बाप्पाचा नैवेद्य : मोदक

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
20 Sep 2015 - 6:38 am

गणेशोत्सव असल्याने मोदकांच्या पाककृती देत आहे.

१) आंब्याचे मोदक
सारणासाठी साहित्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आंब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्धा चमचा साजूक तूप

पारीसाठी साहित्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी किंवा तेल, अर्धा चमचा मीठ, पाणी

कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तूप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे.
एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी किंवा रिफ़ाइंड तेल (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅस बारीक करून वाफ आणावी. पाच मिनीटाने गॅस बंद करावा.

नंतर त्यातील उकड काढुन घेउन, तेल पाण्याचे हाताने चांगली मळून घ्यावी. या उकडीचा लिंबा एव्हढा गोळा करुन, त्यात एक चमचा सारण घालून पारीला पाकळ्यांचा आकार देउन मोदक बंद करावा.
तयार झालेले मोदक मोदकपात्रात उकडुन घ्यावेत.

वरुन साजूक तूप घालून बाप्पाला नेवेद्य दाखवावा.
.

2) पंचखाद्याचे मोदक
या सारणात "ख' पासून सुरु होणारे ५ पदार्थ घाला.
खोबरे, खसखस, खडीसाखर, खवा, खारीक, खिसमिस

पारीसाठी - एक कप बारीक रवा, एक कप मैदा, २ चमचे बेसन, दोन चमचे साजूक तुपाचे मोहन (तूप पातळ करून घ्या) दूध व पाणी कोमट करून पीठ भिजवा. २ तास राहू द्या. छान मळून घ्या.

सारणासाठी - किसलेले सुके खोबरे भाजून एक कप भाजलेला खवा अर्धा कप, खारकेची पूड, २ चमचे भाजून कुटलेली खसखस, एक टेबलस्पून खडीसाखर व टेबलस्पून हे सर्व साहित्य एकत्र करा. मिश्रणाच्या निम्मी पिठीसाखर घाला. यात इच्छा असल्यास बेदाणे(खिसमिस) घालता येतील.

कृती - पिठाच्या एकसारख्या लाट्या करून, मध्ये किंचित जाड व कडेने पातळ पुऱ्या लाटून घ्या. पुरीला चुण्या देऊन सारण भरून मोदकाचा आकार द्या. मग गॅसवर तळून घ्या. मोहनासाठी तूप वापरला असल्याने रिफाइंड तेलात तळा. हे मोदक उकडीच्या मोदकांसारखे फार मोठे करू नका.

३) उकडीचे मोदक

गणपती बाप्पाला हे मोदक खूप आवडतात!

साहित्य ---

पारीकरता -
२ वाट्या तांदुळ पिठी ,२ वाट्या पाणी
१ चमचा साजुक तुप किंवा तेल , चवीपुरते मीठ .
सारणाकरता -
१ मोठ्या नारळाचा चव (ओले खोबरे)
२०० ग्राम गूळ , पांढरे तीळ, केशर (केशर पाक), वेलदोड्याची पूड ,जायफळ पूड,

सुका मेवाः- काजु, बदाम
कृती-

सारण - खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेवावे व ढवळत राहावे. त्यात तीळ, जायफळ पूड ,वेलची पूड व केशर (केशर पाक) घालावे. सारण कोरडे झाले की खाली उतरावे.
सुका मेवा चिरुन एकत्र करावा.

उकड -

पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात १ मोठा चमचा साजुक तुप व चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात तांदुळ पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.

ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी.
उकडीचा छोटा गोळा चांगला मळून घ्यावा. प्लास्टिक पेपर वर गोळ्याची पुरी थापावी/लाटावी. पुरीला वाटीचा आकार द्यावा. शक्य तेवढी पातळ वाटी करावी. वाटी डाव्या हाताच्या तळव्यावर घ्यावी. त्यात सारण भरावे व सुका मेवा भरावा. आता वाटीला चिमटीने जवळ जवळ निऱ्या घालाव्या. निऱ्या करताना हाताला पाणी लावून घ्यावे. निऱ्या झाल्यानंतर उजव्या हाताने एकत्र आणून बंद करवी. हे सगळे अत्यंत हलक्या हाताने करावे.

या प्रकारे सगळे मोदक करून घ्यावे व मोदकपात्रात / इडलीपात्रात / कुकरमधे (शिटी काढून ) चाळणीला तुप लावून उकडावे. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा.
.

४) खवा मोदक --

साहित्य- एक वाटी ताजा खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड एक टी स्पुन.
कॄती- प्रथम खवा चांगला परतुन घ्यावा, जरा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलदोडा पूड मिसळून चांगले मळून घ्या व मोदकसाच्यात घालुन मोदक बनवा.

५) काजू मोदक -

साहित्य -एक वाटी काजू पावडर ,एक वाटी मिल्क पावडर ,साखर एक वाटी ,दुध पाऊन वाटी

कृती - सर्व साहित्य 180वर पॉवरकमी करून दीड मिनिटे मायक्रो करा. थोडे हलवून परत दीड मिनिटे मायक्रो करा,(ज्यांचेकडे मायक्रो नाही अशांनी साधारण पाच-सहा मिनिटे परतुन घ्यावे) बाहेर काढून त्यावर थोडी पिठी साखर व मिल्क पावडरघालून चांगले मिक्स करून थंड करून घ्या. नंतर थोडे मळून साच्यातून मोदक करा.

वरील तयार पिठात तेवढाच आंब्याचा गोळा घालून त्याचे आंबा मोदक तयार होतात.

वरील तयार पिठात कोको पावडर किंवा चोकलेट पावडर घालून चोकलेट मोदक तयार होतात.
करून पहा

(आंबा मोदक : फोटो श्रेय अजया)

प्रतिक्रिया

पियुशा's picture

20 Sep 2015 - 7:12 am | पियुशा

वाह वाह नीवुकाकू भारी दिस्तायत मोदक !

मांत्रिक's picture

20 Sep 2015 - 7:32 am | मांत्रिक

आंबा मोदक फार आवडले. अगदी झक्कास दिसताहेत.

भुमी's picture

20 Sep 2015 - 7:58 am | भुमी

छान प्रकार मोदकांचे ,आवडले.काजू मोदक करून बघणार.

मी पण काजू मोदक करणार ताई !!

स्रुजा's picture

20 Sep 2015 - 8:30 am | स्रुजा

सुरेख दिसतायेत सगळे मोदक, निवु ताई :) काजु मोदक नक्की करुन बघणार ..

नूतन सावंत's picture

20 Sep 2015 - 8:30 am | नूतन सावंत

निवुतै,
गणपतीआधी तुम्हाला नमस्कार.

मुक्त विहारि's picture

20 Sep 2015 - 9:17 am | मुक्त विहारि

पण...

सादरीकरण आवडले.

एस's picture

20 Sep 2015 - 2:56 pm | एस

मोदक खाणे ही मला एक शिक्षाच वाटते, विशेषतः दर चतुर्थीला ती भोगावीच लागते. पण सादरीकरण छान आहे.

मस्त पाकृ! आंबा मोदक फार आवडतात!!

मस्त सोप्या पाकृ.!सोनेरी मोदक छानच.
काजु-चोकलेट-आंबा मोदक आवडले.

कविता१९७८'s picture

20 Sep 2015 - 10:16 am | कविता१९७८

मस्तच ग निवु

मदनबाण's picture

20 Sep 2015 - 10:25 am | मदनबाण

वा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोरया... :- दगडी चाळ

पद्मावति's picture

20 Sep 2015 - 1:05 pm | पद्मावति

वाह..मस्तं सुंदर मोदक!
सगळेच प्रकार आवडले.

किसन शिंदे's picture

20 Sep 2015 - 1:48 pm | किसन शिंदे

हा अजया ताईंचा डूआयडी आहे का? ;)

कारण आंबा मोदकाचे हेच ताट त्यांच्या घरातल्या गणपतीसमोर पाह्यले होते परवा त्यांनी पाठवलेल्या फोटोत. :D

दु दु मेल्या किसना! आंबा मोदकाचा फोटो नव्हता ताईकडे! म्हणून माझा उसना दिलाय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2015 - 5:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि किस्ना म्हंतो आजकाल बिज्जी असल्याने मिपाकडे तितके लक्ष द्यायला वेळ मिळत नाय ! ;) :)

अजया's picture

20 Sep 2015 - 5:11 pm | अजया

बघा ना=)))

नीलमोहर's picture

20 Sep 2015 - 2:16 pm | नीलमोहर

मोदकांचे एवढे विविध प्रकार एकत्रित दिल्याबद्दल धन्यवाद..

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:04 pm | सानिकास्वप्निल

छान छान पाककृती विविध मोदकांची :)
आंबा मोदकाचा फोटो खास आवडला आहे.

स्वाती दिनेश's picture

21 Sep 2015 - 3:02 pm | स्वाती दिनेश

मोद देत आहेत मोदक!
स्वाती

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 3:10 pm | दिपक.कुवेत

एकदा आंबा मोदक खायची खुप ईच्छा आहे.