हॉप फ्रॉग १

शा वि कु's picture
शा वि कु in जनातलं, मनातलं
5 Nov 2015 - 8:56 pm

राजाइतका विनोद आवडणारा माणूस सापडणे कठीण.राजा जणू जगतच विनोदासाठी होता. एखादा विनोद रंगवून सांगणे म्हणजे राजाच्या मर्जीत येण्याचा हमखास उपाय होता. म्हणूनचकी काय त्याचे सातही मंत्री गमत्ये म्हणून प्रसिद्ध होते.ते मंत्रीपण राजासारखेच गलेलठ्ठ होते.त्यांच्याकडे पाहणार्याला हमखास वाटायचेच की विनोदी असणे आणि लठ्ठ असणे यात नक्कीच परस्परसंबंध असणार !
  राजा दरबाराच्या कामांचा क्वचितच स्वतःला त्रास करून घेई.राजाला गमत्या आणि विदूषकांच्या विविध प्रकारात खूप रस होता.अति शिष्ठाचार त्याला कंटाळा आणत आणि शाब्दिक विनोद त्याला लवकर समजत नसत . राजाचा कल चावट आणि द्रुष्य विनोदांकडे असे.
   त्या दिवसांमध्ये दरबारात विदूषक ठेवण्याची पद्धत होती.मोठे मोठे राजे त्यांच्या दरबारात विचित्र कपडे घातलेले आणि घंट्यांची माळ बांधलेले विदूषक ठेवत जे क्षणभराच्या सूचनेवर लगेच वेडेचाळे करण्यास तयार असत.
  आपला राजासुद्धा त्याचा विदूषक अभिमानाने दरबारात बाळगायचा. राजाच्या नजरेत त्या विदूषकाची किंमत तिप्पट होती, कारण तो फक्त विदूषकच नव्हे तर एक बुटका आणि लंगडा पण होता.
   त्या काळातल्या राजांचे दिवस एखाद्या विदूषकाच्या सोबत आणि एखाद्या बुटक्यावर हसल्याशिवाय पूर्ण होत नसत.सर्व राजे बुटके बाळगून असले तरी आपला राजा जाणून होता की हॉप फ्रॉग ( त्या बुटक्याचे नाव हॉप फ्रॉग होते. )हा एक अनमोल ठेवा आहे.
अर्थातच हॉप फ्रॉग हे त्याचे बारश्याचे नाव नव्हते.हे नाव राजा आणि त्याच्या सात मंत्र्यांच्या सार्वमताने ठरले होते. हे नाव त्याला पडलेले कारण तो सामान्य माणसासारखा चालू शकत नसे. तो हलण्यासाठी सरपटणे अाणि झेपावणे ह्यामधली हालचाल करे, जे पाहून दरबार क्रूर हास्याने भरून जाई. तसच राजाची धिप्पाड शरीरयष्टी आणि हॉप फ्रॉगची रांगणारी , केविलवाणी आक्रुती पाहल्यामुळे राजाचे महत्व आणखीनच वाढे.
पण जरी हॉप फ्रॉग स्वतःला यातना दिल्याशिवाय रस्ता किंवा जमिनीवर हलू शकत नसे ,तरी त्याच्या हाताचे स्नायू खुप बळकट होते , जणू काही निसर्ग त्याच्या वैगुण्यांची भरपाई करत होता. त्यामुळे तो  सफाइदार पणे झाडावर किंवा दोरावर चढत असे. ( अस करताना तो बेडकापेक्षा माकड किंवा खार वाटत असे. )
  हॉप फ्रॉग नक्की कुठल्या देशातला आहे हे खूपच कमी लोकांना माहीत होतं.अशी अफवा होती की तो एक लांबचा रानटी प्रदेश होता.हॉप फ्रॉग आणि एक हॉप फ्रॉग इतकीच ऊंच(!) मुलगी जबरदस्तीने कैद करुन राजाला भेट देण्यात आले होते.ती मुलगी बुटकी असूनही कमालची नर्तिका होती.
अशा परिस्थीतीत त्या दोघांना एकमेकांविषयी सहानुभूती वाटणं सहाजिक होतं . लवकरच हॉप फ्रॉग आणि ट्रिपेटा पक्के मित्र बनले.हॉप फ्रॉग कितीही उत्तम खेळ करित असला तरी कुरूप असल्यामुळे ट्रिपेटाला फारशी मदत करु शकत नसे. त्याउलट ट्रिपेटा बुटकी असूनही सुंदर असल्यानं ती दरबारात प्रिय होती.त्यामुळे ती शक्य तिथे हॉप फ्रॉगला मदत करत असे.
राजानं एका खास प्रसंगासाठी एक समारंभ आयोजित केला. अशा समारंभांमध्ये हॉप आणि ट्रिपेटाला खूप महत्व असे. खासकरुन हॉप फ्रॉगला.त्याच्या सुपीक डोक्यातून          समारंभासाठीची कथा कल्पना , सादरीकरणे निघत.त्याच्याशिवाय समारंभाचं पान हलत नसे.
समारंभाची रात्र आली.ट्रिपेटाच्या नजरेखाली नखशिकांत सजलेसा
दिवाणखाना समारंभाची रंगत वाढवणार्या विविध वस्तुंनी भरला होता.सर्व दरबारी अतिशय उत्सुक होते. राजाद्न्येवरुन सर्वजण एका विनोदी वेषभूषेत आले होते.सर्वजणांनी समारंभाचे आपापले पोशाख अनेक दिवसांपूर्वीच ठरवले होते - राजा आणि त्याचे सात मंत्री सोडले तर. त्यांना कुठलीच धमाकेदार कल्पना सुचत नव्हती . शेवटी राजाने वैतागून हॉप फ्रॉग आणि ट्रिपेटाला बोलावणे धाडले.
  ते दोघे जेव्हा राजाच्या कक्षात पोचले तेव्हा राजा आणि त्याचे मंत्री वाईनच्या सुरई भोवती बसलेले. राजा कशामुळेतरी खुप वैतागलेला दिसत होता.राजा जाणून होता की हॉप फ्रॉगला वाईन आवडत नव्हती.वाईन हॉप फ्रॉगवर लगेच प्रभाव करत असे आणि वाईनमुळे तो जरा जास्तच रोमांचित होत असे.राजा मात्र हॉपचा वेंधळेपणा बघण्यात जास्तच आनंद घेई.त्यामुळे राजा बरेचदा हॉप फ्रॉगला जबरदस्तीने वाईन पाजून मजा बघत असे.
   “इकडं ये हॉप फ्रॉग."हॉप फ्रॉग आत आल्यावर राजा म्हणाला.“तुझ्या अनुपस्थित नातलगांच्या आरोग्यासाठी हा वाईनचा चषक पी. ( हॉपने नि:श्वास सोडला.) आणि आम्हाला पात्रं-वेशभूषा सुचव.आम्हाला काहीतरी वेगळी , धमाकेदार कल्पना हवीय्.हा चषक रिचवून टाक आणि तुझ्या बुद्धिला चालना दे ! "
हॉप फ्रॉगने नेहमीप्रमाणे काहीतरी चतुर उत्तर देऊन आपत्ती टाळण्यासाठी तोंड उघडले, पण त्याला काही उत्तर सुचले नाही. योगायोगाने आज त्या दुर्दैवी बुटक्याचा वाढदिवस होता.त्याच्या ‘अनुपस्थित नातलगां 'च्या उल्लेखाने त्याच्या डोळ्यात पाणी आले . दोन उष्ण,कडवट अश्रू चषकात पडले जसा त्याने राजाच्या हातातून चषक घेतला.
“हा ! हा!"राजा ओरडला जसं हॉपने चषक मोकळा केला.“चांगल्या वाईनचे फायदे! बघ , तुझे डोळे तर आत्तापासूनच चमकत आहेत !"
हॉप फ्रॉगने थरथरत्या हातानं चषक खाली ठेवला, आणि पाणावल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं.सातही मंत्री राजाच्या ‘विनोदा'मुळे आनंदीत दिसत होते.
    “आता कामाचं बोलूया"प्रधानमंत्री म्हणाला. “बरोबर."राजा म्हणाला.“आम्हाला वेशभूषा हव्यायत ! वेशभूषा ! लवकरात लवकर ! " हॉप फ्रॉग गप्प बसून राहीला.
  “ लवकर सांग !" राजा फणकारला. “ मी काहीतरी नाविन्यपूर्ण आठवण्याचा प्रयत्न करतोय ." हॉप फ्रॉग उत्तरला.
  “प्रयत्न करतोय ?" तो राक्षस थुंकी उडवत किंचाळला.“ आता समजलं. तू रुसलायस , हो ना ? तुला आणखी वाईन पाहीजेय." त्याने अजून एक चषक भरला आणि बुटक्यासमोर नाचवला , जो फक्त दिर्घ श्वास घेत शून्यात पाहत राहीला.
“पी!" राजा किंचाळला.“नाहीतर सैतानाची शपथ..."
हॉप फ्रॉग चाचरला.राजा संतापून लालबुंद झाला.तितक्यात प्रेताइतकी पांढरीफटक पडलेली ट्रिपेटा राजाच्या खुर्चीपाशी जाऊन गुडघ्यांवर कोसळून राजाकडे तिच्या मित्राला क्षमा करण्याची विनंती करु लागली.
राजा काहीवेळ थक्क होऊन तिच्या धाडसाकडे पाहत राहीला , काय कराव सुचत नसल्याने.मग तिला जोरात बाजूला ढकलून , एक शब्दही न बोलता तिच्या तोंडावर चषकातली वाईन भिरकावली.ती बिचारी मुलगी श्वाससुद्धा घेण्याची हिंमत न करता बसून राहीली.
  काही वेळ संपूर्ण शांततेत गेला.त्या शांततेत गवताच्या पात्याची सळसळ पण ऐकु आली असती.आणि एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.
     उदाहरणार्थ दातांच्या.
जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं.
- एडगर एलन पो

संस्कृतीकथाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

5 Nov 2015 - 9:14 pm | प्रीत-मोहर

छान आहे.
पु भा प्र

एस's picture

5 Nov 2015 - 9:18 pm | एस

वाचतोय. पुभाप्र!

बिन्नी's picture

5 Nov 2015 - 9:58 pm | बिन्नी

छान लिहिलंय

इडली डोसा's picture

5 Nov 2015 - 10:19 pm | इडली डोसा

भाषांतर आहे का? पु.भा.प्र.

शा वि कु's picture

5 Nov 2015 - 10:22 pm | शा वि कु

एडगर एलन पो मूळ लेखक आहेत .

इडली डोसा's picture

6 Nov 2015 - 12:20 am | इडली डोसा

ते वाचायचं राहिलं होतं. येऊ द्या लवकर पुढचा भाग.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2015 - 10:26 pm | परिकथेतील राजकुमार

काहीतरी वेगळे आणि खिळवून ठेवणारे.
वाचतोय...

पद्मावति's picture

5 Nov 2015 - 10:43 pm | पद्मावति

वाह, मस्तं थरारक सुरूवात. वाचतेय.

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2015 - 12:04 am | स्वाती दिनेश

हा भाग आवडला.
पु भा प्र,
स्वाती

दमामि's picture

6 Nov 2015 - 6:38 am | दमामि

आवडली. पुभाप्र

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Nov 2015 - 7:17 am | कैलासवासी सोन्याबापु

पो! _/\_

विषय संपला

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 9:56 am | बोका-ए-आझम

पो स्वतःच एक शापित आयुष्य जगला. पुभाप्र!