लसणाचे आक्षे:-
लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ
कृति:-
पावशेर तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे.
मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे.
आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये थोड़े पाणी टाकून वाटून एकजीव करायचे. बैटर साधारण डोशाच्या बैटरएवढे गाढ असावे.
तव्यावर थोड़े तेल शिंपडून एकसर पसरावे. त्यावर बैटर गोल पसरावे. (त्याआधी तव्याखालची गैस नक्की पेटवा आणि तवा गरम होऊ द्या.) पसरताना फार जाड पसरवू नये आणि फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि जळेल. जाड झाले तर वरची बाजू शिजणार नाही.
तव्यावर झाकण ठेवावे. गैस मध्यम आचेवर असावी. साधारण 2-3 मिनिटांनी झाकण काढावे. परत आक्ष्यावर थोड़े तेल सोडावे. आक्षे उलटून 20-30 सेकण्ड शेकावे. तव्यावरुन काढून तूप ओढून चटणी किंवा लोणच्यासोबत गरमागरम हादडावे.
तांदळाचे पीठ झाले कमी:-
आदर्श आक्षे:- उलट बाजू
आदर्श आक्षे:- सुलट बाजू
टीप्स :-
1. तांदूळ 3- 4 तास भिजू देण्याएवढा वेळ नसेल तर तांदळाचे पीठही वापरता येईल. पण अस्सल चव भिजलेले तांदूळ पातीसोबत वाटल्यानेच येते- इति मातोश्री.
2. बैटर पसरवायला क्रेडिट कार्ड वापरता येईल. त्याने अगदी एकाच जाडीचे पसरते. पळीच्या उलट बाजूने पसरले तर ते डोशासारखे पसरते. सराटा वापरता येईल. पूर्वी आंब्याची किंवा पेरुची पाने मोडून त्याला काडीने बांधून वापरत. आता प्रगत झालो. अच्छे दिन आले.
3. फ़क्त लसणाची पात वापरावी. सोललेल्या पाकळ्या नाही. चवीला उग्रता नको.
4. तांदूळ जर कमी झाले तर आक्षे तव्याला चिकटतात. तव्यावर नीट पसरले जात नाहीत. तेव्हा आक्षे जमले नाहीत तर बैटरमध्ये थोड़े तांदळाचे पीठ टाकता येईल. ते मिसळा आणि पुन्हा एक प्रयत्न करून पहा. जमेगा बाबा जमेगा!
5. आक्षे बनले की खायला प्रस्तुत लेखकाला अवश्य बोलवावे. नाहीतर पुढच्या वेळी आक्षे बिघडतात.
प्रतिक्रिया
15 Feb 2016 - 9:47 am | स्वामी संकेतानंद
लिण्क टाकताना गडबड झाली बाप्पा. फोटो दिसत नाहीत.
15 Feb 2016 - 9:48 am | ज्ञानोबाचे पैजार
क्रेडिट कार्डच्या वापराची टिपही अनोखी पण उपयुक्त आहे. ज्या ब्यांका फुकट कार्ड देतो म्हणतात त्यांना आता नाही म्हणायला नको.
आम्ही फोटोला नेवैद्य दाखवुन खाऊ फोटो पाठवुन द्या.
ही पाकृ अंडे घालुन करता येईल का?
पैजारबुवा,
15 Feb 2016 - 10:06 am | स्वामी संकेतानंद
प्रयोग कराअला हरकत नसावी. आम्ही मेथीची पाने पण टाकून पाहिली आहेत. तुम्ही अंडी टाकून पहा
15 Feb 2016 - 10:07 am | पैसा
पैजारबुवा "अंडी घालून" असे विचारताहेत.
15 Feb 2016 - 9:53 am | सुनील
हपिसातून फोटो दिसत नसल्याने पाकृवर तूर्तास कमेंट नाही.
तत्पूर्वी ते कार्ड एक्स्पायर झाले असल्याची खात्री करून घ्या!
15 Feb 2016 - 10:07 am | स्वामी संकेतानंद
मुदत गेलेलेच. माझेवाले मी एकदाही स्वाइप केले नव्हते. कोरे करकरीत क्रेडित कार्ड वापराय्ला मिळाले.
15 Feb 2016 - 10:09 am | पैसा
बेष्ट! माझे या महिनाअखेर "मरणार" आहे.
15 Feb 2016 - 9:55 am | प्रीत-मोहर
स्वामी जबत्रक आक्षेके फटु नय दिखते तबतक पाकृ फाउल हय!!!!
15 Feb 2016 - 10:05 am | स्वामी संकेतानंद
करतो काहितरी
15 Feb 2016 - 10:06 am | पैसा
जबरदस्त पाकृ आहे! अजून येऊ दे रे! मातोश्रींची मदत सध्या घे.
पीठ तव्यावर पसरायला क्रेडिट कार्ड? =)) हे तुमच्यासारखे संसारत्याग केलेले स्वामीच करू शकतात! =))
15 Feb 2016 - 10:14 am | स्वामी संकेतानंद
एका स्विट डिश ची पाकॄ टाकायची आहे, पण फोटो घ्यायचे विसरलो आणि संपवून पण टाकले. गुंजे म्हणतात त्यांना.संक्रांत पेश्शल डीश असते.
15 Feb 2016 - 10:11 am | पियुशा
दिस्ले फोटु मस्त न रोच्क पाक्रु :)
15 Feb 2016 - 11:04 am | कंजूस
भारी वर्णन.प्रामाणिकपणा समजतोय पहिल्या फोटोतून.लसूण पात म्हणजे शिवाजीपार्क,आगरबाजार, किर्ती कॅालेज एअरिआतले सिकेपि लोकांच्या पाककृती. तिकडे लसूण पात विकायला असते.ओफिसवाले,कॅालेजवाल्यांचे आइडी कार्ड बरें . त्याला गळ्यात घालायचा पट्टा असतो.धुवून टांगता येईल.
15 Feb 2016 - 1:19 pm | राही
मुंबईत उंधियुंच्या मोसमात लसूणपात सर्वत्र-अगदी सर्वत्र- मिळते. सुरती उंधियुंमध्ये ती हवीच. काही जैन किंवा कट्टर वैष्णव लसूण वापरत नाहीत. पण असे थोडे. त्यामुळे मुंबईत अजूनही लसूणपात सगळीकडे दिसते आहे. अजूनही उंधियुंची भाजी वाटे लावून ठेवलेली दिसते. त्यात सगळ्या भाज्या थोड्या थोड्या असतात.
पाकृ वाचनीय आहे हे खास लिहायला पाहिजे. तांदूळ भिजवून वाटून नीरडोसे करताना त्यात भाज्याबिज्या घालतात ते माहीत होते. लसूणपात वापरलेली प्रथमच पाहिली. चांगली चव येत असणार. आणि रंगही फिकट हिरवा येत असणार.
15 Feb 2016 - 2:26 pm | स्वामी संकेतानंद
चव भन्नाट असते. लसणाची पात वापरून आम्ही पुर्यासुद्धा बनवतो आणि आता हिवाळ्यात रोजच्या भाजीत लसणाऐवजी पातच वापरतो.
17 Feb 2016 - 10:36 am | अदि
लसणाच्या पातीची चटणी पण.. वा वा वा... मस्तच लागते.
15 Feb 2016 - 12:40 pm | अनन्न्या
तोंपासू दिसतेय, पण आमच्याकडे लसूणपात मिळत नाही. त्यासाठी काय पर्याय?
15 Feb 2016 - 1:51 pm | कंजूस
आहे उपाय.खरा उपाय १) लसणाचे बी लावायचे.दोन महिन्यात पात मिळते. २) लसणाच्या पाकळ्याच सुट्या करून घ्यायच्या एकेक इंच अंतरावर पेरायच्या .पेरताना अर्धा भाग जमिनीवर अशाच्या "टोचायच्या." दहा दहा पाकळ्यांचा लॅाट पंधरा दिवसांच्या फरकाने लावा म्हणजे सतत पात मिळत राहते.
पहिल्या प्रकारात खरीखुरी पात अधिक बारीक लसूण मिळतो.वाढवल्यास मोठा लसूणही मिळतो.दुसरा प्रकार हा "चालू" प्रकार आहे.त्यात लसुण पाकळी गायब होते.नाही काढली तर पातही वातड होते.
15 Feb 2016 - 12:47 pm | नाना स्कॉच
अक्षी उत्तम दिसतायत आक्षे!!
15 Feb 2016 - 2:08 pm | स्पा
भारी प्रकार दिसतोय
15 Feb 2016 - 2:11 pm | प्रीत-मोहर
मला फोटो दिसत नाहीयेत!! स्पा आणि इतर मंडळी तुम्हाला खरच फोटोज दिस्ताहेत का? काय लोच्या आहे नक्की?
15 Feb 2016 - 2:14 pm | स्पा
दिसतायेत कि फोटो, तिन फोटो आहेत ,हिरवेगार डोसे :)
15 Feb 2016 - 2:28 pm | विशाखा राऊत
मला पण फोटो दिसत नाही आहेत
15 Feb 2016 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
लसणीच्या स्वादाचे हिरवेगार घावण ! चवदार प्रकार दिसतोय !
15 Feb 2016 - 3:30 pm | इशा१२३
नवा प्रकार! पण फोटो? दिसत नाहियेत.
15 Feb 2016 - 3:45 pm | प्रीत-मोहर
मल मोबल्यावर दिसताहेत फोटो. पीसीवरुन काय पंगा कळेना
15 Feb 2016 - 4:35 pm | आदूबाळ
भारी पाकृ!
बॅटर पसरायला क्रेडिट कार्ड नक्की कसं वापरायचं हे समजलं नाही.
15 Feb 2016 - 5:31 pm | स्वामी संकेतानंद
पळीभर बैटर तव्यावर टाकावे आणि मग सामान्यतः आपण पळीच्याच उलट बाजूने पसरतो तसे न करता क्रेडिट कार्ड उभे एका टोकाला पकडून दुसऱ्या टोकाने बैटर गोल गोल पसरावे. :D
15 Feb 2016 - 8:28 pm | आदूबाळ
पण वाटीच्या बुडाने पसरवणं सोपं नाही का पडणार?
15 Feb 2016 - 8:35 pm | पैसा
तुला स्वाम्याचा दिल्लीतला संसार माहीत असता तर असे प्रश्न पडले नसते!
या सगळ्या सूचना वाचल्या नाहीस का?
15 Feb 2016 - 10:04 pm | स्वामी संकेतानंद
ते बुडाला चिकटलेले घाण वाटते. :P असो, वाटी वापरली तर कळेल. लसणाच्या पातीमुळे हे थोड़े चिकट असते डोशापेक्षा.
15 Feb 2016 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा
वृत्त अगदी बरोब्बर-धरलय!
15 Feb 2016 - 9:04 pm | सूड
लसणाचे घावन दिसतायेत. भारी.
15 Feb 2016 - 10:07 pm | अजया
मस्तंय पाकृ आणि कंजूसकाकांची टिप पण.दोन्ही करुन बघणार.
15 Feb 2016 - 10:22 pm | प्रीत-मोहर
फोटो फायनली दिसले. ते खराब आलेले आक्षे स्वाम्याने आणि आदर्श वाले त्याच्या मातोश्रींनी बनवलेले आहेत हे समज्ले!!! धन्यवाद स्वाम्या
16 Feb 2016 - 12:03 am | रेवती
हा खाद्यप्रकार पहिल्यांदाच ऐकला, पाहिला. कृती लिहिण्याची पद्धत मनोरंजक आहे. ;)
काही झाले तरी क्रेकाने ब्याटर पसरवण्याची आयडिया अमलात आणणार नाही तरी ती आवडलीच!
16 Feb 2016 - 1:32 am | स्वाती दिनेश
रेवतीसारखेच म्हणते,
फोटो दिसत नाहीत.
स्वाती
16 Feb 2016 - 3:35 am | बहुगुणी
.webp प्रकारच्या फाईल्स दिसत नव्हत्या म्हणून .jpeg फाईल्स पुन्हा अपलोड केल्या आहेतः
तांदळाचे पीठ झाले कमी
आदर्श आक्षे:- उलट बाजू
आदर्श आक्षे:- सुलट बाजू
17 Feb 2016 - 10:30 am | अनिता ठाकूर
पावशेर तांदूळ म्हणजे किती वाट्या तांदूळ?
17 Feb 2016 - 10:49 am | स्वामी संकेतानंद
वाटीच्या आकारानुसार २ ते ३ वाट्या. अंदाजाने जमते ते. ट्रायल आणि एरर
17 Feb 2016 - 12:05 pm | पिलीयन रायडर
करुन पहायला हरकत नाही. एकदा लसुण पात गंमत म्हणुन आणली. तिचे काय करावे हे बरेच दिवस समजले नव्हते. आता समजले!
क्रेकाची आयडीया करुन पाहूच.. पण पीठ अंमळ जास्तच पातळ करुन तवा गरागरा हलवुन जो आकार येईल तो चालतो मला.. पीठ पसरवणे प्रकार का कोण जाणे जमलेला नाही कधी!
17 Feb 2016 - 12:50 pm | जागु
लसुणचा वास आणि स्वाद येत असेल तर छानच आहे.
17 Feb 2016 - 6:12 pm | स्वामी संकेतानंद
येतो..चवीला एकदम बेस्ट आहे!
18 Feb 2016 - 6:49 am | मदनबाण
वेगळीच पाकॄ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram