जायफळाच्या सालींचे लोणचे आणि मुरांबा

अनन्न्या's picture
अनन्न्या in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:34 pm

पाककृती देण्यापूर्वी जायफळाचे झाड ज्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी हा फोटो.

jayfal

ही झाडावर दिसणारी फळे खालच्या बाजूने तडकतात आणि त्यातून जायफळ मिळते. जायफळ, त्यावर कडक आवरण, जायपत्री आणि त्यावर जाड साल असते. हे साल चवीला आंबट असते. त्यामुळे त्यापासून लोणचे, मुरंबा होऊ शकेल असे वाटले म्हणून हा प्रयोग. साली अशा दिसतात.

jayfal

जायफळाचे लोणचे

साहित्यः जायफळाच्या साली अर्धा कि., १०० ग्रॅ. तयार लोणचे मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद.

कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून घ्यावे. आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. मीठ लावून अर्धा तास ठेवाव्यात. अर्धी वाटी तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करण्यास ठेवावी. अर्ध्या तासाने फोडीमध्ये तयार लोणचे मसाला, गार झालेली फोडणी मिसळावी. एक दोन दिवसांनी लोणचे मुरते. याच्या फोडी चावून खाल्ल्यास अगदी कैरीसारख्या लागतात. खरं तर या सालींना जायफळाचा वास येतो. पण लोणच्यात तो जराही जाणवत नाही.

jayfal

जायफळाचा मुरंबा:

साहित्य: जायफळाच्या साली, सालींच्या वजनाएवढी साखर. जायपत्री एक दोन तुकडे.

कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. तयार फोडी थोडे पाणी घालून कुकरला दोन शिट्या करून वाफवून घ्याव्या. या फोडी शिजल्यावर चाळणीवर ओतून घ्याव्या. त्याचे पाणी आपल्याला पाकासाठी वापरायचे आहे. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात घ्यावी. त्यात फोडींचे आलेले पाणी मिसळावे. पाणी साखर बुडेपर्यंत नाही झाले तर थोडे साधे पाणी साखरेत घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डिशमध्ये घातल्यावर पसरला नाही की त्यात शिजवलेल्या फोडी घालाव्यात. जायपत्रीच्या एक दोन पाकळ्या घालाव्या (ऐच्छिक. फोडी घातल्यावर पाक परत थोडा सैल होतो. पुन्हा डिशमध्ये घातल्यावर पसरणार नाही एवढा वेळ शिजवावे. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा. या फोडींना आंबट चव असल्याने मुरंबा मस्त लागतो. आणि जायफळाचा वासही येतो. जायपत्रीही वासासाठीच असते, म्हणून ती घातली पाहिजे असे नाही. या मुरंब्याला सुंदर गुलाबी रंग येतो.

jayfal

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 1:59 pm | पैसा

कसलं सुंदर दिसतंय!! मस्त, एकदम नवीन कृती!

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 2:14 pm | प्रीत-मोहर

ए घरी जायफळ असुन ही हे करायच काही सुचल नाही. कोई नही आता करेन.
पाकृ अफाट सुंदर आहे हे फोटो प्रुव करतात

जायफळाचे असे उपयोग पहिल्यांदा बघतीये.
सुरेख फोटो.रंग सुंदर आलाय मुरांब्याला.

नवीनच माहिती ही जायफळाबद्दल.गुलाबी रंग किती छान आलाय मुरांब्याला.

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 2:21 pm | मधुरा देशपांडे

हे सगळे पहिल्यांदाच बघतेय. छान फोटो आणि माहिती.

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:39 pm | सामान्य वाचक

जायफलाचे हे प्रकार फारच नविन आहेत

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2015 - 1:43 pm | स्वाती दिनेश

वेगळेच लोणचे आणि मुरांबा!
मस्त!
स्वाती

बाटली रिकामी करुन परत देणेत येईल.... पुन्हा भरण्यासाठी.

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:08 pm | सानिकास्वप्निल

जायफळाचा असाही पाककृतीत वापर होऊ शकतो याची कल्पना पण केली नव्हती.
एक नंबर पाककृती दिल्या आहेस अनन्नया, मुरांब्याला सुरेख रंग आलाय.
सुं द र !!
__/\__

बिन्नी's picture

20 Oct 2015 - 7:27 am | बिन्नी

वेग्ळीच पाकक्रुती

पण हे खल्ल्याव र झोप येत नाही का ?

हे पदार्थ कल्पनेच्या पलिकडले आहेत. एकतर जायफळाचं झाड घरी राहू देत, आजूबाजूलाही सहसा नसतं. असल्यास त्यापासून इतके मस्त पदार्थ करता येतील हा विचार तुला सुचला याचे कौतुक वाटते. फोटू आवडले.

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2015 - 11:52 am | पिलीयन रायडर

अगदी अगदी..

एकतर जायफळाचे झाडच पाहिलेले नाही.. त्यामुळे त्याचा असाही पदार्थ बनु शकतो?!!
आणि काय रंग आलाय ग!! माशाल्ला!!

भुमी's picture

21 Oct 2015 - 1:07 pm | भुमी

मी पहिल्यांदाच पहातेय ,रंग छान आलाय मुरांब्याला.

मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकले ह्या पाकृंबद्द्ल. जायफळाचे झाड सुद्धा पहिल्यांदा बघितले.

मितान's picture

24 Oct 2015 - 8:00 pm | मितान

सुरेख दिसतायत फोटू !!
तोंडाला पाणी सुटले.

सुपर्बप्रतिम! खल्लास्सुंदर!

अनन्न्या's picture

26 Oct 2015 - 5:04 pm | अनन्न्या

धन्यवाद सर्वांचे!

विशाखा पाटील's picture

28 Oct 2015 - 11:37 am | विशाखा पाटील

मस्त फोटो! नवीनच पदार्थ कळले...

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:27 pm | कविता१९७८

वाह , पहिल्यांदाच ऐकलय, जायफळाच्या सालीचे ही लोणचे असते असे, मस्त दिसतय.

Maharani's picture

31 Oct 2015 - 3:20 pm | Maharani

भारीच एकदम..

शिल्पा नाईक's picture

5 Nov 2015 - 4:34 pm | शिल्पा नाईक

अलिबाग कडे, बहुतेकांच्या घरी जायफळाच झाड पाहिलेय अन अस लोणचं पण.. मस्त लागत. एक मस्त जायफळाची चव लागते खाताना. मुरंबा मात्र पहिल्यान्दाच बघतेय.