Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य : मोदक

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 20/09/2015 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव असल्याने मोदकांच्या पाककृती देत आहे. १) आंब्याचे मोदक सारणासाठी साहित्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आंब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्धा चमचा साजूक तूप पारीसाठी साहित्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी किंवा तेल, अर्धा चमचा मीठ, पाणी कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तूप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे. एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी किंवा रिफ़ाइंड तेल (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅस बारीक करून वाफ आणावी. पाच मिनीटाने गॅस बंद करावा. नंतर त्यातील उकड काढुन घेउन, तेल पाण्याचे हाताने चांगली मळून घ्यावी. या उकडीचा लिंबा एव्हढा गोळा करुन, त्यात एक चमचा सारण घालून पारीला पाकळ्यांचा आकार देउन मोदक बंद करावा. तयार झालेले मोदक मोदकपात्रात उकडुन घ्यावेत. वरुन साजूक तूप घालून बाप्पाला नेवेद्य दाखवावा. . 2) पंचखाद्याचे मोदक या सारणात "ख' पासून सुरु होणारे ५ पदार्थ घाला. खोबरे, खसखस, खडीसाखर, खवा, खारीक, खिसमिस पारीसाठी - एक कप बारीक रवा, एक कप मैदा, २ चमचे बेसन, दोन चमचे साजूक तुपाचे मोहन (तूप पातळ करून घ्या) दूध व पाणी कोमट करून पीठ भिजवा. २ तास राहू द्या. छान मळून घ्या. सारणासाठी - किसलेले सुके खोबरे भाजून एक कप भाजलेला खवा अर्धा कप, खारकेची पूड, २ चमचे भाजून कुटलेली खसखस, एक टेबलस्पून खडीसाखर व टेबलस्पून हे सर्व साहित्य एकत्र करा. मिश्रणाच्या निम्मी पिठीसाखर घाला. यात इच्छा असल्यास बेदाणे(खिसमिस) घालता येतील. कृती - पिठाच्या एकसारख्या लाट्या करून, मध्ये किंचित जाड व कडेने पातळ पुऱ्या लाटून घ्या. पुरीला चुण्या देऊन सारण भरून मोदकाचा आकार द्या. मग गॅसवर तळून घ्या. मोहनासाठी तूप वापरला असल्याने रिफाइंड तेलात तळा. हे मोदक उकडीच्या मोदकांसारखे फार मोठे करू नका. ३) उकडीचे मोदक गणपती बाप्पाला हे मोदक खूप आवडतात! साहित्य --- पारीकरता - २ वाट्या तांदुळ पिठी ,२ वाट्या पाणी १ चमचा साजुक तुप किंवा तेल , चवीपुरते मीठ . सारणाकरता - १ मोठ्या नारळाचा चव (ओले खोबरे) २०० ग्राम गूळ , पांढरे तीळ, केशर (केशर पाक), वेलदोड्याची पूड ,जायफळ पूड, सुका मेवाः- काजु, बदाम कृती- सारण - खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेवावे व ढवळत राहावे. त्यात तीळ, जायफळ पूड ,वेलची पूड व केशर (केशर पाक) घालावे. सारण कोरडे झाले की खाली उतरावे. सुका मेवा चिरुन एकत्र करावा. उकड - पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात १ मोठा चमचा साजुक तुप व चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात तांदुळ पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा. ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी. उकडीचा छोटा गोळा चांगला मळून घ्यावा. प्लास्टिक पेपर वर गोळ्याची पुरी थापावी/लाटावी. पुरीला वाटीचा आकार द्यावा. शक्य तेवढी पातळ वाटी करावी. वाटी डाव्या हाताच्या तळव्यावर घ्यावी. त्यात सारण भरावे व सुका मेवा भरावा. आता वाटीला चिमटीने जवळ जवळ निऱ्या घालाव्या. निऱ्या करताना हाताला पाणी लावून घ्यावे. निऱ्या झाल्यानंतर उजव्या हाताने एकत्र आणून बंद करवी. हे सगळे अत्यंत हलक्या हाताने करावे. या प्रकारे सगळे मोदक करून घ्यावे व मोदकपात्रात / इडलीपात्रात / कुकरमधे (शिटी काढून ) चाळणीला तुप लावून उकडावे. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. . ४) खवा मोदक -- साहित्य- एक वाटी ताजा खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड एक टी स्पुन. कॄती- प्रथम खवा चांगला परतुन घ्यावा, जरा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलदोडा पूड मिसळून चांगले मळून घ्या व मोदकसाच्यात घालुन मोदक बनवा. ५) काजू मोदक - साहित्य -एक वाटी काजू पावडर ,एक वाटी मिल्क पावडर ,साखर एक वाटी ,दुध पाऊन वाटी कृती - सर्व साहित्य 180वर पॉवरकमी करून दीड मिनिटे मायक्रो करा. थोडे हलवून परत दीड मिनिटे मायक्रो करा,(ज्यांचेकडे मायक्रो नाही अशांनी साधारण पाच-सहा मिनिटे परतुन घ्यावे) बाहेर काढून त्यावर थोडी पिठी साखर व मिल्क पावडरघालून चांगले मिक्स करून थंड करून घ्या. नंतर थोडे मळून साच्यातून मोदक करा. वरील तयार पिठात तेवढाच आंब्याचा गोळा घालून त्याचे आंबा मोदक तयार होतात. वरील तयार पिठात कोको पावडर किंवा चोकलेट पावडर घालून चोकलेट मोदक तयार होतात. करून पहा (आंबा मोदक : फोटो श्रेय अजया)

वाचने 12318
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

छान प्रकार मोदकांचे ,आवडले.काजू मोदक करून बघणार.

निवुतै, गणपतीआधी तुम्हाला नमस्कार.

In reply to by मुक्त विहारि

मोदक खाणे ही मला एक शिक्षाच वाटते, विशेषतः दर चतुर्थीला ती भोगावीच लागते. पण सादरीकरण छान आहे.

वा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोरया... :- दगडी चाळ

हा अजया ताईंचा डूआयडी आहे का? ;) कारण आंबा मोदकाचे हेच ताट त्यांच्या घरातल्या गणपतीसमोर पाह्यले होते परवा त्यांनी पाठवलेल्या फोटोत. :D

In reply to by किसन शिंदे

आणि किस्ना म्हंतो आजकाल बिज्जी असल्याने मिपाकडे तितके लक्ष द्यायला वेळ मिळत नाय ! ;) :)

मोदकांचे एवढे विविध प्रकार एकत्रित दिल्याबद्दल धन्यवाद..

मोद देत आहेत मोदक! स्वाती