एक बर्नर जोडलेला असतो व त्याच्या बटणालाच एक लाइटर असतो.परदेशात मिळणा्रा कुकिंग रेंजच्या बटणातही लाइटर असतोच परंतू तो गॅस पेटलाय हे कुकिंग रेंजमध्ये दिसते तसं गॅसगिजरची खात्री देता आली पाहिजे अथवा पेटलाच नाही तर आपोआप गॅस बंद झाला पाहिजे.
विज वाचवण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतील त्यावर मत न देता उपकरणांतील दोषांमुळे वीज विनाकारण अधिक खर्च होते का हे पहावे.दुसरे असे की हाइ वॅाटिजची उकरणे मोठा फरक पाडतात.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2016 - 6:33 pm | मार्मिक गोडसे

परंतू तो गॅस पेटलाय हे कुकिंग रेंजमध्ये दिसते तसं गॅसगिजरची खात्री देता आली पाहिजे अथवा पेटलाच नाही तर आपोआप गॅस बंद झाला पाहिजे.

उच्च दर्जाच्या गॅस गिझरमध्ये ह्या सगळ्या सुविधा असतात. गॅस गळती झाली तर सेन्सर गिझर बंद करतो. गॅस पेटला हे दिसण्यासाठी जाळीदार खिडकी असते. ऑटो स्टार्ट साठी पाण्याची टाकी गिझरपासून कमीतकमी ६ फूट वरती असावी.

एसी रुमचं इन्सुलेशन नसणे,फ्रिजच्या मागच्या बाजुला गॅस रेडिएटर असतो त्याला पुरेशी हवा न लागणे अशा गोष्टींनीही वीज फार वापरली जाते.

नितिन थत्ते's picture

28 Sep 2016 - 1:54 pm | नितिन थत्ते

+१

शिवाय फ्रीज वारंवार उघडणे, तो बराच काळ चुकून उघडा राहणे, एसी असलेल्या खोलीचा दरवाजा/खिडकी उघडे राहणे या कारणांनीही वीज जास्त जाते.

चतुरंग's picture

29 Sep 2016 - 12:16 pm | चतुरंग

फ्रीज खचाखच भरुन ठेवण्यानेही भरपूर वीज जळते. फ्रीजचे सगळे कप्पे हे कमितकमी भरलेले ठेवावेत.
काही दिव्य लोक फ्रिजमध्ये, कूकरसह भात, शिजवायच्या भांड्यापातेल्यासहित भाज्या असे सारून देतात मग काय मीटर फिरतंय गरागरा, मज्जाचमज्जा! ;)

अमृत's picture

29 Sep 2016 - 12:03 pm | अमृत

बाजारात पंख्याच्या रेगुलेटरचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत उदा १ ते ४ गती पर्याय असलेला, १ ते ६ व त्यापूढे गती पर्याय असलेला. तरी यातील चांगला कोणता? सध्या घरी रोमाचा १ते४ चा रेगुलेटर आहे पण १ व २ वर हवा अगदी नगण्य असते,३ वर थोडीशी वाढते पण ४ वर अगदी नकोशी होइल इतकी हवा येते तरी हे रेगुलेटर बदलण्याचा विचार आहे.

नितिन थत्ते's picture

29 Sep 2016 - 12:29 pm | नितिन थत्ते

कंटिन्युअस रोटेशन असलेला रेग्युलेटर वापरा....

सस्नेह's picture

29 Sep 2016 - 12:19 pm | सस्नेह

मस्त धागा !

हेमंत लाटकर's picture

29 Sep 2016 - 5:54 pm | हेमंत लाटकर

पाश्चिमात्य देशात शाळेत सुतारकाम, इलेक्ट्रिकल कामे करण्याचे शिकवले जाते. सर्वाकडे टुलकीट असते. सर्व छोटी कामे घरीच केली जातात.

काही प्रश्न
१)आपण कोणतेही टु पिनची वायर कधी सुलटी कधी उलटी लावतो. लावतो. सध्या शकत्यो सर्व थ्री पिन चेच साॅकेट वायर असतात ते नेहमी बरोबर लावतो. टु पिनचे उदा. मोबाईल चार्जर चे वायर उलटे सुलटे लावले जाते काय फरक पडतो.
२)फॅनचे रेग्युलेटर साधे वापरावे का इलेक्टाॅनिक वापरावे.
३)काॅरपरेशनच्या नळाला पाणी आल्यावर मोटरने पाणी वरच्या टाकीत चढवल्यावर वीच जास्त लागत का टाकीत भरलेले पाणी वरच्या टाकीत भरल्यावर वीज जास्त कमीलागते.

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 5:55 pm | टवाळ कार्टा

पाश्चिमात्य देशात शाळेत सुतारकाम, इलेक्ट्रिकल कामे करण्याचे शिकवले जाते.

याला काही विदा?

चौकटराजा's picture

29 Sep 2016 - 7:31 pm | चौकटराजा

मी शाळेत कापड विणायला शिकलो आहे. शेतीत मेथी ची भाजी पिकवून ती पाटीत घालून गावात घरोघर विकली आहे. काही शाळात सुतारकामाचे शिक्षण आपल्याकडेही दिले जात असे. आताचे चित्र असे आहे की प्रोजेक्ट करून घ्यायचे त्यातील ७५ टकक्के भाग पालकानी व २५ टक्केच भाग विद्यार्थ्याने करायचा. अर्थात शिकण्याची आवड हा एक नैसर्गिक गुण आहे. रविंद्रनाथ टागोर हे साठी झाल्यावर चित्रकला शिकले. ज्याना शिकायचे आहे ते आंतरजालाचा सुरेख उपयोग करून घेतात ज्याना शिकायचे नाही ते सलमानच्या चित्रपटाचे विडीओ पहात बसतात.

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 7:49 pm | टवाळ कार्टा

ओ काका "पाश्चिमात्य देशात शाळेत सुतारकाम, इलेक्ट्रिकल कामे करण्याचे शिकवले जाते." असे आहे ते म्हणून विचारलेले

चौकटराजा's picture

29 Sep 2016 - 8:58 pm | चौकटराजा

म्हण्जी भौतेक तिअक्डबी शिकवीत अस्त्याल की ! न्हाईतरी तेंचीच कॉप्यी शिक्क्षन पद्धतीत करतो ना ?

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 1:25 pm | टवाळ कार्टा

मग तो अंदाज झाला ना?

एक अगदीच बेसिक शंका आहे.हल्ली बरेचसे थ्री पिन प्लगचे साॅकेट येतात त्यातून आत एक पातळ प्लॅस्टिक पडदा असतो.कधीकधी त्यातून आपले उपकरण वापरून प्लग काढला की ते असे काही बंद होते की काही धारदार वस्तू वापरून तो पडदा बाजूला करुन प्लग बसवावा लागतो. हे काम डेंजरस आहे.अजून कोणाला होतो का हा त्रास?काय करावं?
तसेच घराच्या बाहेरच्या बाजूला एक प्लग साॅकेट आहे तिच्यावरचे कव्हर पडून गेल्या गेल्या आत पांढरे कोणत्याशा कीटकाने घर केले आहे.ते साफ करुन वापरावे की नाही?
कृपया शंकाना आणि अक्षराला हसू नये.मला खरंच हे प्रश्न पडलेत!

चौकटराजा's picture

29 Sep 2016 - 7:34 pm | चौकटराजा

हे प्रकरण कशासाठी आहे याचा मला देखील पत्ता नाही. आमचा नव्या घरात अशी बटनेही आहेत की ती चालू अहेत की बंद हेच कळत नाही. आपण सांगितलेल्या डिझाईन मधे नेहमी तो पडदा बाजूला करण्यासाठी कसरत करावी लागते. व त्यासाठी शॉक न बसेल अशी काडी सतत शोधावी लागते.

उपयोजक's picture

30 Sep 2016 - 5:52 pm | उपयोजक

अहो ती भिकार सोय नाही.त्याला सेफ्टी शटर म्हणतात.घरात लहान मुले असतील तर ती आगावू कुतुहलापोटी त्याच्याशी काहीतरी छेडछाड करण्याची शक्यता असते.एखाद्या लहान मुलाने त्या सॉकेटमध्ये काही धातूची वस्तू घालून स्वीच चालू करुन अपघात ,इजा होऊ नये म्हणून ती सोय आहे.
लहान मुलांना ती सहजी उघडता येऊ नये यासाठी हे केलेलं असतं.

ज्या अर्थी तुम्हालाधारदार वस्तू वापरून तो पडदा बाजूला करुन प्लग बसवावा लागतो त्या अर्थी तुम्ही योग्य ३ पिन प्ल्ग
वापरत नसाव्यात, मुळात हेच चुकीचे आहे अर्थींग शिवाय इस्त्री,तत्सम उपकरणे वापरणे डेंजरस आहे. ३ पिन प्ल्ग वापरत
असल्यास पडदा मधे येण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही सुरक्षा नियमांना बायपास करत आहात.

गडगडाट होत असताना सर्व प्लग काढले होते.त्यानंतर तो पडदा वर गेला.यात सुरक्षा नियम बायपास कसा झाला?३पिन प्लगच आहे उपकरणाला.

मला २ पिन प्लग वापरत असाल तर सुरक्षा नियम बायपास होतो अस म्हणायच आहे बरेच लोक अस करतात. ( मी ही करतो) टेस्टर अर्थिंग च्या पिन मधे घालुन पड्दा उघडायचा आणि २ पिन टाकायची.
३ पिन प्ल्ग असेल तर असल काही करायची गरज नसते. फेल सेफ मेकेनिसम आहे ते.

अकिलिज's picture

30 Sep 2016 - 6:27 pm | अकिलिज

मुळातच आजकाल भारतात स्वस्तात मिळणारे प्लगसारखे सगळेच भाग हे निकृष्ट दर्जाचे आहेत.
त्यामुळे हे धारदार वस्तू वगैरे वापराव्या लागतात. युरोपात तर प्लगला बटन वेगळे दिलेलेच नसते. सॉकेटमध्ये प्लग खूपसून उपकरण चालू. तिथेही पडदा आहे. सगळे सुरळीत चालते. युरोपातही चायनीज एल् ई डी माळा मिळतात. त्यांची वायर भारतात मिळणार्‍या माळेपेक्षा बरीच जाड आहे.
वीजेच्या वायरी प्लग वगैरेंच्या दर्जा साठी भारतात काही किमान मर्यादा आहे कां? आमच्या जून्या घरात गणपतीत थ्री पिनचे प्लग बर्‍याच वायरी जोडल्यावर वितळलेले लहानपणी पाहिले आहेत.

युरोपमध्ये प्लग खटका पद्धतीने लागत/निघत असतील त्यामुळे बटण देण्याची आवश्यकता नसेल. व्होल्टेजही २३० नसून ११० आहे का? विद्युत संपर्क दोन तारांमध्ये करायचा असतो अथवा तोडायचा असतो तो अति जलद व्हावा लागतो ते साध्य केले जाणारी कोणतीही पद्धत चालते. इकडे ते काम बटणाने होते.ISIमार्क असलेले स्विच वगैरे 'पास' केलेले असतात पण ते महागडे असतात ते गरीब जनता घेत नाही.

कंजूस's picture

30 Sep 2016 - 8:50 pm | कंजूस

>>वीजेच्या वायरी प्लग वगैरेंच्या दर्जा साठी भारतात काही किमान मर्यादा आहे कां? आमच्या जून्या घरात गणपतीत थ्री पिनचे प्लग बर्याच वायरी जोडल्यावर वितळलेले लहानपणी पाहिले आहेत.>>

हातात वायर घेतली की वायरमन !!!दिलेली माळ कोणत्या प्रकारे बल्ब जोडणीची आहे हे न कळता माळेला माळ जोडणे ,फेरफार करणे ( वरती आम्ही असंच करतो )यामुळे तारा वितळतात.

हेमंत लाटकर's picture

29 Sep 2016 - 8:36 pm | हेमंत लाटकर

मी ६-७ वीत असताना आठवड्यात एकदा एक तास असायचा त्यात सुतारकाम, लोखंडकाम शिकवायचे नक्की आठवत नाही पण कुणी जास्त सिरीयसली घेत नसत. आताही शाळेत प्रोजेक्ट असतो पण गुगलवरून माहिती काढून लिहून घेऊन प्रोजेक्ट केला जातात.

पंख्याच्या रेगुलेटर, पाणी पंप, टु पिन प्लग,थ्री पिन प्लगचे साॅकेट येतात पातळ प्लॅस्टिक पडदावाले
हे प्रश्न कळले लिहितो नंतर.

अमितदादा's picture

29 Sep 2016 - 10:42 pm | अमितदादा

उत्तम माहिती. वीज बचतीचे सोपे उपाय तसेच वीज गळती/अपव्ययाची कारणे/मार्ग हि सांगावेत. अर्थात वरील काही प्रतिसादात याचा उल्लेख झालाय. पण सगळ्याचं एक संकलन होऊन वाचाय मिळावं हि इच्छा.

नवीन प्रश्नोत्तरे लेखाच्या आतच "सामान्य प्रश्नांत जोडली आहेत. इतरांना प्रतिसादांत शोधायला नको.
>>>वीज बचतीचे सोपे उपाय तसेच वीज गळती/अपव्ययाची कारणे/मार्ग हि सांगावेत.>>
नक्कीच. एकत्र करून लेखात देतो.

राजेंद्र देवी's picture

30 Sep 2016 - 1:22 pm | राजेंद्र देवी

एखाद्या उपकराणामधुन विजप्रवाह वाह्तो आहे हे ते टेस्टर शिवाय कसे चेक करावे... तसेच बर्याच वायर्मन कदे तो दोन बल्ब जोडलेले असुन त्याने ते चेक करतात ते काय असतए ?

कंजूस's picture

30 Sep 2016 - 8:35 pm | कंजूस

हे आपण नंतर घेणार आहोत.

धन्यवाद कंकाका.उत्तर वाचले.