तंबिटाचे लाडू

रेवती's picture
रेवती in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:41 pm

प्रकार १

साहित्य - दीडशे ग्रॅम सुवासिक तांदूळ, तांदळाच्या पाऊणपट गूळ, एक चमचा तूप, पाच ते सहा वेलदोडे, एक टेबलस्पून तीळ, एक टेस्पू सुक्या खोबर्‍याचा कीस, अर्धा टेबलस्पून खसखस.

कृती - या लाडूसाठी तांदूळपिठी तयार करून घ्यावी लागते. सुवासिक तांदूळ कढईत गुलाबी रंगावर भाजून घ्यावेत. मग ते गरम असतानाच बुडतील एवढ्या गार पाण्यात भिजवून ठेवावेत. दहा मिनिटांनी चमच्याने हलवून पाणी ओतून द्यावे व तांदूळ सावलीत एका स्वच्छ कापडावर पसरून ठेवावेत. तीन ते चार तासात ते साधारण सुकतील. अगदी किंचित दमट असायला हवेत. आता त्याची मिक्सरमध्ये वस्त्रगाळ पूड करून घ्यावी. कण्या राहता कामा नयेत. कढईत तीळ, किसलेले सुके खोबरे, खसखस गुलाबी रंगावर भाजून घेऊन वेगळे काढून ठेवावेत. वेलदोडे कुटून घ्यावेत. आता कढई पुन्हा मध्यम आचेवर ठेवून त्यात बारीक चिरलेला गूळ, तूप, घालून हलवत रहा. गूळ विरघळून पाकातून बुडबुडे येऊ लागतील. त्यात भाजून ठेवलेले खोबरे, तीळ, खसखस व वेलदोडा पूड घालावी. तांदुळाची पिठी घालावी. एकजीव करावे. आता आच बंद करून मिश्रण कोमट होऊ द्यावे. मग त्याचे चित्रात मध्यभागी दाखवलेल्या आकाराचे लाडू बांधावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १० लाडू होतील. हे लाडू विशेषत: शाकंभरीच्या नवरात्रात प्रसादाला केले जातात.

प्रकार २

साहित्य - भाजके डाळे १०० ग्रॅम, तेवढाच गूळ बारीक चिरून, ७० ग्रॅम तूप, वेलदोडापूड, सुके खोबरे २ टेस्पू, तीळ २ टेस्पू, खसखस १ टेस्पू.

कृती- प्रथम कढईत भाजके डाळे जरा गरम होईपर्यंत परतावे व गार होण्यास काढून ठेवावे. गार झाल्यावर त्याची बारीक पूड करावी. कढईत तीळ, खसखस व खोबरे गुलाबी रंगावर भाजावे व काढून ठेवावे. आता त्याच काढईत भरपूर तूप, गूळ असे पाक होण्यास घालावे. बुडबुडे येऊ लागताच सर्व जिन्नस घालून नीट एकत्र करावे. हाताला सोसवेल असे झाले की लाडू वळावेत. चित्रातील गोल वळलेले लाडू डाळ्याचे आहेत.

.

प्रतिक्रिया

मस्त आहे पारंपरिक पाककृती.आम्ही गुळाऐवजी पिठीसाखर मळून लाडू करून प्रवासात नेतो .असेडटी होत नाही.शाकंबरीचं देवीचं मूळ स्थान कुठे आहे? एक बदामीजवळ बनशंकरीला आहे.

सूड's picture

16 Oct 2015 - 2:29 pm | सूड

आले का फायनली!! =))

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 4:06 pm | प्रीत-मोहर

हे असे लाडु (प्रकार १) इकडे वेगळ्याच नावाने फामात आहे. नाव विसरले. सांगेन नंतर जनरली ख्रिश्चन लोक्स करतात नाताळात. मस्त लागतात अगदी.

पैसा's picture

16 Oct 2015 - 4:21 pm | पैसा

जबरदस्त पाकृ! फोटो तर अगदी मार डाला!

पद्मावति's picture

16 Oct 2015 - 9:49 pm | पद्मावति

अहाहा....मस्तं! ही पाककृती पहिल्यांदाच ऐकली. फारच टेंप्टिंग दिसताहेत लाडू.
गप्पकन तोंडात टाकावासा वाटतोय एखादा लाडू...मग दुसरा....आणि तीसरा....

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 10:13 pm | सानिकास्वप्निल

तंबिटाचे लाडू अगदी जबरदस्त दिसतायेत, घेतला गं मी एक.
ही पाकृ या अंकाच्या नशिबात होती ;)
दोन्ही प्रकार मस्तच आहेत, नक्की बनवणार मी.

वाह !! खतरनाक फोटो आणि चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) हे लाडु माझ्या नशिबात होते .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब !!

अनन्न्या's picture

17 Oct 2015 - 11:31 am | अनन्न्या

फोटो भारी आलाय. आता माझ्या लाडू रेसिपी संग्रहात आणखी एका लाडूची भर.

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 6:51 pm | मधुरा देशपांडे

आले का लाडु फायनली. कृती बघ्ता जमेल असे वाटतेय पण पाकाचे पदार्थ म्हणजे किचनदेवाचे व्रत कमी पडेल असे वाटते. तरिही दिवाळीच्या आधी ट्राय करते.

आले ते सुप्रसिद्ध रेवाक्का स्टाईल लाडु! पाकाचे पदार्थ न करता येणारी नापाक मी ;) फोटोतले उचलते!!

चतुरंग's picture

18 Oct 2015 - 2:43 am | चतुरंग

ट्राइड अँड टेस्टेड रेसिपी! :)

(चवप्रमुख)चतुरंग

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2015 - 8:29 pm | स्वाती दिनेश

त्यांच्या आकारामुळे आणि अर्थातच चवीमुळे माझे लाडके लाडू.
रेवती, कित्ती दिवसांनी चित्रात तरी बघितले..
स्वाती

सुरेख दिसतायत लाडु.गुळाच्या पाकाची भितीवाटते जरा.
जरा चुकला कि दगडि लाडु होतात.
सुगरणीचे काम.

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:54 pm | सामान्य वाचक

आमच्याकडे करतात हे लाडू
मस्त चव असते

गिरकी's picture

19 Oct 2015 - 10:03 am | गिरकी

हाय तुमने तो मां की याद दिलादी … आता आईला तंबीट करून ठेवायला सांगते आणि माहेरी चक्कर टाकते :)

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 12:28 pm | मांत्रिक

झक्कास! अगदि किलर दिसत आहेत लाडू.

एकात तांदूळ? एकात डाळे? तरीही दोन्ही तंबीटाचे लाडू च कसं काय?

डाळ्याचे लाडू खाल्लेत कधीतरी. आवडले होते.

के.पी.'s picture

21 Oct 2015 - 7:22 am | के.पी.

तशा बऱ्यापैकी सोप्या पाकृ वाटताहेत:)

ताई लाडु आवडले गं. आता पाठवुन दे मला इकडे.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 1:23 pm | बोका-ए-आझम

खासच दिसतंय की. शाकंभरी नवरात्रामध्ये म्हणजे कधी?

त्रिवेणी's picture

24 Oct 2015 - 1:29 pm | त्रिवेणी

बहुतेक जानेवारीत.
बाकी ते डाळ्यांचे लाडू होतात पण पीठिसाखर घालून करतात आमच्याकडे.

मितान's picture

24 Oct 2015 - 8:10 pm | मितान

ए ताई, प्रकार १ मी लहानपणापासून गुळपापडी म्हणून खात आलेय. माझे अत्यंत लाडके लाडू :)

एस's picture

25 Oct 2015 - 11:55 am | एस

प्रकार १ चा फोटो टाकलाय का? दिसत नाहीये.

'येणार, येणार' म्हणत शेवटी आली एकदाची पाककृती.

माझ्यासाठी नवीनच आहेत हे लाडू ..फोटो मस्त वाटतोय .

पिलीयन रायडर's picture

26 Oct 2015 - 2:53 pm | पिलीयन रायडर

अरे.. हे तर मी कधीच ऐकलेले नाव नाही.. तंबिट म्हणजे काय?

पण लाडु तर टेम्पटिंग वाटत आहेत!
रेवाक्का आहेच सुगरण!

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:16 pm | कविता१९७८

मस्तच आहेत लाडु, एक कानडी मैत्रीन तंबिट त्तु म्हणुन काहीसे आणते ते हेच का

उमा @ मिपा's picture

30 Oct 2015 - 11:20 am | उमा @ मिपा

मितानने नाचणीचे लाडू शिकवल्यापासून न डगमगता लाडू करू लागले आहे. हे दोन्ही प्रकारसुद्धा तुम्ही अगदी सोपे करून, तपशीलांसकट सांगितले आहेत, शिवाय तो फोटो असला जबरदस्त आलाय... आता करावेच लागतील लाडू. छान रेवतीताई!

दीपा माने's picture

3 Nov 2015 - 5:41 am | दीपा माने

सर्व सुगरण अन्नपुर्णांना सादर प्रणाम!
संपादक मंडळाच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे फळ जपुन ठेवले आहे.
सर्व अन्नपुर्णा आणि अनाहिता विशेषांक संपादक मंडळाचे मन:पुर्वक अभिनंदन.

मस्तच.टेम्पटिंग एकदम..