"कय गेलती गं? " सुलु ने प्रेमा ला विचारले तशी प्रेमा म्हणाली , "कय नय गं , अथीस जरा आयकडे जाउन आलु, आपु कय जाणार? आपल्या तय काय पैशे हात फिरव्या?" सुलुने त्यावर "ते पण हाय गं" हे उत्तर जरी दिले असले तरीही तिला माहीत होते की प्रेमा खोटे बोलत होती, ती नक्की भगताकडे गेली असेल. तिच्या मुलाला काहीच काम धंदा नसल्याने तो रोज दारु पिउन उंडारु लागला होता, घरात गरीबी , नवरा तर आधीपासुनच दारुडा, प्रेमा एम. आय डी. सी. मधे कामाला जाउन घर चालवत होती. प्रेमाला दोन मुली - प्राची आणि पल्लवी आणि एक मुलगा सचिन. मुलीही १० वी नापास होउन आईबरोबर एम आय डी सी मधे कामाला जात होत्या. वय वर्षे १६-१७ च्या दरम्यान म्हणजे गावातल्या रीतीप्रमाणे दोन्ही मुली लग्नासारख्या झाल्या होत्या. गावातल्या कुंदनशी प्राची ने सुत जमवलं होतं पण प्रेम केलं तर आपली इज्जत जाईल या भीतीने प्रेमा लग्नाला तयार नव्हती. माहीत पडल्या बरोबर तिने प्राचीला काठीने झोडली होती. कान पकडुन दम भरत होती , "कय गेलती काळं करव्या? काय लाज बिज हाय का नाय? आमसं नाक कापिलं तु , त्यापेक्षा कय जाउन मेली का नय? आथ मी काय तोंड दाखवु लोकांना? , लोकांना तर बरंस होईल, आथं लोक हासतील मला. देवा काय करु मी आथं..? असे म्हणुन प्रेमा रडु लागली. पण प्राची काह्ही केल्या ऐकेना शेवटी प्रेमाने तातडीने तिच्या बहीणीला (कुमुदला) बोलावणं पाठवलं. कुमुद म्हणजे अगदी व्यवहारी बाई, लोकांना समोरचे म्हणणे प्रेमाने किंवा धाकाने पटवुन देण्यात अगदी पटाईत , पुरुषासारखी भारदस्त शरीरयष्टी पाहुन कुणालाही तिची भिती वाटे. प्रेमाने प्राचीला त्या दिवसापासुन कामावर नेणे बंद केले होते, "हांगितल्याशिवाय कय बाहेर जाव्याहं नय नयतर तंगडं तोडुन ठेवतं", प्रेमाने स्वतःदेखील सुट्टी घेतली होती.
कुमुद मावशी आली आणि प्राची ला समजवायला लागली, " बाय, अहं नय करव्याहं , प्रेम बिम करुन आपल पोट भरते का? आपु गरीब माणसं , अथी कमवणार न अथी खाणार, तु बघीते ना तुह्या घरची परीस्थीती? आपला बाप बेवडा, भाउ पण त्याह्यास लायनीवर , आपु कहं वागव्याहं. सल रडु नको आथं , तुह्य लग्न मी याहुन सांगल्या पोराबरोबर लावुन देतं बास? माह्या नणदेहा पोर हाय ना, तु तर बघितले त्याला. आथ्थं एका महीन्यात लगिन करुन टाकु, मस्त पोरगा हाय , दहावी शिकले , नापास हाय गं पण नोकरी करते, महीन्याला ४००० पगार हाय मस्त, बयणीही लग्न झाल्यात म्हणजे काय जबाबदारी नाय तुह्या डोक्यावर, आणि आईबाप काय आज हात उद्या नय, ते काय जल्माला पुरव्यात का? पण प्राचीचे तोंड पाहुन मुलगी इतक्या लवकर मानणार नाही हे तिला हे चांगलेच कळाले होते, "मी कुंदनशीच लग्न करणार" असा घोशा प्राचीने लावला मग कुमुदमावशीनेही प्राचीला बरी झोडपली आणि प्रेमाला सांगितले, "भगताकडे जाउन बंदोबस्त करुन ये, त्याला सांग अहं कर की ही त्याहं तोंडपण बघणार नय , तवर आपु लगेस इहं लग्न लाउ , मग कयशी पळते ही , एकदा लगीन झालं , पोर झालं की जकलं खपलं".
अनुभवी बहीणीचा सल्ला ऐकुन प्रेमा दुसर्या गावातल्या एका भगताकडे गेली होती , पण प्राचीचं लफडं गावात सगळ्यांना माहीत झालं होतं , सुलुने जाता जाता टोला लगावलाच , " नीट जा गं बाय, आसकाल काय समदं हमजते जकल्यांना , कोंबडा कवडा टोपल्याखाली लपुन ठेवीला तरी आरवाचा रेय नय नं." पण आपल्या मुलीनेच आपलं नाक कापलं तर दुसर्यांना काय बोलणार असा विचार करुन प्रेमा घरी परतली. आतापर्यंत तिने नवर्याला आणि मुलाला प्राचीच्या प्रेमा बद्द्ल काही सांगितले नव्हते पण त्यांना दुसर्यांकडुन माहीत पडले होते, त्यांनी प्राचीला मारहाण केलीच होती पण प्रेमा घरात शिरताच त्याने प्रेमाला मारायला सुरुवात केली , " ...... , .......... कय गेलती, या पोरीने आपलं नाक कापिलं , तुह्य लक्ष कुठे होत? तुन सडवुन ठेवीले इला, लोकं थुकयला लागली माह्या तोंडावर, आजपर्यंत कोणासं काय वाईट केलं नाय आणि ये दिवस दाखवले या पोरीने. आजपासुन हिला बाहेर जाउन देउ नको, नोकरी गेली खड्ड्यात , कही जाते ते मीस बघतो, आण तो मोबाईल अथी, या मोबाईलनेस घात केले, जवा बघु तवा ही मोबाईलवर बोलत आहते. प्रेमा आपल्या नशीबाला दोष देत रडत बसली.
इथे प्राचीने हालचाल करायला सुरुवात केली. प्राचीच्या मैत्रिणिला माहीत पडले होते की प्राचीला घरात कोंडले आहे तिने ही माहीती कुंदनला पोहोचवली. कुंदनच्या घरच्यांना जेव्हा माहीत पडले तेव्हा त्यांनी ही कुंदन ला विरोध केला. पण प्राची आणि कुंदन कुणाला ऐकणारे नव्हते , त्यांनी आपापल्या मित्र मैत्रीणींतर्फे एकमेकांना धीर दिला आणि पळुन जाउन लग्न करु असे ठरवले. २-३ दिवसाने कुमुद मावशी मुलाकडचा निरोप घेउन आली. "रविवारी इला बघव्या येव्यात, नीट साडी निहवुन तयार करा, नाश्त्याला कांदापोहे करा. पुडश्या मयन्यात इहं लगिन करुन टाकु म्हणजे ब्याद जाईल." हे ऐकताच प्राचीचा धीर सुटला. तिने कुंदनला निरोप पाठवला. कुंदन ने मित्राला जमवले. आणि रविवारच्या आधीच पळुन जायचा प्लॅन केला. शुक्रवारी गावात एक लग्न होतं त्यासाठी दोघांच्या घरातीले सर्वजण जाणार होते. प्राचीला ही प्रेमा जबरदस्ती घेउन गेली होती. सगळीकडे लग्नाची लगबग होती. बाकीच्या बायका प्रेमाकडे मुलींच्या लग्नाची चौकशी करत होत्या तर काही मुद्दाम खोदुन खोदुन प्राची बद्द्ल विचारत होत्या. प्रेमाने प्राचीला जवळच बसवुन ठेवले होते, लग्न लागले आणि सगळे जेवायला गेले. प्रेमाचं जेउन झालं अणि ती दुसर्या बाई बरोबर गप्पा मारत होती, प्राची अगदी हळ्हळु जेवत होती. हात धुवुन येते असं सांगुन गेली ती एकदम पसार झाली. ऐन लग्नात बोंबाबोंब , शोधाशोध सुरु झाली. प्रेमाने हंबरडा फोडला, "पोरीनं नाक कापीलं, कय तोंड दाखडव्या जागा नाय ठेविली, मला मरुन जाउ द्या . कुमुद मावशी तिचं सात्वन करु लागली, " गप गं बाय, तुही काय सुक? तुन हांगितलं का तिला पळुन जाव्या? तुन तर शाणपणाह्या गोष्टीच शिकविलत्या तिला पण तिन तोंड काळं केलं त्याला आपु काय करणार बिजं? सल घरा आथं, रडुन काय उपेग? तरी हांगिलतं तुला तीपय नीट लक्ष दे जो , पण तु तिला एकटी होडलीस क्याला? आपलास रुपया खोटा , जकले आहताना तीही हिमंत कही झाली पळव्याही, आहुंदे नव्या नवरीहे नौ दिवस खपले का हमजेल तिला. सल बाय सल घरा जाउ सल."
कुंदन आणि प्राचीने मित्रमैत्रीणींच्या मदतीने देवळात लग्न लावले होते. घरी जाता जाता रस्त्यातच प्राची आणि कुंदन लग्न करुन येताना दिसले तशी प्रेमाने शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली. प्राचीच्या डोळयात पाणी आले पण कुंदन ने धीर दिला, दोघांची वरात कुंदनच्या घरी आली आणि कुंदनचे आईवडील गप्पगार झाले, कुंदनच्या आईने नवर्याला समजावले , "जाउ द्या आथं, यो लगिन करुन हीला घेउन उंबर्यावर आलास हाय तर आपु तरी काय करणार? जे आहेन यांश्या नशिबात तेस होणार , देवाने जोडा आधीस लिवलेला आहतो आपु काउ करु शकत नाय". मग सर्वांनी समंजस पणा दाखवुन दोघांना घरात घेतलं. दुसर्या दिवशी सत्यनारायणाची पुजा ठेवली आणि गावजेवण दिलं. एकाच गावात असल्याने रोजचं प्राची आणि तिच्या आईकडचे समोरा समोर येत होतेच शेवटी कुमुद मावशीने प्रेमा आणि तिच्या नवर्याला समजावले आणि सगळे प्राचीच्या सासरी जाउन तिला आशिर्वाद देउन आले.
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 2:50 pm | स्नेहश्री
छान आणि छोटीशी सकारत्मक प्रेम कथा
24 Feb 2016 - 3:09 pm | मीता
छान लिहिलंय ..
24 Feb 2016 - 3:11 pm | पियुशा
मस्त शेवट छान तर सगळ छान :)
24 Feb 2016 - 3:27 pm | प्रीत-मोहर
छान लिहलियस कथा
24 Feb 2016 - 3:31 pm | सन्दीप
छान मस्त शेवट .
24 Feb 2016 - 3:32 pm | सूड
सुंदर, बदलापूरात आगर आळीत फेरी मारुन आल्यासारखं वाटलं.
24 Feb 2016 - 3:36 pm | Maharani
Chan aahe Katha...vegali bhasha...
24 Feb 2016 - 3:41 pm | अजया
मस्त कथा.
24 Feb 2016 - 4:14 pm | भुमी
आवडली कथा.
24 Feb 2016 - 4:34 pm | हाहा
छान आहे कथा
24 Feb 2016 - 4:42 pm | पैसा
या बोलीवर गुजरातीचा थोडा प्रभाव आहे का?
24 Feb 2016 - 4:51 pm | कविता१९७८
असु शकेल कारण आम्ही महाराष्ट्र - गुजरात बॉर्डरच्या आसपासच राहतो, बाय रोड ४५-५० कीमी नंतर गुजराथ सुटतं तर ट्रेन ने अर्ध्या तासात. तस आमच्या समाजाचा इतिहास वाचला होता त्यात असं होतं की आम्ही क्षत्रिय लढवय्ये १४ व्या शतकात राजा भीमदेव राय बरोबर लढाईसाठी या भागात आलो अन इथेच वसलो.
24 Feb 2016 - 4:54 pm | पैसा
अजून साम्यं असतील. जास्त वाचायला मिळाले तर कळेल.
24 Feb 2016 - 5:47 pm | मुक्त विहारि
म्हणजे "सांगीतल्याशिवाय"च्या ऐवजी "हांगीतल्याशिवाय" किंवा "सूरत"च्या जागी "हूरत"... इत्यादी....
24 Feb 2016 - 5:51 pm | कविता१९७८
हो गावात अशी भाषा वापरतात.
24 Feb 2016 - 4:43 pm | एस
शेवट गोड ते सगळंच गोड! छान कथा!
24 Feb 2016 - 5:38 pm | भीडस्त
छान आहे.
24 Feb 2016 - 5:45 pm | मुक्त विहारि
मस्त.
24 Feb 2016 - 7:28 pm | नूतन सावंत
कविता,लहेजा छान पकडलाहेस.
24 Feb 2016 - 8:52 pm | इशा१२३
छानच !! भाषा समजतेय आणि वेगळिहि वाटतेय .
25 Feb 2016 - 3:10 pm | सस्नेह
..वेगळीच आहे बोली.
25 Feb 2016 - 4:22 pm | विशाखा राऊत
छान लिहिले आहेस. पण कदाचित ही बोली भाषा प्रांतामुळे बदलत असेल. कारण तु लिहिलेस त्यात जास्त प्रभाव गुजराथीचा आहे, परंतु वसई भागात शेष वंशीय भंडारी ही भाषा बोलत नाहीत. त्यांच्या बोली भाषेत जास्त प्रभाव मराठी सोबत "कुपारी" भाषेचा आहे.
25 Feb 2016 - 10:30 pm | मित्रहो
आवडली
27 Feb 2016 - 7:20 pm | अनन्न्या
आवडली गं!
27 Feb 2016 - 8:05 pm | मितान
छान कथा !