वैदर्भीय खाद्यसंस्कृती

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:25 pm

नमस्कार लोकहो, काय म्हणताय? बरे आहात ना समदे? ठीक हाव ना? तर मी आता तुम्हास्नी जरा विदर्भाच्या खाण्यापिण्या बद्दल, तिथल्या लोकांच्या आवडी निवडी, सवयी याची जरा माहिती देतेय या लेखातून. त्याचं आसं झालं, की आम्ही अनाहितानी रुची विशेषांक काढायचे ठरिवले. मंग आता तेच्यात विदर्भाचा लेख पायजे म्हंजे पायजेच. विदर्भातले लोकांनी कावून मागे राहायचे? न्हायतर उपोषण हायेच ठरलेले मालकांकडे. पन तशी वेळ काही आमच्या अनाहितात कधी येत न्हाय. समद्यांनी मिळून ठरिवले की समस्त अनाहिता महिला मंडळाकडून विदर्भाची प्रतिनिधी म्हनून मी लेख लिहिणार. आता काय सांगू तुम्हाला, आम्ही लोक कुठेबी असलो ना, तरी जेवनाले विदर्भाची चव आल्याबिना घास काही घशाखाली धकेना बघा. त्यातून आमी परदेशात राहतो ना, तिकडच्या काही काही भाज्या इकडे भेटत न्हाईत, इकडच्या थंडीत तिथले प्रकार मानवत न्हाइत, मंग अजूनच आठवण येउन जाते या पदार्थांची. म्हंजे तसे समद्यांचेच होते म्हणा आपापल्या भागा विषयी. तर काये, या विदर्भाच्या पदार्थात लोकायले दिसते फकस्त तिखट सैपाक अन तेलाची तर्री, बाकी आपण सगळे लोक खातो तसेच. पण काये ना बाप्पा, ते समदे तर हायेच. तेल जरा ढिल्या हाताने असतंच, पर त्याच्या संगत आजून बी बरंच असतं इकडं सैपाकात. आता काय काय असतं ते वाचाच तुम्ही लेखात पुढं.

आता तशे वाचणारे सुज्ञ वाचक असतील अन त्यांना विदर्भ म्हंजी कुठे, किती जिल्हे हे माहीत असीन, पण तिकडे शहरातले, आपल्या महाराष्ट्रातलेच लोक असत्येय की ज्यांना विदर्भात उन्हाळा, शेतकरी आत्महत्या आणि संत्री एवढेच माहित राहते, गेलाबाजार शेगांव कचोरी. म्हणून हे बी एक्ष्ट्राचे सांगूनच टाकते. तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा ह्ये समदे जिल्हे म्हंजी विदर्भ. तसा रोजच्या जेवणात समद्या महाराष्ट्रात असतं तसंच जेवतात. वरण भात भाजी पोळी, सणावारी गोड. पण जो काय फरक हाये ना इकडे, तो होतो मेन म्हंजी इकडे शेतात काय पिकते त्यावरून. त्यात बी पूर्वीच्या काळी काय पिकायचे त्यावरून. आता तर इंटरनेटच्या जगात इकडची संत्री झटक्यान तिकडे आन तिकडचे पिझ्झे इकडे. पण पूर्वीच्या काळी ज्या पद्धती व्हत्या, त्या अंगात मुरलेल्या असतेत एकदम. मग त्येच घरात बनते अन तेच खाल्ले जाते. अन पिकाचे बघाल तर जमीन कशी, हवामान कशे, पाणी किती सगळ्या गोष्टी म्याटर करत्येत. पुन्हा ते खाल्लेलं झेपेल असं काम पण पायजे. म्हणून शेतकऱ्याचे जेवण वेगळे, साहेबाचे वेगळे. पुन्हा हर एक घरात, समाजात पद्धत वेगळी राहतेच न्हवं. नागपूर साईडले म्हणजे चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा ते उमरावती परेंत अन पुढे अकोला, वाशिम, बुलढाणा तिकडे बी छोटे मोठे बदल दिसून येतेत. तर हे जे मी लिहिणार ना, त्यात जेवढं शक्य हाये ते कव्हर करत्ये, अन अजून जर म्या काही विसरून गेली, तर मला आठवण करून द्या तुम्ही.

तर आपले मराठी लोकांचे जेवणात पहिले राह्यते पोळी आणि भात. तर विदर्भातले बहुतेक लोक हे भाताबिगर राहू शकतेत, पण पोळी नाहीतर भाकरी पायजेच. भात खातेत म्हणजे, न्हाई असे न्हाई, अगदी आवडीने बी खातेत, तुम्ही ऐकले असीन की नागपूर साईडला तर एकदम पहिला भात, मग पुन्हा शेवटचा भात अन त्योबी येकदम आवडीने खातेत लोक. पण पोळी पायजेच. आन हां, पुन्हा शब्दांचे गोंधळ नको. फुलके करा, न्हायतर तेल लावून घडीच्या पोळ्या करा, त्या सगळ्या आमच्या पोळ्याच. काही ठिकाणी चपाती पण म्हन्त्येत पण पोळीच जास्त करून म्हणतात लोक. ज्वारीची भाकर म्हणजे इकडचा लैच आवडणारा प्रकार. तुम्ही पावसाळ्यात कुठेबी जासाल ना फिरायला, शेतात ज्वारीची कणसं दिसलीच पायजे. ज्वारीच्या भाकरी खाऊन पण जीव कंटाळते ना बाप्पा. मंग त्यात उडीद मिसळून कळण्याची भाकर होते. आता भाकरीसोबत चटणी न खावून कसं चालीन? अन त्या चटणीत तेल न घालून तर विदर्भातले लोकायला जमेचना. काय म्हणता, ठेचा विसरला का? असं कसं म्हणता? भाकर आन वर्हाडी ठेचा. एकदम वर्ल्ड फ़ेमस. लाल मिरच्या, लसूण, अद्रक, लिंबाचा रस…बास मले लिवता लिवता डोळ्यासमोर धूर दिसू राह्यला. आणि वरतुन परत कच्चं तेल घ्या. त्ये काये ना, विदर्भात तेलाचा वापर लैच होतो. आता तो चूक की बरोबर, प्रकृतीला मानवते की नाही वगैरे चर्चा वेगळी, म्हणजे बघा पिठलं कोरडं असतं, घ्या वरून तेल. झुणका कोरडा, घ्या तेल. चटण्यात तेल. वडाभात खाते तवा तर त्यावर फोडणीचे तेल असतेच. तर पोळी अन भाकरीवरून तेलाकडे आलो बघा आपण. चटण्या आपल्या नेहमीच्याच हो, तीळाची, जवसाची, दाण्याची, कारळाची वैगरे, आणि अंबाडीची चटणी, करवंद आले की लोणचं, कवठाची चटणी अशे लई प्रकार भाकरी सोबत अन पोळीसोबत तोंडी लावायाले.

आता भाताचं कसय, नागपूरले बघाल तर बटाटे भात, वांगी भात, तोंडली भात, मसालेभात काय विचारू नका. वरण भात तर हायेच, पण खास नागपुरी गोळा भात, वडा भात ह्येबी लई फ़ेमस. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आमटी म्हनतेत, पण आमच्याकडे कुठ्ल्याबी डाळीचे वरण करू देत, सगळे वरणच. मग साधे वरण की फोडणीचे वरण हाच काय त्यो फरक. मग ती फोडणी लसणाची, की कांदा टमाट्याची, की आमसूल घातलेले वरण, चिंच गुळाचे वरण नाहीतर कैरीचे वरण. आमटी हा शब्द फक्त तेवढा न्हाय वापरला जात इकडे. अन त्यात पण तूर डाळीचेच वरण जास्ती करून. मुगाचे, मसुराचे, उडदाचे पण असत्ये, पण इकडे शेतात तूर म्हणजे शेतकऱ्याचे सगळ्यात मुख्य कडधान्य. शिजवलेलं घट्ट वरण अन वरून कच्चा कांदा, तिखट अन काळ्या मसाल्याची फोडणी ह्ये बी मस्त लागतं. खिचडीत बी तुरडाळ जास्त. त्यात पण बघा, जेव्हा शेतावर तूर येते ना हिरवीगार अन कोवळी, त्याचे दाणे सोलाचे, मस्त तेलावर परतायचे, वाटायचे अन नेहमीची फोडणी द्यायची. हिरवागार रंग येतो ना याला, अन तेच्यासोबत कांदा घ्या कच्चा, अन भाकर नाहीतर पोळी नाहीतर भात. समदं असं जमून येतं ना की ज्याचं नाव तिकडे. अन हिवाळ्यात हुरडा. शेतावर हुरडा पार्टी अन घरी पण हुरड्याचे पदार्थ.

तूर डाळ - शेंगा, हिरवे दाणे - आंतरजालावरून साभार

.

गोळा भात

.

आपल्या नेहमीच्या भाज्या तर होतातच, पण त्यात पण पेशल आयटम आहेत काय काय. लाल भोपळ्याची मसालेवाली भाजी, म्हणजेच बाकरभाजी. खोबरे, खसखस, अन खडा मसाला सगळ्याचे मिळून बनवतेत. सणावारी तर लई झ्याक. इकडे ओलं खोबरं कमी हाय तसं सैपाकात. जास्ती करून सुकंच. पालेभाज्या तशा भेटतेत सगळीकडेच. पण त्याची पातळभाजी नाहीतर डाळभाजी जास्त करत्येत लोक. हरभऱ्याची डाळ नायतर तुरडाळ घालून पातळभाजी आन त्याच्यावर बी फोडणी वालं तेल पायजेच, मस्त लसूण घालून. ढेमशाची भाजी पण खावी ती विदर्भातच. साधी फोडणीद्या, न्हायतर त्यात मस्त खोबरे खसखस वाटण करा, भरली करा, उन्हाळा ढेमशा बिगर जातच नाय. चिवळ नावाची एक पालेभाजी असत्ये, ती बी उन्हाळ्यात असत्येच. तब्येतीला एकदम थंड. ही निवडायला डेंजर एकदम, पण खायला एक नंबर लागते. अन तर्रीवाल्या भाज्यांचे काय सांगू, तेलच तेल पुन्हा. मसाल्यांच्या नावातही गोंधळ होऊ शकतो. जेवणात वापरला जातो तो काळा मसाला. आता यात बी घराघरात बदलते गोष्टी. काही ठिकाणी यात कांदा सुकवून त्याची पूड करून घालतात मसाल्यात आणि तो काळा मसाला. तर काहीजण नेहमीचाच गोडा मसाला जरा जास्त भाजून घेतेत म्हंजी रंग बदलतो. त्यामुळे विदर्भात गोडा मसाला म्हणून पटकन भेटत नाय कुठे. काळा मसालाच. आता उन्हाळा अतिशय खडतर. मग खाण्यात थंड आले पायजे ना बरंच. कांदा लई औषधी बघा या दिवसात, उन्हाळ्यात तर कुठेबी जा विदर्भात, घरोघरी कांदा असत्योच. कांद्याचा झुणका अन भाकर हे सांगायचे विसरलेच बघा मी. इतर भाज्यांमध्ये पण बेसन लावतात खुपदा. काकडीचे थालीपीठ पण करतात. पण अजून एक खास म्हणजे काकडीचा कोरोडा. काकडीचे पिठले म्हणू शकता तुम्ही बाप्पा. अन हे काय फकस्त व्हेज आयटम नाहीत बरं का विदर्भात. वऱ्हाडी चिकन, सावजी चिकन, मटण ह्येबी फ़ेमस सगळीकडे. तर्रीवाले वऱ्हाडी चिकन खाल्ले असेन तर समजेन की एवढी तेल तेल का करून राहिली मी अक्ख्या लेखात. वेड लागेल बघा तुम्हास्नी ते चिकन खाउन.

चिकन (साभार - मिपाकर सोन्याबापु)

.

दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार

आता सणावारी गोड काय करायचं? ओल्या नारळाचे पदार्थ जास्त करून सणावारी. हल्ली होतात नेहमीच. नारळाच्या करंज्या, सगळ्या प्रकारच्या खिरी, न्हायतर मग श्रीखंड, बासुंदी, पुऱ्या सगळे नेहमीचेच गोड पदार्थ. हां आणि जसे तिखट खाण्यात इथल्ले लोक पुढे, तशेच गोड खाण्यात बी. फकस्त या गोडात गुळ कमी अन साखर जास्त. संक्रांतीला पण तिळगुळ म्हणून तीळ साखरच जास्त. अन पुरणपोळी तर तुम्ही एकदा खाऊनच बघा विदर्भात. सर्वात जास्त पुरण भरूनही एकदम पातळ सुंदर पोळ्या लाटण्यात विदर्भाचा नंबर पहिलाच. काही ठिकाणी तुरीच्या डाळीचे पण चालते पुरण. त्यातही पुरणात साखर जास्त, गूळ कमी. कुणी म्हनतेत की साखरेने जमत नाय, तर आम्ही सांगतो तुम्ही आधी खाउन बघा अन मंग बोला. बर ती पुरणाची पोळी खायची कशी. पहिले ते पोळी गोल पसरायची, चांगले चार पाच चमचे तुपाने तिला आंघोळ घालायची. मग एक घडी घालायची, पुन्हा तूप ओतायचे, मग पुन्हा घडी घालून ती चतकोर आकाराची होईल तेव्हा त्यावर परत तूप आणि मग वदनी कवळ घेता म्हणायचे, विदर्भातले लोक भारतभर कुठेही असले, तरीही पुरणपोळी वाढणार्याला हमखास सांगतील, बाई, आपल्या अस्सल वऱ्हाडी पद्धतीने तूप वाढ. बरेच जण तर तुपाची वाटीच घेतात पानात. पुरणपोळी तुपात बुडवून तिला आंघोळ घालून खायची. सणावाराला जेव्हा पुरणपोळी होते, तेव्हा तर सगळा नैवेद्याचा सैपाक. आता तोही प्रत्येक घरात, समाजात बदलतो. कुणाकडे आलं लसूण जास्त तर कुणाकडे नाई. अशा जेवणात विदर्भात मठ्ठा, मसालेभात, मोकळी डाळ, पालकाची पातळ भाजी, सुकी भाजी म्हणून बटाटा किंवा लाल भोपळ्याची भाजी. आणि एक, यातला मठ्ठा असेन की नाही याची जरी खात्री नसली, तरी कुळाचार असू द्या, नायतर कधीही पुरणपोळी किंवा काही सणाचा स्वयंपाक असू द्या, कढी असतेच. जणू नियमच. गोळाभात, वडा भात या सगळ्याच पदार्थांसोबत कढी हवीच. मग या जेवणाच्या शेवटी वडा भात किंवा भजी भात हवाच. त्यावर फोडणी हे काय सांगायला पायजे का आता? वेगवेगळ्या डाळी भाजून त्याचा भरडा करायचा अन त्याचे वडे तळायचे अन भातासोबत खायचे, झाला भरडा भात. महालक्ष्म्या तर अशा तृप्त होतेत ना हे जेवून. लई समाधान वाटते मग.

बर मला एक सांगा, तुम्ही शाळेत असाल तेव्हा बोरकूट खाल्लं असीन ना? तर त्ये बी तसा आमच्या इकडचा पदार्थ. एवढे कडक उन की काय सांगू. बोरं वाळवायची आणि मग त्याची पूड करायची. वर्ध्यातले केळकरांचे बोरकूट म्हाईत असते लोकायले. पाकातली बोरं बी अशीच. आता त्या विष्णुजी की रसोई मधी भेटतेत तर लोक मिटक्या मारू मारू खातेत म्हणे. उन्हाळ्यात वाळवण तर खूप होतेत. बटाट्याचे पापड, कुरड्या, बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या पापड्या, मुगोड्या नायतर मुगवड्या, खारोड्या किती प्रकार. आमरसाचे जेवण असले की हे सगळे पायजेच.

आजून एक, संध्याकाळच्या वेळी सगळ्यालेच भुका लागतेत. मग रोज रोज काय कराचे. तर नेहमीच्या आपल्या पदार्थासोबतच इकडचे काही पेस्शल आयटम सांगते. कच्चा चिवडा, पण कसा करायचा. असा आपापल्या घरापुरता होतच न्हाय हा. त्यासाठी शेजारपाजारच्या चार सहा बायकांनी एकत्र यायचे, कुणाच्यातरी अंगणात. रद्दी पेपर घ्यायचे आणि एक मोठ्ठ घमेलं घ्यायचं, गप्पा मारता मारता एकीने कांदा चिरायचा, एकीने टमाटा, तोवर कुणीतरी पातळ पोहे हलकेसे भाजून आणतं, मग त्यात चिरलेला कांदा टमाटा घालायचा, वेळ असल्यास डाळवा आणि शेंगदाणे फोडणीत घालायचे, थोडसं लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं घालायचं, चवीला मीठ साखर घालायची आणि सगळं एकत्र मिसळून तयार झाला कच्चा चिवडा. उन्हाळ्यात अजून एक पोरासोरांना अन म्हातार्यांना आवडते ते म्हणजे सातूचे पीठ. सातूचे पीठ, साखर आणि दुध मिसळून खायचे आणि तिखट पायजे असेल तर त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा, टमाटा, ताजं लोणचं, मीठ, साखर घालायचे, यात वरून थोडे कच्चे तेल घ्यायचे की एकदम चटपटीत आयटम तय्यार. आणि काकडी घ्यायची, उभ्या फोडी चिरायच्या, त्या या पिठात घोळवा यच्या अन खायच्या. उकरपेंडी पण अशीच, उपम्याचीच बहीण, फक्त कणिक (गव्हाचे पीठ) वापरून केलेली. नेहमीची फोडणी करून तेलावर कांदा परतून घ्यायचा, शेंगदाणे घालायचे, मग कणिक परतून घ्यायची आणि व्यवस्थित भाजली गेली की यात हळूहळू पाणी घालायचे, एक मस्त वाफ आणायची आणि पुन्हा वरून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून दह्यासोबत खायची. पुडाच्या वड्या हा बी एक अस्सल विदर्भातला प्रकार. आता पुडाच्या वड्या म्हणजेच सांभार वड्या. आता प्रश्न येईल सांभार म्हणजे काय? इडली सोबत असतो तो? तर विदर्भात कोथिंबिरीला सांभार म्हणतात आणि या पुडाच्या वड्या म्हणजे कोथिंबिरीच्या वड्या, पण खास विदर्भीय पद्धतीच्या. कोथिंबीर, सुके खोबरे, खसखस वापरून सारण करायचे, ते कणिक आणि बेसनाच्या पारीत भरून त्या तळायच्या आणि गरमागरम खायच्या. वेळखाऊ काम एकदम पण चवीला एकदम भारी.

उकरपेंडी आणि पुडाच्या वड्या

.

.

अजून बरेचदा काय व्हते, शब्द वेगळे राहते विदर्भात. पदार्थ त्योच, पण नावामुळे गोंधळ होतो बघा. आता साबुदाण्याची उसळ म्हणतो आम्ही अन बाकीचे लोक खिचडी म्हनतेत. बरं अजून एक, विदर्भात उपासाले सांबार खात न्हाय कुणी, म्हणजे कोथिंबीर खात न्हाय अन काकडीबी काय काय जणच खात्येत. पिठ्ल्यालाच तिकडे बेसन पण म्हणतात. रावण पिठले म्हैतेय का. एकदम तिखट जाळ. लाल भोपळ्याला गंगाफळ पण म्हणतात, अन खरबुजाला डांगर बी. फोडणीच्या पोळीला कुस्करा म्हणतो आम्ही, पोळी कुस्करतो म्हणून कुस्करा. फ्लॉवरला फुलकोबी आन कोबीला पानकोबी. प्रत्येक भाषेची काहीतरी वेगळीच नावे, पण त्यातच मज्जा असत्ये ना बाप्पा.

आता तुम्हाला अजून सांगते, की तुम्ही विदर्भात कधीबी कुठेबी फिरायला गेलात तर काय खासान. आता तुम्ही जर वर्धेत जाल, तर तिकडे आलुबोंडा मिळतो. म्हणजे? बटाटेवडा. पण नुसता न्हाई, त्याच्या सोबतीला असतो एकदम तर्रीवाला रस्सा. आलुबोंडा म्हटले की तो रस्सा सोबत हवाच. आता ते सामोसा चाट वगैरे जे मिळते ना, तर किती वर्षांपासून बघा तिकडे वर्धेत दही सामोसा मिळतो. तोबी खाऊनच बघा. तिकडे वर्धेतच गोरस भांडार नावाचे दुकान आहे, पार महात्मा गांधीजी होत्ये तिकडे तेव्हा सुरु झालेले. तिथे गोरसपाक मिळतो, गायीच्या शुद्ध तुपात न्हालेली बिस्कीट. शेगांवला जवा येसान, तवा तर तुम्ही कचोरी खाल्या बगैर जाउच नगा. तिथे बी बदमाष लोक राह्यते. त्ये कुनीबी आमचीच खरी कचोरी म्हणून फशिवातात. पण तिथल्या रेल्वे स्टेशनासमोर एक दुकान हाये तिरथराम करमचंद शर्मांचे. तिथली खरी शेगाव कचोरी. अकोल्याले जी पाणीपुरी भेटते, तीबी खासच. अन तिथेच खस्ता मिळतो या पाणीपुरीच्या गाड्यांवर. मैद्यापासून बनवत्येत पापडी सारखा प्रकार अन त्याच्यावर दही, कांदा, टमाटा, शेव घेऊन खायचा हा खस्ता. एकदम तोंपासू बघा मिपाच्या भाषेत. नागपुरले जासान तर सावजी चिकन म्हणू नका, पुडाच्या वड्या म्हणू नका, नवीन झालेले ते हल्दीरामचे संत्रा बर्फी, सोनपापडी म्हणू नका. खाण्यापिण्याची काय चिंताच करू नका. तुम्ही बुलढाण्याले जर येसान, तर इथंबी मेजवानी हाय नुसती. मराठवाडा पण शेजारी अन खानदेश पण. तर समद्यांचा इफेक्ट दिसत्यो तिथे. मिरच्यांची भाजी…व्हय व्हय, आपल्या बारक्या हिरव्या मिरच्यांची असत्ये ही भाजी. आंबट चुका, मिरच्या, कांदा, सुकं खोब्र, दाण्याचा कुट अन डाळ असं घालतेत. पावसाळा सुरु झाला की गावागावात पार्ट्या असतेत मिरच्यांच्या भाजीच्या. भाकरी कुस्कारायाची, त्यात ही भाजी, वर कच्चं तेल आणि सोबतीला लिंबू, कांदा. मंदिराच्या आवारात, कुणाच्याही अंगणात, शेतात, आज काय बेत तर मिरच्यांची भाजी. अन शेतात पार्टीला दुसरे काय तर वांग्याची भाजी आणि बिट्ट्या. बिट्ट्या, बाफल्या, बाट्या समदे तशे एकाच प्रकारचे, थोडासा आकारात, पिठाच्या प्रमाणात फरक. बिट्ट्या चुलीवर भाजतेत, बाफल्या वाफवून तळून घेतेत. आन खामगावच्या एस टी स्टँडावर भेटणारा उसाचा रस एकदम एवन. अशा बऱ्याच गावात बऱ्याच गोष्टी हायेत. पण या जेवढ्या मले आठवल्या, तेवढ्या मी सांगितल्या. तुम्हास्नी म्हाईत असतील तर घाला भर तुमी अजून.

मिरच्यांची भाजी

.

तसं अक्ख्या विदर्भाची एवढी खायची प्यायची माहिती आहे, की लिहावं तेवढं कमीच. प्रत्येकाच्या घरात विचारले तर नवीन गोष्टी कळतील मला पण. म्हणून आत्ता ह्ये एवढेच पुरे. तर आता विदर्भ वेगळा हवा की नको वगैरे चर्चा राहूद्यात बाजूला, अन करा यातलेच काहीतरी झणझणीत पदार्थ, सोबतीला गोडही करा आणि मग ताणून द्या. अक्खा विदर्भ येऊ द्या सपनात. काय म्हणताय, कधी येऊ खायला वैदर्भीय पाहुणचार?
कधीही या. वऱ्हाडी आग्रह कसा असतो हे ऐकले असेन तुम्ही, नसेल तर सांगते. चार पोळ्या खाणार असाल, तर २ खाऊनच थांबा. अजून ३ तरी आग्रहाच्या खाव्या लागतील हे ध्यानात असू द्या. बास, बाकी मी काय लिहू अजून, इकडचा दुष्काळ मिटू देत, आत्महत्त्या थांबू देत, काळ्या मातीत भरघोस पीक येऊ देत आणि हे सगळे पारंपारिक पदार्थ जगभर पोचू देत अशी इच्छा.

तळटीप:
अस्सल वैदर्भीय किंवा वऱ्हाडी बोलीभाषा मला येत नाही. तिथले अनेक शब्द वापरात आहेत परंतु संपूर्ण ग्रामीण किंवा बोलीभाषेची सर या लेखाला नाही. आजवर मी जी भाषा ऐकली आहे, त्यातून हा लेख ग्रामीण भाषेत लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. तो परिपूर्ण नाही याची जाणीव आहे. त्याचबरोबर लेखात जर वैदर्भीय खाद्यसंस्कृतीच्या अनेकविध वैशिष्ट्यांपैकी काही आली नसतील तर अवश्य सांगा. धन्यवाद.

मिसळपाववर पूर्वप्रकाशित वैदर्भीय पदार्थ:
गोळा भात
उकरपेंडी

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 11:12 am | पैसा

काय वर्णन! काय वर्णन!! किती छळ करून र्‍हायले तुमी!

अमृत's picture

16 Oct 2015 - 11:49 am | अमृत

असं कावून म्हनताजी की वैदर्भिय भाषा येत नाही...

लहानपणी ५रू ला मिळणारा गोरसपाक आता १५० च्या वर गेला आहे. अन तुमी वर्धा (पू)आताचे सेवाग्राम रेल्वे स्तेशनचे वडे विसरलानंजी. समाधानचा आलूबोंडा अजुनपण दुसर्यादिवशी सकाळी धावाधाव करायला लावतो :-)

बाकी त्या पुडाच्या वड्यांना आम्ही सांभारवड्या म्हणतो. तूरीच्या दाण्यांची व कांद्याची हरबरा (चणा)दाळ घालून केलेली मसाला भाजी विसरलाजी तुम्ही.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:09 am | मधुरा देशपांडे

धन्यवाद. :)
व्हय जी, ते वर्धा पुर्वचे वडे खायला मला कधी भेटलेच न्हाय भाऊ, पण आईकडुन लई वेळा ऐकेल हाय. आणि ती भाजी बी विसरले बघा, अजुन तशा काय काय भाज्या विसरले हे लेख पाठिवल्यावर आठवलं. आता पुढच्या टायमाला. आन तुमच्या घरी झाल्या यातया भाज्या तर पाकृ येऊ द्या इकडं मिपावर.

मित्रहो's picture

16 Oct 2015 - 12:38 pm | मित्रहो

अस काही वाचल का तोंडाले पाणी सुटते नं बाप्पा. बायकोले काही म्हटल तर ते उरावर धावन न आमच्या. यायले नुसती खाय खायच हाय म्हणून.
तस आजकाल विदर्भात पोहे म्हटले का नुसते पोहे भेटतच नाही त्याच्यावर तो रस्सा आन चिवडा आलाच पायजे. उमरावतीले राजकमल चौकात टाकीजच्या बाजूले पुडाची वडी (सांभारवडी) भेटे आधी. येक नंबर.
गोरसपाक आणि गोरस भंडारचे दूध मजा. गोरस भंडारवाल्यायचा पेढा बी लइ खास. केळकरच्या राजमलाइचीबी आठवण झाली. बोरकुट मार्केटात भेटायच्या आधी आमची आजी वावरातले बोर वाळवून बोरकुट करे.
आमची एक आजी तेलंगणातली. ती गोळाभातासंग चिंचेचा सार करे. विदर्भात आमटी आहे पण ती शेंगदाण्याची उपासाला खायची.
एक अजून पदार्थ म्हणजे पांडगे (काही त्याला रोडगे की काही म्हणतात असेही ऐकले). कणकीचे गोळे करुन ते गोळेच गोवऱ्याच्या जगऱ्यात (जगर म्हणचे शेणाच्या गोवऱ्या , काही तुराट्या मांडायच्या आणि पेटवायच्या) शिजवतात. जसे तंदुर मधे तवा न वापरता पोळ्या भाजतात तसाच काहीसा प्रकार आहे. त्यासोबत वांग्याची भाजी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा.
विदर्भात पोळ्या खातात हे खर असल तरीही चंद्पूर, गडचिरोली आणि भंडाऱ्याच्या भागात भातच खातात. लग्नाबिग्नात तर असा भात वाढतात का नागपूरवाल्याची पार पंचाइत होते.

अमृत's picture

16 Oct 2015 - 1:57 pm | अमृत

आताशा मिळत नाही कुठेच :-( लहानपणी खूप खूप खाल्लेत.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:14 am | मधुरा देशपांडे

हो चिंचेचं सार माझ्या मावशीकडे असतं, घराघरात पद्धती बदलतात. गोरस भंडार आणि निर्मल बेकरी हे दोन्ही वर्ध्यातले फेव्हरेट. राजमलाई तर लहानपणी वेड्यासारखी खाल्ली आहे. नुकतेच भारतात गेले होते तेव्हा वेगळ्या रॅपरमध्ये राजमलाई असे नाव दिसले, लगेच घेतले पण चव अजिबातच आवडली नाही, बहुधा काहीतरी फ्लेवर देण्याच्या नादात बिघडले असावे. आता नाहीच मिळत तशी पुर्वीसारखी.
हो रोडगे म्हणतो आम्ही पण. प्रतिसादातुन माहितीती भर घातल्याबद्दल धन्यवाद.

मितान's picture

16 Oct 2015 - 1:17 pm | मितान

खास स्टाईल !
खूप सुंदर लेख मधुरा !!

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 1:25 pm | प्रीत-मोहर

नधुरा बादलीभर लाळ गळालेली आहे. आता आरोही नाय्तर त्रिवेणीला सतवणे आले.

अनन्न्या's picture

16 Oct 2015 - 5:40 pm | अनन्न्या

वा एकदा यायला पाहिजे विदर्भात...परवाच भोपळ्याची बाकर भाजी करून पाहिली छान चविष्ट लागते.

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 7:14 pm | स्वाती दिनेश

मधुरा, श्वेट्झिंगनमध्ये विदर्भ अवतरणार असेल तर लवकरात लवकर भेट घ्यायला हवी आहे,:)
मस्त, खमंग लेख!
स्वाती

स्रुजा's picture

16 Oct 2015 - 9:37 pm | स्रुजा

रेलचेल आहे नुसती सुरेख पदार्थांची. मेहनत करुन आमच्या समोर आणलेल्या या सुंदर लेखासाठी खुप खुप धन्यवाद. तुम्हा तिघी चौघींमुळे मला विदर्भीय पदार्थ नुसते कळलेच नाहीत तर मनापासुन आवडायला लागले आहेत. घरी जेवायला येणार्‍या मित्र - मैत्रिणींवर पण मी तुमच्या जीवावर हे प्रयोग करते आणि ते यशस्वी होतात. तू, त्रि आणि आरोही ला कधी औपचारीक धन्यवाद द्यायची गरज वाटली नाही पण आज सांगितल्याशिवाय राहवलं नाही.. विदर्भा च्या पदार्थांइतक्याच खमंग मैत्रिणी माझ्या .. लव्ह यु :)

काय सुरेख लिहिलं आहेस माय!विदर्भात जाणे आले!

लेखन एकदम आवडलं. एकेक पदार्थ खुलवून, निवांतपणे सांगितलाय. साखरेची पुपो फारशी खाल्ली नाहीये. तुझ्या पद्धतीने गोळाभात हा आता माझा नेहमीचा पदार्थ झालाय.
विदर्भ वेगळा करू नका म्हणावं. ;) आता भेट द्यायला हवी तिकडे (असे नेहमीच वाटते).

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 1:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

मधुरा तै,

लेख लैच तर्रीबाज झाला वं!!! लै म्हणजे लैच ख़ास ! आमच्या ब्रह्मचारी (बायको माहेरी गेल्या कारणे) चिकन फोटु ची इतकी ख़ास मांडणी केली ताई तू नं!! कायच बोला! कितीच् बोला!!

बाकी

आता सणावारी गोड काय करायचं? ओल्या नारळाचे पदार्थ जास्त करून सणावारी. हल्ली होतात नेहमीच. नारळाच्या करंज्या, सगळ्या प्रकारच्या खिरी, न्हायतर मग श्रीखंड, बासुंदी, पुऱ्या सगळे नेहमीचेच गोड पदार्थ. हां आणि जसे तिखट खाण्यात इथल्ले लोक पुढे, तशेच गोड खाण्यात बी. फकस्त या गोडात गुळ कमी अन साखर जास्त.

विदर्भ असलाच दिलखुलास आहे आमचा, बोली लुक्स अन वागण्यात आम्ही तराट अन तिखट असतो पण प्रेमही तितकेच गोडीनं करतो ह्याचे उदाहरण म्हणजे मधुरा तै न सांगितलेली गोडाची रीत ! सगळे काही साखरेत , आमचे आजोळ पश्चिम महाराष्ट्रात तिकडे दुधात बुडवून खायला पूरणपोळी बनते ती गुळाच्या पूरणा ची मले ते कधीच नाही जमली (रागवु नका अर्थ हां की ती टेस्ट नाही विकसित झाली) आमच्या आईला दोन्ही पूरणपोळ्या झकास जमतात साखरेचे पूरण भरलेली पोळी अन वरतुन तुपाची धार चमचा/भांडे ह्याने न धरता सरळ शेजारी वाटीभर साजुक तूप ही आमची पद्धत , बरं खाणारे किती पट्टी चे असतील ? जुन्या आमदनीतले आमच्या एका मित्राचे फादर आहेत त्यांना पुरणपोळी वर भरपुर पीठीसाखर अन तूप असे पसरुन खायची आदत होती! आमच्या घरी आम्हाला स्वतःला पुरणपोळी श्रीखंडाशी लावुन खाणे आवडते ! अतिरेकी गोडवा!

स्वगत टिप :- आता तै लोकांचा आदर्श ठेऊन एक लेख अकोला खादाडी वर लिहा लागते बापा!

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:16 am | मधुरा देशपांडे

धन्यवाद सोन्याबापु. अकोल्यातल्या खादाडीवर लिहाच. वाट बघतेय. खूप वर्ष झालीत अकोल्यात जाऊन, पण खस्ता आणि पाणीपुरी साठी परत जायला पाहिजे.

होबासराव's picture

19 Nov 2015 - 4:24 pm | होबासराव

स्वगत टिप :- आता तै लोकांचा आदर्श ठेऊन एक लेख अकोला खादाडी वर लिहा लागते बापा!

भौ तुम्च्या लेखाले आपलाबी थोडा खारीचा वाटा र्‍हाइन ना बाप्पा, लेख लिव्याले सुरु तर करा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 1:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

मधुरा तै,

लेख लैच तर्रीबाज झाला वं!!! लै म्हणजे लैच ख़ास ! आमच्या ब्रह्मचारी (बायको माहेरी गेल्या कारणे) चिकन फोटु ची इतकी ख़ास मांडणी केली ताई तू नं!! कायच बोला! कितीच् बोला!!

बाकी

आता सणावारी गोड काय करायचं? ओल्या नारळाचे पदार्थ जास्त करून सणावारी. हल्ली होतात नेहमीच. नारळाच्या करंज्या, सगळ्या प्रकारच्या खिरी, न्हायतर मग श्रीखंड, बासुंदी, पुऱ्या सगळे नेहमीचेच गोड पदार्थ. हां आणि जसे तिखट खाण्यात इथल्ले लोक पुढे, तशेच गोड खाण्यात बी. फकस्त या गोडात गुळ कमी अन साखर जास्त.

विदर्भ असलाच दिलखुलास आहे आमचा, बोली लुक्स अन वागण्यात आम्ही तराट अन तिखट असतो पण प्रेमही तितकेच गोडीनं करतो ह्याचे उदाहरण म्हणजे मधुरा तै न सांगितलेली गोडाची रीत ! सगळे काही साखरेत , आमचे आजोळ पश्चिम महाराष्ट्रात तिकडे दुधात बुडवून खायला पूरणपोळी बनते ती गुळाच्या पूरणा ची मले ते कधीच नाही जमली (रागवु नका अर्थ हां की ती टेस्ट नाही विकसित झाली) आमच्या आईला दोन्ही पूरणपोळ्या झकास जमतात साखरेचे पूरण भरलेली पोळी अन वरतुन तुपाची धार चमचा/भांडे ह्याने न धरता सरळ शेजारी वाटीभर साजुक तूप ही आमची पद्धत , बरं खाणारे किती पट्टी चे असतील ? जुन्या आमदनीतले आमच्या एका मित्राचे फादर आहेत त्यांना पुरणपोळी वर भरपुर पीठीसाखर अन तूप असे पसरुन खायची आदत होती! आमच्या घरी आम्हाला स्वतःला पुरणपोळी श्रीखंडाशी लावुन खाणे आवडते ! अतिरेकी गोडवा!

स्वगत टिप :- आता तै लोकांचा आदर्श ठेऊन एक लेख अकोला खादाडी वर लिहा लागते बापा!

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 7:24 pm | नूतन सावंत

मधुरा,काय लिहून रायली बाप्पा तू.इकडे तोंडातून धार लागली बघ."वद जाऊ कुणाला शरण ग"अशी परिस्थिती झालीय.वर सृजा म्हणते तसं,तरी,आरोही यांनाच शरण जायला हवं.
@सोन्याबापू,अकोला खादाडीवर नक्की लेख टाका.
त्य्रावरून अकोला जिल्ह्यातलया तेल्हारा गावी खाल्लेली भोपळ्याची बाखरभाजी आठवली.
त्याचं असं झालं,माझ्या भावाच्या मित्राच्या घरी गेलो होतो.गणपतीचे दिवस असल्याने त्यांचं जेवण त्यादिवशी,तिथल्या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात होतं.पण आम्हाला ते तिखट जेवण सोसणार नाही आणि आम्ही लगेच निघणार होतो. त्यांनीही कौतुकाने आम्ही मुंबईकर म्हणून कमी तिखटाचं जेवण बनवलं.प्रुरणपोळीचे जेवण,पुढ्यात साजूक तुपाने भरलेल्या वाट्या होत्याच. इतक्यात त्या काकूंनी विचारलं,"थोडी नैवेद्याची भाजी घेणार का?लाल भोपळ्याची बाखरभाजी केलीय."विचार केला की,लाल भोपळ्याची भाजी आहे,किती तिखट असणार शिवाय प्रसाद म्हणून खायचीय.आणि होकार दिला.त्या लगबगीने जाऊन एका बशीत भाजी घेऊन आल्या.चमचा चमचा लोणच्यासारखी वाढली.प्रसाद आहे म्हणून उचलून तोंडात टाकली नि काय?कानातून धूरच आला ना!गिळताही येईना आणि थुंकताही येईना.काकूंचे लक्ष होतेच.त्यांनी पटकन् पुढ्यातल्या तुपाच्या वाट्या पुढे केल्या.आणि वाटीभर तुपाने ती आग शमली.हुश्य,आताही ती आग आठवली की माझा हात तुपाच्या डब्याकडे जातो.

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 9:19 pm | सानिकास्वप्निल

लेख खूप आवडला, विदर्भातले अनेक पदार्थ आवडतात वडा-भात, गोळाभात, सावजी चिकन, बाकरभाजी रचने (तुला माहित आहेच कोण) शिकवलेले लसणीचे तिखट ही खूप आवडतं ;) खिचडी वर हे तिखट मला आवडतं फक्त तिखटाचे प्रमाण मी कमी ठेवते :))

लेख खुमासदार झालाय आणि ग्रामीण भाषेत लिहिल्यामुळे जास्तं आवडला. फोटो पण मस्तं, तोंपासू अगदी.

१०-१२ वर्षापूर्वी माझ्या नागपुरी मैत्रिणीकडे पुरणपोळी खाल्ली होती, ती काही मला रुचली नाही, एकतर पुपो आकाराने लहान, खूपचं जाड, आणि पुरण तुरडाळीचे होते. खांदेशातले खापरावरचे मांडे मात्र खूप आवडले, ते खरे कौशल्यच आहे बनवणार्‍यांचे. पुपो आणि भरपूर तुप स्वर्गीय सुख :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 9:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

सुरंगी तै,सानिका तै,

अकोला जिल्ह्यातच बाळापुर तालुक्यात नवरात्र फार जोरदार असते (बाळा देवी तिथली ग्राम देवता) तिथे आमच्या वडिलांचे एक मित्र आहेत,त्यांच्याकडे पूर्णपणे चारोळी चे पुरण असते, म्हणजे ९-९ किलो चारोळी शिजवुन घोटून पुरण! त्यात जायफळ खैरात! त्यांच्याकडे जेवायला गेले की मजा असे सकाळी ९ पासुन पंगती झड़त ते १२ ला शेवटची मग शिस्तीत जितके पाहुणे आहेत तितक्या लोकांस चटाई अन उशी देत पाहुणे चक्क चारोळी पुरण अन तूप ओरपुन जड़ झाले की तिथेच लवंडत असत, मग ४ वाजता वगैरे उठले की यजमानास विडा सवाष्णि ला साडीचोळी वगैरे करुन पाठवणी होत असे!

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:27 am | मधुरा देशपांडे

स्रुजा आणि प्रीमो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फक्त पोट्ट्याहो, त्रि आणि आरोही खान्देशातल्या. दोन वेगळे भाग. ;)
सानिका, धन्यवाद. तु इकडे येशील तेव्हा विदर्भ स्टाईलने पुपो करेन, आम्ही पण हरभरा डाळच वापरतो, तुला आवडेल नक्की. हो, रचनाताई म्हणजे एकदम अस्सल नागपुरीच.
सुरन्गीताई, हो सहसा जेव्हा प्रसादाला, मोठ्या प्रमाणात जसे देवीचा भंडारा, शेतावर स्वयंपाक करतात तो खूपच तिखट असतो. घरात नेहमी होते तेव्हा तिखटाचं प्रमाण कमी असतं. बाखरभाजीची पाकृ देणार आहे मिपावर लवकरच, फक्त घरगुती स्वरुपातली.
पैसाताई, अजयाताई, मितान, अनन्याताई, धन्यवाद.
स्वातीताई, तु येशील तेव्हा खास वैदर्भीय मेन्युच करेन. लवकर भेटुयात. :)

आरोही's picture

21 Oct 2015 - 8:58 pm | आरोही

माय व !! काय लिहेल शे व तून बैना ....
मले तढली भाषा गैरी आवडस पण बोल्याले काय जमे नि ...तवा मी गैरी लहान व्हते तवा गेल्ती अकोल्याले ..गैरह भारी सैपाक केला व्हता त्या माय न पण मले काही झेपालता नि तिखा लाग्लता मले ..आता तुह्या वडाभात करून खाईन पहिले ..

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2015 - 3:23 am | मधुरा देशपांडे

:) करुन बघ गोळाभात, वडाभात आन सांग मपल्याला कसा झाला व्ह्ता ते.

त्रिवेणी's picture

18 Oct 2015 - 10:51 am | त्रिवेणी

एक नंबर लेख लिहिला आहेस. खरच ग खरच तूच लिहू शकतेस असा लेख.
पण तेवढी आपली मसाला खिचड़ी राहिली बघ. आता उरलेले पदार्थ प्रतिसादत कवर करू या.

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 4:21 pm | मांत्रिक

गोळा भात, उकरपेंडी आणि पुडाच्या वड्या यांची सविस्तर कृती फोटोसहित द्या ही विनंती.
तो गोळाभात तर काय सिरियल किलर दिसतोय! अफाटच. खतराच लिहिलंय.

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 4:24 pm | मांत्रिक

गोळाभाताची रेसिपी लिहायचं मनावर घ्याच! अगदी विनंती.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 8:27 pm | मधुरा देशपांडे

गोळा भात आणि उकरपेंडी दोन्हीची पाकृ मिपावर आहे. लेखाच्या शेवटी दुवे आहेत.

पदार्थ चाखुन पाहिले परवा
बाकी लेख चमचमीत झाला आहे

पदार्थ चाखुन पाहिले परवा
बाकी लेख चमचमीत झाला आहे

स्वाती२'s picture

18 Oct 2015 - 11:07 pm | स्वाती२

मस्त लेख!

उमा @ मिपा's picture

19 Oct 2015 - 10:31 am | उमा @ मिपा

खुसखुशीत, खुमासदार, तर्रीबाज लेख! बोलीभाषेत लिहिलेला असल्याने गोड सुद्धा! हे सगळेच पदार्थ चाखायची खूप इच्छा होतेय. मधुरा, अभिनंदन आणि धन्यवाददेखील, इतकी सुरेख ओळख करून दिल्याबद्दल.
प्रतिक्रियांमध्ये काहीजणांनी लिहिलंय की अजून काही पदार्थ आहेत तर सर्वच विदर्भप्रेमींनी लिहिते व्हा, आम्ही उत्सुक आहोत या मेजवानीचा अजून अजून आस्वाद घेण्यासाठी.

मीता's picture

19 Oct 2015 - 1:54 pm | मीता

मस्त लेख!

चटकदार ओलख..मजा आली वाचताना..

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 7:27 pm | प्यारे१

>>> गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा ह्ये समदे जिल्हे म्हंजी विदर्भ.

किमान खाण्यासाठी तरी वेगळा काढायला नको म्हणून सांगायला हवा नानांना.

श्रीरंग_जोशी's picture

20 Oct 2015 - 10:34 am | श्रीरंग_जोशी

हा लेख वाचता वाचता अनेक जुन्या आठवणी वर येत होत्या, जुन्या चवी जीभेवर पुन्हा येत होत्या. कालौघात कित्येक पदार्थांबाबत विस्मरण झाले होते. आज हा लेख वाचून अनेक सुखद आठवणींचे माणिकमोती अस्ताव्यस्त स्मृतींच्या ढिगार्‍यांतून अलगदपणे वर आले.

या लेखासाठी लेखिकेचा ऋणी आहे.

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2015 - 3:27 am | मधुरा देशपांडे

खूप खूप धन्यवाद!! :)

होबासराव's picture

19 Nov 2015 - 4:30 pm | होबासराव

गव्हाचे पिक निघाल्यानतंर किंवा एखाद्या जत्रेत ला फेमस आयटम राहुन गेलाय्...रोडगे आणि वांग्याचि तिखट रस्सा भाजी, भाताचे आळण करुन त्यामध्ये वरण्...अहा हा

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 3:29 pm | बॅटमॅन

येखादं हाटेल काढा न राजेहो अथीसा, येऊ मग समदे तथीसा =))

ब्यॅट्या बाकि इतर भाषांप्रमाणे वर्‍हाडी पण मस्त बोललास :)

भाषाप्रभु ब्यॅटाचा फॅन
होबासराव

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2015 - 3:52 pm | पिलीयन रायडर

मार डाला...!!
गोळा भाताविषयी फारच ऐकलय राव.. आता खायलाच हवा.. फोटो तर काय कातील टाकलाय!!!

एक नंबर जमलाय लेख!!!

वैदर्भीय पदार्थांचे वैदर्भीय भाषेत वर्णन वा वा !!!

इडली डोसा's picture

20 Oct 2015 - 7:16 pm | इडली डोसा

गोळाभात, बाकरभाजी,उकरपेंडी आणि हे आणि ते सगळ कसं लगेच कोणितरी करुन द्यावं आणि आपण गट्टम करावं असं वाटतयं. मी कधीच हे पदार्थ खाल्ले नाहीयेत आणि आत्ता त्याबद्दल वाचुन अगदि त्यांच्या प्रेमातच पडले. खुप आवडली सगाळ्या वैदर्भीय पदार्थांची ओळख.

मधुरा लेख आवडला गं. माझ्या पण बर्‍याच आठवणी आहेत विदर्भाच्या. वर्‍हाडी खिचडी, वांग्याचे भरीत, पाकातली बोरे, ज्वारीचे पापड, कळ्ण्याची भाकरी, ठेचा, डुबुक वडे, मांडे सगळेच खुप आवडते मला.

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2015 - 3:22 am | मधुरा देशपांडे

धन्यवाद. अगं या खान्देशी स्पेशालिटिज ना. हो पण अकोला, बुलढाणा जिल्ह्यांच्या जवळ असल्याने तिथे प्रभाव आढळतो सगळ्याचा. तु इकडे येशील तेव्हा करु खास या पाकृ. :)

इशा१२३'s picture

21 Oct 2015 - 9:15 pm | इशा१२३

मस्त लेख.पदार्थांच वर्णन वाचुनच तोपासु.खन्देशात राहिल्यामुळॅ ते पदार्थ खाल्लेत.वैदर्भिय मात्र फारसे खाल्ले नाहियेत.आता एकएक करुन पाहिन.

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2015 - 3:27 am | मधुरा देशपांडे

त्रिवेणी, मांत्रिक, सामान्य वाचक, स्वाती२, उमा, मीता, महाराणी, प्यारे१, बॅटमॅन, पिरा, विभावरी, इडो, मृ, आरोही, इशा सर्वांनाच अनेक अनेक धन्यवाद. :)

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 8:22 pm | बोका-ए-आझम

कचोरी काऊन भुलून गेली बे? बाकी वडाभात, गोळाभात, भजीभात, लाल मिरच्यांची आणि मोहरीची फोडणी, तूरडाळ खिचडी,पुडाच्या वड्या, उकरपेंडी हे सगळे प्रकार घरी होतात पण आजीच्या हातची चव अजून जिभेवर आहे. दररोजची भाजी भाकरी पण चवीने खाणारा वैदर्भीय माणूसच. YOU CAN TAKE A MAN OUT OF VIDARBHA BUT YOU CANNOT TAKE VIDARBHA OUT OF HIM!

मधुरा देशपांडे's picture

23 Oct 2015 - 4:08 am | मधुरा देशपांडे

कचोरी नाही हो विसरली बोकाभाऊ. ते लिव्हेल हाय ना शेगाव पेशल आयटम म्हनुन. हां जरा घाईत कचोरीचं आजुन जास्तीचं वर्णन र्‍हायले असीन. :) तूरडाळ खिचडी राहिली हेही आत्ता लक्षात आले.
प्रतिसादाबद्दल आणि खास करुन "दररोजची भाजी भाकरी पण चवीने खाणारा वैदर्भीय माणूसच. YOU CAN TAKE A MAN OUT OF VIDARBHA BUT YOU CANNOT TAKE VIDARBHA OUT OF HIM!" यासाठी धन्यवाद आणि फेसबुकावरचा अंगठा.

पद्मावति's picture

24 Oct 2015 - 8:16 pm | पद्मावति

आई ग...काय सही लिहिलयस. किती मस्तं ते पदार्थ आणि लिहिण्याची शैली तर त्या पदार्थांच्या तोडिस तोड...खमंग, खुसखुशीत, चुरचुरित...
मस्तं, मस्तं लेख.

विदर्भात अजिबात येणार नाही. कधी आलोच तर लक्षात ठेवायचं -
१. तिखट अजिबात नको.
२. आग्रह अजिबात नको.
३. आणि गोड तर काही आपल्याला आवडत नाही. ;-)

लेख भारी लिहिलाय. अकोल्याच्या पाणीपुरीबद्दल बरेच ऐकलंय.

नागझिर्‍याला वा ताडोबाला आलो तर वैदर्भीय पाहुणचाराचा आस्वाद नक्कीच घेईन.