ग्रोसग्लोकनर होख आल्पनं स्ट्रासं!!!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in विशेष
8 Mar 2016 - 12:16 am
महिला दिन

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

आल्प्समध्ये लपलेल्या सुंदर, अनवट जागा हुडकून तिथे मनसोक्त भटकंती करायला आम्हाला आवडते. नेहमीच्या टूरिस्ट जागा सोडून प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायला आवडतातच पण ह्या अशा भटकंतीत एक वेगळा आनंद असतो. इतक्यांदा ठरवूनही ऑस्ट्रीयन आल्प्समधल्या 'ग्ग्रोसग्लोकनर होख आल्पनं/अल्पाइनं स्ट्रासं' (großglockner hochalpenstraße) वरती जायचा योग काही आला नव्हता. कधी अतिवृष्टी तर कधी हिमवर्षा तर कधी खराब हवा तर कधी वेळेची कमी अशा एक ना दोन.. अनेक कारणांनी हा हाय अल्पाइन रोड आम्हाला हुलकावण्या देत होता. ह्या वेळी मात्र हवामानाचा अभ्यास करून तेथल्या ऑफिसमध्ये चारचारदा खात्री करून घेऊन आम्ही होख अल्पाइन स्ट्रासं जवळच्या एका चिमुकल्या गावातल्या फार्महाउस वर बुकिंग केले. तारांकित हॉटेलं वगळून अशा फेरियन वोहनुंग म्हणजे हॉलिडे होम्स किवा फार्म हाउस वर राहणे म्हणजे स्वतःशी आणि तिथल्या निसर्गाशी संवाद करण्याची हुकमी संधी! तर साल्झबुर्गपासून जवळ असलेल्या फारवेर्फन नावाच्या लहानशा खेड्यातल्या अहोन्न्नेगरांच्या फार्म हाऊसवर आमचे बुकिंग झाले..

.

फ्रांकफुर्ट पासून साधारण ६०० किमी अंतरावर हे गाव असल्याने सहा तासांच्यावर वेळ लागणार हे गृहित धरून सकाळी ब्रेकफास्ट करून दहाच्या सुमाराला बाहेर पडलो. इतकसं चिमुकलं गाव आहे ते की सहा साडेसहालाच सगळं बंद होऊन जातं. हे माहित असल्याने तहानलाडू, भूकलाडू बरोबर घेतले होतेच. मध्ये दोन कॉफी ब्रेक्स घेतले आणि एखादा छानसा स्पॉट दिसला की थोडे रेंगाळत साडे पाचच्या सुमाराला तेथे पोहोचलो. हसतमुख गेर्टा आजी आणि पीटर आजोबांनी आमचे आपुलकीने स्वागत केले. मागच्या उन्हाळ्यात आम्ही येथे आल्याची आठवण काढली. थोड्या गप्पा झाल्या आणि मग पहिल्या मजल्यावरच्या आमच्या खोल्या दाखवल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट हॉलमध्ये ब्रेड, जॅम, अंडी, फळे, म्युसली असा भरपेट नाश्ता करताना ग्रोस ग्लोकनर ला कसे जायचे हे विचारले. तर उत्तर आले, आता सिझन सुरू झाल्यामुळे रस्ता चालू झाला आहे पण तरीही आधी फोन करा तिथे आणि आज रस्ता खुला आहे की नाही ते पहा. आज हवा चांगली आहे म्हणजे काही अडचण येऊ नये. आम्ही तेथल्या ऑफिसला फोन लावला आणि रस्ता खुला आहे हे समजल्यावर लगेचच निघायचे ठरवले. जपून जा रे, गाडी जपून चालवा. आजीआजोबांची प्रेमळ दटावणी सुरू होती.

.

छान, स्वच्छ कोवळ्या उन्हात आम्ही ग्रोसग्लोकनरकडे जाणार्‍या रस्त्याला लागलो. फारवेर्फन पासून साधारण ६०/६५ किमी अंतरावर ही हिमशिखरं आहेत. तिथे पोहोचण्यासाठीचा रस्ताही अटकर वळणे घेत जाणारा, एका बाजूने उंचच उंच आल्प्स तर दुसर्‍या बाजूला दरीतली रानफुले, कुरणे, त्यात चरणारी गाईगुरे, छोटी छोटी घरे अशी दोबाजूंना हिरवाई लेवून स्वागत करणारा आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करतात तो ऑक्टोबर पर्यंत. हिवाळ्यात मात्र पूर्ण बंद ठेवतात. प्रवेशद्वाराशीच दिवसाचा पास (३५ युरो) घेऊन आत जाता येते. अटकर वळणे आता अजून अटकर आणि उंचही होतात.

.

..

दुचाकी, एकचाकी वरून चढाई करणारे स्वार, गड हेंगायला जाणारे वीर आणि गाड्यातून येणारे आपल्यासारखे पर्यट्क.. मेळाच भरलेला असतो. सायकली, मोटरबाइक्स आणि गाड्यांची नुसती जत्रा फुललेली असते शिखराकडे तरीही वाहने शिस्तीत वर जात असतात. मध्ये मध्ये थांबे केलेले आहेत, तेथे थांबून आल्प्सची अनुभूती घेता येते. धुक्यात लपेटून जाता येतं आणि कॅमेरात ती निसर्गाची जादू पकडण्याचा प्रयत्नही करता येतो. खूप कुड्कुडायला झालं तर वाटेतल्या कॉफीशॉप मध्ये वाफाळत्या कॉफीचा आस्वाद सभोवतालचा निसर्ग पाहत घेता येतो.

साधारण तासाभरात आम्ही प्रवेशद्वाराशी पोहोचलो. पास घेऊन वर जायला निघालो तेव्हाही हवेत सुखद गारवा होता, चुकार पांढरे ढग होते पण त्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. काही मीटरच वर गेलो असू, तर उजवीकडे समोर दिसणार्‍या पर्वतरांगा, त्यावर चमकणारे हिम पाहून फोटो साठी एक थांबा घ्यायचा मोह अनावर झाला. आमच्यासारखेच अनेक जणं तेथे गाड्या थांबवून तो नजारा डोळ्यात साठवत आणि कॅमेर्‍यात पकडत होते. फोटो काढत असतानाच समोरच्या डोंगरमाळेवर धुक्याची चादर लपेटली गेली. थोडा वेळ ते निसर्गकौतुक पाहून आम्ही अजून वर जायला निघालो. काही वेळाने परत एक कॉफी ब्रेक घेतला आणि कॉफीशॉपच्या बाहेर आलो तर वर आकाशात ढग दाटून आलेले आणि रस्त्यावर धुक्याचा पूर्ण जाड पडदा! चार फुटांवरचेही दिसेना. गाडीपार्किंग पर्यंतचा रस्ताही धुक्यात बुडून गेला होता. अतिसाहस करण्यात अर्थ नव्हता. पाठीशी आल्पस तर दुसर्‍या बाजूला खोल दरी .. सगळे परत कॉफीशॉप मध्ये आलो. तिथे बाकीची मंडळीही धुकं निवळण्याची वाट पाहत निसर्गाची ती गूढ, रौद्र सुंदरता अनुभवत बसली होती. काही वेळाने धुकं आसमंतात विरघळू लागले आणि थोडे दिसू लागले. मग एकेक गाड्या आस्तेकदम वर सरकू लागल्या.

.

.

३७९८ मी. उंचीवर सेंट्रल इस्टर्न आल्प्स आणि अल्पाइन डिव्हाइन मध्ये वसलेले हे ग्लेशियर ऑस्ट्रीयातले दूरवर पसरलेले मोठे ग्लेशियर आहे. पिरॅमिडच्या आकारातले हे ग्लेशियर ग्रोसग्लोकनर आणि क्लाइनग्लोकनर म्हणजे थोरले आणि धाकले ग्लोकनर असे दोन भागात असून एका ग्लोकनरशार्ट नावाच्या सॅडलने ही दोन ग्लोकनर वेगळी दिसतात. बेल्झर हाकेत नावाचा फ्रेंच अ‍ॅनॉटॉमी प्रोफेसर इस १७७९ ते १७८१ इस्टर्न आल्पस मध्ये गेला आणि तेथून आल्यावर त्याने सन. १७८३ मध्ये ग्लोकनर पर्वतराजींचं वर्णनपर पुस्तक प्रसिध्द केलं. ग्लोकनर पर्वतराजीचं हे पहिलं ज्ञात वर्णन! ह्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन मग प्रिन्स बिशप कोर्ट फ्रान्स झेवियरने त्याच्या सहकार्‍यांसह हे शिखर सर करण्याची मोहिम आखली. सन १८०० मध्ये ६२ लोकांचा चमू हे शिखर पादाक्रांत करायला गेला त्यात फ्रान्स मिशाइल फिअर्टहालर हा शाळा मास्तर आणि डेव्हिड हाइनरिश होफं हा वनस्पतीज्ञ हे ही होते. बर्फातून वाट काढत क्लाइनग्लोकनर पर्यंत ते पोहोचले. १९ व्या शतकात पुढे अनेक जणांनी प्रयत्न करून तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर केला. सन. १९०९ मध्ये तेथे पहिल्यांदाच स्किइंग केले गेले आणि मग पुढे हे पर्यंटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.

काही ऑस्ट्रीयन एक्सपर्ट्सनी सन १९२४ मध्ये ह्या उंच पर्वतरांगातून रस्ता खोदण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांना आधी मूर्खातच काढण्यात आले पण पुढे सन १९३० मध्ये त्यांना मान्यता मिळाली आणि १९३५ मध्ये म्हणजे पाच वर्षांनी हा रस्ता तयार होऊन तेथे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल आणि मोटरबाइक रेस खेळवण्यात आली. त्यावेळी हा रस्ता फक्त उन्हाळ्यातच खुला असे; सुमारे १३२ दिवस पण आता मात्र तो सुमारे २७६ दिवस खुला असतो. नागमोडी वळणे घेत आल्प्सच्या अंगाखांद्यावरून सळसळत जाणारा हा रस्ता! ह्या रस्त्यावरून जाताना दूरवरची हिमशिखरं सतत साद घालत असतात. तेथे कधी पोहोचतो असंही होतं आणि मध्ये मध्ये थांबून ते रौद्र सौंदर्य पाहवेसे, अनुभवावेसे वाटते.

.
ग्रोसग्लोकनरच्या शिखराची उंची जरी ३७९८ मीटर असली तरी २५०० मीटर उंचीपर्यंत साधारण ४८ किमीचा हा रस्ता बांधून काढला आहे. त्यामुळे जेथे रस्ता संपतो त्या टोकाशी जेव्हा आपण पोहोचतो आणि आपल्याला अगदी अमोरासामोरा अगदी जुन्या मित्रासारखा आल्प्स भेटतो ना तेव्हाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. एकदा स्वच्छ उन्हात भेटेल तर एकदम धुक्याची शाल लपेटेलं.. किती रुपडी बदलतो तो! गाडी तिथल्या पार्क हाउस मध्ये पार्क करताना आपलं वयही तिथेच पार्क करायचं आणि मग फक्त हुंदडायचं, त्या आल्प्सच्या अंगाखांद्यावर खेळायचं. पार्क हाउस म्हणजे मोठ्ठी इमारतच आहे. समोरच एक होडगं मांडून ठेवलं आहे आणि त्या पुढे काही अंतरावर रेलिंग. त्या रेलिंगला रेलून मनसोक्त आल्प्स पहायचा..

.

.

तेथून खाली उतरून नितळ, निळ्याशार पाण्यात डोकावायचं. पाय दमले तरी मन भरत नाही तोवर आल्प्स आपल्यात भरून घ्यायचा. अशा विचाराने गाडी पार्क केली आणि आल्प्सला भेटायला गेलो. मनसोक्त हिंडलो. डोळे भरून ती निसर्गशोभा पाहिली. सूर्याचा आणि ढगांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. मध्येच ढगांचा आणि धुक्याचा पडदा सारून तो बाहेर आला की खोलवर खाली दिसणार्‍या नितळ निळ्या पाण्यात चुकार सोनेरी किरण लख्खकन चमकून जात होते. किती वेळ तो खेळ पाहण्यात गेला समजलेच नाही. तिथे असलेल्या स्मरणवस्तूंच्या दुकानात चक्कर मारून आलो. हे सारं चित्रं मनावर जरी अगदी स्पष्ट कोरलं गेलं होतं तरी सुवेनियर्सचा मोह झालाच. खूप वेळ गेला, पोटात कावळ्यांचं समूहगान सुरू झालं. मग तिथल्याच एका उपाहारगृहात केझं स्पेट्झलं, सलाड खाल्लं आणि परत भटकत बसलो.

घड्याळातले काटे वेळ दाखवायला लागले, मग नाइलाजाने मग परतीचा रस्ता धरावा लागला. मनात आणि कॅमेर्‍यात ग्रोस ग्लोकनर स्ट्रासं जपत आणि आठवणी घोळवत !

.

गेर्टा आजीच्या घरापाशी आलो तर आजी दारात वाटच पाहत होती. आम्हाला पाहून कशी झाली ट्रीप, हवा कशी होती? वगैरे विचारलं आणि मग गप्पच झाली. खोदून खोदून विचारल्यावर समजलं मागच्याच आठवड्यात तिच्याकडे आलेले काही पाहुणे मोटरबाइक्स घेऊन तेथे गेले होते आणि हवा खराब झाली. धुक्यात काही न दिसल्याने मोठ्ठा अपघात झाला आणि त्यात त्या मंडळींपैकी दोघेजण गेले.. क्षणभर सगळेच स्तब्ध झालो. एकदम अंगावर काटा आला. सकाळचा धुक्याचा जाड पडदा आठवला आणि आपण सुखरूप परत आलो ह्याचा नि:श्वास टाकत असतानाच पीटर आजोबांनी सेक्ट उघडली आणि त्यांना फोटो दाखवत असताना आम्ही सगळेच परत त्या ग्रोसग्लोकनरच्या शिखरात हरवलो.

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

मस्तच गं स्वाती ताई. ह्या उन्हाळ्यात जायला पाहिजे. आम्हाला पण साधारण ५-६ तास लागतील इथुन तिथे पोहोचायला.
एवढ्या छान जागेची माहिती करुन दिल्याबद्दल थँक्स. :)

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 8:51 pm | प्रीत-मोहर

फोटो अप्रतिम आहेत
पीटर आजोबा आणि गेर्टा आजीच घर किती सुंदर
__/\__

सुंदर, तुमची फेरियन्वोऽनुन्ग आवडली.

इडली डोसा's picture

9 Mar 2016 - 7:47 am | इडली डोसा

वर्णन इतकं सुंदर आहे की लगेच उठुन या ठिकाणी जायची इच्छा झाली.

सविता००१'s picture

9 Mar 2016 - 10:55 am | सविता००१

मस्तच फोटो आणि लेखन

पैसा's picture

9 Mar 2016 - 5:39 pm | पैसा

घरबसल्या एकापेक्षा एक सुंदर ठिकाणे येत आहेत समोर!

पद्मावति's picture

9 Mar 2016 - 10:01 pm | पद्मावति

काय सुंदर ठीकाण आहे. आत्ता उठून तिथे जावंसं वाटतंय.

सूड's picture

10 Mar 2016 - 4:42 pm | सूड

वि इस्ट दी रिष्टिगं आऊसश्प्राख़ं? अल्पाईनस्ट्रासं ओडं आल्पनष्त्रासं? केन्न्ट येमांड?

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2016 - 5:33 pm | मधुरा देशपांडे

बदल केला आहे.

सूड's picture

10 Mar 2016 - 6:02 pm | सूड

डान्कं !!

स्वाती दिनेश's picture

11 Mar 2016 - 6:38 pm | स्वाती दिनेश

अल्पाइन,आल्पेन,आल्पन ही सगळी उचारणे केली जातात. ऑस्ट्रीयन जर्मन, स्वीस जर्मन आणि जर्मनीतले जर्मन .. उचारणात फरक असतो. जर्मन मध्येही होख डॉइश आणि डिआलेक्टन मध्ये उचारणात फरक होत जातो.
स्ट्रासं, ष्ट्रासं किवा स्ट्रासे, ष्ट्रासे ..अशा प्रकारे स्ट्रासं चेही उचारण केले जाते.
प्रदेशानुसार जर्मन बोलण्याच्या पध्दतीत,उचारणात फरक होत जातो.
उदा- लाइपझिश.. लाइपझिग ,द्रायझिश- द्रायझिग.. इ.
शिकताना आपल्याला ig शेवट असेल तर श उचारण शिकवतात. वरील प्रमाणे.. द्रायझिश, फिअरझिश इ.. परंतु येथे सर्रास दोन्ही वापरले जाते. म्हणजे द्रायझिश, द्रायझिग दोन्ही बरोबर मानले जाते.
तसेच nicht निष्ट.. निट म्हटले जाते. असे अनेक पाठभेद आहेत. लोकल लोकांचे उचारण आणि होख डॉइश उचारण यात बदल आहे. इतरही भाषांत ते दिसून येतेच. जसे पुणेरी मराठी आणि इतरत्र बोलली जाणारी मराठी-- प्रमाण भाषाच असली तरी उचारणात फरक दिसून येतो. लिहिताना मात्र सारख्या पध्दतीने लिहिली जाते. इथेही तसेच आहे, स्पेलिंग ,ग्रामर तसेच राहते, उचारणात फरक होतो.
बर्लिन मध्ये ich- इष ला इख म्हणतात. तसेच बर्लिनर बोलताना व्याकरणातही द्वितियेचा जास्त वापर न करता चतुर्थीचाच करतात पण लिखित स्वरूपात मात्र व्याकरण नियम पाळतात. अशी अनेक उदा. देता येतील. तूर्तास एवढे पुरे.
स्वाती

फार म्हणजे फारच आभार!!

सुंदर !! आत्ताच्या आत्ता उठून तिकडे जावंसं वाटतंय..

सर्वसाक्षी's picture

11 Mar 2016 - 11:58 pm | सर्वसाक्षी

सफर आणि चित्रे दोन्ही मस्त

पियुशा's picture

13 Mar 2016 - 11:31 am | पियुशा

क्लास्स !!!

जुइ's picture

14 Mar 2016 - 9:27 pm | जुइ

सुंदर फोटो आणि वर्णन!rainbow

Maharani's picture

24 Mar 2016 - 6:45 pm | Maharani

जबरदस्त..भन्नाट

सानिकास्वप्निल's picture

28 Mar 2016 - 3:00 pm | सानिकास्वप्निल

सुंदर जागेचे तितकेच सुंदर वर्णन आणि फोटोज :)
कधीतरी तिथे जायला नक्कीच आवडेल.

निशाचर's picture

8 Apr 2016 - 6:01 pm | निशाचर

ग्रोस् ग्लोक्नर होख आल्पेन ष्ट्रासं ची खूप सुंदर ओळख! ग्रोस् ग्लोक्नर जवळचं हाइलिगेन्ब्लुट (Heiligenblut) गावही छान आहे. त्या भागात लोकल बसने फिरल्यामुळे होख आल्पेन ष्ट्रासं चा थोडाच भाग बघितला आहे.
लेखामध्ये ग्रोस् ग्लोक्नर शिखराचा फोटो हवा होता. मी टाकला तर चालेल का?

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2016 - 12:38 am | स्वाती दिनेश

टाका ना फोटो रोस् ग्लोक्नर शिखराचा. विचारायचे काय ?

निशाचर's picture

13 Apr 2016 - 3:06 am | निशाचर

ढगांमधून दिसणारं ग्रोस् ग्लोक्नर शिखर आणि उजवीकडे पास्टर्झे हिमनदी
.

पास्टर्झे ग्लेशिअर ट्रेल
.

झूम इन केल्यावर दिसणारा ग्रोस् ग्लोक्नर
.

स्वाती दिनेश's picture

17 Apr 2016 - 2:11 am | स्वाती दिनेश

धन्यावाद !!!

स्रुजा's picture

8 Apr 2016 - 9:47 pm | स्रुजा

काय कातिल फोटो आहेत !! अप्रतिम जागा.. आणि तुझं वर्णन पण सुरेख.. फोटो बघुन च जीव निम्मा खलास झाला.

मानसी१'s picture

12 Apr 2016 - 10:17 am | मानसी१

सुरेख प्रवास वर्णन.

स्वामिनी's picture

12 Apr 2016 - 12:29 pm | स्वामिनी

अप्रतिम वर्णन. तुमचे लेख आणि प्रवास वर्णन नेहमीच खुप सुरेख असतात.

सुधीर काळे's picture

12 Apr 2016 - 1:56 pm | सुधीर काळे

होख आल्पनं स्ट्रासं कीं होख आल्पन्स्ट्रासं? Kale आडनांव असल्यामुळे जर्मन मित्रांकडून 'हेर्र कालं' या संबोधनाची मला संवय असल्याने विचारत आहे!

स्वाती दिनेश's picture

17 Apr 2016 - 2:13 am | स्वाती दिनेश

अल्पाइन,आल्पेन,आल्पन ही सगळी उचारणे केली जातात. ऑस्ट्रीयन जर्मन, स्वीस जर्मन आणि जर्मनीतले जर्मन .. उचारणात फरक असतो. जर्मन मध्येही होख डॉइश आणि डिआलेक्टन मध्ये उचारणात फरक होत जातो.
स्ट्रासं, ष्ट्रासं किवा स्ट्रासे, ष्ट्रासे ..अशा प्रकारे स्ट्रासं चेही उचारण केले जाते.
प्रदेशानुसार जर्मन बोलण्याच्या पध्दतीत,उचारणात फरक होत जातो.
उदा- लाइपझिश.. लाइपझिग ,द्रायझिश- द्रायझिग.. इ.
शिकताना आपल्याला ig शेवट असेल तर श उचारण शिकवतात. वरील प्रमाणे.. द्रायझिश, फिअरझिश इ.. परंतु येथे सर्रास दोन्ही वापरले जाते. म्हणजे द्रायझिश, द्रायझिग दोन्ही बरोबर मानले जाते.
तसेच nicht निष्ट.. निट म्हटले जाते. असे अनेक पाठभेद आहेत. लोकल लोकांचे उचारण आणि होख डॉइश उचारण यात बदल आहे. इतरही भाषांत ते दिसून येतेच. जसे पुणेरी मराठी आणि इतरत्र बोलली जाणारी मराठी-- प्रमाण भाषाच असली तरी उचारणात फरक दिसून येतो. लिहिताना मात्र सारख्या पध्दतीने लिहिली जाते. इथेही तसेच आहे, स्पेलिंग ,ग्रामर तसेच राहते, उचारणात फरक होतो.
बर्लिन मध्ये ich- इष ला इख म्हणतात. तसेच बर्लिनर बोलताना व्याकरणातही द्वितियेचा जास्त वापर न करता चतुर्थीचाच करतात पण लिखित स्वरूपात मात्र व्याकरण नियम पाळतात. अशी अनेक उदा. देता येतील. तूर्तास एवढे पुरे.
स्वाती

कवितानागेश's picture

18 Apr 2016 - 11:02 am | कवितानागेश

सुन्दर आहे ठिकाण. गार गार वाटले! :)