अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:56 pm

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.. असं गर्वगीत म्हणत म्हणत कोलंबसाने अमेरिका शोधली आणि तिथून युरोपात परत येताना आपल्या पोतडीत अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आणि वस्तू भरून घेऊन आला. फर्डिनांड महाराज आणि इझाबेला राणीसाहेबांना त्याने आपला हा जादूई नजराणा पेश केला. त्यातल्या साधारण बदामासारख्या दिसणार्‍या गर्द तपकिरी बियांकडे कोणाचं फारसं लक्षही गेलं नाही. आपल्या चौथ्या अमेरिका वारीत कोलंबसाला असं आढळलं की ह्या बियांचा चलन म्हणून वापर होतो आहे. त्याचं कुतुहल चाळवलं गेलं आणि तेथील लोक ह्या बियांपासून पेय बनवतात असं त्याच्या लक्षात आलं. तरीही त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.

.

पुढे सन १५१३ मध्ये हर्नांडो वाल्डेझलाही हे कोकोबियांच्या चलनाची किमया समजली. १०० कोकोच्या बिया देऊन त्याने चक्क गुलाम विकत घेतला. सन १५१९ मध्ये दुसर्‍या हर्नांडो कॉर्टेझला ह्या चलनाची किंमत चांगलीच समजली आणि स्पेनच्या साम्राज्याच्या नावाने त्याने कोकोची लागवड सुरू केली. खरेच पैशाचे झाड लावले गेले. पुढे ह्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलातल्या ४००० वर्ष जुन्या कोकोच्या बियांनी सार्‍या जगाचेच अर्थकारण बदलले.

.

सार्‍या जगाला अमेरिका माहिती होण्यापूर्वी मेसोमेरिकेत म्हणजेच मेक्सिको आणि मध्य अमेरिकेमध्ये विकसित माया संस्कृती नांदत होती. साधारण ६ व्या शतकात कोकोच्या बियांपासून त्यांनी झोकोटी म्हणजे कडसर पाणी तयार करायला सुरूवात केली. ह्या कोको बियांना जीवन आणि सूजनाचे प्रतिक मानले जात असे. अ‍ॅझटेक लोकांच्या मते क्वेझलाकोटी ह्या देवाने कोकोचे हे झाड थेट स्वर्गातून चोरून आणले. (म्हणजे आपल्या पारिजातकाच्या कथेसारखेच झाले की हे.. ) कोकोबियांपासून घट्ट, गार कडसर पेय तयार करून पित असत. त्यांच्या मते बल आणि ज्ञानवर्धक असे हे देवाचे पेय शक्तीदायीही होते आणि त्यांना साखर माहित नसल्याने स्वादासाठी ही मंडळी त्यात अगदी मिरीपासून मिरचीपर्यंत हवे ते मसाले घालत असत. मॉंटेझुमा ह्या अ‍ॅझटेक राजाला हे देवाचे पेय एवढे आवडत होते की दिवसाला ५०-५० चषक ते तो पित असे. राजाच तो.. प्रत्येक वेळी वेगळा सोन्याचा पेला आणि एकदा वापरला की फेकून दिला.. 'युज अँड थ्रो' संस्कृती तेव्हापासून आहे असं दिसतंय.

.

.

. .

पुढे सन १५२८मध्ये हर्नांडो कोर्टेझने पाचव्या चार्ल्स राजाला हे कोकोचे पेय सादर केले. त्याच्या असे लक्षात आले की ह्या पेयात साखर घातली तर अजून मजा येईल. स्पॅनियार्ड्सनी ह्या देवाच्या पेयात साखर, दालचिनी, लवंगा, वॅनिलाच्या शेंगा मिसळल्या आणि चमत्कार घडला.. हे देवाचे पेय आता राजाचे पेय झाले. मेसोमेरिकेतून कोकोच्या बियांची मागणी वाढतच चालली तरीही बाकीच्या जगापासून जवळपास १०० वर्षे हे चॉकोलेटी रहस्य स्पेनने दडवून ठेवले बाकीच्या युरोपला कोकोबी, चॉकलेट ह्याबद्दल काहीही माहिती नव्हती. ते इतके अनभिज्ञ होते की इसन १५७९ मध्ये एक कोकोच्या बियांनी भरलेले स्पॅनिश जहाज इंग्लिश चाचांनी लुटले तेव्हा त्या कोकोच्या बियांना शेळ्यामेंढ्याच्या लेंड्या समजून त्यांनी जाळून टाकल्या. पण स्पेनच्या मार्केटात मात्र अमेरिकेहून येणार्‍या जहाजातून कोकोबिया अवतरल्या होत्या. एवढेच नव्हे तर पुढे १५८७ मध्ये परत असेच कोकोबियांनी लदलेले एक स्पॅनिश जहाज कुचकामी म्हणून ब्रिटिशांनी टाकून दिले. अजूनही हे देवाचे पेय बाकीच्यांपासून दडलेलेच होते.

सन १६०९ मध्ये मेक्सिकोतून चॉकलेटवरचे पहिले पुस्तक आले आणि पुढे १६१५ मध्ये ऑस्ट्रियाची राजकन्या आणि फ्रेंच राजा १३ वा लुईस यांच्या शाही लग्नाच्या मेजवानीत सरदारांना हे पेय दिले आणि मग पॅरिसमध्ये झपाट्याने ह्या पेयाची कीर्ति पसरली. पॅरिसने चॉकलेटला लवकरच आपलेसे केले तर लंडनला चॉकलेटी रंगात रंगायला १६६२ उजाडावे लागले.. इतकेच नव्हे तर रोमच्या पोपनेही ह्यात लक्ष घातले. अमेरिकेत न्यू इंग्लंड मध्ये आणि पुढे लगेचच स्पेनमधील बार्सिलोना मध्ये चॉकलेटचा कारखाना निघाला, जर्मनीही मग मागे राहणार नव्हते. बर्लिनमध्ये जॉस्टी ब्रदर्सनी फॅक्टरी उघडली. स्वीस, बेल्जियमही ह्या चॉकलेट शर्यतीत उतरले. हळूहळू युरोप आता चॉकलेटमय झाला होता पण अजूनही ते पेयरुपातच होते.

फ्राय अँड सन्स ह्या ब्रिटिश चॉकलेटवाल्यांनी चॉकलेट फक्त पिता येत नसून खाताही येते हे सन १८३० मध्ये दाखवले. पण त्याच्या कडू चवीमुळे ते फारसे अपिल झाले नाही. खडबडीत चॉकलेटचे पुढे मऊमुलायम, गुळगुळीत चॉकलेटात रुपांतर व्हायला १८४७ साल उजाडले. कॅडबरी ब्रदर्सनीही अशा मुलायम सिल्की चॉकलेटांचे बर्मिंगहॅमच्या बिंगले हॉलमध्ये प्रदर्शन मांडले. स्वीसच्या डॅनियल पीटरने दुधाचा वापर केला आणि मिल्क चॉकलेटची देणगी दिली. बर्नच्या रोडोल्फ लिंडने काही फेरफार करून, कोको बटरचा जास्त वापर करून चॉकलेट तोंडात टाकल्यावर लगेचच विरघळणारे फोंडाट तयार केले. स्पेनचा चॉकलेट बिझनेस हळूहळू स्वीझर्लंडकडे सरकत होता. इतके की केझंफाँड्यु, रोस्टी प्रमाणे चॉकलेटही राष्ट्रीय पदार्थ होऊ पहात होता. बेल्जियन मंडळींही मागे नव्हती. चॉकलेटच्या रसात बदाम किवा हेझलनटना लपवून त्यांनी चॉकलेटचा नवा प्रकार तयार केला, प्रालिन!

.

चॉकलेट बनवण्यासाठी लागणारा मुख्य कच्चा माल म्हणजे कोकोच्या बिया, त्या तर अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून, मेसोमेरिकन भागातून जहाजातून येत होत्या. युरोपातले हवामान काही त्यांना मानवणारे नव्हते. विषुववृत्ताजवळ आंब्यासारख्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत वाढणारे Theobroma Cacao असे बोटॅनिकल नाव असलेले हे झाड ५ ते ८ वर्षात फळ धरू लागते. कोकोपॉड्समधून बिया काढून त्या साधारण आठवडाभर ट्रेमध्ये पसरून, झाकून वाळवण घालतात. त्या ब्राऊन होतात, मग त्यातील आर्द्रता ७% पर्यंत खाली जाण्यासाठी उन्हात साधारण ३ दिवस वाळवतात. मग त्या स्वच्छ करून १२० ^० से (२५०^० फॅ) तपमानाखाली मिक्स करून दोन तास ठेवतात. मग कवच काढून त्या क्रश करतात. त्यापासून कोको मास मिळते आणि हस्तीदंती रंगाचे कोको बटर मिळवण्यासाठी बियांना आंबवून, वाळवून, भाजून त्यांची साल काढावी लागते. सॉलिड कोको आणि कोको बटर साधारण निम्मे निम्मे मिळते. हे कोको बटर, कोको पावडर, दूध, वॅनिला, दालचिनी, बदाम इ. पदार्थ घालून मग चॉकलेटे बनवतात.

.

.

.

.

.

.

.

चॉकलेट बनवणे ही युरोपियनांची परंपरा बनू पाहत होती, ते त्यांच्या संस्कृतीचा एक भाग बनू पहात होते. अमेरिकाही चॉकलेटांच्या व्यवसायात मागे नव्हती.१८५२ पासून घिराडेली चॉकलेट्स नी पाय रोवले होतेच. हळूहळू हर्शे, डांटं, मार्स सारख्या चॉकलेट बनवणार्‍या कंपन्या रिंगणात उतरल्या. तर युरोपात कॅडबरी, लिंड, नेस्ले, नॉयहाउस सारखे अनेक जण होतेच. चॉकलेटी, तपकिरी रंगाच्या, बदाम वाल्या, सिल्की स्मूथ कोकोयुक्त वड्यांची एव्हाना पाश्चिमात्य जगाला चटक लागलेली होती. पण आता फक्त सिल्की मिल्क चॉकलेट न राहता त्यात विविधता आणण्याचे प्रयोग सुरू झाले. बेल्जियम मध्ये हेझल नट्स किवा बदाम चॉकलेट्च्या रसात घोळवून प्रालिन तयार झाली होतीच तर फ्रान्सने फ्रेश क्रिम आणि चॉकलेटचे बॉल्स कोको पावडरीत आणि नट्स मध्ये घोळवून 'ट्रफल्स' बनवले, कॅडबरीने पंचतारांकित क्रंची चॉकलेट बनवून त्याला 'फाइव्ह स्टार' नाव दिले. कॅडबरीनेच चॉकलेटच्या 'इस्टर एग्ज'ची छानशी भेट दिली. 'डार्क बिटर' चॉकलेटांमध्ये कोकोचे प्रमाण जवळजवळ ८०% पर्यंत नेले तर नेस्ले ने वाफेल वर चॉकलेटरस ओतून 'किटकॅट' बनवले तर मिंटच्या स्वादाचे 'आफ्टर एट' बनवले आणि मग १९३० मध्ये नेस्लेनेच जगाला 'व्हाइट चॉकलेट' दिले. दूध, साखर आणि कोको बटर युक्त हस्तीदंती रंगाचे हे चॉकलेट साध्या चॉकलेटांपेक्षा जास्त हेल्दी ठरले. आता चॉकलेट नुसते चॉकलेट न राहता त्यांच्या त्यांच्या नावांनी ओळखू जाऊ लागले होते. ब्रँड्स तयार होऊ लागले होते.

.

.

.

चॉकलेटांमधून मिळणारी इन्स्टंट एनर्जी एव्हाना लक्षात येत होती. इतके की दुसर्‍या महायुध्दात आपल्या सैनिकांना एनर्जीसाठी चॉकलेटे दिली होती. एवढेच नव्हे तर स्पेसशिपमधून प्रवास करणार्‍या अंतराळवीरांसोबतही चॉकलेटे दिली गेली. चॉकलेट आता फक्त पेय किवा वडी स्वरुपात न राहता माणसाच्या कल्पक डोक्याने त्यात खूप प्रकार आणले. आइसक्रिम, केक्स मधले चॉकलेट फ्लेवर्स फार लोकप्रिय होऊ लागले. कॉफीच्या कपावरही कोकोपावडरीची नक्षी करून देण्याची फॅशन आली. चॉककाफे असा कॉफीचा नवा प्रकारही निघाला. लोकांना चॉकलेट फ्लेवर इतका आवडू लागला की सुगंधाच्या दुनियेलाही त्याची दखल घ्यावी लागली आणि चॉकलेट परफ्युम्स बाजारात आले. कलोन, पॅरिस, लंडन, ब्रुगं, बार्सिलोना, ब्रोक, बर्लिन, प्राग अशी युरोपभर चॉकलेट्गाथा सांगणारी चॉकलेट म्युझियम्स बांधली गेली तर अमेरिका, क्युबा, कोरियातही अशी चॉकलेट म्युझिअम्स निघाली. मागच्या वर्षीच्या सर्व्हेनुसार जगभरात चॉकलेटे खाण्यात स्वीसचा नंबर पहिला आहे, जर्मनी त्याच्या मागोमाग आहेच.

.

तिकडे अमेरिका आणि युरोपात ही चॉकलेट क्रांती घडत होती पण इकडे भारतात मात्र स्वातंत्र्याच्या संग्राम चालू होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ वर्षभराने कॅडबरीने भारतात आपला कारखाना उघडला आणि थोड्या कालावधीतच कॅडबरी डेअरी मिल्क नावाचे चॉकलेट श्रीमंतांमध्ये, अभिजनांमध्ये थोडा प्रौढीचा विषय होऊ लागले. मग फाईव्ह स्टार आले, इक्लेअर ,कॉफीबाईट आली आणि आणखी कितीतरी.. जेव्हा भारतातच चॉकलेट बनू लागले तेव्हा तेथल्या हवामानाला आणि लोकांच्या आवडीनिवडीला साजेसे काही बदल करणे जरुरीचे झाले.

हळूहळू चॉकलेटची ही गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागली. नाटकवेडा मराठी माणूस रेडिओ, टीव्ही, सिनेमा मध्येही रमू लागला.. चॉकलेटने मग हळूच चोरपावलांनी त्याच्या आनंदक्षणांमध्ये प्रवेश केला.. लहान मुलांना चॉकलेटच्या बंगल्याची स्वप्नं पडू लागली. पुढे अमूल ह्या डेअरी उत्पादन कंपनीनेही चॉकलेटे बनवण्यास सुरूवात केली. चॉकलेट आता घराघरात पोहोचले आहे, इतके की "कुछ मीठा हो जाय.." म्हणत तोंड गोड करण्यासाठी चॉकलेट पुढे केले जाऊ लागले आहे.

.

.

(सर्व प्र. चित्रे आंजा वरून साभार)

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 11:21 am | पैसा

मार डाला!!

किती मेहनतीने सगळी माहिती लिहिली आहेस!

जिन्गल बेल's picture

16 Oct 2015 - 1:06 pm | जिन्गल बेल

यम्मी... :)

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 4:09 pm | प्रीत-मोहर

आहा!!. चॉकलेटचे फोटो वाचुन वारलेय. नण्तर वाचते आधी एक चाकलेट खाउनच येते

खपले मी !! काय जीवघेणी माहिती आणी फोटो आहेत, तुझी मेहनत दिसते आहे :)

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 4:13 am | मधुरा देशपांडे

लेख खूप आवडला स्वातीताई.

लेख फोटो सर्वच अप्रतिम.

गिरकी's picture

19 Oct 2015 - 9:56 am | गिरकी

फोटो बघून जिवाचे मोल्टन चॉकोलेट झाले आहे. सुंदर लेख !

उमा @ मिपा's picture

19 Oct 2015 - 11:13 am | उमा @ मिपा

चॉकलेट यम्मी! सध्या उपवास सुरु आहेत म्हणून हा लेख बघणे टाळत होते, पण छे, राहावलंच नाही. अगदी रोजच्या रोज सुद्धा घरातल्या लहानथोर सगळ्यांकडून सहज खाल्ल्या जाणाऱ्या आणि आता तर घरातही सर्रास बनवल्या जाणाऱ्या चॉकलेटबद्दल एवढी माहिती मात्र फार कमी लोकांना असते. इतक्या मेहनतीने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल स्वातीताई इ लोवे यु! फोटो पाहून क्काय्यच्या क्काय्य तोंपासु.

महासुंदर...किती मस्त लिहिलेय चॉकलेटव! खूप आवडला.....

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 7:04 pm | प्यारे१

हा लेख म्हणजे चॉकलेटचा 'संपूर्ण इतिहास भूगोल नागरीकशास्त्र विथ सामान्यज्ञान' आहे.

हा लेख मुख्य बोर्डावर हवा.

मस्तच ! चॉकलेटचा एवढा डीट्टेल इतिहास माहित न्हवता.

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:52 pm | सानिकास्वप्निल

अभ्यापूर्ण लेख आहे हा स्वातीताई, चॉकलेटची माहिती छान सांगितली आहेस.
चॉकलेट बद्दल प्रथमचं इतका तपशीलवार लेख वाचत आहे, तू यासाठी घेतलेली मेहनत दिसतेय.
लेख खूप खूप आवडला.
आता बर्मिंगहॅमच्या कॅडबरीज वर्ल्डला लवकरचं जाणे आले त्याही आधी चॉकलेट परफ्युम्स शोधणे ही आलेच ;)

आहाहा....यमी लेख..यमी फोटो

लेख आवडला. आम्ही प्रागच्या चॉकलेट म्युझियमला गेलो होतो ते आठवले. तिथे कोकोच्या फळापासुन, कोको सिड्स ते कोको पावडर पर्यंत सगळे बघायला मिळाले होते. तिथे खाल्लेले फ्रेश चॉकलेट मी कधीच विसरणार नाही.
आणि हो, ते चॉकलेट परफ्युम मात्र मला पण माहित नव्हते. हॅन्ड वॉश, हॅण्ड क्रिम वापरले आहे. पण परफ्युअम आता शोधायला पाहिजे.

के.पी.'s picture

21 Oct 2015 - 9:16 pm | के.पी.

चॉकलेट! माझ्या खुप आवडीचं. लेख छानच आहे. पूर्ण वाचेपर्यंत तोंड चॉकलेटमय झालं आणि चॉकलेट खाऊन प्रतिसाद द्यायला आले ;)

चॉकलेट च्या इतिहासाविषयी इतकी सुरेख, तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद स्वाती. मस्तं रुचकर लेख.

त्रिवेणी's picture

24 Oct 2015 - 11:18 am | त्रिवेणी

ढुष्ट स्वाती तै.

नूतन सावंत's picture

24 Oct 2015 - 7:02 pm | नूतन सावंत

स्वाती,तुला आवडणारी चॉकलेट्स् बक्षीस माझ्याकडून.

अनन्न्या's picture

26 Oct 2015 - 4:46 pm | अनन्न्या

चॉकलेट पाहून विसरलेच! खूप सविस्तर माहिती गोळा केलीस . आता आज परत फोटो पाहिले म्हनजे परत चॉकलेट खायला पाहिजे.

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2015 - 4:23 pm | पिलीयन रायडर

अत्यंत चविष्ट लेख!! चला २ चोकोलेट्स तोंडात टाकुन येऊ!!

रेवती's picture

28 Oct 2015 - 10:18 pm | रेवती

अभ्यासपूर्ण लेखन आवडले. चॉकलेटच्या जन्माच्या आधीपासूनची माहिती यात आहे. फोटो तर आकर्षक आहेतच. ;)

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:09 pm | कविता१९७८

लेखन मस्त, फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले पण वजनाचा काटा समोर दिसु लागलाय .........