Skip to main content

तंबिटाचे लाडू

लेखक रेवती यांनी गुरुवार, 15/10/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकार १ साहित्य - दीडशे ग्रॅम सुवासिक तांदूळ, तांदळाच्या पाऊणपट गूळ, एक चमचा तूप, पाच ते सहा वेलदोडे, एक टेबलस्पून तीळ, एक टेस्पू सुक्या खोबर्‍याचा कीस, अर्धा टेबलस्पून खसखस. कृती - या लाडूसाठी तांदूळपिठी तयार करून घ्यावी लागते. सुवासिक तांदूळ कढईत गुलाबी रंगावर भाजून घ्यावेत. मग ते गरम असतानाच बुडतील एवढ्या गार पाण्यात भिजवून ठेवावेत. दहा मिनिटांनी चमच्याने हलवून पाणी ओतून द्यावे व तांदूळ सावलीत एका स्वच्छ कापडावर पसरून ठेवावेत. तीन ते चार तासात ते साधारण सुकतील. अगदी किंचित दमट असायला हवेत. आता त्याची मिक्सरमध्ये वस्त्रगाळ पूड करून घ्यावी. कण्या राहता कामा नयेत. कढईत तीळ, किसलेले सुके खोबरे, खसखस गुलाबी रंगावर भाजून घेऊन वेगळे काढून ठेवावेत. वेलदोडे कुटून घ्यावेत. आता कढई पुन्हा मध्यम आचेवर ठेवून त्यात बारीक चिरलेला गूळ, तूप, घालून हलवत रहा. गूळ विरघळून पाकातून बुडबुडे येऊ लागतील. त्यात भाजून ठेवलेले खोबरे, तीळ, खसखस व वेलदोडा पूड घालावी. तांदुळाची पिठी घालावी. एकजीव करावे. आता आच बंद करून मिश्रण कोमट होऊ द्यावे. मग त्याचे चित्रात मध्यभागी दाखवलेल्या आकाराचे लाडू बांधावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १० लाडू होतील. हे लाडू विशेषत: शाकंभरीच्या नवरात्रात प्रसादाला केले जातात. प्रकार २ साहित्य - भाजके डाळे १०० ग्रॅम, तेवढाच गूळ बारीक चिरून, ७० ग्रॅम तूप, वेलदोडापूड, सुके खोबरे २ टेस्पू, तीळ २ टेस्पू, खसखस १ टेस्पू. कृती- प्रथम कढईत भाजके डाळे जरा गरम होईपर्यंत परतावे व गार होण्यास काढून ठेवावे. गार झाल्यावर त्याची बारीक पूड करावी. कढईत तीळ, खसखस व खोबरे गुलाबी रंगावर भाजावे व काढून ठेवावे. आता त्याच काढईत भरपूर तूप, गूळ असे पाक होण्यास घालावे. बुडबुडे येऊ लागताच सर्व जिन्नस घालून नीट एकत्र करावे. हाताला सोसवेल असे झाले की लाडू वळावेत. चित्रातील गोल वळलेले लाडू डाळ्याचे आहेत. .

वाचने 24782
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

मस्त आहे पारंपरिक पाककृती.आम्ही गुळाऐवजी पिठीसाखर मळून लाडू करून प्रवासात नेतो .असेडटी होत नाही.शाकंबरीचं देवीचं मूळ स्थान कुठे आहे? एक बदामीजवळ बनशंकरीला आहे.

हे असे लाडु (प्रकार १) इकडे वेगळ्याच नावाने फामात आहे. नाव विसरले. सांगेन नंतर जनरली ख्रिश्चन लोक्स करतात नाताळात. मस्त लागतात अगदी.

जबरदस्त पाकृ! फोटो तर अगदी मार डाला!

अहाहा....मस्तं! ही पाककृती पहिल्यांदाच ऐकली. फारच टेंप्टिंग दिसताहेत लाडू. गप्पकन तोंडात टाकावासा वाटतोय एखादा लाडू...मग दुसरा....आणि तीसरा....

तंबिटाचे लाडू अगदी जबरदस्त दिसतायेत, घेतला गं मी एक. ही पाकृ या अंकाच्या नशिबात होती ;) दोन्ही प्रकार मस्तच आहेत, नक्की बनवणार मी.

वाह !! खतरनाक फोटो आणि चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) हे लाडु माझ्या नशिबात होते .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब !!

आले का लाडु फायनली. कृती बघ्ता जमेल असे वाटतेय पण पाकाचे पदार्थ म्हणजे किचनदेवाचे व्रत कमी पडेल असे वाटते. तरिही दिवाळीच्या आधी ट्राय करते.

त्यांच्या आकारामुळे आणि अर्थातच चवीमुळे माझे लाडके लाडू. रेवती, कित्ती दिवसांनी चित्रात तरी बघितले.. स्वाती

हाय तुमने तो मां की याद दिलादी … आता आईला तंबीट करून ठेवायला सांगते आणि माहेरी चक्कर टाकते :)

तशा बऱ्यापैकी सोप्या पाकृ वाटताहेत:)

खासच दिसतंय की. शाकंभरी नवरात्रामध्ये म्हणजे कधी?

बहुतेक जानेवारीत. बाकी ते डाळ्यांचे लाडू होतात पण पीठिसाखर घालून करतात आमच्याकडे.

ए ताई, प्रकार १ मी लहानपणापासून गुळपापडी म्हणून खात आलेय. माझे अत्यंत लाडके लाडू :)

प्रकार १ चा फोटो टाकलाय का? दिसत नाहीये. 'येणार, येणार' म्हणत शेवटी आली एकदाची पाककृती.

अरे.. हे तर मी कधीच ऐकलेले नाव नाही.. तंबिट म्हणजे काय? पण लाडु तर टेम्पटिंग वाटत आहेत! रेवाक्का आहेच सुगरण!

मितानने नाचणीचे लाडू शिकवल्यापासून न डगमगता लाडू करू लागले आहे. हे दोन्ही प्रकारसुद्धा तुम्ही अगदी सोपे करून, तपशीलांसकट सांगितले आहेत, शिवाय तो फोटो असला जबरदस्त आलाय... आता करावेच लागतील लाडू. छान रेवतीताई!

सर्व सुगरण अन्नपुर्णांना सादर प्रणाम! संपादक मंडळाच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे फळ जपुन ठेवले आहे. सर्व अन्नपुर्णा आणि अनाहिता विशेषांक संपादक मंडळाचे मन:पुर्वक अभिनंदन.