भारत आणि जगभरच्या काठीपूजेचा शोध घेता घेता मेपोल - एक आनंदोत्सव हा लेख मिपावर लिहिण्याचा योग आला. मिपा सदस्यांनी बगाड नावाच्या पश्चिम महाराष्ट्रातील परंपरे बद्दल माहिती दिली ज्यात थोडक्यात लाकडाची क्रेन बनवून त्या क्रेनने चक्क माणुस/माणसे उंच उचलली आणि फिरवली जातात. हे सर्व देवाच्या नावाने नवस करून केले जाते अर्थात अजून थोडा शोध घेतल्या नंतर हे केवळ महाराष्ट्रात नाही प्रथा पश्चिमबंगाल ते महाराष्ट्र आणि मधात येणारा आदीवासी पट्ट्यातून किंमान इंग्रजांच्या आधी पासून वेगवेगळ्या नावाने प्रचलित असावी असे दिसते आहे. एका इंग्रज अभ्यासकाचा १९१४चा वृत्तांत इंग्रजी विकिस्रोतावर आहे (जो माझ्याच्याने पूर्ण वाचवला नाही!)
बगाड परंपरेचा उल्लेख असलेला-संत एकनाथांची गाथेचा (संत तुकारामाच्या गाथेचा सुद्धा) संदर्भ दिसतो आहे म्हणजे महाराष्ट्रात किमान १६व्या शतकापासून प्रथा सुरु असावी.
मराठी बातम्यात एका ठिकाणी माणसा एवजी हनुमानाची मुर्ती बगाडाच्या क्रेनने उचलून नेण्याची परंपरेत सुधारणा केली गेली हे वाचून बरे वाटले. माणसांना उंचावरून फिरवून आणण्यात गैर नाही ते इतरही मार्गांनी करता येते आज तंत्रज्ञानही बरेच विकसीत झाले आहे कदाचित त्याची कास धरता येईल पण बहुतेक ठिकाणी स्त्रीपुरुषांच्या पाठीत लोखंडी हुक घुसवून (तेही कोणत्याही वैद्यकीय पाठबळा शिवाय) उचलणे अथवा त्यांचे हात बांधून त्यांना उचलणे वाचतानातरी अमानुषपणाचे वाटले. परंपरा असाव्यात पण त्या आनंदाचा सोहळा व्हाव्यात कुठलेही आनंदसोहळे दुसर्याव्यक्तीच्या/प्राण्याच्या शारीरीक क्लेषावर (तेही अमानुष) आधारीत असू नयेत जरी ती व्यक्ती स्वतःच्या मर्जीने क्लेष सहन करत असली तरीही. आमेरीकेतील एक जमात अगदी असाच प्रकार पण चक्क छातीला पिअर्सींग करून करते. आफ्रीकेतील एक जमात काठीपूजेचा आधार खर्या खुर्या स्त्रीयांच्या विचहंटींग करता वापरते. अमानुष प्रकार वगळून आनंद सोहळे आनंदाने साजरे करावयास शिकले पाहीजे असे वाटते. बाकीच्या जगात बहुतांश काठी पुजांमध्ये किमान माणसाशी कोणती अमानुषता नाही. सण, परंपरा आणि जत्रांचा आनंद सर्वांना आणि प्रत्येकाला (अनावश्यक क्लेषा शिवाय) घेता आला पाहिजे ज्या ठिकाणच्या बगाड परंपरेत सुधारणा झाली नाही अशा बगाड लावणार्यांनी एवढी एक सुधारणा करणे जरूरीचे आहे.
* झि टिव्ही वरील दृकश्राव्य वृत्त
चरक उत्सवात एकाच वेळी चार व्यक्तींंना पाठीत गळ लावून फिरवतानाचे कलकत्त्यातील दृष्य बिनॉय घोष यांच्या इतिब्रित्त्तातून - इसवि सन १८४९-१८५०
छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
*गोहाटी हायकोर्टास चरकपुजेची सुट्टी-२०१३ मिळत असलेला एक आंजावरील एक रोचक संदर्भ पिडीएफ (ह्यावरून बंगाल आणि आसाम मधील या उत्सवाचे महत्व अधोरेखीत व्हावे)
प्रतिक्रिया
2 Oct 2015 - 12:51 pm | प्यारे१
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाई तालुका(सातारा) मध्ये बावधन चं बगाड़ जास्त प्रसिद्ध आहे. अजूनही काही गावांमध्ये बगाड़ असतं पण बावधन जास्त प्रसिद्द आहे. त्यात बगाड़ म्हणजे आपण म्हणता तशी लाकडी क्रेन असते. त्यात उभ्या लाकडाला केंद्रस्थानी त्यावर एक आडवं लाकूड मेल फीमेल करून वरुन बसवालेलं असतं. ते गोल फिरू शकतं. हे सगळं लाकडी रथामध्ये असतं.
बांधून घेतल्या जाणाऱ्या माणसाला बगाड्या म्हणतात. बगाड्या असतो त्यानं आपला नवस पूर्ण झाल्याच्या श्रद्धेनं बगाड्या होण्याचं कबूल केलेलं असतं. कोण बगाड़ घेणार हे देवाचा कौल घेऊन ठरतं. यात्रेच्या आधी काही दिवस तो एकदम नैष्ठिक जीवन जगतो. ठराविक कपडे, चप्पल न घालणे, मांसाहार दारु नाही, बहुतेक सेक्स सुद्धा नाही असे काही नियम आहेत.
बावधनच्या बगाड्याला बगाडाला बांधलं जातं. टोचलं जात नाही. लाकडी सांगाड्याच्या रथामध्ये उभं लाकूड मध्ये असतं आणि हा रथ त्या बगाड्याला बांधलेल्या स्थिति मध्ये प्रदक्षिणेसाठी फिरवला जातो. वरचं आडवं लाकूड गोल फिरत असतं. बैल आणि माणसं रथ ओढ़त असतात. कधी कधी अपघात सुद्धा होतात अशी बातमी आहे. वरच्या माणसाचे हाल त्या प्रदक्षिणेवेळी जास्त होतात.
2 Oct 2015 - 1:00 pm | माहितगार
बावधानच्या बगाड मध्ये पाठीत टोचणाची शारिरीक इजा नाही हे वाचून त्यातल्या त्यात बरे वाटले. पण हात बांधूनही उचलण्या पेक्षा सरळ गाड क्रेनच्या समोरून बगाड्यासाठी झोपाळ्यात निवांत बसण्याची सोय करण्यास हरकत नसावी असे वाटते. प्रत्येकाची स्नायु आणि हाडांचे सांधे असा ताण घेऊ शकतात का माहित नाही डॉक्टर मंडळीच सांगू शकतील.
2 Oct 2015 - 1:05 pm | प्यारे१
अगंबाई अरेच्चा मध्ये संजय नार्वेकर ला जसं दाखवलं आहे तसंच असतं. तरी कंफर्म करून सांगतो.
2 Oct 2015 - 1:04 pm | माहितगार
पश्चिम बंगालात यास चक्रपुजा म्हणतात कारन बगाडास समोर चक्रच असते आणि एका चक्रास एका वेळी चार चार बगाडे पाठीतल्या टोचण्यांनी उचलून गोल चक्राकार फिरवले जातात. वाचून आणि फोटो पाहून कसे तरी वाटले.
2 Oct 2015 - 1:06 pm | प्यारे१
कमल हसन (कमलाहासन) च्या दशावतार मध्ये पहिला वैष्णव कमल हसन तसा दाखवला आहे.
2 Oct 2015 - 5:59 pm | माहितगार
रोचक माहिती पण मला एका वाचण्यात जे खूपल ते चित्रपट पाहणार्यांना खुपल नाही का ? रविंद्रनाथ टागोर राहात त्या गावाजवळ आदीवासी क्षेत्रात २१ व्या शतकातही खर्याखुर्या स्त्रींयाच्या विचहंटची प्रथा शिल्लक असावी, वाई गावात लक्ष्मणशास्त्रींंनी आख्ख्या महाराष्ट्रातले बुद्धीवंत गोळा केले जवळ पण जवळ त्याच तालुक्यातला समाज आपल्या धारणांमध्ये समयोचीत सुधारणा करु शकत नाही मानवी स्वभावाचे नवल आहे एकुण !
2 Oct 2015 - 2:20 pm | दिवाकर कुलकर्णी
गदिमांच्य़ा हॅलो मि.डेथ ,या लेखात बगाडाचा उल्लेख आहे,
2 Oct 2015 - 5:51 pm | माहितगार
गदिमांच्या लेखाचे स्वरुप ललित (काल्पनिक) लेखनाचे आहे का ललितेतर लेखनाचे आहे
2 Oct 2015 - 2:25 pm | श्रीगुरुजी
पुण्याजवळील आयटी पार्क असलेल्या हिंजवडी गावात दरवर्षी स्थानिक देवस्थान म्हातोबाच्या उत्सवाच्या वेळी पाठीत हूक घुसवून बगाड केले जाते.
2 Oct 2015 - 5:54 pm | माहितगार
होय हे आंजावर वाचले. पाठीत हूक प्रकार सोडला तर बाकी बगाड रचना रोचक वाटली, वाई तालुक्यातील बगाड गाडीस ओढण्यासाठी आठ आठ बैल लावले जातात असे वाचले.
3 Oct 2015 - 6:05 pm | सत्याचे प्रयोग
बगाड हिंजवडी गावात येत असते. दरवर्षी हनुमान जयंतीला येथील यात्रा भरते.
डिट्टो अगं बाई अरेच्चा सारखच असते बगाड
2 Oct 2015 - 2:27 pm | आदूबाळ
हम्म. भा रा भागवतांनी एक फास्टर फेणे कथाही "बगाड" रुढीवर बेतली आहे.
हा प्रकार विदर्भातही असतो का? वरूड बगाजी नावाच्या गावी?
2 Oct 2015 - 5:47 pm | माहितगार
या प्रश्नाचे कुतुहल आहे
2 Oct 2015 - 11:16 pm | श्रीरंग_जोशी
विदर्भात बगाड किंवा त्यासारखा इतर कुठला प्रकार आजवर तरी पाहिला नाही. अगं बाई अरेच्या या चित्रपटामुळे असं काहीतरी असतं हे प्रथमच ठाऊक झालं.
विदर्भात मंदिरांमध्ये पशु-पक्ष्यांचे बळी दिले जात असल्याचही कधी पाहिलं नाही. मध्यंतरी पुणे मुंबई रस्त्यावरच्या कार्ला येथील देवीच्या मंदिरात गेलो असता लोक अगदी राजरोसपणे बळी देण्यासाठी पशु पक्षी नेताना दिसले.
बाकी लेखाच्या आशयाशी सहमत.
हे वाक्य असे असायला हवे
'इ', 'आत', 'वर', 'मध्ये' हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात. त्यांना एकमेकांशी जोडणे हे व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे असे आम्हाला शाळेत शिकवले गेले आहे.
त्याखेरीज मध्य भारतातला आदिवासी पट्टा असा उल्लेखही चालला असता.
3 Oct 2015 - 2:34 am | मधुरा देशपांडे
विदर्भात मीही याबद्दल कधी ऐकले नाही. पण बळी प्रकार मात्र आहेत. प्रमाण कमी असेल पण आहेत.
3 Oct 2015 - 2:40 am | श्रीरंग_जोशी
जेवढे मी ऐकले आहे त्यानुसार गाडगेबाबांनी केलेल्या प्रबोधनामुळे बळी देण्याचे प्रकार अनेक दशकांपूर्वीच विदर्भातून हद्दपार झाले.
वृत्तपत्रांतल्या बातम्यांमध्येही कधी उल्लेख दिसला नाही.
3 Oct 2015 - 2:45 am | मधुरा देशपांडे
हो प्रमाण अगदी कमी असेल पण आमच्या गावातल्या देवीच्या मंदिरात हे प्रकार व्हायचे. गेल्या आठ द हा वर्षातले माहित नाही पण तोवर होते. आता त्याहुन कमी किंवा बंद झाले असतील तर चांगलेच आहे.
3 Oct 2015 - 5:14 pm | मित्रहो
हा प्रकार ऐकलेला नाही. विकीपिडीयानुसार वरुड बगाजी हे गाव धामणगाव जवळ आहे. तिथेही काही ऐकल्याचे आठवत नाही. तरीही शोध घ्यायला हरकत नाही.
विदर्भातला नाही पण जवळच असनारा अमानुष प्रकार म्हणजे पांढुर्णा आणि सावरगावमधे होनारी गोटमार. आजही प्रथा सुरु आहे की नाही माहीत नाही.
3 Oct 2015 - 11:19 pm | माहितगार
हेही प्रथमच वाचतोय आपला प्रतिसाद वाचल्यानंतर गूगल केले तर, गावे मध्यप्रदेशची (सीमावर्ती) असली तरी बहुसंख्य गावकरी मराठीच असावेत असे दिसते, मनुष्य हानी पाहील्यानंतर हा गोटमार सोहळ्यापुढे बगाड काहीच नाही वाटावे ! प्रेमकथेच्या नावाने दोन गावातल्या लोकांनी दिवसठरवून पिढ्यांपिढ्या दगडमारीचा सोहळा करणे कमाल आहे ! हिंदी विकिपीडियावर चक्क गोटमार मेला नावाचा लेख आहे. पांढुर्ण्याच्या गोटमारीत ५०५ जखमी हि ऑगस्ट २०१४चे लोकमत वृत्त दिसते आहे. ह्यावर्षी प्रशासनाच्या सख्तीमुळे का काय घायाळांचा आकडा ११० एवढा कमी झालेला दिसतो.
3 Oct 2015 - 11:28 pm | श्रीरंग_जोशी
मी लहानपणी वरुडला काही वर्षे राहीलो आहे. तिथून मध्यप्रदेशातल्या मुलताई जिल्ह्यातले पांढुर्णा गाव जवळच आहे. तेव्हा आमच्या ओळखीचे एक गृहस्थ गोटमार मेळ्यात सामील झाले होते व स्वतःच्या गुडघ्यावर जखम करून घेतली होती. पूर्ण बरे व्हायला सहा महिने लागले होते.
या मेळ्यासाठी तिथलं प्रशासन छोटे गोटे उपलब्ध करून देतं तसेच अॅम्ब्युलंसेसही अगोदरच तयार ठेवते. तसेच कलेक्टरपासून अनेक गणमान्य व्यक्ती लांबून दुर्बिणी वगैरे घेऊन क्रिकेट सामन्यासारखा या प्रकाराचा आस्वाद घेतात.
हा प्रकार बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.
4 Oct 2015 - 12:33 am | मित्रहो
नाही परंतु लोक जखमी होतात. खरे खोटे माहीत नाही परंतु बऱ्याचदा जखमी व्हायला त्यात सामील होतात. बघायला जानाऱ्यांना पण फार लांबून हा प्रकार बघावा लागतो. गाड्या पार्कींगची सोयसुद्धा लांब असते. वैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध असते असे ऐकले. मी या दोन्ही गावात गेलोय (९७ मधे) पण गोटमार बघितली नाही. इथली मुख्य भाषा मराठीच. पांढुर्णा, सावरगाव, नरखेड, काटोल, वरुड (पुढे जाउन मोर्शी, अचलपूर, परतवाडा) हा संत्रा पिकवनारा पट्टा आहे. पूर्वी म्हणजे कापूस एकाधिकारशाहीच्या काळात विदर्भातले शेतकरी कधी कधी कापूस पांढुर्ण्यात विकायचे. पांढुर्णा आणि सावरगाव या चांगल्या बाजारपेठा आहेत. रेमंडचा एक प्लँट पांढुर्ण्याच्या जवळ होता आता आहे की नाही माहीत नाही. मागे या गोटमारीची टिव्हीवर बरीच चर्चा झाली होती तेंव्हा आता कमी झाली असेल असे मला वाटले.
4 Oct 2015 - 7:51 am | माहितगार
खेळात जाणारे लोक स्वेच्छेने जात असणार यात वाद नाही पण तरीही ...
प्रतिसाद दुव्यात दिलेल्या लोकमतवृत्त्तात गेल्या ६० वर्षातील जिवीत हानी (१२) नावासहीत नमुद केलेली दिसते. आणि पहिली ओळ "अनेकांना कायमचे अपंगत्व : अघोरी प्रथेपुढे प्रशासन हतबल" अशी आहे.
आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आणि चर्चेत सहभागासाठी आभार
2 Oct 2015 - 10:42 pm | सिरुसेरि
भा रा भागवतांनी अशीच एक "बन्याचे बारा गाडया प्रकरण" हि फास्टर फेणे कथा लिहिली आहे. त्यामध्ये देवीच्या जत्रे मध्ये एकटा माणुस बारा गाडया ओढुन नेतो . हि पद्धतही धोकादायक वाटते .
2 Oct 2015 - 3:57 pm | पैसा
कोकण गोव्यात बगाड आहे. मी लहान असताना राहिले त्या रत्नागिरीजवळ बसणी गावात महालक्ष्मी रवळनाथाची बगाडाची जत्रा असते. त्यात उंच खांबावर असे गोल फिरणारे मोठे लाकूड (खांबासारखे) असते. त्याला लाट म्हणतात. मी लहान असतानापासून पाठीत हुक घालणे वगैरे प्रकार कधी तिथे पाहिले नाहीत. त्या आडव्या लाटेच्या टोकाला बांधून लोकांना फिरवले जायचे. गोव्यात साळ, कुडणे, पैंगिणी इ. ठिकाणी गड्यांची जत्रा असते. पैंगिणीला बगाड प्रकारच्या एका प्रथेचा उल्लेख वाचला आहे. मात्र पाठीत टोचून घेतात का ते माहीत नाही.
2 Oct 2015 - 5:50 pm | माहितगार
लेखात झि टिव्ही च्या बातमीचा दुवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावातला आहे जिथे पाठीत हूक लावले जाते असे दिसते.
4 Oct 2015 - 1:30 am | रेवती
मी एकदा प्रत्यक्ष बघितलेय. फारसे आवडले नाही.
4 Oct 2015 - 4:29 pm | भीमराव
बगाडावर काथ्याकुट, मस्तय भाऊ.
बगाड प्रथा म्हनुन थोडसं अमानुश आहे हे मान्य आहे, पन त्या यात्रेतला तो माहोल, तिथला जोश वाकरीतनं दगडी चाकाचं बगाड पळवत न्हेनं, ह्याची तोड कुठल्याच टायपाच्या एडवेंचर ला नाही येनार.
5 Oct 2015 - 2:08 pm | माहितगार
आनंद धाडस (अॅड्वेंचर) इतर अनेक मार्गांनी साध्य करता येतात; मानव किंवा खालील प्रतिसादात 'अमित मुंबईचा' यांनी म्हटल्याप्रमाणे प्राण्यास अनावश्यक क्लेष होत असेल तर असा आनंद निर्मळ राहत नाही सोहळे करा बगाडही पळवा आनंद आणि साहसही मिळवा, पण अमानुषता शिल्लक राहणार नाही असा काही तरी बदल होणे गरजेचे आहे.
चर्चेत सहभागासाठी आभारी आहे.
5 Oct 2015 - 12:33 pm | अमित मुंबईचा
जानावरांचा अमानुष छ्ळ असतो एथे, माझ आजोळ सुरूर(वाई,सातारा) हे गाव आहे, तिथेही बगाड असत. माझे मामा त्यांचे बैल कधीच बगाडासाठी देत नाहीत. काही लोक व्ययक्तित वैर या प्राण्यांवर काढतात. मी ऐकलाय की हे लोक अगदी सिगरेट चे चटके देतात, दाताने शेपूट चावतात. आणि महामार्ग गावातून जात असताना देखील मुद्दामहून शेता मधून घेऊन जातात. जास्त त्रास व्हावा म्हणून....
5 Oct 2015 - 3:45 pm | माहितगार
तुकाराम महाराजांच्या मराठी विकिस्रोतावर उपलब्ध अभंग गाथेत 3558 क्रमांकावर खालील अभंग दिला आहे. याचा काँटेक्स्ट आणि अर्थ माहित करून हवा आहे.
दगडाच्या देवा बगाड नवस । बाइऩल कथेस जाऊं नेदी ॥1॥
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी॥ध्रु.॥
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥2॥
करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥3॥
तुका ह्मणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥4॥
संदर्भः तुकाराम गाथा/गाथा ३३०१ ते ३६००. (२०१२, मार्च २९). विकिस्रोत, . Retrieved १०:१०, ऑक्टोबर ५, २०१५ from तुकाराम महाराजांच्या मराठी विकिस्रोतावर उपलब्ध (तुकाराम_गाथा/गाथा_३३०१_ते_३६००) अभंग गाथेत 3558 क्रमांकावरील अभंग
5 Oct 2015 - 3:50 pm | माहितगार
हा अभंग प्रक्षिप्त नसेल तर महाराष्ट्रातील बगाड परंपरेचा संदर्भ १७व्या शतकाच्या मध्या पर्यंत मागे जातो, पण तसे असेल तर इतर संतांच्या साहित्यात काहीतरी उल्लेख मिळावयास हवेत, कदाचित त्याकाळातील इतर संत वाङमयात बगाड प्रथा वेगळ्या नावाने उल्लेखीत असल्याची शक्यता असू शकेल का ?
5 Oct 2015 - 4:36 pm | माहितगार
हिंजवडीच्या महातोबा (कि म्हातोबा ?)च्या बगाडची साद्यंत कहाणी आंजावर एका लोककाव्यात/ ओवीत दिसली. बहुतेक शब्द समजत आहेत पण काही शब्द अथवा त्यांचे संदर्भ माहित नाहीत. या ओवीचा मतितार्थ आणि रसग्रहण करून मिळाल्यास हवे आहे.
5 Oct 2015 - 7:04 pm | माहितगार
खेटे घालणे, कावडी घालणे, वारी मागणे, आडजूड जाणे, बगाड घेणे, हाळावरून म्हणजे इंगळावरून चालणे, गळ, इंगळ आणि पवाडा (पोवाडा नव्हे), वारे घेणे,
कर्माचे प्रकार नित्य, काम्य आणि नित्यकाम्य; श्रौत, स्मार्त व पौराणिक म्हणजे काय ?
संदर्भ डॉ . प्रकाश खांडगे यांचा दिवस मजेचे सुरू जाहले हा दैनिक नवशक्तीतील लेख.
5 Oct 2015 - 7:34 pm | माहितगार
वेषधार्यांच्या भावना ~ संत एकनाथांच्या गाथा (संदर्भ: ट्रांसलिटरल डॉट ऑर्ग -- दिनांक:५/१०/२०१५ सायं १९.३२ वाजता जसे पाहीले--वर अभंग गाथा क्रमांक २५९९)
येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥
दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥
रांडापोरें घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥
आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥
एका जनार्दनीं ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥
5 Oct 2015 - 7:39 pm | माहितगार
संत एकनाथांच्या साहित्यातीलमुळे उल्लेख बगाड परंपरा आणि बगाड शब्द किमान सोळाव्या शतका पर्यंत मागे नेतो.
29 Oct 2015 - 6:26 pm | माहितगार
आंध्रप्रदेशात नवरात्रात सिरिमानू वर बसून पुजारी मिरवून घेतात तेथेही जत्रेला तीनेक लाख लोक असतात. या इंडियन एक्सप्रेस वृत्तात दाखहवल्या प्रमाणे बगाडाला व्यवस्थीत खुर्ची बांधून खुर्चीवर पुजार्यास सन्मानाने बसविलेले दिसते. पाठीत खिळे टोचणे दिअस नाही.
वोलादोरेझ नावाचे मेक्सिकोतील वेगळ्या देवाचे बगाड छायाचित्र : (यात दोरी कंबरेला बांधलेली असते हे ही अपघात प्रवण आहे)
29 Oct 2015 - 6:44 pm | रुस्तम
पेण वाशीच्या यात्रेत पण असत अस.
28 Feb 2018 - 9:36 pm | माहितगार
केरळातील कुठीयोट्टम येथील शाळकरी मुलांच्या अंगाला भोके पाडण्याची प्रथा चर्चेत आली आहे. बगाड प्रमाणे उंचावर लटकवणे नसले तरी अमानुष पद्धतीने भोके पाडणे अनुचितच आहे. संगित नृत्याच्या परंपरा श्रद्धा म्हणून पाळाव्यात , श्रद्धेच्या नावावर अमानुषतेची गरज नसावी .