एका दगडूची प्राजू

भरत्_पलुसकर's picture
भरत्_पलुसकर in जनातलं, मनातलं
19 Mar 2016 - 4:17 pm

ही गोष्ट आहे दगडूची आणि प्राजूची. तुमच्या आजुबाजुला अनेक सापडतील असे. एकतर्फे प्रेमातून इतक्या भयानक घटना घडतात की आईवडील नाईलाजाने कठोर पावले उचलतात. पण सरसकट सगळेच किशोर सारखे नसतात. ही नाण्याची दूसरी बाजू मांडायचा प्रयत्न. थोडीशी काल्पनिक आणि बरीचशी खरी. काही उणीव राहून गेली असल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतीलच.

एका

का कोण जाणे आज असं काहीतरी मनातलं सांगाव वाटतंय. खोल खोल रुतलेल. खूप इच्छा असूनही कधी बाहेर न पडल्यान खदखदनार. मुलींच एक बरं असतं, घळाघळा रडून मन मोकळ करतात. मुलांचा जाम लोचा असतो. रडावं तर मित्र म्हणतात काय रडुबाइ आहे आणि न रडावं तर मुली म्हणतात कसं दगडांच मन असतं मुलांच! भावना म्हणजे काही फक्त मुलीच नाव नसतं! फीलिंग्स फीलिंग्स!

तर हे सगळं काही काही कळत नव्हत तेव्हाची गोष्ट. निवांत जगत होतो. सगळे होतात तसे दहावी पास झालो! काय नशीब! मला तर वाटलं वडील हत्तीवरून साखर वाटतात की काय आनंदाच्या भरात. टिपीकल मध्यमवर्गीय कुटुंब. रात्रीचा दिवस करून कष्ट करणारे वडील. काटकसर करून संसार करणारी आई. मोठ्या दोन बहिणी. एकीच लग्न झालेलं. एकीच बघायच चाललेल वगैरे सगळे हुकमी पत्ते वाट्याला आलेले. असंच चालू होत आयुष्य. त्यात वेगळ काही होण्याची आशा नव्हती. पण कसं असतं ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तसंच झालं. दहावीला कसातरी करून पास झालो आणि मग आयुष्यच बदललं.

कॉलेज! जूनियर का असेना पण कॉलेजला गेलो. पास होणे याहून जास्त अपेक्षा कुणाच्याचं नसल्यान बरं चाललं होत तसं. मोठ मित्र मंडळ जमा झालं होत. शाळा सुटून कॉलेजला गेल्यावर सगळ्याच मुलांना आपण काहीतरी वेगळे आहे असं वाटतं असतं. मुलीतर शाळेतही होत्याच वर्गात पण आता अचानक ज्याच्या जास्त मैत्रिणी तो हॉट वगैरे समज. त्यात तेव्हा मी दिसायचो सावळेलासा. उंच सड्सडीत. कॉलेजचा अजय देवगण. आपल्याला काय फरक पडत नव्हता काही का म्हणा ना.

मग एक दिवस ती दिसली. ती दिसली म्हणजे तशी रोजच दिसायची पण त्या दिवशी अशी दिसली की आजपर्यंत विसरलो नाहीये. ती होती स्कॉलर. रोज तिच्या दोन मैत्रिणीबरोबर असायची. मैत्रिणी कसल्या बॉडीगार्डचं त्या. सायकलवरून यायच्या. तिची मधे आणि बाजूला बॉडीगार्ड. टिपीकल स्कॉलर. चष्मा वगैरे. दिसायला फार काही आउट ऑफ द वर्ल्ड वगैरे नाहीच. एकदम आपल्यातलीचं वाटावी अशी. तर एकदा आम्ही असेच बसलो होतो ग्राउन्डवर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत. आणि स्कॉलर आली सायकलवरून. सगळ्या माना वळल्या. थोडी पुढं गेली न गेली तो ओढणीचं अडकली तिची चेनमधे. जरा मानेला हिसका बसला तशी लटपटली सायकल आणि स्कॉलर पडली. आता तेव्हा आमचा मेंदू गुड्घ्यात त्यामुळं मदत बिदत करायला जायच्या ऐवजी बसलो दात काढत. आणि तिनी पाहिलं. कसं पाहिलं त्याचं वर्णन नाही करता येत. त्या दिवशी पहिल्यांदा चश्म्यामागचे तिचे मोठे मोठे डोळे दिसले. दोन वेण्या घातल्या होत्या. मातोन्डकरांची उर्मिला घालायची तशा. त्यातन एक बट चुकारपणा करून बाहेर आलेली. पडल्यावर ओढणी काढायची खटपट करताना खालचा ओठ वरच्या ओठाने हलके दाबलेला. मग सगळ्यांसमोर पडलो याची जाणीव होऊन एकच थेंब हलकेच गालावर ओघळलेला. त्याला तेवढ्याच निग्रह करून पुसून टाकलेला. जणू मनात म्हणत असावी काय बिशाद तुझी माझ्या परवानगीशिवाय बाहेर यायची. बास! खेळ खल्लास. चित्र काढता येत असतं तर ते तसंच तिचं चित्र काढून तिला दिलं असत आणि म्हणालो असतो बाई ग तु पड़ते ते पड़ते पण लागतं आम्हाला ना. कशाला अत्याचार करते एवढे. पण तेवढी कला हातात असती तर ! जाऊं दया. तर सांगायचा मुद्दा हा कि आज इतक्या वर्षांनी तिची आठवण आली की समोर फोटो दिसावा तस तिचं हेच रूप दिसत समोर. तर तेव्हाच्या त्या किशोर वयात आमच्या ह्रुदयाचं काय झालं असेल विचार करा. मग ती आवडायलाच लागली ना. तीच असणं तिचं हसणं. तिचं मोत्यासारखं अक्षर. तिचे कुरले कुरले केस. त्यांची एकच बट कायम कानावर रूळनारी. मग कधी शंका विचारताना ती बट आधी कानावरून मागे सारायची सवय. हुशार पण गर्विश्ट नाही.अगदी कंटाळा येईपर्यंत एखादी गोष्ट समजून सांगायची. वर्गात जोक झाला की खळखळून हसायची. तिच्या ग्रुपमधे शिक्षकांची नक्कल करून दाखवायची. तिच्यासाठी मी माझा बेंच बदलला. ती असायची पुढे. मग मी पण पुढे बसू लागलो. पहिला बेंच अगदीच ऑब्वियस झालं असतं म्हणून दुसऱ्या बेंचवर बसू लागलो. तर ते आमच्या मॅथसच्या सरांनी पकडलचं. एवढ सगळं होईपर्यंत मित्रांना काही कळलं नाही तर ते मित्र कसले. आता ती वर्गात आली की उगाच मला मोठ्याने हाका मारणे वगैरे उद्योग सुरू झाले होते. तरी सांगितलं साल्याना. पण ऐकतो कोण. तिच्या हळूहळू लक्षात यायला लागलं होतं. तिच्याकडे चोरून बघताना तिनी पकडल एक दोन वेळा. मग मी नुसताच वहीची पान चाळायचो. एकदा गम्मतच केली तिनी. मी आपला नेहमीसारखा बसलो होतो पुढच्या बेंचवर. ती आली पण तिच्या नेहमीच्या जागी बसलीचं नाही. मी आपला तिला काही वाटायला नको म्हणून खाली बघत जर्नल पूर्ण करत होतो. सगळे साले मित्रपण ही काय करते बघू म्हणून शांत बसले. तर या मॅडम जाऊन बसल्या मागे. माझा ग्रुप बसायचा तिथं.लेक्चर सुरू झाल्यावर मी आपलं नेहमीच्या सवयीन बघितलं तिच्या जागेकड. तर दुसरीच मुलगी. च्यायला म्हणलं आता भास पण व्हायला लागले काय. आलेली तर दिसली होती. गेली कुठं? मी आपला कावरा बावरा होऊन शोधतोय तिला. तर मागं मित्रांची खसखस ऐकू आली. सहज मागे पाहिलं तर मॅडम खुदुखुदु हसत माझ्याकडेचं बघत होत्या. सगळ्या मित्रांना असं धुतल त्यादिवशी. आता एवढ सगळं झाल्यावर असं वाटलं आता गाडी रूळावर आली एकदाची. पन ती स्कॉलर सिंसियर. एक दिवस लॅबच्या बाहेर बसलो होतो जर्नल लिहीत तर आली ना सरळ म्हणाली जरा अभ्यासात लक्ष दिलं तर असं कधीही कुठेही बसून जर्नल नाही लिहावं लागणार. आपण आउट. बाद! विकेट पडली!
जिच्याशी बोलायची मी नुसती स्वप्नं रंगवायचो ती येऊन बोलून गेली स्वतः! आणि मी शुम्भ बघत बसलो. काय ध्यान आहे म्हणाली असेल.

मग जरा धीर आला. आता मी पण काहीतरी अभ्यासाच विचारायचं म्हणून बोलू लागलो. त्याच वर्षी मधल्या बहिणीच लग्न ठरलं. मग तिला बोलवायचं लग्नाला म्हणून सगळ्या क्लासला दिली पत्रिका. मॅथ्स च्या खडुस सरांसकट. येती का नाही शंका होती पण आली. मला वाटतं पहिल्यांदा कॉलेज बंक करून ही कुठेतरी गेली असेल. असलं भारी वाटलं. ती लग्नालापण येताना तशीच आलेली अगदी साधीसुधी. मी कसंतरी सावरायचो आणि ही परत परत पाडायची प्रेमात. मग ताईचं लग्न झाल्यावर पुन्हा बुडालेल्या अभ्यासाच निमित्त झालं तिच्याशी बोलायला. एक दिवस धीर करून विचारल, कॉलेज सुटल्यावर थांबशील का जरा बोलायचय. नाही म्हणाली चक्क! माझा क्लास असतो लगेच! देवा म्हणलं आयुष्यात प्रेमात पडायला स्कॉलरचं द्यायची होती का! मग क्लास संपल्यावर? तिला विचारलं. नाहीच म्हणाली. आणि ते पण एकदम सहज. शांत. झाल म्हणलं संपलं.

पण तरी कुठंतरी धुगधुगी होती. तिलापण आवडतं असणार आपण पण असणार तिची काही मजबुरी. मग एक दिवस पत्र लिहल. वाईट वाईट सवय लिहायची. ते तिला दिलं. तिनं विचार करते म्हणाली. आता अभ्यास आहे खुप म्हणाली. तू पण अभ्यास कर. आपण तर म्हणजे एकदम जे भिड्लो पीसीएमला की बासचं. मग सगळ्या गोष्टीत असतो तसा विलन आला. पत्र सापडलं तिच्या बहिणीला. तिनी सांगितलं असलं काही नाहीये. ती नाही म्हणणार आहे मला. फक्त परीक्षा होईपर्यंत थांबणार आहे. माझ्या अभ्यासावर परिणाम नको म्हणून आता नाही सांगत. पण नाही ऐकल बहिणीन. दिल पत्र थेट आई
वडीलांकडे. मग काय असल्या गोष्टीत सबूरी वगैरे गोष्टी कळत असत्या तर काय? त्या एवढ्या निरागस निष्पाप मुलीवर हात उचलला. आयुष्यात जिला कधी बोट लावायची गरज पडली नसेल अशा मुलीला मारलं सरळ सरळ. लागेपर्यत. ती अक्षरशः लाल होइपर्यंत. काय चूक होती तिची? एका मुलाला समजून घ्यायचा प्रयत्न करण ही चूक होती तिची. चार दिवस आली नाही कॉलेजला. बॉडीगार्डनी सगळ पुराण सांगितल. काय सांगू काय वाटलं त्या दिवशी. अस वाटलं काय गरज होती माझ्या मनाचा एवढा विचार करायची. माझ्या अभ्यासाचा विचार करायची. इतक निःस्वार्थ कुणी असतं का? नंतर आली ते खाली मान घालून. रडून रडून डोळे सूजलेले. तिच्याशी बोलायची पण हिम्मत नाही झाली. त्या दिवशी ठरवलं आपल्यामुळ हिला पुन्हा कधी रडू द्यायच नाही. तिला मारलं कारण ति एका जवळ जवळ वाया गेलेल्या मुलाला संभाळून घेत होती. बस आता नाही वाया जायचं. तिच्यासारखं हुशार नसलो म्हणून काय झालं जिद्द आहे, आता काहीतरी झाल्याशिवाय तिच्यासमोर उभ नाही राहायचं. कुणाला संधी नाही द्यायची म्हणायला हाच सापडला का म्हणून. तिथं जे रस्ते वेगळे झाले ते परत कधीच एकत्र नाही आले. भरपूर मेहनत करून जेवढे पडायचे तेवढे मार्क पडले. ती टॉपर. पुण्याच्याच कॉलेजला मिळालं अड्मिशन. आम्हाला पुणं सोडाव लागलं. ते सोडलं या आशेने की एक दिवस परत येऊ तेव्हा तिला सांगू नकार द्यायचा असला ना तर आता दे ह्या क्षणी. ते उगीच अभ्यास अन वेळ पाहिजे न माझी काळजी नको. मी निस्तरीन. पण तशी वेळच नाही आली. शिक्षण संपलं मग आयुष्याचे धक्के खाऊ लागलो. घरी मुली सांगून येऊ लागल्या. मी टाळू लागलो. तिला शोधत होतो. एक वेडी आशा होती. आम्ही पास आऊट झालो तेव्हा फेसबुकचं फॅड नव्हत. मग कुणाविषयी माहिती मिळण अवघड. बहिणीला कशेबशी तयार केली. तिला म्हणलं एकदा जा तर तिच्या घरी. तिची मैत्रीण आहे सांग. काही करून फक्त एकदा भेट घालून दे. पुढचं माझं मी बघतो. बहीनाबाई गेल्या भावाच्या तोंडाकड बघून. तिच्या सुदैवाने आणि माझ्या दूर्देवाने स्कॉलर घरी नव्हती. विचारल्यावर कळलं स्कॉलर गेली परदेशात. शिक्षण झालं. जॉब झाला मग लग्न. सगळ कसं सुरळीत पार पडलं. तिच्या आईन कौतुकाने लग्नाचा अल्बम दाखवला. बहिणाबाई भरल्या डोळ्यांनी ते बघून आल्या. काकू म्हणाल्या येत जा अधून मधून असा निरोप दिलाय. ती आता परदेशात तर खुप आठवण येते तिची. अशा तिच्या मैत्रिणी येऊन गेल्या की बर वाटतं. काय बोलणार यावर बहिणाबाई. मग घरी आल्यावर सगळ ऐकून मला कळेना मी रडू का माझ्या रड्नार्या बहिणी ची समजूत घालू. तिची समजूत काढायला म्हणलं जाऊ दे आपल्या घरात कुणाला चष्मा नाही ती ऑड मॅन आउट झाली असती. तर आमच्या जखमेवर मीठ चोळत बहिणाबाई म्हणाल्या अरे कसली सुंदर दिसते माहिती आता. काय म्हणणार ती किती सुंदर होती दिसायलाच नाही तर मनाने हे माहिती नसतं तर आजवर दहा गलफ्रेंड झाल्या असत्या. पण साला आपण अडकलो ते अडकलोचं.

आता फेसबुकवर कोण कोण सापडत असतं. सहज शोधल तर सापडली की. एका गोबर्या गोब्र्या पिलूबरोबर प्रोफाइल फोटो लावलेला. आधीची ती स्कॉलर चश्मेबद्दूर लुक कुठल्या कुठं गायब. दोन मिनीट बघतचं बसलो ही नाहीच ती म्हणून. मग फ्रेंड लिस्ट बघितली आणि ओळख पटली. असं वाटलं करूया का फ्रेंड रिक्वेस्ट. पण नाही केली. म्हणलं गेला तो भूतकाळ आता. त्यावेळी किंवा त्यानंतरही कधी तिला आपल्याविषयी वाटलं असलं तरी आता त्या आठवणीची खपली काढून काय मिळणार. खुश दिसतेय. अशीच राहू दे कायम. लॉग आउट केलं.

आता नवी सुरवात करतोय. पण काय माहिती का लॉग आउट करून असं क्लोजर मिळत नाही. म्हणलं लिहून टाकाव. इथे एवढे लोक येतात वाचायला. काहींची मुलं लहान असतील ती ह्या टप्प्यातून जाणार असतील. काहींची यातून जात असतील. आवाहन बिवाहन करायला मी काय कुणी नेता नाही पण एक विनंती आहे प्रेमात पड़ली म्हणून कुठल्या प्राजूला कधी मारू नका. एखादा दगडू ते घाव आयुष्यभर विसरणार नाही आणि ठुसठुस्णार्या जखमेसारखी दगडूची आठवण कधी प्राजूची उशी ओली करणार नाही. वाकड पाऊल पडणार नाही एवढंच सांभाळा फक्त. खर प्रेम खरंच खरं असतं ते आहे की नाही तेवढं समजायला वेळ दया. बाकी उमलायची फुलं ती उमलनारचं. तुम्ही आम्ही थांबवून का ती थांबणारेत?

कथा

प्रतिक्रिया

चिनार's picture

19 Mar 2016 - 4:58 pm | चिनार

छान !!

संजय पाटिल's picture

19 Mar 2016 - 5:01 pm | संजय पाटिल

मस्तच!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2016 - 5:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हं चांगलं लिहिलंय. प्रेमाच्या पार्‍यामधील ही एक पायरी.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

19 Mar 2016 - 5:06 pm | पैसा

छान लिहिलंय!

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 5:07 pm | अभ्या..

भारीच की.
नशीबवान आहात.

नितिन५८८'s picture

19 Mar 2016 - 5:15 pm | नितिन५८८

खूपच छान लिहलंय, खरच प्रेम म्हणजे प्रेम असतंय . . .. .

यशोधरा's picture

19 Mar 2016 - 5:41 pm | यशोधरा

भारी...

बोरकरांची एक कविता आहे, तिची आठवण झाली, लिहू का इथे?

प्राची अश्विनी's picture

19 Mar 2016 - 7:41 pm | प्राची अश्विनी

लिही ना!!

यशोधरा's picture

19 Mar 2016 - 7:51 pm | यशोधरा

तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...

भरत्_पलुसकर's picture

19 Mar 2016 - 8:18 pm | भरत्_पलुसकर

ताई तुम्ही तर मीठाचा डबा ओतला की वो :(

यशोधरा's picture

19 Mar 2016 - 8:30 pm | यशोधरा

:(

भरत्_पलुसकर's picture

20 Mar 2016 - 11:33 am | भरत्_पलुसकर

चिल! ^=^

कंजूस's picture

19 Mar 2016 - 6:10 pm | कंजूस

!!

निशांत_खाडे's picture

19 Mar 2016 - 6:21 pm | निशांत_खाडे

मस्त!

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2016 - 6:29 pm | टवाळ कार्टा

टचिंग :)

प्राची अश्विनी's picture

19 Mar 2016 - 7:31 pm | प्राची अश्विनी

आवडलं.

मस्त. कोणाचीतरी आठवण आली.
यशोधरा ताई कविता पाठवा.

सत्याचे प्रयोग's picture

19 Mar 2016 - 7:48 pm | सत्याचे प्रयोग

लय भारी परत एकदा वाचतो

छान लिहिलय.
यशो, कविता आवडली.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 8:07 pm | मितभाषी

रेवती तै एक नंबर +१

भरत्_पलुसकर's picture

19 Mar 2016 - 8:24 pm | भरत्_पलुसकर

धन्यवाद हो. ते शायरी लिहिता येत असतं तर म्हणलं असतं
आता बराच बरा आहे तसा
तेवढं बरं कशाला म्हणायचं ते कळलं तर बरं होईल.

भरत्_पलुसकर's picture

19 Mar 2016 - 8:24 pm | भरत्_पलुसकर

धन्यवाद हो. ते शायरी लिहिता येत असतं तर म्हणलं असतं
आता बराच बरा आहे तसा
तेवढं बरं कशाला म्हणायचं ते कळलं तर बरं होईल.

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 8:31 pm | सतिश गावडे

सुंदर. छान लिहिलंय. अर्थात लिहिलंय म्हणणं चुकीचं ठरेल. हे आतून आलंय तुमच्या.

परदेशावरून लहानपणीचा एक प्रसंग आठवला. आमचं घर गावातील शेवटचं घर. पुढे मोठं माळरान. माळरानाच्या पलीकडे दुथडी भरलेली काळ नदी. नदीच्या पलीकडे एक मुस्लीमबहूल वस्ती असलेलं गाव. त्या गावात या ना त्या निमित्ताने रात्री कव्वालीचे कार्यक्रम होत असत. लाऊड स्पिकरवरून ते रात्रीच्या निरव शांततेत आमच्या गावात ऐकू येत असत. मी त्या माळावर जावून एक गोणतं टाकून निवांत बसत असे त्या कव्वाली ऐकायला. गार वारा, डोक्यावर आभाळ आणि नदीपलिकडून येणारे कव्वालीचे सुर. अशाच कधीतरी ऐकलेल्या एका कव्वालीच्या ओळी आजही आठवत आहेत,

दिल था देशमें हमारा, जिस्म था परदेशमें
जब तुम्हारी याद आयी, हम शराबी हो गयें

भरत्_पलुसकर's picture

20 Mar 2016 - 11:31 am | भरत्_पलुसकर

माहौल तयार केला तुम्ही तर! ^=^

किसन शिंदे's picture

19 Mar 2016 - 8:46 pm | किसन शिंदे

आह!! छान लिहीलंय. दहा वर्षांपूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेला. :(

यशो, बाकीबाब भारीच!

विवेक ठाकूर's picture

19 Mar 2016 - 10:01 pm | विवेक ठाकूर

एकदम दिल खुष . फार दिवसांनी काही चांगलं ललित वाचायला मिळालं . धन्यवाद !

नावातकायआहे's picture

19 Mar 2016 - 10:05 pm | नावातकायआहे

बाडिस

असलं काही वाचायला फारसं आवडत नाही. दवणीय वाटतं.
तसं हेही आवडलं नाहीच, पण काळीज हलवणारं वाटलं म्हणून!

भरत्_पलुसकर's picture

20 Mar 2016 - 11:34 am | भरत्_पलुसकर

झाल जरा दवनीय खरं. चालायचंचं ^=^

बोका-ए-आझम's picture

19 Mar 2016 - 10:42 pm | बोका-ए-आझम

एक गेली, दुसरी येते. काही फरक पडत नाही. मुळात मुलीच्या मागे लागण्याऐवजी तिचा बाप तुमच्या मागे लागायला हवा - माझ्या मुलीशी लग्न कर. या कथेतल्या भावनेला प्रेम नाही, infatuation म्हणतात. सोडा. गेली खड्ड्यात.
(मुलींनीही मुलांच्या बाबतीत अशाच भावना दाखवाव्यात. Involvement is enslavement आणि No one in your life is worth ending your life over हे लक्षात ठेवावे.)

विवेक ठाकूर's picture

19 Mar 2016 - 11:47 pm | विवेक ठाकूर

संवेदनाक्षमता लागते . प्रतिसादात लिहील्याप्रमाणे रूक्ष आणि कोरडया विचारसरणीला ते कळणं कठीण .

निशांत_खाडे's picture

20 Mar 2016 - 1:18 am | निशांत_खाडे

तिच्यामारी, एक तरी धागा सोडा राव... समदीकड काय मानून वाद घालीत हिंडताय? नसलं पटत तर कानाडोळा करून पुढं व्हायचं. उगा आपलं जिथं नाय तिथं चालूच हाय.. कटाळा आलाय आमास्नी..

क.लो.अ.,
(कटाळून गेलेला) निशांत.

कमाल झाली राव . प्रतिसाद जरा विचार करून द्या .

निशांत_खाडे's picture

21 Mar 2016 - 3:54 pm | निशांत_खाडे

म्हणा की..पण लेखाविषयी तुंम्ही तुमची 'चांगली' प्रतिक्रिया देऊन मोकळे व्हायला पाहिजे. सगळ्यांना ते पटवून देण्याचे कष्ट का घेताय तुम्ही?

रच्याकने, बोकाशेठ सोबतचं भांडण एकदाचं मिटवून टाका बरं, आम्हाला ताप होतो त्याचा.

तिच्यामारी, एक तरी धागा सोडा राव...

आणि या प्रतिसादातही तेच चाललंय.

जे चांगलं आहे त्याला सपोर्ट करायला हवा, नुसती शेपूट घालून उपयोग नाही, तरच चांगल्या गोष्टी टिकतात. इथे प्रोत्साहानाचे प्रतिसाद किती आलेत ते पाहा म्हणजे कळेल. विधायक टिका मान्य आहे पण लेखकाला नाऊमेद करण्यात अर्थ नाही (लेखकाचा प्रतिसाद वाचा). आणि मी सुद्धा काही व्यक्तिगत लिहीलं नाही (तो प्रतिसाद अजून आहेच) पण त्यावर तुम्ही ज्यांची बाजू घेतायं त्यांचा प्रतिसाद काय होता? इथेच नाही तर इतरत्रही इतक्या वारंवार दिलेल्या व्यक्तिगत प्रतिसादांनी आयडी अजून गेला नाही हे नशीब. आणि एकदा दुसर्‍यानं सुरु झाल्यावर गप्प बसणं म्हणजे त्याला मोकाट सोडाण्यासारखं आहे. तस्मात, झेपत असेल तर ज्यांना समजावायचं त्यांना समजवा.

बोका-ए-आझम's picture

24 Mar 2016 - 8:45 am | बोका-ए-आझम

तुम्ही पण कोणाला शहाणपणा शिकवताय? झोपलेल्या माणसाला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.

भरत्_पलुसकर's picture

20 Mar 2016 - 11:29 am | भरत्_पलुसकर

बोकेश मित्राच्या हक्काने तुम्ही हा प्रतिसाद दिलाय अशी स्वतः स्वतःची समजूत काढून घेतो आणि जास्त काही लिहीत नाही. काळजी करू नका मूव ऑन झालोय आता. पण कधी कधी वाटतं आपण लय स्ट्रॉंग आपण विनोदी सगळे मुख्वटे काढून टाकावे. असंच लिहिलं गेलं ते. लाइफ ओवर बीव्र करायचे डोक्यात पण नाही. वडीलानी काय कष्ट करून शिकवलय ते चांगल लक्षात आहे. एवढा पण करन्टा नाही. तुमची कळकळ पोचली. धन्यवाद.

बोका-ए-आझम's picture

20 Mar 2016 - 5:03 pm | बोका-ए-आझम

येस सर! असले प्रसंग आयुष्यात बरेच येतात. त्यामुळे खचून चालत नाही एवढंच सांगायचं होतं. पण आपली भाषा ही अशीच आहे. असो. भावना पोचल्याशी मतलब!

shvinayakruti's picture

20 Mar 2016 - 12:53 am | shvinayakruti

खुपच छान .....

फारएन्ड's picture

20 Mar 2016 - 1:28 am | फारएन्ड

सुंदर लिहीले आहे. जबरी आवडले.

जेपी's picture

20 Mar 2016 - 10:21 am | जेपी

आवडल..

भरत्_पलुसकर's picture

20 Mar 2016 - 11:36 am | भरत्_पलुसकर

सर्वांचे धन्यवाद. ^=^

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Mar 2016 - 11:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दगडु बदलतो. पराजक्ता बदलतात. कधी कधी कायमच्या हरवतात.... पण गोष्टं मात्र तीचं रहाते. शेकड्यात किमान ७०%. :(!!!

उगा काहितरीच's picture

20 Mar 2016 - 11:47 am | उगा काहितरीच

सुंदर लेखन...आवडलं. आपल्याकडील बरीचशी जनता अशा अनुभवातून जातच असते. अस्मादिकही त्यातलेच... ;-)
-(सावरलेला) उका.

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 11:51 am | जव्हेरगंज

ओ पलुसकर, ज्याम भारी लिहीलय तुम्ही!!

आवडलं !!

अर्धवटराव's picture

20 Mar 2016 - 12:20 pm | अर्धवटराव

सुंदर.
अनेक दगडु आणि प्राजुंना आमचा खांदा म्हणजे हक्काची जागा अश्रू ढाळायला. यांची अनेक रुपं अनुभवली आहेत. त्यांना मोकळं करणं, वाहतं करणं हे आमचं जीवाभावाचं काम. त्यावेळी कुठल्याश्या वळणावर थांबलेल्या या कथा कालांतराने जीवनप्रवाहात मग्न झालेल्या दिसतातच... काहि कथा मात्र चटका लावणारी असतात. कितीही प्रयत्न करा, शेवटी नशीब आपलं दान टाकतच असतं. असो.

छान लिहीलय भौ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2016 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनेक दगडु आणि प्राजुंना आमचा खांदा म्हणजे हक्काची जागा अश्रू ढाळायला. यांची अनेक रुपं अनुभवली आहेत. त्यांना मोकळं करणं, वाहतं करणं हे आमचं जीवाभावाचं काम.

१०००%आवडले.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

21 Mar 2016 - 10:01 am | नाखु

श्री श्री अर्धवटराव यांनी आम्ची कुंडली चोरल्याचा आम्हाला सौंशय अहे कारण तेच ग्रह आमचे कुंडलीत तंतोतंत आहेत.

खांदाराव सावरकर नाखु

हेमन्त वाघे's picture

20 Mar 2016 - 1:35 pm | हेमन्त वाघे

दिल की चोटों ने कभी चैन से रहने न दिया
जब चली सर्द हवा मैंने तुझे याद किया
इसका रोना नहीं क्यों तुमने किया दिल बरबाद
इसका ग़म है कि बहुत देर में बरबाद किया

हमको किसके गम ने मारा, ये कहानी फिर सही
किसने तोड़ा दिल हमारा, ये कहानी फिर सही

दिल के लूटने का सबब पूछो न सबके सामने
नाम आएगा तुम्हारा, ये कहानी फिर सही
हमको किसके गम ने...

नफरतों के तीर खा कर, दोस्तों के शहर में
हमने किस किस को पुकारा, ये कहानी फिर सही
हमको किसके गम ने...

क्या बताएं प्यार की बाजी, वफ़ा की राह में
कौन जीता कौन हारा, ये कहानी फिर सही
हमको किसके गम ने...

Lyrics By: मसरूर अनवर
Performed By: गुलाम अली

अजया's picture

20 Mar 2016 - 6:29 pm | अजया

छान लिहिलंय.आवडलं.
यशो कविता अप्रतिम.

मुक्तक आवडले. मनापासून लिहिलय.

नाना स्कॉच's picture

21 Mar 2016 - 11:48 am | नाना स्कॉच

बोका ह्यांच्याशी सहमत! शब्द कड़े आहेत पण सत्य आहेत हे ह्या निमित्ताने नोंदवतो!

तिच्येयला , (क्षमस्व) इथे दगडू अन प्राजु मधला किस्सा आहे, प्राजु किमान एक त्रयस्थ माणसाशी लग्न करून हम्रिकेत सेटल्ड हाय

आमची तर प्राजु आमच्याच मित्र असणाऱ्या एका बालभारती ने आमचाच गेम करून गटवली! चि सौ कां प्राजु ला माफक सुखात ठेवले! हे आम्हांस अधुनमधुन कळत असते सामयिक मित्रमंडळा कडून ! आम्ही तर तेरे नाम मधील राधे मोहन व्हायला हवे त्या हिशेबाने!!

पण असे केले तर प्राजु अन बालभारती जिंकतील! एकीला आपल्याच भावनांवर खंबीर राहता आलेले नाही अन तिच्या नवर्याने म्हणजे आमच्या बालभारतीनेच मित्रद्रोह केला असेही म्हणता येईल पर अपन नही बोलेगा ऐसा! साला मनगट में जोर रखने का!! आपुन बापे लोग ने रोनेका नय मंगताय!!

च्यायला जरा पर्सनल धूणी धुतल्यागत वाटते आहे धाग्यावर पण धागा विषय पाहता स्वातंत्र्य घ्यावे वाटले

भरत्_पलुसकर's picture

21 Mar 2016 - 12:18 pm | भरत्_पलुसकर

अर्र हे तर लयच वंगाळ झालं बगा. झाल माझं रडून. हे बगा पुसले डोळे. ^=^ :)

नीलमोहर's picture

21 Mar 2016 - 11:56 am | नीलमोहर

आवडलं.

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2016 - 12:12 pm | चौथा कोनाडा

किशोरवयीन प्रेमाची मनस्वी शब्दात सांगितलेलीkकहाणी आवडली ! लेखन ओघवते आहे त्यामुळे वाचायला सुरुवाती पासूनच बांधुन ठेवले.

पुभाप्र...... :-))) नाय नाय पुलेप्र !!

मीता's picture

21 Mar 2016 - 12:45 pm | मीता

:(

सुमीत भातखंडे's picture

21 Mar 2016 - 12:45 pm | सुमीत भातखंडे

छान लिहिलय

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2016 - 5:44 pm | मराठी कथालेखक

छान आहे. प्रेमात पडलेली नसतानाही समोरच्या मुलाचा इतका विचार करणारी मुलगी ...क्या बात है.

जगप्रवासी's picture

21 Mar 2016 - 6:15 pm | जगप्रवासी

जुन्या आठवणी जाग्या झाल्या… जाऊ दे, छान लेख

शैलेन्द्र's picture

21 Mar 2016 - 10:20 pm | शैलेन्द्र

सुंदर लिहिलंय, आवडलं वाचायला

ब़जरबट्टू's picture

23 Mar 2016 - 4:51 pm | ब़जरबट्टू

छान लिहिलंय.आवडलं.

सुबोध खरे's picture

25 Mar 2016 - 10:22 am | सुबोध खरे

कुण्या एका दगडू आणि प्रजूची कथा आहे म्हणून इतके दिवस वाचली नव्हती.
छान लिहिले आहे.
आपली पण कोणीतरी अशी एक "असायला हवी होती" असे मात्र फार वर्षापासून वाटून राहिले आहे.
अकरावी बारावी मध्ये आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे तेंव्हा मुलींकडे पाहायला नको म्हणून काही केले नाही पुढे वैद्यकीय महाविद्यालयात अशी कुणी "खास" दिसलीच नाही. आयुष्यात अशी एक "नसलेली" दुखरी नस ठणकत राहिली आहे.
नाही म्हणायला काही मुलीनी "तसा" रस दाखवला होता. परंतु केवळ लोकांना दाखवायला "गर्ल फ्रेंड" असावी असे कधीही वाटले नाही त्यामुळे त्यांच्या भावनांशी कधीहि खेळ केला नाही. हे एक ( कदाचित) समाधान आहे.
असो.
छान आणि प्रामाणिक लेखन आहे.